गुंज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गुंज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

३ जानेवारी, २०११

बाबूकाका

डोक्याच्या घेरावर बारीक होत गेलेला पोलीसकट, पांढरे होत चाललेले केस, तरूणपणीच्या शम्मी कपूरसारखाच चेहेरा आणि अंगयष्टीही तशीच, अंगात सफारी किंवा तसलाच साहेबी वाटणारा पोषाख, हातात एक लहानशा आकाराची ब्रीफकेस असे काहीसे वर्णन करता येईल असा माणूस एसटीतून उतरण्याची वाट पाहात खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट घातलेला एक पोरगा बसस्टॅण्डवर कितीतरी वेळापासून थांबलेला असे. ते त्याचे बाबूकाका होते. बाबूकाका त्याचे आजोबा लागत असले तरी घरातील इतर सर्वजण त्यांना बाबूकाकाच म्हणत असल्याने त्याच्यासाठीही ते बाबूकाकाच होते. घरातील कुणीतरी बाबूकाका आज/उद्या येणार असं बोलत असताना ऐकलं की तो शाळा सुटताच बाबूकाका यायची वाट पाहात स्टॅण्डवरच थांबून राही. कधीकधी बाबूकाकासोबत रमाकाकू सुध्दा यायच्या. अशावेळी मात्र त्यांचा गडी चांदपाशासुध्दा गाडीबैल बसस्टॅंडजवळच्या एखाद्या झाडाखाली सोडून तिथेच बीडी फुंकत बसलेला दिसे. एस्ट्यावर एस्ट्या थांबत आणि त्यातून बाबूकाका-रमाकाकू बाहेर न पडताच निघुन जात. मग साडेसहा पावणेसात वाजता चांदपाशानं गाडी जुपून गावाकडे वळवली की तो पोरगा मागून चालत्या बैलगाडीत उडी मारून गाडीत चढे आणि चांदपाशाजवळ जाऊन बसे.
"य्या:!! ...हूं॒:!!! ... सांगायचं नाही व्हयं गाडी थांबव म्हनून? पल्डं, र्‍हायलं म्हंजी? नसलेली बला.."
बैलगाडीचा कासरा सांभाळताना खरोखर आलेला राग त्या हूं:!!! मधून दाखवत त्या पोराकडं पाहून चांदपाशा म्हणे.
"काही पडत नाही मी चांदपाशामामू.. ते जाऊ द्या.. बाबूकाका कधी येतो म्हणले होते?"
"बाबूशेट आज पंधरादी जालन्याला गेले व्हते तव्हा ह्या सुक्कीरवारी यतो म्हनून निरोप देल्ता... आजूक पत्ता नाई... येतेन उद्या.. सनवार आन रैवारी सुट्टीबी अस्ती.."
"हो!!!! उद्या बाबूकाका येणारच मग.. उद्या शनीवार.."
मग तो पोरगा शनीवारी दुपारी चार वाजता पुन्हा एकदा स्टॅण्डवर जाऊन बसे. बाबूकाका आणि रमाकाकूची खूप वेळ वाट पाहून कंटाळून जाई. आणि अचानक कुठल्यातरी एसटीतून बाबूकाका आणि डोक्यावर पदर घेतलेल्या रमाकाकू उतरताना दिसत. चेहेर्‍यावर खूप मोठं हसू घेऊन तो एस्टीतून उतरलेल्या बाबूकाकाच्या दिशेनं पळे.
"ह्हे:!!!!! पप्पुशेठ.. गाडीलेट.. गाडीचा नंबर एटीएट!!! ..." बाबूकाका त्या पोराकडं पाहून ओरडत.
"तुमी तर कालच येणार होता... चांदपाशा न मी वाट पाहून घरी वापस गेलो काल..."
"येणार होतो रे.. पण सुट्टीच मिळाली नाही.."
तेवढ्यात गावात कोतवालकी करणारा देवर्‍या कुणीही न सांगता पुढे येऊन काकांची ब्रीफकेस हातात घेई आणि रूमालाची चुंबळ डोक्यावर ठेऊन काकूची मोठी सूटकेस डोक्यावर घेऊन घराकडे चालू लागे.
मग बाबूकाकाच्या हातात हात घातलेला तो पोरगा, रमाकाकू असे सगळेजण पायीपायीच घराकडे चालू लागत. बाबूकाकासोबत हातात हात घालून चालताना त्या पाचवी सहावीतल्या पोराला खूप मजा वाटे. रस्त्यात भेटणारे, धोतर, टोपी घातलेले लोक मध्येच थांबून बाबूकाकाला रामराम! असं म्हणून रामराम घालत. बाबूकाकापण रामराम! रामराम! म्हणून प्रतिसाद देत. असं होता होता मारवाड्याचं दुकानं येई आणि तिथं बाबूकाका मुद्दाम थांबून दुकानात गिर्‍हाईकांच्या मालाची पट्टी करीत उभ्या असलेल्या बाबूशेठला "जयगोपाल शेटजी!!" म्हणत. ते ऐकताच आडदांड आकाराचे बाबूशेठ चष्यातून वर पाहात बोलत -
"अरे! तुम्ही आलात? चांदपाशा आला नाही का गाडीबैल घेऊन?.. आज कापूस वेचायला बाया लावल्यात.. तिकडं गेला असल.."
"हो, तुम्हाला बोललो होतो शुक्रवारी येईल म्हणून.. पण रजाच मिळाली नाही.. आज शेवटी निघालोच.. येतो रात्री निवांत.." असं म्हणून बाबूकाका पुढे चालू लागत.
घराकजवळ येताच त्या पोराची आजी हातात पाण्यानं भरलेला तांब्या आणि भाकरीचा तुकडा घेऊन थांबलेली दिसे. शेजारच्या ओट्यावरच सामान वाहून थकल्याने हाश्श..हुश्श करत देवर्‍या बसलेला.
"देवर्‍यानं सामान आणून टेकवलं कीच मी म्हणले, माय‌‍ऽऽ बाबू राव आले जणू... रमा, किती खराब झालात गं.." असं म्हणीत आजी बाबूकाका आणि रमाकाकूवरून भाकरीचा तुकडा ओवाळून फेकी आणि चूळ भरायला पाण्यानं भरलेला तांब्या हातात देई.
बाबूकाका मोठ्या दारातच चूळ भरून पायावर पाणी घेत आणि लगेच वाट पाहात उभ्या राहिलेल्या देवर्‍याच्या हातावर तिथल्या तिथेच दहा रूपयाची कडक नोट ठेवत. डोक्याला हात लावत देवर्‍या पुन्हा बसस्टॅण्डकडे चालू लागे. पटकन मग तो लहानसा पोरगा त्याच्या शाळेच्य वह्या बाहेर काढी आणि बाबूकाकाला दाखवायला निघे -
"काका, हे बघा, मला आता इंग्लिश वाचता येतंय...."
"हो? पाचवीलाच इंग्लीश? दाखव.." म्हणून काका त्या पोराची वही हातात घेत. तो पोरगा वही काकांच्या हातात देऊन इंग्रजीचं पुस्तक हातात धरून धडा वाचायला सुरूवात करी.. निघोज इज ए वंडरफुल प्लेस सिच्युएटेड ऑन दी बॅंक्स ऑफ रिव्हर घोड.. रिव्हर घोड हॅज क्रिएटेड मेनी पॅथहोल्स इन दी रॉक्स सराऊंडींग इट्स बोथ साईड्स..."
"ए‌ऽऽऽ इथं हे मराठीत लिहीलेलंय..." काका म्हणत..
"हो.. मला दादांनी आधी मराठीत इंग्रजी वाक्यं लिहून वाचायला शिकवलंय.." तो पोरगा त्याची बाजू सांभाळी.
"तुझे दादा काही ती जुनी पध्दत सोडणार नाहीत.. कुठे गेले दादा..?" बाबूकाका विचारत. हे दादा म्हणजे बाबूकाकाचेच सावत्र पण मोठे भाऊ.
"गायवाड्याकडं गेले असतेल.." तो पोरगा बाबूकाकाला सांगत असे.
"पप्प्या, जा बोलावून आण तुझ्या दादाला.. बाबूराव आले म्हणाव.." त्याची आजी त्याला म्हणे.
बाबूकांच्या हातात वाफाळलेल्या चहाची कपबशी देत आजी म्हणे. तो पोरगा गायवाड्याकडं पळे.
त्या पोरासाठी बाबूकाका म्हणजे नेहमीच लांबच्या गावाहून येणारं अत्यंत जवळचं, अत्यंत लाड करणारं आणि आकर्षण वाटणारं माणूस असे. बाबूकाकाबद्दल गावातल्या प्रत्येक माणसाला आदरयुक्त भीती असे, प्रत्येक माणूस कधी ना कधी त्यांना सल्ला विचारायला येत असे. बाबूकाका हे पुणे, जालन्याच्या पोलिसांच्या शाळांमध्ये पोलिसांना कायदे शिकवणारे वकील होते. पाचवीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत जालन्याच्या आर.पी.टी.एस. मध्ये बाबूकाकांकडे राहायला तो मुलगा जेव्हा गेला, तेव्हा गेट भोवती आणि घराभोवती बंदुका हातात घेऊन उभे असलेले पोलिस पाहून त्याला बाबूकाका हे कुणीतरी खूपच मोठे असल्याबद्दल खात्रीच पटली होती.
बाबूकाका म्हणजे कायदेकानू कोळून प्यालेला माणूस. कधीही कुणासमोरही खाली पाहाणार नाही. झालेच तर लोकांवर उपकार करतील, पण फुकट कुणाकडून ग्लासभर पाणीसुद्धा घेणार नाहीत. बेकार हिंडणार्‍या पोरांना काहीतरी किल्ल्या वापरून पोलिस कॉन्स्टेबलची नोकरी द्यायचा अधिकार हातात असला तरी, कायद्यानं आखलेल्या मर्यादेबाहेर जाऊन कधी कुणावर उपकार केला नाही. शिकायचं आहे ना, मग शिका - पैसा लागला तर मी देतो, पण परिक्षा पास होऊनच नोकरीत या - वशिल्याचे फालतू धंदे माझ्याच्यानं होणार नाहीत - हे त्यांच्याकडं नोकरीकरीता येणार्‍या गावातल्या तरूण लोकांना स्वच्छ सांगणं असे. त्यांच्या आश्रयानं राहून अनेक होतकरू पोरं फौजदार, सरकारी वकील या हुद्द्यावर गेली. आणि जी जावू शकली नाहीत, ती "वकील लई खडूस हाये.. साधा कॉन्स्टेबल म्हणूनपण कधी कुणा बेकार पोराला लावणार नाही" म्हणू लागली.
बाबूकाका आणि रमाकाकू येत तेव्हा न चुकता त्या मुलासाठी खार्‍या शेंगदाण्याच्या पुड्या आणत, दिवाळीत हजार रूपयांचे फटाके विकत घेऊन देत, कपडे, पुस्तके आणि तसलाच अनेक प्रकारचा लाड पुरवत. पण या बाबूकाका आणि रमाकाकूंना स्वत:चा मुलगा किंवा मुलगी कुणीही नव्हते. ते स्वत:च्या पुतण्याच्या, भावाच्या मुलांना असे प्रेम लावत. आणि मग त्या खेड्यात "आता बाबू वकील अमुक च्या मुलाला दत्तक घेणार!!" अशी अफवा उठे. बाबूकांकांचा दरारा, चार औतं, पाच-सहा गड्यांचा बारदाना आणि पन्नास-साठ एक्कर जमीन पण त्यांच्या वंशाला नसलेला नसलेला दिवा हाच एक गावातल्या लोकांसाठी चर्चेचा विषय असे.
गावातले लोक मध्येच कधीतरी त्या मुलाला पकडून म्हणत -
"पप्पुशेठ, नीट र्‍हा, शिका.. बाबूमालक तुमाला काई कमी पडू देणार न्हाईत.. सोनं होईल आयुष्याचं.." त्या पाचवी सहावीतल्या पोराला त्यातलं काही कळत नसे.
मग बाबूकाका चहापाणी आटोपून ओट्यावर बसत. तेवढ्यात शेताकडून कापसाच्या भोतांनी लादलेली बैलगाडी घेऊन चांदपाशा येई. आल्याआल्याच "मालक आले जणू!" म्हणून पटकन कापूस चार खणात टाकून बाबूकाका या त्याच्या मालकांसमोर येऊन बसे.
"वाट पाहून चार वाजता गेलो मी गारूडात... कापसाला बाया लावल्यात आज.." असं सांगून बैलगाडी घेऊन बसस्टॅण्डवर हजर नसल्याबद्दल सारवासारव करी.
"देवर्‍या होता बसस्टॅण्डवर.. आम्ही आलो पायीपायी.. बाबूशेठनं आत्ताच दुकानात सांगितलं कापसाचं.. किती होईल यंदा कापूस?" बाबूकाका चांदपाशाला विचारत.
"अं! छातीइतकं हाये एक एक झाड आवंदा.., ईस पंचीस कुंटल उतार होईनच...तूर बी तशीच हाये.. उद्या येढ्याला तुमीच पाहा.." चांदपाशा म्हणे.
मग ओट्यावर बाबूकाका, चांदपाशा आणि रानातून आलेल्या गड्यांच्या गप्पा होत त्यावेळी वाड्यासमोरच्या आवारात रातकिडे चमकू लागलेले असत आणि बेडकांची डरांवऽऽ डरावं‍ऽऽ सुरू झालेली असे. गड्यांसोबत बाबूकाकांचा पुन्हा एकदा चहा होई.
"जा आता घरी, भाकरी खाऊन घ्या..." शेवटी बाबूकाका गड्यांना सांगत आणि जेवणखाण आटोपून बाबूशेठ्च्या दुकानाकडं निघत. तिथे त्यांच्या दोस्तांचा जमाव रात्रीच्या रमीच्या डावाची जमवाजमव करीत बाबूकाकांची वाट पाहात असे.
सकाळी "बाबू काल रात्री अडीच वाजता आला घरी" असं दादा म्हणत असताना ऐकू येई आणि तो पोरगा जागा होई.
मग चार सहा दिवस असेच बाबूकाकासोबत, रमाकाकूसोबत गप्पा करताना, त्यांचं बोलणं ऐकताना कसे वार्‍यासारखे भुर्रर्र उडून जात.
"वन्सं, माझा सपीटाचा उंडा किती काळा पडलाय हो... पप्पुशा अभ्यास करतोस की नाही नीट?" रमाकाकू आजीला बोलत असताना त्या पोराला जवळ घेत.
"गंगंच्या काठंचं वारं रमा इथं, इथं कुठं तुमच्या जालन्यासारखं मशीनीतून येणारं वारं? घेऊन जा त्याला जालन्याला... महिन्यात सपीटासारखा दिसल" आजी रमाकाकूला म्हणे.
मग गुरूवार येई आणि गुंजाला निघायची तयारी होई. तो मुलगा आणि त्याची बहीण नमी सगळ्यात अगोदर तयार होऊन गाडीत चढत.
.
.
.
.
.
.
.
असेच दिवस, वर्षे उलटत गेली. तो मुलगा कळता होऊ लागला. चुकत माकत शिकला, चार अक्षरं गिरवू लागला. पाखरांच्या पिलांना पंख आले की ती जास्त काळ घरट्यात थांबत नाहीत. तो ही कुठंतरी दूर उडून गेला. या काळात बाबूकाका रिटायर झाले. गावाकडे राहायला आले. आता इतकी वर्षं शहरात राहिलो, आता गावातच राहून स्वत: शेती पाहाणार म्हणाले - काही वर्षे गुंजाच्या वार्‍या करीत स्वत: शेती पाहिलीसुध्दा. एवढा सरकारी वकील माणूस पण खेड्यागावात राहून शेती पाहातोय, गावची मोडकळीला आलेली मंदीरं पुन्हा उभारतोय हे पाहून गावातल्या लोकांना बाबूकाकांचं आणखीनच अप्रूप वाटू लागलं.
तशी बाबूकाकाची प्रकृती पहिल्यापासूनच तोळामासा. थोडं काही झालं की बाबूकाकांची तब्येत खालावत असे. गावचं राहाणं, लोकांकडून होणार्‍या दत्तकाबद्दल होणार्‍या खुदर्‍याबुदर्‍या यांत बाबूकाकांनी त्याबद्दल काहीच ठरवलं नाही. स्वत:च्या दुसर्‍या सख्ख्या भावाची मुलं, मुलीही आता कळते सवरते झाले होते. बाबूकाकांनी त्यांना शिकवलं, डॉक्टर, प्राध्यापक केलं. जालन्यात असताना भावाची मुलगी स्वत:कडे शिकायला ठेऊन घेतली - तिला पोटच्या पोरीसारखाच जीव लावला. तिचं लग्न लाऊन दिलं - आणि तेव्हापासूनच त्यांची तोळामासा प्रकृती दर सहा महिन्यांना आणखी ढासळू लागली. अन्न समोर आलं की उलट्या होऊ लागल्या.
असाच आजार सरकारी वकीलाची नोकरी लागलेली असताना त्यांना झाला होता असं दादा कित्येक वेळा बोलताना त्या पोराला आठवे. पण तो काळ जुना होता. तेव्हा गुंजाचे महाराज हयात होते. ते महाराज दत्तकृपा असलेले नैष्ठीक ब्रम्हचारी होते. बाबूकाका त्यांच्या संस्थानातले मानकरी होते. रमाकाकूंनी महाराजांसमोर पदर पसरून भीक मागितल्यानंतर त्यांनी बाबूकाकांना जगवलं होतं. कुणाच्याही घरचं अन्न खाऊ नका, कुणाचा पैसा खाऊ नका, नेकीनं सरकारची चाकरी करा अशा अटी घालून त्यांनी बाबूकाकांना जीवनदान दिल्याचं खुद्द बाबूकाकाच मानत होते. महाराजांनी सांगितलेले नियम आणि गुरूवारची दत्तमहाराजांची वारी व रोजची पंचपदी, पाठ चुकवत नव्हते.
पण आता काळ बदलला होता. वय वाढल्यानंतर पुन्हा प्रकृतीच्या त्याच तक्रारी बाबूकाकाला सतावू लागल्या. आता गुंजाचे महाराजही नव्हते. डॉक्टर झाले, वैद्य झाले, महिना महिना हॉस्पीटलमध्ये राहून झालं. चार आठ महिने बाबूकाकांना बरं वाटे आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन.
तो पोरगा बाबूकाकांना म्हणे -
"काका, तुम्ही कशाला त्या गावात राहून शेती पाहाण्याच्या फालतू भानगडीत पडता.. चांगला बंगला घ्या, कार घ्या.. शहरात राहा.. काय पडलंय त्या शेतीत आणि हवीय कशाला आता ती शेती? सरळ विकून टाका.. आजारी पडलात तर कार करून शहरापर्यंत यावं लागतं... तुम्ही नकाच राहू तिथं.." बाबूकाका हो! हो! म्हणत पण ऐकत नसत.
शेवटी महिनाभर बाबूकाकांनी अन्न सोडलं. सगळे डॉक्टर, वैद्य झाले. जुन्या महाराजांच्या जागेवर आलेल्या महाराजांनी दिलेला अंगारा, तीर्थ वगैरे झाले.. पण बाबूकाकांची अन्नावर वासना होईना. डॉक्टरांनी आठ दिवस ठेऊन घेतले आणि एके दिवशी प्रकृतीत फरक पडल्यावर काहीही शारीरिक आजार नाही, अन्न खायला लागा म्हणून डिस्चार्ज दिला. सख्ख्या भावाचा पुतण्या, सावत्र भावाचा पुतण्या, बायको त्यांचा तो पोरगा दिवसरात्र हॉस्पिटलमध्ये राहिले. डिस्चार्ज मिळून गावाकडे गेल्यावर, शेवटी बाबूकाकांनी नेहमीच्या शिरस्त्यानुसार गुंजाच्या वारीला न्यायचा हट्ट धरला. अन्न जात नव्हतंच. तिथं गेले, रात्रीचे बारा वाजेपर्यंत गुरूवारची पंचपदी झाली, सकाळी काकड आरती झाली..
बाबूकाका सोबत असलेल्या, डॉक्टर पुतण्याला म्हणाले -
"अरे, दत्त महाराजांचं तीर्थ आणि अंगारा दे..."
ते झालं. सकाळी साडेसहाला बाबूकाकांचा श्वास थांबला आणि अन्नावाचून जर्जर झालेला देह शिल्लक राहिला. प्रतिगाणगापूर मानल्या जात असलेल्या गुंज गावात बाबूकांकांनी देह ठेवला.
बाबूकाका गेले आणि त्या पोराला हे सगळं आठवलं...
गावी जाणार्‍या रेल्वेमध्ये हे पोरंगं का रडतंय ते अनोळखी प्रवाशांना कळत नव्हतं

२३ नोव्हेंबर, २०१०

गुंजग्रामीचे दिवस

महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतील बामणांच्या पोरांचे बालपण जसे जात तसेच माझेही गेले. पण कदाचित इतर पोरांना जी मौज पाहायला भेटली नसेल ती आम्हाला दर गुरूवारी पाहायला मिळायची. आमच्या गावाच्या डगरीखालून वाहणार्‍या गंगेच्या (खरं म्हणजे ही गोदावरी, पण तिला सगळे गंगाच म्हणतात) तीरावरच गुंज क्षेत्र नावाचे दत्तसंस्थान असलेले एक गाव होते. अजूनही आहे. पण आता तिथं ती मौज मात्र राहिली नाही. आमच्या घराण्यात पन्नास पाऊणशे वर्षांपूर्वी दत्तोपासना सुरू झालेली आणि सकाळी-सकाळी प्रत्येकाचा पाठ, घंटा, पंचपदी वगैरेंची नुसती गडबड. चांगला चौसोपी किल्ल्यासारखा वाडा. वर माडी. माडीवर मोठ्या दाराशेजारून निघणार्‍या पायर्‍या. दोन्हीकडच्या पायर्‍यांवर बसलेली एक-एक महाभयानक गावठी कुत्री. घरात या ना त्या कारणाने होणारी गड्यांची वर्दळ - त्यात मग चांदपाशा मामू, आमजा, गफूरभाई, सरदार, निजाम, प्रकाशकाका, सावकारमामा, गुलाब भाऊ, भांडेवाली शरीफा किंवा ल्याखत - तिच्या जोहरा आणि सायरा या मुली, जावेद, वाहेद ही मुलं! एवढे सगळे लोक घरात, रानात लागायचेच कारण दीड-दोनशे एक्कर रान - त्यातली औतं आणि बारदाना - गावाच्या एका कडेला असलेला आमचा भलामोठा गायवाडा, त्यात अधेमधे खोदलेली पेवं, एका कोपर्‍यात ओळीने लावलेल्या कडब्याच्या वळह्या, गायबैल, वासरं, आंडील गोरे - लिहायला बसलो तर एक फर्मास कादंबरी सहज हातावेगळी होईल. पण तो धंदा वय वाढल्यावर करू.
आता फक्त गुंजाच्या दिवसांबद्दल. तर पाठ म्हणजे पंचपदीत जी ठराविक कवनं केलेली असतात ती दररोज एकवीस वेळा स्नान झाल्याझाल्या म्हणायची, पंचपदी करायची. मग रात्री निवांत जेवणं वगैरे झाल्यावर घंटा ! म्हणजे पुढचा तासभर सगळ्यांचा नुसता हातवार्‍यांवर कारभार! ज्याचा घंटा चालु आहे त्याचे बोलणे नाहीच. म्हणजे तासभर नुसता दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असा मनातल्या मनात जप करायचा. हे मी स्वत: करीत नव्हतो आणि ते वयही नव्हते कारण ही कामं ज्यानं गुरूमंत्र घेतला आहे त्यालाच फक्त मस्ट! इतरांना त्यातून सूट. काही आगाऊ काट्टी जमेस धरून, घरातील सगळ्यांनीच गुरूमंत्र घेतलेला. आठवडाभर हा सकाळ-संध्याकाळचा नेटवर्क कार्यक्रम आणि गुरूवारी गुंजाच्या मंदिरातील पंचपदीला उपस्थिती मस्ट म्हणजे मस्टच! घरातील किमान एकाचीतरी. बरेच जण जायचे.
बुधवारी रात्रीच चांदपाशा मामू आणि कंपनी गुरूवारचं टिपण घेत असताना - म्हणजे गुरूवारी शेतात करायच्या कामाची प्लॅनिंग काका किंवा तात्याकडून ऐकून घेत असताना सर्वात शेवटी त्याला प्रश्न जायचा -
"उद्या गुरूवार आहे बरं! कोण येतंय उद्या मग गाडीवर?"
"जाता क्या? " पायरीखाली रूमालाची घडी करून टेकून बसलेल्या सरदारकडं बघून चांदपाशा त्याला विचारायचा.
"त्रॉक्क.. वो बईल मेरे अकेलेकू नई संभलते !!" सरदार आलेल्या आफतीतून अंग काढून घ्यायचा.
हा चांदपाशा म्हणजे आमचा मुनीम. गडी, त्यांचे काम, बैल-बारदाना, औतं, रोजानं लावलेल्या बाया, शेतातली लहानसहान देणीघेणी, चंदी, घरचा किराणा भरणे वगरे कामांची पॉवर ऑफ अ‍ॅटॉर्नी याच्याकडं. सरदार हे चांदपाशाचेच सर्वात लहान शेंडेफळ. सरदारनं नुकतंच साल धरलेलं. चांदपाशा त्याला हलकी कामं द्यायचा. म्हणजे गुरूवारी नुसतंच गाडी जुपून मालक-पोराटोरांसोबत गुंजाला जायचं, तिथं गेलं की गाडी सोडायची, जेवून घ्यायचं आणि कुठंतरी सावलीला पडायचं. आम्ही मंदिरात. हा इकडं. शुक्रवारी सकाळी गाडी जुपून पुन्हा परत. पण बैल मारके असल्यानं सरदारला ते सोपं कामही नको वाटायचं. मग चांदपाशा गफूरभाईला थेट हुकूम सोडायचा -
"गफूर, सुबू कू बाडे पे गाडी लाव जल्दी से - इसकू टंगालता मै बारबिगी में "
सरदारकडं रागारागानं बघत चांदपाशा त्याला बारबिगी नावाच्या शेतात ताबडून घेण्याची धमकी द्यायचा आणि काका किंवा तात्याकडं हळूच बघुन घ्यायचा. सरदारला आमच्यासोबत पाठवण्याचा चांदपाशाचा आणखी एक छुपा हेतू म्हणजे - पोरगं जाता येताना मालकासोबत राहिल - बैलगाडी हाकताना चार जवळीकीच्या गोष्टी होतील. पुढं त्यालाच मुनीमकी करणं आहे. पण सरदारच्या टकुर्‍यात या गोष्टी शिरायच्या नाहीत. तो आपलं बैलांना भ्यायचा - आणि त्याच्या मालकांनाही. कारण हे बारबापे बैल (मी गायवाड्यात ऐकलेली ही त्याचीच शिवी) मध्येच शिवळावर पडायचे - एक बैल एका बाजूला ओढायचा दुसरा दुसर्‍या बाजूला! मध्येच गंगा ओलांडताना एखादा बैल जी पाण्यात फतकल मारून बसायचा की बास - दहा कोरडे ओढले तरी भरल्या गंगेतून जागचा उठायचा नाही. गंगेचं पाणी गाडीत शिरायचं आणि काका सरदारला शिव्या घालू लागायचे. अशावेळी गफर्‍याच (भाऊंनी नाहीतर तात्यांनी गफूरला बहाल केलेलं हे खास संबोधन) पाहिजे.
तर दुसर्‍या दिवशी गफूर गाडी-बैल घेऊन वाड्यासमोर हजर व्हायचा. नुसत्या रिकाम्या बैलगाडीत खाली कडब्याच्या पेंड्या टाकलेल्या असायच्या. मग त्यावर गादी. गाडीला छत वगैरे फक्त घरातलं महिलामंडळ सोबत येणार असेल तरच - एरव्ही नाही. गफूरने मस्त गाडीची चाके जिथे जोडलेली असतात तिथल्या आखाला लांब तारेने वंगण चोपडून घेतलेले असायचे. तो काळ्याकुट्ट वंगणाचा मोठ्या पोकळ वेळू (बांबू) पासून बनवलेला नळा गाडीच्या साट्यालाच हमेशा अडकवून ठेवलेला असे. बाबुकाका, मी, राजूकाका, योगूकाका, झालंच तर गाडीत येण्यासाठी रडारड करून आमची नमी गाडीत चढायचे. मी आणि नमी आधी गफूरच्या शेजारची जागा धरायचो. कारण तिथून समोर बसून पाय खाली सोडता यायचे आणि गफूरकडून बैलगाडीचा कासराही हातात घ्यायला मिळायचा. बाकीचे सगळे बाजारस्त्यातल्या मारूतीच्या देवळापासून बसायचे.
भोईवाड्याकडून खंडोबाकडे अशी अर्धी नगरप्रदक्षिणा घालत आमची गाडी सरईच्या ओढ्यात एकदाची शिरायची - गुंजाला निघाल्याचा खरा फील सरईच्या ओढ्यातून सुरू व्हायचा. कुठेतरी लुप्त की गुप्त झालेली शरयू नदी आमच्या गावच्या उशाशी उगम पावली असे समजले जात असे  - तिचे गावठी नाव सरई! ती पुढे गोदावरीला जाऊन मिळते. तिच्या त्या भल्यामोठ्या ओढ्यातल्या चिखलातून चाकं फसवीत, कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला कंबरेपर्यंत कलत गाडीबैल आणि आमची जत्रा पुढे सरकायची. ओढ्याच्या दोन्ही बाजूंना उंचच उंच बाभळी. त्यांना लटकलेली आग्या मोहोळं. चित्रविचित्र पक्ष्यांचे आवाज. मध्येच समोरून येणार्‍या दुसर्‍या बैलगाड्यांना आमची गाडी कुठंतरी काट्याकुपाट्यात घालून साईड देणे वगैरे प्रकारात गफूर निष्णात. होता होता इद्दुस्वामीचा मळा यायचा. इथं पाण्याचा एक मोठ्ठा पाईप आणि एक हौद रस्त्याच्या कडेला बांधलेला असे. इथं बैलगाडी थोडा दम खात असे. बैलांना पाणी दाखवले जाई. आम्ही सगळे खाली उतरून पाय मोकळे करीत. तेवढ्यात नमी नाहीतर मी ओरडे -
"ओ काका, आपले काळ्या-लाल्यापण आलेच आपल्यासोबत!"
काळ्या लाल्या या आमच्या कुत्र्यांना कुणीही न बोलावता ते गाडीमागं गुंजापर्यंत येत - दुसर्‍या दिवशी पुन्हा बैलगाडीसोबत परत.
"दत्तदर्शनला जायाचं जायाचं जायाचं‌ऽऽऽ आनंद पोटात माझ्या माईनाऽऽ माईना" त्या कुत्र्यांकडं बघत योगू काका गाणं म्हणे.
बाबूकाका योगूकाकाला छेडत-
"योगानंद महाराज - कुठं ऐकलंत हे गाणं?"
"अहो ती नाही का मी कॅसेट आणलीय नवीन - तिच्यात आहे" योगूकाका.
"आंऽऽ योगूमालक हे गानं इतक्यांदा म्हन्तात की मलाबी पाट झालंय आता" गफूरही मध्येच त्यांच्या बोलण्यात सहभागी होई.
गफूर पुन्हा मग गाडी जुपून त्याच्या भाषेत बैलांशी संवाद साधू लागे -
"व्वा रे बईल!!" असं म्हणून शेपटी पिरगाळी.
मग पुन्हा एकदा सुरूमगावच्या ओढ्यात गाडी शिरे. तिथे थोडे गचके-आदळे खाऊन, त्या गावच्या मारूतीला वेढा घालून आमची बैलगाडी एकदाची गंगेत शिरे. गंगा ओलांडली की आलंच गुंज! तापलेल्या वाळूत बैलगाडीची चाकं शिरली की सर्रर्रर्रर्र आवाज होई आणि वाळू उडे. तेवढ्यात गंगेच्या वरच्या बाजूला दिसणार्‍या निशाणाच्या दिशेनं सगळ्यांचे हात जोडले जात. तिथे गुरूमहाराजांच्या समाधीचे मंदीर उन्हात चमकताना दिसे. बाबुकाका, राजूकाका गाडीच्या खाली उतरत. आणि गंगेच्या पाण्यात गाडी शिरली, की एक बैल त्याच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणं पाण्यात फतकल मारून बसे! गफूर सरळ पाण्यात उतरून बैलाची शेपूट हातात घेऊन तिला कडकडून चावा घेई - तोपर्यंत कासरा योगूमालकांनी धरलेला असे. शेपूट चावले की दण्णकन बैल उठून चालायला लागे.

मग पुन्हा गाडी सोडा. वडीलधारे लोक कृष्णा आत्याकडं जात. ही बाबुकाकांची बहिण. आमची आज्जीच. हे तिचंही गाव होतंच. गफूर शिवळा-जोती, कासरा आत्याच्या घरी ठेऊन बाहेर फिरायला निघून जाई. नमी, मी थेट मंदिरासमोरच्या वड-लिंबाच्या बनाकडे धूम ठोकत असू. कारण तिथे गुंज संस्थानचा खराखुरा, अगडबंब हत्ती बांधलेला असे. बारा वाजत आलेले असत आणि त्या हत्तीला झुल चढवून, घागरमाळांनी मढवून वर अंबारी ठेवण्याचे काम पाहायला खूप मजा येई. हाच हत्ती दत्ताची आरती चालू असताना थोड्यावेळानं उंचावर असलेल्या मंदीराच्या उंबर्‍याशी आणला जाई. उंचच उंच पायर्‍या. मंदिराचे टोलेजंग बांधकाम. संगमरवराचा भलामोठा सभामंडप आणि गुरूवारच्या आरतीला जमलेली भरगच्च गर्दी. एका कोपर्‍यात वाजणारा सनई-चौघडा. नमीची आणि माझी जागा सनई-चौघड्यावाल्या बाबांच्या शेजारी. कारण ती पण एक मजा असे. आरतीच्या गूढ, गंभीर ताला सुरात हत्तीच्यापण किंकाळ्या मिसळून जात.
मग ती भलीमोठी आरती ठरलेल्या ठिकाणी ठेऊन दिली जाई आणि लोक रांगेने आरती घेत. ती रांग तशीच पुढे पाकशाळेकडे सरकत असे. अगडबंब देहाच्या ब्राम्हणांच्या पंगती लागत आणि तशाच उघड्याबंब, गलेलठ्ठ देहाचे, छाती-पोटावर भरघोस केस, जानवी वागवणारे सेवेकरी पत्रावळी वाढायला घेत. चविष्ट अन्न. मंदिराच्या विहीरीचे पाणी मात्र खारे असे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, गुरूदेव दत्त दत्त दत, समर्थ सदगुरू योगानंद महाराज की जय, परमपूज्य चिंतामणी महाराज की जय! अस जयघोष झाली की चित्रावती घालून पंगत अन्नग्रहण सुरू करीत असे. मध्येच पंगतीच्या एका कोपर्‍यातून नुकतीच मुंज झालेल्या श्रीपाद नाहीतर अवधूतचा श्लोकाचा बारीक आवाज उठत असे -

सोडी सावळी सानुताप सबळे ऽऽऽ सत्सेवी संतुष्टलाऽऽऽऽ  
साधी साधन साष्टांग निगुती ऽऽऽऽऽऽ योगे तपे कष्टलाऽऽऽऽऽ
कर्मोपासक ज्ञानसूर्य गमतो वैराग्य द्विमर्धूनीऽऽऽऽऽऽ
श्रीमद्सद्गुरू पादपद्मह्र्दयी ऽऽऽऽ सिध्दाग्र चिंतामणीऽऽऽ

मग पुन्हा एकदा जयजयकार होई. एखादा तयारीचा ब्राम्हण खास ठेवणीतला श्लोक काढी -

सासु कस्पट सासरा तृणजसाऽऽऽ भ्रतार दासापरिऽऽऽ
ऐशी कन्या ज्या नरासी मिळतसे त्याने भजावा हरिऽऽऽ

सर्वांना यथेच्छ अन्नदान करण्यासाठी वाढपी ब्राम्हणांची नुसतील धावपळ सुरू असे. श्लोकांच्या अशा जुगलबंदीत, हास्यविनोदात प्रसादग्रहण होई आणि लांब पाट काढलेल्या विहीरीवर हात वगैरे धुवून लोक सभामंडप, मंदिराचे आवार, खालचे झाडांचे बन इत्यादी ठिकाणी पांगत.
नमी आणि माझं आणखी एक आकर्षण पाहायचं राहिलेलं असे - संस्थानची भलीमोठी, उंचच्या उंच अ‍ॅम्बासॅडर कार, तसलाच मोठठा ट्रॅक्टर. त्या कारला झटायचे नाही. कारण ती चिंतामणी महाराजांची कार असे. तिला हार, गंध वगैरे लावलेले असे. लोक कारलाही नमस्कार करीत. आम्हीही हात जोडून घेत असू; पण त्या कारजवळून लवकर हलत नसू.

मग पुन्हा एकदा कृष्णा आत्याकडे एक चक्कर. तिथं गेलं की तपकीर नाकात घालत बसलेले उत्तमकाका आधी मला पकडत आणि दर आठवड्याला विचारलेले तेच प्रश्न पुन्हा एकदा विचारून उगाच भंडावून सोडत-
"काय रे, कितवीला आहेस यंदा? किती टक्के पडले गेल्यावर्षी?"
"सहावीला आहे. गेल्यावर्षी पासष्ट टक्के पडले."
"आत्ता दुपारी तुच भोंगळ्यानं गंगात पोहत होता की नाही? मी पाहिलंय तुला. सांगू का बाबूकाकाला?"
"मी कुठं पोहोत होतो हो? मी न नमी हत्ती पाहायला गेलो होतो"
"अस्सं काय बेट्या - तु इथं आलास की नेहमी भोंगळ्यानं गंगात पोहोताना पाहातो मी.. खोटं बोलू नको"
मी त्यांच्या तावडीतून सुटुन दुसरीकडे पळत असे. मग अशीच दुपारच्या चहाची वेळ. मोठ्यांच्या गप्पा उगाच कान देऊन ऐकणे, तिथल्या पोरासोरांच्या खोड्या काढणे.
नमीचे ए पोरा तुझ्या नाकात दोरा वगैरे गाणे सुरू होत असे.
आणि रात्री दहा वाजता पंचपदी!
मंदिराच्या लाऊडस्पीकर मधून नोम-तोम-नोम-तोम-राम-राम-तुक्काराम-राम-राम-तुक्काराम-राम-राम-तुक्काराम ऐकू येऊ लागले की सर्वजण लगबगीनं मंदिराकडे पळत.
पंचपदीची सुरूवात रंगावधूत महाराजांच्या गुजराती भाषेतल्या दत्तबावनीनं होत असे -

जय योगीश्वर दत्तदयाळ, तुच एक जगमां प्रतिपाळ...
अत्र्यनुसूया करि निमित्त, प्रगट्यो जगकारण निश्चित
ब्रम्हा हरिहरनो अवतार, शरणागतनो तारणहार
अंतर्यामी सदचित्सुख, बहार सद्गुरू द्विभूज सुमुख
झोळी अन्नपूर्णा करमाह्य, शांती कमंडल कर सोहाय
क्वायं चतुर्भुज षडभुजसार, अनंत बाहु तु निर्धार
आव्यो शरणे बाळ अजाण, ऊठ दिगंबर चाल्या प्राण

अशीच सुंदर सुंदर पदे पेटी, तबला आणि सुरेल आवाजात म्हटली जात, दत्तगुरूंची पालखी सजवलेली असे. काही-काही पदं ऐकताना-म्हणताना खूप भरून येई. खाली दिलेले पद दत्तगुरूंनी स्वत: त्या कविच्या स्वप्नात जाऊन रचून घेतले आहे असे बोलले जाते. एक नंबरचे कवित्व आणि वर पुन्हा त्या पट्टीच्या गायक ब्राम्हणाचा आवाज एवढा भावार्थ असे की अनेकांच्या डोळ्यांतून अश्रु टपकत-

हा परमसनातन विश्वभरूनी उरलाऽऽऽ भरूनी उरला
गुरू दत्तराज ऋषिकुळात अवतरला
स्मित रम्यवदन काषाय वसन धारी
पियुषयुक्त करी रत्नजडीत झारी
निज भक्त कारणेऽऽऽऽ दंड त्रिशुळ धरिला

बांधीला टोप मुरडून जटा मुकुटीऽऽऽऽ मुकुटी
घातली गुरूने वनमाला कंठी ऽऽऽऽ कंठीऽऽऽ
करिघृतडमरूतुनी उपजति ज्ञान कला
मृगचर्म पांघरे माला कमंडलू हाती, कमंडलू हाती ऽऽऽ
श्रुति श्वानरूप होऊनी पुढे पळती
भूधेनू कली भये चाटीत चरणाला
करिस्वजन उपाधि भस्मलेप अंगा ऽऽऽ
झोळीत भरीत तज्जजन्ममरण पिंगा ऽऽ
नारायण हृदयी रंग भरूनी गेलाऽऽऽ भरूनी गेलाऽऽऽ
गुरू दत्तराज ऋषिकुळात अवतरला

त्या संगमरवरी सभामंडपात टाकलेल्या लांबरूंद सतरंजीवर आम्हाला कधी डोळा लागत असे ते कळत नसे. पुढची सगळी पंचपदी, पदे तो हत्ती, ती अ‍ॅम्बासॅडर कार, तो मोठ्ठा घाट, त्या पंगती श्लोक यांच्या मनात भिरभिरणार्‍या प्रतिमा, आवाज, स्वप्ने यांच्या रूपानं मनासमोर गोलगोल फिरत आणि झोपेच्या गुडूप्प काळोखात नाहीशी होत. झोपेतच आरती घेणे, घरी येणे, पुन्हा झोपणे.
दुसर्‍या दिवशी सकाळी आमची बैलगाडी गंगा ओलांडून गावाकडे परत निघाली की बाबुकाका सांगत -
"अरे काय पप्या, झोपलास रात्री मध्येच पंचपदी चालु असताना, किती मजा आली बघ नंतर....."

गुंजग्रामीचे ते दिवस फार मजेत जात.