रजनीश लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रजनीश लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

३० जुलै, २०१०

उपसंहार

मराठी शब्दकोषाच्या दृष्टीने या शब्दाचा अर्थ काहीही असो, हा शब्द या ब्लॉगसाठी संहारक ठरणार आहे. ब्लॉगच्या समाप्तीची पोस्ट टाकल्यापासून मृताच्या घरी जसे लोक जातात आणि अबोलपणे परततात तसे वाचक या ब्लॉगवर येऊन परत जाताना पाहून मजा वाटत होती. खरोखरचा मृत्यू येण्यापूर्वीची एक चुणूक ! युजी, आय टेल यू - एव्हरीबडी रॉटस लाईक ए गार्डन स्लग व्हेन ही ऑर शी डाईज, बट यू हॅड दॅट एक्स्ट्राऑर्डिनरी करेज टू स्टेट इट व्हेन यू वेअर अलाईव्ह. आणि म्हातारबा, तेच तुझं सौंदर्य आहे. मी नेहमीच वास्तवावर प्रेम केलं आहे; आणि कुणाही विचार करू शकणार्‍या जीवाचा जसा प्रश्न असू शकतो तसा
माझाही होता - माझं वास्तव काय? मी म्हणजे काय? आणि असे प्रश्न खरोखर
जेव्हा पडतात तेव्हा कुठल्याही पुस्तकी व्याख्या कामी पडत नाहीत.
असा प्रश्न माझ्यात निर्माण करण्याची भूमिका रजनीशांच्या साहित्यानं निभावली आणि हा प्रश्न उखडून फेकण्याची भूमिका यूजींच्या आभासी सहवासानं निभावली. युजी आणि रजनीश हे विचारांच्या (आणि शिकवणुकीच्याही (सॉरी युजी तुमची काहीच शिकवणूक नव्हती, तरीही हा शब्द वापरतोय) दृष्टीनं दोन ध्रुव असले तरी ते एकाच पृथ्वीचे दोन ध्रुव आहेत - एकमेकांशी एवढ्या घट्टपणे जोडलेले तरीही एकमेकांपासून कितीतरी दूरवर. रजनीशांची भूमिका अखिल मानवजातीच्या संचितावर हक्क सांगणारी -
तर युजी अगदी दूरवर एकटेच अबोलपणे उभे. थोडक्यात रजनीश म्हणजे जगाच्या बाजारात ओरडून परमात्म्याचा प्रसाद विकणारे, प्रसादावरही प्राईस टॅग ठेवणारे तर युजी परमात्माही अस्तित्वात नाही आणि त्यामुळे त्याचा प्रसादही नाही असं निक्षून बजावणारे. तरीही दोघांच्याही हातून परमात्म्याच्या प्रसादाचे तेवढ्याच प्रमाणात वाटप झाले याचा मी साक्षीदार आहे. माझ्या ब्लॉगवरील रजनीशांवरची पोस्ट वाचलेल्या वाचकांना ही पोस्ट म्हणजे घूमजाव वाटू शकतो.
पण आहे हे असं आहे. रजनीश एवढे का बोलले? युजी गप्प का राहिले? तर परमात्मा हा चराचरात व्यापून आहे - ज्याने तो अनुभवला त्याच्यात तो आहेच आहे; पण ज्याला अजून अनुभवायला मिळाला नाही त्याच्यातही आहेच; फक्त त्याला त्याची जाणीव नाही; आणि ही जाणीव त्याच्यात येण्यासाठी त्याने शक्य त्या सार्‍या प्रयत्नांचा अवलंब करायला हवा. ध्यान करायला हवं, विपश्यना करायला हवी, सूफी व्हर्लींग करायला हवी - अगदी संभोगातूनही समाधीकडे जाण्याचा प्रयत्न करायला हवा अशी भूमिका असणा
रे रजनीश. तर हे सगळे प्रयत्न व्यर्थ आहेत (युजींनी ते केले होते), ही बुध्दत्व विकण्याची मार्केटींग आहे, मला हा पवित्र धंदा करण्यात रस नाही, जग हे जसे असायला हवे, अगदी तसेच आहे, त्यात काडीचाही बदल करण्याची गरज नाही असे जन्मभर सांगत राहाणारे युजी. या दोघांमध्येही फार मजेशीर साम्यस्थळे आहेत. उदा. रजनीश आयुष्यभर रोज आहारात एकच-एक पदार्थ घेत असत. एकच पदार्थ रोज! त्यात काहीही बदल नाही. युजींचेही असेच. बुध्दपुरूषांच्या बाबत असे शक्य आहे कारण त्यांच्यात कोणताही अनुभव साठत नाही, चवीचाही नाही. क्षण उलटला की अनुभवही पुसून जातो आणि पुन्हा एकदा आरसा स्वच्छ होतो.

दोघांच्याही उपस्थितीत करिष्मा होता. दोघांकडेही लोकांची रिघ लागलेली असे. रजनीशांचा वावर अत्यंत यांत्रिक वाटणारा, ताठर, संथ तर युजींसोबतचे बोलणे म्हणजे लहान मुले आपल्या आजोंबासोबत बसून जेवढ्या सहज गप्पा मारू शकतात तेवढे सहज! रजनीश लोकांशी अंतर राखून बोलतील, "दर्शनाची" वेळ देतील, मी महत्वाचा आहे, माझा आदर राखायलाच हवा हे लोकांच्या मनात ठसवतील. हे वर्णन कल्प-कल्पांतापर्यंत चालू शकेल. हेच नेति नेति. हे थांबण अशक्य आहे. ब्लॉग थांबला, न थांबला तरी!

२१ जुलै, २०१०

वेगळा


नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन ।

असं कुठल्यातरी उपनिषदात सांगण्यात आलंय. म्हणजे माझा आत्मा मी कितीही प्रवचने ऐकली, कितीही बुध्दीला ताण दिला कुणाच्याही कितीही बाता ऐकल्या तरी तो मला मिळू शकत नाही. मला संस्कृत कळत नाही. आणि मी आत्मा काय आहे त्याचा हिशेबही इथं मांडत नाहीय. युट्यूबवर युजी कृष्णमूर्तींकडून वरचे वचन ऐकले; आणि युट्य़ूबवर पाहाता येतील तेवढ्या क्लिप्स पाहिल्या. हे युजी कृष्णमूर्ती (उप्पलुरी गोपाला कृष्णमूर्ती) वेगळे आणि जे कृष्णमूर्ती (जिद्दू कृष्णमूर्ती) वेगळे. साध्या सोप्या शब्दांत यांची ओळख म्हणजे, तुम्ही जर यांना ऐकलंत तर तुमच्यासमोर फक्त एकच पर्याय शि
ल्लक राहातो: स्वत:ला दोरीच्या मदतीने कुठल्यातरी उंच झाडाला टांगून घेणे (दोरी मानेभोवती असणे आवश्यक). तुम्ही तेवढे संवेदनशील आणि कच्च्या दिलाचे असाल तर दुसरा पर्यायच शिल्लक राहात नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा पुढचा शोध जपूनच घ्या. एवढं सगळं असेल तर मी हा मजकूर लिहायला शिल्लक कसा? मी हे का लिहीतोय? कारणे तीन: १. मी शिल्लक आहे कारण मी कच्च्या दिलाचा नाही आणि २. मराठीत अजून कुठल्या ब्लॉगकारानं किंवा वेबसाईटवाल्यानं त्यांच्यावर काही लिहील्याचं बाबा गुगलनाथ दाखवत नाही. फक्त लोकसत्तानं त्यांच्या मृत्यूची काय ती बातमी छापलीय. अगदी परवा, २००७ मध्ये गेले ते. ३. मला हा माणूस आवडला.
मला रजनीशपण आवडले होते - पण रजनीश एवढा बोललाय, एवढा बो
ललाय की त्याचे बोलणे ऐकण्यातला आणि त्याचे बोलणे ऐकून-ऐकून माझ्याच बोलण्यातला इंट्रेस्ट निघून गेलाय! बट युजी इज अ डिफरंट मॅन. एन्लायटन्मेंट, ध्यान, धर्म, जीवन, साधना याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांना युजींचा आपल्याला ऐकू येणारा सूर तद्दन नकाराचा, टोकाचा निराशावादी! थोडक्यात त्यांना स्पिरिच्युअल टेररीस्ट म्हणता येईल. युजी स्पष्टपणे सांगतात - माझ्या संदेशावर (तुम्हाला हाच शब्द वापरायचा असेल तर) कॉपीराईट नाही. तुम्ही त्याचा अर्थ लावा-गैर अर्थ लावा, विश्लेषण करा-गैर विश्लेषण करा, एवढंच काय तुम्ही स्वत:च त्याचे लेखक आहात असे म्हणा, त्यासाठी कुणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही.
भारताच्या आतापर्यंतच्या धार्मिक, आध्यात्मिक संचिताच्या अगदी टोकाची, तीव्र विरोधाची युजींची भूमिका आहे.
एन्लायटन्मेंट्ला युजी कॅलामिटी (चक्रीवादळ, विनाश) म्हणतात. मारूतीच्या बेंबीत गार लागतंय, असे बेंबीत बोट घालून विंचू चावून घेणारे सगळेच म्हणतात. पण मी तुम्हाला सांगतो - हा विनाश आहे, एन्लायटनमेंटच्या मागे असणार्‍या लोकांच्या कल्पनेतही नसेल अशी ही गोष्ट आहे. ही कुणालाही नको असेल; पण तिच्याच मागे लोक पागल झाले आहेत असे युजी सांगतात.
युजींची वचने:-
बुध्दा वॉज ए बिग्गेस्ट बास्टर्ड !
जीसस सेड "आय अ‍ॅम दि वे" अ‍ॅण्ड ऑल दि फूल्स लॉस्ट देअर वे !
वेदकालीन लोकांनी सोमरस पिऊन बडबड केली आहे. अहं ब्रम्हास्मि !
गॉड अ‍ॅण्ड सेक्स गो टुगेदर. इफ गॉड गोज, सेक्स गोज टू!
मसिहा म्हणजे स्वत:च्या मागे गबाळ ठेऊन जाणारा माणूस.
गुरू सामाजिक भूमिका निभावतात, वेश्यासुध्दा तेच करतात!
जीसस, बुद्ध आणि कृष्ण यासारख्या मॉडेल्सकडे पाहून निसर्ग आणखी सुंदर मॉडेल्स बाहेर फेकू शकतो हेच आपण विसरलो आहोत.
मी तुम्हाला फक्त एवढीच खात्री देऊ शकतो की तुम्ही जोपर्यंत सुख शोधत राहाल, तोपर्यंत ते मिळूच शकणार नाही.
तुम्ही कल्पना खाता अन्न नव्हे, तुम्ही उपाध्या आणि लेबल्स पांघरता, कपडे घालत नाही.
निखळ सत्य म्हणजे, तुम्हाला काहीही अडचण नसताना तुम्ही अडचणी उभ्या करता. तुम्हाला प्रश्न पडत नाही तेव्हा तुम्ही जीवंत आहात हे तुम्ही मानतच नाही. धार्मिक आणि आध्यात्मिक प्रदुषणाने माणसे खंगून गेली आहेत, वातावरणाचे प्रदुषण किस झाड की पत्ती!
निसर्ग अद्वितीय माणसे तयार करण्यात गुंतला आहे, तर संस्कृतीने एकच साचा शोधला
आहे आणि त्यात सर्वांनी स्वत:ला ठोकून बसवायचं!
तुम्ही जे पाहात आहात त्याबद्दलची अक्कल वापरूनच तुम्ही त्या गोष्टींकडे पाहात असता, त्यामुळे ती गोष्ट खरी कशी आहे ते कळणं कधीच शक्य नाही - कारण तुमची अक्कल नेहमीच मध्ये डोकावणार.
माझं बोलणं म्हणजे कुत्र्याच्या भुंकण्यासारखं आहे.
तुमच्या अकलेवर उभा असलेला अनुभव हा आभास आहे.
तुम्हाला काही कळत नसूनही तुम्ही बडबड करता, जेव्हा कळतं तेव्हा तुम्ही काहीच बोलू शकत नाही.
मी लोक जागरणाच्या पवित्र धंद्यात नाही - इथून तुमचे तोंड काळे करा (प्रश्न विचारायला आलेल्या लोकांना बोलताना).
ज्यादिवशी माणसाला जाणीव कळली त्या दिवशीपासूनच तो स्वत:ला तीसमारखां समजू लागला आणि तो तोडला जाऊन तिथंच त्यानं स्वत:च्या विनाशाची बीजं रूजवली.
माणूस मेल्यानंतर निसर्ग त्याच्या शरीरातील घटकांचा पुनर्वापर करतो; त्या अर्थानं माणूस अमर आहे.
गुरू हे छा-छू अनुभव देणार्‍या कल्याणकारी(??) संस्था आहेत. तो एक फायदेशीर धंदा आहे. वर्षात दोन अब्ज डॉलर्स कमवून दाखवा बरं दुसर्‍या धंद्यात!

अशी अगाध वचनं सांगणारे युजी त्यांच्याकडे आलेल्या लोकांना अक्षरश: रडवून सोडत. कंम्प्लिट डिस्पेअर, क्लिनीकल डेथ इज नीडेड! त्यांनी त्यांच्या आयुष्यात स्वत:भोवती कोणती संस्था उभी राहू दिली नाही. वेळ पडेल तेव्हा सगळ्या गुरूंना झोडपून काढले. सुरूवातीला गबाळ गुरूंना झोडपून ते रजनीशांसारखे महागुरू बनले नाहीत. ते त्यांनीच केलेल्या विधानाला पुढच्या विधानात खोडून काढत; आणि खांदे उडवून आ
हे हे असंच आहे असे सांगत. त्यांनी कितीही हाकलले तरी देश-विदेशातील लोक त्यांच्याकडे जात असत; आणि मार खात असत.
मी काही महिन्यांपूर्वी युजींना युट्य़ूबवर ऐकले, तेव्हा त्यांची आक्रस्ताळी शैली पाहून तात्काळ क्लिप बंद केली होती. जो एवढ्या मोठ्यानं ओरडतोय, एवढा कर्कश्श्य आहे त्याला काय माती कळलं असणार असे वाटले होते. आणि ते दिसतातही भयानक (तुम्ही आणखी भयानक माणसं पाहिली असतील तर ती गोष्ट वेगळी!). त्यांच्यावरच्या एका वेबसाईटवर तर चक्क लिहीलंय की या माणसाचा नुसता फोटो पाहिलात, काही शब्द वाचले तरी तो तुमच्यामध्ये व्हायरस सारखा घुसेल; आणि मेंदुतल्या सगळ्या रचना पोखरून काढील.
युजी हा माणूस खरंच उपयुक्त आहे की नाही, त्यांच्या बोलण्यामुळे आत्महत्त्या करून घ्यावी लागेल, तर वाचा कशाला? असा विचार मी करू शकत नाही. कारण माझा प्रश्न वेगळा आहे. ध्यानाच्या दुष्टचक्रातून मला बाहेर पडायचं आहे; आणि ते सोपं नाही. त्यासाठी अत्यंत टोकाची निराशा हवी आहे. निश्चितच, परिणाम मला माहीत नाहीत. रिस्क घ्यायला काहीच हरकत नाही! काही दोस्त मिळाले तर उत्तमच.

सिनेनिर्माते महेश भट यांनी युजींचं चरित्र लिहीलंय. रजनीशांच्या गुरूगिरीला कदरून जाऊन (आणि कदाचित युजींना भेटल्यामुळे) महेश भट यांनी रजनीशांच्या माळेचे तुकडे करून ती संडासात फेकली. बेशर्त प्रेमाच्या बाता मारणार्‍या रजनीशांनी महेश भट यांना "मला सोडून जाऊ नकोस, वाटोळे करून टाकीन" अशी धमकी दिली होती. रजनीश हा असा मादरचोद देवमाणूस होता. मला खरंच रजनीशांबद्दल लिहीताना स्वत:ला आवरता येत नाही राव.
लिहीण्यासारखं पुष्कळ आहे - पण ड्राईव्ह टिकत नाही.
चलो. पुढचे आठ दिवस एवढं पुरेल. बाय!

२८ मार्च, २०१०

रजनीश: ओशो: एक्सप्लेण्ड





या ब्लॊगवर गेल्यावेळी रजनीशांबद्दल मी मुद्दामच एका ति-हाईताच्या नजरेने लिहिले आहे. तेच आताही करतो आहे. कितीही काही म्हटले तरी जगावर छाप पाडणा-या या व्यक्तिमत्वाच्या जीवनातील विसंगती स्वस्थ बसु देत नाही. तशी त्यांनी कधीच कोणत्याच गोष्टीत संगती ठेवली नव्हती. कधी येशु ख्रिस्तावर टीका, तर कधी बायबलमधील वचनांवर शिष्यांना नवे भान देणारी व्याख्याने, कधी गीतेच्या अठरा अध्यायांवर व्याख्याने देऊनही वर पुन्हा Krishna seems to be a playboy ! हे ठीक होते - हे समजुन घेता येते. पण किमान स्वत:च्या जीवनाबद्द्ल आपण जे सांगतोय, ते आपण आहोत तोपर्यंत कसेही संपादता येईल, पण आपण गेल्यावर काय? हा प्रश्न त्यांना पडला नसावा. मला रजनीश जसे कळले तसे मी इथे मांडतोय - कारण माझ्या आयुष्यातील बराच काळ मी या बाबावर (हो बाबाच! सोफास्टीकेटेड असला म्हणुन काय झाले) खर्च केलाय. काही काळ तर नुसतं वाचन करुनच पुरता सैरभैर झालो होतो. पण नंतर आपोआपच कळलं की हे प्रकरण नुसतं वाचुन संपत नाही. त्यांचे साहित्य वाचणा-या वाचकांना माहीत असेल, की रजनीशांची "सर्वकाही जाणलेला" अशी आपल्या मनात प्रतिमा निर्माण होते. तशी ती होऊ देत असत.
कधी कुणा श्रीमंत बाईला "मी तुमचा पूर्वजन्मातील मुलगा आहे", तर श्रोत्यांसमोर "सातशे वर्षापूर्वी मी पुण्यातच तप करीत होतो, एकवीस दिवसांच्या उपासानंतर माझ्या तपाची सांगता होणार होती, पण त्यापूर्वीच माझा खून झाला, पुन्हा जन्म घ्यायला मला सातशे वर्षे वाट पहावी लागली" तर कधी "बुध्द आणि मी काहीकाळ रस्त्याने सोबत चाललो होतो, नंतर तो त्याच्या वाटेने गेला, मी माझ्या वाटेने गेलो " तर कधी "बुध्दाच्या आत्म्याने माझ्या शरीरात प्रवेश केला आहे, माझी तब्येत सुधारली आहे" नंतर "बुध्दाला मी बाय-बाय केले, त्याची झोपताना हात उशाशी घेण्याची सवय मला त्रासदायक होत होती" असल्या भंपक कथा सांगुन ते नसते वलय निर्माण करीत. ज्या जुनाट भारतीय मानसिकतेवर त्यांनी जन्मभर आसूड ओढले त्याच मानसिकतेचे रजनीश हे अतिशुध्द, प्रच्छन्न रुप होते. हा माणूस निव्वळ भंपक होता असे मी म्हणत नाही, पण त्यांनी जाणतेपणी स्वत:बद्दल काही ग्रह पसरु दिले होते.
संबोधी किंवा निर्वाण किंवा एन्लायटनमेंट ही गोष्ट या जगात राहु इच्छिणाराच्या द्रुष्टीने काहीही महत्वाची नसते. ती शेवटची पायरी आहे. रजनीशांनी एन्लायटनमेंटची पध्दतशीत मार्केटींग केली. सर्व प्रकारच्या "कंडिशनिंग्ज" च्या विरोधात असणारे रजनीश मात्र काही बाबतीत "कडिशण्ड" होते:
रजनीशांची बोलण्याची पध्दत सुरुवातीला आक्रामक होती, ती नंतर श्रोत्यांना क्षणा-क्षणाबद्दल, त्या-त्या क्षणाबद्दल जागरुक करुन देणारी झाली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जगात सर्वप्रथमच या प्रकारच्या बोलण्याच्या पद्धतीचा वापर करण्यात येत होता. ते जेव्हा बोलत, तेव्हा दोन वाक्यांच्या मध्ये, जाणिवपूर्वक थांबा घेत, तो क्षण पिऊन घेत, श्रोत्यांनाही तो प्यायला लावीत आणि मग पुढे जात.
रजनीशांची देहबोली पूर्णत: Let Go प्रकारची होती - म्हणजे त्यामागे कसलाही अभिनिवेश नव्हता.
ध्यानाशी ज्याची ओळख नाही, जो सतत घाई-गडबडीत असतो, घाईत नसतो तेव्हा देखील त्याच्या मनात सतत विचार चालु असल्याने वर्तमान क्षणाकडे लक्ष नसते त्याच्यावर वरील प्रकारच्या बोलण्याचा आणि देहबोलीचा नक्कीच प्रभाव पडतो. ऎकणा-याला अनायास शांत वाटु लागते.
ध्यान देखील एक प्रकारचा निष्क्रिय सराव आहे - अत्यंत सूक्ष्म निष्क्रिय सराव. हा सराव तुम्ही, तुमचे विचार, तुमची देहस्थिती, मनात चालु असणारी वळवळ यांबद्दल जागरुक होण्याचा आहे. या निष्क्रिय सरावाचा जो परिणाम होतो तो थोडा अतर्क्य म्हणावा असा आहे. कारण या सरावाच्या परिणामाचे विज्ञानाने अजूनपर्यंत मूल्यांकन केलेले नाही. ध्यानाच्या शिखर अवस्थेत दुस-या व्यक्तीला विश्वास न बसेल अशा काही शारीरिक घटना घडतात. उदा. माकडहाडापासुन मेंदुकडे एक उष्ण प्रवाह सरकणे, हा प्रवाह पाठीवरील शिरांमध्येही प्रवाहीत होणे, पाठीच्या कण्यांत काही निवडक जागांवर गोल फिरल्यासारखे वाटणे. ही घटना घडते तेव्हा सहाजिकच आपण घाबरतो. कारण शरीराला ताठरता आलेली असते आणि ध्यान चालु असताना सर्व आधार क्षणिक नाहीसे झाल्यासारखे वाटत असतात. आपण पटकन ध्यानातुन बाहेर पडतो. पण एकदा का ही घटना घडली, की ती अनायास होत राहाते. पुढे डोळे तारवटतात (तेजस्वी होतात म्हटले तरी चालेल), भुवया आपोआप वर जायला लागतात, मनात काही विचार चालु नसल्याने आजुबाजुचे जग सुस्पष्ट दिसायला लागते. विचारांमध्ये सुसुत्रता येते, बोलणे पूर्वीपेक्षा सुस्पष्ट होऊ लागते. लोकांसोबत होत असणा-या संवादावर तुम्ही जास्त नियंत्रण राखु शकता, काही प्रमाणात लोकांना "मोनोपोलाईज"ही करू शकता. पुढे मग मन स्थिर होते, फालतू विचार येणे आणि त्यातच रंगुन जाणे, त्यांनी काही कारण नसताना बेजार होणे बंद होते. एकुणच माणूस स्वस्थ होतो, आनंदी आणि समाधानी राहु लागतो.
ही कोणत्याही माणसाच्या बाबतीत घडणारी अगदी सामान्य घटना आहे. पण याच घटनेला "अतिंद्रिय अनुभव", "तप" "मिस्टिसिझम" "साधना" असली बाष्कळ नावे पडल्याने त्याभोवती उगाच वलय निर्माण होते. रजनीशांनी हेच अगदी बेमालूमपणे स्वत:भोवती गोवले, त्याचा पद्धतशीर प्रचार केला. यात काही वाईट झाले असे मी म्हणत नाही, पण या सगळ्या गोष्टी अशा आहेत आणि त्यात आश्चर्यकारक, अमानवी असे काही नाही. (क्रमश:)