


या ब्लॊगवर गेल्यावेळी रजनीशांबद्दल मी मुद्दामच एका ति-हाईताच्या नजरेने लिहिले आहे. तेच आताही करतो आहे. कितीही काही म्हटले तरी जगावर छाप पाडणा-या या व्यक्तिमत्वाच्या जीवनातील विसंगती स्वस्थ बसु देत नाही. तशी त्यांनी कधीच कोणत्याच गोष्टीत संगती ठेवली नव्हती. कधी येशु ख्रिस्तावर टीका, तर कधी बायबलमधील वचनांवर शिष्यांना नवे भान देणारी व्याख्याने, कधी गीतेच्या अठरा अध्यायांवर व्याख्याने देऊनही वर पुन्हा Krishna seems to be a playboy ! हे ठीक होते - हे समजुन घेता येते. पण किमान स्वत:च्या जीवनाबद्द्ल आपण जे सांगतोय, ते आपण आहोत तोपर्यंत कसेही संपादता येईल, पण आपण गेल्यावर काय? हा प्रश्न त्यांना पडला नसावा. मला रजनीश जसे कळले तसे मी इथे मांडतोय - कारण माझ्या आयुष्यातील बराच काळ मी या बाबावर (हो बाबाच! सोफास्टीकेटेड असला म्हणुन काय झाले) खर्च केलाय. काही काळ तर नुसतं वाचन करुनच पुरता सैरभैर झालो होतो. पण नंतर आपोआपच कळलं की हे प्रकरण नुसतं वाचुन संपत नाही. त्यांचे साहित्य वाचणा-या वाचकांना माहीत असेल, की रजनीशांची "सर्वकाही जाणलेला" अशी आपल्या मनात प्रतिमा निर्माण होते. तशी ती होऊ देत असत.
कधी कुणा श्रीमंत बाईला "मी तुमचा पूर्वजन्मातील मुलगा आहे", तर श्रोत्यांसमोर "सातशे वर्षापूर्वी मी पुण्यातच तप करीत होतो, एकवीस दिवसांच्या उपासानंतर माझ्या तपाची सांगता होणार होती, पण त्यापूर्वीच माझा खून झाला, पुन्हा जन्म घ्यायला मला सातशे वर्षे वाट पहावी लागली" तर कधी "बुध्द आणि मी काहीकाळ रस्त्याने सोबत चाललो होतो, नंतर तो त्याच्या वाटेने गेला, मी माझ्या वाटेने गेलो " तर कधी "बुध्दाच्या आत्म्याने माझ्या शरीरात प्रवेश केला आहे, माझी तब्येत सुधारली आहे" नंतर "बुध्दाला मी बाय-बाय केले, त्याची झोपताना हात उशाशी घेण्याची सवय मला त्रासदायक होत होती" असल्या भंपक कथा सांगुन ते नसते वलय निर्माण करीत. ज्या जुनाट भारतीय मानसिकतेवर त्यांनी जन्मभर आसूड ओढले त्याच मानसिकतेचे रजनीश हे अतिशुध्द, प्रच्छन्न रुप होते. हा माणूस निव्वळ भंपक होता असे मी म्हणत नाही, पण त्यांनी जाणतेपणी स्वत:बद्दल काही ग्रह पसरु दिले होते.
संबोधी किंवा निर्वाण किंवा एन्लायटनमेंट ही गोष्ट या जगात राहु इच्छिणाराच्या द्रुष्टीने काहीही महत्वाची नसते. ती शेवटची पायरी आहे. रजनीशांनी एन्लायटनमेंटची पध्दतशीत मार्केटींग केली. सर्व प्रकारच्या "कंडिशनिंग्ज" च्या विरोधात असणारे रजनीश मात्र काही बाबतीत "कडिशण्ड" होते:
रजनीशांची बोलण्याची पध्दत सुरुवातीला आक्रामक होती, ती नंतर श्रोत्यांना क्षणा-क्षणाबद्दल, त्या-त्या क्षणाबद्दल जागरुक करुन देणारी झाली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जगात सर्वप्रथमच या प्रकारच्या बोलण्याच्या पद्धतीचा वापर करण्यात येत होता. ते जेव्हा बोलत, तेव्हा दोन वाक्यांच्या मध्ये, जाणिवपूर्वक थांबा घेत, तो क्षण पिऊन घेत, श्रोत्यांनाही तो प्यायला लावीत आणि मग पुढे जात.
रजनीशांची देहबोली पूर्णत: Let Go प्रकारची होती - म्हणजे त्यामागे कसलाही अभिनिवेश नव्हता.
ध्यानाशी ज्याची ओळख नाही, जो सतत घाई-गडबडीत असतो, घाईत नसतो तेव्हा देखील त्याच्या मनात सतत विचार चालु असल्याने वर्तमान क्षणाकडे लक्ष नसते त्याच्यावर वरील प्रकारच्या बोलण्याचा आणि देहबोलीचा नक्कीच प्रभाव पडतो. ऎकणा-याला अनायास शांत वाटु लागते.
ध्यान देखील एक प्रकारचा निष्क्रिय सराव आहे - अत्यंत सूक्ष्म निष्क्रिय सराव. हा सराव तुम्ही, तुमचे विचार, तुमची देहस्थिती, मनात चालु असणारी वळवळ यांबद्दल जागरुक होण्याचा आहे. या निष्क्रिय सरावाचा जो परिणाम होतो तो थोडा अतर्क्य म्हणावा असा आहे. कारण या सरावाच्या परिणामाचे विज्ञानाने अजूनपर्यंत मूल्यांकन केलेले नाही. ध्यानाच्या शिखर अवस्थेत दुस-या व्यक्तीला विश्वास न बसेल अशा काही शारीरिक घटना घडतात. उदा. माकडहाडापासुन मेंदुकडे एक उष्ण प्रवाह सरकणे, हा प्रवाह पाठीवरील शिरांमध्येही प्रवाहीत होणे, पाठीच्या कण्यांत काही निवडक जागांवर गोल फिरल्यासारखे वाटणे. ही घटना घडते तेव्हा सहाजिकच आपण घाबरतो. कारण शरीराला ताठरता आलेली असते आणि ध्यान चालु असताना सर्व आधार क्षणिक नाहीसे झाल्यासारखे वाटत असतात. आपण पटकन ध्यानातुन बाहेर पडतो. पण एकदा का ही घटना घडली, की ती अनायास होत राहाते. पुढे डोळे तारवटतात (तेजस्वी होतात म्हटले तरी चालेल), भुवया आपोआप वर जायला लागतात, मनात काही विचार चालु नसल्याने आजुबाजुचे जग सुस्पष्ट दिसायला लागते. विचारांमध्ये सुसुत्रता येते, बोलणे पूर्वीपेक्षा सुस्पष्ट होऊ लागते. लोकांसोबत होत असणा-या संवादावर तुम्ही जास्त नियंत्रण राखु शकता, काही प्रमाणात लोकांना "मोनोपोलाईज"ही करू शकता. पुढे मग मन स्थिर होते, फालतू विचार येणे आणि त्यातच रंगुन जाणे, त्यांनी काही कारण नसताना बेजार होणे बंद होते. एकुणच माणूस स्वस्थ होतो, आनंदी आणि समाधानी राहु लागतो.
ही कोणत्याही माणसाच्या बाबतीत घडणारी अगदी सामान्य घटना आहे. पण याच घटनेला "अतिंद्रिय अनुभव", "तप" "मिस्टिसिझम" "साधना" असली बाष्कळ नावे पडल्याने त्याभोवती उगाच वलय निर्माण होते. रजनीशांनी हेच अगदी बेमालूमपणे स्वत:भोवती गोवले, त्याचा पद्धतशीर प्रचार केला. यात काही वाईट झाले असे मी म्हणत नाही, पण या सगळ्या गोष्टी अशा आहेत आणि त्यात आश्चर्यकारक, अमानवी असे काही नाही. (क्रमश:)