राज ठाकरे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राज ठाकरे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

६ एप्रिल, २०१०

राज ठाकरे हे नाही करू शकले !


राज ठाकरेंचा म.न.से. नुकताच स्थापन झाला होता आणि त्यांची मारा-ठोका छाप भाषणे गाजत होती. पुढे त्यांना अटक झाली - म्हणजे अटकेची एक मोठी मालिकाच सुरु झाली. रस्त्यावरुन जात असताना इथं, औरंगाबादला एक केवीलवाणे चित्र मला दिसले. ठाकरेंचे चार-दोन समर्थक (यापैकी एक म.न.से.कडून पदवीधर मतदार संघाची निवडणुक लढताना पडून आता शिवसेनावासी) रस्त्यावर उतरले होते आणि पोलीस त्यांना गाडीत कोंबत होते. राज ठाकरेंची भाषणे ऎकायला लोक जमत असतील, पण त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर फक्त चार-दोन पदाधिकारी आणि कार्यकर्तेच उतरले होते.
राज ठाकरे यांच्या भाषणातील थेट मुद्दे, महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट इ.इ. मुळे हा माणूस काहीतरी वेगळे करणार असे चित्र निर्माण झाले होते - आजही आहे. मोठ-मोठे विचारवंत लोक त्यांना समर्थन देत होते. मी राज ठाकरेंच्याच काय पण कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नव्हतो, आजही नाही. पण मला मोठी आशा वाटत होती. पण अमुक एका पक्षाचा कार्यकर्ता व्हायचे म्हणजे नेमके काय करायचे? साहेब आले की घोषणा द्यायच्या, साहेब गेले की सतरंज्या उचलायच्या - त्यांच्या वाढदिवसाला रक्तदान करायचे, कुठेतरी वह्या-पुस्तकं वाटायची, प्रचाराच्या वेळी प्रचार करायचा, आंदोलनाच्या वेळी आंदोलने करायची ही काही फार निकडीची आणि सदा-सर्वकाळ-सगळीकडे चालणारी कामे नाहीत. पण कार्यकर्ते ती करीत असतात. ही कामे कार्यकर्त्यापुरती आणि त्या-त्या घटनेपुरतीच मर्यादीत राहातात. त्यातून लोकांनाही काही मिळत नाही आणि कार्यकर्त्यालाही कामाचे केल्याचे समाधान होत नाही. विचार केला आणि तो कागदावर लिहुन काढला.
म.न.से.ने स्विकारलेली भूमिका शहरांपुरतीच मर्यादीत आहे आणि महाराष्ट्रात खेडी, अर्धशहरी गावेही आहेत. त्यांच्यासाठी काही ठोस हवे. नवनिर्माणच करायचेय तर तो दररोज आणि महाराष्ट्राच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत चालणारा कार्यक्रम पाहीजे. गावात ग्रामपंचायत, क्रुषी उत्पन्न बाजार समित्या, पोलीस ठाणी, शहरात महानगरपालिका, बसथांबे, न्यायालये, विमानतळे, बाजारपेठा, आर.टी.ओ. कार्यालये इत्यादी ठिकाणी नडलेल्या जनतेला दररोज मदत करण्यासाठी कार्यकर्ते का नसावेत? कार्यच करायचेय, नवनिर्माणच करायचेय तर त्याला इथे तिन्ही त्रिकाळ अमाप वाव आहे. उदाहरणार्थ म.न.से. चा कार्यकर्ता असणारा एक वकील आहे. तो रोज न्यायालयात जातो. त्याला म.न.से. नियुक्त, जनतेसाठी कधीही उपलब्ध असणारा वकील म्हणून घोषीत करा. त्या-त्या विषयाचे ज्ञान असलेले तुमचे लोक ठिक-ठिकाणी द्या. अनेकप्रकारचे ज्ञान असलेली कार्यकर्तेमंडळी तुमच्याकडे आहेत - करा त्यांना लोकार्पित. अशी भूमिका तुम्ही पक्षाचे धोरण म्हणून मुंबईतून जाहीर करा. असा काहीसा आशय असणारे पत्र मी राज ठाकरे यांना लिहीले. असली हजारो पत्रे त्यांना येत असतील - अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाहीच.

सुभेदारीवर एकदा राज ठाकरे आले असताना मी त्यांना वरील आशयाचे पत्र समक्षच द्यायचे असे ठरवून भेटायला गेलो. अगदी सकाळी सात वाजताच. तीन-चार तास वाट पाहिल्यावर कळले की "साहेब भाषणापूर्वी कुणाशीही बोलत नाहीत, जे काय असेल भाषण संपल्यावर बोला किंवा लिहुन आणलं असेल तर देऊन जा..." मी आता कंटाळलो होतो. श्री. मनोज हाटे नावाच्या मुंबईहुन त्यांच्या सोबत आलेल्या पदाधिका-याला बोललो. त्यांनी पत्र वाचले आणि साहेबांच्या रुममध्ये निघुन गेले. दहा-पंधरा मिनिटांनंतर परत आले.
"काय करता आपण?" पदाधिकारी
"अमुक-तमुक पेपरमध्ये काम करतो"
"अरे वा! किती आहे तुमच्या पेपरचं वितरण?"
"भरपुर असेल...नक्की आकडा माहीत नाही.."
"बरं, तुम्ही आमच्यासोबत मुंबईला याल का?"
"मी नोकरी करतो, मी तिथं येऊन काय करू, तुम्ही पत्रात विनंती केलीय ते करा, फार बरे होईल..."
"आम्ही निश्चित त्यावर विचार करू....खरंच हे व्हायला पाहीजे"
"मुंबईला याल का?" या त्याप्रश्नामागचा त्यांचा अभिप्राय फक्त एवढाच की "काय कमाल केली यार तु हे पत्र लिहुन? चल आता मुंबईला आमच्या सोबत...! आणि जा घरी परत आणि सांगत सुट सगळ्यांना "मला मुंबईला बोलावलं आहे म्हणून..."
पण हे झाल्यावरही मला राहवेना. यावर दोन वर्षे उलटली. काहीही झाले नाही. पुन्हा एकदा ते इथे आले. आता मात्र काही झाले तरी समक्षच, राज ठाकरेंच्याच हातात पत्र द्यायचे असे ठरवले.

पूर्वीसारखीच कार्यकर्त्यांची, बघ्यांची ही हुल्लड, ढकला-ढकली. ते थांबलेल्या ठिकाणी कसातरी आत घुसलो. मिडियाचे काही लोकही पाठोपाठ आले. यांचं आता सुरु होणार म्हणुन मी पटकन पुढे होऊन सोबत आणलेले पत्र राज ठाकरे यांच्या हातात ठेवले. ते त्यांनी वाचले. पुन्हा एकदा वाचुन काढले. समोर उभ्या असलेल्या कुणाला तरी (बहुतेक श्री. बाळा नांदगावकर) उद्देशून वाचलेले पत्र त्यांच्याकडे देत देत ते म्हणाले -
"बघा जरा काय करता येईल ते"
मला फार बरे वाटले. मी तिथेच थांबून राहीलो.
मग मिडियावाल्यांनी राज साहेबांची पाच-दहा मिनिटांत मुलाखत घेतली. राज ठाकरे यांच्यावर पीएच.डी. करणा-या विद्यार्थ्याने स्वत:बद्दल थोडक्यात माहिती सांगुन त्यांचे आशिर्वाद घेतले. पत्रकार परिषद दुसरीकडे होणार होती, त्यासाठी साहेब निघाले. तेवढ्यात तो पीएच.डी.वाला त्यांना काहीतरी म्हणाला. त्यांना वाटले मीच बोलतोय.
ते म्हणाले,
"कळ्ळयं मला...आलं माझ्या लक्षात"
मी म्हणालो -
"मी नाही बोललो..हे (पीएच.डी.वाले) बोलले.."
मी तिथून बाहेर पडलो.
आज ३-४ वर्षे झाली. त्यांना काय कळले आणि त्यांनी का काही केले नाही रामजाणे घनश्यामबापू* !

[रामजाणे घनश्यामबापू* - हा फक्त आमच्याच गावात चालणारा वाक्यप्रचार आहे. कुणाला कशातले काही कळले नाही तर घनश्यामबापूला (वारले आता ते) नावाच्या एका जख्ख म्हाता-या बाबांना ते नक्कीच ते कळते असा त्याचा अर्थ]