२१ जानेवारी, २०११

माईंड इज ए मिथ


यापूर्वी इथे यु.जी. कृष्णमूर्तींबद्दल एक लेखमाला लिहिण्याचा योग आला होता. त्यात यु.जी. या व्यक्तीमत्वाबद्दल बरीच माहिती सादर करता आली असली तरी त्यात लोकांशी झालेला युजींचा वास्तविक संवाद हा अत्यंत कमी होता. यु.जी. कृष्णमूर्तींसोबत साधलेल्या संवादांचे संकलन असलेली "माईंड इज ए मिथ", "मिस्टिक ऑफ एन्लायट्न्मेंट" आणि "थॉट इज युवर एनेमी" ही पुस्तके मी पुन्हा एकदा वाचत आहे; त्यातीलच एका पुस्तकातील प्रकरणाचा मी मराठीमध्ये अनुवादीत केलेला हा काही भाग. वाचकांना आवडल्यास, पुढील भाग अनुवादीत करायला आनंद वाटेल; मी एरव्ही वाचणार आहेच. पण ते वाचन इथल्या वाचकांनाही सहभागी करता आले तर आणखी आनंद होईल. 
ज्यांनी पूर्वीची लेखमाला वाचलेली नसेल आणि वाचण्याची इच्छा असेल तर कृपया सर्व सातही भागाचे दुवे खाली दिले आहेत.


१, २, ३, ४, ५, ६, ७
    



माईंड इज ए मिथ
यु.जी. कृष्णमूर्तींशी प्रश्नोत्तरे
भाग एक
सर्वकाही फोडून टाकणारी निश्चितता

युजी: मी कधीच व्यासपीठावर बसून बोलत नाही. किती कृत्रिम असते ते. काही गोष्टी गृहित धरून किंवा अस्पष्ट अर्थात समोर ठेऊन बसून बोलत राहाणे वेळेचा अपव्यय आहे. रागावलेला माणूस रागाबद्दल बोलत बसत नाही आणि रागाबद्दल मोठ्या आनंदाने संवादही साधत नाही; त्याचे माथे फिरलेले असते. त्यामुळे तु रागीट आहेस आणि म्हणून तुला अडचणी येतात हे मला सांगू नकोस. क्रोधाबद्दल बडबड कशाला हवीय? केव्हातरी, कसेतरी तुम्हाला राग येणे कायमचे थांबेल आशेवर तुम्ही जगता आणि त्यातच मरता. त्या आशेचेच ओझे तुमच्यावर आहे, आणि त्यात हे जीवन निरर्थक वाटले की तुम्ही पुनर्जन्माचा शोध लावता.    
प्रश्न: ठीक आहे, तुमच्या बोलण्यातून कुणालाही आशा मिळते असे बिलकुल म्हणता येणार नाही. मग सांत्वन किंवा सूचना द्यायच्या नसूनही तुम्ही का बोलत राहाता?
युजी: मग मी करावे तरी काय? तुम्ही येता, मी बोलतो. तुम्हाला दगड फेकून मारून मी तुमच्यावर टिका करत राहावी हे तुम्हाला हवे आहे? ते निरर्थक आहे कारण तुमच्यावर कशाचाही प्रभाव पडत नाही कारण तुमच्याभोवती एक अभेद्य चिलखत उभे आहे. तुम्हाला काहीच वाटत नाही. तुम्हाला तुमची स्थिती समजून घेता येत नसल्याने, तुम्ही विचारांच्या माध्यमातून प्रतिक्रिया देता ज्यात तुमच्या कल्पना आणि मन्तव्य असते. विचार ही प्रतिक्रिया असते. तुम्ही ज्या वेदनांतून जात आहात त्या वेदना, त्यांचा अनुभव न घेता इथे माझ्यात प्रतिबिंबीत होत आहेत. इथे त्यांचा बिलकुल अनुभव नाही. बस्स, तेवढेच. या नैसर्गिक स्थितीत तुम्हाला इतरांच्या वेदना जाणवतात, मग तुम्ही त्यांना व्यक्तिश: ओळखत असाल किंवा नसाल. अलिकडेच माझा सर्वात मोठा मुलगा जवळच्याच हॉस्पिटलमध्ये कॅन्सरमुळे मरणासन्न होता. मी ही त्याच परिसरात होतो आणि त्याला नेहमी भेटायला जात असे. माझे मित्र सांगतात की तो मरेपर्यंत मी मलासुद्धा तशाच तीव्र वेदना होत होत्या. मी काहीही करू शकत नाही. वेदना ही जीवनाचीच एक अभिव्यक्ती आहे. त्याच्या कॅन्सरवर मी कसलातरी उपाय करावा असे त्यांना वाटत होते. मी जर ट्यूमरला हात लावला तर तो आणखी वाढेल. कॅन्सर ही पेशींची वाढ, जीवनाची आणखी एक अभिव्यक्ती असते, आणि त्यात मी काही केले तर तो आणखी मजबूत होईल.
प्रश्न: तर मग तुम्हाला इतरांच्या वेदना कळतात तरी तुम्ही त्यापासून बाजूला असता असेच ना?
युजी: वेदना हा एक अनुभव आहे, आणि इथे (स्वत:कडे बोट दाखवून) कसलाही अनुभव नाही. तुम्ही एक गोष्ट आहात आणि जीवन दुसरी एक गोष्ट आहे असे नाही. ती एकच एक सबंध हालचाल आहे आणि त्याबद्दल मी काहीही सांगितले तरी ते चुकीचे, गोंधळात टाकणारे आहे. तुम्ही एक "व्यक्ती", एक "वस्तू", किंवा "इतर" गोष्टींनी व्यापलेली स्वतंत्र आकृती नाही आहात. ही एकच एक, सबंध हालचाल तुम्हाला अनुभवता येणारी गोष्ट नसते.
प्रश्न: पण अनुभवाला येत नसतानाच जगत असणे आमच्या मनाला अतार्किक वाटते.
युजी: मी जे बोलतोय त्यामुळे तुमच्या तार्किक चौकटीत गोंधळ उडतो. ती विभक्त बांधणी तशीच अबाधीत ठेवण्यासाठी तुम्ही तर्क वापरत आहात, बाकी काही नाही. तुमचे प्रश्न हे पुन्हा एकदा विचारच आहेत आणि प्रतिक्रियात्मक आहेत. सगळे विचार प्रतिक्रियात्मक असतात. तुम्ही जीव तोडून हे विचारांचे चिलखत वाचवत आहात, आणि जीवनाच्या हालचालीमुळे तुमचा आधार नष्ट होईल अशी भीती तुम्हाला वाटतेय. जीवन हे खळाळत वाहाणार्‍या नदीसारखे, तिला घालून दिलेल्या सीमांना मोडून टाकील अशा प्रकारे दोन्ही तीरांवर आदळत असते. तुमच्या विचारांची रचना आणि तुमची वास्तविक मानसिक चौकट मर्यादीत आहे, पण जीवन मात्र तसे मर्यादीत नाही. त्यामुळेच स्वतंत्र्यातील जीवन हे शरीराला वेदनादायक असते; इथे होत असणारा ऊर्जेचा प्रचंड खळखळाट शरीरासाठी वेदनादायक आहे, तो होत राहातो तशी प्रत्येक पेशी फुटत जाते. तुमच्या अत्यंत विचित्र स्वप्नातही तुम्ही त्याची कल्पना करू शकणार नाही. त्यामुळेच मी ते कसेही सांगितले तरी ते चुकीचेच होईल.
प्रश्न: गुरू आणि पुरोहितदेखील आम्हाला हेच शिकवतात की वेगळी अशी काही रचना नाही आणि आमच्या प्रश्नांचा तोच उगम आहे. तुम्ही वेगळे काय सांगू शकाल?
युजी: तुमच्यासाठी आणि त्यांच्यासाठीही, ते फक्त ठणठणीत कोरडे शब्द आहेत. जीवनाच्या एकच एक सबंध हालचालीत तुमचा विश्वास हा फक्त एक निराधार विश्वास असतो, त्यात निश्चितता नसते. गुरू आणि धर्मग्रंथातून तुम्हाला जे शिकवले गेलेय ते तुम्ही अत्यंत हुशारीने तर्कात बांधले आहे. तुमचे विश्वास हे, ते सांगणार्‍या व्यक्तीकडून आंधळ्यासारखे स्वीकारलेले आहेत, सगळा वापरलेला माल. तुम्ही तुमच्या विश्वासापेक्षा वेगळे नाही. जेव्हा तुमचे मौल्यवान विश्वास आणि भ्रम समाप्त व्हायला येतात, तेव्हा तुमचाही शेवट येतो. माझे बोलणे हे तुमच्या वेदनेला दिलेल्या प्रतिसादापेक्षा जास्त काहीही नाही, त्या वेदना तुम्ही तुमचे प्रश्न, तर्कपूर्ण युक्तीवाद आणि इतर मन्तव्यांतून व्यक्त करताय.
प्रश्न: पण तुम्ही इथे बसून तासामागून तास बोलत राहाताय त्यातून निश्चितच हे दिसून येते की तुमचेही एक तत्वज्ञान, एक संदेश आहे, जरी तो ऐकणार्‍यांना नीट समजत नसला तरी.
युजी:  बिलकुल नाही. इथे बोलणारा, सल्ला देणारा, वेदना अनुभवणारा किंवा काहीही अनुभवून घेणारा कुणीही नाही. एखादा बॉल भिंतीवर फेकला की तो परत विरूध्द बाजूला फेकला जातो, फक्त तेवढेच. माझे बोलणे हे तुमच्या प्रश्नाचा थेट परिणाम आहे. माझे स्वत:चे इथे काहीही नाही, कोणताही सुस्पष्ट किंवा लपलेला अजेंडा नाही, कोणतेही प्रॉडक्ट विकायचे नाही, कसल्याही शस्त्राला मी धार लावत नाही आणि काहीही सिध्द करीत नाहीय.
प्रश्न: पण शरीर हे क्षणभंगुर असते, आणि आपल्या सगळ्यांना कसलेतरी अमरत्व हवे असते. साहाजिकच आपण एका मोठ्या तत्वज्ञानाकडे, धर्माकडे, आध्यात्माकडे वळत असतो. निश्चितच, जर..
युजी: शरीर फक्त अमर असते. वैद्यकिय मृत्यू झाल्यानंतर नवीन आकारात जीवनाच्या प्रवाहात राहून ते त्याचे रूप बदलते. शरीराला "पुनर्जन्म" किंवा कसल्याही प्रकारच्या अमरत्वाशी काही घेणेदेणे नाही. त्याचा आत्ता, या क्षणी जीवंत राहाण्यासाठी आणि वाढण्यासाठी संघर्ष चालू असतो. भीतीमुळे विचारातून तयार केलेला बनावट "पैलतीर" हीच खरी, तसलेच आणखी पुढेही चालू राहाण्याची मागणी आहे. त्याच गोष्टीची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होण्याची ही मागणी हीच अमरत्वाची मागणी आहे. असले अमरत्व शरीराला नको आहे. कायम टिकून राहाण्याची विचाराची मागणी शरीराची घुसमट करून दृष्टीकोन धूसर करीत आहे. विचार हा स्वत:च स्वत:चे रक्षण करीत स्वत:ला टिकवून ठेवण्यापुरते पाहाण्यासोबतच, शरीरही टिकवायला पाहातो. दोन्हीही पूर्णत: चुकीचे आहेत.
प्रश्न: असे दिसते की मूळापासूनच कसलातरी पूर्णत: बदल व्हायला हवा, पण तशी इच्छा मध्ये येत नसेल तर...
युजी: जर ते तुमच्या शक्तीच्या बाहेर घडले, तर खेळ खलास. ते थांबवण्याचा, ती परिस्थिती बदलण्याचा तुमच्याकडे कसलाच मार्ग नसेल. त्यातून जाण्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. वास्तवावर प्रश्नचिन्ह उभे करून काहीच साधणार नाही. त्यापेक्षा तुमची ध्येये, तुमच्या श्रध्दा आणि मान्यतांवर प्रश्नचिन्ह उभे करा. त्यांच्यापासून तुम्ही मुक्त व्हायला हवे, वास्तवापासून नव्हे. तुम्ही विचारत असणारे हे बिनबुडाचे प्रश्न तुमची ध्येये आपोआप सुटली की गायब होतील. ते एकमेकांवर अवलंबून आहे. यातला एक दुसर्‍याशिवाय अस्तित्वात असू शकत नाही.
प्रश्न: हे एवढे दृश्यच भयंकर आहे. आम्हाला अराजक, पूर्णत: नाश ओढवण्याची भीती वाटते.
युजी: जर तुमच्या नाकातोंडात पाणी जात असेल, तर जाऊ द्या. तुम्ही बुडणार नाही. पण मी खात्री दिल्याने काय होणार आहे? मला वाटते, ते निरर्थक असेल. तुम्ही जे करताय ते तुम्ही करीत राहाल; त्यातील निरर्थकता तर तुमच्या लक्षातही येत नाही. मी तुम्हाला सांगतो, आशा आणि सातत्याच्या इच्छेतून होत असलेल्या गोष्टी करणे तुम्ही थांबवता तेव्हा, त्यासोबतच तुम्ही करीत असलेल्या सर्व गोष्टी थांबतात. तुम्ही तरंगत राहाल. पण तरीही तिथे आशा राहातेच; "कदाचित काहीतरी मार्ग असावा, कदाचित मी योग्यप्रकारे करीत नसेल." दुसर्‍या शब्दांत, कशावरही अवलंबून राहाण्याचा मूर्खपणा आपल्याला स्वीकारावा लागतो. आपल्या अगतिकतेचा सामना आपण करायलाच हवा.
प्रश्न: आमच्या प्रश्नांवर काहीतरी उपाय असेल असे वाटून घेण्याशिवाय काहीच हाती नाही. 
युजी: तुमचे प्रश्न तसेच राहातात ते तुम्ही शोधलेल्या चुकीच्या उपायांमुळे. उत्तरे जर तिथे नसतील, तर प्रश्नही तिथे राहू शकणार नाहीत. ते एकमेकांवर अवलंबून आहेत; तुमचे प्रश्न आणि त्यावरचे उपाय एकत्रच जातात. तुमचे प्रश्न मिटवण्यासाठी निश्चित उत्तरे तुम्हाला वापरायची असल्याने, ते प्रश्न तसेच टिकून राहातात. या सर्व धार्मिक आणि पवित्र लोकांनी, मानशास्त्रज्ञ, राजकारण्यांनी सांगितलेले असंख्य उपाय, ही काही खरीखुरी उत्तरे नव्हेत. तेवढे तरी निश्चित आहे. ती लागू पडणारी उत्तरे असती, तर प्रश्न आतापर्यंत शिल्लक राहिले नसते. ते फक्त आणखी कसून प्रयत्न करायला, आणखी ध्यान करायला, आणखी विनम्र व्हायला, तुमच्या डोक्यावर उभे राहायला आणि असल्याच अगणित गोष्टी करायला सांगतात. ते तेवढेच करू शकतात. या तथाकथित उत्तरांसोबतच शिक्षक, गुरू किंवा नेत्याने सांगितलेल उपायदेखील तेवढेच चुकीचे आहेत. ते काही प्रामाणिकपणे काम करीत नाहीत, फक्त बाजारात उभे राहून भिकार, तकलादू वस्तू विकत आहेत. तुमची आशा, भीती आणि भाबडेपणा दूर सारून त्या मूर्खांना बिझिनेसमन सारखी वागणूक दिली तर ते कोणताही माल देत नाहीत, आणि कधीच देऊ शकणार नाहीत हे तुम्हाला दिसेल. पण तज्ञ व्यक्तींनी दिलेल्या बोगस वस्तू तुम्ही विकत घेत जाता.. घेत जाता.
प्रश्न: पण पूर्ण क्षेत्रच एवढे गुंतागुंतीचे आहे की आत्मजागरण आणि ज्ञानप्राप्तीसाठी काळजीपूर्वक अभ्यास करून जीवन अर्पण केलेल्या व्यक्तींवर अवलंबून राहाणे आवश्यक वाटते. 
युजी: त्यांचे सर्व तत्वज्ञान प्रत्येकाच्या शरीरातच असलेल्या ज्ञानाच्या पासंगालाही पुरणार नाही. ते सांगत असलेली मानसिक कृती, आध्यात्मिक कृती, भावनिक कृती आणि भावना ह्या सर्व गोष्टी एकच एक सबंध प्रक्रिया आहे. शरीर हे अत्यंत हुशार आहे आणि या वैज्ञानिक आणी धार्मिक शिकवणुकीची त्याला टिकून राहाण्यासाठी आणि प्रजोत्पादनासाठी काहीच गरज नाही. जीवन, मृत्यू आणि मुक्तीबद्दलच्या तुमच्या सर्व रंगीबेरंगी कल्पना बाजूला सारा आणि शरीर अबाधीत, स्वरबध्दपणे कार्य करीत राहिल. त्याला माझी किंवा तुमची गरज नाही. तुम्हाला काहीएक गोष्ट करायची गरज नाही. अमरत्व, पुनर्जन्म किंवा मृत्यूबद्दलचे मूर्खपणाचे प्रश्न त्यानंतर तुम्ही कधीही विचारणार नाही. शरीर अमर आहे.  
प्रश्न: आम्हाला दिलासा, नियंत्रण मिळण्याची प्रत्येक शक्यता तुम्ही निर्दयपणे छाटून टाकलीत, दु:खापासून पळण्याची धूसर आशाही शिल्लक ठेवली नाहीत. स्वत:चा नाश करून घेण्याशिवाय काहीही हातात नाही असे वाटते. मग आत्महत्या का करू नये? 
युजी: तुम्ही आत्महत्या केलीत, तरी परिस्थितीत कसलाच फरक पडणार नाही. आत्महत्या झाल्यानंतर काही क्षणातच शरीर सडायला लागून, जीवनाच्या इतर प्रकारे संघटीत रूपांत रूपांतरीत होईल, त्यामुळे काहीही संपणार नाही. जीवनाला सुरूवातही नाही आणि शेवटही. मृत आणि सडणारे शरीरावत थडग्यातील मुंग्यांची भूक भागेल आणि सडणार्‍या प्रेतांतून मृदा समृध्द होणारी रसायने मिळून जीवनाच्या इतर रूपांचे पोषण होईल. तुम्ही तुमचे जीवन संपवू शकत नाही, ते अशक्य आहे. शरीर हे अमर आहे आणि "अमरत्व आहे काय?" वगैरे मूर्खपणाचे प्रश्न ते विचारत नाही. त्याला माहित असते की विशिष्ट रूपात समाप्त होऊन ते इतर रूपात टिकून राहिल. मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दलचे प्रश्न हे नेहमीच भीतीतून विचारले जातात. तुमच्या "आध्यात्मिक जीवनाचे" नेतृत्व घेतलेले ते नेते कधीच या गोष्टींबाबत प्रामाणिकपणे बोलणार नाहीत, कारण ते भीती, भविष्यातील जीवनाबद्दलचे अंदाज आणि मृत्यूच्या "गूढावर" स्वत:ची उपजिवीका चालवितात.
आणि तुम्ही, त्यांचे चेले, तुम्हाला काही खरोखर माणसाच्या भविष्याबद्दल घेणेदेणे नाही, तुम्हाला फक्त तुमच्या स्वत:च्या क्षुल्लक चिंता आहेत. मानवता, दया, करूणा आणि इतर गोष्टींबद्दल तासन तास बोलत राहून तुम्ही फक्त एक विधी पार पाडता. तुम्हाला रूचि असते ती तुमच्या स्वत:मध्ये, नसता तुमची भविष्यातील जीवने आणि तुमच्या सुनिश्चित मृत्यूबद्दल असले पोरकट प्रश्न उभे राहिले नसते.
प्रश्न: पण आमच्यापैकी बहुतेकांसाठी जीवन ही एक पवित्र गोष्ट आहे. आम्ही आमच्या पोराबाळांचे, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि आणखी युध्दे टाळण्यासाठी संघर्ष करतो..
युजी: तुम्ही सगळे माथेफिरू लोक आहात. तुम्ही जनन दरावरील नियंत्रणाविरोधात बोलता, अमूल्य जीवनाबद्दल आणि त्यानंतर बॉम्ब्ज आणि नरसंहाराबद्दल बडबडत राहाता. किती हास्यास्पद आहे. तुम्ही बॉम्बफेक, उपासमार, गरीबी आणि दहशतवाद यातून हजारो लोक मारत असतानाच तुम्हाला अजून जन्म न झालेल्या जीवनाबद्दल चिंता आहे. तुमची जीवनाबद्दलची "चिंता" फक्त त्यातून राजकिय मुद्दा उकरून काढण्यापुरतीच आहे. ती फक्त सुशिक्षित लोकांची एक चर्चा आहे. मला त्यात रूची नाही.
प्रश्न: होय, पण आमच्यापैकी अनेकजण हे पाहातात आणि या गोष्टी बदलण्याचीही त्यांची इच्छा असते. हा काही आमचा फक्त अहंकार नाही.
युजी: खरंच तुम्हाला त्यात रूची आहे? तुम्हाला मानवाच्या भविष्यात खरंच रूची आहे? राग, खरेपणा आणि काळजी या तुमच्या अभिव्यक्तींना माझ्याकडे काहीही किंमत नाही. ते फक्त विधी आहेत. तुम्ही बसता आणि बोलता, बस्स तेवढेच. तुम्ही बिलकुल चिडलेले नाही आहात. तुम्ही या क्षणी खरोखर चिडलेले असता तर हा प्रश्न तुम्ही स्वत:ला देखील विचारला नसता. तुम्ही अखंडीतपणे रागाबद्दल बोलत राहाता. रागावलेला माणूस, त्याबद्दल बोलणार नाही. त्या रागाच्या बाबतीत तो सामावून घेऊन शरीराने अगोदरच त्याची कृती करून टाकलेली असते. राग तिथल्या तिथे जळून जाऊन संपतो. तुम्ही काही करीत नाही; शरीर फक्त तो सामावून घेते. बस्स, तेवढेच. तुमच्यासाठी हे फारच जास्त असेल, त्यामुळे ताण येत असेल तर, कधीच धार्मिक माणसांकडे जाऊ नका. गोळ्या खा, काहीही करा, पण पवित्र धंद्यातून तुम्हाला मदत मिळण्याची अपेक्षा करू नका. तो वेळेचा अपव्यय आहे.
प्रश्न: तुम्ही मला सगळंच सोडायला लावताय, सगळाच त्याग..
युजी: जोपर्यंत तुम्हाला त्याग करण्यासारखे, सोडून देण्यासारखे काही आहे असे वाटेल तोपर्यंत तुम्ही हरवलेले आहात. पैशांचा आणि जीवनातील गरजांचा विचारही न करणे हा एक आजार आहे. जीवनाच्या मूलभूत गरजाही स्वत:ला नाकारणे हे दमन आहे. स्वत: ओढवून घेतलेल्या निष्कांचनपणामुळे तुम्हाला जागरूकता वाढविता येऊन ती जागरूकता सुखी होण्यासाठी वापरता येईल असे तुम्हाला वाटते. विसरा रे. जागरूकतेबद्दलच्या सर्व संकल्पना टाकून दिल्यानंतर आणि कॉम्प्युटरसारखे काम करणे सुरू केल्यानंतर तुम्हाला शांतता मिळेल. तुम्ही एक यंत्र असायला हवे, या जगात आपोआप कार्य करायला हवे, तुमच्या कृत्यांबद्दल ते होण्यापूर्वी, होताना किंवा झाल्यानंतर प्रश्नच पडायला नकोत.
प्रश्न: योगातील पध्दती, धार्मिक परित्याग किंवा नैतिक पोषणाचे मूल्य तुम्ही नाकारत आहात काय? माणूस निश्चितच यंत्रापेक्षा काहीतरी जास्त आहे.
युजी: सर्व नैतिक, आध्यात्मिक, तात्विक मूल्ये खोटी आहेत. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी व्यावहारिक मार्ग शोधणारे मानसशास्त्रज्ञ आता थकले आहेत आणि उत्तरांसाठी आध्यात्मिक धेंडांकडे वळायला त्यांनी सुरूवात केलीय. ते हरवले आहेत, आणि तरीही उत्तरे ही त्यांच्याकडूनच यायला हवीत, बुरसटलेल्या निरूपयोगी धार्मिक परंपरा आणि पवित्र धंद्यातून नव्हे.
प्रश्न: या सर्व परिस्थितीतून फक्त हताशा येतेय. मसिहा, महात्मा आणि प्रेषितांवर लोक अवलंबून राहिले यात काहीच आश्चर्य नाही.
युजी: या तथाकथित मसिहा आणि प्रेषितांनी जगात फक्त दु:ख मागे ठेवले आहे. एखादा आधुनिक मसिहा तुमच्यासमोर आला, तर त्याला तुम्हाला कसलीही मदत करता येणार नाही. आणि त्याला मदत करता आली नाही, तर कुणालाच मदत करता येणार नाही.
प्रश्न: एखादी अभिषिक्त व्यक्ती, उदाहरणार्थ एखादा तारणहार किंवा ऋषिला काहीच करता येण्यासारखे नसेल, तर धर्मग्रंथ म्हणतात त्याप्रमाणे, आपण "सत्य जाणून घ्यायला हवे आणि सत्य आपणा सर्वांना मुक्त करील."  
युजी: सत्य ही एक हालचाल असते. तुम्ही ते कैद करू शकत नाही, साठ्वू शकत नाही किंवा व्यक्त करू शकत नाही अथवा तुमचे हेतू साध्य करण्यासाठी वापरूही शकत नाही. ज्या क्षणी तुम्ही सत्य कैद करता, ते सत्य राहात नाही. माझ्यासाठी जे सत्य आहे ते कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला देता येत नाही. इथे असणारी निश्चितता दुसर्‍याकडे सोपवता येत नाही. याच कारणामुळे गुरूगिरीचा सर्व धंदा पूर्णत: एक फाजीलपणा आहे. नेहमीच हे असेच असत आले आहे, आत्ताच असे आहे असे नाही. पुरोहित, गुरूंना समृध्द करण्यासाठी तुम्ही काटकसर करता. तुम्ही तुमच्या मूलभूत गरजा दाबून टाकता आणि तो माणूस मात्र रोल्स रॉयस कारमध्ये फिरतो, राजासारखा खातो आणि महाराजासारखा वागवला जातो. तो आणि पवित्र धंद्यातील दुसरे लोक इतरांचा मूर्खपणा आणि भोळेपणावर पोसले जातात. असेच, राजकारणी सुध्दा माणसाच्या भुक्कडपणावर जगतात. सगळीकडे हे असेच आहे.
प्रश्न: तुमचा जोर नेहमीच नकारात्मक बाजूवर आहे, प्राचिन "नेति नेति" या दृष्टीकोनावर. आपला नैसर्गिक जन्मसिध्द हक्क असणारी स्थिती एखाद्याने शोधण्यासाठी धर्मग्रंथ, गुरू आणि अधिकारी व्यक्तींसह सर्व अतिरिक्त पसारा फेकून देण्याकडे तुमचा इशारा आहे ना?
युजी: नाही. मुक्तीसाठी गुरू, मंदिरे आणि पवित्र ग्रंथांपासून फारकत घेणे ही पूर्व अट असणे चमत्कारिक आहे. फक्त तुमच्या अडचणी, वेदना टाळण्यासाठी तुम्ही उत्तरे शोधत असता. जन्म झालेली प्रत्येक गोष्ट वेदनादायी आहे. ते तसे का आहे हे विचारण्याचा काहीही उपयोग नाही. ते तसे आहे. गुरू आणि अधिकारी व्यक्तींना नाकारून तुम्ही कसल्यातरी दैवी वेदना सहन कराल; वेदना सहन केल्याने तुम्हाला कसलीही आध्यात्मिक मदत मिळू शकणार नाही. कसलाही मार्ग नाही.
प्रश्न: पण आम्ही तुम्हाला एक अतिवादी, एक मानवद्वेष्टा म्हणून ओळखतो. तुम्ही फक्त माणसाच्या सध्याच्या हाल अपेष्टांवर टिकाच करीत नाहीय तर त्याच्या वेगळ्याच नियतीकडे निर्देश करताय, नाही?
युजी:  तुमच्या प्रश्नांसाठी एक उपाय आहे - मृत्यू. तुम्हाला ज्या मुक्तीमध्ये रूची आहे ती मुक्ती फक्त मरताना मिळेल. प्रत्येकाला शेवटी मोक्ष मिळतो, कारण मोक्षामध्ये नेहमीच मृत्यूची सावली आहे, आणि प्रत्येकजण मरण पावतो.
प्रश्न: पण मला वाटते तुम्ही कोणत्याही काव्यात्म किंवा काल्पनिक अर्थाने मृत्यूकडे पाहात नाही आहात. तुम्ही वर्णन करीत असणारा मृत्यू हा मानसिक, कल्पित किंवा अस्पष्ट रूप असलेला मृत्यू नाही तर खरोखर, वास्तविक शारीरिक मृत्यू आहे, होय ना?  
युजी: होय. तुम्ही मरता तेव्हा शरीर हे पसरलेल्या स्थितीत असते आणि कार्य करणे थांबवते, आणि तोच शेवट आहे. पण या बाबतीत शरीराने स्वत:ला कसेतरी पुनरूज्जीवीत केले आहे. आता ते नेहमीसारखे दररोजच होते; ही सर्व प्रक्रिया स्थिर होण्यासाठी अनेक वर्षे लागली. माझ्यासाठी आता जीवन आणि मृत्यू एकच आहेत, त्या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. मी फक्त एवढाच इशारा देतो की तुमचे ध्येय असणारा मोक्ष खरोखर आला, तर तुम्ही मराला. शारीरिक मृत्यू होईल, कारण त्या स्थितीत जाण्यासाठी शारीरिक मृत्यू व्हायलाच हवा. तुम्हाला मजा वाट्ते म्हणून तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवत खेळ खेळला जातो. पण तुम्ही जास्तवेळ श्वास रोखून ठेवला तर मरण ओढवते.
प्रश्न: त्यामुळे आपल्या ध्यानाचा विषय करून, त्याला अशा काल्पनिक, गूढ प्रकारे मानून मृत्यूबद्दल जागरूक व्हायला हवे. नाही का?
युजी: त्या स्थितीचे ध्यानातील पूर्ण जागरूकता असलेली स्थिती म्हणून वर्णन करणे कल्पित, निरर्थक गोष्ट आहे. जागरूकता! स्वत:ला आणि इतरांना मूर्ख बनवण्यासाठी वापरण्यात येणारी किती चमत्कारिक युक्ती! तुम्ही प्रत्येक पावलाबद्दल जागरूक होऊ शकत नाही, झालात तर तुम्ही फक्त आत्मकेंद्रीत आणि बावळट बनता. जहाजचालक असणारा एक माणूस मला एकदा भेटला. तो "निष्क्रिय जागरूकता" याबद्दल वाचत होता आणि त्याने तसे प्रत्यक्ष वागण्याचा प्रयत्न केला. तो चालवत असलेल्या जहाजाच्या, त्याने आयुष्यात पहिल्यांदाच चिंध्या केल्या. आपोआप चालत राहून तुम्ही प्रत्येक पावलाबद्दल जागरूक राहाण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला वेड लागेल. ध्यानाच्या पायर्‍या कसल्या शोधताय? जेवढे आहे तेवढे पुरे. ध्यानस्थ स्थिती सर्वात खराब आहे.
प्रश्न: पण आपण पवित्र मानलेली प्रत्येक गोष्टच आपल्याला सोडून देता येत नाही.
युजी: निश्चितच, मला सोडून देऊ शकतो; तो फक्त रोमॅण्टीक पसारा आहे. मी तुम्हाला दिलेला कोणताही उपाय तुमच्या शोधाचा भाग बनेल; म्हणजेच आणखी रोमॅण्टीक पसारा. त्यामुळेच मी कधीच सांगताना थकत नाही की माझ्याकडे विकण्यासारखी कोणतीच गोष्ट नाही, एखादी चांगली पध्दतही नाही ज्यातून तुम्हाला तुमचा शोध पुढे चालु ठेवता येईल. मी त्या पूर्ण शोधाचीच वैधता नाकारतो. तुम्हाला इथे काहीही मिळणार नाही. इतर कुठेतरी तुमचे नशीब अजमावून पाहा.
प्रश्न: पण निश्चितच तुम्ही पण एक माणूस आहात आणि मानवतेच्या कामी पडू ईच्छिता, दया म्हणून तरी?
युजी:  तारणहार म्हणून माझी कुणी निवड केलीय? तुमची सेवा करू इच्छिणारे असंख्य संत, प्रेषित आणि त्राते तुमच्याकडे आहेत. आणखी एकाची भर कशाला टाकता? येशू म्हणाला, "वाजवा म्हणजे दार उघडेल. माझ्या मागून या." काही कारणामुळे मी ते करू शकत नाही. आपण बरेच रान पळालो आहोत. आपण हा संवाद उद्या पुढे चालू ठेवला तर बरे होईल.
प्रश्न: मग उद्यापर्यंत..
युजी: धन्यवाद.


( मराठी अनुवाद - यशवंत कुलकर्णी  )

३ जानेवारी, २०११

बाबूकाका

डोक्याच्या घेरावर बारीक होत गेलेला पोलीसकट, पांढरे होत चाललेले केस, तरूणपणीच्या शम्मी कपूरसारखाच चेहेरा आणि अंगयष्टीही तशीच, अंगात सफारी किंवा तसलाच साहेबी वाटणारा पोषाख, हातात एक लहानशा आकाराची ब्रीफकेस असे काहीसे वर्णन करता येईल असा माणूस एसटीतून उतरण्याची वाट पाहात खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट घातलेला एक पोरगा बसस्टॅण्डवर कितीतरी वेळापासून थांबलेला असे. ते त्याचे बाबूकाका होते. बाबूकाका त्याचे आजोबा लागत असले तरी घरातील इतर सर्वजण त्यांना बाबूकाकाच म्हणत असल्याने त्याच्यासाठीही ते बाबूकाकाच होते. घरातील कुणीतरी बाबूकाका आज/उद्या येणार असं बोलत असताना ऐकलं की तो शाळा सुटताच बाबूकाका यायची वाट पाहात स्टॅण्डवरच थांबून राही. कधीकधी बाबूकाकासोबत रमाकाकू सुध्दा यायच्या. अशावेळी मात्र त्यांचा गडी चांदपाशासुध्दा गाडीबैल बसस्टॅंडजवळच्या एखाद्या झाडाखाली सोडून तिथेच बीडी फुंकत बसलेला दिसे. एस्ट्यावर एस्ट्या थांबत आणि त्यातून बाबूकाका-रमाकाकू बाहेर न पडताच निघुन जात. मग साडेसहा पावणेसात वाजता चांदपाशानं गाडी जुपून गावाकडे वळवली की तो पोरगा मागून चालत्या बैलगाडीत उडी मारून गाडीत चढे आणि चांदपाशाजवळ जाऊन बसे.
"य्या:!! ...हूं॒:!!! ... सांगायचं नाही व्हयं गाडी थांबव म्हनून? पल्डं, र्‍हायलं म्हंजी? नसलेली बला.."
बैलगाडीचा कासरा सांभाळताना खरोखर आलेला राग त्या हूं:!!! मधून दाखवत त्या पोराकडं पाहून चांदपाशा म्हणे.
"काही पडत नाही मी चांदपाशामामू.. ते जाऊ द्या.. बाबूकाका कधी येतो म्हणले होते?"
"बाबूशेट आज पंधरादी जालन्याला गेले व्हते तव्हा ह्या सुक्कीरवारी यतो म्हनून निरोप देल्ता... आजूक पत्ता नाई... येतेन उद्या.. सनवार आन रैवारी सुट्टीबी अस्ती.."
"हो!!!! उद्या बाबूकाका येणारच मग.. उद्या शनीवार.."
मग तो पोरगा शनीवारी दुपारी चार वाजता पुन्हा एकदा स्टॅण्डवर जाऊन बसे. बाबूकाका आणि रमाकाकूची खूप वेळ वाट पाहून कंटाळून जाई. आणि अचानक कुठल्यातरी एसटीतून बाबूकाका आणि डोक्यावर पदर घेतलेल्या रमाकाकू उतरताना दिसत. चेहेर्‍यावर खूप मोठं हसू घेऊन तो एस्टीतून उतरलेल्या बाबूकाकाच्या दिशेनं पळे.
"ह्हे:!!!!! पप्पुशेठ.. गाडीलेट.. गाडीचा नंबर एटीएट!!! ..." बाबूकाका त्या पोराकडं पाहून ओरडत.
"तुमी तर कालच येणार होता... चांदपाशा न मी वाट पाहून घरी वापस गेलो काल..."
"येणार होतो रे.. पण सुट्टीच मिळाली नाही.."
तेवढ्यात गावात कोतवालकी करणारा देवर्‍या कुणीही न सांगता पुढे येऊन काकांची ब्रीफकेस हातात घेई आणि रूमालाची चुंबळ डोक्यावर ठेऊन काकूची मोठी सूटकेस डोक्यावर घेऊन घराकडे चालू लागे.
मग बाबूकाकाच्या हातात हात घातलेला तो पोरगा, रमाकाकू असे सगळेजण पायीपायीच घराकडे चालू लागत. बाबूकाकासोबत हातात हात घालून चालताना त्या पाचवी सहावीतल्या पोराला खूप मजा वाटे. रस्त्यात भेटणारे, धोतर, टोपी घातलेले लोक मध्येच थांबून बाबूकाकाला रामराम! असं म्हणून रामराम घालत. बाबूकाकापण रामराम! रामराम! म्हणून प्रतिसाद देत. असं होता होता मारवाड्याचं दुकानं येई आणि तिथं बाबूकाका मुद्दाम थांबून दुकानात गिर्‍हाईकांच्या मालाची पट्टी करीत उभ्या असलेल्या बाबूशेठला "जयगोपाल शेटजी!!" म्हणत. ते ऐकताच आडदांड आकाराचे बाबूशेठ चष्यातून वर पाहात बोलत -
"अरे! तुम्ही आलात? चांदपाशा आला नाही का गाडीबैल घेऊन?.. आज कापूस वेचायला बाया लावल्यात.. तिकडं गेला असल.."
"हो, तुम्हाला बोललो होतो शुक्रवारी येईल म्हणून.. पण रजाच मिळाली नाही.. आज शेवटी निघालोच.. येतो रात्री निवांत.." असं म्हणून बाबूकाका पुढे चालू लागत.
घराकजवळ येताच त्या पोराची आजी हातात पाण्यानं भरलेला तांब्या आणि भाकरीचा तुकडा घेऊन थांबलेली दिसे. शेजारच्या ओट्यावरच सामान वाहून थकल्याने हाश्श..हुश्श करत देवर्‍या बसलेला.
"देवर्‍यानं सामान आणून टेकवलं कीच मी म्हणले, माय‌‍ऽऽ बाबू राव आले जणू... रमा, किती खराब झालात गं.." असं म्हणीत आजी बाबूकाका आणि रमाकाकूवरून भाकरीचा तुकडा ओवाळून फेकी आणि चूळ भरायला पाण्यानं भरलेला तांब्या हातात देई.
बाबूकाका मोठ्या दारातच चूळ भरून पायावर पाणी घेत आणि लगेच वाट पाहात उभ्या राहिलेल्या देवर्‍याच्या हातावर तिथल्या तिथेच दहा रूपयाची कडक नोट ठेवत. डोक्याला हात लावत देवर्‍या पुन्हा बसस्टॅण्डकडे चालू लागे. पटकन मग तो लहानसा पोरगा त्याच्या शाळेच्य वह्या बाहेर काढी आणि बाबूकाकाला दाखवायला निघे -
"काका, हे बघा, मला आता इंग्लिश वाचता येतंय...."
"हो? पाचवीलाच इंग्लीश? दाखव.." म्हणून काका त्या पोराची वही हातात घेत. तो पोरगा वही काकांच्या हातात देऊन इंग्रजीचं पुस्तक हातात धरून धडा वाचायला सुरूवात करी.. निघोज इज ए वंडरफुल प्लेस सिच्युएटेड ऑन दी बॅंक्स ऑफ रिव्हर घोड.. रिव्हर घोड हॅज क्रिएटेड मेनी पॅथहोल्स इन दी रॉक्स सराऊंडींग इट्स बोथ साईड्स..."
"ए‌ऽऽऽ इथं हे मराठीत लिहीलेलंय..." काका म्हणत..
"हो.. मला दादांनी आधी मराठीत इंग्रजी वाक्यं लिहून वाचायला शिकवलंय.." तो पोरगा त्याची बाजू सांभाळी.
"तुझे दादा काही ती जुनी पध्दत सोडणार नाहीत.. कुठे गेले दादा..?" बाबूकाका विचारत. हे दादा म्हणजे बाबूकाकाचेच सावत्र पण मोठे भाऊ.
"गायवाड्याकडं गेले असतेल.." तो पोरगा बाबूकाकाला सांगत असे.
"पप्प्या, जा बोलावून आण तुझ्या दादाला.. बाबूराव आले म्हणाव.." त्याची आजी त्याला म्हणे.
बाबूकांच्या हातात वाफाळलेल्या चहाची कपबशी देत आजी म्हणे. तो पोरगा गायवाड्याकडं पळे.
त्या पोरासाठी बाबूकाका म्हणजे नेहमीच लांबच्या गावाहून येणारं अत्यंत जवळचं, अत्यंत लाड करणारं आणि आकर्षण वाटणारं माणूस असे. बाबूकाकाबद्दल गावातल्या प्रत्येक माणसाला आदरयुक्त भीती असे, प्रत्येक माणूस कधी ना कधी त्यांना सल्ला विचारायला येत असे. बाबूकाका हे पुणे, जालन्याच्या पोलिसांच्या शाळांमध्ये पोलिसांना कायदे शिकवणारे वकील होते. पाचवीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत जालन्याच्या आर.पी.टी.एस. मध्ये बाबूकाकांकडे राहायला तो मुलगा जेव्हा गेला, तेव्हा गेट भोवती आणि घराभोवती बंदुका हातात घेऊन उभे असलेले पोलिस पाहून त्याला बाबूकाका हे कुणीतरी खूपच मोठे असल्याबद्दल खात्रीच पटली होती.
बाबूकाका म्हणजे कायदेकानू कोळून प्यालेला माणूस. कधीही कुणासमोरही खाली पाहाणार नाही. झालेच तर लोकांवर उपकार करतील, पण फुकट कुणाकडून ग्लासभर पाणीसुद्धा घेणार नाहीत. बेकार हिंडणार्‍या पोरांना काहीतरी किल्ल्या वापरून पोलिस कॉन्स्टेबलची नोकरी द्यायचा अधिकार हातात असला तरी, कायद्यानं आखलेल्या मर्यादेबाहेर जाऊन कधी कुणावर उपकार केला नाही. शिकायचं आहे ना, मग शिका - पैसा लागला तर मी देतो, पण परिक्षा पास होऊनच नोकरीत या - वशिल्याचे फालतू धंदे माझ्याच्यानं होणार नाहीत - हे त्यांच्याकडं नोकरीकरीता येणार्‍या गावातल्या तरूण लोकांना स्वच्छ सांगणं असे. त्यांच्या आश्रयानं राहून अनेक होतकरू पोरं फौजदार, सरकारी वकील या हुद्द्यावर गेली. आणि जी जावू शकली नाहीत, ती "वकील लई खडूस हाये.. साधा कॉन्स्टेबल म्हणूनपण कधी कुणा बेकार पोराला लावणार नाही" म्हणू लागली.
बाबूकाका आणि रमाकाकू येत तेव्हा न चुकता त्या मुलासाठी खार्‍या शेंगदाण्याच्या पुड्या आणत, दिवाळीत हजार रूपयांचे फटाके विकत घेऊन देत, कपडे, पुस्तके आणि तसलाच अनेक प्रकारचा लाड पुरवत. पण या बाबूकाका आणि रमाकाकूंना स्वत:चा मुलगा किंवा मुलगी कुणीही नव्हते. ते स्वत:च्या पुतण्याच्या, भावाच्या मुलांना असे प्रेम लावत. आणि मग त्या खेड्यात "आता बाबू वकील अमुक च्या मुलाला दत्तक घेणार!!" अशी अफवा उठे. बाबूकांकांचा दरारा, चार औतं, पाच-सहा गड्यांचा बारदाना आणि पन्नास-साठ एक्कर जमीन पण त्यांच्या वंशाला नसलेला नसलेला दिवा हाच एक गावातल्या लोकांसाठी चर्चेचा विषय असे.
गावातले लोक मध्येच कधीतरी त्या मुलाला पकडून म्हणत -
"पप्पुशेठ, नीट र्‍हा, शिका.. बाबूमालक तुमाला काई कमी पडू देणार न्हाईत.. सोनं होईल आयुष्याचं.." त्या पाचवी सहावीतल्या पोराला त्यातलं काही कळत नसे.
मग बाबूकाका चहापाणी आटोपून ओट्यावर बसत. तेवढ्यात शेताकडून कापसाच्या भोतांनी लादलेली बैलगाडी घेऊन चांदपाशा येई. आल्याआल्याच "मालक आले जणू!" म्हणून पटकन कापूस चार खणात टाकून बाबूकाका या त्याच्या मालकांसमोर येऊन बसे.
"वाट पाहून चार वाजता गेलो मी गारूडात... कापसाला बाया लावल्यात आज.." असं सांगून बैलगाडी घेऊन बसस्टॅण्डवर हजर नसल्याबद्दल सारवासारव करी.
"देवर्‍या होता बसस्टॅण्डवर.. आम्ही आलो पायीपायी.. बाबूशेठनं आत्ताच दुकानात सांगितलं कापसाचं.. किती होईल यंदा कापूस?" बाबूकाका चांदपाशाला विचारत.
"अं! छातीइतकं हाये एक एक झाड आवंदा.., ईस पंचीस कुंटल उतार होईनच...तूर बी तशीच हाये.. उद्या येढ्याला तुमीच पाहा.." चांदपाशा म्हणे.
मग ओट्यावर बाबूकाका, चांदपाशा आणि रानातून आलेल्या गड्यांच्या गप्पा होत त्यावेळी वाड्यासमोरच्या आवारात रातकिडे चमकू लागलेले असत आणि बेडकांची डरांवऽऽ डरावं‍ऽऽ सुरू झालेली असे. गड्यांसोबत बाबूकाकांचा पुन्हा एकदा चहा होई.
"जा आता घरी, भाकरी खाऊन घ्या..." शेवटी बाबूकाका गड्यांना सांगत आणि जेवणखाण आटोपून बाबूशेठ्च्या दुकानाकडं निघत. तिथे त्यांच्या दोस्तांचा जमाव रात्रीच्या रमीच्या डावाची जमवाजमव करीत बाबूकाकांची वाट पाहात असे.
सकाळी "बाबू काल रात्री अडीच वाजता आला घरी" असं दादा म्हणत असताना ऐकू येई आणि तो पोरगा जागा होई.
मग चार सहा दिवस असेच बाबूकाकासोबत, रमाकाकूसोबत गप्पा करताना, त्यांचं बोलणं ऐकताना कसे वार्‍यासारखे भुर्रर्र उडून जात.
"वन्सं, माझा सपीटाचा उंडा किती काळा पडलाय हो... पप्पुशा अभ्यास करतोस की नाही नीट?" रमाकाकू आजीला बोलत असताना त्या पोराला जवळ घेत.
"गंगंच्या काठंचं वारं रमा इथं, इथं कुठं तुमच्या जालन्यासारखं मशीनीतून येणारं वारं? घेऊन जा त्याला जालन्याला... महिन्यात सपीटासारखा दिसल" आजी रमाकाकूला म्हणे.
मग गुरूवार येई आणि गुंजाला निघायची तयारी होई. तो मुलगा आणि त्याची बहीण नमी सगळ्यात अगोदर तयार होऊन गाडीत चढत.
.
.
.
.
.
.
.
असेच दिवस, वर्षे उलटत गेली. तो मुलगा कळता होऊ लागला. चुकत माकत शिकला, चार अक्षरं गिरवू लागला. पाखरांच्या पिलांना पंख आले की ती जास्त काळ घरट्यात थांबत नाहीत. तो ही कुठंतरी दूर उडून गेला. या काळात बाबूकाका रिटायर झाले. गावाकडे राहायला आले. आता इतकी वर्षं शहरात राहिलो, आता गावातच राहून स्वत: शेती पाहाणार म्हणाले - काही वर्षे गुंजाच्या वार्‍या करीत स्वत: शेती पाहिलीसुध्दा. एवढा सरकारी वकील माणूस पण खेड्यागावात राहून शेती पाहातोय, गावची मोडकळीला आलेली मंदीरं पुन्हा उभारतोय हे पाहून गावातल्या लोकांना बाबूकाकांचं आणखीनच अप्रूप वाटू लागलं.
तशी बाबूकाकाची प्रकृती पहिल्यापासूनच तोळामासा. थोडं काही झालं की बाबूकाकांची तब्येत खालावत असे. गावचं राहाणं, लोकांकडून होणार्‍या दत्तकाबद्दल होणार्‍या खुदर्‍याबुदर्‍या यांत बाबूकाकांनी त्याबद्दल काहीच ठरवलं नाही. स्वत:च्या दुसर्‍या सख्ख्या भावाची मुलं, मुलीही आता कळते सवरते झाले होते. बाबूकाकांनी त्यांना शिकवलं, डॉक्टर, प्राध्यापक केलं. जालन्यात असताना भावाची मुलगी स्वत:कडे शिकायला ठेऊन घेतली - तिला पोटच्या पोरीसारखाच जीव लावला. तिचं लग्न लाऊन दिलं - आणि तेव्हापासूनच त्यांची तोळामासा प्रकृती दर सहा महिन्यांना आणखी ढासळू लागली. अन्न समोर आलं की उलट्या होऊ लागल्या.
असाच आजार सरकारी वकीलाची नोकरी लागलेली असताना त्यांना झाला होता असं दादा कित्येक वेळा बोलताना त्या पोराला आठवे. पण तो काळ जुना होता. तेव्हा गुंजाचे महाराज हयात होते. ते महाराज दत्तकृपा असलेले नैष्ठीक ब्रम्हचारी होते. बाबूकाका त्यांच्या संस्थानातले मानकरी होते. रमाकाकूंनी महाराजांसमोर पदर पसरून भीक मागितल्यानंतर त्यांनी बाबूकाकांना जगवलं होतं. कुणाच्याही घरचं अन्न खाऊ नका, कुणाचा पैसा खाऊ नका, नेकीनं सरकारची चाकरी करा अशा अटी घालून त्यांनी बाबूकाकांना जीवनदान दिल्याचं खुद्द बाबूकाकाच मानत होते. महाराजांनी सांगितलेले नियम आणि गुरूवारची दत्तमहाराजांची वारी व रोजची पंचपदी, पाठ चुकवत नव्हते.
पण आता काळ बदलला होता. वय वाढल्यानंतर पुन्हा प्रकृतीच्या त्याच तक्रारी बाबूकाकाला सतावू लागल्या. आता गुंजाचे महाराजही नव्हते. डॉक्टर झाले, वैद्य झाले, महिना महिना हॉस्पीटलमध्ये राहून झालं. चार आठ महिने बाबूकाकांना बरं वाटे आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन.
तो पोरगा बाबूकाकांना म्हणे -
"काका, तुम्ही कशाला त्या गावात राहून शेती पाहाण्याच्या फालतू भानगडीत पडता.. चांगला बंगला घ्या, कार घ्या.. शहरात राहा.. काय पडलंय त्या शेतीत आणि हवीय कशाला आता ती शेती? सरळ विकून टाका.. आजारी पडलात तर कार करून शहरापर्यंत यावं लागतं... तुम्ही नकाच राहू तिथं.." बाबूकाका हो! हो! म्हणत पण ऐकत नसत.
शेवटी महिनाभर बाबूकाकांनी अन्न सोडलं. सगळे डॉक्टर, वैद्य झाले. जुन्या महाराजांच्या जागेवर आलेल्या महाराजांनी दिलेला अंगारा, तीर्थ वगैरे झाले.. पण बाबूकाकांची अन्नावर वासना होईना. डॉक्टरांनी आठ दिवस ठेऊन घेतले आणि एके दिवशी प्रकृतीत फरक पडल्यावर काहीही शारीरिक आजार नाही, अन्न खायला लागा म्हणून डिस्चार्ज दिला. सख्ख्या भावाचा पुतण्या, सावत्र भावाचा पुतण्या, बायको त्यांचा तो पोरगा दिवसरात्र हॉस्पिटलमध्ये राहिले. डिस्चार्ज मिळून गावाकडे गेल्यावर, शेवटी बाबूकाकांनी नेहमीच्या शिरस्त्यानुसार गुंजाच्या वारीला न्यायचा हट्ट धरला. अन्न जात नव्हतंच. तिथं गेले, रात्रीचे बारा वाजेपर्यंत गुरूवारची पंचपदी झाली, सकाळी काकड आरती झाली..
बाबूकाका सोबत असलेल्या, डॉक्टर पुतण्याला म्हणाले -
"अरे, दत्त महाराजांचं तीर्थ आणि अंगारा दे..."
ते झालं. सकाळी साडेसहाला बाबूकाकांचा श्वास थांबला आणि अन्नावाचून जर्जर झालेला देह शिल्लक राहिला. प्रतिगाणगापूर मानल्या जात असलेल्या गुंज गावात बाबूकांकांनी देह ठेवला.
बाबूकाका गेले आणि त्या पोराला हे सगळं आठवलं...
गावी जाणार्‍या रेल्वेमध्ये हे पोरंगं का रडतंय ते अनोळखी प्रवाशांना कळत नव्हतं

१७ डिसेंबर, २०१०

दिलखुलास

नमस्कार वाचकहो!
आजची पोस्ट तुमच्यासाठीच आहे. हा ब्लॉग सुरू होऊन जवळपास सात आठ महिने झालेत. या ब्लॉगवरची प्रत्येक पोस्ट या ना त्या रूपात वाचकांशी संवाद साधण्यासाठीच असली तरी आजच्यासारखा थेट संवाद सुरू करण्याचा पहिल्यांदाच प्रयत्न करतोय. सुरूवातीला मी या ब्लॉगपुरताच मर्यादीत होतो. नंतर मग मिसळपाव डॉट कॉम, मायबोली, मीमराठी या मराठी संकेतस्थळांचे सदस्यत्व घेतले आणि तिथे नियमीत लिहू लागलो; त्यामुळं ब्लॉगकडे येणं फक्त पोस्ट टाकण्यापुरतंच होऊ लागलं. अधेमध्ये पोस्ट आवडून गेल्याचे अनेक वाचकांचे मेल्सही आले; पण ते तेवढ्यापुरतंच. ब्लॉगवर वाचकांशी संवाद असा झालाच नाही. त्या-त्या पोस्टवर एखाददुसरी प्रतिक्रिया आली तरी मी ब्लॉग नेहमी पाहात नसल्याने, प्रतिक्रिया येऊन बरेच दिवस उलटलेले असत आणि मला त्या प्रतिक्रियेला उत्तर द्यायला कंटाळा होत असे. कदाचित यामुळेही वाचकांनी फक्त ब्लॉग वाचून लगेच इथून कल्टी मारणे पसंत केले असावे ;-) हरकत नाही. योगेशसारखा एखादा पक्का वाचक मात्र, उत्तर येवो न येवो नेहमीच प्रतिक्रिया देत आला आहे. पण एक उगी किडा म्हणून मला आता वाटतंय की हा ब्लॉग तुम्ही किती लोक वाचत आहात? तुमचे ब्लॉग कोणते आहेत? तुम्ही काय लिहीतायत? तुम्ही कुठले आहेत? वगैरे कळालं तर बरं होईल ! पण हे कळायला आपला संवाद तर झाला पाहिजे ना? इव्हन हा ब्लॉग कुणी वाचत आहे की नाही याबद्दलही मला काही कल्पना नाही. ते पेजव्ह्युज आणि टेहळणीचा नकाशा आपला कामापुरता आहे.
असतील तर (!) या ब्लॉगच्या नियमीत वाचकांनीही त्या-त्या पोस्टवरच त्यांना काय वाटलं ते रोखठोकपणे सांगितलं तर फार बरं होईल.
तर आता प्लीज हा ब्लॉग आवडत असेल/नसेल तरीही "टिप्पणी पोस्ट करा" या बटणाचा आजच्या दिवस का होईना आणि तुम्हाला शक्य झाल्यास नेहमीच वापर करा आणि दिलखोल के जे हवं ते बोला. कसं म्हणता?    

१५ डिसेंबर, २०१०

कासाराचा गोईंदा

काल पुण्याहून अचानक गज्याचा फोन आला आणि मी दहा बारा वर्षे मागे गेलो. गज्या म्हणजे आमच्या गोविंदकाकाचा मुलगा. हा गोविंदाकाका आमचा पोरासोरांचा गोविंदकाका असला तरी अख्ख्या पंचक्रोशीत त्याला कासाराचा गोईंदा हे एकच नाव होतं. तो आमच्या लहानशा गावात राहून चप्पलबूट, कटलरी सामान, बांगड्या, कंदील, कुलूपं, खेळण्या, आरसे-फण्या-पॉण्ड्स पावडर, इस्नू (स्नो!) असल्या वस्तू विकायचा धंदा करायचा. हा धंदा करण्याची त्याची रीतही त्याच्यासारखीच जगावेगळी. तो हे सामान वाहून नेण्यासाठी घोडा वापरायचा! सतत फूर्रर्र ऽऽ फूर्रर्रऽऽ करणारा आणि बांधला असेल तिथे लीद टाकून त्या आवारात विचित्र वास पसरवणारा घोडा. त्याच्या कटलरी सामानापेक्षाही गोईंदाच्या घोड्याचं आम्हाला आकर्षण. कारण गोविंदकाकाच प्रत्येक घोडं गुणाचं होतं.
गावातल्या लोकांची सकाळची गडबड सुरू असताना गोईंदाची वेगळीच गडबड सुरू असायची. चप्पलबूट, कटलरी सामान, बांगड्या, कंदील, कुलूपं, खेळण्या, आरसे-फण्या-पॉण्ड्स पावडर, इस्नू या सगळ्या वस्तू पडशी नावाच्या दोन गाठोड्यांत भरून त्या दोन्ही पडशा घोड्याच्या पाठीवर दोन्ही बाजूने लादायचा गोईंदाचा कार्यक्रम सकाळीसकाळी ऐन रंगात आलेला असायचा. हे सामान त्या घोड्याच्या पाठीवर लादून गोईंदानं वर मांड ठोकली की ते घोडमं त्याचा गुण दाखवायला सुरूवात करी. ते पुढे न जाता रिव्हर्स गिअरमध्ये त्याला वाट्टेल तितकं मागे, मागे, मागेच जाऊ लागे - मागे पार कुपाट्या आल्या तरी ते घोडं रिव्हर्स गिअर थांबवत नसे. मग गोईंद आणि त्याचे सामान कुपाट्यात पडे! असं दोन-चारदा झाल्यानं गोविंदा ते घोडं नीट चालायला लागेपर्यंत कुणालाही त्या घोड्यामागं एक फोक घेऊन उभं राहायला सांगे. हे काम मी मोठ्या आवडीनं करायचो. घोड्यानं रिव्हर्स गिअर टाकायचा अवकाश की त्याच्या मागच्या पायावर मी फटाफट फोकारे ओढायला सुरूवात करी. मग मात्र ते घोडं पुढे पाऊल टाकी आणि बाजारस्ता आला, की लगेच पुन्हा एकदा घोडं रिव्हर्स गिअरमध्ये यायला लागे! तिथं मात्र घोड्याचे पाय झोडपायला कुणी भेटलं तर ठीक, नाहीतर घोडं सामान आणि गोविंदाला तिकडेच फेकून घरी पळून येई. गोविंदाला सकाळी सकाळी टमरेल घेऊन घराकडे परत येणार्‍या लोकांचे सल्ले ऐकावे लागत.
"अरं काय मर्दा गोईंद, असली ब्याद घेतानाच नीट बघून इकत घेऊ नै व्हय?"
"हाना, हाना - मी बसतो, पुलापस्तोरच हाना.. मग नाई येत ते मागं.."
मी तो संतराम किंवा असाच कुणीतरी धोंड्या त्या घोड्याचे मागचे पाय झोडपून काढी आणि गोविंदकाका एकदाचा मार्गस्थ होई!
गोईंदाही मुलखाचा चिकट होता. चांगले दहावीस हजार रूपये खर्चून अस्सल घोडा विकत आणायचा तर चार-पाच हजारात एखादा असलाच गुणी घोडा तो शोधून आणी. बुलेट गाडी घेण्याइतका पैसा पदरी बाळगत असूनही तो साधी सायकलसुध्दा वापरायचा नाही. पांढरा लेंगा, तसाच पांढरा शर्ट आणि एका डोळ्याभोवतीची कातडी काळी झालेला त्याचा डोळा. आवाज गेंगाणा- चिरका.
घोड्याचा ताप फार वाढला की तो घोडं बदलीत असे. मग नव्या घोड्याचे नवे गुण! असाच माऊली नावाचा एक घोडा त्यानं कुठूनतरी शोधून आणला. या घोड्याची खोड वेगळी होती. या घोड्यासमोर कुणीही अचानक जाऊन उभा राहिला की हे घोडं त्याचे पुढचे दोन पाय समोरच्या माणसाच्या खांद्यावर टाकी. बाजारात गोविंदाच्या दुकानाशेजारी दुकान लावणार्‍या बोकडासारख्या दाढीच्या मणेर्‍याचीही त्या घोड्यानं एकदा अशीच गळाभेट घेतली होती.
"मेरे कू कुछ नही करिंगा वो घोडा, गोईंदऽऽऽ मैने भोत खच्चरोंको ठीक किया है"
असा नाद लावून त्यानं हट्टानं गोविंदाकडून घोड्याचा लगाम मागून घेतला, आणि थोड्यावेळानं गपगार गंगाकडे जाऊन स्वत:चे भरलेले कपडे धूवून आला!
मी गोविंदकाकाच्या खनपटीलाच बसत असे. त्या घोड्याला खरारा कर, त्याला वैरण टाक, दुपारच्या वेळेस जाऊन चोंबाळ असं करून मी त्या घोड्याची मैत्री संपादन केली. काही दिवसांनी गोविंदासमोर माझी आणि घोड्याची मैत्री सिध्द करून दाखवून त्याचा लगामही हस्तगत केला. मला पण त्या घोड्यानं चार-सहा वेळा पाडलं - पण मी गोविंदकाकाला त्याचा पत्ता लागू देत नसे. तो सकाळीसकाळी नवं सामान भरायला तालुक्याला जाताना पाच वाजता बसस्टॅण्डवर घोडा घेऊन यायचा निरोप तो त्याच्या बायकोकडे म्हणजे रमाकाकूकडे ठेवून जाई. तासभर आधीच घोडा घेऊन मी लंपास होई आणि त्या घोड्याच्या तोंडातून फेस येईपर्यंत त्याला गंगेच्या वाळूतून पिदडून काढी. जोपर्यंत व्यापार केला तोपर्यंत गोविंदकाकानं घोडं सोडलं नाही. गोविंदकाका गावातला एक विक्षिप्त माणूस होता. कधीच कुणाला आपण होऊन बोलत नसे. त्याला मित्रही नव्हतेच. आपण भलं, आपला बाजार भला आणि आपलं घोडं भलं असं मानणारा गोईंदा कासार. दररोज देवदर्शन, विठ्ठलमंदीरातला हरिपाठ मात्र चुकवत नसे.
तो बाजार करून येताना रानातून घोड्यासाठी गवत आणत असे. कुणीतरी रस्त्यात विचारी -
"काय गोविंदराव.. कुनीकडून आणलं गवत?"
"लांबून" गोविंदा एकाच शब्दात उत्तर देऊन घोडा पुढे रेटीत असे.
कधीतरी कुणीतरी विचारी -
"किती वाजले गोईंदा?"
"बख्खळ" !!
त्याच्या गावोगावच्या बाजारातल्या गिर्‍हाईकांना मात्र तो पोपटासारखा बोलायचा. बाजार ऐन भरात आलेला असे. गावच्या भोयांनी झणझणीत लसण घातलेला चिवडा, जिलेबी, मासे यांचा बाजारात घमघमाट सुटलेला असे आणि आम्ही पोरं चिंचेच्या पारावरून बाजाराची शोभा पाहात असू. खालीच गोविंदाचा पाल ठोकलेला असायचा -
"केवढ्याला देता बुटाड गोईंद महाराज, पटकन बोला" जेरीला आलेलं गिर्‍हाईक म्हणायचं.
"लास्ट सत्तर रूपै.. नाई.. नाई.. माल बघा ना तुम्ही...पिवर नायलॉनय.." अत्यंत भोळाभाबडा चेहेरा करून, दुसरीकडेच बघत गोईंदकासार उत्तर देई.
"अरे हॅट!! पिवर नायलॉन म्हनं! सा म्हैन्यात चुरा व्हतो ह्याचा.. ह्याचे सत्तर रूपै ??" गिर्‍हाईक चवताळत असे.
"मग किती देता?.. गिर्‍हाईक
"चाळीस रूपये देतो बघ ह्याचे..पटत असंल तर बघ.. नाहीतर पाथरीहून आणतो चांगला बूट उद्या..."
"चाळीसला हे घ्या ना मग.. पस्तीसला घ्या.. पाच कमी करतो पाटील तुमच्यासाठी" दुसरा एक बेक्कार बूट समोर ठेऊन गोविंदा म्हणे!
गिर्‍हाईक पुन्हा एकदा तो नवा बूट खालीवर करून बघे.. दोन्ही बूट समोर ठेऊन पाही आणि सत्तर रूपै वाल्या बुटाचेच पन्नास रूपये द्यायला तयार होई.
"पन्नासमध्ये मला पन आला नाही माल पाटील.. सत्तर लास्ट.. तुम्ही माल बघा की.."
"आता लई झालं तुव्हं.. पंचावन रूपै देतो बघ" असं म्हणून पाटील एकदम उठून धोतर झटकीत असे.
"साठ रूपये देऊन टाका जाऊद्या..." गोविंदा बूट कागदात बांधत म्हणे.
"आता पंचावन घी.. पुढच्या बाजारी पाच रूपै देईन..ओऽ?" गिर्‍हाईक पैसे समोर करी
गोविंदा पट्कन पैसे घेऊन त्याच्या लोखंडी गल्ल्यात टाकून देत असे. वर्षानुवर्ष तीच गिर्‍हाईकं, तीच गावं आणि बाजारातली त्याची तीच ठरलेली जागा आणि दुकानाच्या त्याच निळ्या तंबूखाली गोविंदकासाराचा व्यापार चालत होता. त्यावरच त्यानं एका मुलीचं लग्न केलं - गल्लीच्या हमरस्त्यावर एक नवं पत्र्याचं शेड बांधलं आणि रमाकाकूला वेगळं बांगड्यांचं दुकान काढून दिलं. स्वत:चा घोडा आणि गावोगावचे बाजार मात्र सोडले नाहीत.
मध्ये एका उन्हाळ्यात त्याच्या शेडसमोरच वाडा असणार्‍या मधूआण्णासोबत रमाकाकूच्या काहीतरी कुरबुरी झाल्या. आणि एका रात्री त्यांच्या त्या पत्र्याच्या शेडनंच आतून पेट घेतला. गोविंदकासाराचे सत्तरऐंशी हजार रूपये त्या रात्रीच्या तीन ते साडेसहा वाजेदरम्यान राख झाले !
सरपन्या केशवला दारू पाजवून, पाचशे रूपये देऊन मधूअण्णानंच दुकान पेटवून द्यायला लावलं अशी चार-सहा महिन्यानं अफवा उठली होती.
त्या झटक्यानं त्या कुटूंबानं गावंच सोडलं. रमाकाकू गोविंदकाकाला घेऊन तिच्या माहेरी राहायला गेली. तिथं नवं दुकान टाकलं.
तर त्या गोविंदकाकाचा मुलगा गजा काल फोनवर सांगत होता -
"मी पुण्यात एमबीए करतोय.. हॉस्टेलवर असतो... पप्पा न आई आजोळीच असतात.. पप्पाला दिसत नाही व्यवस्थित आजकाल.."
मी गज्याला काहीच बोललो नाही. फक्त इकडच्यातिकडच्या, पुण्याच्या गप्पा केल्या.

७ डिसेंबर, २०१०

कोअर (आणि त्यामुळे निघालेला पसारा)

२००३ साली येऊन गेलेला हॉलीवूडचा दि कोअर हा सी-फि सिनेमा नुकताच नजरेवेगळा केला. या कोअरमधूनच बराच पसारा निघाला, तोच आता इथं मांडणार आहे. कोणताही सी-फि म्हटले की त्यात डायरेक्ट पृथ्वीचाच नाश होताना पाहाणे आणि मध्येच कुणीतरी (विशेषत: व्हाईट हाऊस किंवा पेंटागॉनच्या जाली सेटवर बसलेल्या लुंग्यासुंग्यांनी, किंवा कुठल्यातरी वाळवंटात, कबाडखान्यात किंवा जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात संशोधन करणार्‍या झक्की लोकांनी) तो थांबवणे अटळ असते. या सिनेमातही हेच होते; एकापेक्षा एक छप्परफाड (खरं म्हणजे पृथ्वीफाड, आकाशफाड किंवा ग्रहगोल-तारे-आकाशगंगा-विश्व-फाड असं म्हणायला हवं) कल्पना यात अगदी ठासून भरलेल्या आहेत. तर बाकी चर्चा करण्याआधी या सिनेमाची स्टोरीलाईन खेचून घेऊ.


थोडक्यात कथा अशी की पृथ्वीचा आतला गाभा आणि त्याच्यावर असलेला तप्तरस, लाव्हारस किंवा ते जे काय असेल ते अचानक फिरणे बंद होते. का? अर्थातच अमेरिका नावाच्या महाभयानक डोकेबाजी करणार्‍या देशाने कामाला लावलेल्या संशोधकामुळे. सिनेमात हे थोडसं पुसटपणेच सूचीत केलंय; पण केलंय. झिमिन्स्की नावाचा भूगर्भ शास्त्रज्ञ पृथ्वीला झटके देऊन पृथ्वीवर भूकंप उत्पन्न करण्याचं मोठ्ठं यंत्र उभारतो. हे प्रलयंकारी यंत्र उभं करण्यामागची कल्पना अर्थातच अमेरिकेच्या शत्रुंपेक्षाही (म्हणजे अमेरिकेचे शत्रु तिकडून भूकंपाचा झटका देणार, अमेरिकाही त्यांच्यापेक्षा जास्त मोठा झटका इकडून देणार, आणि पृथ्वी व पृथ्वीवरचे लोक मात्र मधल्यामध्ये फुकट मरणार! पण हे सिनेमात दाखवलेलं नाही) वरचढ शस्त्र तयार करणे ही असते. "इफ वी वील नॉट डू इट, दे वील डू इट" या जगप्रसिध्द सूत्राचे पाठबळ त्याला असायला हवेच, ते तसे असते. तर हा चित्रपट उत्पन्न होण्याचे चित्रपटातील पुसट पण आपल्याला दिसणारे सुस्पष्ट कारण म्हणजे झिमिन्स्कीने दिलेल्या झटक्यामुळे पृथ्वीच्या गाभ्यावर काही मैल पसरलेल्या गाभ्यावरचा तो तप्तरस, लाव्हारस किंवा ते जे काही असेल ते आपण कॉफी ढवळतो तसे फिरणे अचानक थांबते.
त्यामुळे सूर्यापासून किंवा अवकाशातून येणारे अतिनील चुंबकीय किरण हळूहळू पृथ्वीचा बोर्‍या वाजवायला सुरू करतात. अर्थातच चित्रपट हॉलीवूडचा असल्याने सर्वात आधी बोर्‍या वाजतो तो अमेरिकेतल्या लोकांचा. म्हणजे आकाशातून येणार्‍या त्या विद्युत चुंबकीय तरंगांमुळे सर्वात आधी पेसमेकर बसवलेले तीस-बत्तीस लोक भर चौकात एकामागून एक अचानक पटापट माना टाकतात. मग लंडनच्या ट्रॅफल्गार चौकातील कबुतरं किंवा स्थलांतरप्रिय पक्षी वाटेल तसे उडायला लागतात आणि दणादण दुकानांच्या, मोटारींच्या काचांवर, लोकांच्या तोंडावर जाऊन आदळू लागतात. या पक्षांच्या मेंदूत त्यांना लांबचा पल्ला गाठताना मार्गदर्शन करणारे कसलेतरी इलेक्ट्रॉनिक आयन्स असतात त्यामुळे असे होते म्हणे. इथे येतात अ‍ॅरॉन एकहार्ट आणि चेकी कार्यो! अ‍ॅरॉन हा शिकागो विद्यापीठात भूगर्भ रचनेचा हुशार प्रोफेसर असतो. चेकी अणु शास्त्रज्ञ. मग त्याला पकडून जनरल समोर हजर करणं आलंच. त्याला सीआयएवाले भर वर्गातून धरून आणतात आणि सेक्युरिटी जनरल लोक पटापट का उडाले ते अ‍ॅरॉनकडून समजून घेतो. हा दहशतवादी हल्ला नाही हे स्पष्ट झाल्याने सेक्युरिटी जनरल निर्धास्त होतो आणि अ‍ॅरॉनने पाजळलेले शिल्लक ज्ञान ऐकून घेऊनही त्याला कल्टी मारतो.


  तिकडे रोमवर आलेल्या चुंबकीय ढगांमुळे अर्ध्यापेक्षाही जास्त रोम शहराचा बुकणा वाजतो - अचानक विजा कोसळू लागतात, इमारती ढासळू लागतात, विद्युतसुवाहक धातुला स्पर्श करणार्‍या लोकांना वीजेचे झटके बसू लागतात आणि पृथ्वीवर हाहाकार माजायला सुरूवात होते. उंच वर अवकाशात अमेरिकेचे एंडेव्हर हे अवकाशयान उडत असते त्याची खाली पृथ्वीवर उतरण्याची वेळ झालेली असते. पण पृथ्वीवर मध्येच ही भानगड उपटल्यामुळे ते उतरायला जाते एकीकडे आणि उतरते भलतीकडेच. हॉलीवूडची शपथ, ते अवकाशयान, हो, हो अवकाशयान लॉस एंजेलीस जवळच्या नदीत सुखरूप उतरवले जाते! ते उतरवणारा/री पायलट/कमांडर कुणीतरी असायलाच हवं - तर एक असतो आल्फ्रे वूडार्ड आणि दुसरी असते हिलरी स्वॅंक. रस्ता भटकलेल्या, लॉस एंजेलीस शहराच्या रस्त्यांवर आदळू शकणार्‍या अवकाशयानाला नदीत घुसवण्याची आयडीया शेवटच्या सेकंदाला हिलरीनेच यानाच्या कमांडरला सुचवलेली असते. ती यशस्वी झाल्याने कमांडरने तिच्यावर खार खायला हवा, तसा आल्फ्रे वूडार्ड खातो. नदीतल्या पुलाच्या खांबाना घासून अवकाशयानाचे पंख तुटतात. अमेरिकेसारख्या चौकशीप्रेमी देशात या प्राणहानी न झालेल्या अपघाताची चौकशी व्हायला हवीच, तशी ती होते. अमेरिकेचा सेक्युरीटी जनरल किंवा सरसेनापती तिला झालेल्या घटनेबद्दल चार शब्द ऐकवतो.  भोवतीची यंत्रणा बिघडलीय हे तोपर्यंत स्पष्ट झालेले नसते. ते जेव्हा लक्षात येते तेव्हा बाकायदा हिलरीला आणखी एक चांगले काम सोपवले जाते.      
तोपर्यंत भूगर्भाचा प्रोफेसर असलेल्या अ‍ॅरॉन एकहार्टने काहीतरी डोके लावलेले असते आणि सुरू झालेली सगळी भानगड समजून घेऊन झिमिंस्की नावाच्या सेलिब्रीटी शास्त्रज्ञासमोर मांडलेली असतो. हा झिमिंस्की सेलिब्रीटी शास्त्रज्ञ असला तरी बर्‍याच भानगडी करून, लोकांची संशोधनं चोरून ती स्वत:च्या नावावर खपवून वर चढलेला असतो. कारण डेलरॉय लिंडो (हा वाळवंटात संशोधन करणारा झक्की शास्त्रज्ञ आहे) झिमिंस्कीला पाहिल्यापाहिल्याच म्हणतो - "तु अजून मेला नाहीस? तु माझं संशोधन चोरून स्वत:च्या नावावर खपवल्याला आता वीस वर्षे झालीत, वीस वर्षांनंतर मी तुझं तोंड पहिल्यांदाच पाहातोय." तर झिमिंस्की सगळी भानगड अमेरिकेचा सेक्युरिटी जनरल आणि टेबलाभोवती बसणार्‍या लोकांसमोर मांडतो आणि पुन्हा एकदा अ‍ॅरॉन एकहार्टला उचलून सेक्युरिटी काऊंसिलसमोर उभे केले जाते. हुशार आहेस ना, सांग मग काय होतंय ते! तो रूमफ्रेशनर मागवतो व एक फळ मधोमध कापून सगळी कथा तिथल्या लोकांसमोर मांडतो. मग आता पुढे काय होणार ते लोक त्याला विचारतात. रूम फ्रेशनरचा फवारा त्या फळावर सोडून तो त्या फळाला आग लावतो. सूर्याकडून येणार्‍या अशाच आगीच्या फवार्‍यात पृथ्वी जळून खाक होणार हे अ‍ॅरॉन जाहीर करतो. मग ही दुर्घटना थांबवणं आलंच. त्यासाठी पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील फक्त नऊ मैलांपर्यंतचीच माहिती उपलब्ध आहे आणि तिथंही एक लहानसा शाफ्ट्च जाऊ शकलाय हेही जाहीर होतं. फक्त वर्षभराच्या आत पृथ्वी जळून राख होईल हे अ‍ॅरॉन स्पष्ट करतो; झिमिंस्की त्याला मध्येमध्ये तोंड मारून स्वत:च त्या विषयावरील प्रभुत्व सिध्द करीत दुजोरा देत राहातो. या एका वर्षाच्या काळात नैसर्गिक प्रकोप वाढत्या प्रमाणात सहन करावा लागेल आणि त्यातच जगाचा अंत आहे हे मनावर बिंबतं.


मग येतो डेलरॉय लिंडो. या पठ्ठ्यानं लेजर किरण वापरून पहाडाला भोक पाडणारे एक यंत्र आणि लेजर किरणांच्या मार्‍यात उंदीर (कोणताही जीव) आत जीवंत राहिल असा धातू शोधलेला असतो. हा खरा हाडाचा शास्त्रज्ञ असतो. स्वत:च्या चष्याच्या काड्यांना सूत गुंडाळून हा वीस वर्षांपासून ते पहाडाला भोक पाडणारं यंत्र उभं करण्यात गुंतलेला असतो. शेवटी सेक्युरिटी जनरल आणि उपरोल्लेखीत सर्व गॅंग या डेलरॉय लिंडोच्या वाळवंटात असलेल्या बेसवर जाऊन धडकते. हॉलीवूडचा चित्रपट म्हटल्यावर हेलिकॉफ्टर्स, चकचकीत कार्स वगैरे लवाजामा आलाच. तोही दिसून जातो. डेलरॉय त्या यंत्राचं आणि धातूचं प्रात्यक्षिक करून दाखवतो. त्यानं बांधलेलं यानसुध्दा दाखवतो. त्याला जनरलकडून उपकरण पूर्ण कधी होईल त्याबद्दल विचारणा होते. डेलरॉय दहा ते बारा वर्षे लागतील हे सांगतो. मग पुन्हा जनरल डेलरॉयला तीन महिन्यात यान उभ करायला सांगतो; पन्नास अब्ज डॉलर्स खर्च द्यायला तयार होतो.
हे यान बांधण्यामागची कल्पना अशी की - रेल्वेच्या डब्याप्रमाणे एकमेकांपासून वेगळ्या होणार्‍या सात कंपार्टमेंटस तो नवीन धातू वापरून बांधायच्या. यानाच्या तोंडावर लेसर किरणांचा मारा करणारे व्हील बसवायचे. यान पृथ्वीला भोक पाडीत तिच्या गाभ्यापर्यंत जाणार. तिथे गेल्यावर यानात सोबत घेऊन   गेलेल्या अणुबॉम्बचे स्फोट करायचे आणि गोलाकार असलेल्या त्या लाव्ह्याला गती देऊन आतलं वर्तुळ पुन्हा एकदा सुरू करायचं!
अ‍ॅरॉन एकहार्ट, चेकी कार्यो, ब्रुस ग्रीनवूड, हिलरी स्वॅंक, झिमिन्स्की, डेलरॉय लिंडो आणि हो, डीजे क्वाल्स हा आत्ताच चरख्यातून पिळून काढल्यासारखा दिसणारा हॅकर या सर्वांची टीम तयार करण्यात येते. डीजे क्वाल्सने चौसष्ट वेळा हॅकींग करून फ्रॉड केलेले असते. तोही त्याच्या क्षेत्रातला महागुरूच! पण काम करायला लवकर तयार होत नाही. बोलणी चालू असताना तो एका मिनीटातच अ‍ॅरॉनच्या मोबाईलवर लाईफटाईम एसटीडी कॉल्स फ्री करून देतो. त्याच्याकडे संपूर्ण जगातले इंटरनेट्च हॅक करण्याचे काम दिले जाते. म्हणजे या प्रकल्पाबाबत एक शब्द देखील इंटरनेट्वर दिसू द्यायचा नाही.
अ‍ॅरॉनला या यानाचा चीफ करण्यात येते. कारण झिमिन्स्कीच्या वर उल्लेख आलेल्या डेस्टीनी नावाच्या उद्योगामुळे झिमिन्स्कीची अक्कल जनरलला कळालेली असते. जगभरातील शास्त्रज्ञ समुदायासमोर प्रवक्ता म्हणून बोलू देऊन भाव खाऊ देण्यासाठीही झिमिन्स्की जनरलकडे तड्फड करतो; पण त्याची डाळ शिजत नाही. एकूण प्रकल्प सुरू होतो; सिम्युलेशनद्वारे यानाच्या चालकांना हे जमिनीत घुसत जाणारे यान चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
अ‍ॅरॉन या यानाचा भूगर्भातील वाटाड्या होतो, हिलरी आणि ब्रुस हे चालक होतात, झिमिन्स्की काहीच न करता चुकीचा सल्ला छातीठोकपणे द्यायचे काम स्वीकारतो, चेकी कार्योकडे अणुबॉम्बच्या स्फोटाचे काम असते, डेलरॉय लिंडोचे तर पूर्ण यानच असते. समुद्रात यान खाली तोंड करून उभे केले जाते आणि काऊंट्डाऊन पूर्ण होताच समुद्रतळाकडे मुसंडी मारून आत घुसत जाते. यानाशी संपर्क, नियंत्रण वगैरे सांभाळण्यासाठी नेहमीचेच निनावी यशस्वी कलाकार कुठल्यातरी नियंत्रण कक्षात बसतात.
अ‍ॅरॉन आणि हिलरी हेच सिनेमाचे हिरो-हिरॉईन असल्याने फक्त तेच दोघे शेवटी जीवंत परत येतात. यानातील बाकी सब लोग दुनिया बचाने के लिये कुर्बान हो जाते है. यान गाभ्यापर्यंत कसे जाते, गाभ्यावरचा लाव्हा अत्यंत तरल असल्याने स्फोट करणे रद्द होऊन त्यांना परत फिरण्याची ऑर्डर येणे, शिल्लक राहिलेल्यांमधील बेबनाव, मध्येच काय-काय अडचणी येतात वगैरे दृश्ये मनोरंजन करून जातात.

आता हॉलीवूडचा कोणताही सिनेमा पाहिल्यानंतर मला पडणारे सनातन प्रश्न:-

हॉलीवूडमध्ये निग्रो जर सूटाबुटात असेल तर त्याचा सूट नेहमी वाकडातिकडा, ढगाळा-गबाळा का असतो? (नमुना: २०१२ डूम्स डे मधील अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष)

हिरो हिरोईन हुशार असूनही एकमेकांना सोडून का जातात? रहा की राव मस्त, लग्न करा - मजा करा... पण नाही.

जवळपास सगळ्या हॉलीवूडपटांचा रोख जगाचा नाश करण्याकडेच का असतो?

हॉलीवूड सिनेमातील प्रत्येकजण सतत बर्गर, पिझ्झा असे काहीतरी खात किंवा दारू, वाईन पीत का असतो?

हॉलीवूड सिनेमातील निग्रो पोरांच्या आया त्यांच्यावर सतत का ओरडत असतात?

हॉलीवूडच्या सिनेमात प्रत्येकजण आपल्या कामात एवढा चोख दाखवला नाही तर अमेरिकेची जगातील प्रतिमा खराब होईल काय?

हॉलीवूडच्या सिनेमातील प्रत्येकाच्या आवडीचे एक विशिष्ट हॉटेल, विशिष्ट बेट, विशिष्ट ड्रिंक, एक विशिष्ट स्वप्न का असते?

स्वत: पन्नासदा घटस्फोट घेत असले तरी हॉलीवूड सिनेमातील नायक-नायिका पोराबाळांच्या पालन पोषणाबद्दल एवढे जागरूक का असतात?

आणि हॉलीवूड सिनेमातील प्रत्येक बाप "मुझे पता है, मै अच्छा बाप नहीं बन सका" असे का म्हणतो?

तुम ये कर सकते हो..
नय...चार्ली..छोडो भी
असली आणि असलीच कितीतरी निरर्थक वाक्ये हिंदी आवाजात कोण डब करतात?

२३ नोव्हेंबर, २०१०

गुंजग्रामीचे दिवस

महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतील बामणांच्या पोरांचे बालपण जसे जात तसेच माझेही गेले. पण कदाचित इतर पोरांना जी मौज पाहायला भेटली नसेल ती आम्हाला दर गुरूवारी पाहायला मिळायची. आमच्या गावाच्या डगरीखालून वाहणार्‍या गंगेच्या (खरं म्हणजे ही गोदावरी, पण तिला सगळे गंगाच म्हणतात) तीरावरच गुंज क्षेत्र नावाचे दत्तसंस्थान असलेले एक गाव होते. अजूनही आहे. पण आता तिथं ती मौज मात्र राहिली नाही. आमच्या घराण्यात पन्नास पाऊणशे वर्षांपूर्वी दत्तोपासना सुरू झालेली आणि सकाळी-सकाळी प्रत्येकाचा पाठ, घंटा, पंचपदी वगैरेंची नुसती गडबड. चांगला चौसोपी किल्ल्यासारखा वाडा. वर माडी. माडीवर मोठ्या दाराशेजारून निघणार्‍या पायर्‍या. दोन्हीकडच्या पायर्‍यांवर बसलेली एक-एक महाभयानक गावठी कुत्री. घरात या ना त्या कारणाने होणारी गड्यांची वर्दळ - त्यात मग चांदपाशा मामू, आमजा, गफूरभाई, सरदार, निजाम, प्रकाशकाका, सावकारमामा, गुलाब भाऊ, भांडेवाली शरीफा किंवा ल्याखत - तिच्या जोहरा आणि सायरा या मुली, जावेद, वाहेद ही मुलं! एवढे सगळे लोक घरात, रानात लागायचेच कारण दीड-दोनशे एक्कर रान - त्यातली औतं आणि बारदाना - गावाच्या एका कडेला असलेला आमचा भलामोठा गायवाडा, त्यात अधेमधे खोदलेली पेवं, एका कोपर्‍यात ओळीने लावलेल्या कडब्याच्या वळह्या, गायबैल, वासरं, आंडील गोरे - लिहायला बसलो तर एक फर्मास कादंबरी सहज हातावेगळी होईल. पण तो धंदा वय वाढल्यावर करू.
आता फक्त गुंजाच्या दिवसांबद्दल. तर पाठ म्हणजे पंचपदीत जी ठराविक कवनं केलेली असतात ती दररोज एकवीस वेळा स्नान झाल्याझाल्या म्हणायची, पंचपदी करायची. मग रात्री निवांत जेवणं वगैरे झाल्यावर घंटा ! म्हणजे पुढचा तासभर सगळ्यांचा नुसता हातवार्‍यांवर कारभार! ज्याचा घंटा चालु आहे त्याचे बोलणे नाहीच. म्हणजे तासभर नुसता दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असा मनातल्या मनात जप करायचा. हे मी स्वत: करीत नव्हतो आणि ते वयही नव्हते कारण ही कामं ज्यानं गुरूमंत्र घेतला आहे त्यालाच फक्त मस्ट! इतरांना त्यातून सूट. काही आगाऊ काट्टी जमेस धरून, घरातील सगळ्यांनीच गुरूमंत्र घेतलेला. आठवडाभर हा सकाळ-संध्याकाळचा नेटवर्क कार्यक्रम आणि गुरूवारी गुंजाच्या मंदिरातील पंचपदीला उपस्थिती मस्ट म्हणजे मस्टच! घरातील किमान एकाचीतरी. बरेच जण जायचे.
बुधवारी रात्रीच चांदपाशा मामू आणि कंपनी गुरूवारचं टिपण घेत असताना - म्हणजे गुरूवारी शेतात करायच्या कामाची प्लॅनिंग काका किंवा तात्याकडून ऐकून घेत असताना सर्वात शेवटी त्याला प्रश्न जायचा -
"उद्या गुरूवार आहे बरं! कोण येतंय उद्या मग गाडीवर?"
"जाता क्या? " पायरीखाली रूमालाची घडी करून टेकून बसलेल्या सरदारकडं बघून चांदपाशा त्याला विचारायचा.
"त्रॉक्क.. वो बईल मेरे अकेलेकू नई संभलते !!" सरदार आलेल्या आफतीतून अंग काढून घ्यायचा.
हा चांदपाशा म्हणजे आमचा मुनीम. गडी, त्यांचे काम, बैल-बारदाना, औतं, रोजानं लावलेल्या बाया, शेतातली लहानसहान देणीघेणी, चंदी, घरचा किराणा भरणे वगरे कामांची पॉवर ऑफ अ‍ॅटॉर्नी याच्याकडं. सरदार हे चांदपाशाचेच सर्वात लहान शेंडेफळ. सरदारनं नुकतंच साल धरलेलं. चांदपाशा त्याला हलकी कामं द्यायचा. म्हणजे गुरूवारी नुसतंच गाडी जुपून मालक-पोराटोरांसोबत गुंजाला जायचं, तिथं गेलं की गाडी सोडायची, जेवून घ्यायचं आणि कुठंतरी सावलीला पडायचं. आम्ही मंदिरात. हा इकडं. शुक्रवारी सकाळी गाडी जुपून पुन्हा परत. पण बैल मारके असल्यानं सरदारला ते सोपं कामही नको वाटायचं. मग चांदपाशा गफूरभाईला थेट हुकूम सोडायचा -
"गफूर, सुबू कू बाडे पे गाडी लाव जल्दी से - इसकू टंगालता मै बारबिगी में "
सरदारकडं रागारागानं बघत चांदपाशा त्याला बारबिगी नावाच्या शेतात ताबडून घेण्याची धमकी द्यायचा आणि काका किंवा तात्याकडं हळूच बघुन घ्यायचा. सरदारला आमच्यासोबत पाठवण्याचा चांदपाशाचा आणखी एक छुपा हेतू म्हणजे - पोरगं जाता येताना मालकासोबत राहिल - बैलगाडी हाकताना चार जवळीकीच्या गोष्टी होतील. पुढं त्यालाच मुनीमकी करणं आहे. पण सरदारच्या टकुर्‍यात या गोष्टी शिरायच्या नाहीत. तो आपलं बैलांना भ्यायचा - आणि त्याच्या मालकांनाही. कारण हे बारबापे बैल (मी गायवाड्यात ऐकलेली ही त्याचीच शिवी) मध्येच शिवळावर पडायचे - एक बैल एका बाजूला ओढायचा दुसरा दुसर्‍या बाजूला! मध्येच गंगा ओलांडताना एखादा बैल जी पाण्यात फतकल मारून बसायचा की बास - दहा कोरडे ओढले तरी भरल्या गंगेतून जागचा उठायचा नाही. गंगेचं पाणी गाडीत शिरायचं आणि काका सरदारला शिव्या घालू लागायचे. अशावेळी गफर्‍याच (भाऊंनी नाहीतर तात्यांनी गफूरला बहाल केलेलं हे खास संबोधन) पाहिजे.
तर दुसर्‍या दिवशी गफूर गाडी-बैल घेऊन वाड्यासमोर हजर व्हायचा. नुसत्या रिकाम्या बैलगाडीत खाली कडब्याच्या पेंड्या टाकलेल्या असायच्या. मग त्यावर गादी. गाडीला छत वगैरे फक्त घरातलं महिलामंडळ सोबत येणार असेल तरच - एरव्ही नाही. गफूरने मस्त गाडीची चाके जिथे जोडलेली असतात तिथल्या आखाला लांब तारेने वंगण चोपडून घेतलेले असायचे. तो काळ्याकुट्ट वंगणाचा मोठ्या पोकळ वेळू (बांबू) पासून बनवलेला नळा गाडीच्या साट्यालाच हमेशा अडकवून ठेवलेला असे. बाबुकाका, मी, राजूकाका, योगूकाका, झालंच तर गाडीत येण्यासाठी रडारड करून आमची नमी गाडीत चढायचे. मी आणि नमी आधी गफूरच्या शेजारची जागा धरायचो. कारण तिथून समोर बसून पाय खाली सोडता यायचे आणि गफूरकडून बैलगाडीचा कासराही हातात घ्यायला मिळायचा. बाकीचे सगळे बाजारस्त्यातल्या मारूतीच्या देवळापासून बसायचे.
भोईवाड्याकडून खंडोबाकडे अशी अर्धी नगरप्रदक्षिणा घालत आमची गाडी सरईच्या ओढ्यात एकदाची शिरायची - गुंजाला निघाल्याचा खरा फील सरईच्या ओढ्यातून सुरू व्हायचा. कुठेतरी लुप्त की गुप्त झालेली शरयू नदी आमच्या गावच्या उशाशी उगम पावली असे समजले जात असे  - तिचे गावठी नाव सरई! ती पुढे गोदावरीला जाऊन मिळते. तिच्या त्या भल्यामोठ्या ओढ्यातल्या चिखलातून चाकं फसवीत, कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला कंबरेपर्यंत कलत गाडीबैल आणि आमची जत्रा पुढे सरकायची. ओढ्याच्या दोन्ही बाजूंना उंचच उंच बाभळी. त्यांना लटकलेली आग्या मोहोळं. चित्रविचित्र पक्ष्यांचे आवाज. मध्येच समोरून येणार्‍या दुसर्‍या बैलगाड्यांना आमची गाडी कुठंतरी काट्याकुपाट्यात घालून साईड देणे वगैरे प्रकारात गफूर निष्णात. होता होता इद्दुस्वामीचा मळा यायचा. इथं पाण्याचा एक मोठ्ठा पाईप आणि एक हौद रस्त्याच्या कडेला बांधलेला असे. इथं बैलगाडी थोडा दम खात असे. बैलांना पाणी दाखवले जाई. आम्ही सगळे खाली उतरून पाय मोकळे करीत. तेवढ्यात नमी नाहीतर मी ओरडे -
"ओ काका, आपले काळ्या-लाल्यापण आलेच आपल्यासोबत!"
काळ्या लाल्या या आमच्या कुत्र्यांना कुणीही न बोलावता ते गाडीमागं गुंजापर्यंत येत - दुसर्‍या दिवशी पुन्हा बैलगाडीसोबत परत.
"दत्तदर्शनला जायाचं जायाचं जायाचं‌ऽऽऽ आनंद पोटात माझ्या माईनाऽऽ माईना" त्या कुत्र्यांकडं बघत योगू काका गाणं म्हणे.
बाबूकाका योगूकाकाला छेडत-
"योगानंद महाराज - कुठं ऐकलंत हे गाणं?"
"अहो ती नाही का मी कॅसेट आणलीय नवीन - तिच्यात आहे" योगूकाका.
"आंऽऽ योगूमालक हे गानं इतक्यांदा म्हन्तात की मलाबी पाट झालंय आता" गफूरही मध्येच त्यांच्या बोलण्यात सहभागी होई.
गफूर पुन्हा मग गाडी जुपून त्याच्या भाषेत बैलांशी संवाद साधू लागे -
"व्वा रे बईल!!" असं म्हणून शेपटी पिरगाळी.
मग पुन्हा एकदा सुरूमगावच्या ओढ्यात गाडी शिरे. तिथे थोडे गचके-आदळे खाऊन, त्या गावच्या मारूतीला वेढा घालून आमची बैलगाडी एकदाची गंगेत शिरे. गंगा ओलांडली की आलंच गुंज! तापलेल्या वाळूत बैलगाडीची चाकं शिरली की सर्रर्रर्रर्र आवाज होई आणि वाळू उडे. तेवढ्यात गंगेच्या वरच्या बाजूला दिसणार्‍या निशाणाच्या दिशेनं सगळ्यांचे हात जोडले जात. तिथे गुरूमहाराजांच्या समाधीचे मंदीर उन्हात चमकताना दिसे. बाबुकाका, राजूकाका गाडीच्या खाली उतरत. आणि गंगेच्या पाण्यात गाडी शिरली, की एक बैल त्याच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणं पाण्यात फतकल मारून बसे! गफूर सरळ पाण्यात उतरून बैलाची शेपूट हातात घेऊन तिला कडकडून चावा घेई - तोपर्यंत कासरा योगूमालकांनी धरलेला असे. शेपूट चावले की दण्णकन बैल उठून चालायला लागे.

मग पुन्हा गाडी सोडा. वडीलधारे लोक कृष्णा आत्याकडं जात. ही बाबुकाकांची बहिण. आमची आज्जीच. हे तिचंही गाव होतंच. गफूर शिवळा-जोती, कासरा आत्याच्या घरी ठेऊन बाहेर फिरायला निघून जाई. नमी, मी थेट मंदिरासमोरच्या वड-लिंबाच्या बनाकडे धूम ठोकत असू. कारण तिथे गुंज संस्थानचा खराखुरा, अगडबंब हत्ती बांधलेला असे. बारा वाजत आलेले असत आणि त्या हत्तीला झुल चढवून, घागरमाळांनी मढवून वर अंबारी ठेवण्याचे काम पाहायला खूप मजा येई. हाच हत्ती दत्ताची आरती चालू असताना थोड्यावेळानं उंचावर असलेल्या मंदीराच्या उंबर्‍याशी आणला जाई. उंचच उंच पायर्‍या. मंदिराचे टोलेजंग बांधकाम. संगमरवराचा भलामोठा सभामंडप आणि गुरूवारच्या आरतीला जमलेली भरगच्च गर्दी. एका कोपर्‍यात वाजणारा सनई-चौघडा. नमीची आणि माझी जागा सनई-चौघड्यावाल्या बाबांच्या शेजारी. कारण ती पण एक मजा असे. आरतीच्या गूढ, गंभीर ताला सुरात हत्तीच्यापण किंकाळ्या मिसळून जात.
मग ती भलीमोठी आरती ठरलेल्या ठिकाणी ठेऊन दिली जाई आणि लोक रांगेने आरती घेत. ती रांग तशीच पुढे पाकशाळेकडे सरकत असे. अगडबंब देहाच्या ब्राम्हणांच्या पंगती लागत आणि तशाच उघड्याबंब, गलेलठ्ठ देहाचे, छाती-पोटावर भरघोस केस, जानवी वागवणारे सेवेकरी पत्रावळी वाढायला घेत. चविष्ट अन्न. मंदिराच्या विहीरीचे पाणी मात्र खारे असे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, गुरूदेव दत्त दत्त दत, समर्थ सदगुरू योगानंद महाराज की जय, परमपूज्य चिंतामणी महाराज की जय! अस जयघोष झाली की चित्रावती घालून पंगत अन्नग्रहण सुरू करीत असे. मध्येच पंगतीच्या एका कोपर्‍यातून नुकतीच मुंज झालेल्या श्रीपाद नाहीतर अवधूतचा श्लोकाचा बारीक आवाज उठत असे -

सोडी सावळी सानुताप सबळे ऽऽऽ सत्सेवी संतुष्टलाऽऽऽऽ  
साधी साधन साष्टांग निगुती ऽऽऽऽऽऽ योगे तपे कष्टलाऽऽऽऽऽ
कर्मोपासक ज्ञानसूर्य गमतो वैराग्य द्विमर्धूनीऽऽऽऽऽऽ
श्रीमद्सद्गुरू पादपद्मह्र्दयी ऽऽऽऽ सिध्दाग्र चिंतामणीऽऽऽ

मग पुन्हा एकदा जयजयकार होई. एखादा तयारीचा ब्राम्हण खास ठेवणीतला श्लोक काढी -

सासु कस्पट सासरा तृणजसाऽऽऽ भ्रतार दासापरिऽऽऽ
ऐशी कन्या ज्या नरासी मिळतसे त्याने भजावा हरिऽऽऽ

सर्वांना यथेच्छ अन्नदान करण्यासाठी वाढपी ब्राम्हणांची नुसतील धावपळ सुरू असे. श्लोकांच्या अशा जुगलबंदीत, हास्यविनोदात प्रसादग्रहण होई आणि लांब पाट काढलेल्या विहीरीवर हात वगैरे धुवून लोक सभामंडप, मंदिराचे आवार, खालचे झाडांचे बन इत्यादी ठिकाणी पांगत.
नमी आणि माझं आणखी एक आकर्षण पाहायचं राहिलेलं असे - संस्थानची भलीमोठी, उंचच्या उंच अ‍ॅम्बासॅडर कार, तसलाच मोठठा ट्रॅक्टर. त्या कारला झटायचे नाही. कारण ती चिंतामणी महाराजांची कार असे. तिला हार, गंध वगैरे लावलेले असे. लोक कारलाही नमस्कार करीत. आम्हीही हात जोडून घेत असू; पण त्या कारजवळून लवकर हलत नसू.

मग पुन्हा एकदा कृष्णा आत्याकडे एक चक्कर. तिथं गेलं की तपकीर नाकात घालत बसलेले उत्तमकाका आधी मला पकडत आणि दर आठवड्याला विचारलेले तेच प्रश्न पुन्हा एकदा विचारून उगाच भंडावून सोडत-
"काय रे, कितवीला आहेस यंदा? किती टक्के पडले गेल्यावर्षी?"
"सहावीला आहे. गेल्यावर्षी पासष्ट टक्के पडले."
"आत्ता दुपारी तुच भोंगळ्यानं गंगात पोहत होता की नाही? मी पाहिलंय तुला. सांगू का बाबूकाकाला?"
"मी कुठं पोहोत होतो हो? मी न नमी हत्ती पाहायला गेलो होतो"
"अस्सं काय बेट्या - तु इथं आलास की नेहमी भोंगळ्यानं गंगात पोहोताना पाहातो मी.. खोटं बोलू नको"
मी त्यांच्या तावडीतून सुटुन दुसरीकडे पळत असे. मग अशीच दुपारच्या चहाची वेळ. मोठ्यांच्या गप्पा उगाच कान देऊन ऐकणे, तिथल्या पोरासोरांच्या खोड्या काढणे.
नमीचे ए पोरा तुझ्या नाकात दोरा वगैरे गाणे सुरू होत असे.
आणि रात्री दहा वाजता पंचपदी!
मंदिराच्या लाऊडस्पीकर मधून नोम-तोम-नोम-तोम-राम-राम-तुक्काराम-राम-राम-तुक्काराम-राम-राम-तुक्काराम ऐकू येऊ लागले की सर्वजण लगबगीनं मंदिराकडे पळत.
पंचपदीची सुरूवात रंगावधूत महाराजांच्या गुजराती भाषेतल्या दत्तबावनीनं होत असे -

जय योगीश्वर दत्तदयाळ, तुच एक जगमां प्रतिपाळ...
अत्र्यनुसूया करि निमित्त, प्रगट्यो जगकारण निश्चित
ब्रम्हा हरिहरनो अवतार, शरणागतनो तारणहार
अंतर्यामी सदचित्सुख, बहार सद्गुरू द्विभूज सुमुख
झोळी अन्नपूर्णा करमाह्य, शांती कमंडल कर सोहाय
क्वायं चतुर्भुज षडभुजसार, अनंत बाहु तु निर्धार
आव्यो शरणे बाळ अजाण, ऊठ दिगंबर चाल्या प्राण

अशीच सुंदर सुंदर पदे पेटी, तबला आणि सुरेल आवाजात म्हटली जात, दत्तगुरूंची पालखी सजवलेली असे. काही-काही पदं ऐकताना-म्हणताना खूप भरून येई. खाली दिलेले पद दत्तगुरूंनी स्वत: त्या कविच्या स्वप्नात जाऊन रचून घेतले आहे असे बोलले जाते. एक नंबरचे कवित्व आणि वर पुन्हा त्या पट्टीच्या गायक ब्राम्हणाचा आवाज एवढा भावार्थ असे की अनेकांच्या डोळ्यांतून अश्रु टपकत-

हा परमसनातन विश्वभरूनी उरलाऽऽऽ भरूनी उरला
गुरू दत्तराज ऋषिकुळात अवतरला
स्मित रम्यवदन काषाय वसन धारी
पियुषयुक्त करी रत्नजडीत झारी
निज भक्त कारणेऽऽऽऽ दंड त्रिशुळ धरिला

बांधीला टोप मुरडून जटा मुकुटीऽऽऽऽ मुकुटी
घातली गुरूने वनमाला कंठी ऽऽऽऽ कंठीऽऽऽ
करिघृतडमरूतुनी उपजति ज्ञान कला
मृगचर्म पांघरे माला कमंडलू हाती, कमंडलू हाती ऽऽऽ
श्रुति श्वानरूप होऊनी पुढे पळती
भूधेनू कली भये चाटीत चरणाला
करिस्वजन उपाधि भस्मलेप अंगा ऽऽऽ
झोळीत भरीत तज्जजन्ममरण पिंगा ऽऽ
नारायण हृदयी रंग भरूनी गेलाऽऽऽ भरूनी गेलाऽऽऽ
गुरू दत्तराज ऋषिकुळात अवतरला

त्या संगमरवरी सभामंडपात टाकलेल्या लांबरूंद सतरंजीवर आम्हाला कधी डोळा लागत असे ते कळत नसे. पुढची सगळी पंचपदी, पदे तो हत्ती, ती अ‍ॅम्बासॅडर कार, तो मोठ्ठा घाट, त्या पंगती श्लोक यांच्या मनात भिरभिरणार्‍या प्रतिमा, आवाज, स्वप्ने यांच्या रूपानं मनासमोर गोलगोल फिरत आणि झोपेच्या गुडूप्प काळोखात नाहीशी होत. झोपेतच आरती घेणे, घरी येणे, पुन्हा झोपणे.
दुसर्‍या दिवशी सकाळी आमची बैलगाडी गंगा ओलांडून गावाकडे परत निघाली की बाबुकाका सांगत -
"अरे काय पप्या, झोपलास रात्री मध्येच पंचपदी चालु असताना, किती मजा आली बघ नंतर....."

गुंजग्रामीचे ते दिवस फार मजेत जात.

८ नोव्हेंबर, २०१०

मॅड

दिवाळीची धामधूम. लोक गल्लीत फटाके, फुलबाज्या वाजवत आहेत. बहिणी भावाला ओवाळत आहेत,  उत्सवी वातावरण! जीव कसा हरखून जातो ना?? माझाही जात होता.  पण काल-पर्वाचे अ‍ॅटमबॉम्ब तसेच पडलेले असूनही मला ते वाजवावे वाटेनात. उगाच फालतू आवाज कशाला काढायचे. नुकताच गाडीवर दीड-दोनशे किलोमीटर जाऊन आलो होतो. त्यामुळे आपल्यालाही शरीर आहे हे जाणवत होते. आ:!!!! मॉम~!!!! अर्धाकप चहा दे बरं ! खिडकीतून गल्लीतला फटाक्यांचा नजारा पहात-पहात आपसूकच मातोश्रींना ऑर्डर गेली. तेवढ्यात बाहेर वेगळेच आवाज होऊ लागले होते.
धाड्ड...धाड्ड.. फड्ड्ड...फड्ड्द..
काय आहे म्हणून बघायला बाहेर पडलो. गल्लीतील सगळ्यांची दारं फडाफड बंद झाली होती; आणि खिडक्यांच्या गजांना तोंड लाऊन लोक गल्लीत डोकावत होते.
एऽऽऽऽ पोलीसांना फोन लावा रे! सगळ्या मूडचा सत्त्यानाश साला.
"ओ कुलकर्णी, आत जा.. मरायचं आहे का?" खिडकीतून कुणीतरी ओरडले.
माझ्याएवढाच एक मुलगा होता. हातात एक लांबसर फरशी घेऊन तो कुणाच्यातरी दारावर जोरजोरात मारत होता. आयला ! काय झालंय ते त्याला विचारावं म्हणून त्याच्या दिशेने गेलो. दारावर फरशी मारमारून त्यानं दारावरची नक्षी पार उखडून टाकली होती. त्याच्या अंगात संचारलेल्या त्या अद्भुत शक्तीनिशी तो दारावर फटके देत होता. ते फटके मारताना त्याला बाकी जगाची काहीच तमा नव्हती. व्हाट ए ब्युटीफूल व्हायोलन्स ! पण कशाचं काय, ते वाक्य मनात चमकून विझले नसेल तेवढ्याच एका क्षणभरात माझ्या दिशेनं असलेली त्याची पाठ वळली आणि डोळे माझ्यावर रोखले.
"व्हीफ्ह्ह्हऽऽऽऽ व्हीफ्ह्.... जवळ येऊ नको.. दगड डोक्यात घालील हांऽ.."
त्याच्या नाकपुड्यांतून प्रचंड शक्तीने आतबाहेर होत असणारा श्वास आणि त्याचा तो भयानक पवित्रा पाहुन मला काहीच सुचलं नाही आणि "एऽऽ‌ऽ मारू नको.. मारू नको‌ऽऽऽ" एवढेच शब्द तोंडातून बाहेर पडून मी परत घराकडे पळालो आणि दारात उभा राहून पुढे काय होतंय ते पाहू लागलो.
"घरात हो रे गाढवा!~! त्याचं डोकं फिरलंय, जवळ जाऊ नको त्याच्या, दार लाऊन घे पटकन!" हातात कप घेऊन आलेली आई ओरडली.
"थांब गं तुऽ.. पाहु दे मला.."
तो पुन्हा एकदा त्या दारावर दगडाचे फटके देत होता. त्या दाराच्या आतले लोक लिहून दाखवता येणार नाही अशा भेदरलेल्या आवाजात मोठमोठ्यानं ओरड्त होते. दार कोयंड्याच्या एकाच खिळ्यावर तटून राहिले होते आणि दगडाचे फटके बसताच "दाण्ण!! दाण्ण!!" असे आवाज निघत होते. तेवढ्यात कुणीतरी बहाद्दर एका लांबक्या फरशीचा तुकडा हातात घेऊन त्या पोराच्या दिशेनं धावला.
"दगड खाली टाक साल्या‍ऽऽऽ दगड खाली टाक म्हणतो ना‌‍ऽऽऽ..." फरशी त्या पोरावर उगारत तो धमकवू लागला.
"तुम्हाला काय करायचंय?? जा तुम्ही...जाऽऽ"
एवढ्यात आणखी चार-पाच जण घराबाहेर पडले आणि त्या सगळ्यांनी त्या पोराभोवती कोंडाळे केले. मी पण त्यात घुसलो. आरडाओरड्यात कुणीतरी त्याच्या हातातली फरशी खेचून दूर फेकली आणि मग ते चारपाच जण त्याला धरून बुकलू लागले.
"मॅड झालंय सालंऽऽ आईचा जीव घेत होतं स्वत:च्या‌ऽऽऽ ठोका साल्याला... ए शैलेश, दोरी आणऽऽ.. दोरी आण म्हणतो ना‍ऽऽऽ "
"तुम्हाला काय करायचंय??.. मी तुम्हाला काही करतोय का?"
"साल्या इथं आमची लेकरं खेळत होती..डोक्यात फरशी घातली असतीस म्हणजे.." या माणसानं फटाफट त्याच्या थोबाडीत लगावल्या.
"पैशे देतो ना मी तुम्हाला... देऊन टाकतो तुमचे पाच हजार रूपये‌ऽऽ"
"बांधा रे आधी त्याला.."
"हो‍ऽऽ होऽऽऽ आधी त्याला बांधून टाका.. मरायचं कुणी च्यायला.."
"मी काही करीत नाही कुणाला.. तुमी जा इथून.. मी आत जाऊन बसतो.."
"पोलीसला फोन लावा‌‍ऽऽ याचा काही भरवसा नाही‍ऽऽ.. तोपर्यंत बांधून टाका आधी याला "
बांधाण्याचे नाव ऐकताच त्याच्या भोवती जमलेल्या कोंड्याळ्याला धक्का देत, त्याला धरू पाहाणार्‍या लोकांच्या हातांत नख खूपसून रक्त काढीत तो कोंडाळ्यातून बाहेर पडला आणि शेजारीच असलेल्या त्याच्या दोन खोल्यांत पळाला. लटलट उडणारे माझे काळीज आता नॉर्मल झाले होते आणि आता मलाही धैर्य आले होते. त्याच्या खोलीच्या बंद होत असलेल्या दारावर मी धडक दिली आणि आत घुसलो.
"बाहेर हो‍ऽऽ बाहेर हो म्हणतो ना साल्या.. बाहेर निघ आधी.."
"तु जा उगं इथून.. पहार घालीन डोक्यात तुझ्या.." त्याच्या ओठातून आलेलं रक्त मनगटानं पुशीत तो म्हणाला.
"हे बघ.. एकटा आत बसू नकोस.. बाहेर चल..माझ्याघरी चल... "
"जा त्याला घेऊन तुमच्या घरी च्यायची पिडा.."
"हा कुलकर्णी पण मॅड्च आहे..त्याला कशाला घरी घेऊन जातो रे.. आधी त्याला बांधा आणि इथंच पडू द्या पोलीस येईपर्यंत.."
"ओ मालक, पंधरा मिनीटात तुमची दोरी सोडील तो.. आणि हा उद्या फॅनला लटकलेला दिसला ना मग विचारीन तुम्हा सगळ्यांना मी.." मी पण आता चेकाळलो होतो.
आता लोक हादरले. त्याला बाहेर घ्या, बाहेर घ्या म्हणू लागले आणि त्याला सगळ्यांनी बाहेर काढायला सुरूवात केली.
शेवटी त्याच्या घरासमोरच्या फ्लोअरींगवर तो जाऊन बसला आणि दोन पांयात डोके लपवून ढसाढसा रडू लागला.
"रडतंय कसं आता, दारूफिरू पिऊन आलंय का बघा..." माझ्या शेजारीच उभे असलेले कुणीतरी ओरडले. जरा जवळ गेलो तर याच महाशयांच्या तोंडातून दारूचा बेक्कार वास येत होता.
"तुम्ही जा इथून.. मी काही करीत नाही कोणाला, पैशे देऊन टाकतो मीऽऽ "
"स्वत:च्या आईचा जीव घेत होतास साल्या‍ऽऽ तु काय पैसे देणार रेऽऽ दार मोडलंस माझं.. " हे त्याचे घरमालक होते.
"देतो ना तुम्हाला पाच हजार रूपये‍ऽऽ " रडतारडता तो म्हणाला.
गर्दीतल्या टग्यांनी अर्वाच्य शिव्या देत त्याच्यावर आणखी एकदा हात मोकळा करून घेतला. तोपर्यंत कुणीतरी दोरीपण घेऊन आले होते.
"असं करा, त्याला बांधाच. नको उगं पीडा मोकळी." आसाराम बापू स्टाईल दाढीमिशा असलेला एक म्हातारा म्हणाला.

पुन्हा एकदा जबरदस्तीने त्याला त्याच्या घरात नेण्यात आलं आणि कॉटवर आडवा झोपवून हात, पाय पक्की बांधण्यात आले.
"बघून घेतो एकएकाला.. बघुन घेतो.."
"मॅड झालंयऽऽ बार्‍हाळेकडं न्या त्याला"
"कोण नेईल बॉ‌ऽऽ गळाफिळा दाबायचं रस्त्यात आपलाच"
"पडू द्या त्याला इथंच.. "

मग गर्दी काय झालं होतं कशामुळं झालं होतं वगैरे चर्चा करण्यात गुंतली. काही लोक उगाच मधूनमधून त्या खोलीत चकरा मारू लागले.
मला मात्र नेमकं कुणाचं डोकं सरकलंय ते कळेना.  नुसता मतांचा हलकल्लोळ माजला होता. डोकं दुखू लागलं.
घरी परत आलो. कॉम्पुटरसमोर ठेवलेल्या चहावर आता साय आली होती.