३० जुलै, २०१०

उपसंहार

मराठी शब्दकोषाच्या दृष्टीने या शब्दाचा अर्थ काहीही असो, हा शब्द या ब्लॉगसाठी संहारक ठरणार आहे. ब्लॉगच्या समाप्तीची पोस्ट टाकल्यापासून मृताच्या घरी जसे लोक जातात आणि अबोलपणे परततात तसे वाचक या ब्लॉगवर येऊन परत जाताना पाहून मजा वाटत होती. खरोखरचा मृत्यू येण्यापूर्वीची एक चुणूक ! युजी, आय टेल यू - एव्हरीबडी रॉटस लाईक ए गार्डन स्लग व्हेन ही ऑर शी डाईज, बट यू हॅड दॅट एक्स्ट्राऑर्डिनरी करेज टू स्टेट इट व्हेन यू वेअर अलाईव्ह. आणि म्हातारबा, तेच तुझं सौंदर्य आहे. मी नेहमीच वास्तवावर प्रेम केलं आहे; आणि कुणाही विचार करू शकणार्‍या जीवाचा जसा प्रश्न असू शकतो तसा
माझाही होता - माझं वास्तव काय? मी म्हणजे काय? आणि असे प्रश्न खरोखर
जेव्हा पडतात तेव्हा कुठल्याही पुस्तकी व्याख्या कामी पडत नाहीत.
असा प्रश्न माझ्यात निर्माण करण्याची भूमिका रजनीशांच्या साहित्यानं निभावली आणि हा प्रश्न उखडून फेकण्याची भूमिका यूजींच्या आभासी सहवासानं निभावली. युजी आणि रजनीश हे विचारांच्या (आणि शिकवणुकीच्याही (सॉरी युजी तुमची काहीच शिकवणूक नव्हती, तरीही हा शब्द वापरतोय) दृष्टीनं दोन ध्रुव असले तरी ते एकाच पृथ्वीचे दोन ध्रुव आहेत - एकमेकांशी एवढ्या घट्टपणे जोडलेले तरीही एकमेकांपासून कितीतरी दूरवर. रजनीशांची भूमिका अखिल मानवजातीच्या संचितावर हक्क सांगणारी -
तर युजी अगदी दूरवर एकटेच अबोलपणे उभे. थोडक्यात रजनीश म्हणजे जगाच्या बाजारात ओरडून परमात्म्याचा प्रसाद विकणारे, प्रसादावरही प्राईस टॅग ठेवणारे तर युजी परमात्माही अस्तित्वात नाही आणि त्यामुळे त्याचा प्रसादही नाही असं निक्षून बजावणारे. तरीही दोघांच्याही हातून परमात्म्याच्या प्रसादाचे तेवढ्याच प्रमाणात वाटप झाले याचा मी साक्षीदार आहे. माझ्या ब्लॉगवरील रजनीशांवरची पोस्ट वाचलेल्या वाचकांना ही पोस्ट म्हणजे घूमजाव वाटू शकतो.
पण आहे हे असं आहे. रजनीश एवढे का बोलले? युजी गप्प का राहिले? तर परमात्मा हा चराचरात व्यापून आहे - ज्याने तो अनुभवला त्याच्यात तो आहेच आहे; पण ज्याला अजून अनुभवायला मिळाला नाही त्याच्यातही आहेच; फक्त त्याला त्याची जाणीव नाही; आणि ही जाणीव त्याच्यात येण्यासाठी त्याने शक्य त्या सार्‍या प्रयत्नांचा अवलंब करायला हवा. ध्यान करायला हवं, विपश्यना करायला हवी, सूफी व्हर्लींग करायला हवी - अगदी संभोगातूनही समाधीकडे जाण्याचा प्रयत्न करायला हवा अशी भूमिका असणा
रे रजनीश. तर हे सगळे प्रयत्न व्यर्थ आहेत (युजींनी ते केले होते), ही बुध्दत्व विकण्याची मार्केटींग आहे, मला हा पवित्र धंदा करण्यात रस नाही, जग हे जसे असायला हवे, अगदी तसेच आहे, त्यात काडीचाही बदल करण्याची गरज नाही असे जन्मभर सांगत राहाणारे युजी. या दोघांमध्येही फार मजेशीर साम्यस्थळे आहेत. उदा. रजनीश आयुष्यभर रोज आहारात एकच-एक पदार्थ घेत असत. एकच पदार्थ रोज! त्यात काहीही बदल नाही. युजींचेही असेच. बुध्दपुरूषांच्या बाबत असे शक्य आहे कारण त्यांच्यात कोणताही अनुभव साठत नाही, चवीचाही नाही. क्षण उलटला की अनुभवही पुसून जातो आणि पुन्हा एकदा आरसा स्वच्छ होतो.

दोघांच्याही उपस्थितीत करिष्मा होता. दोघांकडेही लोकांची रिघ लागलेली असे. रजनीशांचा वावर अत्यंत यांत्रिक वाटणारा, ताठर, संथ तर युजींसोबतचे बोलणे म्हणजे लहान मुले आपल्या आजोंबासोबत बसून जेवढ्या सहज गप्पा मारू शकतात तेवढे सहज! रजनीश लोकांशी अंतर राखून बोलतील, "दर्शनाची" वेळ देतील, मी महत्वाचा आहे, माझा आदर राखायलाच हवा हे लोकांच्या मनात ठसवतील. हे वर्णन कल्प-कल्पांतापर्यंत चालू शकेल. हेच नेति नेति. हे थांबण अशक्य आहे. ब्लॉग थांबला, न थांबला तरी!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा