६ एप्रिल, २०१०

राज ठाकरे हे नाही करू शकले !


राज ठाकरेंचा म.न.से. नुकताच स्थापन झाला होता आणि त्यांची मारा-ठोका छाप भाषणे गाजत होती. पुढे त्यांना अटक झाली - म्हणजे अटकेची एक मोठी मालिकाच सुरु झाली. रस्त्यावरुन जात असताना इथं, औरंगाबादला एक केवीलवाणे चित्र मला दिसले. ठाकरेंचे चार-दोन समर्थक (यापैकी एक म.न.से.कडून पदवीधर मतदार संघाची निवडणुक लढताना पडून आता शिवसेनावासी) रस्त्यावर उतरले होते आणि पोलीस त्यांना गाडीत कोंबत होते. राज ठाकरेंची भाषणे ऎकायला लोक जमत असतील, पण त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर फक्त चार-दोन पदाधिकारी आणि कार्यकर्तेच उतरले होते.
राज ठाकरे यांच्या भाषणातील थेट मुद्दे, महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट इ.इ. मुळे हा माणूस काहीतरी वेगळे करणार असे चित्र निर्माण झाले होते - आजही आहे. मोठ-मोठे विचारवंत लोक त्यांना समर्थन देत होते. मी राज ठाकरेंच्याच काय पण कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नव्हतो, आजही नाही. पण मला मोठी आशा वाटत होती. पण अमुक एका पक्षाचा कार्यकर्ता व्हायचे म्हणजे नेमके काय करायचे? साहेब आले की घोषणा द्यायच्या, साहेब गेले की सतरंज्या उचलायच्या - त्यांच्या वाढदिवसाला रक्तदान करायचे, कुठेतरी वह्या-पुस्तकं वाटायची, प्रचाराच्या वेळी प्रचार करायचा, आंदोलनाच्या वेळी आंदोलने करायची ही काही फार निकडीची आणि सदा-सर्वकाळ-सगळीकडे चालणारी कामे नाहीत. पण कार्यकर्ते ती करीत असतात. ही कामे कार्यकर्त्यापुरती आणि त्या-त्या घटनेपुरतीच मर्यादीत राहातात. त्यातून लोकांनाही काही मिळत नाही आणि कार्यकर्त्यालाही कामाचे केल्याचे समाधान होत नाही. विचार केला आणि तो कागदावर लिहुन काढला.
म.न.से.ने स्विकारलेली भूमिका शहरांपुरतीच मर्यादीत आहे आणि महाराष्ट्रात खेडी, अर्धशहरी गावेही आहेत. त्यांच्यासाठी काही ठोस हवे. नवनिर्माणच करायचेय तर तो दररोज आणि महाराष्ट्राच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत चालणारा कार्यक्रम पाहीजे. गावात ग्रामपंचायत, क्रुषी उत्पन्न बाजार समित्या, पोलीस ठाणी, शहरात महानगरपालिका, बसथांबे, न्यायालये, विमानतळे, बाजारपेठा, आर.टी.ओ. कार्यालये इत्यादी ठिकाणी नडलेल्या जनतेला दररोज मदत करण्यासाठी कार्यकर्ते का नसावेत? कार्यच करायचेय, नवनिर्माणच करायचेय तर त्याला इथे तिन्ही त्रिकाळ अमाप वाव आहे. उदाहरणार्थ म.न.से. चा कार्यकर्ता असणारा एक वकील आहे. तो रोज न्यायालयात जातो. त्याला म.न.से. नियुक्त, जनतेसाठी कधीही उपलब्ध असणारा वकील म्हणून घोषीत करा. त्या-त्या विषयाचे ज्ञान असलेले तुमचे लोक ठिक-ठिकाणी द्या. अनेकप्रकारचे ज्ञान असलेली कार्यकर्तेमंडळी तुमच्याकडे आहेत - करा त्यांना लोकार्पित. अशी भूमिका तुम्ही पक्षाचे धोरण म्हणून मुंबईतून जाहीर करा. असा काहीसा आशय असणारे पत्र मी राज ठाकरे यांना लिहीले. असली हजारो पत्रे त्यांना येत असतील - अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाहीच.

सुभेदारीवर एकदा राज ठाकरे आले असताना मी त्यांना वरील आशयाचे पत्र समक्षच द्यायचे असे ठरवून भेटायला गेलो. अगदी सकाळी सात वाजताच. तीन-चार तास वाट पाहिल्यावर कळले की "साहेब भाषणापूर्वी कुणाशीही बोलत नाहीत, जे काय असेल भाषण संपल्यावर बोला किंवा लिहुन आणलं असेल तर देऊन जा..." मी आता कंटाळलो होतो. श्री. मनोज हाटे नावाच्या मुंबईहुन त्यांच्या सोबत आलेल्या पदाधिका-याला बोललो. त्यांनी पत्र वाचले आणि साहेबांच्या रुममध्ये निघुन गेले. दहा-पंधरा मिनिटांनंतर परत आले.
"काय करता आपण?" पदाधिकारी
"अमुक-तमुक पेपरमध्ये काम करतो"
"अरे वा! किती आहे तुमच्या पेपरचं वितरण?"
"भरपुर असेल...नक्की आकडा माहीत नाही.."
"बरं, तुम्ही आमच्यासोबत मुंबईला याल का?"
"मी नोकरी करतो, मी तिथं येऊन काय करू, तुम्ही पत्रात विनंती केलीय ते करा, फार बरे होईल..."
"आम्ही निश्चित त्यावर विचार करू....खरंच हे व्हायला पाहीजे"
"मुंबईला याल का?" या त्याप्रश्नामागचा त्यांचा अभिप्राय फक्त एवढाच की "काय कमाल केली यार तु हे पत्र लिहुन? चल आता मुंबईला आमच्या सोबत...! आणि जा घरी परत आणि सांगत सुट सगळ्यांना "मला मुंबईला बोलावलं आहे म्हणून..."
पण हे झाल्यावरही मला राहवेना. यावर दोन वर्षे उलटली. काहीही झाले नाही. पुन्हा एकदा ते इथे आले. आता मात्र काही झाले तरी समक्षच, राज ठाकरेंच्याच हातात पत्र द्यायचे असे ठरवले.

पूर्वीसारखीच कार्यकर्त्यांची, बघ्यांची ही हुल्लड, ढकला-ढकली. ते थांबलेल्या ठिकाणी कसातरी आत घुसलो. मिडियाचे काही लोकही पाठोपाठ आले. यांचं आता सुरु होणार म्हणुन मी पटकन पुढे होऊन सोबत आणलेले पत्र राज ठाकरे यांच्या हातात ठेवले. ते त्यांनी वाचले. पुन्हा एकदा वाचुन काढले. समोर उभ्या असलेल्या कुणाला तरी (बहुतेक श्री. बाळा नांदगावकर) उद्देशून वाचलेले पत्र त्यांच्याकडे देत देत ते म्हणाले -
"बघा जरा काय करता येईल ते"
मला फार बरे वाटले. मी तिथेच थांबून राहीलो.
मग मिडियावाल्यांनी राज साहेबांची पाच-दहा मिनिटांत मुलाखत घेतली. राज ठाकरे यांच्यावर पीएच.डी. करणा-या विद्यार्थ्याने स्वत:बद्दल थोडक्यात माहिती सांगुन त्यांचे आशिर्वाद घेतले. पत्रकार परिषद दुसरीकडे होणार होती, त्यासाठी साहेब निघाले. तेवढ्यात तो पीएच.डी.वाला त्यांना काहीतरी म्हणाला. त्यांना वाटले मीच बोलतोय.
ते म्हणाले,
"कळ्ळयं मला...आलं माझ्या लक्षात"
मी म्हणालो -
"मी नाही बोललो..हे (पीएच.डी.वाले) बोलले.."
मी तिथून बाहेर पडलो.
आज ३-४ वर्षे झाली. त्यांना काय कळले आणि त्यांनी का काही केले नाही रामजाणे घनश्यामबापू* !

[रामजाणे घनश्यामबापू* - हा फक्त आमच्याच गावात चालणारा वाक्यप्रचार आहे. कुणाला कशातले काही कळले नाही तर घनश्यामबापूला (वारले आता ते) नावाच्या एका जख्ख म्हाता-या बाबांना ते नक्कीच ते कळते असा त्याचा अर्थ]

१३ टिप्पण्या:

  1. इथून तिथून सगळे एक सारखे. . .सुरुवातीला राज कडून खूप अपेक्षा होत्या पण काही उपयोग नाही. . राजची भाषण, त्याचे विचार खूप पटत होते पण भ्रम निरास झाला आहे. बघू काय होतय ते.

    उत्तर द्याहटवा
  2. यशवंत,

    राज साहेबाना जे पत्र दिले होते त्याची प्रत मिळेल काय? किवा ते तुम्हाला तुमच्या ब्लोग वर टाकता येईल काय?

    विनोद
    vinodshirsath1971@gmail.com

    उत्तर द्याहटवा
  3. हे लोक (राज ठाकरेंसकट) लंब्याचवड्या बाता मारतात...पण खरे काम करायची वेळ येते तेव्हा दुसरेच नखरे करु लागतात....त्यामुळे यांच्या भाषणांना काही अर्थ नाही...!

    उत्तर द्याहटवा
  4. विनोदकुमारजी,
    तुम्ही विचारलेले पत्र तुमच्या मेलवरही पाठवले आहे आणि माझ्या ब्लॊगवरही टाकले आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. प्रत्येक गोष्ट घडायला थोडा वेळ लागतो. जर महाराष्ट्राचे नवनिर्माण करायचे असेल तर निश्चितच आधीची घाण काढली पाहिजे. आणि तेच काम मनसे करत आहे. ६० वर्षे सत्तेत असूनही सत्तधारी पक्ष फारसा विकास करू शकले नाही. त्यामुळे ५ वर्षापूर्वी स्थापन झालेल्या पक्षाकडून(जो अजुन सत्तेत पण नाहीये) इतक्या अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे. सांगण्याचे तात्पर्य इतकेच की बदल नक्की होईल .... थोडा धीर धरा आणि सहकार्य करा.
    आणि यशवंतजी...मनसेने केलेले काम त्यांच्या वेबसाइट वर बघा किंवा वृत्तपत्रांमधे येतातच.
    जय महाराष्ट्र.

    उत्तर द्याहटवा
  6. निशाजी,
    सत्तेत असलेल्या पक्षाने काही केले नाही, आम्ही तर सत्तेतही नाहीत किंवा आत्ताच आलोय, धीर धरा हेच तर जगातल्या सगळ्या राजकिय पक्षांचं तत्वज्ञान आहे !
    तुम्ही म्हणताय बदल नक्की होईल, आम्हीही तेच म्हणतोय, पण आम्हाला वाटते की फक्त राज ठाकरेंनी भाषण केले आणि झाला बदल असे होणार नाही, त्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांना अगदी दररोज झटावे लागेल, महाराष्ट्रभराच्या कानाकोप-यातील लोकांना त्यात थेट सहभागी करुन घ्यावे लागेल.
    आणि हो, वरचे लिखाण करण्यापूर्वी मी त्यांची वेबसाईट पाहिली होती, पेपरही दररोज वाचतो!

    उत्तर द्याहटवा
  7. मी अस म्हणत नाहीए की फक्त भाषण केल्याने बदल होईल. त्यासाठी कार्यकर्त्यांना झटावे लागेल आणि झटतच आहेत कार्यकर्ते. म्हणून तर तुम्हाला म्हणाले ना मी की त्यांची वेबसाइट बघा आणि वर्तमानपत्र वाचा. त्यात येताच की कार्यकर्त्यांनी काय काय केला आहे ते.
    आणि तुम्ही म्हणतात ना की "महाराष्ट्रभराच्या कानाकोप-यातील लोकांना त्यात थेट सहभागी करुन घ्यावे लागेल". राजसाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा त्यासाठीच केला. त्यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग आणि सहकार्य असणे आवश्यक आहे. पण ते ज्या लोकांसाठी लढताय तेच लोक त्यांची साथ देत नाहीए हे त्यांच दुर्दैव म्हणाव की महाराष्ट्राच हेच कळत नाही.

    उत्तर द्याहटवा
  8. मनविसेचे आंदोलन, परिणामी ए एच ए वर गुन्हा दाखल, पुणे.
    मोबाईल कंपन्या सुतासारख्या सरळ, मुंबई...
    मनसे कार्यकर्त्यांनी केली ५१ बालकामगारांची सुटका ! वडगाव मावळ,पुणे.
    पुण्यातील शिवाजीनगर विभागातील नवनिर्माण अभियान...!
    मनसेच्या इशा-यानंतर मुंबई शेअर बाजाराची वेबसाइट आता मराठीत
    ठाण्यातील रेल्वे दुर्घटनेत मनसेची आपत्कालीन व्यवस्थापनात आगळी मदत
    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शेतकर्‍यांसाठी हेल्पलाईन, परभणी
    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेती- मदत केंद्र सुरू, बीड ( मोंढा)
    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी ठोकले सेनगाव पंचायत समितीला टाळे, सेनगाव ( हिंगोली)
    पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीमधील गैरकारभाराविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा धडक मोर्चा, कल्याण
    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिक्षणक्षेत्रात स्टिंग ऑपरेशन, नांदेड
    मुंबई विद्यापीठाचा अंदाधुंद कारभार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्टिंग ऑपरेशन!, मुंबई
    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे टोलवसुली विरोधी आंदोलन, डोंबिवली
    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दणका शिवडी येथील टोल नाका बंद, मुंबई.
    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उल्हासनगर पालिकेला दणका, उल्हासनगर
    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मागितली पाण्याची ओवाळणी, चेंबूर, मुंबई
    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हस्तक्षेपाने कंत्राटदाराची माघार, घाटकोपर (प.)
    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठोकले जलकेंद्राला टाळे, पुणे
    केंद्र सरकारच्या निर्यात ऋण विभागात मराठी कामगारांना न्याय, मुंबई
    ‘मनविसे’ ने विद्यार्थ्याच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आधिकार्‍यांना कोंडले, मालवण
    विद्युत वीज केंद्रावर मनसेची धडक, पनवेल
    शालेय फी वाढ - मनसे चा दणका, अलिबाग
    शालेय फी वाढीविरोधात मनसे चे आंदोलन, डी. वाय. पाटील प्रतिष्ठानने घेतले नमते. पिंपरी
    (www.manase.org)

    निशाजी,
    वरच्या सगळ्या बातम्या म.न.से.च्याच संस्थळावरून घेतल्या आहेत (मी त्यांची वेबसाईट वाचतो असे आता तरी वाटतेय का?). महाराष्ट्र एक आहे, महाराष्ट्राचे प्रश्नही थोड्याफार फरकानं सारखे आहेत आणि त्यासाठी सारख्या प्रमाणात, महाराष्ट्रात अगदी दैनंदिन पातळीवर चालणारा कार्यक्रम पाहिजे, त्याची सूत्रे एकाच ठिकाणी पाहिजेत. (नुसती ब्ल्यूप्रिंट आहे असे म्हणून भागत नाही)
    वर झालेली, आणि होत असलेली म.न.से.ची आंदोलने ही काही संघटीत आणि महाराष्ट्रासाठी इथुन-तिथुन सम-समान धोरण असल्याचे दर्शवीत नाहीत. अशी आंदोलने हजारो वर्षे केली तरी नवनिर्माण होणार नाही - हां, कार्यकर्ते मात्र फुकट बेजार होतील. वरची आंदोलने म्हणजे हवेत गोळ्य़ा (ज्याला जिथे मारावी वाटली तिथे मारली) मारण्याचा प्रकार वाटतो. इतर पक्षदेखील अशीच आंदोलने गेली साठ वर्षे आलटुन-पालटुन करीत आले आहेत.

    म.न.से. ला खरंच "नवनिर्माण" करायचे असेल, तर संपूर्ण सत्ता काबिज करण्याशिवाय पर्याय नाही आणि त्यासाठी अख्ख्या महाराष्ट्राला अपिलिंग वाटेल (नुसतं मुंबई, पुणे या शहरांना नव्हे) असा कार्यक्रम सत्तेत येत नाहीत तोपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात राबवा (कारण आम्हा सगळ्यांनाच नवनिर्माण हवं आहे) एवढंच माझं म्हणणं आहे आणि माझ्या अल्पमतीप्रमाणं मी त्यांना विनंती केली आणि ते इथं मांडलं.

    उत्तर द्याहटवा
  9. नमस्कार,

    मान्य आहे की महाराष्ट्राचे भरपूर प्रश्‍न आहेत. पण मला सांगा जर महाराष्ट्राचे 10 प्रश्‍न असतील आणि ते 10 पण प्रश्न एका वेळी सोडवण्याचा प्रयत्न केला तर एकही व्यवस्थित सोडवता येणार नाही. त्याच जागी जर सुरवातीला जर मोजके 3 ते 4 प्रश्‍न हातात घेतले तर ते व्यवस्थित सोडवता येणार नाही का? आणि हीच कार्यपद्धती मनसे ची आहे.

    मागे एकदा मनसे च्या महिलांनी रेशन कार्डावर तूरडाळ देत नाही म्हणून आंदोलन करणार होते. पण राजसाहेबांनी सांगितले की "आंदोलन करून काही होणार नाही, गोदामा फोडा". आणि त्यानंतर माणसे कार्यकर्त्यांनी गोदामात लपवलेली कितीतरी टन तूरडाळ जप्त केली. ही बातमी कदाचित आपण पण वृत्तवाहिनीला बघितली असेल . सांगण्याचे तात्पर्य इतकेच की मनसे ची आंदोलन ही अशा प्रकारची असतात.

    तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की "म.न.से. ला खरंच "नवनिर्माण" करायचे असेल, तर संपूर्ण सत्ता काबिज करण्याशिवाय पर्याय नाही" आणि याचसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. माझा स्वताचा अनुभव सांगते. मला १ समस्या होती म्हणून मी ती मनसेच्या संकेतस्थळावर व्यक्त केली. त्यांनी मला प्रतिसाद पण पाठवला आणि समस्येचा तोडगा पण सागितला. म्हणून मी केलेल्या विनंतीचे मला समाधान मिळाले.

    माझे म्हणणे ईतकेच आहे की मराठी माणसांची जी खेकड्याची वृत्ती आहे, त्यात कुठेतरी बदल झाला पाहिजे. तरच नवनिर्माण होईल.

    जय महाराष्ट्र.

    उत्तर द्याहटवा
  10. ओक्के!! तुमचं म्हणंण मला अगदी पटलं. माझ्याशी एवढा संवाद साधल्याबद्दल आभार!!!

    उत्तर द्याहटवा
  11. धन्यवाद यशवंतजी, तुमची १ गोष्ट मला खूप आवडली ती म्हणजे तुमचे मराठी. खरच अप्रतिम आहे.

    उत्तर द्याहटवा