४ ऑक्टोबर, २०१०

यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग एक

Copyright Notice
My teaching, if that is the word you want to use, has no copyright. You are free to reproduce, distribute, interpret, misinterpret, distort, garble, do what you like, even claim  authorship, without my consent or the permission of anybody. - U.G.

U.G. Krishnamurti
यापूर्वी माझ्याकडून यु.जी. कृष्णमूर्तींवरून सुचलेल्या माझा दोस्त युजिनी आणि वाचा आणि शोधा या लिखाणात दोनवेळा काही अंशी (म्हणजेच अगदी शंभरातला दशलक्षावा टक्का) यु.जी. कृष्णमूर्तींवर लिहून झालंय. खरोखर माझा असा कुठलाही दोस्त कधी नव्हता. पण यु.जीं.चे रंग वापरून एक पात्र रंगवण्याचा विचार आला आणि ते लिहून काढलं होतं. त्या पात्राच्या तोंडून यु.जी. कृष्णमूर्तींनी सांगितलेल्या गोष्टी अर्थात भारतीय आध्यात्मिक संचिताबद्दल खडे बोल वदवून घेण्याचा विचार होता - तो बारगळला. कारण असं पात्र उभं करायला मी काही लेखक नाही.
Rajneesh aka Osho


    पण कधीकाळी रजनीशांच्या सोफास्टीकेटेड बाबागिरीच्या आधीन जाऊन आयुष्यातील काही काळ मी घालवला आहे; त्यात सगळं काही माझ्यापुरतं जवळून अभ्यासलं आहे आणि तेच असं कधीतरी बाहेर पडत राहातं. मला वाटतं हेच जगातल्या सगळ्या लोकांबद्दल होत असतं. कुणालातरी काहीतरी खुणावतं, त्या खुणावणार्‍या गोष्टीकडे अधिकाधिक जवळ जायला होतं, त्याबद्दल माहिती होते आणि तीच माहिती तुम्ही जगासमोर मांडत राहाता. तोच उपजिवीकेचा मार्ग देखील बनतो. हे जगात असलेल्या सगळ्या अभ्यासविषयांना आणि त्या-त्या विषयाच्या अभ्यासकांना लागू आहे - पण एका क्षेत्राचे अभ्यासक यात मोडत नाहीत ते म्हणजे आध्यात्मिक क्षेत्र. कारण आध्यात्माच्या प्रदेशात पाऊल टाकलेला माणूस आणि त्याचं तिकडे वळलेलं पाऊल हा त्याला या लौकिक जगतातलं काही नकोय, त्याची रूचि जगाच्या पार जे आहे त्यात आहे याचा स्वयंसिध्द पुरावा आहे असं हजारो वर्षांपासून या भूमीत मानण्यात आलं आहे - यामुळेच भगव्या वस्त्रांना आणि संन्याशांना आदर मिळत आलेला आहे.
    अगदी अलिकडे म्हणजे ६२-७२ च्या दशकात रजनीश:ओशो यांनी "सगळं काही सोडून गिरीकंदराच्या दिशेने जाणे आणि स्वत:चा शोध घेत राहाणे" ही संन्यासाची व्याख्या बदलली आणि "कुठंही न जाता जिथे आहोत तिथेच, सगळ्या सुखोपभोगांच्या सान्निध्यात राहून संन्यासी असणे" असं नवं रूप संन्यासाला दिलं तोच त्यांचा "नव-संन्यास." पुढे मग गोष्टी वाढत गेल्या आणि "सेक्सगुरू" या उपाधीपर्यंत रजनीशांचा प्रवास झाला. ६२-७२ पासून सन १९९० मध्ये रजनीशांचा मृत्यू होईपर्यंत त्यांनी निर्माण केलेल्या नव-संन्यासाच्या वातावरणातून आजच्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर वेळीअवेळी प्रवचनं देणार्‍या बहुतांशी बाबा/गुरू लोकांचे भरण-पोषण झाले आहे. आध्यात्माचं क्षेत्र देखील एक धंदा बनला आहे हे आजचं वास्तव आहे.
    धंदा बनलेल्या आजच्या आध्यात्म या क्षेत्राची आणखी एक खूबी म्हणजे इतर धंद्यांसारखी यात खर्‍याखुर्‍या वस्तूंची डिलेव्हरी द्यावी लागत नाही. जे काही असायचं ते गुलदस्त्यातच असतं - ते तसंच गुलदस्त्यात राहातं. आणि कशाचीही डिलेव्हरी न देता हा धंदा जोरात चालू असतो. त्यामुळंच आध्यात्माबद्दल जो बोलतो तो ढोंगबाज बाबाचा चेला असला पाहिजे किंवा "तसा होण्याचा त्याचा प्रयत्न असावा" असा एक समज जगभरात पसरलेला आहे. पुन्हा एकदा मी यु.जी. कृष्णमूर्तीं हा मुख्य धागा पकडून आज लिहायला बसलो आहे. पुढे जाईल तसं इतर अनेक धाग्यांनाही हातात घ्यावं लागणार आहे - सोडावं लागणार आहे कारण त्यांची विशिष्ट अशी विचारसरणी नाही - तर यु.जी. कृष्णमूर्ती हा भारतात उदयाला आलेल्या समस्त आध्यात्मिक विचारसरणींच्या विरूध्द, अगदी टोकाचा परिणाम आहे. त्यांनी उभ्या केलेल्या प्रश्नांमुळे आध्यात्मच नव्हे तर मानवी बुध्दीमत्तेशी निगडीत असलेल्या प्रत्येक क्षेत्राच्या वैधतेवारच प्रश्नचिन्ह लागतं.  
    ते कसं लागतं हे पाहाण्यापूर्वी यु.जी. कृष्णमूर्तींच्या पार्श्वभूमीबद्दल एकदा थोडक्यात आटपून घेतो. यु.जी. कृष्णमूर्ती (उप्पलुरी गोपाला कृष्णमूर्ती) हे जे. कृष्णमूर्ती (जिद्दू कृष्णमूर्ती) यांचे समकालीन. यु.जीं.चे आजोबा हे सी.डब्ल्यू. लीडबीटर आणि अ‍ॅनी बेझंट यांच्या थिऑसॉफिकल सोसायटीमधील कारकिर्दीदरम्यान सोसायटीला उदारपणे आर्थिक मदत देणारी असामी होते; व्यवसायानं ख्यातनाम वकील होते. लीडबीटर आणि अ‍ॅनी बेझंट यांनी जे. कृष्णमूर्तींची त्यांच्या बालपणापासूनच ते नव्या युगाचे "मैत्रेय" बनून जगापुढे यावेत या इराद्याने निवड केली होती. जे. कृष्णमूर्ती हे नव्या युगाचे बुध्दपुरूषच व्हावेत (ते पुढे बुध्दपुरूष म्हणून जगासमोर आलेही, पण थोडासा यू टर्न घेऊन ), थोडक्यात बुध्दत्व प्राप्ती हेच ध्येय समोर ठेऊन जे.कृष्णमूर्तींचे पालन-पोषण केले जात होते. या पालन पोषणात ध्यान, साधना आणि तसलेच सर्व प्रकार आले. जे.कृष्णमूर्तींबद्दल हे होत असतानाच कुमारवयीन यु.जी. कृष्णमूर्तीदेखील थिऑसॉफिकल सोसायटीचे सदस्य बनले. दुसरीकडे युजींना त्यांच्या कर्मठ घरातच लहानपणापासून साधु, बैरागी, साधक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींना जवळून पाहायला मिळत होते; कारण त्यांच्या पंगती युजींच्या आजोबांच्या घरी सतत उठत असत.
Raman Maharshee


    या कुमार वयातच कुठेतरी, मोक्ष खरोखर आहे काय, ती अवस्था कशी असते, ती मला मिळवायचीय ही ओढ युजींच्या मनात निर्माण झाली. पौगंडावस्था ते एकविशी या दरम्यानच्या कालखंडात युजींनी ब्रम्हचर्य पालनासह सर्व प्रकारच्या आध्यात्मिक साधना केल्या. कुणीतरी स्वामी शिवानंद नावाच्या व्यक्तीबरोबर त्यांनी हिमालयात सात वर्षे घालवली. मोक्षाची तीव्रतम तहान लागलेली असताना, साधना चालू असताना आणि आजूबाजूचे पूरक वातावरण या सर्व पार्श्वभूमीवर खरोखर मोक्ष मिळवलेली कुणी व्यक्ती हयात आहे काय? ती कशी आहे? ती आपल्याला मोक्ष देऊ शकेल काय? हे प्रश्न मनात असतानाच युजींनी ऋषि मानल्या जाणार्‍या, अरूणाचलम या पर्वताच्या सान्निध्यात राहाणार्‍या रमण महर्षींची भेट घेतली. या भेटीदरम्यान युजींचा रमण महर्षींना थेट सवाल होता "हा जो काही मोक्ष म्हणतात, तो तुम्ही मला देऊ शकता काय?" रमण महर्षींनी साशंकपणे उत्तर दिले, "मी देऊ शकतो, पण तु तो घेऊ शकतोस काय?" या उत्तरामुळे युजींचा आध्यात्मिक साधना आणि साधक याबद्दलचा संपूर्ण दृष्टीकोनच पलटला आणि त्यानंतर त्यांनी कधीच आध्यात्मिक बाबतीत कुणाच्या सल्ल्याची, मार्गदर्शनाची अपेक्षा ठेवली नाही; पण मोक्षाचा त्यांचा शोध मात्र सुरूच राहिला.



J. Krishamurti
यु.जी. कृष्णमूर्ती हे भारतातील थिऑसॉफिकल सोसायटीचे अध्यक्ष बनलेल्या जिनराजदास यांचे सहायक म्हणून काम करू लागले. यादरम्यानच त्यांनी मद्रास विद्यापीठात मानसशास्त्र, तत्वज्ञान आणि गूढवाद हे विषय घेऊन पदवीचे शिक्षण सुरू केले; ते त्यांनी पूर्ण केले नाही. थिऑसॉफिकल सोसायटी ही वंश, वर्ण, जात यांचा भेदभाव न करता विश्वबंधुत्वाचे माहेरघर उभे करणे -  धर्म, तत्वज्ञान आणि विज्ञान यांच्या तुलनात्मक अभ्यासाला प्रोत्साहन देणे -निसर्गाच्या अदभुत नियमांचा आणि माणसातील सुप्त शक्तीचा तलास घेणे या उद्देशाने १८७५ मध्ये न्यूयॉर्कमध्ये अस्तित्वात आलेली आणि नंतर अड्यार, चेन्नईमध्ये मुख्यालय स्थापन झालेली सोसायटी. युजींची आध्यात्मिक क्षेत्रातील तोपर्यंतची पार्श्वभूमी, थिऑसॉफिकल सोसायटीतील नोकरी आणि त्यांना उपजत मिळालेली वक्तृत्वाची देणगी यांतून यु.जी. थिऑसॉफिकल सोसायटीचे व्याख्याते म्हणून पुढे आले. या काळात भारतातील आघाडीच्या जवळपास प्रत्येक महाविद्यालयांत थिऑसॉफीवर व्याख्याने दिली. युजींनी पुढे सोसायटीच्या वतीने आंतरराष्ट्रीय व्याख्यान मोहीमेत नॉर्वे, बेल्जियम, जर्मनी आणि अमेरिकेला भेटी दिल्या. या व्याख्यान मोहिमेपूर्वीच युजींचा कुसूमकुमारी या नावाच्या तरूणीशी विवाहदेखील झाला. यु.जी कृष्णमूर्तींचा हा प्रवास सुरू असतानाच जे. कृष्णमूर्ती हे एप्रिल १९११मध्ये इंग्लंडला जाऊन तिथे पाश्चिमात्य जग, रितीरिवाज, भाषा, तत्वज्ञान आणि त्यांची "मैत्रेय" बनण्याची साधना करीत असतानाच थिऑसॉफिकल सोसायटीचे व्याख्याते म्हणूनही पुढे आले होते. स्वत:च्या आध्यात्मिक साधनेत निराश झालेले, सर्व प्रकारचे गुरू आणि साधनेबद्दल निराश झालेले युजी थिऑसॉफीशी जुळवून घेतात आणि त्या तत्वज्ञानाचा व्याख्याता का होतात? हा प्रश्न आहे. युजींनीच एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे उपजिवीका चालविण्यासाठी तोच एक लाभदायक मार्ग होता. पण थिऑसॉफीकल सोसायटीचा व्याख्याता म्हणून काम करीत असताना सातव्या वर्षी थिऑसॉफीबद्दल त्यांच्या मनात तिटकारा निर्माण झाला. (थिऑसॉफीकल सोसायटीच्या सदस्यांची बैठक होत असे तेव्हा एकमेकांची ओळख करून घेताना लोक म्हणत- "नमस्कार, मी अमुक-तमुक, मी पूर्वीच्या जन्मात इंग्लडची राणी होते, मी राजा अशोक होतो")
    सन १९४७ ते ५३ या कालखंडात यु.जी. कृष्णमूर्ती जे. कृष्णमूर्तींच्या व्याख्यानांत उपस्थित राहात होते; जेकेंचे तत्वज्ञान पटत नसले, ते तत्वज्ञान स्वत:च्या अनुभवाच्या कसोटीवर खरे उतरत नसले तरी. जेकेंसोबत त्यांच्या सतत चर्चेच्या फैरी झडत होत्या. सरतेशेवटी इथेही युजींची जेकेंशी असहमती झाली - तो किस्सा युजींच्याच भाषेत पाहाण्यासारखा आहे -
"होता होता, शेवटी मी आग्रह धरलाच, "खरे सांगा तुम्ही माझ्यावर फेकीत असलेल्या या आध्यात्मिक गुंत्यामागे खरोखर काही आहे का?" 
आणि तो पोट्टा म्हणाला "तु स्वत:होऊन हा गुंता समजून घेण्याचा तुझ्याकडे कोणताच मार्ग नाही"
संपलच! आमच नात तिथेच संपलं - "मला स्वत:होऊन ते जर समजून घेण्याचा मार्ग नसेल, तुमच्याकडे जर देण्याचा मार्ग नसेल, तर मग आपण ही झक नेमकी कशासाठी मारतोय?" मी यात सात वर्षे मातीत घातलीत. रामराम, तुम्हाला पुन्हा भेटण्याचीदेखील माझी इच्छा नाही. यानंतर मी तिथून चालता झालो.
    जेकेंसोबत असा काडीमोड झाल्यानंतर, युजींनी त्यांची थिऑसॉफिकल सोसायटीची व्याख्याने चालूच ठेवली.  इथेच त्यांना स्वत:तील गूढ शक्तींची सतत जाणीव होऊ लागली होती अशा नोंदी आहेत. या काळापर्यंत युजींना एक मुलगा आणि दोन मुली अशी तीन अपत्ये झाली होती. त्यापैकी सर्वात मोठ्या वसंत या मुलाला पोलीओसदृश्य आजार झाला होता. जे. कृष्णमूर्तींनी असा विश्वास होता की त्यांनी मसाज केल्यास मुलाचे पाय बरे होतील; त्यांनी मोजक्याच वेळा पण दुर्धर आजार झालेल्या रूग्णांना हिलींग करून बरे केले आहे असा समज होता; पण युजींना ते पटत नव्हते. शेवटी युजींच्या पत्नीच्या आग्रहामुळे जेके त्या मुलावर मसाजमधून हिलींगचे प्रयोग करू लागले. त्याने काही फरक पडला नाही; युजींच्या मुलाची परिस्थिती बिघडत चालली होती. शेवटी युजींनी पुढील उपचारासाठी अमेरिकेचा रस्ता पकडला आणि मुलावर उपचार करण्यासाठी गेलेले श्री आणि सौ. युजी पाच वर्षे अमेरिकेत राहिले. वर्षाभरात मुलगा पायावर उभा राहिल अशी डॉक्टरांनी खात्री दिली होती. युजींनी सोबत घेतलेला पैसा फक्त मुलाच्या उपचारांसाठीच पुरेल एवढा होता. पुढे वर्ष उलटले तसा तोही संपू लागला आणि पैसा कमावणे आवश्यक बनले. काय करायचे? व्याख्यान. ते व्याख्यान देऊ शकत होते. अमेरिकेतील व्याख्याने भारतातील व्याख्यानांसारखी फुकट नसणार होती. एका व्याख्यानाला शंभर डॉलर मिळू शकत होते.  युजींनी व्याख्याने द्यायला सुरूवात केली; पुढे त्यासाठी एक व्यवस्थापिकाही नेमली.
    वैद्यकिय उपचार होत गेले तशी वसंत या त्यांच्या मुलाच्या पायात बरीच सुधारणा दिसू लागली. तो कुबड्या न वापरता उभा राहून, एक पाय घासत का होईना पण चालू लागला. युजी या काळात उभ्या-आडव्या अमेरिकेत व्याख्यानांसाठी फिरत होते. कौटुंबिक आयुष्यात युजी हे वाईट पिता किंवा पती नसले आणि झक्कीपणा व दुसर्‍या बाजूला सुरू असलेला त्यांचा आध्यात्मिक शोध जमेस धरूनही सर्वकाही व्यवस्थित होते. पत्नीशी वाद होत असत ते फक्त पैसा या गोष्टीवरून - कारण युजी पैशाच्या बाबतीत बेफिकीर बंदा होते. त्यांनी पहिल्या वर्षात साठ व्याख्याने दिली आणि दुसर्‍या वर्षाच्या अखेरीस त्या व्याख्यानाच्या धंद्याबद्दल त्यांना तिटकारा निर्माण झाला. व्याख्यानांच्या काळातील दोन उदाहरणे उल्लेखनीय आहेत. मिनींग अ‍ॅण्ड मिस्टरी ऑफ पेन या शीर्षकाचे व्याख्यान देऊन झाल्यानंतर खुद्द युजींनाच गालफुगीचा विकार उद्भवला. त्यामुळे होणारी गैरसोय आणि वेदना असाह्य असल्या तरी त्यांनी डॉक्टरांना भेटायला नकार दिला. कितीही काही झाले तरी वेदनेची रचना जाणून घेण्याचे औत्सुक्य असल्याने आणि नुकतेच त्याच विषयावर व्याख्यान दिल्याने स्वत:ला होत असलेल्या वेदनांवरच ते प्रयोग करू लागले आणि त्यात आत-आत शिरू लागले. शेवटी वेदना वाढत गेल्या आणि शुद्ध हरपली. त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले; पण त्यांच्यावर नेमके काय उपचार आवश्यक आहेत हे डॉक्टरांना ठरवता येईना - कारण शरीर थंड पडत चालले होते आणि ते मृत्यूच्या उंबरठ्यावर आहेत असे दिसत होते. अर्धा तास उलटला. अचानक त्यांना शुध्द आली आणि वेदना नाहीशा झाल्या होत्या. शरीराने स्वत:च स्वत:वर उपचार केले होते.
    यानंतर त्यांची व्याख्यानांतील रूचि निघून गेली आणि कमाईचा दुसरा एखादा मार्ग मिळतो काय याचा ते शोध घेऊ लागले. हे पाहुन इर्मा नावाच्या त्यांच्या व्यवस्थापिकेला झीटच यायची बाकी होती. कारण आतापर्यंत व्याख्यानांमुळे युजी एक महत्वाची असामी बनले होते आणि व्याख्यानांची चहुकडून मागणी होत होती; व्याख्यान दिल्यावर बरेच पैसे मिळत होते. पण युजींनी नकार दिला. अचानक, त्यांना काम करण्याची इच्छा राहिली नव्हती.    


(थोडक्यात पार्श्वभूमी म्हणताम्हणता बरंच लांबत चाललंय आणि मुख्य विषय बाजूला पडलाय, पण ही पार्श्वभूमी आवश्यक आहे असे वाटते. युजींचं त्रोटक "चरित्र" रेखाटून पुढे जाणार होतो. पुढच्या भागात हे लवकर आवरून असली पिक्चर सुरू होईल! )


संदर्भ: इंग्लिश विकीपिडीया, युजी रीडर - संकलन मुकूंद राव, ए टेस्ट ऑफ डेथ- महेश भट, युट्यूबवरील युजींच्या क्लिप्स, युजी कृष्णमूर्ती डॉट ऑर्ग, आणि अर्थातच माझी समज ;-)

६ सप्टेंबर, २०१०

वाचा आणि शोधा

१. तुम्ही तुमचं शरीर सोडून कधीच कुठंही जाऊ शकत नाही.
२. तुम्हाला वाटते की तुम्ही हुशार आहात, नो!!!! सर्व माणसे मानसिकदृष्ट्या महामूर्ख असतात, येस!!! पण प्रत्येकाचे शरीर हुशार असते. ती एक वेगळी संस्था आहे (इथे वैद्यकिय दृष्टीकोणातून पाहू नये) पुढच्या वेळी नखे वाढतील तेव्हा नजर ठेवा. तुम्ही कधीच सरळ उठून नखे काढायला सुरूवात करीत नाही. आधी हात तुमच्या डोळ्यांसमोर येतो, तुम्हाला नखे वाढल्याचे दिसून येते (हा अक्षरश: शरीराच्या विशिष्ट भागाने दिलेला सिग्नल असतो) आणि मग नखे काढण्याचा विचार करता.
३. मोठ्ठा आवाज होतो तेव्हा, शरीर एकदम दचकते. हा शरीराने तुमच्या यंत्रणेला दूर होण्यासाठी दिलेला सिग्नल असतो.
४. मानसिक शांती, ध्यानातून येणारी शांती ही आजकालची लोकप्रिय टूम आहे. शरीराला असले काहीही नको असते कारण ते मुळातच अतिशांत असते. तुम्ही मानसिकदृष्ट्या अशांत असाल, आणि ती अशांतता शरीरातून वाहू देत असाल. पण त्याच वेळी तुमचे शरीर नेहमी एवढेच शांत, स्थिर असते.
५. शरीराला फक्त दोनच गोष्टीत स्वारस्य असते: टिकून राहाणे आणि प्रजोत्पादन.
६. विचार करण्याची प्रक्रिया ही जात्यासारखी असते - कुठलाच विचार सर्वकाळ टिकत नाही, विचारांचे पीठ सतत मात्र पडत राहाते.
७. आजपर्यंत कुणीही मूलत: ओरिजीनल म्हणता येईल असा विचार केलेला नाही, नकला मात्र सर्व करीत असतात. विचार हा नेहमी विचाराबद्दलचा असतो.
८. विचारातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग अस्तित्वात नाही. मग कुणी काहीही म्हटलेले असो.
९. बाल्यावस्थेचा काळ वगळता तुम्ही कधीच काहीही पाहात नाही; तुमच्याकडे असलेली कल्पनाच तुम्ही पाहात असता.
१०. लहान मुले ही अत्यंत जीवंत ऊर्जा असते. ती पृथ्वीवर जन्माला आलेला सर्वात नवीनतम माणसे असतात. ती जुन्या माणसांच्या संगतीत राहून त्यांचे वेगळे विशेष असे काहीही न करता जुन्या माणसांसारखीच होतात. कोणताही शिक्षक, गुरू शिकवू शकणार नाही एवढे त्यांच्याकडून शिकता येते. फक्त तुमचे कचराछाप (मग ते तुम्हाला कितीही महत्वाचे, अगत्याचे वाटोत ) विचार त्यांच्यात ओतण्याची घाई करू नये. त्यांना आजूबाजूची व्हॅल्यू सिस्टीम आणि स्पर्धा यात राहायचे असल्याने, त्यातच जगायचे असल्याने समाज, आई-वडील, शिक्षक या सर्वांनी टाकलेला कचरा वाहात राहावे लागते. लहान मुले जळता निखाराही सहज हातात घेतात - ते शिकत आहेत. लहान मुलांना साप कधीही चावत नाही, त्यांच्यात अजून वैरभावनाच तयार झालेली नसते. सापासारखे प्राणी तुमच्या मनातील वैरभावना झटक्यात ओळखतात आणि तुमच्यापासून दूर जाण्याचा उपाय नसेल तर आणि तरच चावा घेऊन दूर पळतात.
११. तुम्ही कधीही, कोणत्याही मार्गाने स्वत:चे शरीर परिपूर्णपणे अनुभवू शकत नाही - त्यासाठी दुसरे शरीर हवे असते.
पाश्वभूमी: युजी कृष्णमूर्ती यांच्याशी लोकांनी केलेली चर्चा.

४ सप्टेंबर, २०१०

विचार

विचार जागा झाला आणि मेंदूच्या या कप्प्यातून त्या कप्प्यात फिरू लागला; हे उचकलं; ते उचकलं. पण त्याला काही करमेना मग थोडंस डोकं खाजवलं. मेंदूत तो एकटाच होता. बोर झाला होता. कुणीतरी हवं होतं. मग त्यानं दुसरा एक मेंदू शेजारून जाताना पाहिला. त्यात त्याला दुसरा, त्याच्यापेक्षा वेगळा विचार दिसला. मग त्यानं त्याला हाक दिली. दोघांचं काही बोलणं झालं आणि अचानक ते दोन्ही विचार हमरी-तुमरीवर उतरू लागले. मग त्यापैकी कोणतातरी एक विचार म्हणाला, "अरे? आपले विचार जुळत नाहीत वाटते, असे नको व्हायला"
मग दुसरा म्हणाला, "ए बाबा, मला एक वेगळा विचार म्हणून जगायचं आहे - तुझ्यासोबत जुळलो तर खलास होईल ना मी?"
मग पहिला विचार म्हणे, "छे! असं काही नसतं, दुसर्‍या अनेक विचारांचं माझ्याशी खूप जुळतं; तरी ते शिल्लक राहातात. तु म्हणतोस ते काही खरं नाही."
मग दुसरा विचार म्हणे, "असं आहे काय? मग असं कर, तु माझ्याशी जुळून दाखव"
मग तो पहिला विचार त्या दुसर्‍या विचाराशी जुळू लागला. ते दोन्ही एक झाले; आणि दोन्हीही नष्ट झाले. पण ते दोन्ही विचार जुळून मरण्यापूर्वी त्यांची असंख्य अपत्ये जन्माला आली होती - ती अजूनही हमरी-तुमरीवर उतरतात. कधी जुळतात आणि मरतात. कधी अनमॅरीड राहून वेगळी जगतात. या अनमॅरीड विचारांना मात्र काही अपत्ये होत नाहीत - ज्या मेंदूत ते राहातात तो निकामी होईपर्यंतच असले विचार जगतात.

२ सप्टेंबर, २०१०

माझा दोस्त युजिनी

यूजिनी आणि माझी सर्वात पहिली भेट कुठं झाली हे मला आता आठवत नाही. ते तेवढं महत्वाचंही नाही. पण ह्या माणसात काहीतरी वेगळं, काहीतरी ठोस, काहीतरी चमकणारं आहे - ते आमच्या मित्रांच्या ग्रुपलाच काय पण त्याला एकदाच रस्त्यावरुन चालता-चालता ओझरतं पाहाणार्‍यालाही जाणवून जातं. ते काय आहे ते मात्र अजून कुणाला नक्की सांगता आलेलं नाहीय. म्हटला तर तो तसा हॅंडसम कॅटॅगिरीत मोडतो. पण त्याच्यापेक्षाही दिसायला गोरेगोमटे, जिम-फिम मारल्यानं चारचौघात उठून दिसणारे, महिन्यातून तीन-तीन,चार-चार नव्या पोरींना पाठीवर घेऊन गाड्या उडवणारे बहाद्दर आमच्या ग्रुपमध्ये आहेत. सुंदर पोरी-बिरी याच्याही अवती-भवती असतात; पण ते वेगळ्या कारणामुळं. पोरी त्याच्याभोवती अधून-मधून जमणार्‍या गर्दीचा एक भाग असतात. अशा थोडक्या वेळी पियक्कड लोकांच्या मैफिलीत मोकळ्या ढाकळ्या वातावरणात जशा गप्पा चालू असतात तसे वातावरण त्याच्या अवतीभवती असते. लोक न पीता ही धुंद झालेले असतात. बंगलोरपासून मर्सिडिझमध्ये बसून त्याच्याकडं नेहमी एक बाई येत असे. चांगली दिसायची, बोलायला पण मोकळी-ढाकळी होती. ती युजिनीसोबत जरा जास्तच जवळ गेलेली दिसायची. युजिनीच्या बंगल्यातील प्रशस्त लॉनवर विखरून विखरून टाकलेल्या खुर्च्यांत जवळ बसलो असताना एका रात्री धीर करून त्या बाईंना मी सहज विचारतोय असं भासवत एकदा विचारलं होतं -
व्हाट मेक्स यु व्हिजीट धीस मॅन सो फ्रिक्वेंट्ली?
ती हसर्‍या चेहेर्‍याची, चेहेर्‍यावरून सतत मलमली हसू खेळवत राहाणारी बाई बेधडक म्हणाली,
ओह! टू बी व्हेरी फ्रॅंक, ही नीड नॉट टू टेक मी टू बेड फॉर ऑरगॅजम; आय फील इट इन एअर अराऊंड हिम! आणि तिनं माझ्या डोक्यावर एक टप्पल मारली.
न विचारलेल्या प्रश्नाला उत्तर न देऊनही तिनं माझी विकेट घेतली होती.
"देन व्हाय डोंट यू स्टे विथ हिम फॉरेव्हर...मे बी मॅरी हिम??"
दोन्ही हातांच्या मुठी बांधून खांद्याकडे खेचत, लगेच झटका मारून दोन्ही हात हवेत पसरत ती म्हणाली,
आय वॉंट टू डिअर, बट ही सेज ही डोंट नीड एनिवन स्टेअर अ‍ॅट हिम नाऊ अ‍ॅण्ड देन... सो आय हॅव टू कम हिअर फ्रिक्वेंट्ली... आणि चेहेर्‍यावरून खळखळून हसू ओघळले...
नो, नो, बट धीस इज नॉट आय वॉटेड यू टू आन्सर..मला नेमकं काय विचारावं ते कळत नव्हतं; मी लॉनवर जमलेल्या गर्दीकडे हताशपणे नजर टाकली - कुणीतरी बटाटा कलरचा अमेरिकन माणूस युजिनीसमोरच्या गर्दीत बसून गिटारवर गाणं म्हणत होता
ती तिकडे पाहात अचानक म्हणाली -  
ही इज स्पेशल अ‍ॅण्ड एव्हरीबडी अराऊंड हिम बिकम्स स्पेशल व्हेन दे आर विथ हिम...दे आर नॉट सो व्हेन दे आर अलोन इन देअर वेल्दी सर्कल्स...
असा हा अवलिया माणूस मला दोस्त म्हणून लाभला होता. घरचा गर्भश्रीमंत नसला तरी, तो एखाद्या स्थलांतरप्रिय पक्ष्यासारखा प्रत्येक ऋतूत स्वत:च्या खर्चानं पृथ्वीगोलावर पसरलेल्या वेग-वेगळ्या देशात फिरू शकत असे. तिथल्या शहरांमध्ये त्याचे थोडके, पण "तो येतोय" कळलं की त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसणारे, त्याच्यासोबत कुठेही फिरायला तयार असणारे दोस्त होते. मला त्याला अवधूत म्हणावं वाटे. तो गर्दी खेचणारी असामी असला तरी आमच्या लंगोटीयार दोस्त कंपनीतला कुणीही त्याच्या खांद्यावर थाप मारू शकत असे. नाती एवढी मोकळी असली तरी त्याच्याबाबत कोणतंच अंतिम विधान करता येणार नाही.  आमच्या शहराशेजारच्या डोंगर उतारावर असलेल्या त्याच्या बंगल्यात तो वर्षातले दोन-तीन महिने राहायला येत असे. असाच तो यावर्षीही आला होता. आला होता की जावून आला होता, तो इथे राहात होता की विदेशात राहात होता हे सांगता येत नाही. कारण हा पक्षी कुठेलंच घरटं जास्त काळ वापरायचा नाही. सारखा फिरत राहायचा. यावेळी मात्र  तो आमच्या लंगोटीयार कंपनीसोबत बराच काळ राहिला. दुसरे जास्त कुणी आले नव्हते.
असेच एकदा दुपारी साडेतीन-चार वाजता त्याच्या बंगल्याच्या लॉनवर बसलो होतो. त्याच्या सोबत असताना आपण काहीही बोललो, तरी ते थेट त्याला उद्देशून नसेल तर तो बिलकूल प्रतिसाद देत नाही - तसा तो आताही आपण होऊन बोलत नव्हता आणि आम्ही सर्वजण तो काय म्हणतो याची वाट पाहात होतो. कारण तो जेव्हा बोलतो तेव्हा ते भयंकरच असते. एकदा त्याला त्याच्या तोंडावरच मी चिडून म्हणालो होतो, "तू मूर्ख आहेस!"
"इट इज नो मोअर अ न्यूज. टेल समथिंग न्यू, इफ यू हॅव!" माझ्याकडे न बघता तो शांतपणे उत्तरला. हे वाक्य पूर्ण झाल्यावर त्याच्या डोळ्यांचा फोकस क्षण-दोन क्षणांसाठी माझ्या डोळ्यांवर स्थिरावला. एखाद्या सिंहाच्या पिंजर्‍यात उतरून त्याच्यासमोर तावातावाने, "तु एक बंदिस्त जनावर आहेस"  असे मोठ्ठ्याने ओरडावे आणि त्यानं भयानक गर्जना करून त्याचे ते दोन हिरवट डोळे आपल्यावर रोखावेत तसं मला जाणवून गेलं.
"म्हणजे, अगदी अस्संच काही म्हणायचं नाही मला..सॉरी!" घशात आलेला आवंढा गिळत मी म्हणालो.
"सॉरी? उलट मीच तुझा आभारी आहे, तु माझ्या हिताचंच विधान केलंस तुझ्या दृष्टीनं, पण ते माझ्या कक्षेत आलं तेव्हा गैरलागू झालं - तु कस्संही, काहीही म्हण, ते मला कसलीच इजा करू शकत नाही..करूनच घ्यायचाच असेल, तर त्यात माझा फायदा आहे!”
या अशाच चक्रावून टाकणार्‍या त्याच्या बोलण्यामुळं त्याला सतत भेटत राहावं, त्याला मुद्दाम डिवचावं आणि त्याची मुक्ताफळं ऐकावीत असं आमच्या सगळ्या भिडूंना वाटत राहातं. तो आमच्यासोबतच असा वागतो असं नाही, आयुष्यात कधीच न पाहिलेल्या माणसाला सुध्दा तो याच स्टाईलमध्ये बोलतो. एकदा मॉलमध्ये मॅनेजर असलेल्या आमच्या एका दोस्ताकडं तो आणि मी गेलो होतो. चहा पाजवायला म्हणून तो मित्र आम्हाला घेऊन "एक्झिट" असे लिहीलेल्या गेटमधून बाहेर पडला. गेटवर असलेल्या सिक्युरिटीवाल्यानं मॉलच्या युनिफॉर्ममध्ये असलेल्या आमच्या मॅनेजर मित्राची तलाशी घेतली. तसा नियम असेल त्यांचा.
"तु पृथ्वीवरचा सर्वात मोठा बिनविश्वासू माणूस आहेस - हेच काम करीत राहिलास अजून काही दिवस, तर बायकोची पण तलाशी घेशील झोपण्यापूर्वी" हा कडाडला.
तो फुकट पोलीसगिरीवाला सेक्युरिटी भूत पाहावं तसं त्याच्याकडं पाहात होता. काहीच बोलला नाही. मग न राहावून मी माझी अक्कल पाजळलीच -
"तु पण ना, त्याचा काय दोष आहे रे? त्याला जो नियम सांगितलाय तो पाळतोय तो"  मी.
"आणि मी काय करतोय मग?"’ तो.
"काय करतोयस म्हणजे?" मी.
"मी पण नियमच पाळतोय, पण मला ते कुणी सांगितलेले नाहीत" तो.
"कसला नियम?"
"कॉलींग ए स्पेड, स्पेड!"
सांगत बसायचं म्हटले तर त्याचे अनेक किस्से आहेत. एकदा आम्ही असेच नेहमीसारखे त्याच्या आवडत्या वामा इंटरनॅशनल मध्ये बसलो (!) होतो. हे हॉटेल त्याला नुसतंच आवडतं. म्हणजे तो तिथं खातही नाही पीतही नाही.  मला आवडू शकणारे आणि मी त्यांना आवडू शकेल असे लोक कुठेही असू शकतात त्यामुळे त्याचा वावर सगळीकडेच असे. शहराशेजारच्या अ‍ॅसिलममध्येही तो आला की दोन-चार वेळा जाऊन येत असे. तर सांगत काय होतो की आम्ही वामा इंटरनॅशनलमध्ये बसलो होतो. आजूबाजूच्या टेबलवर दबक्या आवाजातील गोष्टींसोबत ग्लास किणकिणत होते. भींतींवर विश्वामित्राच्या तपोभंगाचे दृश्य दाखणार्‍या पेंटींगवर एवढा झिरझिरीत मंद उजेड कुठून पडलाय हे मी शोधून काढायचा प्रयत्न करीत होतो आणि हुडहुडी सुटेल एवढे थंड वाटत असल्याने माझ्या अंगातले जर्किन जास्तच घट्ट करून घेत होतो. शेजारच्या टेबलावरचे युजिनी गॅंगशी आहे नाही म्हणावी अशी पुसटशी ओळख असणारे काही भिडूही रंगात आले होते. त्यांचं आवरत आलं होतं वाटतं, उठायच्या तयारीत होते. त्यातला एकजण यूजिनीकडे हात दाखवत वेटरला म्हणाला,
"आज टिप त्या साहेबांकडून घ्यायची"
युजिनीनं ते ऐकलं आणि वेटरला म्हणाला,
"तुझं नाव कधी छापून आलंय का पेपरमध्ये?"
"पेपरमध्ये नाव? नाही ब्वॉ..का?"
"उद्या येणार आहे मग, तु आज टीप द्यायची मला...लगेच उद्या सकाळच्या पेपरमध्ये बातमी "वेटरने दिली गिर्‍हाईकाला टीप"....नाहीतरी त्या मूर्ख पेपरवाल्यांना काही धंदा नसतो... बघ...चान्स घालवू नको.."
वेटरला काही कळलं नाही. तो बावळट चेहरा करून तिथेच उभा राहिला.
आमच्या शेजारच्या टेबलवरची गॅंग पेटली.
"रघू, आम्ही तुझ्या नेहमीच्या टीप पेक्षा हजार रूपये जास्त देतो,  दे म्हणे तु त्यांना टीप..बघुतच..." असं म्हणून त्या लोकांनी खिशातून पैसे काढून रघूच्या हातात कोंबले. वेटर रघू भांबावला. तो मान खाली घालून चेहरा आणखी बावळट करून,  गालातल्या गालात हसू लागला.
ती लोकं आरडा-ओरडा करू लागली.. "रघ्या, दे त्यांच्या हातात..बघू म्हणे खरंच "
"अरे दे की, त्यांनी दिलेच आहेत..तुला फक्त माझ्या हातावर ठेवायचे आहेत....तुझी टीपपण मिळतेय" असं म्हणून युजिनीनं हात पुढे केला.
त्या गॅंगचा आरडा-ओरडा ऐकून लोकांच्या नजरा आमच्या टेबलाकडे रोखल्या गेल्या आणि बारमधला तो नेहमीचा मंद आवाजात चालणारा गोंगाट अचानक शांत झाला.
रघ्याला काही कळेना. तो आणखीनच भांबावला. बारमधल्या एवढ्या सगळ्या लोकांनी त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच एकाच वेळी, एवढ्या उत्कंठेनं नजरा लावल्या होत्या. तो त्या क्षणाला त्या वामाच्या बारमधला सर्वात महत्वाचा माणूस बनला होता; घायबरून गेला होता.
"साहेब लोकांना कशी टीप द्यायची...नको...हे घ्या.. " चाचरत-चाचरत त्यांच्या तोंडातून शब्द फुटले आणि तो त्या गॅंगने दिलेले पैसे परत करू लागला. पण आता मामला बिघडला होता. समोरची गॅंग जास्तच पेटली होती; रघू वेटर चांगलाच अडकला होता.
"दे म्हणतो ना आम्ही, बघ बरं रघ्या, आयुष्यात पुन्हा कधी टीप मिळायची नाही आमच्याकडून.."
" ...... "
रघू आळीपाळीनं नुसताच गर्दीकडं आणि आमच्या दोन गॅंगकडं बघू लागला. युजिनीनं ते हेरलं आणि त्यांच्या टेबलावरची रिकामी झालेली स्कॉच उचलली
"ठिक आहे...पैसे नको देऊ, ही बाटली टीप म्हणून मला दे म्हणे..."
"न्है हो साहेब..माफ करा.." रघू पक्का होता.  ती उत्कंठीत झालेली गर्दी सोडून जाण्याच्या बेतात आला.
"रघूराम, तु जब मरेगा ना...गरीबी में मरेगा रे... लेकीन बहोत शांती से मरेगा तु...पाहा याच्याकडं - लोक पैसे मिळत नाहीत म्हणून गरिब राहात नाहीत...मनाची भुक्कड श्रीमंती आड येते...." युजिनीनं त्या दृश्याचा क्लोजिंग डायलॉग टाकला.
जाताना त्या गॅंगमधल्या प्रत्येकानं युजिनीसोबत शेकहॅंड केला. आमचं संपवून आम्हीही थोड्यावेळानं निघालो. रघुनंच सर्व्ह केलं. युजिनीनं काही घेतलं नव्हंत. त्यानं जाताना रघूच्या त्या जाड बिल-कम-टीप फाईलमध्ये स्वत:चे हजार रूपये सरकवले.

दुसर्‍या दिवशी त्या गॅंगमधले लोक आणि रघूही युजिनीच्या लॉनवरच्या लोकांमध्ये दिसत होते.

२१ ऑगस्ट, २०१०

शेरलॉक होम्सचे जग भाग ३ आणि ४

शेरलॉक होम्सचे जग भाग ३

शेरलॉक होम्सच्या कथा, मालिका जगात सगळीकडे उपलब्ध आहेत - कुणालाही त्या वाचता, पाहाता येऊ शकतात आणि त्यात रंगून जाता येते. शेरलॉक होम्सच्या समग्र कथांचा अनुवाद गजानन जहागिरदार यांनी केलेला आहे आणि जालावरच्या काही हौशी अनुवादकांनीही मस्त अनुवाद केले आहेत. ते इथे, इथे आणि या इथे आणि हे इथे एक वाचायला मिळतील. म्हणून मी शेरलॉक होम्सच्या कथा भाषांतरीत न करता शेरलॉक होम्सबद्दल, त्याच्या जगाबद्दल लिहू इच्छितो. हे रसग्रहण नाही हेही मागच्या पोस्टमध्ये सांगितले आहे. बर्‍याच मायबोलीकरांनी मागच्या पोस्टला दिलेल्या प्रतिसादात डिटेलमध्ये लिहीयला सांगितले आहे. हे लिखाण होम्सने निर्माण केलेल्या पूर्वसंचितामुळे सगळ्यांना आवडले आहे. काही चतुर वाचकांना शेरलॉकबद्दल लिहीताना मला किती अक्कल पाजळता येईल याची उत्सुकता लागुन राहिली आहे (मला स्वत:ला सुध्दा!!) पण माझी अक्कल मला दिसत नसल्यानं ती किती आहे आणि पाजळताना कितीवेळ जळेल, मध्येच संपली तर काय? याबद्दल काही चिंता करण्याचं कारण नाही. संपेल तेव्हा निश्चितच माझ्या अगोदर ते तुम्हाला कळेल ! शेरलॉक होम्स आणि त्याचे जग हे एका माणसाचे स्वप्न होते जे नंतरच्या बर्‍याच माणसांना पाहायला आवडते कारण ते सुंदर आहे. तो गूढ वाटणार्‍या प्रश्नाचे उत्तर शोधू शकतो कारण ते गूढ काल्पनिक आहे आणि ते गूढ नसून सत्यच असल्याचा भास उत्पन्न करणारी जबरदस्त शैली सर ए. सी. डॉयलकडे होती. जिज्ञासूंना शेरलॉक होम्सच्या जन्माची कथा खुद्द सर आर्थर कॉनन डॉयलच्या तोंडून इथे ऐकायला मिळेल. शेरलॉक होम्स च्या निर्मात्याला वास्तविक गूढे किती उकलता आली असती हेही एक गूढच आहे. मला आता नेमका संदर्भ आठवत नाही, पण लोकमान्य ते महात्मा या सदानंद मोरे यांच्या ग्रंथात इंडिया हाऊसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आपली क्रांतीकारक मंडळी रचत असलेल्या कटांचा (अर्थातच साहेबाच्या नजरेतून), इंडिया हाऊसपासून जवळच असलेल्या २२१बी, बेकर स्ट्रीटला पत्ता नव्हता असा एक टोला हाणलेला पुसटसा आठवतो (मराठी लंडनर्स, थ्रो लाईट प्लीज!) . इथे सदानंद मोरेंचा नेमका रेफरंस पॉईंट काय आहे हे ज्यांच्याकडे लोकमान्य ते महात्माचे खंड आहेत त्यांनी सांगावे. होम्सच्या कथांचा सूत्रधार असणारा डॉक्टर वॉटसन हे पात्र दुसरेतिसरे कुणी नसून स्वत: सर डॉयल हे आहेत. तेच खरा शेरलॉक होम्सदेखील आहेत. पण तसा त्यांनी दावा केला असता तर आफत झाली असती (खर्‍या क्लाएंट्सची रांग लागली असती दारासमोर) कारण होम्सची कथामालिका स्ट्रॅण्डमधून प्रकाशित होत असताना लंडनवासियांमध्ये प्रचंड खळबळ माजली होती. सर ए.सी. ना होम्स या पात्राच्या निर्मितीची प्रेरणा जोसेफ बेल या वैद्यकिय प्राध्यापकाकडून मिळाली जे त्यांच्या रूग्णांबद्दल फक्त त्यांच्याकडे पाहूनच त्यांच्या रोगाचे निदान करीत, त्याचे राष्ट्रीयत्व, व्यवसाय, पूर्वेतिहास सांगत.




शेरलॉक होम्सचे जग भाग ४
अगदी सर्व प्रकारे हास्यास्पद ठरायला तयार राहुन पुन्हा एकदा मी हा भाग लिहायला घेतो आहे. सर आर्थर यांनी केलेले आध्यात्मविषयक लिखाण मी अद्यापपर्यंत वाचलेले नाही. पण त्यांना कसले तरी सायकिक एक्स्पेरियन्सेस होते, त्यांनी त्याबद्दल लिखाण केले आहे, व्याख्याने दिली आहेत आणि त्यांच्या हयातीत जागतिक साहित्य वर्तुळात त्याबद्दल बरेच प्रवाद निर्माण झाले असल्याचे जिज्ञासू वाचकांनी खुद्द त्यांच्याच तोंडून मी दुवा दिलेल्या यूट्‍यूबवरील चित्रफितीत ऐकले असेल. यासंदर्भात सर आर्थरचे लिखाण वाचले असेल त्या वाचकांनी कृपया प्रकाश टाकावा. ए स्टडी इन स्कार्लेट हे समग्र शेरलॉक होम्समधील प्रकरण वाचत असताना मी हा भाग लिहायला घेतला आहे. शेरलॉक होम्स आणि वॉटसन या व्यक्तीरेखा सर आर्थरच्याच सावल्या आहेत, त्या दंतकथा आहेत, त्यांचा चाहता वर्ग आहे - आणि या व्यक्तीरेखा या चाहत्यांसाठी खर्‍या आहेत. एकूणच शेरलॉक-वॉटसन-डॉयल आणि त्यांचे जग यातून तयार झालेल्या रसायनात सत्य आणि काल्पनिकता यांचा बेमालूम मिलाफ आहे, तो झिंग आणतो. मी सर डॉयलच्या या जगाकडे पाहात असताना ते एका कॅलिडोस्कोपचे रूप घेते - या कॅलिडोस्कोपचा केंद्रबिंदू कधी सर डॉयल असतात, कधी होम्स तर कधी वॉटसन. 
लंडन विद्यापीठातून एम.डी.ची पदवी घेतलेल्या डॉक्टर वॉटसनला सहायक सर्जन म्हणून भारतात असलेल्या रेजिमेंटमध्ये रूजू होण्यासाठी मुंबईत पाठविण्यात येते. त्याच्या रेजीमेंटने तो भारतात येण्यापूर्वीच युध्दग्रस्त अफगाणिस्तानात म्हणजे कंदाहारला कूच केलेले असते. मैवंदच्या तुंबळ लढाईत त्याच्या खांद्यात गोळी घुसल्याने तो सैन्याच्या कामी बेकार ठरतो, त्याला पेशावरच्या इस्पितळात काहीकाळ ठेवून त्याचे आरोग्य न सुधारल्याने सैनिकी मेडिकल बोर्ड डॉक्टर वॉटसनला त्याच्या आरोग्यात सुधारणा करून घेण्यासाठी लंडन पाठवते. आडव्या-तिडव्या पसरलेल्या इंग्लंडमध्ये कुणीही त्याचा नातेवाईक नाही - खिशात अकरा शिलींग आणि सहा पेन्स ही दिवसाकाठीची कमाई  आणि खांद्यात जेझाईल बुलेटच्या वेदना यांच्यासोबत तो लंडनच्या रस्त्यांवरून निरर्थक भटकतोय - आणि सध्या त्याचा मुक्काम स्ट्रॅण्ड भागातील हॉटेलात आहे. पैसे संपत असल्याचे जाणवताच तो कमी खर्चिक भागात मुक्काम हलविण्याच्या तयारीत आहे किंवा त्याला हॉटेल सोडून स्वत:ची जागा शोधावी लागणार आहे.
लंडनमध्ये असाच निरर्थक हिंडत असताना स्टॅम्फर्ड नावाचा कुणीतरी जुना परिचित त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. लंडनच्या त्या अफाट, अनोळखी गर्दीत या स्टॅम्फर्डच्या तोंडावरील हसू डॉ. वॉटसनला सुखावून जाते. डॉ. वॉटसन बार्टसमध्ये शिकत असताना हा स्टॅम्फर्ड त्याच्या हाताखाली ड्रेसर असतो; तो काही त्याचा जीवाभावाचा दोस्त नसतो पण वॉटसनची जखमी मन:स्थिती स्टॅम्फर्डला मिठीच मारायला भाग पाडते - स्टॅम्फर्डलाही आनंद होतो. खुशीखुशी में वॉटसन साहेब उनके इस पुराने आदमी को खानेपर चलने की दावत देते है आणि बग्गीतून ते हॉटेलच्या दिशेने निघतात.
डॉ. वॉटसनची हालहवाल विचारताना स्टॅम्फर्डला कळते की त्याला राहायला स्वस्तातल्या जागेची गरज आहे. स्टॅम्फर्डला दिवसभरात घडलेल्या योगायोगाचे आश्चर्य वाटते कारण त्याचे आणखी दुसर्‍या माणसासोबत सुध्दा स्वस्तातल्या राहाण्याच्या जागेबद्दलच बोलणे झालेले असते. वॉटसन स्टॅम्फर्डला एकदम उसळून या दुसर्‍या माणसाबद्दल विचारतो. तो माणूस इस्पितळातील रासायनिक प्रयोगशाळेत कामात गुंतलेला आहे आणि सुंदर अशा खोल्यांचा सूट मिळूनही एकट्याला भाडे परवडत नसल्याने त्या घेता येत नसल्याबद्दल आज सकाळीच त्याने स्टॅम्फर्डसमोर नाराजी व्यक्त केलेली असते.
हे ऐकून डॉक्टर वॉटसन स्टॅम्फर्डला सांगतो की खरच त्या माणसाला सूट मध्ये कुणी पार्टनर हवा असेल, तर त्यासाठी वॉटसनच योग्य माणूस आहे. एकाकी राहाण्यापेक्षा त्याला एखाद्या पार्टनर सोबत राहाणे मस्त वाटते.
वाईनचा चषक ओठाला लावलेला असताना त्यातून विचित्रपणे डॉक्टर वॉटसनकडे पाहात स्टॅम्फर्ड उद्गारतो "तु अजून शेरलॉक होम्सला ओळखत नाहीस, ओळखत असतास तर कदाचित तो पार्टनर म्हणून तुला तो नको असता"
वॉटसनला काहीतरी भानगड असल्याचा वास येतो आणि स्टॅम्फर्डला तो तसे विचारतो. शेरलॉक होम्सबद्दल काही भानगड नाही, मी तसे म्हणालो नाही, पण तो विचित्र माणूस आहे - त्याला विज्ञानाच्या विशिष्ट शाखेत भलती उत्सुकता असल्याचे, आणि एवढे वगळता त्याची बाकी इतर काही भानगड नसल्याचे स्टॅम्फर्ड सांगतो. मग तो काय वैद्यकशास्त्राचा विद्यार्थी आहे का ही डॉक्टर वॉटसनची पुन्हा एकदा पृच्छा. नाही, मला काहीच माहित नाही त्याचा नेमका इंट्रेस्ट काय आहे तो पण तो शरीररचना शास्त्रात निष्णात आहे तो प्रथम श्रेणीचा केमिस्ट आहे हे मी विश्वासपूर्वक सांगू शकतो, पण तो कोणत्याही औपचारिक वर्गाला बसत नाही. त्याचा अभ्यासविषय भलता विस्कळीत आणि जगावेगळा असल्याचे, त्याच्या जगावेगळ्या ज्ञानामुळे प्रोफेसरमंडळीही अचंबित होतात असे स्टॅम्फर्ड वॉटसनला सांगतो.  तो नेमकी काय झक मारतोय हे तु त्याला कधीच विचारले नाहीस का हा वॉटसनचा पुढचा प्रश्न. नाही, तो नेमके काय आणि कशासाठी करतोय हे त्याच्या तोंडून वदवून घेणे सोपे नाही, पण तो चुकून-हुकून त्याच्या विचित्रपणाच्या झटक्याच्या अमलाखाली असेल तरच त्याबद्दल बडबडू शकतो असे स्टॅम्फर्डचे उत्तर.
मला या माणसाला भेटायला आवडेल, मला असाच अभ्यासू आणि झक्की माणूस पार्टनर म्हणून आवडेल कारण मला सतत बकबक करणारा आणि अतिउत्साही साथीदार नकोय, मी अफगाणिस्तानात अशाच वातावरणात राहून आलोय, माझी आणि शेरलॉकची कशी भेट घडू शकेल? वॉटसन.
तो प्रयोगशाळेत नक्की भेटतोच भेटतो - तो एकतर कित्येक आठवडे तिथे येत नाही किंवा तो सकाळपासून रात्रीपर्यंत तिथेच पडिक असतो, तुला जमणार असेल तर खाणं-पिणं झाले की आपण तिकडेच निघू - खाल्लेले अन्न आणि पिलेल्या वाईनमुळे स्टॅम्फर्डही रंगात आलेला असतो.
टांगा पलटी होण्यापूर्वी आपण त्याची भेट घेऊ असे वॉटसन बोलतो आणि इतर फालतू विषयाकडे ते वळतात जे कथेत दिलेले नाहीत.
हॉटेलपासून इस्पितळाच्या रस्त्यावर स्टॅम्फर्ड डॉक्टर वॉटसनला त्याच्या होऊ घातलेल्या पार्टनरबद्दल आणखी तपशील पुरवतो.
तुमचं जमल नाही तर नंतर मला फुकट दोष द्यायचा नाही, मी त्याला प्रयोगशाळेत चुकून-हुकून भेटलो तेव्हा मला त्याच्याबद्दल जे थोडेफार कळले ते तुला सांगितलेय, त्याच्यासोबत राहाण्याचा सुलेमानी किडा तुझ्या डोक्यात वळवळलाय, नंतर माझ्या डोक्यावर खापर फोडायचे नाही - स्टॅम्फर्ड.
तसे काही नाही, आमचे जमले नाही तर तिथेच मामला खतम करू, पण स्टॅम्फर्डा खरे सांग, तु या बाबतीत राहुन-राहुन तुझ्या काखा का वर करतोयस? आपण ज्याला भेटायला जात आहोत तो एखादा माथेफिरू तर नाही ना? जरा भडाभडा सांग -  वॉटसन.
जो देखा-समझा जाता है वो हमेशा ही लफ्जों में बयॉं किया नही जा सकता मिस्टर वॉटसन, मेरी नजर में होम्स कुछ ज्यादाही पेचिदा चीज है - वो कभीकभी गर्मखूनी से, काफी सख्ती से पेश आता है. मी त्याला एकदा एका मित्राला आग्रहाने अफू खाऊ घालण्याच्या आवेशात पाहिले आहे, हा काही नशाबाजी करायचा आग्रह नव्हता, अफू खाल्ल्यावर माणसावर अगदी अचूक, तंतोतंत परिणाम काय होतो ते पाहाण्याच्या कुतूहलाचे भूत त्याच्यावर स्वार होते. आणि हे कुतूहल शांत करण्यासाठी, मला खात्री आहे - त्याने स्वत: विषदेखील प्यायला कमी केले नसते.
ही अपिअर्स टू हॅव ए पॅशन फॉर डेफिनीट अ‍ॅण्ड एक्झॅक्ट नॉलेज.  (त्याला कसलेतरी अंतिम आणि अचूक ज्ञान मिळवण्याची मस्ती आहे ) स्टॅम्फर्ड.

इथे स्टॅम्फर्ड आणि डॉक्टर वॉटसन या दोघांच्याही मुसक्या बांधून त्यांना माझ्या खोलीतील पुस्तकांच्या कपाटात कोंडतोय. एवढ्या एका वाक्याकरिता वरचा बेवकूफपणा करावा लागला.

दी पॅशन फॉर डेऽऽऽफिनी॑‍ऽऽऽऽऽट अ‍ॅण्ड एक्झॅक्ट नॉलेज
शेरलॉक होम्स नावाचे हे पिल्लू त्याचा ओरिजीनल फादर सर आर्थर कॉनन डॉयलची ही आकांक्षा होती - डेफिनिट अ‍ॅण्ड एक्झॅक्ट नॉलेज. बुध्दी, तर्क, विचारशक्तीच्या वाटा आडवाटांनी डेफिनिट अ‍ॅण्ड एक्झॅक्ट नॉलेजचा शोध घेणार्‍यांच्याच हातून दंतकथा निर्माण होतात. भारताच्या कोट्यवधी पिढ्या याच शोधात खलास झाल्या.  कृष्ण, शंकराचार्य, गौतम बुध्द, महावीर, विवेकानंद, रजनीश/ओशो, जे. कृष्णमूर्ती, यु.जी. कृष्णमूर्ती या त्यातल्या काही ठळक दंतकथा आहेत. शेरलॉक होम्स आणि मंडळी हीदेखील एक कल्ट आहे, संप्रदाय आहे. त्यांचा मार्ग तथाकथित सायंटिफिक आहे - कारण स्पष्ट आहे. त्याची मुळे पश्चिमेत आहेत. पण पूर्व असो की पश्चिम दी पॅशन फॉर डेऽऽऽफिनी॑‍ऽऽऽऽऽट अ‍ॅण्ड एक्झॅक्ट नॉलेज अगदी सारखी असते. ही पॅशन जगातल्या इतर कुठल्याही संसर्गजन्य गोष्टीपेक्षा लक्षावधीपट संसर्गजन्य असते. हा संसर्ग झालेल्या लोकांनाच सांप्रदायिक म्हणतात. इथे फरक फक्त एवढाच आहे की शेरलॉक सारख्या लिजंड्ससमोर खून, चोर्‍या, घोटाळे यासारखी ढोबळ वाटणारी गूढे ठेवली जातात तर आपल्या भारतीय मंडळींसमोर "आत्मा म्हणजे काय?", "देव आहे का?", "स्वर्ग आहे का?", "सिध्दी आहेत का? कशा मिळवता येतील?" असले जास्त वैयक्तिक गुढ प्रश्न विचारले जातात.  मानवी जीवनाच्या सायंटिफिक आणि स्पिरिच्युअल असल्या विभाजनामुळे मानव जातीचा प्रवास दोन विरूध्द दिशांना होत असलेला दिसत असला तरी त्यांचा संगम एकाच बिंदूत होत असतो. वर उल्लेखिलेल्या भारतीय लिजंडसना "आत्मा म्हणजे काय?", "देव आहे का?", "स्वर्ग आहे का?", "सिध्दी आहेत का? कशा मिळवता येतील?" असले प्रश्न विचारले गेले तेव्हा त्यांनी ज्ञानापासून मुक्त व्हावे लागेल अशी उत्तरे दिलेली आहेत - ती भारतीय पटलाचा विचार करता ठिक आहेत. सर डॉयलने केलेली शेरलॉक या पात्राची शुध्द तार्किक मांडणी पाहाता त्याने जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याचा आग्रह धरायला हवा. पण तो म्हणतो -  "I consider that a man's brain originally is like a little empty attic, and you have to stock it with such furniture as you choose. A fool takes in all the lumber of every sort that he comes across, so that the knowledge which might be useful to him gets crowded out, or at best is jumbled up with a lot of other things so that he has a difficulty in laying his hands upon it. Now the skilful workman is very careful indeed as to what he takes into his brain-attic. He will have nothing but the tools which may help him in doing his work, but of these he has a large assortment, and all in the most perfect order. It is a mistake to think that that little room has elastic walls and can distend to any extent. Depend upon it there comes a time when for every addition of knowledge you forget something that you knew before. It is of the highest importance, therefore, not to have useless facts elbowing out the useful ones."

शेरलॉक उकलीत असलेली कोडी भौतिक स्वरूपाची असल्याने भौतिक कोडी सोडविण्यासाठी मेंदूरूपी खोलीत किमान आवश्यक फर्निचर ठेवायला त्याची ना नाही. फक्त आवश्यक तेवढीच आणि तितकीच साधने त्याला लागतात. कोपर्निकसने मांडलेला सौरमालेचा आराखडा जाणून घेणे त्याच्या लेखी बेकार गोष्ट आहे. तो म्हणतो -
You say that we go round the sun. If we went round the moon it would not make a pennyworth of difference to me or to my work.

क्रमश:

टीप: भाग ३ मधील काही वाक्ये मायबोलीवरील हे लेखन आवडलेल्या वाचकांना उद्देशून आहेत


१९ ऑगस्ट, २०१०

शेरलॉक होम्सचे जग: भाग २

मागच्या पोस्टमधील शेवटचा परिच्छेद वाचुन मी इथं शेरलॉक होम्सच्या डिटेक्टीव्ह  कथांचे रसग्रहण लिहीत आहे असा समज होण्याची शक्यता आहे.  लिखाण पुढे जाईल तसं अगदीच आवश्यकता असेल तेव्हा ते घडेलच; पण रसग्रहण करून देण्यावर माझा विश्वास नाही.  रसग्रहण म्हणजे आपल्या वाट्याला आलेल्या रसातून दुसर्‍याला कनेक्शन देण्यासारखे वाटते; तो रस कितपत दुसर्‍यापर्यंत जातो देवजाणे. कदाचित यामुळेच रसग्रहण छाप पुस्तके निरस वाटतात. माझा इंटरेस्ट आहे तो सर ए.सी. डॉयल (अंशत:) शेरलॉक, त्याच्या भोवतीचे जग, त्याकाळची इंग्लिश भाषा, काही प्रमाणात इंग्रजांचे रितीरिवाज यांची उचक-पाचक करणे यात. कारण शेरलॉकच्या सर्व गूढकथा याच जगात उगवल्या होत्या. शेरलॉक हे एक पात्र आहे -  त्यात ओतलेला ए.सी. डॉयलचा मेंदू महत्वाचा आहे -  यातून निष्कर्ष वगैरे देखील काही काढायचा नाही - मी फक्त शेरलॉक होम्सच्या गूढरम्य रानातून येढा करायला निघालो आहे. येढा करणे म्हणजे सहज शिवारातून आजूबाजूचे पीक-पाणी, पक्षी, झाडे-वेली पाहात-पाहात एक चक्कर टाकणे. तशी ही चक्कर आहे. थोडक्यात शेरलॉकचे जग हे निमित्त आहे आणि मी इथं माझी अक्कल पाजळतोय. 

मागच्या पोस्टमध्ये शेवटच्या परिच्छेदात जी शब्दांची जमवाजमव केली आहे ती फक्त त्याकाळच्या सुसंघटीत, सूत्रबध्द आणि फुल्ली नेटवर्क्ड इंग्लिश जगताची एक  किंचीतशी झलक आहे. ए.सी. डॉयलने मांडलेले ते पुस्तकी जग वाचताना दुवे कसे फटाफट जुळतात -  ए. सी. डॉयलने मांडलेले जग ही त्याकाळच्या इंग्लिश जगताची एक सुंदरशी झलक आहे. हे इंग्लिश लोकच मुळात सुव्यवस्थित, कायदेकानू करणारे आणि केलेल्या कायद्याला सार्थकी लावणारे, शिस्त बाळगणारे. काहीवेळा अतिरेक होतो; पण शिस्त मस्त असते.  बोअर झालं. अर्थातच एक किस्सा सांगावा लागणार. टायटॅनिक चित्रपटात जहाज बुडताना लिओ डी’कॅप्रिओला सेलरमध्ये नेऊन पाईपला बांधलेले असते. केट विन्स्लेट त्याला शोधत येते. त्याला हातकडी घालून पाईपला अडकवलेला असतो. केट कुर्‍हाड शोधून आणते आणि हातकडी तोडायला धावते. तो तिला आधी लाकडी टेबलावर कुर्‍हाड सरळ मारण्याची प्रॅक्टीस करायला लावतो. दोन-तीनदाच. तिकडे जहाज फुटलेय. माणसं मेलीत. यांच्याही गळ्यापर्यंत पाणी येतेय आणि हा बाबा तिला म्हणतोय कुर्‍हाड आधी सरळ मारायला शिक, मग हातकडी तोड. ती तसे करते आणि हातकडी तोडते. हे भारतात होणे शक्य नाही! भारतीय माणूस म्हणाला असता - हाण कसाही धडाका, हात तोड! पण लवकर सोडव ! भारतीय (आणि त्यातल्या त्यात मल्लू - मगधीरा!!!) हिरो-बीरो असता तर तो बुडते जहाज घेऊनही आकाशात उडाला असता हा भाग अलाहिदा !
तर पुन्हा एकदा ट्रॅकवर येतो.  शेरलॉकच्या कथांतून आपल्या मनाची पकड घेणारे सुसंघटीत, सूत्रबद्ध आणि फुल्ली नेटवर्क्ड जग ही ए.सी. डॉयलची काल्पनिक निर्मिती आहे; पण त्याची ही काल्पनिक निर्मिती हिंदी सिनेमासारखी बेफाट नाही. ती तर्काच्या कसोटीवर खरी उतरूनही सत्य शोधल्यानंतर तर्काला चारीमुंड्या चीत करणारी आहे. शेरलॉकचीच वाक्ये घेतो:-
It was easier to know it than to explain why I know it. If you were asked to prove that two and two made four, you might find some difficulty, and yet you are quite sure of the fact.
(मला कसे समजते हे विश्लेषण करीत बसण्यापेक्षा ते समजण्याची प्रक्रिया सुगम असते. तुम्हाला दोन आणि दोन चारच का होतात हे सिध्द करायला सांगितले तर अवघड होईल, पण दोन आणि दोन चारच होतात हे सूर्यप्रकाशाइतके सत्यदेखील असते - ए.सी. डॉयलच्या कथांचाच नव्हे तर जगातील सर्व गुढातिगुढांचा (यात तथाकथित भारतीय आध्यात्मिक गुढे देखील आली) डोलारा या सूत्रावर उभा आहे - बाकी जे आहे तो सगळा रंगीत, निव्वळ चटकदार तपशील आहे - आणि एका ठराविक मर्यादेनंतर तपशील कितीही रंगीबेरंगी, चटकदार असो तो रंगहीन होतो; निरस होतो )

I never guess. It is a shocking habit — destructive to the logical faculty. 
(मी कधीच अंदाज लावत नाही. ती बेकार सवय आहे - ती सरळ सत्यापर्यंत घेऊन जाणार्‍या तर्काच्या मार्गावरून कल्पनांच्या जंगलात घेऊन जाते)

डिटेक्टीव्ह कथांचे सोडा, आपले रोजचे दैनंदिन आयुष्य नुसते अंदाज लावत बसण्यात, आणि आपणच गेस केलेल्या गोष्टींभोवती गोल-गोल फिरण्यात उलटते. कल्पना काहीतरी वेगळीच असते आणि रिअ‍ॅलिटी अगदीच वेगळी - आपण रिअ‍ॅलिटीपासून कोसो दूर - कल्पनांच्या जंगलात वाट चुकलेलो असतो. पुढं मग आपण निर्माण केलेली कल्पना खोटी ठरली की आदळआपट, आपली कल्पनाच कशी खरी आहे हे सिध्द करण्याचा अतोनात आटापिटा - आणि वेळोवेळी सत्यतेच्या आसूडाचे फटके खाणे.  एकतर सत्यतेला सिध्द होण्याची काही गरज नसते - जो माणूस सत्यतेला सिध्द करू पाहातो तो अर्थातच भटकलेला असतो - मुळात माणूस सत्यता सिध्द करीत नसतो तर तो स्वत:ला सिध्द करीत असतो. त्यामुळे सत्य स्वयंसिध्दच असते, ते तसेच राहाते आणि माणसे उलटतात - संपून जातात. उदा. आत्ताच माझ्या मैत्रिणीचा एसएमएस आला आहे- "अरे झोपला आहेस का?" आता मी झोपलेलो असेन तर उत्तर देणार नाही आणि ती समजून जाईल की मी झोपलो आहे - हा साधा तर्क आहे, सत्यतेपर्यंत घेऊन जाणारा आहे. पण इथेच जर कल्पना मध्ये तडमडली तर "झोपलाच असेल कशावरून? मुद्दाम उत्तर देत नसेल तर? " की झाली बेजारी सुरू तिकडं. आता मी झोपलेला नसून इथे ही पोस्ट टाईप करतोय ही रिअ‍ॅलिटी आहे.  उत्तर आलेले नाही त्याअर्थी झोपला आहे हे समजणे तिच्यासाठी मानसिकदृष्ट्या फायदेशीर आहे.  हे विश्लेषण मनोरंजक नाही. थांबतो.