यूजिनी आणि माझी सर्वात पहिली भेट कुठं झाली हे मला आता आठवत नाही. ते तेवढं महत्वाचंही नाही. पण ह्या माणसात काहीतरी वेगळं, काहीतरी ठोस, काहीतरी चमकणारं आहे - ते आमच्या मित्रांच्या ग्रुपलाच काय पण त्याला एकदाच रस्त्यावरुन चालता-चालता ओझरतं पाहाणार्यालाही जाणवून जातं. ते काय आहे ते मात्र अजून कुणाला नक्की सांगता आलेलं नाहीय. म्हटला तर तो तसा हॅंडसम कॅटॅगिरीत मोडतो. पण त्याच्यापेक्षाही दिसायला गोरेगोमटे, जिम-फिम मारल्यानं चारचौघात उठून दिसणारे, महिन्यातून तीन-तीन,चार-चार नव्या पोरींना पाठीवर घेऊन गाड्या उडवणारे बहाद्दर आमच्या ग्रुपमध्ये आहेत. सुंदर पोरी-बिरी याच्याही अवती-भवती असतात; पण ते वेगळ्या कारणामुळं. पोरी त्याच्याभोवती अधून-मधून जमणार्या गर्दीचा एक भाग असतात. अशा थोडक्या वेळी पियक्कड लोकांच्या मैफिलीत मोकळ्या ढाकळ्या वातावरणात जशा गप्पा चालू असतात तसे वातावरण त्याच्या अवतीभवती असते. लोक न पीता ही धुंद झालेले असतात. बंगलोरपासून मर्सिडिझमध्ये बसून त्याच्याकडं नेहमी एक बाई येत असे. चांगली दिसायची, बोलायला पण मोकळी-ढाकळी होती. ती युजिनीसोबत जरा जास्तच जवळ गेलेली दिसायची. युजिनीच्या बंगल्यातील प्रशस्त लॉनवर विखरून विखरून टाकलेल्या खुर्च्यांत जवळ बसलो असताना एका रात्री धीर करून त्या बाईंना मी सहज विचारतोय असं भासवत एकदा विचारलं होतं -
व्हाट मेक्स यु व्हिजीट धीस मॅन सो फ्रिक्वेंट्ली?
ती हसर्या चेहेर्याची, चेहेर्यावरून सतत मलमली हसू खेळवत राहाणारी बाई बेधडक म्हणाली,
ओह! टू बी व्हेरी फ्रॅंक, ही नीड नॉट टू टेक मी टू बेड फॉर ऑरगॅजम; आय फील इट इन एअर अराऊंड हिम! आणि तिनं माझ्या डोक्यावर एक टप्पल मारली.
न विचारलेल्या प्रश्नाला उत्तर न देऊनही तिनं माझी विकेट घेतली होती.
"देन व्हाय डोंट यू स्टे विथ हिम फॉरेव्हर...मे बी मॅरी हिम??"
दोन्ही हातांच्या मुठी बांधून खांद्याकडे खेचत, लगेच झटका मारून दोन्ही हात हवेत पसरत ती म्हणाली,
आय वॉंट टू डिअर, बट ही सेज ही डोंट नीड एनिवन स्टेअर अॅट हिम नाऊ अॅण्ड देन... सो आय हॅव टू कम हिअर फ्रिक्वेंट्ली... आणि चेहेर्यावरून खळखळून हसू ओघळले...
नो, नो, बट धीस इज नॉट आय वॉटेड यू टू आन्सर..मला नेमकं काय विचारावं ते कळत नव्हतं; मी लॉनवर जमलेल्या गर्दीकडे हताशपणे नजर टाकली - कुणीतरी बटाटा कलरचा अमेरिकन माणूस युजिनीसमोरच्या गर्दीत बसून गिटारवर गाणं म्हणत होता
ती तिकडे पाहात अचानक म्हणाली -
ही इज स्पेशल अॅण्ड एव्हरीबडी अराऊंड हिम बिकम्स स्पेशल व्हेन दे आर विथ हिम...दे आर नॉट सो व्हेन दे आर अलोन इन देअर वेल्दी सर्कल्स...
असा हा अवलिया माणूस मला दोस्त म्हणून लाभला होता. घरचा गर्भश्रीमंत नसला तरी, तो एखाद्या स्थलांतरप्रिय पक्ष्यासारखा प्रत्येक ऋतूत स्वत:च्या खर्चानं पृथ्वीगोलावर पसरलेल्या वेग-वेगळ्या देशात फिरू शकत असे. तिथल्या शहरांमध्ये त्याचे थोडके, पण "तो येतोय" कळलं की त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसणारे, त्याच्यासोबत कुठेही फिरायला तयार असणारे दोस्त होते. मला त्याला अवधूत म्हणावं वाटे. तो गर्दी खेचणारी असामी असला तरी आमच्या लंगोटीयार दोस्त कंपनीतला कुणीही त्याच्या खांद्यावर थाप मारू शकत असे. नाती एवढी मोकळी असली तरी त्याच्याबाबत कोणतंच अंतिम विधान करता येणार नाही. आमच्या शहराशेजारच्या डोंगर उतारावर असलेल्या त्याच्या बंगल्यात तो वर्षातले दोन-तीन महिने राहायला येत असे. असाच तो यावर्षीही आला होता. आला होता की जावून आला होता, तो इथे राहात होता की विदेशात राहात होता हे सांगता येत नाही. कारण हा पक्षी कुठेलंच घरटं जास्त काळ वापरायचा नाही. सारखा फिरत राहायचा. यावेळी मात्र तो आमच्या लंगोटीयार कंपनीसोबत बराच काळ राहिला. दुसरे जास्त कुणी आले नव्हते.
असेच एकदा दुपारी साडेतीन-चार वाजता त्याच्या बंगल्याच्या लॉनवर बसलो होतो. त्याच्या सोबत असताना आपण काहीही बोललो, तरी ते थेट त्याला उद्देशून नसेल तर तो बिलकूल प्रतिसाद देत नाही - तसा तो आताही आपण होऊन बोलत नव्हता आणि आम्ही सर्वजण तो काय म्हणतो याची वाट पाहात होतो. कारण तो जेव्हा बोलतो तेव्हा ते भयंकरच असते. एकदा त्याला त्याच्या तोंडावरच मी चिडून म्हणालो होतो, "तू मूर्ख आहेस!"
"इट इज नो मोअर अ न्यूज. टेल समथिंग न्यू, इफ यू हॅव!" माझ्याकडे न बघता तो शांतपणे उत्तरला. हे वाक्य पूर्ण झाल्यावर त्याच्या डोळ्यांचा फोकस क्षण-दोन क्षणांसाठी माझ्या डोळ्यांवर स्थिरावला. एखाद्या सिंहाच्या पिंजर्यात उतरून त्याच्यासमोर तावातावाने, "तु एक बंदिस्त जनावर आहेस" असे मोठ्ठ्याने ओरडावे आणि त्यानं भयानक गर्जना करून त्याचे ते दोन हिरवट डोळे आपल्यावर रोखावेत तसं मला जाणवून गेलं.
"म्हणजे, अगदी अस्संच काही म्हणायचं नाही मला..सॉरी!" घशात आलेला आवंढा गिळत मी म्हणालो.
"सॉरी? उलट मीच तुझा आभारी आहे, तु माझ्या हिताचंच विधान केलंस तुझ्या दृष्टीनं, पण ते माझ्या कक्षेत आलं तेव्हा गैरलागू झालं - तु कस्संही, काहीही म्हण, ते मला कसलीच इजा करू शकत नाही..करूनच घ्यायचाच असेल, तर त्यात माझा फायदा आहे!”
या अशाच चक्रावून टाकणार्या त्याच्या बोलण्यामुळं त्याला सतत भेटत राहावं, त्याला मुद्दाम डिवचावं आणि त्याची मुक्ताफळं ऐकावीत असं आमच्या सगळ्या भिडूंना वाटत राहातं. तो आमच्यासोबतच असा वागतो असं नाही, आयुष्यात कधीच न पाहिलेल्या माणसाला सुध्दा तो याच स्टाईलमध्ये बोलतो. एकदा मॉलमध्ये मॅनेजर असलेल्या आमच्या एका दोस्ताकडं तो आणि मी गेलो होतो. चहा पाजवायला म्हणून तो मित्र आम्हाला घेऊन "एक्झिट" असे लिहीलेल्या गेटमधून बाहेर पडला. गेटवर असलेल्या सिक्युरिटीवाल्यानं मॉलच्या युनिफॉर्ममध्ये असलेल्या आमच्या मॅनेजर मित्राची तलाशी घेतली. तसा नियम असेल त्यांचा.
"तु पृथ्वीवरचा सर्वात मोठा बिनविश्वासू माणूस आहेस - हेच काम करीत राहिलास अजून काही दिवस, तर बायकोची पण तलाशी घेशील झोपण्यापूर्वी" हा कडाडला.
तो फुकट पोलीसगिरीवाला सेक्युरिटी भूत पाहावं तसं त्याच्याकडं पाहात होता. काहीच बोलला नाही. मग न राहावून मी माझी अक्कल पाजळलीच -
"तु पण ना, त्याचा काय दोष आहे रे? त्याला जो नियम सांगितलाय तो पाळतोय तो" मी.
"आणि मी काय करतोय मग?"’ तो.
"काय करतोयस म्हणजे?" मी.
"मी पण नियमच पाळतोय, पण मला ते कुणी सांगितलेले नाहीत" तो.
"कसला नियम?"
"कॉलींग ए स्पेड, स्पेड!"
सांगत बसायचं म्हटले तर त्याचे अनेक किस्से आहेत. एकदा आम्ही असेच नेहमीसारखे त्याच्या आवडत्या वामा इंटरनॅशनल मध्ये बसलो (!) होतो. हे हॉटेल त्याला नुसतंच आवडतं. म्हणजे तो तिथं खातही नाही पीतही नाही. मला आवडू शकणारे आणि मी त्यांना आवडू शकेल असे लोक कुठेही असू शकतात त्यामुळे त्याचा वावर सगळीकडेच असे. शहराशेजारच्या अॅसिलममध्येही तो आला की दोन-चार वेळा जाऊन येत असे. तर सांगत काय होतो की आम्ही वामा इंटरनॅशनलमध्ये बसलो होतो. आजूबाजूच्या टेबलवर दबक्या आवाजातील गोष्टींसोबत ग्लास किणकिणत होते. भींतींवर विश्वामित्राच्या तपोभंगाचे दृश्य दाखणार्या पेंटींगवर एवढा झिरझिरीत मंद उजेड कुठून पडलाय हे मी शोधून काढायचा प्रयत्न करीत होतो आणि हुडहुडी सुटेल एवढे थंड वाटत असल्याने माझ्या अंगातले जर्किन जास्तच घट्ट करून घेत होतो. शेजारच्या टेबलावरचे युजिनी गॅंगशी आहे नाही म्हणावी अशी पुसटशी ओळख असणारे काही भिडूही रंगात आले होते. त्यांचं आवरत आलं होतं वाटतं, उठायच्या तयारीत होते. त्यातला एकजण यूजिनीकडे हात दाखवत वेटरला म्हणाला,
"आज टिप त्या साहेबांकडून घ्यायची"
युजिनीनं ते ऐकलं आणि वेटरला म्हणाला,
"तुझं नाव कधी छापून आलंय का पेपरमध्ये?"
"पेपरमध्ये नाव? नाही ब्वॉ..का?"
"उद्या येणार आहे मग, तु आज टीप द्यायची मला...लगेच उद्या सकाळच्या पेपरमध्ये बातमी "वेटरने दिली गिर्हाईकाला टीप"....नाहीतरी त्या मूर्ख पेपरवाल्यांना काही धंदा नसतो... बघ...चान्स घालवू नको.."
वेटरला काही कळलं नाही. तो बावळट चेहरा करून तिथेच उभा राहिला.
आमच्या शेजारच्या टेबलवरची गॅंग पेटली.
"रघू, आम्ही तुझ्या नेहमीच्या टीप पेक्षा हजार रूपये जास्त देतो, दे म्हणे तु त्यांना टीप..बघुतच..." असं म्हणून त्या लोकांनी खिशातून पैसे काढून रघूच्या हातात कोंबले. वेटर रघू भांबावला. तो मान खाली घालून चेहरा आणखी बावळट करून, गालातल्या गालात हसू लागला.
ती लोकं आरडा-ओरडा करू लागली.. "रघ्या, दे त्यांच्या हातात..बघू म्हणे खरंच "
"अरे दे की, त्यांनी दिलेच आहेत..तुला फक्त माझ्या हातावर ठेवायचे आहेत....तुझी टीपपण मिळतेय" असं म्हणून युजिनीनं हात पुढे केला.
त्या गॅंगचा आरडा-ओरडा ऐकून लोकांच्या नजरा आमच्या टेबलाकडे रोखल्या गेल्या आणि बारमधला तो नेहमीचा मंद आवाजात चालणारा गोंगाट अचानक शांत झाला.
रघ्याला काही कळेना. तो आणखीनच भांबावला. बारमधल्या एवढ्या सगळ्या लोकांनी त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच एकाच वेळी, एवढ्या उत्कंठेनं नजरा लावल्या होत्या. तो त्या क्षणाला त्या वामाच्या बारमधला सर्वात महत्वाचा माणूस बनला होता; घायबरून गेला होता.
"साहेब लोकांना कशी टीप द्यायची...नको...हे घ्या.. " चाचरत-चाचरत त्यांच्या तोंडातून शब्द फुटले आणि तो त्या गॅंगने दिलेले पैसे परत करू लागला. पण आता मामला बिघडला होता. समोरची गॅंग जास्तच पेटली होती; रघू वेटर चांगलाच अडकला होता.
"दे म्हणतो ना आम्ही, बघ बरं रघ्या, आयुष्यात पुन्हा कधी टीप मिळायची नाही आमच्याकडून.."
" ...... "
रघू आळीपाळीनं नुसताच गर्दीकडं आणि आमच्या दोन गॅंगकडं बघू लागला. युजिनीनं ते हेरलं आणि त्यांच्या टेबलावरची रिकामी झालेली स्कॉच उचलली
"ठिक आहे...पैसे नको देऊ, ही बाटली टीप म्हणून मला दे म्हणे..."
"न्है हो साहेब..माफ करा.." रघू पक्का होता. ती उत्कंठीत झालेली गर्दी सोडून जाण्याच्या बेतात आला.
"रघूराम, तु जब मरेगा ना...गरीबी में मरेगा रे... लेकीन बहोत शांती से मरेगा तु...पाहा याच्याकडं - लोक पैसे मिळत नाहीत म्हणून गरिब राहात नाहीत...मनाची भुक्कड श्रीमंती आड येते...." युजिनीनं त्या दृश्याचा क्लोजिंग डायलॉग टाकला.
जाताना त्या गॅंगमधल्या प्रत्येकानं युजिनीसोबत शेकहॅंड केला. आमचं संपवून आम्हीही थोड्यावेळानं निघालो. रघुनंच सर्व्ह केलं. युजिनीनं काही घेतलं नव्हंत. त्यानं जाताना रघूच्या त्या जाड बिल-कम-टीप फाईलमध्ये स्वत:चे हजार रूपये सरकवले.
दुसर्या दिवशी त्या गॅंगमधले लोक आणि रघूही युजिनीच्या लॉनवरच्या लोकांमध्ये दिसत होते.
more abt him.. ajun nit kalal nahiye.
उत्तर द्याहटवा