३ ऑगस्ट, २०१०

तुका झाला सांडा विटंबिती पोरे रांडा

माझ्या आयुष्यावर परिणाम करून गेलेला तुकाराम हा एक जबरदस्त माणूस. तुम्ही लोक कसे आहेत हे हजार सांगू शकाल हो, पण तुम्ही स्वत: कसे आहात हे सांगायला तुकारामाचीच छाती लागते; आणि ती तिन्ही त्रिकाळ उघडी असावी लागते, तिच्यात येत असलेले उमाळे भडाभडा बाहेर पडू दिले नाहीत तर ते तसेच साठतात आणि दुर्गंध येऊ लागतो, सेप्टीकही होण्याची शक्यता असते. आता तुकाराम वरच्या अभंगात स्वत:लाच सांडा म्हणून घेतायत. सांड पाहिलाय का कधी? अगदी माझ्यासारखाच असतो! लोक जवळ जायला घाबरतात त्याच्या. कारण त्याचं काही सांगता येत नाही - कधी शिंगावरही घेईल, कधी धडकही देईल, तर कधी शांतपणे उभा राहील, चोंबाळू (आता हा शब्द कळायला खेड्यात जन्म घ्यावा लागतो) देईल. त्याच्याबद्दल तुम्ही काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही.

मग सांड एवढा भयानक असतानाही, पोरे आणि रांडा कशी काय त्याची विटंबना करू शकतात बरे? इथे थोडासा घोळ आहे. हे जरा समजून घ्यावं लागेल. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती असं तुकाराम म्हणालेत. दोन विरूध्द दिसणार्‍या गोष्टी जेव्हा चित्तात एकत्र येतात ना, तेव्हा तिथे एक रासायनिक प्रक्रिया घडते. जसं ३ + २ एकत्र केलात तर ५ होतात. आता या ५ मध्ये ३ नाहीत का? २ नाहीत का? आहेत ना. दोन्हीही आहे तिथं. पण हे दोन्ही असूनही ५ चं एक वेगळं अस्तित्व आहे. याच चालीवर विटंबना आणि सन्मानसुध्दा चित्तात एकत्र होतात, तेव्हा विटंबनाही तिचा गुण हरवून बसते आणि सन्मानही त्याचा गुण हरवून बसतो. या दोन्हीतुन एक वेगळंच रसायन तयार होतं - त्याचं नाव सेलिब्रेशन, उत्सव. आता सेलिब्रेशन-सेलिब्रेशन मध्येसुध्दा फरक आहेत. गुत्त्यात जाऊन दोन चपट्या आणि छटाक खारे शेंगदाणे आणि एकमेकांच्या अंगावर ओकायला ना न म्हणणारे मित्र यांच्यासोबतही जे होतं त्यालाही लोक सेलिब्रेट केलं म्हणतात. म्हणोत. पण तुकारामांच सेलिब्रेशन वेगळं आहे. ते चोवीस तास, श्वासा-श्वासातून, शब्दा-शब्दातून चालू असतं. नव्हे, तिथं फक्त सेलिब्रेशनच असतं. तिथे सन्मानही नसतो, विटंबनाही नसते. तरी तुकारामांनी "विटंबना" हा शब्द का वापरलाय? तर इतर पामरांच्या सोयीसाठी. तुकाराम हा कधीच फिनीश झालेला आहे. त्यांच्या जागी फक्त आता सेलिब्रेशन शिल्लक आहे. पण तरिही तुकारामांना सगळं दिसत असतं. या मुर्खांना आयुष्यात फक्त बिटंबनाच ओळखीची आहे - दे आर फॅमिलीअर विथ इट. त्यांना सांगितलं मी चोवीस तास ब्रम्हानंदात तल्लीन आहे तर त्यांच्या डोक्यात ते घुसेल की नाही याचा विचार तुकारामांनी केलेला असतो - म्हणून तुकाराम असे शब्द वापरतात. धीस इज ऑल मिस्टीसिझम. तुकारामांनी माझ्या जीवनावर या अर्थाने परिणाम केला की जणू ते सांगत असावेत - बाळ, तु तुझं तेवढं बघुन घे, बाकी जगाचं बघायला तो विठ्ठल समर्थ आहे. पण मला तुकारामांसारखं "काय माय झविली भुते, म्हणूनी हरि न ये मुखासी" असं काहीसं जबरदस्त लिहायचं होतं. पण हरिचा नि माझा तसा काही संबंध नव्हता, कोण हरि, कुठला हरि, काय त्याचा आणि माझा संबंध. आपलं हे असं आहे. जे माझ्या ह्रदयाच्या तारा झंकारू शकत नाही, ते माझं नाही - जे माझ्या ह्रदयाच्या तारांमधून थोडासाही नाद निर्माण करू शकतं ते माझंच आहे. तुकारामांनी लिहीलेलं "गायनाचे रंगी शक्ती अद्बुत हे अंगी, हे तो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडीत सेवा, अंगी प्रेमाचे भरते नेघे उतार चढते, तुका म्हणे वाणी प्रेम अमृताची खाणी" हे जर बाबा महाराज सातारकरांच्या आवाजात मी ऐकलं ना, तर हार्ट अ‍ॅटॅक येऊन पडतो की काय एवढा मोठा उमाळा उसळतो ह्रदयात. होतं का असं कधी कुणाला?? मला होतं. आणि हे मलाच एकट्याला का होतंय? इतर लोकांना का होत नाही हा प्रश्न मला कधी पडत नाही. आपलं आपलं बघून घ्या, लोकांना त्यांचा मेंदू आहे, ह्रदय आहे, आता ते नसेल वाजत, नसेल उसळत तर तो लोकांचा प्रश्न आहे. तुका आपला देहूच्या रस्त्यांवर वीणा-चिपळ्यांच्या तालावर गातो आहे, नाचतोच आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा