६ ऑगस्ट, २०१०

शास्त्रज्ञ

मी ऐकलंय, एक शास्त्रज्ञ होता. मोठा शास्त्रज्ञ. विशेषकरून विद्युत-यंत्रांबाब त्याची विलक्षण क्षमता होती. तो आपल्या मोठ्या मुलीमुळं काळजीत होता. कारण एक मुलगा त्याच्या मुलीमागे लागला होता. जुन्या वळणाचा बाप असता तर त्यानं काठीनं मारून हाकलून दिलं असतं. पण तो जुन्या वळणाचा नव्हता, आधुनिक माणुस होता. पण आधुनिकता तर वरवरच राहाते ! अंतर्यामी तर जुनंच चालंत राहातं! तेव्हा अंतर्यामी तरी बाप वैतागायचा की हे काय... त्या मुलाला तो माकड म्हणायचा - की ते माकड कुठे आहे, पुन्हा आलं माकड वगैरे...
ते त्याला अगदी सहन होत नव्हतं. अन तो तासन तास दिवाणखाण्यात बसून त्या मुलीशी गप्पा मारायचा. मध्यरात्रीपर्यंत दोघं बसून गप्पा मारायचे. शेवटी सारं त्याच्या सहनशक्तीपलीकडे गेलं. तो खूप बेचैन व्हायला लागला की हे दोघं बसून करतात तरी काय ! आधुनिक बाप होता त्यामुळे मध्ये जाऊन उभादेखील राहू शकत नव्हता ! जुना जमाना तर गेला की मध्ये जाऊन उभं व्हावं..कारण त्यानं आधुनिकपण मरतं. लोक म्हणतात, "त्यात काय! मुलगी तर प्रेम करणारच !...अन माकड? माकड तर सारेच आहेत ! डार्विननं सिध्दच केलं आहे, तेव्हा त्यात काय ! सारी माकडाची अपत्यं आहेत!...तेव्हा हेदेखील ठीक!.. शिवाय मुलीला पसंत आहे मग तुमचं काय जातं!..."
तेव्हा त्यानं एक युक्ती शोधून काढली. तो मोठा शास्त्रज्ञ होता...त्यानं ज्या खोलीत मुलगी अन मुलगा बसून प्रेमालाप करत तिथे छताला एक यंत्र बसवून टाकलं अन आपल्या खोलीत एक रडारचा पडदा लावला. त्या यंत्रानं त्या पडद्यावर रंग उमटायचे. जर मुलानं मुलीचा हात धरला..साहाजिकपणे...दोघं तरूण होते, नुकतेच प्रेमात पडले होते...तेव्हा जेव्हा ते हात पकडायचे तेव्हा बरीच उष्णता निर्माण व्हायची..तेव्हा ते जे उष्णता निर्माण व्हायचं यंत्र होतं ते लगेच उष्णता पकडायचं...अन पडद्यावर लाल रंग उमटायचा! तेव्हा त्याला उमगायचं की, "हं ! माकडानं हात धरला वाटतं !" जर त्यांनी एकमेकांचं चुंबन घेतलं तर हिरवा रंग यायचा !..."अस्सं ते माकड मुलीचं चुंबन घेतं आहे तर..." कधी ते मिठी मारायचे तर निळा रंग यायचा...तर त्यानं असे रंग बनवले होते.
एक दिवस, शास्त्रज्ञांची एक कॉन्फरन्स चालू होती तर त्याला जावं लागलं. तो अगदी नाईलाजानं गेला. कारण जेव्हा तो बाहेर पडत होता तेव्हा ते माकड आत शिरत होतं ! तेव्हा तो आपल्या लहान मुलाला म्हणाला की, "बेटा ! तू आत जाऊन बस. तिथे पडदा लावला आहे त्याकडे पाहात राहा. अन कागद घेऊन नोंद करत जा की कुठला रंग कुठल्या क्रमानं आला..."
मुलाला काही ठाऊक नव्हतं की या रंगाचा अर्थ काय आहे? मुलाला तर वाटलं की वडिलांनी एक काम सांगितलं आहे. तेव्हा तो अगदी उत्साहानं जाऊन बसला अन लिहू लागला की कुठला रंग आधी आला, कुठला मागुन आला, केव्हा कुठला रंग आला...अन बाप घाईनं कॉन्फरन्सला गेला की कशी तरी संपवून यायची..त्याला तर हीच काळजी होती की तिथे कुठले रंग येताहेत !
पण तो घरी यायच्या आतच मुलगा धावत कॉन्फरन्स-भवनात पोचला, बापानं विचारलं "की काय झालं? असा धावत का आलास?" तो म्हणाला बाबा ! कमाल झाली ! बापानं विचारलं, "काय झालं लौकर बोल !" तो म्हणाला, "अहो, इंद्रधनुष्य उमटलं आहे...!"
त्याला तर काही ठाऊक नव्हतं ! सारे रंग एकाच वेळी उमटत होते!

(साभार)
एस धम्मो सनंतनो
धम्मपद
रजनीश


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा