५ ऑक्टोबर, २०१०

युजी कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग तीन

आतापर्यंतचा युजींचा प्रवास रेखाटून झाल्यानंतर आणि या लेखमालेत “त्या स्फोटाचा” ओझरता का होईना पण संदर्भ आल्यानंतर युजी ज्याला कॅलॅमिटी:चक्रीवादळ म्हणतात ते नेमके काय हे पाहाणे मनोरंजक आहे. सुदैवाने युजींच्या या प्रवासाबद्दल मिनीट-टू-मिनीट नोंदी उपलब्ध आहेत, खुद्द युजींच्याच तोंडून नेमके काय आणि कसे घडले त्याचा वृत्तांत उपलब्ध आहे आणि आजही जिज्ञासूंना तो ऐकायला, वाचायला मिळतो.  “मला कसे कळणार हीच ती स्थिती म्हणुन?” हा प्रश्न काही काळ शरीराच्या रोमरोमात भिनला, पेटून उठला आणि तो प्रश्नच युजींचे अस्तित्व बनून गरगरत राहिला, गरगरत राहिला आणि अचानक गायब झाला. युजींमध्ये निर्माण झालेल्या या मूलभूत प्रश्नाला कोणतेच उत्तर नव्हते किंवा ज्या स्थितीत ते खेचले गेले ती स्थितीच त्या प्रश्नाचे उत्तर आहे असे म्हणावे वाटते. उत्तरच नाहीय असे दिसल्यानंतर तो मूलभूत प्रश्न गायब होण्याची परिणिती शरीराच्या आत, बाहेर आणि एकूणच युजी म्हणून जी कुणी व्यक्ती होती तिचा मानवी इतिहासात कधीही कुणाचा झाला नाही अशा कायापालटात झाली. याबद्दल बोलताना म्हणतात युजी म्हणतात, “तो आत अचानक झालेला एक “स्फोट” होता ज्यामुळे शरीरातील प्रत्येक पेशी, प्रत्येक धमणी आणि प्रत्येक ग्रंथी त्या स्फोटात भाजून निघाली, भडकून उठली. या स्फोटासोबतच विचार सतत टिकून असतो, आत कुठेतरी केंद्र असते हा भ्रम नाहीसा झाला आणि विचारांची जोडाजोड करणारा “मी” त्यानंतर तिथे राहिला नाही.” युजी पुढे सांगतात:
त्यानंतर विचार टिकून राहून त्याची जुळणी होऊन तो उभा राहू शकत नव्हता. विचाराची जुळवाजुळव खंडीत होते, आणि एकदा ती तशी खंडीत झाली की खेळ, खलास! या एकाच वेळी विचाराचा स्फोट होतो असे नव्हे, तर त्यानंतर ज्या-ज्या वेळी विचार उमटतो, त्याचा स्फोट होऊन तो नाहीसा होतो. त्यामुळे हे सातत्य संपून जाते आणि विचार त्याच्या नैसर्गिक तालात पडतो.
तेव्हापासून, या घटनेपासून मला कसलेही प्रश्न पडत नाहीत, कारण प्रश्न तिथे राहूच शकत नाहीत. मला पडणारे सर्वसाधारण प्रश्न उदाहरणार्थ “हैदराबादला कसे जायला लागेल?” असल्या प्रकारचे साधेसुधे प्रश्न असतात जे जगात चालण्याबोलण्यासाठी, साध्यासुध्या कामासाठी आवश्यक असतात. आणि असल्या प्रश्नांना लोकांकडे उत्तरे असतात. पण त्या तसल्या प्रश्नांना (“आध्यात्मिक” किंवा “आधिभौतिक” ) कुणाकडेच, कुठलीही उत्तरे नसतात. त्यामुळे आता प्रश्न शिल्लक राहिले नाहीत.
डोक्यात असणारी प्रत्येक गोष्ट भयानकपणे ताणली गेली होती – दुसर्‍या कुठल्याच गोष्टीला तसूभरही वाव राहिला नव्हता. आयुष्यात पहिल्यांदाच मला सर्वकाही “खचाखच” भरून घट्ट झालेल्या माझ्या डोक्याची जाणीव झाली होती. या वासना (पूर्व संस्कार) किंवा तुम्हाला जे संबोधन योग्य वाटते ते घ्या, त्या काहीवेळा डोके वर काढू पाहातात, पण मेंदूतील पेशी एवढ्या “घट्ट” होतात की वासनांमध्ये गुंतण्याची संधीच मिळत नाही. दुभागणी (पूर्व संस्कार आणि विचारांच्या रूपातून झालेली) तिथे राहू शकत नाही. ते शारीरिकदृष्ट्या अशक्य आहे. त्यासाठी काहीही करावे लागत नाही. त्यामुळेच मी नेहमी म्हणत असतो की, हा “स्फोट” घडून येतो तेव्हा (मी हा शब्द वापरतो कारण ते अणुस्फोटासारखे असते), त्यातून प्रतिक्रियांची साखळी मागे सुटते. शरीरातील प्रत्येक पेशी, हाडाच्या कोषांची प्रत्येक पेशीला या “बदलातून” जावे लागते – मला ते शब्द वापरायचे नाहीत – पण हा एक कधीही न पुसला जाणारा बदल आहे, कसलीतरी अल्केमी आहे.
ते आण्विक स्फोटासारखेच असते. त्यातून संपूर्ण शरीर विखरून जाते. ती साधी गोष्ट नाही; तो माणसाचा शेवट असतो. त्या क्षणांतून जाताना मला भयंकर शारीरिक यातना झाल्या आहेत. तुम्ही तो स्फोट अनुभवू शकता असे नव्हे, तर फक्त त्याचे नंतरचे परिणाम भयानकपणे जाणवतात. या “कायापालटातून” शरीराचे पूर्ण रसायनशास्त्रच बदलते.
त्या (स्फोटा) नंतरचा परिणाम म्हणजे, आता इंद्रिये कोणत्याही समन्वयकाशिवाय किंवा केंद्राशिवाय संचालित होत आहेत – एवढेच मी सांगू शकतो. आणखी एक गोष्ट म्हणजे: शरीराचे रसायनशास्त्र बदललेय – मी सांगू शकतो की रसायनशास्त्रात या बदल घडल्याशिवाय, विचारापासून, विचाराच्या सातत्यापासून ही घडण मुक्त होण्याचा कोणताच मार्ग नाही. त्यामुळे, त्यावेळपासून विचाराचे सातत्य नसल्याने, काहीतरी घडलेय असे तुम्ही सहज सांगू शकता, पण खरंच, तंतोतंत काय घडलेय, ते अनुभवण्याचा मला कोणताच वाव नाही.


ही गोष्ट मला अपेक्षित होते, मी कल्पना रंगवल्या होत्या, मला बदलायचे होते त्या क्षेत्राबाहेर घडाली आहे. त्यामुळे मी याला “बदल” म्हणत नाही. माझ्यासोबत काय घडलय ते मला खरंच माहीत नाही. मी आता जे तुम्हाला सांगत आहे ते फक्त माझे कार्य कसे चालतेय त्याबद्दलचे बोलणे आहे. तुम्ही ज्या पध्दतीने कार्य करताय आणि मी ज्या पध्दतीने करतोय त्यात काहीसा फरक वाटू शकतो, पण मूलत: त्यात कसलाही फरक असू शकत नाही. तुमच्यात आणि माझ्यात कसला फरक असू शकतो? कसलाही नाही. पण आपण ज्या पध्दतीने स्वत:ला व्यक्त करतोय, त्यात काहीसा फरक दिसतो. काहीतरी फरक आहे असे मला जाणवतेय आणि तो काय आहे ते मी समजून घेतोय.
या “स्फोटा”दरम्यानच्या आठवड्यात युजींना त्यांच्या इंद्रियांच्या कार्यात काही मूलभूत बदल आढळून आले. शेवटच्या, सातव्या दिवशी त्यांचे शरीर “शारीरिक मृत्यूच्या” प्रक्रियेतून बाहेर पडले आणि त्यानंतरचे बदल ही कायम टिकून राहाणारी वैशिष्ट्ये बनली.
शेवटी: बदलांना सुरूवात झाली. सात दिवसांपर्यंत, प्रत्येक दिवशी बदल घडत गेला. युजींना आढळले की त्यांची त्वचा अत्यंत मुलायम झालीय, डोळ्यांची उघडझाप थांबलीय आणि स्वाद, गंध आणि ऐकण्याच्या संवेदनांत बदल घडलाय.
पहिल्या दिवशी त्यांना आढळून आले, त्वचा की मलमली वस्रासारखी मऊ झालीय आणि त्यावर विचित्र चमक, सोनेरी चमक आलीय. “मी दाढी करत होतो, आणि प्रत्येक वेळी रेझर फिरवताना, ते घसरू लागले. मी ब्लेडस बदलल्या, पण काही उपयोग झाला नाही. मी माझ्या चेहेर्‍याला स्पर्श केला. माझी स्पर्शाची संवेदना वेगळी होती.” युजींनी या गोष्टीला कोणतेही अवास्तव महत्व चिकटवेले नाही. त्यांनी फक्त ही निरिक्षणे केली आहेत.
दुसर्‍या दिवशी त्यांना सर्वप्रथमच आढळून आले की त्यांचे मन, ते नेहमी जो शब्द वापरतात त्याप्रमाणे “पकडमुक्त स्थितीत” आहे. युजी वर असलेल्या किचनमध्ये होते आणि आणि व्हॅलेण्टाईनने काहीतरी टोमॅटो सूप बनवले होते. त्यांनी ते पाहिले आणि ते काय आहे ते त्यांना कळेना. ते सूप आहे असे व्हॅलेण्टाईनेने सांगितले. त्यांनी त्याची चव घेतली आणि मग ते समजले, “टोमॅटो सूपची चव अशी असते तर!.” त्यांनी सूप चाखले आणि परत ते मनाच्या त्या विचित्र चौकटीत शिरले, नव्हे तर ती “मनोमुक्त” स्थिती होती. त्यांनी व्हॅलेण्टाईनला पुन्हा विचारले “हे काय आहे?” पुन्हा व्हॅलेण्टाईन म्हणाली ते सूप आहे. पुन्हा युजींनी चव घेतली, ते गिळले आणि पुन्हा एकदा ते काय होते ते विसरून गेले. माझी काहीकाळ अशी मजा झाली. मजेशीरच होते ते सगळे – ती “पकडमुक्त स्थिती.”
आता युजींसाठी ती स्थिती सामान्य झाली होती. ते म्हणतात आता ते बिलकुल कल्पनारंजन, काळजी, संकल्पना मांडणे किंवा इतर लोक एकटे असताना करतात तसे कोणतेही विचार करीत नाहीत. फक्त गरज असेल तेव्हाच त्यांचे मन उभे राहाते, उदाहरणार्थ, कुणीतरी प्रश्न विचारला किंवा त्यांना टेपरेकॉर्डर दुरुस्त करायचा असेल तेव्हा. अशी गरज संपते तेव्हा, तिथे मन राहात नाही, विचारही राहात नाही. फक्त जीवन राहाते.


तिसर्‍या दिवशी, युजींच्या काही मित्रांना त्यांनी जेवणासाठी बोलावले होते. स्वत: स्वयंपाक करायला ते कबूल झालेले होते. पण त्यांना नेहेमीसारखा गंधही घेता येईना आणि चवही घेता येईना. “या दोन संवेदना रूपांतरीत झाल्या आहेत याबद्दल मला जाणीव झाली. प्रत्येकवेळी माझ्या नाकपुड्यांत कोणताही गंध शिरला तेव्हा  त्यामुळे गंध घेण्याच्या केंद्राला त्रास होऊ लागला – मग तो गंध महागड्या अत्तराचा असो की गायीच्या शेणाचा असो. आणि त्यानंतर मी कधीही कशाची चव घेतली तेव्हा, मला फक्त त्यात जास्त प्रमाणात असलेला घटकच जाणवत असे – इतर घटकांची चव थोडीशी उशीरा जाणवू लागली. त्या क्षणापासून पुढे मला कसल्याही परफ्युमचे काही वाटेना आणि चमचमीत जेवणाबद्दलही काही वाटेना. मला त्यात जास्त प्रमाणात असलेल्या घटकाचीच चव जाणवू लागली – तिखट किंवा जे काही टाकले असेल ते.”
चौथ्या दिवशी, त्यांच्या डोळ्यांबाबत काहीतरी झाले. युजी आणि त्यांचे मित्र गेस्टाड मधील रियाल्टो रेस्टॉरंटमध्ये बसले होते. याच ठिकाणी त्यांना बर्हिवक्र भिंगासारख्या प्रचंड “दृष्टी केंद्रणाची” जाणीव झाली. “माझ्या दिशेने येत असलेल्या गोष्टी, माझ्या आत शिरत असल्यासारखे दिसत होते. आणि माझ्या जवळून दूर जाणार्‍या गोष्टी माझ्या आतून बाहेर पडत असल्यासारखे वाटत होते. मी एवढा कोड्यात सापडलो होतो – माझे डोळे महाप्रचंड कॅमेर्‍याप्रमाणे झाल्यासारखे वाटत होते, आणि मी काही न करता ते त्यांचा अवधान बिंदू बदलत होते. आता मला या विचित्रपणाची सवय झालीय. आजकाल मी असाच पाहात असतो. तुम्ही मला तुमच्या कारमध्ये बसवून घेऊन जाता, तेव्हा माझी कॅमेरा सरसावून हिंडत असलेल्या कॅमेरामन सारखी स्थिती असते. समोरून येणार्‍या कार माझ्या आत शिरत असतात, आणि आपल्याला मागे टाकून पुढे जाणार्‍या कार माझ्यातून बाहेर पडत असतात. माझे डोळे कशावर तरी रोखले जातात, तेव्हा पूर्ण अवधानासह ते तिथे चिकटतात, कॅमेर्‍यासारखे.”
रेस्टॉरंटमधून युजी परत आल्यानंतर त्यादिवशी आरशात पाहात असताना त्यांच्या डोळ्याबाबत त्यांना आढळले की ते “स्थिर” झाले आहेत. ते खूपवेळ आरशासमोर थांबून राहिले आणि निरिक्षण केले तर त्यांच्या पापण्यांची उघडझापच होत नव्हती. जवळपास पंचेचाळीस मिनिटे ते आरशात पाहात राहिले – पण एकदाही पापण्यांची उघडझाप दिसली नाही! “उपजतपणे होणारी माझी पापण्यांची उघडझाप कायमची संपली होती. ”
पाचव्या दिवशी युजींना त्यांच्या श्रवणेंद्रियात झालेला बदल जाणवला. कुत्रा भुंकत असताना त्यांना ऐकू आले तेव्हा, कुत्र्याचा आवाज त्यांच्या आतून येत असल्यासारखे जाणवले. सर्व आवाज माझ्या आतूनच येत आहेत, बाहेरून नाही असे जाणवले. अजूनही ते तसेच आहेत.
पाच दिवसांत पाच इंद्रिये बदलली. सहाव्या दिवशी युजी सोफ्यावर निवांत पडून होते. व्हॅलेण्टाईन किचनमध्ये होती.
“आणि अचानक माझे शरीर अदृश्य झाले. माझ्यासाठी, तिथे शरीर नव्हते. मी माझा हात पाहिला.. “हा हात माझा आहे?” असा प्रश्न नव्हता, पण ती पूर्ण स्थितीच काहीशी तशी होती. स्पर्श वगळता, संपर्काचा बिंदू सोडता इतर काही तिथे आहे असे मला जाणवेना. मी व्हॅलेण्टाईनला बोलावले आणि तिला विचारले “तुला माझे शरीर सोफ्यावर दिसतेय का? ” माझ्या आतून मला काहीच जाणवत नाही की हे शरीर माझे आहे म्हणून. तिने माझ्या शरीराला स्पर्श केला आणि म्हणाली, “हे तुझे शरीर आहे.” आणि तिच्याकडून खात्री करून घेतली तरीही मला बरे वाटेना, माझे समाधान झाले नाही. मी स्वत:ला म्हणालो, “काय गंमत चाललीय ही? माझे शरीर हरवलेय. माझे शरीर सोडून गेले होते, आणि ते कधीही परत आलेले नाही.”
आता त्यांच्या शरीराच्या बाबतीत, युजींकडे फक्त स्पर्श होणारे बिंदूच तेवढे शिल्लक आहेत, कारण, ते म्हणतात दृष्टीची संवेदना ही स्पर्शाच्या संवेदनेपासून विभक्त आहे. त्यांच्या स्वत:च्या शरीराची संपूर्ण प्रतिमा तयार करणे त्यांना शक्य नाही, कारण स्पर्शाच्या संवेदनेच्या अनुपस्थितीत, त्यांच्या अवधानात संबंधीत बिंदू हरवलेले असतात.
आणि सर्वात शेवटी सातव्या दिवशी, युजी त्याच सोफ्यावर पडून होते, आराम करीत होते, “पकडमुक्त स्थिती”ची मजा घेत होते. व्हॅलेण्टाईन आत यायची, तेव्हा ती व्हॅलेण्टाईन आहे हे ते ओळखायचे. ती खोलीबाहेर जायची. त्यानंतर, फिनीश, कोरेपणा – कसलीही व्हॅलेण्टाईन कुठेच नाही. “हे काय आहे नेमके?” व्हॅलेण्टाईन कशी दिसते ती कल्पनाही मी करू शकत नाहीय”, त्यांना वाटायचे. ते किचनमधून येणारे आवाज ऐकत आणि स्वत:ला विचारत, “माझ्या आतून हे कसले आवाज येत आहेत?” पण मला त्या आवाजांशी संबंध काही जोडता येत नसे.” त्यांना आढळून आले की त्यांची सर्व इंद्रिये त्यांच्या आतल्या समन्वय साधणार्‍या यंत्रणेशिवाय काम करीत आहेत: समन्वयक हरवला होता. आणि तेव्हाच... 
माझ्या शरीरात काहीतरी घडत असल्याचे जाणवले: शरीराच्या विविध भागांतून जीवन ऊर्जा एका दृश्य केंद्राकडे जात होती. मी स्वत:ला म्हणालो, “आता तुझे आयुष्य संपले. तु मरणार आहेस.” तेव्हा मी व्हॅलेण्टाईनला बोलावले आणि म्हणालो, “मी मरतोय व्हॅलेण्टाईन आणि तुला या शरीराचे नंतर काहीतरी करावे लागणार आहे. हे डॉक्टरांना देऊन टाक, कदाचित त्यांना त्याचा वापर होईल. माझा दहन किंवा दफन क्रियेवर विश्वास नाही. तुला हवी तशी या शरीराची विल्हेवाट लावावी लागेलच. एकदिवस यातून दुर्गंध येऊ लागेल. त्यामुळे, ते देऊन टाक कुणाला तरी, व्हॅलेण्टाईन म्हणाली, “युजी, तुम्ही एक परदेशी माणूस आहात. स्वीस सरकार तुमचे शरीर स्वीकारणार नाही. विसरा त्याबद्दल.”   

त्यांचे जीवन बल भयानकपणे एका दृश्य बिंदूवर येऊन पोचले होते. व्हॅलेण्टाईनचे बेड रिकामेच होते. ते त्या बेडवर जाऊन पडले, मरायला तयार होऊन. ते जे बोलत होते त्याकडे व्हॅलेण्टाईनने, निश्चितच दुर्लक्ष केले होते. पण तिथून जाण्यापूर्वी ती म्हणाली होती, “एक दिवस तुम्ही म्हणता ही गोष्ट बदललीय,  दुसर्‍या दिवशी म्हणता आणखी दुसरंच काही बदललंय, तर तिसर्‍या दिवशी आणखी तिसरंच काहीतरी बदलतं. काय चालु आहे नेमकं? आता तर तुम्ही म्हणताय तुम्ही मरणार आहात. तुम्ही काही मरणार वगैरे नाही. तुम्ही ठिकठाक आहात, एकदम ठणठणीत” असं म्हणून ती खोलीबाहेर पडली. युजी त्यांची आपबिती पुढे सांगतात:
नंतर एक असा बिंदू आला जसे एखाद्या कॅमेर्‍याच्या अपार्चरचा पडदा स्वत:ला बंद करून घेत असावा. ही एकच उपमा मला सुचते. मी आता जे वर्णन करीत आहे ते आणि वास्तविक जसे घडले त्यात फरक आहे कारण त्यावेळी याप्रकारे विचार करायला तिथे कुणीच नव्हते. हा सर्व माझ्या अनुभवाचा भाग असला पाहिजे, नाहीतर मला त्याबद्दल बोलता आले नसते. तर, अपार्चर स्वत:ला बंद करून घेत होते, आणि आणखी काहीतरी होते जे तो पडदा उघडा ठेऊ पाहात होते. त्यानंतर थोड्यावेळाने काहीही करण्याची इच्छा राहिली नाही, ते अपार्चर बंद होणे रोखावेही वाटत नव्हते. अचानक, जसे झाले त्याप्रमाणे, ते बंद झाले. त्यानंतर काय झाले ते मला माहित नाही.
ही प्रक्रिया – ही मरण्याची प्रक्रिया एकोणपन्नास मिनीटे चालू राहिली. तो शारीरिक मृत्यू होता. युजी म्हणतात की अजूनही त्यांना तसे होते:
माझे हात आणि पाय थंड पडतात, शरीर ताठते, हृदयाचे ठोके मंदावतात, श्वास मंद होतो आणि श्वास घ्यायची मारामार होते. एका बिंदूपर्यंत तुम्ही तिथे असता, तुम्ही तुमचा शेवटचा श्वास घेता आणि मग, फिनीश. त्यानंतर काय घडते ते कुणालाही माहीत नाही.
युजी त्या प्रक्रियेतून बाहेर आले तेव्हा व्हॅलेण्टाईनने त्यांच्यासाठी कुणाचा तरी कॉल आला असल्याचे सांगितले. गोंधळलेल्या स्थितीत ते फोन घेण्यासाठी खाली गेले. काय झाले होते त्यांना माहीत नव्हते. ते शारीरिक मृत्यूमधून बाहेर पडले होते. ते कशामुळे परत जगात आले, त्यांना माहित नाही. कितीकाळ तो मृत्यू टिकून राहिला, त्यांना माहित नाही. “मी त्याबद्दल काही सांगू शकत नाही, कारण अनुभव घेणाराच समाप्त झाला होता: त्या मृत्यूचा अनुभव घेणाराच तिथे बिलकुल नव्हता...”
इथे, या “कॅलॅमिटी”चा एकमेव साक्षीदार डग्लस रोजस्टोन काय म्हणतो ते पाहाणे अगदी सुयोग्य होईल:
चोवीस उन्हाळे उलटले आहेत आता या गोष्टीला, जेव्हा सर्व रूपांतरणांत अत्यंत दुर्मिळ असणार्‍या, हे एकच खरे रूपांतरण आहे असे वाद ज्याबद्दल आहेत त्या रूपांतरणाचा – एका सामान्या माणसाच्या मृत्यूचा आणि पुनर्जन्माचा मला साक्षीदार होता आले.  हा माणूस “देव माणूस”, “निवड झालेला” किंवा जगदगुरू असण्यापेक्षा एक सर्वसामान्य माणूस होता. जे. कृष्णमूर्तींची व्याख्याने ऐकण्यासाठी १९६६ च्या उन्हाळ्यात मी सानेनला गेलो होतो तेव्हा या सगळ्याची सुरूवात झाली. त्या दिवशी मी गेस्टाड येथील माझ्या अपार्टमेंटमध्ये होतो. सायंकाळची वेळ होती. चंद्र नुकताच क्षितीजावर आला होता. कशामुळे तरी मला युजींना, त्यांच्या चॅलेटमध्ये कॉल करावा वाटला. मी केला. घराच्या मालकिणीने फोन घेतला. तिने मारलेली “युजीऽऽऽ तुमच्यासाठी फोना आहेऽऽऽ” अशी हाक मला फोनमधून ऐकू आली. तिच्या आवाजावरून व्हॅलेण्टाईनचे काहीतरी बिनसले आहे असे वाटत होते. ती म्हणाली, “युजींना काहीतरी होतंय, त्यांचं शरीर हलू शकत नाहीय. कदाचित ते मरत असतील.” मी म्हणालो, “जा आणि युजीला बोलवा, मी त्यांना बोलतो.” व्हॅलेण्टाईन म्हणाली, “ते येतील असे मला वाटत नाही.” पण मी अडूनच बसलो. आणि तेव्हा युजी फोनवर आले. त्यांचा आवाज फार दूरून येत आहे असे वाटत होते, “डग्लस, तुच इकडे ये आणि काय होतंय ते पाहा,” एका मेलेल्या माणसाला पाहायला येण्याचे ते आमंत्रण होते. मी पळालो. त्यावेळी रेल्वे चालू नव्हत्या. गेस्टाड आणि सानेनमधील अंतर तीन किलोमीटर आहे. मी चॅलेटमध्ये शिरलो आणि युजींच्या खोलीकडे गेलो. मला ते दृश्य अजूनही चांगलेच आठवते:व्हॅलेण्टाईन भीतीने पांढरीफटक पडली होती, आणि युजी कोचावर होते, शुध्दीवर नव्हते. त्यांचे शरीर धनुष्याकृती सारखे वाकले होते. नुकताच डोंगरावरून चंद्र वर आला होता. मी युजींना उठवू लागलो आणि खिडकीकडे घेऊन गेलो. त्यांनी चंद्राकडे ज्या पध्दतीने पाहिले ते माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. त्या खोलीत काहीतरी विचित्र प्रकार चालला होता. मी त्यांना विचारले, “काय होतंय?” ते म्हणाले, “हा शेवटचा मृत्यू आहे.”
महेश भट आणि मित्रांसमोर डग्लसने हे कथन केले आहे. युजींच्या मित्रांपैकीच एक, डग्लसचे आतापर्यंतचे ऐकणारे श्री. मूर्ती डग्लसला मध्येच थांबवत विचारतात, “म्हणजे ते मरणार आहेत असं ते सांगत होते असे तुला म्हणायचे आहे का?” डग्लस, “नाही, ते आधीच घडून गेले होते. युजी म्हणाले माझा फोन आल्याने ते परत येऊ शकले.” मूर्ती विचारतात, “तुझा काय प्रतिसाद होता डग्लस?” “मला खूप आनंद झाला होता; त्यांच्यामुळे मला खूपच आनंद झाला.”
त्यांच्यात काही उल्लेखनीय बदल दिसत होते काय?
“त्यांचे व्यक्तिमत्व बदलले नव्हते. ते नेहमीसारखेच हाताळायला विचित्र असणारा माणूस दिसत होते. पण त्यांच्यावर कसलाच तणाव जाणवत नव्हता. ”














(उद्याच्या भागात कॅलॅमिटी नंतर युजींचे लोकांशी झालेले बोलणे )

यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग २




युजींच्या संबंधाने लेखमाला पुढे न्यायची असल्याने इथं युजींची पार्श्वभूमी मांडावी लागत आहे; पुन्हापुन्हा तेच सांगतोय. मलाही ते थोडंसं कंटाळवाणं होतंय. पण हा माणूस कोणत्या पार्श्वभूमीतून आलाय याचा त्रोटक का होईना पण माग काढल्याशिवाय पुढे येणारी “युजी कृष्णमूर्ती” ही चीज नेमकी बनली कशी ते स्पष्ट होऊ शकणार नाही. म्हणून हा चरित्र-चिंतनटाईप पसारा वाढवावा लागत आहे. पण असोच.

व्याख्यानांना भरपूर प्रतिसाद मिळत असताना, चांगली कमाई होत असताना अचानक युजींची व्याख्याने देऊन पैसे कमावण्यातील रूचि निघून गेली आणि घरचा खर्च चालवण्याची जबाबदारी कुसूमकुमारी या त्यांच्या पत्नीवर पडली. कुसूमकुमारी या इंग्रजी आणि संस्कृतातील पदवीधर होत्या आणि वर्ल्ड बुक एनसायक्लोपेडिया च्या कार्यात त्यांना संशोधन सहायक म्हणून काम मिळाले. हे होत असताना श्री. व सौ. युजी या दाम्पत्याला त्यांच्या चौथ्या अपत्याचे वेध लागले होते; म्हणून कुसूमकुमारींना त्या अवस्थेत नोकरी नकोशी वाटत होती. पण पर्याय नव्हता. त्यांची कर्मठ भारतीय पार्श्वभूमी असली आणि इंग्लिशमधील पदवी असली तरी अमेरिकन जीवनशैलीबद्दलचे कुसूमकुमारींचे सुरूवातीचे कुतूहल मावळले आणि नंतर त्यांना अमेरिकन जीवनशैलीशी जुळवून घ्यायला अवघड जाऊ लागले. विचीत्र, दडपण आणणारे अमेरिकन जीवन त्यांना दुरचे वाटू लागले. पण त्या गाडे पुढे रेटू लागल्या आणि ऑफिसचे काम कधी-कधी घरीसुध्दा आणावे लागत असे. त्यांच्या कामाचा भाग म्हणून त्यांना भारतीय सांस्कृतिक आणि धार्मिक संकल्पनांवर टिपणे काढून प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक होते. पारंपारिक पध्दतीने युजींना  एक “जबाबदार नवरा” म्हणता येणार नसले तरी ते कुसूमकुमारींना आवश्यक असणारी पुस्तके वाचून आणि त्यांच्या शंकाची उत्तरे शोधून त्यांच्या कामात मदत करू लागले.
वसंत या अपंग मुलाची काळजी घेत युजी आता घर सांभाळू लागले. तिथले भारतीय मित्र युजींच्या घरी डोकावण्यास येत आणि भारतीय तत्वज्ञान आणि थिऑसॉफीवर तासन तास चर्चा चालत. अर्थात या चर्चा युजींना काही विशेष मिळाले होते म्हणून नसत तर आपण जशा साध्यासुध्या चर्चा करतो तशाच त्या असत. चौथ्या अपत्याच्या जन्मानंतर कुसूमकुमारींनी पुन्हा एकदा काम सुरू केले तेव्हा घरी “बेबीसिटींग” करण्याचे काम युजी करू लागले. सुमारे दोन वर्षे काम केल्यानंतर कुसूमकुमारींनी अत्यंत निराश होऊन काम सोडले आणि अमेरिका सोडण्याचा निर्णय घेतला. भारतात त्यांच्या बहिणीकडे मागे सोडून आलेल्या त्यांच्या दोन मुलींचा विचार त्यांना सतत अस्वस्थ करू लागला आणि आता त्यांचे चौथे अपत्य अमेरिकेसारख्या परक्या देशात, वडिलधारे, नातेवाईक आणि कुटूंबियांच्या देखरेखीशिवाय मोठे होणार असल्याने आणि वसंतच्याही परिस्थितीत फार मोठी सुधारणा दिसत नसल्याने या दोन्ही मुलांच्या भविष्याबद्दल त्यांना चिंता सतावू लागली. यात अजूनही बिकट परिस्थिती म्हणजे युजी आता सतरा वर्षांपूर्वी लग्न होताना असलेले युजी राहिले नव्हते. त्यांच्यात बदल होत राहिला आणि हा बदल जमीन आसमानचा होत जाऊन आता युजी घरातही अनोळखी माणसासारखे राहू लागले. सन १९५९ च्या शेवटास ती अपरिहार्य गोष्ट घडलीच आणि कुसूमकुमारींनी काहीही झाले, युजी अमेरिकेत राहाणार असले तरी भारतात परतण्याचा निर्णय पक्का केला. युजींना भारतात परतण्यासाठी केलेल्या विनवण्यांचा युजींवर काही परिणाम झाला नाही. युजींनी कुसूमकुमारींसाठी भारताची तिकीटे आणली आणि जवळ होते नव्हते तेवढे पैसे कुसूमकुमारींना देऊन टाकले. कुसूमकुमारी त्यांच्या दोन अपत्यांसह मद्रासच्या दिशेने निघाल्या आणि भारतात आल्यानंतर प्रवासात पुल्ला या रेल्वेस्टेशनच्या जवळ कुठेतरी त्यांची बॅग गहाळ झाली. या बॅगेत महत्वाच्या व्यक्तींनी युजींना लिहीलेली पत्रे, महत्वाची कागदपत्रे होती. हे अगदी युजींचा भूतकाळ ठरवून पुसला जात असल्यासारखे झाले आणि त्यांचे भारतात परतणे जवळजवळ अशक्य बनले.
आता पत्नी भारतात परत गेली असताना आणि युजींना त्या देशात पुढे राहायचे असल्याने त्यांना पुन्हा एकदा आश्रयाची गरज पडली. वर्ल्ड युनिव्हर्सिटीने त्यांना नोकरीची संधी दिल्यानंतर तो प्रश्न निकालात निघाला. युजींची ओळख एक प्रज्ञावान व्याख्याता एवढीच नव्हती तर त्यांना सखोल दृष्टी असलेला वक्ता म्हणूनही त्यांनी अमेरिकेत नाव कमावले होते. युनिव्हर्सिटीला युजींच्या हुशारीची उपयोगीता वाटू लागली कारण युनिव्हर्सिटीकडे जगाच्या विविध भागांत विद्यार्थ्यांकरिता निवासी महाविद्यालये काढायची योजना होती. युजींकडे ही योजना स्वीकारण्यावाचून पर्याय नव्हता; त्यांनी तशी ती स्वीकारली आणि युजींना त्या कामासाठी सर्वप्रथम भारतात पाठविण्यात आले. युजी त्यांचा व्याख्यानाचा “शो” आटोपण्यासाठी मद्रासला आले असताना कुसूमकुमारी त्यांना भेटल्या आणि पुन्हा एकदा कुटूंबात येण्याबद्दल विनवणी केली. ही युजींची त्यांच्या पत्नीसोबतची शेवटची भेट ठरणार होती. किमान मुलांकडे पाहून तरी युजींचे मन पालटेल असा विचार करून कुसूमकुमारींनी सगळ्या मुलांना सोबत आणले होते – पण युजी पत्थराहूनही कठोर होते. आता परतणे नव्हते. त्यांनी स्वत:च्या भूतकाळाशी कायमची फारकत घेतली होती. एका महिन्यानंतर युजी रशियात गेले आणि तिथून पुढे पूर्वी कधीही भेट न दिलेल्या युरोपातील मध्यवर्ती देशांत. असे दिसते या काळात की युजी त्यांना मिळालेल्या कामाबाबत त्रासून गेले होते, त्यांनी युरोपातील अनेक शहरांना भेटी दिल्या “कामाच्या निमित्ताने” नव्हे तर एक पर्यटक म्हणून, जगाच्या नकाशावरील प्रत्येक स्थळावर पावले टाकायची म्हणून. युजींबाबत खरे पाहाता, कोणतीही विशिष्ट योजना नसल्याने पान वार्‍यावर उडत जावे, भरकटू लागावे तसे झाले होते. शेवटी एकदाचे लंडनमध्ये पाऊल ठेवल्यानंतर ते पूर्णत: खलास झाले!
लंडनमध्ये ते डोके सरकलेल्या माणसासारखे रस्त्यांवरून निरर्थक फिरू लागले. लंडनमधील या कालखंडाला काही लोक त्यांच्या “आत्म्याची काळोखी रात्र” मानतात. युजींनी त्यांना “तो काही एखाद्या नायकाचा संघर्ष नव्हता की आत्म्यासोबत माझी कुस्तीही जुंपलेली नव्हती, त्यात काव्यात्म प्रसंगही नाही – ते फक्त मन मानेल तसे भटकणे होते” अशा शब्दांत फटकारले आहे.
इंग्लंडमध्ये हिवाळा सुरू होऊ लागला तशी त्यांची ही मनमानी थंड व्हायला सुरूवात झाली. त्यांच्याकडे शिल्लक असलेल्या पैशांतून नाईट ब्रिज रोडवरील केडागीन स्क्वेअर अपार्टमेंटस मध्ये त्यांनी जागा शोधली. दिवसभरादरम्यान अंग गोठविणारी थंडी टाळण्यासाठी आणि खोलीच्या चार भिंतीकडे पाहात राहून येणारा कंटाळा घालविण्यासाठी ते ब्रिटीश म्युझियममध्ये शिरत असत आणि कार्ल मार्क्सने ज्या टेबलाशी बसून दास कॅपिटल लिहीले त्या टेबलासमोरच्या टेबलाशी बसून राहात. खरे पाहाता युजींना कोणतेही संशोधन करण्यात किंवा पुस्तक वाचण्यात काहीच रस नव्हता. त्यांनी तत्वज्ञान आणि धर्म यावरील वाचन सोडून देऊन आता खूप वर्षे उलटली होती. पण तरीही काहीतरी वाचण्यासाठी तिथे आलो आहोत असे नाटक वठविण्यासाठी काहीतरी वाचायचे म्हणून ते “अंडरग्राऊंड स्लॅंग (शिवराळ बोली)” हा शब्दकोश घेऊन बसत आणि त्यात तासन तास डोके खूपसून बसत. लंडनच्या रस्त्यांवरील साईनबोर्डसवरील जाहीराती आणि भिंती, टेलीफोन बूथ आणि झाडांच्या खोडांवर लिहीलेले कॉलगर्ल्सचे नंबर आणि नावे वाचत युजी सायंकाळ घालवीत.
हा दिनक्रम चालू असतानाच उन्हे उतरू लागली, हवा तापली आणि दिवसा झक्क सूर्यप्रकाश पडू लागला – उन्हाळा सुरू झाला. उन्हाळा सुरू होताच मरगळलेल्या लंडनमध्ये अचानक प्राण फुंकला गेला. पण युजींमध्ये कोणताही बदल झाला नव्हता, त्यांच्यात काही फरक पडला नव्हता. बिघडत जाणार्‍या परिस्थितीत आणखी भर म्हणजे युजींचे खिसे रिकामे होऊ लागले. काही करून कशीतरी असलेली परिस्थिती पुढे रेटायची असेल तर पुन्हा एकदा काहीतरी करावे लागणार होते. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा-तेव्हा ते स्थलांतरीत लोकांचे (यात बहुतांशी भारतीय आणि पाकीस्तानी होते) हात पाहून भविष्य सांगू लागले आणि काहीवेळा तर त्यांनी पैशासाठी पाकशास्त्रावरील धडेही दिले. निश्चितच त्यांना “बेरोजगारी भत्त्या” वर राहाता आले असते पण त्यांनी ते केले नाही. विचित्र परिस्थिती होती. “मी लोकांच्या दातृत्वावर राहाणार्‍या उपटसुंभासारखा का जगतोय?” हा प्रश्नही त्यांच्या मनाला शिवत नसे. ती निश्चितच डोके फिरल्याची स्थिती होती. पर्याय शोधण्याचीही इच्छा ते गमावून बसले होते असे दिसते. त्यांनी स्वत:ला हवेसोबत इथे, तिथे आणि कुठेही उडत जाणार्‍या पानासारखे सोडून दिले.
याच काळात भारतात त्यांच्या पत्नीचे निधन झाले; ही बातमी जवळपास सहा महिन्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचली. मुले आई गमावून बसली होती; पण त्या कधीही भरून न निघणार्‍या हानीबद्दल सहानुभूती व्यक्त करणारे पत्र लिहीण्याशिवाय युजी काहीच करू शकले नाहीत. पाहूनही दिसत नसल्यासारखे होत, ऐकू येत असूनही ऐकले जात नसल्याच्या स्थितीत, जवळपास पागलपणाच्याच अवस्थेत युजी भटकत होते. काहीवेळा त्यांना थकवा जाणवत असे, काहीही खाण्याची इच्छा नसे. आणि एके दिवशी त्यांच्या लक्षात आले, खिशात फक्त पाच पेन्स शिल्लक राहीलेत! युजी आटोपले. ते आता कुठेही जाऊ शकणार नव्हते आणि काहीही करता येणार नव्हते. पण दैवयोगाने म्हणा किंवा कसेही लंडन मधील रामकृष्ण मिशनचे मुख्य असलेल्या स्वामी घनानंदांच्या रूपाने त्यांना मदत मिळाली. याच काळात युजींच्या शरीरावर बदल दिसून येऊ लागले. यापूर्वी ऋषिकेशच्या गुहेत असताना आलेले गूढ अनुभव आणि अड्यारमध्ये असताना “मृत्यूशी संमुख” होण्याचा अनुभव त्यांनी सरळसोटपणे उडवून लावला होता. पण आता ते सर्व अनुभव साठत येऊन गळ्यापर्यंत आले होते आणि युजींच्या अस्तित्वातच फेरफार व्हायला सुरूवात झाली होती. पारंपारिक हिंदू दृष्टीकोनातून पाहून याला कुंडलिनी जागरण म्हणता येईल. एके दिवशी रामकृष्ण मिशनच्या ध्यानगृहात बसले असताना त्यांना हा अनुभव आला. ही फक्त सुरूवात होती. त्यांच्याच शब्दांत –
मी काहीही न करता तिथे बसून होतो, ध्यानगृहात असलेल्या लोकांची मला दया येत होती. हे लोक ध्यान करायला बसले आहेत. कशाला जायचेय त्यांना समाधीत? त्यांना काहीही मिळू शकणार नाही – मी गेलोय या सर्व गोष्टींतून – ते स्वत:चीच थट्टा करीत आहेत, हसं करून घेत आहेत. असलाच मूर्खपणा आयुष्यभर करीत राहून आयुष्य मातीत घालविणे त्यांनी टाळावे यासाठी मी काय करू शकतो? हे करून ते कुठेही पोहोचणार नाहीत. मी तिथे बसलो होतो आणि माझ्या मनात काहीही नव्हते – फक्त रिक्तता होती – तेव्हा मला कसलीतरी अनोळखी जाणीव होऊ लागली: माझ्या शरीरात कसली तरी हालचाल होऊ लागली. माझ्या जननेंद्रियातून कसली तरी ऊर्जा डोक्याच्या दिशेने सरकत होती आणि डोक्यात छिद्र असल्यासारखे वाटत होते. ती ऊर्जा घड्याळाच्या काट्यांसारखी उलट आणि सुलट दिशेने वर्तुळाकार फिरत होती. ते विमानतळावर असलेल्या विल्स सिगारेटच्या जाहीरातीत दाखवल्यासारखे होते. माझ्यासाठी ती मजेची गोष्ट होती. पण मी त्या गोष्टीसोबत संबंध जोडू शकत नव्हतो. कुणीतरी मला खाऊ घालत होते, कुणीतरी माझी काळजी घेत होते, उद्याचा विचार नव्हता. तरिही, माझ्या आत खोलवर काहीतरी घडत होते...
निश्चितच “नवा माणूस” घडविल्या जात होता, जसे काही जन्मापासूनच यासाठी त्याची घडण आकाराला आली होती, किंवा कोणतेतरी गूढ बल त्याला मंदपणे पण खात्रीने त्या गोष्टीकडे घेऊन जात होते. पण त्या माणसाला ते जसे होईल, जशी त्याने कल्पना केली होती तसे ते घडणार नव्हते. आणि युजींच्या कथेचा हाच सर्वात विदारक, समजून घ्यायला अत्यंत गुंतागुंतीचा भाग आहे.
काहीही झाले तरी लंडनमधील त्यांचा मुक्काम संपला होता. त्यांनी रामकृष्ण आश्रम सोडला, पुढचा पल्ला गाठला आणि पॅरीसमध्ये येऊन पोचले. त्यांनी स्वत:चे भारतात परत यायचे तिकीट विकले आणि ३५० डॉलर हाताशी आणले. आणखी तीन महिन्यांसाठी ते निवांत झाले आणि पॅरीसमधील एका हॉटेलात त्यांनी मुक्काम ठोकला. पूर्वी लंडनमध्ये केले होते त्याप्रमाणेच त्यांनी पॅरीसचे रस्ते पालथे घालायला सुरूवात केली आणि विविध प्रकारच्या फ्रेंच चीज वर गुजराण सुरू केली, ही सवय ते जाईपर्यंत टिकून होती, पण आहार म्हणून नंतर चीजचे प्रमाण कमी झाले होते.
लंडनमध्ये झाले होते तसेच, पुन्हा एकदा त्यांचे पैसे संपत आले. पण पॅरीसमध्ये मात्र पाकशास्त्रावर धडे देऊन पैसे कमवायला स्थलांतरीत लोक नव्हते किंवा मदत मागायला जाता येईल असे मित्रदेखील नव्हते. पण तरीही खिसे उलटेपालटे करून जे काही पैसे मिळाले त्यात त्यांना जिनेव्हापर्यंत जाता आले. पुन्हा एकदा स्मृतीभ्रंश झालेल्या माणसाप्रमाणे त्यांनी हॉटेलातच खोली घेतली आणि रस्ते पालथे घालायला सुरूवात केली. दोन आठवडे उलटले आणि हॉटेलचे बील भागवून जेवणासाठीदेखील पैसे शिल्लक राहिले नाहीत. सगळ्या परिस्थितीचा कडेलोट झाला आणि भारतीय दूतावासात जाऊन तिथल्या अधिकार्‍याकडे भारतात पाठविण्याची विनंती करण्याशिवाय कोणताही दुसरा मार्ग शिल्लक राहिला नाही. 
सुदैवाने अजूनही त्यांच्याकडे स्वत:चे स्क्रॅपबुक होते. त्या स्क्रॅपबुकमुळे ते दूतावासातून बाहेर फेकले गेले नाहीत. नॉर्मन कझिन्स, त्याकाळी भारताचे रशियातील राजदूत असलेले सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी युजींबद्दल उधळलेली स्तुतीसुमने त्या स्क्रॅपबुकमध्ये वाचून निश्चितच व्हॉईस-कॉन्सुलवर छाप पडली. पण तो काहीच करू शकत नव्हता, कारण सरकारी खर्चाने युजींना भारतात पाठवता येणार नव्हते. केवळ एक पर्याय होता, तो म्हणजे युजींनी भारतातील त्यांच्या नातेवाईकांना लिहीणे आणि पैसे मागवणे - तो व्हॉईस कॉन्सुलने युजींना सुचवला.  हे चालु होते तेव्हा नेमके जिनेव्हातील रामकृष्ण मिशनचे मुख्य स्वामी नित्यबोधानंद व्हॉईस कॉन्सुलच्या चेंबरमध्ये बसलेले होते. त्यांनी लगेच तिथल्या तिथे युजींच्या हातात त्यांची बीले भागवण्यासाठी ४०० डॉलर ठेवले आणि युजींना सामान्य व्यक्तींसारखे वागवू नये, होता होईल तोवर सढळपणे मदत करावी अशी कॉन्सुलला विनंती केली. युजींच्या सुटकेसाठी पुन्हा एकदा रामकृष्ण मिशनची अदृश्य शक्ती उभी राहिली होती असे म्हणावे वाटते.

कॉन्सुलेटच्या कर्मचार्‍यांमध्ये एक वेगळी म्हणता येईल अशी महिला होती – व्हॅलेण्टाईन डि कार्व्हान. या बाई त्यावेळी त्रेसष्ट वर्षांच्या होत्या आणि युजी त्यांच्यापेक्षा सतरा वर्षांनी लहान होते. युजींविषयी त्यांच्या अंत:करणात खोलवर काहीतरी स्पर्शून गेले. थोडावेळाने त्यांचे युजींशी बोलणे होत गेले तसे या अनोळखी भारतीय माणसाला मदत करण्याची त्यांची इच्छा बळावली; मी राहाण्यासाठी तुमची स्वित्झर्लण्डमध्ये व्यवस्था करू शकते – तिथे रहा, खरोखर भारतात जायचे नसेल तर जाऊच नका असे त्या युजींना म्हणाल्या. युजींकरीता हे आणखी एक जीवनदान होते आणि दुसरा कोणताही विचार न करता त्यांनी बाईंचा प्रस्ताव स्वीकारला. खरे पाहाता, युजींकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता आणि वारा नेईल तिकडे जायचे असे तर होतच होते.
काही महिन्यांनंतर व्हॅलेण्टाईनने नोकरीचा राजीनामा दिला आणि युगानुयुगांपासून ताटातूट झालेल्या, पण नव्या युगाच्या उंबरठ्यावर पुन्हा भेट झालेल्या मित्रांसारखे ते दोघे राहू लागले. व्हॅलेण्टाईनला मिळालेली पेन्शनची रक्कम फार मोठी नव्हती पण त्यात घरखर्च आणि प्रवास होऊ शकत होता. युजींच्या सल्ल्यानुसार व्हॅलेण्टाईनने त्यांचे सगळे दागिने आणि वर्षानुवर्षांपासून गोळा केलेल्या वस्तू विकून टाकल्या आणि ते पैसे बॅंकेत ठेवले. नंतर, व्हॅलेण्टाईनने युजींच्या प्रवासासाठी एक वेगळा फंड देखील तयार केला.
व्हॅलेण्टाईन युजींची काळजी घेत होत्या पण पुढे काय वाढून ठेवले आहे त्यांना माहित नव्हते. पुढची चार वर्षे तुलनेने निवांत गेली. भरपूर मोकळा वेळ आणि करायला कोणतेही महत्वाचे काम नसल्याने व्हॅलेण्टाईन आणि युजी प्रवासासाठी जेनेव्हाबाहेर पडले. युजींच्या बाबतीत त्यांचा “शोध” जवळपास समाप्त झाला होता. युजी झोप काढत, खात आणि टाईम मॅगझीन वाचत – तुरळक प्रवास करीत आणि व्हॅलेण्टाईन सोबत किंवा एकटेच लांबवर चालायला जात. या काळाची तुलना अंड्यातून पिल्लू बाहेर पडते त्यापूर्वीच्या काळाशी करता येईल. नाट्यमय कलाटणी घेण्यासाठी शरीर स्वत:ला तयार करीत होते आणि ते शतकानुशतकांपासून उभ्या असलेल्या मानवी विचाराचा पायाच हादरवून सोडणार होते.
युजींची सत्याचा, मोक्षाचा शोध संपला होता आणि आता कसलेही वाट पाहाणे नव्हते तरी त्यांच्याबाबतीत रोमांचक, आश्चर्यकारक आणि गंमतीशीर गोष्टी घडायला सुरूवात झाली होती. त्यांनी त्यांच्या हाताचे तळवे किंवा शरीराचा कोणताही भाग एकमेकांवर घासला तर फॉस्फरसच्या चमचमाटासारखा चमचमाट होऊ लागला. असह्यपणे डोकेदुखी सुरू झाल्याने बेडवर अंग टाकले तर ठिणग्या उडू लागत. ती वीज होती. शरीर विद्युत-चुंबकीय क्षेत्र बनले होते. त्यांना सतत डोकेदुखी किंवा ते म्हणतात त्या शब्दांत “मेंदूत भयंकर वेदनां” चा त्रास होऊ लागला. पण युजी त्यांना काय होत आहे त्याबद्दल व्हॅलेण्टाईनशी चर्चा करीत नसत. शरीरात होणारे हे सर्व बदल आणि डोकेदुखीची सत्रे यांतच तीन वर्षे उलटली. युजी त्यांच्या मूळ वयापेक्षा कितीतरी लहान दिसू लागले. त्यावेळी घेतलेल्या त्यांच्या छायाचित्रांमध्ये ते खरोखर वीस-एकोणवीस वर्षाच्या मुलासारखे दिसतात. पण नंतर ते बदलणार होते आणि वयाच्या एकोणपन्नासाव्या वाढदिवसानंतर पुन्हा एकदा वय वाढणार होते.  

दर उन्हाळ्यात जे. कृष्णमूर्ती स्वित्झर्लंण्डमधील सानेन इथे व्याख्याने द्यायला आणि चर्चासत्रांसाठी येत. युजींच्या मित्रांकडून काहीवेळा त्यांना या व्याख्यानात ओढून नेण्याची काही उदाहरणे सोडली, तर युजी जेके आणि त्यांच्या प्रशंसकांपासून आदरपूर्वक दूरच राहात. पण असे घडू लागले की चिकित्सक लोक दररोजच युजी राहात असलेल्या चॅलेटमध्ये येऊ लागले आणि त्यांच्याशी चर्चा करू लागले. अपरिहार्यपणे चर्चा आध्यात्मिक गोष्टींकडे वळत असे आणि युजींसमोर मांडलेला कोणताही आध्यात्मिक मुद्दा कठोरपणे तिथल्या तिथे खोडून काढीत आणि जेकेंच्या शिकवणूकीच्या चिंध्या करीत. हळूहळू जे.कृष्णमूर्तीयन्सचा युजीच्या अवतीभवतीचा वावर वाढू लागला; काही लोक हे “दुसरे कृष्णमूर्ती कोण” हे पाहायच्या कुतूहलाने येत तर काही स्वत:च्या शंका दूर (!) करायला येत तर काही लोक जे.कृष्णमूर्तींना ऐकून युजींना आव्हान द्यायला येत. प्रत्येक उन्हाळ्यातील हा शिरस्ताच बनून गेला. जे. कृष्णमूर्तींच्या सतत जवळ राहाणारे लोक जसे मादाम स्काराव्हेली आणि डेव्हीड बोह्म देखील कुतूहल खाजवले गेल्याने सहज चक्कर मारून जात. काही लोक, युजींसोबतच्या घरघुती वातावरणात चालत आहेत असे वाटणार्‍या गप्पा वाढत गेल्या तसे जेकेंकडे पाठ फिरवली आणि युजींचे मित्र बनले.
हे सगळे चालू असताना, विरोधाभास म्हणा की गूढ म्हणा, १३ ऑगस्ट १९६७ रोजी युजींना जेकेंचे उन्हाळ्यातील व्याख्यान ऐकायला ओढून नेण्यात आले. भव्य तंबू मध्ये तिथे युजी बसून होते – ऐकत होते आणि ऐकत नव्हतेही. व्याख्यानाच्या ओघात जे. कृष्णमूर्ती म्हणू लागले, “...त्या शांततेत, तिथं मन नसतं; तिथे कृती असते...”
आघात झाल्यासारखे, युजींनी ते ऐकले आणि अचानक त्यांना तो सर्वच प्रकार मजेशीर वाटू लागला. जेके वास्तविक युजी ज्या स्थितीत होते त्या स्थितीचे वर्णन करीत होते! हे कसे काय घडू शकते? पण ते खरे होते.  “मी त्या स्थितीत आहे तर!” युजींनी स्वत:शी विचार केला. असं जर असेल तर सर्व प्रकारच्या लोकांना ऐकत, संघर्ष करीत, जिसस, बुध्दांच्या स्थितीचा शोध घेत मी ही तीस वर्षे कशासाठी झक मारतो होतो??, मी तर तिथे अगोदरपासूनच आहे! “मी त्या स्थितीत आहे तर!” स्वत:शीच काढलेला तो उदगार, खूपच आश्चर्याच्या भावनेसह थोडावेळ टिकून राहीला. आणि अचानक स्वत:च्या स्थितीचे जेकेंकडून वर्णन ऐकत तिथे बसून राहाणे स्वत:चीच टवाळी ऐकून घेण्यासारखे वाटू लागले. युजी उठले आणि तंबूबाहेर चालते झाले. पण ते तिथंच संपले नव्हते. युजी निश्चितच त्या स्थितीत होते – बुध्दाची स्थिती आणि सर्व एन्लायटन्ड मास्टर्सची स्थिती. पण ती स्थिती नेमकी आहे तरी कशी? पुढच्या क्षणीच या प्रश्नाने दुसर्‍या प्रश्नाला जन्म दिला “मी त्या स्थितीत आहे हे मला कसे काय कळणार?” हा प्रश्न रोमरोमात भिनलेल्या वेडासारखा त्यांच्यात पेटून उठला. “अत्यंत तीव्रतम आकांक्षेसह मला बुध्दाची जी स्थिती हवी होती, जी मी सगळ्यांकडून मागत सुटलो होतो त्या स्थितीत मी आहे हे मला कळणार कसे? मला कसे कळणार?”


पुढच्या दिवशी तोच प्रश्न रोमरोमात पेटून उठला असताना युजी चेस्टनट वृक्षाखाली विसावलेल्या एका बाकड्यावर बसून होते, समोर सानेनच्या भूमीतील नीलपर्वताची सात शिखरे आणि सात दर्‍या निळ्या प्रकाशात न्हात असल्याचे न्याहाळत होते. प्रश्न तसाच धडधडत होता, त्यांचे पूर्ण अस्तित्वच त्या एका प्रश्नाने झपाटले गेले होते “मला ते कळणार कसे?” दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर ते स्वत:च प्रश्न बनले होते. तो प्रश्न तसाच टिकून होता, “मी त्या स्थितीत आहे हे मला कळणार कसे?”  माझ्या आत कसलीतरी विचित्र दुभागणी आहे: आत कुणीतरी असा आहे जो जाणतो की तो त्या स्थितीत आहे. त्या स्थितीचे ज्ञान – जे मी वाचलेय, जे मी अनुभवलेय, ज्याबद्दल त्यांनी बडबड करून ठेवलीय – हेच ते ज्ञान जे त्या स्थितीकडे पाहातेय – त्यामुळे त्या स्थितीचे प्रक्षेपण करणारे हेच ते ज्ञान आहे. मी स्वत:लाच म्हणालो: “इकडे पाहा जरा म्हातार्‍या कार्ट्या, चाळीस वर्षांनंतरही तु एक पायरीदेखील वर चढला नाहीस; तो चौक क्रमांक एक मध्येच आहेस. तु हा प्रश्न विचारास तेव्हा ही स्थिती प्रक्षेपीत करणारे हेच ते ज्ञान आहे. तु त्याच स्थितीत राहून तोच प्रश्न विचारतो आहेस, “मला कसे कळणार?”  या ज्ञानामुळे, त्या लोकांच्या स्थितीच्या वर्णनामुळे, तुझी ही स्थिती निर्माण झाली आहे. तु स्वत:चीच थट्टा करतो आहेस. तु एक पार वाट लागलेला मूर्ख आहेस.” तरीही एक विचित्र भावना होती की ती स्थिती हीच आहे. आणि तरीही प्रश्न उठत होता, “मला कसे कळणार हीच ती स्थिती म्हणुन?” – या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हते – तो प्रश्न एखाद्या भोवर्‍यात सापडलेल्या प्रश्नासारखा होता – तो गरगर राहिला – गरगरत राहिला...
आणि अचानक तो प्रश्नच गायब झाला. युजी खरोखर आणि संपूर्णत: संपून गेले. ती रिक्तता नव्हती, रे रिकामे होणे नव्हते, ते बौध्द तत्वज्ञानात सांगितलेले निर्वाण नव्हते, आणि सर्व जागृत पुरूष ज्या स्थितीत आहेत असे मानले जाते ती ही स्थिती नव्हती. फक्त प्रश्न मावळला होता.
प्रश्न मावळून गेला तसे विचारातील प्राण निघून गेला – संस्कृती आणि धर्म यांनी स्फटीकरूप दिलेला आणि मजबूत केलेला विचार खलास झाला. विचारांना सांधणारा “मी”, सर्व इंद्रियजन्य अनुभवांचे तुकडे गोळा करणारा, त्यांची तुलना करणारा आणि एकमेकांशी जुळवून पाहाणारा मानसिक समन्वयक” अचानक निघून गेला. आता दुवा निखळला, दुरूस्ती करणारी, सफाई करणारी, शरीराला ऊर्जस्वल करणारी, रेचन करणारी प्रचंड ऊर्जा मोकळी करीत विचाराचे सातत्य खंडीत झाले, विचाराचा स्फोट झाला.
युजी या स्थितीला मुद्दाम कॅलॅमिटी: चक्रीवादळ म्हणतात जेणेकरून लोकांनी, विशेषत: धार्मिक पठडीतील लोकांनी त्या स्थितीचे कसलीतरी प्रसादपूर्ण, सौंदर्यसंपन्न, प्रेमसंपन्न, परमानंदपूर्ण स्थिती म्हणून विश्लेषण करू नये, तिला “एन्लायटन्मेंट” म्हटले जाऊ नये. तसे बिलकुल होता कामा नये. शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या ती स्थिती एक यातना आहे. या दृष्टीकोनातून ती एक चक्रीवादळ आहे. पुढच्या सात दिवसांपर्यंत, सात विचित्र बदल होत गेले आणि त्या बदलांनी त्यांना ते म्हणतात त्या “नॅचरल स्टेट” – निसर्गदत्त स्थितीत फेकले. ती सगळी वेदनादायी प्रक्रिया संपूर्णत: गायब होण्यासाठी आणखी सहा महिने लागले.
ती पेशीय उत्क्रांती होती, ते एक सर्वव्यापी जैविक उत्परिवर्तन होते. तो नैसर्गिक स्थितीतील एका “नव्या” व्यक्तीचा जन्म होता.

१९६७ हे वर्ष संपत असताना युजींना कर्नाटकातील श्रृंगेरी येथे जावे लागले आणि तिथे श्रृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांची कशी कोण जाणे पण गाठभेट झाली. युजींमध्ये झालेल्या विचित्र शारीरिक बदलांबद्दल ऐकल्यानंतर श्री अभिनव विद्यातीर्थ स्वामी या शंकराचार्यांना युजी हे जीवन्मुक्त असल्याबद्दल संशय उरला नाही आणि असे मानले जाते की ते यावेळी म्हणाले होते, “माझ्या व्यक्तीगत अनुभवात मला असल्या गोष्टी माहित नाहीत...अशा निर्विचार स्थितीचा धक्का शरीर पचवून पुन्हा अभंग राहू शकते हे अत्यंत दुर्मिळ आहे. धर्मग्रंथांत सांगितल्यानुसार, असल्या घटनेनंतर तीन दिवसांच्या किंवा बहात्तर तासांच्या आत शरीर मरण पावते. शरीराने त्याचे जैविक बल टिकवून ठेवले असेल आणि ते नष्ट झाले नसेल तर निश्चितच ते मानवतेला वाचवण्यासाठी घडेल असेल...”
शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे युजी स्वत:ला कसल्याही प्रकारचा मसिहा मानत नसत. त्यांना जे घडले होते ते ज्या स्थितीच्या शोधात होते ती स्थिती नव्हती. सर्व प्रकारचा शोध आणि साधनांच्याउपरही ते घडून आले होते. आता त्यांना कुठल्यातरी शांत ठिकाणी राहून आयुष्य कंठायचे होते. युजींना निवृत्त होण्यासाठी तुंगा नदीच्या तीरावरील शांततापूर्ण परिसर सुयोग्य वाटत होता. त्यांनी काही काळ शांतपणे शंकराचार्यांना ऐकले आणि स्वत:च्या एकांतवासाच्या विषयाला हात घातला. इथे शंकराचार्यांनी “तुमची इच्छा असेल तर आजूबाजूची कुठलीही जागा तुम्हाला देण्याची जबाबदारी माझी, पण एकांतात राहाण्याची तुमची कल्पना टिकू शकणार नाही, तुम्ही जंगलात रहा की पर्वतावरी गुहेत राहा, लोक तुमच्याकडे गर्दी करणे थांबवणार नाहीत... ” असे म्हटल्याची नोंद आहे.

(उद्या “त्या” स्थितीत नेमके काय घडले त्याबद्दल)



४ ऑक्टोबर, २०१०

यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग एक

Copyright Notice
My teaching, if that is the word you want to use, has no copyright. You are free to reproduce, distribute, interpret, misinterpret, distort, garble, do what you like, even claim  authorship, without my consent or the permission of anybody. - U.G.

U.G. Krishnamurti
यापूर्वी माझ्याकडून यु.जी. कृष्णमूर्तींवरून सुचलेल्या माझा दोस्त युजिनी आणि वाचा आणि शोधा या लिखाणात दोनवेळा काही अंशी (म्हणजेच अगदी शंभरातला दशलक्षावा टक्का) यु.जी. कृष्णमूर्तींवर लिहून झालंय. खरोखर माझा असा कुठलाही दोस्त कधी नव्हता. पण यु.जीं.चे रंग वापरून एक पात्र रंगवण्याचा विचार आला आणि ते लिहून काढलं होतं. त्या पात्राच्या तोंडून यु.जी. कृष्णमूर्तींनी सांगितलेल्या गोष्टी अर्थात भारतीय आध्यात्मिक संचिताबद्दल खडे बोल वदवून घेण्याचा विचार होता - तो बारगळला. कारण असं पात्र उभं करायला मी काही लेखक नाही.
Rajneesh aka Osho


    पण कधीकाळी रजनीशांच्या सोफास्टीकेटेड बाबागिरीच्या आधीन जाऊन आयुष्यातील काही काळ मी घालवला आहे; त्यात सगळं काही माझ्यापुरतं जवळून अभ्यासलं आहे आणि तेच असं कधीतरी बाहेर पडत राहातं. मला वाटतं हेच जगातल्या सगळ्या लोकांबद्दल होत असतं. कुणालातरी काहीतरी खुणावतं, त्या खुणावणार्‍या गोष्टीकडे अधिकाधिक जवळ जायला होतं, त्याबद्दल माहिती होते आणि तीच माहिती तुम्ही जगासमोर मांडत राहाता. तोच उपजिवीकेचा मार्ग देखील बनतो. हे जगात असलेल्या सगळ्या अभ्यासविषयांना आणि त्या-त्या विषयाच्या अभ्यासकांना लागू आहे - पण एका क्षेत्राचे अभ्यासक यात मोडत नाहीत ते म्हणजे आध्यात्मिक क्षेत्र. कारण आध्यात्माच्या प्रदेशात पाऊल टाकलेला माणूस आणि त्याचं तिकडे वळलेलं पाऊल हा त्याला या लौकिक जगतातलं काही नकोय, त्याची रूचि जगाच्या पार जे आहे त्यात आहे याचा स्वयंसिध्द पुरावा आहे असं हजारो वर्षांपासून या भूमीत मानण्यात आलं आहे - यामुळेच भगव्या वस्त्रांना आणि संन्याशांना आदर मिळत आलेला आहे.
    अगदी अलिकडे म्हणजे ६२-७२ च्या दशकात रजनीश:ओशो यांनी "सगळं काही सोडून गिरीकंदराच्या दिशेने जाणे आणि स्वत:चा शोध घेत राहाणे" ही संन्यासाची व्याख्या बदलली आणि "कुठंही न जाता जिथे आहोत तिथेच, सगळ्या सुखोपभोगांच्या सान्निध्यात राहून संन्यासी असणे" असं नवं रूप संन्यासाला दिलं तोच त्यांचा "नव-संन्यास." पुढे मग गोष्टी वाढत गेल्या आणि "सेक्सगुरू" या उपाधीपर्यंत रजनीशांचा प्रवास झाला. ६२-७२ पासून सन १९९० मध्ये रजनीशांचा मृत्यू होईपर्यंत त्यांनी निर्माण केलेल्या नव-संन्यासाच्या वातावरणातून आजच्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर वेळीअवेळी प्रवचनं देणार्‍या बहुतांशी बाबा/गुरू लोकांचे भरण-पोषण झाले आहे. आध्यात्माचं क्षेत्र देखील एक धंदा बनला आहे हे आजचं वास्तव आहे.
    धंदा बनलेल्या आजच्या आध्यात्म या क्षेत्राची आणखी एक खूबी म्हणजे इतर धंद्यांसारखी यात खर्‍याखुर्‍या वस्तूंची डिलेव्हरी द्यावी लागत नाही. जे काही असायचं ते गुलदस्त्यातच असतं - ते तसंच गुलदस्त्यात राहातं. आणि कशाचीही डिलेव्हरी न देता हा धंदा जोरात चालू असतो. त्यामुळंच आध्यात्माबद्दल जो बोलतो तो ढोंगबाज बाबाचा चेला असला पाहिजे किंवा "तसा होण्याचा त्याचा प्रयत्न असावा" असा एक समज जगभरात पसरलेला आहे. पुन्हा एकदा मी यु.जी. कृष्णमूर्तीं हा मुख्य धागा पकडून आज लिहायला बसलो आहे. पुढे जाईल तसं इतर अनेक धाग्यांनाही हातात घ्यावं लागणार आहे - सोडावं लागणार आहे कारण त्यांची विशिष्ट अशी विचारसरणी नाही - तर यु.जी. कृष्णमूर्ती हा भारतात उदयाला आलेल्या समस्त आध्यात्मिक विचारसरणींच्या विरूध्द, अगदी टोकाचा परिणाम आहे. त्यांनी उभ्या केलेल्या प्रश्नांमुळे आध्यात्मच नव्हे तर मानवी बुध्दीमत्तेशी निगडीत असलेल्या प्रत्येक क्षेत्राच्या वैधतेवारच प्रश्नचिन्ह लागतं.  
    ते कसं लागतं हे पाहाण्यापूर्वी यु.जी. कृष्णमूर्तींच्या पार्श्वभूमीबद्दल एकदा थोडक्यात आटपून घेतो. यु.जी. कृष्णमूर्ती (उप्पलुरी गोपाला कृष्णमूर्ती) हे जे. कृष्णमूर्ती (जिद्दू कृष्णमूर्ती) यांचे समकालीन. यु.जीं.चे आजोबा हे सी.डब्ल्यू. लीडबीटर आणि अ‍ॅनी बेझंट यांच्या थिऑसॉफिकल सोसायटीमधील कारकिर्दीदरम्यान सोसायटीला उदारपणे आर्थिक मदत देणारी असामी होते; व्यवसायानं ख्यातनाम वकील होते. लीडबीटर आणि अ‍ॅनी बेझंट यांनी जे. कृष्णमूर्तींची त्यांच्या बालपणापासूनच ते नव्या युगाचे "मैत्रेय" बनून जगापुढे यावेत या इराद्याने निवड केली होती. जे. कृष्णमूर्ती हे नव्या युगाचे बुध्दपुरूषच व्हावेत (ते पुढे बुध्दपुरूष म्हणून जगासमोर आलेही, पण थोडासा यू टर्न घेऊन ), थोडक्यात बुध्दत्व प्राप्ती हेच ध्येय समोर ठेऊन जे.कृष्णमूर्तींचे पालन-पोषण केले जात होते. या पालन पोषणात ध्यान, साधना आणि तसलेच सर्व प्रकार आले. जे.कृष्णमूर्तींबद्दल हे होत असतानाच कुमारवयीन यु.जी. कृष्णमूर्तीदेखील थिऑसॉफिकल सोसायटीचे सदस्य बनले. दुसरीकडे युजींना त्यांच्या कर्मठ घरातच लहानपणापासून साधु, बैरागी, साधक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींना जवळून पाहायला मिळत होते; कारण त्यांच्या पंगती युजींच्या आजोबांच्या घरी सतत उठत असत.
Raman Maharshee


    या कुमार वयातच कुठेतरी, मोक्ष खरोखर आहे काय, ती अवस्था कशी असते, ती मला मिळवायचीय ही ओढ युजींच्या मनात निर्माण झाली. पौगंडावस्था ते एकविशी या दरम्यानच्या कालखंडात युजींनी ब्रम्हचर्य पालनासह सर्व प्रकारच्या आध्यात्मिक साधना केल्या. कुणीतरी स्वामी शिवानंद नावाच्या व्यक्तीबरोबर त्यांनी हिमालयात सात वर्षे घालवली. मोक्षाची तीव्रतम तहान लागलेली असताना, साधना चालू असताना आणि आजूबाजूचे पूरक वातावरण या सर्व पार्श्वभूमीवर खरोखर मोक्ष मिळवलेली कुणी व्यक्ती हयात आहे काय? ती कशी आहे? ती आपल्याला मोक्ष देऊ शकेल काय? हे प्रश्न मनात असतानाच युजींनी ऋषि मानल्या जाणार्‍या, अरूणाचलम या पर्वताच्या सान्निध्यात राहाणार्‍या रमण महर्षींची भेट घेतली. या भेटीदरम्यान युजींचा रमण महर्षींना थेट सवाल होता "हा जो काही मोक्ष म्हणतात, तो तुम्ही मला देऊ शकता काय?" रमण महर्षींनी साशंकपणे उत्तर दिले, "मी देऊ शकतो, पण तु तो घेऊ शकतोस काय?" या उत्तरामुळे युजींचा आध्यात्मिक साधना आणि साधक याबद्दलचा संपूर्ण दृष्टीकोनच पलटला आणि त्यानंतर त्यांनी कधीच आध्यात्मिक बाबतीत कुणाच्या सल्ल्याची, मार्गदर्शनाची अपेक्षा ठेवली नाही; पण मोक्षाचा त्यांचा शोध मात्र सुरूच राहिला.



J. Krishamurti
यु.जी. कृष्णमूर्ती हे भारतातील थिऑसॉफिकल सोसायटीचे अध्यक्ष बनलेल्या जिनराजदास यांचे सहायक म्हणून काम करू लागले. यादरम्यानच त्यांनी मद्रास विद्यापीठात मानसशास्त्र, तत्वज्ञान आणि गूढवाद हे विषय घेऊन पदवीचे शिक्षण सुरू केले; ते त्यांनी पूर्ण केले नाही. थिऑसॉफिकल सोसायटी ही वंश, वर्ण, जात यांचा भेदभाव न करता विश्वबंधुत्वाचे माहेरघर उभे करणे -  धर्म, तत्वज्ञान आणि विज्ञान यांच्या तुलनात्मक अभ्यासाला प्रोत्साहन देणे -निसर्गाच्या अदभुत नियमांचा आणि माणसातील सुप्त शक्तीचा तलास घेणे या उद्देशाने १८७५ मध्ये न्यूयॉर्कमध्ये अस्तित्वात आलेली आणि नंतर अड्यार, चेन्नईमध्ये मुख्यालय स्थापन झालेली सोसायटी. युजींची आध्यात्मिक क्षेत्रातील तोपर्यंतची पार्श्वभूमी, थिऑसॉफिकल सोसायटीतील नोकरी आणि त्यांना उपजत मिळालेली वक्तृत्वाची देणगी यांतून यु.जी. थिऑसॉफिकल सोसायटीचे व्याख्याते म्हणून पुढे आले. या काळात भारतातील आघाडीच्या जवळपास प्रत्येक महाविद्यालयांत थिऑसॉफीवर व्याख्याने दिली. युजींनी पुढे सोसायटीच्या वतीने आंतरराष्ट्रीय व्याख्यान मोहीमेत नॉर्वे, बेल्जियम, जर्मनी आणि अमेरिकेला भेटी दिल्या. या व्याख्यान मोहिमेपूर्वीच युजींचा कुसूमकुमारी या नावाच्या तरूणीशी विवाहदेखील झाला. यु.जी कृष्णमूर्तींचा हा प्रवास सुरू असतानाच जे. कृष्णमूर्ती हे एप्रिल १९११मध्ये इंग्लंडला जाऊन तिथे पाश्चिमात्य जग, रितीरिवाज, भाषा, तत्वज्ञान आणि त्यांची "मैत्रेय" बनण्याची साधना करीत असतानाच थिऑसॉफिकल सोसायटीचे व्याख्याते म्हणूनही पुढे आले होते. स्वत:च्या आध्यात्मिक साधनेत निराश झालेले, सर्व प्रकारचे गुरू आणि साधनेबद्दल निराश झालेले युजी थिऑसॉफीशी जुळवून घेतात आणि त्या तत्वज्ञानाचा व्याख्याता का होतात? हा प्रश्न आहे. युजींनीच एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे उपजिवीका चालविण्यासाठी तोच एक लाभदायक मार्ग होता. पण थिऑसॉफीकल सोसायटीचा व्याख्याता म्हणून काम करीत असताना सातव्या वर्षी थिऑसॉफीबद्दल त्यांच्या मनात तिटकारा निर्माण झाला. (थिऑसॉफीकल सोसायटीच्या सदस्यांची बैठक होत असे तेव्हा एकमेकांची ओळख करून घेताना लोक म्हणत- "नमस्कार, मी अमुक-तमुक, मी पूर्वीच्या जन्मात इंग्लडची राणी होते, मी राजा अशोक होतो")
    सन १९४७ ते ५३ या कालखंडात यु.जी. कृष्णमूर्ती जे. कृष्णमूर्तींच्या व्याख्यानांत उपस्थित राहात होते; जेकेंचे तत्वज्ञान पटत नसले, ते तत्वज्ञान स्वत:च्या अनुभवाच्या कसोटीवर खरे उतरत नसले तरी. जेकेंसोबत त्यांच्या सतत चर्चेच्या फैरी झडत होत्या. सरतेशेवटी इथेही युजींची जेकेंशी असहमती झाली - तो किस्सा युजींच्याच भाषेत पाहाण्यासारखा आहे -
"होता होता, शेवटी मी आग्रह धरलाच, "खरे सांगा तुम्ही माझ्यावर फेकीत असलेल्या या आध्यात्मिक गुंत्यामागे खरोखर काही आहे का?" 
आणि तो पोट्टा म्हणाला "तु स्वत:होऊन हा गुंता समजून घेण्याचा तुझ्याकडे कोणताच मार्ग नाही"
संपलच! आमच नात तिथेच संपलं - "मला स्वत:होऊन ते जर समजून घेण्याचा मार्ग नसेल, तुमच्याकडे जर देण्याचा मार्ग नसेल, तर मग आपण ही झक नेमकी कशासाठी मारतोय?" मी यात सात वर्षे मातीत घातलीत. रामराम, तुम्हाला पुन्हा भेटण्याचीदेखील माझी इच्छा नाही. यानंतर मी तिथून चालता झालो.
    जेकेंसोबत असा काडीमोड झाल्यानंतर, युजींनी त्यांची थिऑसॉफिकल सोसायटीची व्याख्याने चालूच ठेवली.  इथेच त्यांना स्वत:तील गूढ शक्तींची सतत जाणीव होऊ लागली होती अशा नोंदी आहेत. या काळापर्यंत युजींना एक मुलगा आणि दोन मुली अशी तीन अपत्ये झाली होती. त्यापैकी सर्वात मोठ्या वसंत या मुलाला पोलीओसदृश्य आजार झाला होता. जे. कृष्णमूर्तींनी असा विश्वास होता की त्यांनी मसाज केल्यास मुलाचे पाय बरे होतील; त्यांनी मोजक्याच वेळा पण दुर्धर आजार झालेल्या रूग्णांना हिलींग करून बरे केले आहे असा समज होता; पण युजींना ते पटत नव्हते. शेवटी युजींच्या पत्नीच्या आग्रहामुळे जेके त्या मुलावर मसाजमधून हिलींगचे प्रयोग करू लागले. त्याने काही फरक पडला नाही; युजींच्या मुलाची परिस्थिती बिघडत चालली होती. शेवटी युजींनी पुढील उपचारासाठी अमेरिकेचा रस्ता पकडला आणि मुलावर उपचार करण्यासाठी गेलेले श्री आणि सौ. युजी पाच वर्षे अमेरिकेत राहिले. वर्षाभरात मुलगा पायावर उभा राहिल अशी डॉक्टरांनी खात्री दिली होती. युजींनी सोबत घेतलेला पैसा फक्त मुलाच्या उपचारांसाठीच पुरेल एवढा होता. पुढे वर्ष उलटले तसा तोही संपू लागला आणि पैसा कमावणे आवश्यक बनले. काय करायचे? व्याख्यान. ते व्याख्यान देऊ शकत होते. अमेरिकेतील व्याख्याने भारतातील व्याख्यानांसारखी फुकट नसणार होती. एका व्याख्यानाला शंभर डॉलर मिळू शकत होते.  युजींनी व्याख्याने द्यायला सुरूवात केली; पुढे त्यासाठी एक व्यवस्थापिकाही नेमली.
    वैद्यकिय उपचार होत गेले तशी वसंत या त्यांच्या मुलाच्या पायात बरीच सुधारणा दिसू लागली. तो कुबड्या न वापरता उभा राहून, एक पाय घासत का होईना पण चालू लागला. युजी या काळात उभ्या-आडव्या अमेरिकेत व्याख्यानांसाठी फिरत होते. कौटुंबिक आयुष्यात युजी हे वाईट पिता किंवा पती नसले आणि झक्कीपणा व दुसर्‍या बाजूला सुरू असलेला त्यांचा आध्यात्मिक शोध जमेस धरूनही सर्वकाही व्यवस्थित होते. पत्नीशी वाद होत असत ते फक्त पैसा या गोष्टीवरून - कारण युजी पैशाच्या बाबतीत बेफिकीर बंदा होते. त्यांनी पहिल्या वर्षात साठ व्याख्याने दिली आणि दुसर्‍या वर्षाच्या अखेरीस त्या व्याख्यानाच्या धंद्याबद्दल त्यांना तिटकारा निर्माण झाला. व्याख्यानांच्या काळातील दोन उदाहरणे उल्लेखनीय आहेत. मिनींग अ‍ॅण्ड मिस्टरी ऑफ पेन या शीर्षकाचे व्याख्यान देऊन झाल्यानंतर खुद्द युजींनाच गालफुगीचा विकार उद्भवला. त्यामुळे होणारी गैरसोय आणि वेदना असाह्य असल्या तरी त्यांनी डॉक्टरांना भेटायला नकार दिला. कितीही काही झाले तरी वेदनेची रचना जाणून घेण्याचे औत्सुक्य असल्याने आणि नुकतेच त्याच विषयावर व्याख्यान दिल्याने स्वत:ला होत असलेल्या वेदनांवरच ते प्रयोग करू लागले आणि त्यात आत-आत शिरू लागले. शेवटी वेदना वाढत गेल्या आणि शुद्ध हरपली. त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले; पण त्यांच्यावर नेमके काय उपचार आवश्यक आहेत हे डॉक्टरांना ठरवता येईना - कारण शरीर थंड पडत चालले होते आणि ते मृत्यूच्या उंबरठ्यावर आहेत असे दिसत होते. अर्धा तास उलटला. अचानक त्यांना शुध्द आली आणि वेदना नाहीशा झाल्या होत्या. शरीराने स्वत:च स्वत:वर उपचार केले होते.
    यानंतर त्यांची व्याख्यानांतील रूचि निघून गेली आणि कमाईचा दुसरा एखादा मार्ग मिळतो काय याचा ते शोध घेऊ लागले. हे पाहुन इर्मा नावाच्या त्यांच्या व्यवस्थापिकेला झीटच यायची बाकी होती. कारण आतापर्यंत व्याख्यानांमुळे युजी एक महत्वाची असामी बनले होते आणि व्याख्यानांची चहुकडून मागणी होत होती; व्याख्यान दिल्यावर बरेच पैसे मिळत होते. पण युजींनी नकार दिला. अचानक, त्यांना काम करण्याची इच्छा राहिली नव्हती.    


(थोडक्यात पार्श्वभूमी म्हणताम्हणता बरंच लांबत चाललंय आणि मुख्य विषय बाजूला पडलाय, पण ही पार्श्वभूमी आवश्यक आहे असे वाटते. युजींचं त्रोटक "चरित्र" रेखाटून पुढे जाणार होतो. पुढच्या भागात हे लवकर आवरून असली पिक्चर सुरू होईल! )


संदर्भ: इंग्लिश विकीपिडीया, युजी रीडर - संकलन मुकूंद राव, ए टेस्ट ऑफ डेथ- महेश भट, युट्यूबवरील युजींच्या क्लिप्स, युजी कृष्णमूर्ती डॉट ऑर्ग, आणि अर्थातच माझी समज ;-)

६ सप्टेंबर, २०१०

वाचा आणि शोधा

१. तुम्ही तुमचं शरीर सोडून कधीच कुठंही जाऊ शकत नाही.
२. तुम्हाला वाटते की तुम्ही हुशार आहात, नो!!!! सर्व माणसे मानसिकदृष्ट्या महामूर्ख असतात, येस!!! पण प्रत्येकाचे शरीर हुशार असते. ती एक वेगळी संस्था आहे (इथे वैद्यकिय दृष्टीकोणातून पाहू नये) पुढच्या वेळी नखे वाढतील तेव्हा नजर ठेवा. तुम्ही कधीच सरळ उठून नखे काढायला सुरूवात करीत नाही. आधी हात तुमच्या डोळ्यांसमोर येतो, तुम्हाला नखे वाढल्याचे दिसून येते (हा अक्षरश: शरीराच्या विशिष्ट भागाने दिलेला सिग्नल असतो) आणि मग नखे काढण्याचा विचार करता.
३. मोठ्ठा आवाज होतो तेव्हा, शरीर एकदम दचकते. हा शरीराने तुमच्या यंत्रणेला दूर होण्यासाठी दिलेला सिग्नल असतो.
४. मानसिक शांती, ध्यानातून येणारी शांती ही आजकालची लोकप्रिय टूम आहे. शरीराला असले काहीही नको असते कारण ते मुळातच अतिशांत असते. तुम्ही मानसिकदृष्ट्या अशांत असाल, आणि ती अशांतता शरीरातून वाहू देत असाल. पण त्याच वेळी तुमचे शरीर नेहमी एवढेच शांत, स्थिर असते.
५. शरीराला फक्त दोनच गोष्टीत स्वारस्य असते: टिकून राहाणे आणि प्रजोत्पादन.
६. विचार करण्याची प्रक्रिया ही जात्यासारखी असते - कुठलाच विचार सर्वकाळ टिकत नाही, विचारांचे पीठ सतत मात्र पडत राहाते.
७. आजपर्यंत कुणीही मूलत: ओरिजीनल म्हणता येईल असा विचार केलेला नाही, नकला मात्र सर्व करीत असतात. विचार हा नेहमी विचाराबद्दलचा असतो.
८. विचारातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग अस्तित्वात नाही. मग कुणी काहीही म्हटलेले असो.
९. बाल्यावस्थेचा काळ वगळता तुम्ही कधीच काहीही पाहात नाही; तुमच्याकडे असलेली कल्पनाच तुम्ही पाहात असता.
१०. लहान मुले ही अत्यंत जीवंत ऊर्जा असते. ती पृथ्वीवर जन्माला आलेला सर्वात नवीनतम माणसे असतात. ती जुन्या माणसांच्या संगतीत राहून त्यांचे वेगळे विशेष असे काहीही न करता जुन्या माणसांसारखीच होतात. कोणताही शिक्षक, गुरू शिकवू शकणार नाही एवढे त्यांच्याकडून शिकता येते. फक्त तुमचे कचराछाप (मग ते तुम्हाला कितीही महत्वाचे, अगत्याचे वाटोत ) विचार त्यांच्यात ओतण्याची घाई करू नये. त्यांना आजूबाजूची व्हॅल्यू सिस्टीम आणि स्पर्धा यात राहायचे असल्याने, त्यातच जगायचे असल्याने समाज, आई-वडील, शिक्षक या सर्वांनी टाकलेला कचरा वाहात राहावे लागते. लहान मुले जळता निखाराही सहज हातात घेतात - ते शिकत आहेत. लहान मुलांना साप कधीही चावत नाही, त्यांच्यात अजून वैरभावनाच तयार झालेली नसते. सापासारखे प्राणी तुमच्या मनातील वैरभावना झटक्यात ओळखतात आणि तुमच्यापासून दूर जाण्याचा उपाय नसेल तर आणि तरच चावा घेऊन दूर पळतात.
११. तुम्ही कधीही, कोणत्याही मार्गाने स्वत:चे शरीर परिपूर्णपणे अनुभवू शकत नाही - त्यासाठी दुसरे शरीर हवे असते.
पाश्वभूमी: युजी कृष्णमूर्ती यांच्याशी लोकांनी केलेली चर्चा.

४ सप्टेंबर, २०१०

विचार

विचार जागा झाला आणि मेंदूच्या या कप्प्यातून त्या कप्प्यात फिरू लागला; हे उचकलं; ते उचकलं. पण त्याला काही करमेना मग थोडंस डोकं खाजवलं. मेंदूत तो एकटाच होता. बोर झाला होता. कुणीतरी हवं होतं. मग त्यानं दुसरा एक मेंदू शेजारून जाताना पाहिला. त्यात त्याला दुसरा, त्याच्यापेक्षा वेगळा विचार दिसला. मग त्यानं त्याला हाक दिली. दोघांचं काही बोलणं झालं आणि अचानक ते दोन्ही विचार हमरी-तुमरीवर उतरू लागले. मग त्यापैकी कोणतातरी एक विचार म्हणाला, "अरे? आपले विचार जुळत नाहीत वाटते, असे नको व्हायला"
मग दुसरा म्हणाला, "ए बाबा, मला एक वेगळा विचार म्हणून जगायचं आहे - तुझ्यासोबत जुळलो तर खलास होईल ना मी?"
मग पहिला विचार म्हणे, "छे! असं काही नसतं, दुसर्‍या अनेक विचारांचं माझ्याशी खूप जुळतं; तरी ते शिल्लक राहातात. तु म्हणतोस ते काही खरं नाही."
मग दुसरा विचार म्हणे, "असं आहे काय? मग असं कर, तु माझ्याशी जुळून दाखव"
मग तो पहिला विचार त्या दुसर्‍या विचाराशी जुळू लागला. ते दोन्ही एक झाले; आणि दोन्हीही नष्ट झाले. पण ते दोन्ही विचार जुळून मरण्यापूर्वी त्यांची असंख्य अपत्ये जन्माला आली होती - ती अजूनही हमरी-तुमरीवर उतरतात. कधी जुळतात आणि मरतात. कधी अनमॅरीड राहून वेगळी जगतात. या अनमॅरीड विचारांना मात्र काही अपत्ये होत नाहीत - ज्या मेंदूत ते राहातात तो निकामी होईपर्यंतच असले विचार जगतात.

२ सप्टेंबर, २०१०

माझा दोस्त युजिनी

यूजिनी आणि माझी सर्वात पहिली भेट कुठं झाली हे मला आता आठवत नाही. ते तेवढं महत्वाचंही नाही. पण ह्या माणसात काहीतरी वेगळं, काहीतरी ठोस, काहीतरी चमकणारं आहे - ते आमच्या मित्रांच्या ग्रुपलाच काय पण त्याला एकदाच रस्त्यावरुन चालता-चालता ओझरतं पाहाणार्‍यालाही जाणवून जातं. ते काय आहे ते मात्र अजून कुणाला नक्की सांगता आलेलं नाहीय. म्हटला तर तो तसा हॅंडसम कॅटॅगिरीत मोडतो. पण त्याच्यापेक्षाही दिसायला गोरेगोमटे, जिम-फिम मारल्यानं चारचौघात उठून दिसणारे, महिन्यातून तीन-तीन,चार-चार नव्या पोरींना पाठीवर घेऊन गाड्या उडवणारे बहाद्दर आमच्या ग्रुपमध्ये आहेत. सुंदर पोरी-बिरी याच्याही अवती-भवती असतात; पण ते वेगळ्या कारणामुळं. पोरी त्याच्याभोवती अधून-मधून जमणार्‍या गर्दीचा एक भाग असतात. अशा थोडक्या वेळी पियक्कड लोकांच्या मैफिलीत मोकळ्या ढाकळ्या वातावरणात जशा गप्पा चालू असतात तसे वातावरण त्याच्या अवतीभवती असते. लोक न पीता ही धुंद झालेले असतात. बंगलोरपासून मर्सिडिझमध्ये बसून त्याच्याकडं नेहमी एक बाई येत असे. चांगली दिसायची, बोलायला पण मोकळी-ढाकळी होती. ती युजिनीसोबत जरा जास्तच जवळ गेलेली दिसायची. युजिनीच्या बंगल्यातील प्रशस्त लॉनवर विखरून विखरून टाकलेल्या खुर्च्यांत जवळ बसलो असताना एका रात्री धीर करून त्या बाईंना मी सहज विचारतोय असं भासवत एकदा विचारलं होतं -
व्हाट मेक्स यु व्हिजीट धीस मॅन सो फ्रिक्वेंट्ली?
ती हसर्‍या चेहेर्‍याची, चेहेर्‍यावरून सतत मलमली हसू खेळवत राहाणारी बाई बेधडक म्हणाली,
ओह! टू बी व्हेरी फ्रॅंक, ही नीड नॉट टू टेक मी टू बेड फॉर ऑरगॅजम; आय फील इट इन एअर अराऊंड हिम! आणि तिनं माझ्या डोक्यावर एक टप्पल मारली.
न विचारलेल्या प्रश्नाला उत्तर न देऊनही तिनं माझी विकेट घेतली होती.
"देन व्हाय डोंट यू स्टे विथ हिम फॉरेव्हर...मे बी मॅरी हिम??"
दोन्ही हातांच्या मुठी बांधून खांद्याकडे खेचत, लगेच झटका मारून दोन्ही हात हवेत पसरत ती म्हणाली,
आय वॉंट टू डिअर, बट ही सेज ही डोंट नीड एनिवन स्टेअर अ‍ॅट हिम नाऊ अ‍ॅण्ड देन... सो आय हॅव टू कम हिअर फ्रिक्वेंट्ली... आणि चेहेर्‍यावरून खळखळून हसू ओघळले...
नो, नो, बट धीस इज नॉट आय वॉटेड यू टू आन्सर..मला नेमकं काय विचारावं ते कळत नव्हतं; मी लॉनवर जमलेल्या गर्दीकडे हताशपणे नजर टाकली - कुणीतरी बटाटा कलरचा अमेरिकन माणूस युजिनीसमोरच्या गर्दीत बसून गिटारवर गाणं म्हणत होता
ती तिकडे पाहात अचानक म्हणाली -  
ही इज स्पेशल अ‍ॅण्ड एव्हरीबडी अराऊंड हिम बिकम्स स्पेशल व्हेन दे आर विथ हिम...दे आर नॉट सो व्हेन दे आर अलोन इन देअर वेल्दी सर्कल्स...
असा हा अवलिया माणूस मला दोस्त म्हणून लाभला होता. घरचा गर्भश्रीमंत नसला तरी, तो एखाद्या स्थलांतरप्रिय पक्ष्यासारखा प्रत्येक ऋतूत स्वत:च्या खर्चानं पृथ्वीगोलावर पसरलेल्या वेग-वेगळ्या देशात फिरू शकत असे. तिथल्या शहरांमध्ये त्याचे थोडके, पण "तो येतोय" कळलं की त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसणारे, त्याच्यासोबत कुठेही फिरायला तयार असणारे दोस्त होते. मला त्याला अवधूत म्हणावं वाटे. तो गर्दी खेचणारी असामी असला तरी आमच्या लंगोटीयार दोस्त कंपनीतला कुणीही त्याच्या खांद्यावर थाप मारू शकत असे. नाती एवढी मोकळी असली तरी त्याच्याबाबत कोणतंच अंतिम विधान करता येणार नाही.  आमच्या शहराशेजारच्या डोंगर उतारावर असलेल्या त्याच्या बंगल्यात तो वर्षातले दोन-तीन महिने राहायला येत असे. असाच तो यावर्षीही आला होता. आला होता की जावून आला होता, तो इथे राहात होता की विदेशात राहात होता हे सांगता येत नाही. कारण हा पक्षी कुठेलंच घरटं जास्त काळ वापरायचा नाही. सारखा फिरत राहायचा. यावेळी मात्र  तो आमच्या लंगोटीयार कंपनीसोबत बराच काळ राहिला. दुसरे जास्त कुणी आले नव्हते.
असेच एकदा दुपारी साडेतीन-चार वाजता त्याच्या बंगल्याच्या लॉनवर बसलो होतो. त्याच्या सोबत असताना आपण काहीही बोललो, तरी ते थेट त्याला उद्देशून नसेल तर तो बिलकूल प्रतिसाद देत नाही - तसा तो आताही आपण होऊन बोलत नव्हता आणि आम्ही सर्वजण तो काय म्हणतो याची वाट पाहात होतो. कारण तो जेव्हा बोलतो तेव्हा ते भयंकरच असते. एकदा त्याला त्याच्या तोंडावरच मी चिडून म्हणालो होतो, "तू मूर्ख आहेस!"
"इट इज नो मोअर अ न्यूज. टेल समथिंग न्यू, इफ यू हॅव!" माझ्याकडे न बघता तो शांतपणे उत्तरला. हे वाक्य पूर्ण झाल्यावर त्याच्या डोळ्यांचा फोकस क्षण-दोन क्षणांसाठी माझ्या डोळ्यांवर स्थिरावला. एखाद्या सिंहाच्या पिंजर्‍यात उतरून त्याच्यासमोर तावातावाने, "तु एक बंदिस्त जनावर आहेस"  असे मोठ्ठ्याने ओरडावे आणि त्यानं भयानक गर्जना करून त्याचे ते दोन हिरवट डोळे आपल्यावर रोखावेत तसं मला जाणवून गेलं.
"म्हणजे, अगदी अस्संच काही म्हणायचं नाही मला..सॉरी!" घशात आलेला आवंढा गिळत मी म्हणालो.
"सॉरी? उलट मीच तुझा आभारी आहे, तु माझ्या हिताचंच विधान केलंस तुझ्या दृष्टीनं, पण ते माझ्या कक्षेत आलं तेव्हा गैरलागू झालं - तु कस्संही, काहीही म्हण, ते मला कसलीच इजा करू शकत नाही..करूनच घ्यायचाच असेल, तर त्यात माझा फायदा आहे!”
या अशाच चक्रावून टाकणार्‍या त्याच्या बोलण्यामुळं त्याला सतत भेटत राहावं, त्याला मुद्दाम डिवचावं आणि त्याची मुक्ताफळं ऐकावीत असं आमच्या सगळ्या भिडूंना वाटत राहातं. तो आमच्यासोबतच असा वागतो असं नाही, आयुष्यात कधीच न पाहिलेल्या माणसाला सुध्दा तो याच स्टाईलमध्ये बोलतो. एकदा मॉलमध्ये मॅनेजर असलेल्या आमच्या एका दोस्ताकडं तो आणि मी गेलो होतो. चहा पाजवायला म्हणून तो मित्र आम्हाला घेऊन "एक्झिट" असे लिहीलेल्या गेटमधून बाहेर पडला. गेटवर असलेल्या सिक्युरिटीवाल्यानं मॉलच्या युनिफॉर्ममध्ये असलेल्या आमच्या मॅनेजर मित्राची तलाशी घेतली. तसा नियम असेल त्यांचा.
"तु पृथ्वीवरचा सर्वात मोठा बिनविश्वासू माणूस आहेस - हेच काम करीत राहिलास अजून काही दिवस, तर बायकोची पण तलाशी घेशील झोपण्यापूर्वी" हा कडाडला.
तो फुकट पोलीसगिरीवाला सेक्युरिटी भूत पाहावं तसं त्याच्याकडं पाहात होता. काहीच बोलला नाही. मग न राहावून मी माझी अक्कल पाजळलीच -
"तु पण ना, त्याचा काय दोष आहे रे? त्याला जो नियम सांगितलाय तो पाळतोय तो"  मी.
"आणि मी काय करतोय मग?"’ तो.
"काय करतोयस म्हणजे?" मी.
"मी पण नियमच पाळतोय, पण मला ते कुणी सांगितलेले नाहीत" तो.
"कसला नियम?"
"कॉलींग ए स्पेड, स्पेड!"
सांगत बसायचं म्हटले तर त्याचे अनेक किस्से आहेत. एकदा आम्ही असेच नेहमीसारखे त्याच्या आवडत्या वामा इंटरनॅशनल मध्ये बसलो (!) होतो. हे हॉटेल त्याला नुसतंच आवडतं. म्हणजे तो तिथं खातही नाही पीतही नाही.  मला आवडू शकणारे आणि मी त्यांना आवडू शकेल असे लोक कुठेही असू शकतात त्यामुळे त्याचा वावर सगळीकडेच असे. शहराशेजारच्या अ‍ॅसिलममध्येही तो आला की दोन-चार वेळा जाऊन येत असे. तर सांगत काय होतो की आम्ही वामा इंटरनॅशनलमध्ये बसलो होतो. आजूबाजूच्या टेबलवर दबक्या आवाजातील गोष्टींसोबत ग्लास किणकिणत होते. भींतींवर विश्वामित्राच्या तपोभंगाचे दृश्य दाखणार्‍या पेंटींगवर एवढा झिरझिरीत मंद उजेड कुठून पडलाय हे मी शोधून काढायचा प्रयत्न करीत होतो आणि हुडहुडी सुटेल एवढे थंड वाटत असल्याने माझ्या अंगातले जर्किन जास्तच घट्ट करून घेत होतो. शेजारच्या टेबलावरचे युजिनी गॅंगशी आहे नाही म्हणावी अशी पुसटशी ओळख असणारे काही भिडूही रंगात आले होते. त्यांचं आवरत आलं होतं वाटतं, उठायच्या तयारीत होते. त्यातला एकजण यूजिनीकडे हात दाखवत वेटरला म्हणाला,
"आज टिप त्या साहेबांकडून घ्यायची"
युजिनीनं ते ऐकलं आणि वेटरला म्हणाला,
"तुझं नाव कधी छापून आलंय का पेपरमध्ये?"
"पेपरमध्ये नाव? नाही ब्वॉ..का?"
"उद्या येणार आहे मग, तु आज टीप द्यायची मला...लगेच उद्या सकाळच्या पेपरमध्ये बातमी "वेटरने दिली गिर्‍हाईकाला टीप"....नाहीतरी त्या मूर्ख पेपरवाल्यांना काही धंदा नसतो... बघ...चान्स घालवू नको.."
वेटरला काही कळलं नाही. तो बावळट चेहरा करून तिथेच उभा राहिला.
आमच्या शेजारच्या टेबलवरची गॅंग पेटली.
"रघू, आम्ही तुझ्या नेहमीच्या टीप पेक्षा हजार रूपये जास्त देतो,  दे म्हणे तु त्यांना टीप..बघुतच..." असं म्हणून त्या लोकांनी खिशातून पैसे काढून रघूच्या हातात कोंबले. वेटर रघू भांबावला. तो मान खाली घालून चेहरा आणखी बावळट करून,  गालातल्या गालात हसू लागला.
ती लोकं आरडा-ओरडा करू लागली.. "रघ्या, दे त्यांच्या हातात..बघू म्हणे खरंच "
"अरे दे की, त्यांनी दिलेच आहेत..तुला फक्त माझ्या हातावर ठेवायचे आहेत....तुझी टीपपण मिळतेय" असं म्हणून युजिनीनं हात पुढे केला.
त्या गॅंगचा आरडा-ओरडा ऐकून लोकांच्या नजरा आमच्या टेबलाकडे रोखल्या गेल्या आणि बारमधला तो नेहमीचा मंद आवाजात चालणारा गोंगाट अचानक शांत झाला.
रघ्याला काही कळेना. तो आणखीनच भांबावला. बारमधल्या एवढ्या सगळ्या लोकांनी त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच एकाच वेळी, एवढ्या उत्कंठेनं नजरा लावल्या होत्या. तो त्या क्षणाला त्या वामाच्या बारमधला सर्वात महत्वाचा माणूस बनला होता; घायबरून गेला होता.
"साहेब लोकांना कशी टीप द्यायची...नको...हे घ्या.. " चाचरत-चाचरत त्यांच्या तोंडातून शब्द फुटले आणि तो त्या गॅंगने दिलेले पैसे परत करू लागला. पण आता मामला बिघडला होता. समोरची गॅंग जास्तच पेटली होती; रघू वेटर चांगलाच अडकला होता.
"दे म्हणतो ना आम्ही, बघ बरं रघ्या, आयुष्यात पुन्हा कधी टीप मिळायची नाही आमच्याकडून.."
" ...... "
रघू आळीपाळीनं नुसताच गर्दीकडं आणि आमच्या दोन गॅंगकडं बघू लागला. युजिनीनं ते हेरलं आणि त्यांच्या टेबलावरची रिकामी झालेली स्कॉच उचलली
"ठिक आहे...पैसे नको देऊ, ही बाटली टीप म्हणून मला दे म्हणे..."
"न्है हो साहेब..माफ करा.." रघू पक्का होता.  ती उत्कंठीत झालेली गर्दी सोडून जाण्याच्या बेतात आला.
"रघूराम, तु जब मरेगा ना...गरीबी में मरेगा रे... लेकीन बहोत शांती से मरेगा तु...पाहा याच्याकडं - लोक पैसे मिळत नाहीत म्हणून गरिब राहात नाहीत...मनाची भुक्कड श्रीमंती आड येते...." युजिनीनं त्या दृश्याचा क्लोजिंग डायलॉग टाकला.
जाताना त्या गॅंगमधल्या प्रत्येकानं युजिनीसोबत शेकहॅंड केला. आमचं संपवून आम्हीही थोड्यावेळानं निघालो. रघुनंच सर्व्ह केलं. युजिनीनं काही घेतलं नव्हंत. त्यानं जाताना रघूच्या त्या जाड बिल-कम-टीप फाईलमध्ये स्वत:चे हजार रूपये सरकवले.

दुसर्‍या दिवशी त्या गॅंगमधले लोक आणि रघूही युजिनीच्या लॉनवरच्या लोकांमध्ये दिसत होते.