५ ऑक्टोबर, २०१०

यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग २




युजींच्या संबंधाने लेखमाला पुढे न्यायची असल्याने इथं युजींची पार्श्वभूमी मांडावी लागत आहे; पुन्हापुन्हा तेच सांगतोय. मलाही ते थोडंसं कंटाळवाणं होतंय. पण हा माणूस कोणत्या पार्श्वभूमीतून आलाय याचा त्रोटक का होईना पण माग काढल्याशिवाय पुढे येणारी “युजी कृष्णमूर्ती” ही चीज नेमकी बनली कशी ते स्पष्ट होऊ शकणार नाही. म्हणून हा चरित्र-चिंतनटाईप पसारा वाढवावा लागत आहे. पण असोच.

व्याख्यानांना भरपूर प्रतिसाद मिळत असताना, चांगली कमाई होत असताना अचानक युजींची व्याख्याने देऊन पैसे कमावण्यातील रूचि निघून गेली आणि घरचा खर्च चालवण्याची जबाबदारी कुसूमकुमारी या त्यांच्या पत्नीवर पडली. कुसूमकुमारी या इंग्रजी आणि संस्कृतातील पदवीधर होत्या आणि वर्ल्ड बुक एनसायक्लोपेडिया च्या कार्यात त्यांना संशोधन सहायक म्हणून काम मिळाले. हे होत असताना श्री. व सौ. युजी या दाम्पत्याला त्यांच्या चौथ्या अपत्याचे वेध लागले होते; म्हणून कुसूमकुमारींना त्या अवस्थेत नोकरी नकोशी वाटत होती. पण पर्याय नव्हता. त्यांची कर्मठ भारतीय पार्श्वभूमी असली आणि इंग्लिशमधील पदवी असली तरी अमेरिकन जीवनशैलीबद्दलचे कुसूमकुमारींचे सुरूवातीचे कुतूहल मावळले आणि नंतर त्यांना अमेरिकन जीवनशैलीशी जुळवून घ्यायला अवघड जाऊ लागले. विचीत्र, दडपण आणणारे अमेरिकन जीवन त्यांना दुरचे वाटू लागले. पण त्या गाडे पुढे रेटू लागल्या आणि ऑफिसचे काम कधी-कधी घरीसुध्दा आणावे लागत असे. त्यांच्या कामाचा भाग म्हणून त्यांना भारतीय सांस्कृतिक आणि धार्मिक संकल्पनांवर टिपणे काढून प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक होते. पारंपारिक पध्दतीने युजींना  एक “जबाबदार नवरा” म्हणता येणार नसले तरी ते कुसूमकुमारींना आवश्यक असणारी पुस्तके वाचून आणि त्यांच्या शंकाची उत्तरे शोधून त्यांच्या कामात मदत करू लागले.
वसंत या अपंग मुलाची काळजी घेत युजी आता घर सांभाळू लागले. तिथले भारतीय मित्र युजींच्या घरी डोकावण्यास येत आणि भारतीय तत्वज्ञान आणि थिऑसॉफीवर तासन तास चर्चा चालत. अर्थात या चर्चा युजींना काही विशेष मिळाले होते म्हणून नसत तर आपण जशा साध्यासुध्या चर्चा करतो तशाच त्या असत. चौथ्या अपत्याच्या जन्मानंतर कुसूमकुमारींनी पुन्हा एकदा काम सुरू केले तेव्हा घरी “बेबीसिटींग” करण्याचे काम युजी करू लागले. सुमारे दोन वर्षे काम केल्यानंतर कुसूमकुमारींनी अत्यंत निराश होऊन काम सोडले आणि अमेरिका सोडण्याचा निर्णय घेतला. भारतात त्यांच्या बहिणीकडे मागे सोडून आलेल्या त्यांच्या दोन मुलींचा विचार त्यांना सतत अस्वस्थ करू लागला आणि आता त्यांचे चौथे अपत्य अमेरिकेसारख्या परक्या देशात, वडिलधारे, नातेवाईक आणि कुटूंबियांच्या देखरेखीशिवाय मोठे होणार असल्याने आणि वसंतच्याही परिस्थितीत फार मोठी सुधारणा दिसत नसल्याने या दोन्ही मुलांच्या भविष्याबद्दल त्यांना चिंता सतावू लागली. यात अजूनही बिकट परिस्थिती म्हणजे युजी आता सतरा वर्षांपूर्वी लग्न होताना असलेले युजी राहिले नव्हते. त्यांच्यात बदल होत राहिला आणि हा बदल जमीन आसमानचा होत जाऊन आता युजी घरातही अनोळखी माणसासारखे राहू लागले. सन १९५९ च्या शेवटास ती अपरिहार्य गोष्ट घडलीच आणि कुसूमकुमारींनी काहीही झाले, युजी अमेरिकेत राहाणार असले तरी भारतात परतण्याचा निर्णय पक्का केला. युजींना भारतात परतण्यासाठी केलेल्या विनवण्यांचा युजींवर काही परिणाम झाला नाही. युजींनी कुसूमकुमारींसाठी भारताची तिकीटे आणली आणि जवळ होते नव्हते तेवढे पैसे कुसूमकुमारींना देऊन टाकले. कुसूमकुमारी त्यांच्या दोन अपत्यांसह मद्रासच्या दिशेने निघाल्या आणि भारतात आल्यानंतर प्रवासात पुल्ला या रेल्वेस्टेशनच्या जवळ कुठेतरी त्यांची बॅग गहाळ झाली. या बॅगेत महत्वाच्या व्यक्तींनी युजींना लिहीलेली पत्रे, महत्वाची कागदपत्रे होती. हे अगदी युजींचा भूतकाळ ठरवून पुसला जात असल्यासारखे झाले आणि त्यांचे भारतात परतणे जवळजवळ अशक्य बनले.
आता पत्नी भारतात परत गेली असताना आणि युजींना त्या देशात पुढे राहायचे असल्याने त्यांना पुन्हा एकदा आश्रयाची गरज पडली. वर्ल्ड युनिव्हर्सिटीने त्यांना नोकरीची संधी दिल्यानंतर तो प्रश्न निकालात निघाला. युजींची ओळख एक प्रज्ञावान व्याख्याता एवढीच नव्हती तर त्यांना सखोल दृष्टी असलेला वक्ता म्हणूनही त्यांनी अमेरिकेत नाव कमावले होते. युनिव्हर्सिटीला युजींच्या हुशारीची उपयोगीता वाटू लागली कारण युनिव्हर्सिटीकडे जगाच्या विविध भागांत विद्यार्थ्यांकरिता निवासी महाविद्यालये काढायची योजना होती. युजींकडे ही योजना स्वीकारण्यावाचून पर्याय नव्हता; त्यांनी तशी ती स्वीकारली आणि युजींना त्या कामासाठी सर्वप्रथम भारतात पाठविण्यात आले. युजी त्यांचा व्याख्यानाचा “शो” आटोपण्यासाठी मद्रासला आले असताना कुसूमकुमारी त्यांना भेटल्या आणि पुन्हा एकदा कुटूंबात येण्याबद्दल विनवणी केली. ही युजींची त्यांच्या पत्नीसोबतची शेवटची भेट ठरणार होती. किमान मुलांकडे पाहून तरी युजींचे मन पालटेल असा विचार करून कुसूमकुमारींनी सगळ्या मुलांना सोबत आणले होते – पण युजी पत्थराहूनही कठोर होते. आता परतणे नव्हते. त्यांनी स्वत:च्या भूतकाळाशी कायमची फारकत घेतली होती. एका महिन्यानंतर युजी रशियात गेले आणि तिथून पुढे पूर्वी कधीही भेट न दिलेल्या युरोपातील मध्यवर्ती देशांत. असे दिसते या काळात की युजी त्यांना मिळालेल्या कामाबाबत त्रासून गेले होते, त्यांनी युरोपातील अनेक शहरांना भेटी दिल्या “कामाच्या निमित्ताने” नव्हे तर एक पर्यटक म्हणून, जगाच्या नकाशावरील प्रत्येक स्थळावर पावले टाकायची म्हणून. युजींबाबत खरे पाहाता, कोणतीही विशिष्ट योजना नसल्याने पान वार्‍यावर उडत जावे, भरकटू लागावे तसे झाले होते. शेवटी एकदाचे लंडनमध्ये पाऊल ठेवल्यानंतर ते पूर्णत: खलास झाले!
लंडनमध्ये ते डोके सरकलेल्या माणसासारखे रस्त्यांवरून निरर्थक फिरू लागले. लंडनमधील या कालखंडाला काही लोक त्यांच्या “आत्म्याची काळोखी रात्र” मानतात. युजींनी त्यांना “तो काही एखाद्या नायकाचा संघर्ष नव्हता की आत्म्यासोबत माझी कुस्तीही जुंपलेली नव्हती, त्यात काव्यात्म प्रसंगही नाही – ते फक्त मन मानेल तसे भटकणे होते” अशा शब्दांत फटकारले आहे.
इंग्लंडमध्ये हिवाळा सुरू होऊ लागला तशी त्यांची ही मनमानी थंड व्हायला सुरूवात झाली. त्यांच्याकडे शिल्लक असलेल्या पैशांतून नाईट ब्रिज रोडवरील केडागीन स्क्वेअर अपार्टमेंटस मध्ये त्यांनी जागा शोधली. दिवसभरादरम्यान अंग गोठविणारी थंडी टाळण्यासाठी आणि खोलीच्या चार भिंतीकडे पाहात राहून येणारा कंटाळा घालविण्यासाठी ते ब्रिटीश म्युझियममध्ये शिरत असत आणि कार्ल मार्क्सने ज्या टेबलाशी बसून दास कॅपिटल लिहीले त्या टेबलासमोरच्या टेबलाशी बसून राहात. खरे पाहाता युजींना कोणतेही संशोधन करण्यात किंवा पुस्तक वाचण्यात काहीच रस नव्हता. त्यांनी तत्वज्ञान आणि धर्म यावरील वाचन सोडून देऊन आता खूप वर्षे उलटली होती. पण तरीही काहीतरी वाचण्यासाठी तिथे आलो आहोत असे नाटक वठविण्यासाठी काहीतरी वाचायचे म्हणून ते “अंडरग्राऊंड स्लॅंग (शिवराळ बोली)” हा शब्दकोश घेऊन बसत आणि त्यात तासन तास डोके खूपसून बसत. लंडनच्या रस्त्यांवरील साईनबोर्डसवरील जाहीराती आणि भिंती, टेलीफोन बूथ आणि झाडांच्या खोडांवर लिहीलेले कॉलगर्ल्सचे नंबर आणि नावे वाचत युजी सायंकाळ घालवीत.
हा दिनक्रम चालू असतानाच उन्हे उतरू लागली, हवा तापली आणि दिवसा झक्क सूर्यप्रकाश पडू लागला – उन्हाळा सुरू झाला. उन्हाळा सुरू होताच मरगळलेल्या लंडनमध्ये अचानक प्राण फुंकला गेला. पण युजींमध्ये कोणताही बदल झाला नव्हता, त्यांच्यात काही फरक पडला नव्हता. बिघडत जाणार्‍या परिस्थितीत आणखी भर म्हणजे युजींचे खिसे रिकामे होऊ लागले. काही करून कशीतरी असलेली परिस्थिती पुढे रेटायची असेल तर पुन्हा एकदा काहीतरी करावे लागणार होते. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा-तेव्हा ते स्थलांतरीत लोकांचे (यात बहुतांशी भारतीय आणि पाकीस्तानी होते) हात पाहून भविष्य सांगू लागले आणि काहीवेळा तर त्यांनी पैशासाठी पाकशास्त्रावरील धडेही दिले. निश्चितच त्यांना “बेरोजगारी भत्त्या” वर राहाता आले असते पण त्यांनी ते केले नाही. विचित्र परिस्थिती होती. “मी लोकांच्या दातृत्वावर राहाणार्‍या उपटसुंभासारखा का जगतोय?” हा प्रश्नही त्यांच्या मनाला शिवत नसे. ती निश्चितच डोके फिरल्याची स्थिती होती. पर्याय शोधण्याचीही इच्छा ते गमावून बसले होते असे दिसते. त्यांनी स्वत:ला हवेसोबत इथे, तिथे आणि कुठेही उडत जाणार्‍या पानासारखे सोडून दिले.
याच काळात भारतात त्यांच्या पत्नीचे निधन झाले; ही बातमी जवळपास सहा महिन्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचली. मुले आई गमावून बसली होती; पण त्या कधीही भरून न निघणार्‍या हानीबद्दल सहानुभूती व्यक्त करणारे पत्र लिहीण्याशिवाय युजी काहीच करू शकले नाहीत. पाहूनही दिसत नसल्यासारखे होत, ऐकू येत असूनही ऐकले जात नसल्याच्या स्थितीत, जवळपास पागलपणाच्याच अवस्थेत युजी भटकत होते. काहीवेळा त्यांना थकवा जाणवत असे, काहीही खाण्याची इच्छा नसे. आणि एके दिवशी त्यांच्या लक्षात आले, खिशात फक्त पाच पेन्स शिल्लक राहीलेत! युजी आटोपले. ते आता कुठेही जाऊ शकणार नव्हते आणि काहीही करता येणार नव्हते. पण दैवयोगाने म्हणा किंवा कसेही लंडन मधील रामकृष्ण मिशनचे मुख्य असलेल्या स्वामी घनानंदांच्या रूपाने त्यांना मदत मिळाली. याच काळात युजींच्या शरीरावर बदल दिसून येऊ लागले. यापूर्वी ऋषिकेशच्या गुहेत असताना आलेले गूढ अनुभव आणि अड्यारमध्ये असताना “मृत्यूशी संमुख” होण्याचा अनुभव त्यांनी सरळसोटपणे उडवून लावला होता. पण आता ते सर्व अनुभव साठत येऊन गळ्यापर्यंत आले होते आणि युजींच्या अस्तित्वातच फेरफार व्हायला सुरूवात झाली होती. पारंपारिक हिंदू दृष्टीकोनातून पाहून याला कुंडलिनी जागरण म्हणता येईल. एके दिवशी रामकृष्ण मिशनच्या ध्यानगृहात बसले असताना त्यांना हा अनुभव आला. ही फक्त सुरूवात होती. त्यांच्याच शब्दांत –
मी काहीही न करता तिथे बसून होतो, ध्यानगृहात असलेल्या लोकांची मला दया येत होती. हे लोक ध्यान करायला बसले आहेत. कशाला जायचेय त्यांना समाधीत? त्यांना काहीही मिळू शकणार नाही – मी गेलोय या सर्व गोष्टींतून – ते स्वत:चीच थट्टा करीत आहेत, हसं करून घेत आहेत. असलाच मूर्खपणा आयुष्यभर करीत राहून आयुष्य मातीत घालविणे त्यांनी टाळावे यासाठी मी काय करू शकतो? हे करून ते कुठेही पोहोचणार नाहीत. मी तिथे बसलो होतो आणि माझ्या मनात काहीही नव्हते – फक्त रिक्तता होती – तेव्हा मला कसलीतरी अनोळखी जाणीव होऊ लागली: माझ्या शरीरात कसली तरी हालचाल होऊ लागली. माझ्या जननेंद्रियातून कसली तरी ऊर्जा डोक्याच्या दिशेने सरकत होती आणि डोक्यात छिद्र असल्यासारखे वाटत होते. ती ऊर्जा घड्याळाच्या काट्यांसारखी उलट आणि सुलट दिशेने वर्तुळाकार फिरत होती. ते विमानतळावर असलेल्या विल्स सिगारेटच्या जाहीरातीत दाखवल्यासारखे होते. माझ्यासाठी ती मजेची गोष्ट होती. पण मी त्या गोष्टीसोबत संबंध जोडू शकत नव्हतो. कुणीतरी मला खाऊ घालत होते, कुणीतरी माझी काळजी घेत होते, उद्याचा विचार नव्हता. तरिही, माझ्या आत खोलवर काहीतरी घडत होते...
निश्चितच “नवा माणूस” घडविल्या जात होता, जसे काही जन्मापासूनच यासाठी त्याची घडण आकाराला आली होती, किंवा कोणतेतरी गूढ बल त्याला मंदपणे पण खात्रीने त्या गोष्टीकडे घेऊन जात होते. पण त्या माणसाला ते जसे होईल, जशी त्याने कल्पना केली होती तसे ते घडणार नव्हते. आणि युजींच्या कथेचा हाच सर्वात विदारक, समजून घ्यायला अत्यंत गुंतागुंतीचा भाग आहे.
काहीही झाले तरी लंडनमधील त्यांचा मुक्काम संपला होता. त्यांनी रामकृष्ण आश्रम सोडला, पुढचा पल्ला गाठला आणि पॅरीसमध्ये येऊन पोचले. त्यांनी स्वत:चे भारतात परत यायचे तिकीट विकले आणि ३५० डॉलर हाताशी आणले. आणखी तीन महिन्यांसाठी ते निवांत झाले आणि पॅरीसमधील एका हॉटेलात त्यांनी मुक्काम ठोकला. पूर्वी लंडनमध्ये केले होते त्याप्रमाणेच त्यांनी पॅरीसचे रस्ते पालथे घालायला सुरूवात केली आणि विविध प्रकारच्या फ्रेंच चीज वर गुजराण सुरू केली, ही सवय ते जाईपर्यंत टिकून होती, पण आहार म्हणून नंतर चीजचे प्रमाण कमी झाले होते.
लंडनमध्ये झाले होते तसेच, पुन्हा एकदा त्यांचे पैसे संपत आले. पण पॅरीसमध्ये मात्र पाकशास्त्रावर धडे देऊन पैसे कमवायला स्थलांतरीत लोक नव्हते किंवा मदत मागायला जाता येईल असे मित्रदेखील नव्हते. पण तरीही खिसे उलटेपालटे करून जे काही पैसे मिळाले त्यात त्यांना जिनेव्हापर्यंत जाता आले. पुन्हा एकदा स्मृतीभ्रंश झालेल्या माणसाप्रमाणे त्यांनी हॉटेलातच खोली घेतली आणि रस्ते पालथे घालायला सुरूवात केली. दोन आठवडे उलटले आणि हॉटेलचे बील भागवून जेवणासाठीदेखील पैसे शिल्लक राहिले नाहीत. सगळ्या परिस्थितीचा कडेलोट झाला आणि भारतीय दूतावासात जाऊन तिथल्या अधिकार्‍याकडे भारतात पाठविण्याची विनंती करण्याशिवाय कोणताही दुसरा मार्ग शिल्लक राहिला नाही. 
सुदैवाने अजूनही त्यांच्याकडे स्वत:चे स्क्रॅपबुक होते. त्या स्क्रॅपबुकमुळे ते दूतावासातून बाहेर फेकले गेले नाहीत. नॉर्मन कझिन्स, त्याकाळी भारताचे रशियातील राजदूत असलेले सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी युजींबद्दल उधळलेली स्तुतीसुमने त्या स्क्रॅपबुकमध्ये वाचून निश्चितच व्हॉईस-कॉन्सुलवर छाप पडली. पण तो काहीच करू शकत नव्हता, कारण सरकारी खर्चाने युजींना भारतात पाठवता येणार नव्हते. केवळ एक पर्याय होता, तो म्हणजे युजींनी भारतातील त्यांच्या नातेवाईकांना लिहीणे आणि पैसे मागवणे - तो व्हॉईस कॉन्सुलने युजींना सुचवला.  हे चालु होते तेव्हा नेमके जिनेव्हातील रामकृष्ण मिशनचे मुख्य स्वामी नित्यबोधानंद व्हॉईस कॉन्सुलच्या चेंबरमध्ये बसलेले होते. त्यांनी लगेच तिथल्या तिथे युजींच्या हातात त्यांची बीले भागवण्यासाठी ४०० डॉलर ठेवले आणि युजींना सामान्य व्यक्तींसारखे वागवू नये, होता होईल तोवर सढळपणे मदत करावी अशी कॉन्सुलला विनंती केली. युजींच्या सुटकेसाठी पुन्हा एकदा रामकृष्ण मिशनची अदृश्य शक्ती उभी राहिली होती असे म्हणावे वाटते.

कॉन्सुलेटच्या कर्मचार्‍यांमध्ये एक वेगळी म्हणता येईल अशी महिला होती – व्हॅलेण्टाईन डि कार्व्हान. या बाई त्यावेळी त्रेसष्ट वर्षांच्या होत्या आणि युजी त्यांच्यापेक्षा सतरा वर्षांनी लहान होते. युजींविषयी त्यांच्या अंत:करणात खोलवर काहीतरी स्पर्शून गेले. थोडावेळाने त्यांचे युजींशी बोलणे होत गेले तसे या अनोळखी भारतीय माणसाला मदत करण्याची त्यांची इच्छा बळावली; मी राहाण्यासाठी तुमची स्वित्झर्लण्डमध्ये व्यवस्था करू शकते – तिथे रहा, खरोखर भारतात जायचे नसेल तर जाऊच नका असे त्या युजींना म्हणाल्या. युजींकरीता हे आणखी एक जीवनदान होते आणि दुसरा कोणताही विचार न करता त्यांनी बाईंचा प्रस्ताव स्वीकारला. खरे पाहाता, युजींकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता आणि वारा नेईल तिकडे जायचे असे तर होतच होते.
काही महिन्यांनंतर व्हॅलेण्टाईनने नोकरीचा राजीनामा दिला आणि युगानुयुगांपासून ताटातूट झालेल्या, पण नव्या युगाच्या उंबरठ्यावर पुन्हा भेट झालेल्या मित्रांसारखे ते दोघे राहू लागले. व्हॅलेण्टाईनला मिळालेली पेन्शनची रक्कम फार मोठी नव्हती पण त्यात घरखर्च आणि प्रवास होऊ शकत होता. युजींच्या सल्ल्यानुसार व्हॅलेण्टाईनने त्यांचे सगळे दागिने आणि वर्षानुवर्षांपासून गोळा केलेल्या वस्तू विकून टाकल्या आणि ते पैसे बॅंकेत ठेवले. नंतर, व्हॅलेण्टाईनने युजींच्या प्रवासासाठी एक वेगळा फंड देखील तयार केला.
व्हॅलेण्टाईन युजींची काळजी घेत होत्या पण पुढे काय वाढून ठेवले आहे त्यांना माहित नव्हते. पुढची चार वर्षे तुलनेने निवांत गेली. भरपूर मोकळा वेळ आणि करायला कोणतेही महत्वाचे काम नसल्याने व्हॅलेण्टाईन आणि युजी प्रवासासाठी जेनेव्हाबाहेर पडले. युजींच्या बाबतीत त्यांचा “शोध” जवळपास समाप्त झाला होता. युजी झोप काढत, खात आणि टाईम मॅगझीन वाचत – तुरळक प्रवास करीत आणि व्हॅलेण्टाईन सोबत किंवा एकटेच लांबवर चालायला जात. या काळाची तुलना अंड्यातून पिल्लू बाहेर पडते त्यापूर्वीच्या काळाशी करता येईल. नाट्यमय कलाटणी घेण्यासाठी शरीर स्वत:ला तयार करीत होते आणि ते शतकानुशतकांपासून उभ्या असलेल्या मानवी विचाराचा पायाच हादरवून सोडणार होते.
युजींची सत्याचा, मोक्षाचा शोध संपला होता आणि आता कसलेही वाट पाहाणे नव्हते तरी त्यांच्याबाबतीत रोमांचक, आश्चर्यकारक आणि गंमतीशीर गोष्टी घडायला सुरूवात झाली होती. त्यांनी त्यांच्या हाताचे तळवे किंवा शरीराचा कोणताही भाग एकमेकांवर घासला तर फॉस्फरसच्या चमचमाटासारखा चमचमाट होऊ लागला. असह्यपणे डोकेदुखी सुरू झाल्याने बेडवर अंग टाकले तर ठिणग्या उडू लागत. ती वीज होती. शरीर विद्युत-चुंबकीय क्षेत्र बनले होते. त्यांना सतत डोकेदुखी किंवा ते म्हणतात त्या शब्दांत “मेंदूत भयंकर वेदनां” चा त्रास होऊ लागला. पण युजी त्यांना काय होत आहे त्याबद्दल व्हॅलेण्टाईनशी चर्चा करीत नसत. शरीरात होणारे हे सर्व बदल आणि डोकेदुखीची सत्रे यांतच तीन वर्षे उलटली. युजी त्यांच्या मूळ वयापेक्षा कितीतरी लहान दिसू लागले. त्यावेळी घेतलेल्या त्यांच्या छायाचित्रांमध्ये ते खरोखर वीस-एकोणवीस वर्षाच्या मुलासारखे दिसतात. पण नंतर ते बदलणार होते आणि वयाच्या एकोणपन्नासाव्या वाढदिवसानंतर पुन्हा एकदा वय वाढणार होते.  

दर उन्हाळ्यात जे. कृष्णमूर्ती स्वित्झर्लंण्डमधील सानेन इथे व्याख्याने द्यायला आणि चर्चासत्रांसाठी येत. युजींच्या मित्रांकडून काहीवेळा त्यांना या व्याख्यानात ओढून नेण्याची काही उदाहरणे सोडली, तर युजी जेके आणि त्यांच्या प्रशंसकांपासून आदरपूर्वक दूरच राहात. पण असे घडू लागले की चिकित्सक लोक दररोजच युजी राहात असलेल्या चॅलेटमध्ये येऊ लागले आणि त्यांच्याशी चर्चा करू लागले. अपरिहार्यपणे चर्चा आध्यात्मिक गोष्टींकडे वळत असे आणि युजींसमोर मांडलेला कोणताही आध्यात्मिक मुद्दा कठोरपणे तिथल्या तिथे खोडून काढीत आणि जेकेंच्या शिकवणूकीच्या चिंध्या करीत. हळूहळू जे.कृष्णमूर्तीयन्सचा युजीच्या अवतीभवतीचा वावर वाढू लागला; काही लोक हे “दुसरे कृष्णमूर्ती कोण” हे पाहायच्या कुतूहलाने येत तर काही स्वत:च्या शंका दूर (!) करायला येत तर काही लोक जे.कृष्णमूर्तींना ऐकून युजींना आव्हान द्यायला येत. प्रत्येक उन्हाळ्यातील हा शिरस्ताच बनून गेला. जे. कृष्णमूर्तींच्या सतत जवळ राहाणारे लोक जसे मादाम स्काराव्हेली आणि डेव्हीड बोह्म देखील कुतूहल खाजवले गेल्याने सहज चक्कर मारून जात. काही लोक, युजींसोबतच्या घरघुती वातावरणात चालत आहेत असे वाटणार्‍या गप्पा वाढत गेल्या तसे जेकेंकडे पाठ फिरवली आणि युजींचे मित्र बनले.
हे सगळे चालू असताना, विरोधाभास म्हणा की गूढ म्हणा, १३ ऑगस्ट १९६७ रोजी युजींना जेकेंचे उन्हाळ्यातील व्याख्यान ऐकायला ओढून नेण्यात आले. भव्य तंबू मध्ये तिथे युजी बसून होते – ऐकत होते आणि ऐकत नव्हतेही. व्याख्यानाच्या ओघात जे. कृष्णमूर्ती म्हणू लागले, “...त्या शांततेत, तिथं मन नसतं; तिथे कृती असते...”
आघात झाल्यासारखे, युजींनी ते ऐकले आणि अचानक त्यांना तो सर्वच प्रकार मजेशीर वाटू लागला. जेके वास्तविक युजी ज्या स्थितीत होते त्या स्थितीचे वर्णन करीत होते! हे कसे काय घडू शकते? पण ते खरे होते.  “मी त्या स्थितीत आहे तर!” युजींनी स्वत:शी विचार केला. असं जर असेल तर सर्व प्रकारच्या लोकांना ऐकत, संघर्ष करीत, जिसस, बुध्दांच्या स्थितीचा शोध घेत मी ही तीस वर्षे कशासाठी झक मारतो होतो??, मी तर तिथे अगोदरपासूनच आहे! “मी त्या स्थितीत आहे तर!” स्वत:शीच काढलेला तो उदगार, खूपच आश्चर्याच्या भावनेसह थोडावेळ टिकून राहीला. आणि अचानक स्वत:च्या स्थितीचे जेकेंकडून वर्णन ऐकत तिथे बसून राहाणे स्वत:चीच टवाळी ऐकून घेण्यासारखे वाटू लागले. युजी उठले आणि तंबूबाहेर चालते झाले. पण ते तिथंच संपले नव्हते. युजी निश्चितच त्या स्थितीत होते – बुध्दाची स्थिती आणि सर्व एन्लायटन्ड मास्टर्सची स्थिती. पण ती स्थिती नेमकी आहे तरी कशी? पुढच्या क्षणीच या प्रश्नाने दुसर्‍या प्रश्नाला जन्म दिला “मी त्या स्थितीत आहे हे मला कसे काय कळणार?” हा प्रश्न रोमरोमात भिनलेल्या वेडासारखा त्यांच्यात पेटून उठला. “अत्यंत तीव्रतम आकांक्षेसह मला बुध्दाची जी स्थिती हवी होती, जी मी सगळ्यांकडून मागत सुटलो होतो त्या स्थितीत मी आहे हे मला कळणार कसे? मला कसे कळणार?”


पुढच्या दिवशी तोच प्रश्न रोमरोमात पेटून उठला असताना युजी चेस्टनट वृक्षाखाली विसावलेल्या एका बाकड्यावर बसून होते, समोर सानेनच्या भूमीतील नीलपर्वताची सात शिखरे आणि सात दर्‍या निळ्या प्रकाशात न्हात असल्याचे न्याहाळत होते. प्रश्न तसाच धडधडत होता, त्यांचे पूर्ण अस्तित्वच त्या एका प्रश्नाने झपाटले गेले होते “मला ते कळणार कसे?” दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर ते स्वत:च प्रश्न बनले होते. तो प्रश्न तसाच टिकून होता, “मी त्या स्थितीत आहे हे मला कळणार कसे?”  माझ्या आत कसलीतरी विचित्र दुभागणी आहे: आत कुणीतरी असा आहे जो जाणतो की तो त्या स्थितीत आहे. त्या स्थितीचे ज्ञान – जे मी वाचलेय, जे मी अनुभवलेय, ज्याबद्दल त्यांनी बडबड करून ठेवलीय – हेच ते ज्ञान जे त्या स्थितीकडे पाहातेय – त्यामुळे त्या स्थितीचे प्रक्षेपण करणारे हेच ते ज्ञान आहे. मी स्वत:लाच म्हणालो: “इकडे पाहा जरा म्हातार्‍या कार्ट्या, चाळीस वर्षांनंतरही तु एक पायरीदेखील वर चढला नाहीस; तो चौक क्रमांक एक मध्येच आहेस. तु हा प्रश्न विचारास तेव्हा ही स्थिती प्रक्षेपीत करणारे हेच ते ज्ञान आहे. तु त्याच स्थितीत राहून तोच प्रश्न विचारतो आहेस, “मला कसे कळणार?”  या ज्ञानामुळे, त्या लोकांच्या स्थितीच्या वर्णनामुळे, तुझी ही स्थिती निर्माण झाली आहे. तु स्वत:चीच थट्टा करतो आहेस. तु एक पार वाट लागलेला मूर्ख आहेस.” तरीही एक विचित्र भावना होती की ती स्थिती हीच आहे. आणि तरीही प्रश्न उठत होता, “मला कसे कळणार हीच ती स्थिती म्हणुन?” – या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हते – तो प्रश्न एखाद्या भोवर्‍यात सापडलेल्या प्रश्नासारखा होता – तो गरगर राहिला – गरगरत राहिला...
आणि अचानक तो प्रश्नच गायब झाला. युजी खरोखर आणि संपूर्णत: संपून गेले. ती रिक्तता नव्हती, रे रिकामे होणे नव्हते, ते बौध्द तत्वज्ञानात सांगितलेले निर्वाण नव्हते, आणि सर्व जागृत पुरूष ज्या स्थितीत आहेत असे मानले जाते ती ही स्थिती नव्हती. फक्त प्रश्न मावळला होता.
प्रश्न मावळून गेला तसे विचारातील प्राण निघून गेला – संस्कृती आणि धर्म यांनी स्फटीकरूप दिलेला आणि मजबूत केलेला विचार खलास झाला. विचारांना सांधणारा “मी”, सर्व इंद्रियजन्य अनुभवांचे तुकडे गोळा करणारा, त्यांची तुलना करणारा आणि एकमेकांशी जुळवून पाहाणारा मानसिक समन्वयक” अचानक निघून गेला. आता दुवा निखळला, दुरूस्ती करणारी, सफाई करणारी, शरीराला ऊर्जस्वल करणारी, रेचन करणारी प्रचंड ऊर्जा मोकळी करीत विचाराचे सातत्य खंडीत झाले, विचाराचा स्फोट झाला.
युजी या स्थितीला मुद्दाम कॅलॅमिटी: चक्रीवादळ म्हणतात जेणेकरून लोकांनी, विशेषत: धार्मिक पठडीतील लोकांनी त्या स्थितीचे कसलीतरी प्रसादपूर्ण, सौंदर्यसंपन्न, प्रेमसंपन्न, परमानंदपूर्ण स्थिती म्हणून विश्लेषण करू नये, तिला “एन्लायटन्मेंट” म्हटले जाऊ नये. तसे बिलकुल होता कामा नये. शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या ती स्थिती एक यातना आहे. या दृष्टीकोनातून ती एक चक्रीवादळ आहे. पुढच्या सात दिवसांपर्यंत, सात विचित्र बदल होत गेले आणि त्या बदलांनी त्यांना ते म्हणतात त्या “नॅचरल स्टेट” – निसर्गदत्त स्थितीत फेकले. ती सगळी वेदनादायी प्रक्रिया संपूर्णत: गायब होण्यासाठी आणखी सहा महिने लागले.
ती पेशीय उत्क्रांती होती, ते एक सर्वव्यापी जैविक उत्परिवर्तन होते. तो नैसर्गिक स्थितीतील एका “नव्या” व्यक्तीचा जन्म होता.

१९६७ हे वर्ष संपत असताना युजींना कर्नाटकातील श्रृंगेरी येथे जावे लागले आणि तिथे श्रृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांची कशी कोण जाणे पण गाठभेट झाली. युजींमध्ये झालेल्या विचित्र शारीरिक बदलांबद्दल ऐकल्यानंतर श्री अभिनव विद्यातीर्थ स्वामी या शंकराचार्यांना युजी हे जीवन्मुक्त असल्याबद्दल संशय उरला नाही आणि असे मानले जाते की ते यावेळी म्हणाले होते, “माझ्या व्यक्तीगत अनुभवात मला असल्या गोष्टी माहित नाहीत...अशा निर्विचार स्थितीचा धक्का शरीर पचवून पुन्हा अभंग राहू शकते हे अत्यंत दुर्मिळ आहे. धर्मग्रंथांत सांगितल्यानुसार, असल्या घटनेनंतर तीन दिवसांच्या किंवा बहात्तर तासांच्या आत शरीर मरण पावते. शरीराने त्याचे जैविक बल टिकवून ठेवले असेल आणि ते नष्ट झाले नसेल तर निश्चितच ते मानवतेला वाचवण्यासाठी घडेल असेल...”
शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे युजी स्वत:ला कसल्याही प्रकारचा मसिहा मानत नसत. त्यांना जे घडले होते ते ज्या स्थितीच्या शोधात होते ती स्थिती नव्हती. सर्व प्रकारचा शोध आणि साधनांच्याउपरही ते घडून आले होते. आता त्यांना कुठल्यातरी शांत ठिकाणी राहून आयुष्य कंठायचे होते. युजींना निवृत्त होण्यासाठी तुंगा नदीच्या तीरावरील शांततापूर्ण परिसर सुयोग्य वाटत होता. त्यांनी काही काळ शांतपणे शंकराचार्यांना ऐकले आणि स्वत:च्या एकांतवासाच्या विषयाला हात घातला. इथे शंकराचार्यांनी “तुमची इच्छा असेल तर आजूबाजूची कुठलीही जागा तुम्हाला देण्याची जबाबदारी माझी, पण एकांतात राहाण्याची तुमची कल्पना टिकू शकणार नाही, तुम्ही जंगलात रहा की पर्वतावरी गुहेत राहा, लोक तुमच्याकडे गर्दी करणे थांबवणार नाहीत... ” असे म्हटल्याची नोंद आहे.

(उद्या “त्या” स्थितीत नेमके काय घडले त्याबद्दल)



६ टिप्पण्या:

  1. खूपच प्रभावित झालेला दिसतोयस तू..

    interesting life story..and written well too..

    पण .. अर्थात या चरित्रात इतर महान चरित्रांप्रमाणेच आधी ऐहिक जबाबदारी घेऊन मग ती लाथाडणे. कुटुंबियांची अतोनात आबाळ आणि परवड हे सर्व आहेच. त्याने कसेसेच होते. पण त्यासाठी या महान लोकांनी मागे फिरायला हवे होते असेही नाही.

    कदाचित कुटुंबियांची अवस्था आणखीनच "नको रे" झाली असती..

    उत्तर द्याहटवा
  2. नचिकेतजी,
    या माणसाने मला फार मोठ्या गुंत्यातून सोडवलंय; खरंच प्रभावीत झालो होतो.
    ऐहिक जबाबदार्‍या आणि त्यातून निर्माण होणारे ताणतणाव आपल्याकडे वडीलधार्‍यांकडून लग्नाची जी उगाच घाई केली जात असते त्यातून होतात - मग पुढच्या शोकांतिका अपरिहार्य बनून जातात असे म्हणावे वाटते.

    उत्तर द्याहटवा
  3. तुझ्याच पोस्टा वाचून एकदा विकीपीडिया चाळला होता मागे...
    पण तुझं लेखन जास्त चांगलं आहे! पुढच्या भागाची वाट बघतोय!

    उत्तर द्याहटवा
  4. लिखाण सर्वांग सुंदर आणि पकड घेणारं आहे हे सांगायला नकोच..

    माझा काहीतरी लिमिटेड पॉईन्ट सांगतो..मतभेद म्हणून नव्हे हो यशवंता..

    लग्न जबरदस्तीने केले असेल किंवा न कळत्या वयात झाले असेल. मुलेबाळे अशीच नकळत झाली असतील.. सगळं सगळं शक्य..गौतम बुद्ध, रामदास स्वामी इथपासून महात्म्यांपर्यंत सर्व विभूतींना साक्षात्कार होण्याची वेळ ही "जस्ट अ लिटल टू लेट" अशीच असते..

    कितीही पटवू गेले तरी जवळच्या, आपल्यावर विश्वास टाकलेल्या तीन माणसांवर केलेला ब्लंट सरळसोट अन्याय हा जगाला दिलेल्या अमृततुल्य तत्वज्ञानाच्या विरुद्ध बाजूच्या पारड्यात दणकन आदळतो आणि सारे तत्वज्ञान ऊर्ध्वात हिंदकळून सांडते.. अशी आपली आमची मनोधारणा...

    ज्या काही "जगत्या" जगात आपण राहतोय (मायावी म्हणा, किंवा कशाही..) त्यात न्याय आधी येतो आणि तत्वज्ञान नंतर..

    याचं मुख्य कारण म्हणजे कितीही खोल--उंच--पाच डायमेन्शनवाले किंवा कसलेही तत्वज्ञान डोके आपटून जीव देईल इतक्या घट्ट आणि अदृश्य भिंतींनी जखडून आपण जगतोय..

    तत्वज्ञान ही एक उपयुक्त गोष्ट आहे..प्रश्न सोडवण्याचा भास निर्माण करण्यासाठी...ते एक मनोरंजन आहे..त्याचा आनंद तसाच घ्यावा.

    दिलेले सर्व अनुभव विस्मयकारक आहेत यात वाद नाही. पण ते hallucinations च्या व्याख्येत चपखल बसतात आणि explain होऊ शकतात.

    उत्तर द्याहटवा
  5. नचिकेतजी,
    यु.जी. या माणसाबद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांना घडलेली गोष्ट घडून गेल्यानंतर "आय हॅव नथिंग टू से", "आय कॅनॉट हेल्प यू," "आय हॅव नो मॅसेज टू गिव्ह" हे त्यांचे म्हणणे. त्यांनी स्वत:ला जे घडलेय त्याबद्दल प्रसार-प्रचार करण्यासाठी कुठलेही व्यासपीठ गाठले नाही. त्यांचे लोकांसोबत जे बोलणे झालेय ते माणूस म्हणून कोणत्याही माणसाच्या वाट्याला जेवढे बोलणे येते तेवढेच आहे - नो स्पेशल लेक्चर्स, सेमिनार्स, बुक पब्लिकेशन अ‍ॅट ऑल !

    हे युजींचे तत्वज्ञान नाही तर, युजी नेमक्या कोणत्या पार्श्वभूमीतून आले ते मला मांडावे वाटले म्हणून चार-दोन लेख लिहीले.

    आलेले अनुभव हॅल्यूसिनेशन्स असतील तर हॅल्युसिनेशन्सचा परिणाम यु.जीं.च्या शरीरावर व्हायला नको होता - पण त्यांची पूर्ण शरीर यंत्रणाच बदललीय. इथे फोटो टाकता येत नाही म्हणून लिंक देतोय. कृपया पाहा. या फोटोंमध्ये युजींच्या चेहेर्‍यावर जो गोठलेपणा, जी परिपूर्णता, जो पूर्णविराम दिसतो तो मला कुठल्याच "मास्टर्स" च्या चेहेर्‍यावर दिसलेल्या नाही - सगळ्यांच्या चेहेर्‍यावर "और आगे क्या" हे भाव दिसतात. युजींची गोष्ट वेगळी आहे - दुर्दैवाने कितीही प्रयत्न केला तरी मला ती जशीच्या तशी सांगता येणार नाही.

    http://picasaweb.google.co.in/sekharsug63/UGBlessings#5401722533490536114

    उत्तर द्याहटवा