८ एप्रिल, २०१०

व्यंकटेश माडगुळकरांची एक कथा



आज व्यंकटेश माडगुळकरांची एक बेस्ट कथा वाचकांसमोर सादर करावी वाटतेय. माडगुळकरांची एक बेस्ट कथा यात पुनरुक्ती होते आहे, कारण माडगुळकरांची कथा बेस्ट असतेच. तर कथेचं नाव आहे "असंच."

"असंच"
रात्र झाली होती. बाहेर चिमधार पाऊस लागला होता. सारा महारवाडा त्या पावसाच्या मा-याखाली निपचित पडुन राहिला होता. सारख्या कोसळणा-या पावसाचा आवाज कानाला नकोसा वाटत होता. आणि गारठा असा पडला होता की, एखाद्या जाड कांबळात वा वाकळेत घुसमटुन पडायला हवे होते. निदान पेटलेल्या चुलीसमोर मांजरागत अंग उबवीत.
पण येसा खालीच एका पोत्याच्या तुकड्यावर पडली होती आणि लहानगा संदीपान तिच्या पाठीला माकडिणीच्या पोरासारखा चिकटला होता. पाठीच्या तेवढ्या भागाला उबारा मिळत होता. पुढल्या अंगाला मात्र थंडी बोचत होती. पण ती चुळबुळ करीत नव्हती. कारण तसे केले तर थंडी अधिक वाजते. एके जागी न हलता पडुन राहिले तर आपोआप ऊब मिळते. संदीपानच्या अंगात मात्र त्याला गुडघ्याच्या खाली येणारा अंगरखा होता. अगदी धडकंडका. त्याच्या बाह्या इतक्या लांब होत्या की, त्या बोटाखाली चांगल्या टिचभर लोंबत. छाती उघडी पडू नये, म्हणून येसाने बटनाच्या ऎवजी लहान-लहान चिंध्यांच्या तुकड्यांनी त्याची काजेही पक्की बंद केली होती. तो अंगरखा गावातल्या बामणाने दिला होता.
खोपटातली ती विचीत्र शांतता. पावसाचा आवाज. सर्दाळलेली हवा आणि बाहेरच्या भिजलेल्या उकिरड्याचा, छपरावरल्या काडाचा वास. पण येसाच्या ध्यानी या गोष्टी नव्हत्या.
.... पाटलाच्या घरी लगीन चालले होते. ताशेवाजंत्र्यांचा कडकडाट चालला होता. चांगले कपडे केलेली माणसे धांदलीने इकडेतिकडे करीत होती. त्यांच्याकडे आशाळभूतपणे पाहत येसा जोत्याजवळ बसली होती आणि सारखी म्हणत होती,
"दादा, आमाकडं बगा. आक्का, गरिबाकडं बगा !"
मग लफ्फेदार लुगडे नेसलेली आणि दागिन्याने गौरीगत सजलेली पाटलीण नाकातली नथ उडवीत आली आणि तिने चांगल्या ओटाभर पुरणाच्या पोळ्या आणि काहीबाही येसाच्या पदरात टाकले.
ते सावरुन तिला काही भराभरा चालता येईना....
संदीपान डोळ्याची सारखी उघडझाप करीत होता.
.... गेले कित्येक दिवस ठणठणीत असलेल्या ओढ्याला पाणी आले होते. आणि शिदा महाराचा संबा, विठोबाची इट्टली आणि संदीपान त्या लाल, गढुळ पाण्यात धबधब उड्या मारीत होती.
....आणि ओढ्याकाठच्या जांभळीखाली पावसाने पडलेल्या जांभळांचा नुसता सडा झाला होता. ती वेचून अंगरख्याच्या पुढच्या भागाच्या झोळीत टाकताना रंग लागत होता.
ती जांभळे त्याने किती तरी खाऊन घेतली. जीभ तोंडाबाहेर काढून तिरप्या डोळ्याने पाहिले तर ती अगदी गर्द जांभळी झाली होती.
त्याने डोळे उघडले आणि मिटले.
आईच्या पाठीवर आपले नकटे नाक घाशीत तो म्हणाला,
"आय, आमाला जांभळं !"
येसाच्या हातून सा-या पोळ्या धुळीत पडल्या.
तिने डोळे उघडुन पाहिले...
बाहेर पाऊस कोसळत होता. आणि आत अगदी गडद अंधार भरून राहिला होता. पायाकडे टिपटिप आवाज येत होता. गळत असावे.
तिने खडबडीत हात संदीपानच्या पाठीवरुन फिरवला आणि बोलली,
"अरं, अंधार गुडूप पडलाया. दिवा दिकून लावला न्हाई !"
गडबडीने उठायला लागली, पण तसे उठता आले नाही. पूर्वीची चपळाई आता राहिली नव्हती. ती दिवसात होती. "अग बया, बया - " करीत उठली. अंधारातच अचूक चुलीपाशी गेली. थोडीशी राख उकरताच आतला विस्तव चमकला. मग त्याच्यावर काटक्याकुटक्या घालून तिने दम लागेपर्यंत फुंकले, तेव्हा भडकून जाळ झाला.
खोपटातल्या अंधाराला भसका पडला आणि संदीपानने टक डोळे उघडले. चुलीवरला कडू तेलाचा दिवा उजळला. त्याने
कोप-यातला अंधार हुसकून लावला. संदीपानने हाक मारली,
"आये - "
येसा अजून बसल्या जागेवरनं उठली नव्हती. तिला उठवतच नव्हते. कण्हत्या आवाजात ती बोलली,
"काय रं?"
बाहेर कोसळणा-या पावसाच्या घोषात संदीपानच्या ते कानी गेले की नाही कोण जाणे, पण तो धडपडून उठला आणि आईपाशी दोन्ही गुडघे पोटाशी घेऊन बसला. येसाने एकवार समोर पांढ-या मातीने सारवलेल्या भिंतीवर पडलेल्या दोघांच्या भल्यामोठ्या सावलीकडे पाहिले. आणि मग गाडग्यांची उतरंड, फाटकी लक्तरे गुंडाळून ठेवलेले बोचके, कोप-यातली भलीमोठी कु-हाड, हातातली वेळूची गुळगुळीत काठी, धुळीने भरलेला फाटका जोडा, या सर्वावरुन फिरून तिची नजर स्थिर झाली - वरून एक-एक थेंब पडत होता, तळहाताएवढी जागा भिजून चिंब झाली होती, त्या जागेवर !
संदीपानने अंगरख्याने आपले उघडे पाय झाकून घेतले. चूल पेटावी आणि त्या पिवळट लालसर जाळासमोर बसून शिजणा-या कोरड्यासाचा घास घ्यावा असे त्याला वाटले.
"आये, जाळ कर की ग."
"बाबा माज्या, सर्पान न्हाय रं."
चूल पेटवायची कशाला? दुपारी दिवस डोक्यावर आल्यावर गावात वरावरा फिरून तिने पसाभर जोंधळे आणले होते. ते भरडून त्यांच्या पातळ कण्या केल्या होत्या आणि मायलेकरांनी त्या पोटात ढकलल्या होत्या. संदीपानला बजावले होते, "आता राती काय न्हाई रं खायला !" आणि पुढे उपयोगी पडतील म्हणून जुन्या चिंध्या चिवडीत बसली होती. संदीपान बाहेर पडून मातीत खेळला होता. वाण्याच्या दुकानासमोर बराच वेळ उभा राहिला होता. चावडीमागल्या उकिरड्यावर काही सापडते का ते त्याने पाहिले होते. चार कागद आणि एक खिळा सापडला होता. ती दौलत त्याने इट्टलीला दाखवली होती. इतके करीपर्यंत संध्याकाळ झाली होती. एका पायावर लंगडी घालत-घालत तो घरी आला होता. आणि पावसाला सुरूवात झाली होती.
येसा पोत्याच्या तुकड्यावर कलंडली होती आणि संदीपान तिला बिलगला होता.
चूल पेटवायची कशाला? आता काही शिजवायचे नव्हते ! आईच्या उत्तराने संदीपानची निराशा झाली. आपले मिचमिचे आणि सुजके डोळे मोठे करून आणि तिच्या तोंडाजवळ तोंड नेऊन त्याने विचारले,
"मग, वड्याला पानी आलं असल का? सकाळी आमी पवायला जानार !"
पण येसाने उत्तरच दिले नाही. तिचे चित्त त्याच्या बोलण्याकडे नव्हते. "भगवाना !" म्हणून ती बसल्या जागी पुन्हा आडवी झाली.
... छे, आडवी कुठली? बंडू बामणाच्या अंगणात खपल्याचा ढिग पडला होता. आणि उखळातल्या खपल्यावर जड मुसळाचे घावावर घाव ती टाकत होती. पारव्यासारखी घुमत होती. चोळी घामाने चिंब झाली होती आणि हात भरून आले होते. बंडू बामणाची सून सोप्यात कमरेवर हात देऊन उभी होती आणि म्हणत होती -
"येसा, आटप लवकर. तुजा नवरा जेव्हा-तेव्हा म्हणायचा, "आक्का, माजी अस्तुरी लई कामाची. महारवाड्यातली एक महारीन तिच्यासंग टिकायची न्हाई !" पलीकडे सावलीला, डालपाटीत निजवलेला संदीपानचा तीन महिन्यांचा भाऊ सारखा किंचाळत होता...
संदीपानसुध्दा बोटे नाचवीत तिच्यापुढे पडला नव्हता.
...रामोसवाड्याशेजारच्या चिंचेवर तो चढला होता. आणि आंबटगोड मोहर ओरबाडून त्याचे गपागप गपांडे मारीत होता. आणि तांबूस, लुसलुशीत अशी चिंचेची कोवळी पानेही काही कमी गोड लागत नव्हती.
खाली इट्टली उभी राहिली होती. तिच्या अंगावर फडकाही नव्हता आणि चोळीही. तोंड वर करून ती सारखी कोकलत होती,
"ए संद्या, मला टाक की रं थोडा मव्हर..."
अंधा-या कोप-यातून उठून एक डास गिरक्या मारीत-मारीत आला. संदीपान-येसाच्यावर गुणगुणत फिरू लागला.
उतरंडीच्या मागून एक वखवखलेला उंदीर हळूच बाहेर पडला. नाकपुड्या हलवीत, कान टवकारीत जमीन हुंगू लागला.
जरा वेळ गुणगुणून तो खिडमा डास नेमका संदीपानच्या गालावर बसला, आणि आपली टोकदार सोंड त्याने त्याला टोचली.
गाल चोळीत संदीपान एकदम उठुन बसला, आणि आईचे डोके हलवून म्हणाला,
"ए उठ. आमाला भुका लागल्याती !"
डोळे मिटुनच येसा म्हणाली,
"संदीपाना, भाकरी न्हाई रं. नीज आता. उद्या आनू...."
"मग कर की ग भाकरी. कितींदी झालं खाल्लीया का? सारका भोपळा उकडलेला आन भाजी."
येसाने पोराला कुरवाळले आणि समजुतीच्या स्वरात म्हणाली,
"व्हंय रं माज्या लेकरा !"
दुसरे ती काय म्हणणार होती? तीन चिपट्यांवर धारण आहे. गोरगरिबाला जोंधळा द्रुष्टीस पडत नाही. मोलमजुरी करणारा तुझा बापही आपल्याला सोडून निघून गेला आणि...
पण या गोष्टी त्या पोराच्या बाळबुध्दीला काय कळणार?
हटवादीपणाने तो पुन्हा बोलला,
"दे की ग! पोटात चावाय लागलंय...."
येसाने मनाचा धोंडा केला.
"पानी पे रांजनातलं म्हंजे -हाईल. शेना हाय माजा बाबा. पिट न्हाईं रं जुंदळ्याचं, न्हाई तर आता करून दिली असती भाकर !"
"मग नुसतं जुंदळं दे. मी खातो. बारीक चावून खाल्ल्यावर भाकरीवाणी लागत्यात जुंदळं. दे !"
येसा यावर काही बोलली नाही. गप्पच राहिली. लेकराच्या पोटात घालायला कोरभर भाकरीसुध्दा नाही या जाणिवेने ती कष्टी झाली. अंधार होता. रात्र झाली होती. पाऊस कोसळत होता. कुठे बाहेर जायला येत नव्हते. आणि बाहेर तरी कोण देणार? उपाशी मरणारी ती काय एकटीच होती? सारा महारवाडा, मांगवाडा, व्हरलवाडा - हातावर पोट असलेले सारेच गोरगरीब पालापाचोळा खाऊन जगत होते.
"लई भुका लागल्यात्या, कायसुदीक न्हाई का ग?"
"न्हाई रं सोन्या. बग तुज्या हातानं. मी का लबाड बोलतिया?"
भुकेने वखवखलेले ते पोरगे उठले आणि सारे खोपट धुंडू लागले. मोकळी गाडगीमडकी, चिंध्या, डबकी, कोनाडे - सारे खोपट रिकामे होते. खाण्यालायक अशी काहीच वस्तू नव्हती. त्याने चिंध्या हुसकल्या. कोपरे धुंडाळले. उतरंडीचे एक गाडगे खाली पडून फुटले आणि सा-या घरभर खापरे झाली.
आणि आनंदाने संदीपान म्हणाला,
"आई, घावलं मला खायाला !"
येसाने डोळे वर करुन बघितले.
त्याच्या हातात एक धुळीने भरलेले हळकुंड होते. हलकेच त्याने ते पुसले आणि दिव्याजवळ येऊन त्या ज्योतीवर धरले. काळपट-पिवळट हळकुंड तडतडले. त्याचा वास सुटला. त्या वासाने संदीपानच्या नाकपुड्या फुगल्या आणि भूक वाढली.
खरपूस भाजून झाल्यावर तो नीट बसला. आणि ओल्या खोब-याचा तुकडा खावा तसे ते हळकुंड थोडेथोडे मिटक्या मारीत त्याने संपवले.
त्याच्यावर गटागटा पाणी पिऊन त्याने अंगरख्याने तोंड पुसले आणि पुन्हा, आईपाशी येऊन पडला.
दिव्यातले तेल संपले. वात तुट्तुटू लागली. प्रकाश कमी-कमी होत एकदम विझला. पुन्हा चोहीकडे अंधार झाला.
बाहेर पावसाची झड जोरात येऊ लागली. कवाड वाजू लागले.
आणि एवढा वेळ सारे पाहत असलेली येसा संदीपानला पोटाशी धरून ढसढसून रडायला लागली.
"देवा, ह्यापरीस पटकीसारख्या एकांद्या रोगानं मारून का रं टाकलं न्हाईस गरिबाला...?"
देव तिला मारून टाकणार नव्हता. उपाशीपोटाने ती अशीच खोपटात पडून राहणार होती. आणि तिचे एकुलते एक, बापावेगळे पोरगे भुकेने वखवखून हळकुंड खाऊन झोपणार होते आणि ती आतडे तुटेपर्यंत ओरडून म्हणणारी होती,
"देवा, ह्यापरीस पटकीसारख्या एकांद्या रोगानं मारून का रं टाकत न्हाईस गरिबाला...?"
हे असेच चालणार होते.
व्यंकटेश माडगुळकर,
हस्ताचा पाऊस, उत्कर्ष प्रकाशन, पुणे

1 टिप्पणी: