महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतील बामणांच्या पोरांचे बालपण जसे जात तसेच माझेही गेले. पण कदाचित इतर पोरांना जी मौज पाहायला भेटली नसेल ती आम्हाला दर गुरूवारी पाहायला मिळायची. आमच्या गावाच्या डगरीखालून वाहणार्या गंगेच्या (खरं म्हणजे ही गोदावरी, पण तिला सगळे गंगाच म्हणतात) तीरावरच गुंज क्षेत्र नावाचे दत्तसंस्थान असलेले एक गाव होते. अजूनही आहे. पण आता तिथं ती मौज मात्र राहिली नाही. आमच्या घराण्यात पन्नास पाऊणशे वर्षांपूर्वी दत्तोपासना सुरू झालेली आणि सकाळी-सकाळी प्रत्येकाचा पाठ, घंटा, पंचपदी वगैरेंची नुसती गडबड. चांगला चौसोपी किल्ल्यासारखा वाडा. वर माडी. माडीवर मोठ्या दाराशेजारून निघणार्या पायर्या. दोन्हीकडच्या पायर्यांवर बसलेली एक-एक महाभयानक गावठी कुत्री. घरात या ना त्या कारणाने होणारी गड्यांची वर्दळ - त्यात मग चांदपाशा मामू, आमजा, गफूरभाई, सरदार, निजाम, प्रकाशकाका, सावकारमामा, गुलाब भाऊ, भांडेवाली शरीफा किंवा ल्याखत - तिच्या जोहरा आणि सायरा या मुली, जावेद, वाहेद ही मुलं! एवढे सगळे लोक घरात, रानात लागायचेच कारण दीड-दोनशे एक्कर रान - त्यातली औतं आणि बारदाना - गावाच्या एका कडेला असलेला आमचा भलामोठा गायवाडा, त्यात अधेमधे खोदलेली पेवं, एका कोपर्यात ओळीने लावलेल्या कडब्याच्या वळह्या, गायबैल, वासरं, आंडील गोरे - लिहायला बसलो तर एक फर्मास कादंबरी सहज हातावेगळी होईल. पण तो धंदा वय वाढल्यावर करू.
आता फक्त गुंजाच्या दिवसांबद्दल. तर पाठ म्हणजे पंचपदीत जी ठराविक कवनं केलेली असतात ती दररोज एकवीस वेळा स्नान झाल्याझाल्या म्हणायची, पंचपदी करायची. मग रात्री निवांत जेवणं वगैरे झाल्यावर घंटा ! म्हणजे पुढचा तासभर सगळ्यांचा नुसता हातवार्यांवर कारभार! ज्याचा घंटा चालु आहे त्याचे बोलणे नाहीच. म्हणजे तासभर नुसता दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असा मनातल्या मनात जप करायचा. हे मी स्वत: करीत नव्हतो आणि ते वयही नव्हते कारण ही कामं ज्यानं गुरूमंत्र घेतला आहे त्यालाच फक्त मस्ट! इतरांना त्यातून सूट. काही आगाऊ काट्टी जमेस धरून, घरातील सगळ्यांनीच गुरूमंत्र घेतलेला. आठवडाभर हा सकाळ-संध्याकाळचा नेटवर्क कार्यक्रम आणि गुरूवारी गुंजाच्या मंदिरातील पंचपदीला उपस्थिती मस्ट म्हणजे मस्टच! घरातील किमान एकाचीतरी. बरेच जण जायचे.
बुधवारी रात्रीच चांदपाशा मामू आणि कंपनी गुरूवारचं टिपण घेत असताना - म्हणजे गुरूवारी शेतात करायच्या कामाची प्लॅनिंग काका किंवा तात्याकडून ऐकून घेत असताना सर्वात शेवटी त्याला प्रश्न जायचा -
"उद्या गुरूवार आहे बरं! कोण येतंय उद्या मग गाडीवर?"
"जाता क्या? " पायरीखाली रूमालाची घडी करून टेकून बसलेल्या सरदारकडं बघून चांदपाशा त्याला विचारायचा.
"त्रॉक्क.. वो बईल मेरे अकेलेकू नई संभलते !!" सरदार आलेल्या आफतीतून अंग काढून घ्यायचा.
हा चांदपाशा म्हणजे आमचा मुनीम. गडी, त्यांचे काम, बैल-बारदाना, औतं, रोजानं लावलेल्या बाया, शेतातली लहानसहान देणीघेणी, चंदी, घरचा किराणा भरणे वगरे कामांची पॉवर ऑफ अॅटॉर्नी याच्याकडं. सरदार हे चांदपाशाचेच सर्वात लहान शेंडेफळ. सरदारनं नुकतंच साल धरलेलं. चांदपाशा त्याला हलकी कामं द्यायचा. म्हणजे गुरूवारी नुसतंच गाडी जुपून मालक-पोराटोरांसोबत गुंजाला जायचं, तिथं गेलं की गाडी सोडायची, जेवून घ्यायचं आणि कुठंतरी सावलीला पडायचं. आम्ही मंदिरात. हा इकडं. शुक्रवारी सकाळी गाडी जुपून पुन्हा परत. पण बैल मारके असल्यानं सरदारला ते सोपं कामही नको वाटायचं. मग चांदपाशा गफूरभाईला थेट हुकूम सोडायचा -
"गफूर, सुबू कू बाडे पे गाडी लाव जल्दी से - इसकू टंगालता मै बारबिगी में "
सरदारकडं रागारागानं बघत चांदपाशा त्याला बारबिगी नावाच्या शेतात ताबडून घेण्याची धमकी द्यायचा आणि काका किंवा तात्याकडं हळूच बघुन घ्यायचा. सरदारला आमच्यासोबत पाठवण्याचा चांदपाशाचा आणखी एक छुपा हेतू म्हणजे - पोरगं जाता येताना मालकासोबत राहिल - बैलगाडी हाकताना चार जवळीकीच्या गोष्टी होतील. पुढं त्यालाच मुनीमकी करणं आहे. पण सरदारच्या टकुर्यात या गोष्टी शिरायच्या नाहीत. तो आपलं बैलांना भ्यायचा - आणि त्याच्या मालकांनाही. कारण हे बारबापे बैल (मी गायवाड्यात ऐकलेली ही त्याचीच शिवी) मध्येच शिवळावर पडायचे - एक बैल एका बाजूला ओढायचा दुसरा दुसर्या बाजूला! मध्येच गंगा ओलांडताना एखादा बैल जी पाण्यात फतकल मारून बसायचा की बास - दहा कोरडे ओढले तरी भरल्या गंगेतून जागचा उठायचा नाही. गंगेचं पाणी गाडीत शिरायचं आणि काका सरदारला शिव्या घालू लागायचे. अशावेळी गफर्याच (भाऊंनी नाहीतर तात्यांनी गफूरला बहाल केलेलं हे खास संबोधन) पाहिजे.
तर दुसर्या दिवशी गफूर गाडी-बैल घेऊन वाड्यासमोर हजर व्हायचा. नुसत्या रिकाम्या बैलगाडीत खाली कडब्याच्या पेंड्या टाकलेल्या असायच्या. मग त्यावर गादी. गाडीला छत वगैरे फक्त घरातलं महिलामंडळ सोबत येणार असेल तरच - एरव्ही नाही. गफूरने मस्त गाडीची चाके जिथे जोडलेली असतात तिथल्या आखाला लांब तारेने वंगण चोपडून घेतलेले असायचे. तो काळ्याकुट्ट वंगणाचा मोठ्या पोकळ वेळू (बांबू) पासून बनवलेला नळा गाडीच्या साट्यालाच हमेशा अडकवून ठेवलेला असे. बाबुकाका, मी, राजूकाका, योगूकाका, झालंच तर गाडीत येण्यासाठी रडारड करून आमची नमी गाडीत चढायचे. मी आणि नमी आधी गफूरच्या शेजारची जागा धरायचो. कारण तिथून समोर बसून पाय खाली सोडता यायचे आणि गफूरकडून बैलगाडीचा कासराही हातात घ्यायला मिळायचा. बाकीचे सगळे बाजारस्त्यातल्या मारूतीच्या देवळापासून बसायचे.
भोईवाड्याकडून खंडोबाकडे अशी अर्धी नगरप्रदक्षिणा घालत आमची गाडी सरईच्या ओढ्यात एकदाची शिरायची - गुंजाला निघाल्याचा खरा फील सरईच्या ओढ्यातून सुरू व्हायचा. कुठेतरी लुप्त की गुप्त झालेली शरयू नदी आमच्या गावच्या उशाशी उगम पावली असे समजले जात असे - तिचे गावठी नाव सरई! ती पुढे गोदावरीला जाऊन मिळते. तिच्या त्या भल्यामोठ्या ओढ्यातल्या चिखलातून चाकं फसवीत, कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला कंबरेपर्यंत कलत गाडीबैल आणि आमची जत्रा पुढे सरकायची. ओढ्याच्या दोन्ही बाजूंना उंचच उंच बाभळी. त्यांना लटकलेली आग्या मोहोळं. चित्रविचित्र पक्ष्यांचे आवाज. मध्येच समोरून येणार्या दुसर्या बैलगाड्यांना आमची गाडी कुठंतरी काट्याकुपाट्यात घालून साईड देणे वगैरे प्रकारात गफूर निष्णात. होता होता इद्दुस्वामीचा मळा यायचा. इथं पाण्याचा एक मोठ्ठा पाईप आणि एक हौद रस्त्याच्या कडेला बांधलेला असे. इथं बैलगाडी थोडा दम खात असे. बैलांना पाणी दाखवले जाई. आम्ही सगळे खाली उतरून पाय मोकळे करीत. तेवढ्यात नमी नाहीतर मी ओरडे -
"ओ काका, आपले काळ्या-लाल्यापण आलेच आपल्यासोबत!"
काळ्या लाल्या या आमच्या कुत्र्यांना कुणीही न बोलावता ते गाडीमागं गुंजापर्यंत येत - दुसर्या दिवशी पुन्हा बैलगाडीसोबत परत.
"दत्तदर्शनला जायाचं जायाचं जायाचंऽऽऽ आनंद पोटात माझ्या माईनाऽऽ माईना" त्या कुत्र्यांकडं बघत योगू काका गाणं म्हणे.
बाबूकाका योगूकाकाला छेडत-
"योगानंद महाराज - कुठं ऐकलंत हे गाणं?"
"अहो ती नाही का मी कॅसेट आणलीय नवीन - तिच्यात आहे" योगूकाका.
"आंऽऽ योगूमालक हे गानं इतक्यांदा म्हन्तात की मलाबी पाट झालंय आता" गफूरही मध्येच त्यांच्या बोलण्यात सहभागी होई.
गफूर पुन्हा मग गाडी जुपून त्याच्या भाषेत बैलांशी संवाद साधू लागे -
"व्वा रे बईल!!" असं म्हणून शेपटी पिरगाळी.
मग पुन्हा एकदा सुरूमगावच्या ओढ्यात गाडी शिरे. तिथे थोडे गचके-आदळे खाऊन, त्या गावच्या मारूतीला वेढा घालून आमची बैलगाडी एकदाची गंगेत शिरे. गंगा ओलांडली की आलंच गुंज! तापलेल्या वाळूत बैलगाडीची चाकं शिरली की सर्रर्रर्रर्र आवाज होई आणि वाळू उडे. तेवढ्यात गंगेच्या वरच्या बाजूला दिसणार्या निशाणाच्या दिशेनं सगळ्यांचे हात जोडले जात. तिथे गुरूमहाराजांच्या समाधीचे मंदीर उन्हात चमकताना दिसे. बाबुकाका, राजूकाका गाडीच्या खाली उतरत. आणि गंगेच्या पाण्यात गाडी शिरली, की एक बैल त्याच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणं पाण्यात फतकल मारून बसे! गफूर सरळ पाण्यात उतरून बैलाची शेपूट हातात घेऊन तिला कडकडून चावा घेई - तोपर्यंत कासरा योगूमालकांनी धरलेला असे. शेपूट चावले की दण्णकन बैल उठून चालायला लागे.
मग पुन्हा गाडी सोडा. वडीलधारे लोक कृष्णा आत्याकडं जात. ही बाबुकाकांची बहिण. आमची आज्जीच. हे तिचंही गाव होतंच. गफूर शिवळा-जोती, कासरा आत्याच्या घरी ठेऊन बाहेर फिरायला निघून जाई. नमी, मी थेट मंदिरासमोरच्या वड-लिंबाच्या बनाकडे धूम ठोकत असू. कारण तिथे गुंज संस्थानचा खराखुरा, अगडबंब हत्ती बांधलेला असे. बारा वाजत आलेले असत आणि त्या हत्तीला झुल चढवून, घागरमाळांनी मढवून वर अंबारी ठेवण्याचे काम पाहायला खूप मजा येई. हाच हत्ती दत्ताची आरती चालू असताना थोड्यावेळानं उंचावर असलेल्या मंदीराच्या उंबर्याशी आणला जाई. उंचच उंच पायर्या. मंदिराचे टोलेजंग बांधकाम. संगमरवराचा भलामोठा सभामंडप आणि गुरूवारच्या आरतीला जमलेली भरगच्च गर्दी. एका कोपर्यात वाजणारा सनई-चौघडा. नमीची आणि माझी जागा सनई-चौघड्यावाल्या बाबांच्या शेजारी. कारण ती पण एक मजा असे. आरतीच्या गूढ, गंभीर ताला सुरात हत्तीच्यापण किंकाळ्या मिसळून जात.
मग ती भलीमोठी आरती ठरलेल्या ठिकाणी ठेऊन दिली जाई आणि लोक रांगेने आरती घेत. ती रांग तशीच पुढे पाकशाळेकडे सरकत असे. अगडबंब देहाच्या ब्राम्हणांच्या पंगती लागत आणि तशाच उघड्याबंब, गलेलठ्ठ देहाचे, छाती-पोटावर भरघोस केस, जानवी वागवणारे सेवेकरी पत्रावळी वाढायला घेत. चविष्ट अन्न. मंदिराच्या विहीरीचे पाणी मात्र खारे असे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, गुरूदेव दत्त दत्त दत, समर्थ सदगुरू योगानंद महाराज की जय, परमपूज्य चिंतामणी महाराज की जय! अस जयघोष झाली की चित्रावती घालून पंगत अन्नग्रहण सुरू करीत असे. मध्येच पंगतीच्या एका कोपर्यातून नुकतीच मुंज झालेल्या श्रीपाद नाहीतर अवधूतचा श्लोकाचा बारीक आवाज उठत असे -
सोडी सावळी सानुताप सबळे ऽऽऽ सत्सेवी संतुष्टलाऽऽऽऽ
साधी साधन साष्टांग निगुती ऽऽऽऽऽऽ योगे तपे कष्टलाऽऽऽऽऽ
कर्मोपासक ज्ञानसूर्य गमतो वैराग्य द्विमर्धूनीऽऽऽऽऽऽ
श्रीमद्सद्गुरू पादपद्मह्र्दयी ऽऽऽऽ सिध्दाग्र चिंतामणीऽऽऽ
मग पुन्हा एकदा जयजयकार होई. एखादा तयारीचा ब्राम्हण खास ठेवणीतला श्लोक काढी -
सासु कस्पट सासरा तृणजसाऽऽऽ भ्रतार दासापरिऽऽऽ
ऐशी कन्या ज्या नरासी मिळतसे त्याने भजावा हरिऽऽऽ
सर्वांना यथेच्छ अन्नदान करण्यासाठी वाढपी ब्राम्हणांची नुसतील धावपळ सुरू असे. श्लोकांच्या अशा जुगलबंदीत, हास्यविनोदात प्रसादग्रहण होई आणि लांब पाट काढलेल्या विहीरीवर हात वगैरे धुवून लोक सभामंडप, मंदिराचे आवार, खालचे झाडांचे बन इत्यादी ठिकाणी पांगत.
नमी आणि माझं आणखी एक आकर्षण पाहायचं राहिलेलं असे - संस्थानची भलीमोठी, उंचच्या उंच अॅम्बासॅडर कार, तसलाच मोठठा ट्रॅक्टर. त्या कारला झटायचे नाही. कारण ती चिंतामणी महाराजांची कार असे. तिला हार, गंध वगैरे लावलेले असे. लोक कारलाही नमस्कार करीत. आम्हीही हात जोडून घेत असू; पण त्या कारजवळून लवकर हलत नसू.
मग पुन्हा एकदा कृष्णा आत्याकडे एक चक्कर. तिथं गेलं की तपकीर नाकात घालत बसलेले उत्तमकाका आधी मला पकडत आणि दर आठवड्याला विचारलेले तेच प्रश्न पुन्हा एकदा विचारून उगाच भंडावून सोडत-
"काय रे, कितवीला आहेस यंदा? किती टक्के पडले गेल्यावर्षी?"
"सहावीला आहे. गेल्यावर्षी पासष्ट टक्के पडले."
"आत्ता दुपारी तुच भोंगळ्यानं गंगात पोहत होता की नाही? मी पाहिलंय तुला. सांगू का बाबूकाकाला?"
"मी कुठं पोहोत होतो हो? मी न नमी हत्ती पाहायला गेलो होतो"
"अस्सं काय बेट्या - तु इथं आलास की नेहमी भोंगळ्यानं गंगात पोहोताना पाहातो मी.. खोटं बोलू नको"
मी त्यांच्या तावडीतून सुटुन दुसरीकडे पळत असे. मग अशीच दुपारच्या चहाची वेळ. मोठ्यांच्या गप्पा उगाच कान देऊन ऐकणे, तिथल्या पोरासोरांच्या खोड्या काढणे.
नमीचे ए पोरा तुझ्या नाकात दोरा वगैरे गाणे सुरू होत असे.
आणि रात्री दहा वाजता पंचपदी!
मंदिराच्या लाऊडस्पीकर मधून नोम-तोम-नोम-तोम-राम-राम-तुक्काराम-राम-राम-तुक्काराम-राम-राम-तुक्काराम ऐकू येऊ लागले की सर्वजण लगबगीनं मंदिराकडे पळत.
पंचपदीची सुरूवात रंगावधूत महाराजांच्या गुजराती भाषेतल्या दत्तबावनीनं होत असे -
जय योगीश्वर दत्तदयाळ, तुच एक जगमां प्रतिपाळ...
अत्र्यनुसूया करि निमित्त, प्रगट्यो जगकारण निश्चित
ब्रम्हा हरिहरनो अवतार, शरणागतनो तारणहार
अंतर्यामी सदचित्सुख, बहार सद्गुरू द्विभूज सुमुख
झोळी अन्नपूर्णा करमाह्य, शांती कमंडल कर सोहाय
क्वायं चतुर्भुज षडभुजसार, अनंत बाहु तु निर्धार
आव्यो शरणे बाळ अजाण, ऊठ दिगंबर चाल्या प्राण
अशीच सुंदर सुंदर पदे पेटी, तबला आणि सुरेल आवाजात म्हटली जात, दत्तगुरूंची पालखी सजवलेली असे. काही-काही पदं ऐकताना-म्हणताना खूप भरून येई. खाली दिलेले पद दत्तगुरूंनी स्वत: त्या कविच्या स्वप्नात जाऊन रचून घेतले आहे असे बोलले जाते. एक नंबरचे कवित्व आणि वर पुन्हा त्या पट्टीच्या गायक ब्राम्हणाचा आवाज एवढा भावार्थ असे की अनेकांच्या डोळ्यांतून अश्रु टपकत-
हा परमसनातन विश्वभरूनी उरलाऽऽऽ भरूनी उरला
गुरू दत्तराज ऋषिकुळात अवतरला
स्मित रम्यवदन काषाय वसन धारी
पियुषयुक्त करी रत्नजडीत झारी
निज भक्त कारणेऽऽऽऽ दंड त्रिशुळ धरिला
बांधीला टोप मुरडून जटा मुकुटीऽऽऽऽ मुकुटी
घातली गुरूने वनमाला कंठी ऽऽऽऽ कंठीऽऽऽ
करिघृतडमरूतुनी उपजति ज्ञान कला
मृगचर्म पांघरे माला कमंडलू हाती, कमंडलू हाती ऽऽऽ
श्रुति श्वानरूप होऊनी पुढे पळती
भूधेनू कली भये चाटीत चरणाला
करिस्वजन उपाधि भस्मलेप अंगा ऽऽऽ
झोळीत भरीत तज्जजन्ममरण पिंगा ऽऽ
नारायण हृदयी रंग भरूनी गेलाऽऽऽ भरूनी गेलाऽऽऽ
गुरू दत्तराज ऋषिकुळात अवतरला
त्या संगमरवरी सभामंडपात टाकलेल्या लांबरूंद सतरंजीवर आम्हाला कधी डोळा लागत असे ते कळत नसे. पुढची सगळी पंचपदी, पदे तो हत्ती, ती अॅम्बासॅडर कार, तो मोठ्ठा घाट, त्या पंगती श्लोक यांच्या मनात भिरभिरणार्या प्रतिमा, आवाज, स्वप्ने यांच्या रूपानं मनासमोर गोलगोल फिरत आणि झोपेच्या गुडूप्प काळोखात नाहीशी होत. झोपेतच आरती घेणे, घरी येणे, पुन्हा झोपणे.
दुसर्या दिवशी सकाळी आमची बैलगाडी गंगा ओलांडून गावाकडे परत निघाली की बाबुकाका सांगत -
"अरे काय पप्या, झोपलास रात्री मध्येच पंचपदी चालु असताना, किती मजा आली बघ नंतर....."
गुंजग्रामीचे ते दिवस फार मजेत जात.
khupach aanand milala. wwa!
उत्तर द्याहटवा