२६ एप्रिल, २०१०

जुन्या कविता

मजल
आम्हाला गझल लिहीता येत नाही - म्हणून गजलेच्या दिशेने आम्ही मारलेली ही मजल)

हे गोड आठवांनो बरसू नकात आता
स्मृतीशेष त्या स्थळांना उकरू नकात आता

भोगून प्राक्तनाचे मी वार तृप्त झालो
विसरून त्या क्षणांना केव्हाच मुक्त झालो

असता असेही काही गलती अमान्य नाही
पुसण्यास जाच आता देईल ती ही ग्वाही

तो स्वर्ग जिंकण्याची संधी अमोल होती
उमजून सर्वकाही नियती कठोर होती

तुटताच प्रेमधागा जुळण्यास वाव नाही
सांगून रहीम गेला गाठीस भाव नाही

या बुजूर्ग सांगण्याला झालो मी न राजी
धाडून पाहिली मी आमंत्रणे तहाची

शेवटी मानले मी रहिमन तुझेच आता
हे गोड आठवांनो बरसू नकात आता

प्रेमपाठ

प्रेमाचिया गावा जावे । परी मजनू न व्हावे कदापिही ।।
जाळण्या स्वत:सी स्वत:च्याच हस्ते । खटाटोप नस्ते करू नये ।।
ज्वानीच्या भरासी घाला येथ बांध । साठू देत कुंभ भावनांचे ।।
आगीशी खेळणे नसे खेळ सोपा । ज्वाळेवरी खोपा बांधू नये ।।
प्रेमाचा फकिर जळे रात्रंदिन । करी मद्यपान आठवूनिया ।।
मद्य हे आगीचे आहेच की सोयरे । आठवांचे पिसारे फुलवू लागे ।।
वेदनेचे मूळ असे खोल-खोल । न चाले तेथ दवा-दारू ।।
तडफडे जैसा जळाविण मासा । पाहुनिया जन हसती कसे ।।
प्राणदान अर्घ्य पडू पाहे आता । मजनूचे कुळ वाढू पाहे ।।
लैलाची करूणा नसे मजनूभाळी । तरीच ती जाळी पदोपदी ।।
स्मरूनिया प्रियेसी प्राशी हलाहल । आता कोलाहल गेल्यापाठी ।।
ऐसा प्रेमपाठ झाला आता पूर्ण । ठेवी हेच स्मरण रात्रंदिन ।।
न करी हा पाठ होई तो सपाट । मजनूचे कुळ वाढे-वाढे ।।
संतांचा अभंग नसे हा सवंग । नसे प्रथा भंग कदापिही ।।
मजनूच्या सहाय्या ज्ञाना येथ आला । म्हणौनिया झाला प्रेमपाठ ।।