२००३ साली येऊन गेलेला हॉलीवूडचा दि कोअर हा सी-फि सिनेमा नुकताच नजरेवेगळा केला. या कोअरमधूनच बराच पसारा निघाला, तोच आता इथं मांडणार आहे. कोणताही सी-फि म्हटले की त्यात डायरेक्ट पृथ्वीचाच नाश होताना पाहाणे आणि मध्येच कुणीतरी (विशेषत: व्हाईट हाऊस किंवा पेंटागॉनच्या जाली सेटवर बसलेल्या लुंग्यासुंग्यांनी, किंवा कुठल्यातरी वाळवंटात, कबाडखान्यात किंवा जगाच्या कोणत्याही कोपर्यात संशोधन करणार्या झक्की लोकांनी) तो थांबवणे अटळ असते. या सिनेमातही हेच होते; एकापेक्षा एक छप्परफाड (खरं म्हणजे पृथ्वीफाड, आकाशफाड किंवा ग्रहगोल-तारे-आकाशगंगा-विश्व-फाड असं म्हणायला हवं) कल्पना यात अगदी ठासून भरलेल्या आहेत. तर बाकी चर्चा करण्याआधी या सिनेमाची स्टोरीलाईन खेचून घेऊ.
थोडक्यात कथा अशी की पृथ्वीचा आतला गाभा आणि त्याच्यावर असलेला तप्तरस, लाव्हारस किंवा ते जे काय असेल ते अचानक फिरणे बंद होते. का? अर्थातच अमेरिका नावाच्या महाभयानक डोकेबाजी करणार्या देशाने कामाला लावलेल्या संशोधकामुळे. सिनेमात हे थोडसं पुसटपणेच सूचीत केलंय; पण केलंय. झिमिन्स्की नावाचा भूगर्भ शास्त्रज्ञ पृथ्वीला झटके देऊन पृथ्वीवर भूकंप उत्पन्न करण्याचं मोठ्ठं यंत्र उभारतो. हे प्रलयंकारी यंत्र उभं करण्यामागची कल्पना अर्थातच अमेरिकेच्या शत्रुंपेक्षाही (म्हणजे अमेरिकेचे शत्रु तिकडून भूकंपाचा झटका देणार, अमेरिकाही त्यांच्यापेक्षा जास्त मोठा झटका इकडून देणार, आणि पृथ्वी व पृथ्वीवरचे लोक मात्र मधल्यामध्ये फुकट मरणार! पण हे सिनेमात दाखवलेलं नाही) वरचढ शस्त्र तयार करणे ही असते. "इफ वी वील नॉट डू इट, दे वील डू इट" या जगप्रसिध्द सूत्राचे पाठबळ त्याला असायला हवेच, ते तसे असते. तर हा चित्रपट उत्पन्न होण्याचे चित्रपटातील पुसट पण आपल्याला दिसणारे सुस्पष्ट कारण म्हणजे झिमिन्स्कीने दिलेल्या झटक्यामुळे पृथ्वीच्या गाभ्यावर काही मैल पसरलेल्या गाभ्यावरचा तो तप्तरस, लाव्हारस किंवा ते जे काही असेल ते आपण कॉफी ढवळतो तसे फिरणे अचानक थांबते.
त्यामुळे सूर्यापासून किंवा अवकाशातून येणारे अतिनील चुंबकीय किरण हळूहळू पृथ्वीचा बोर्या वाजवायला सुरू करतात. अर्थातच चित्रपट हॉलीवूडचा असल्याने सर्वात आधी बोर्या वाजतो तो अमेरिकेतल्या लोकांचा. म्हणजे आकाशातून येणार्या त्या विद्युत चुंबकीय तरंगांमुळे सर्वात आधी पेसमेकर बसवलेले तीस-बत्तीस लोक भर चौकात एकामागून एक अचानक पटापट माना टाकतात. मग लंडनच्या ट्रॅफल्गार चौकातील कबुतरं किंवा स्थलांतरप्रिय पक्षी वाटेल तसे उडायला लागतात आणि दणादण दुकानांच्या, मोटारींच्या काचांवर, लोकांच्या तोंडावर जाऊन आदळू लागतात. या पक्षांच्या मेंदूत त्यांना लांबचा पल्ला गाठताना मार्गदर्शन करणारे कसलेतरी इलेक्ट्रॉनिक आयन्स असतात त्यामुळे असे होते म्हणे. इथे येतात अॅरॉन एकहार्ट आणि चेकी कार्यो! अॅरॉन हा शिकागो विद्यापीठात भूगर्भ रचनेचा हुशार प्रोफेसर असतो. चेकी अणु शास्त्रज्ञ. मग त्याला पकडून जनरल समोर हजर करणं आलंच. त्याला सीआयएवाले भर वर्गातून धरून आणतात आणि सेक्युरिटी जनरल लोक पटापट का उडाले ते अॅरॉनकडून समजून घेतो. हा दहशतवादी हल्ला नाही हे स्पष्ट झाल्याने सेक्युरिटी जनरल निर्धास्त होतो आणि अॅरॉनने पाजळलेले शिल्लक ज्ञान ऐकून घेऊनही त्याला कल्टी मारतो.
तिकडे रोमवर आलेल्या चुंबकीय ढगांमुळे अर्ध्यापेक्षाही जास्त रोम शहराचा बुकणा वाजतो - अचानक विजा कोसळू लागतात, इमारती ढासळू लागतात, विद्युतसुवाहक धातुला स्पर्श करणार्या लोकांना वीजेचे झटके बसू लागतात आणि पृथ्वीवर हाहाकार माजायला सुरूवात होते. उंच वर अवकाशात अमेरिकेचे एंडेव्हर हे अवकाशयान उडत असते त्याची खाली पृथ्वीवर उतरण्याची वेळ झालेली असते. पण पृथ्वीवर मध्येच ही भानगड उपटल्यामुळे ते उतरायला जाते एकीकडे आणि उतरते भलतीकडेच. हॉलीवूडची शपथ, ते अवकाशयान, हो, हो अवकाशयान लॉस एंजेलीस जवळच्या नदीत सुखरूप उतरवले जाते! ते उतरवणारा/री पायलट/कमांडर कुणीतरी असायलाच हवं - तर एक असतो आल्फ्रे वूडार्ड आणि दुसरी असते हिलरी स्वॅंक. रस्ता भटकलेल्या, लॉस एंजेलीस शहराच्या रस्त्यांवर आदळू शकणार्या अवकाशयानाला नदीत घुसवण्याची आयडीया शेवटच्या सेकंदाला हिलरीनेच यानाच्या कमांडरला सुचवलेली असते. ती यशस्वी झाल्याने कमांडरने तिच्यावर खार खायला हवा, तसा आल्फ्रे वूडार्ड खातो. नदीतल्या पुलाच्या खांबाना घासून अवकाशयानाचे पंख तुटतात. अमेरिकेसारख्या चौकशीप्रेमी देशात या प्राणहानी न झालेल्या अपघाताची चौकशी व्हायला हवीच, तशी ती होते. अमेरिकेचा सेक्युरीटी जनरल किंवा सरसेनापती तिला झालेल्या घटनेबद्दल चार शब्द ऐकवतो. भोवतीची यंत्रणा बिघडलीय हे तोपर्यंत स्पष्ट झालेले नसते. ते जेव्हा लक्षात येते तेव्हा बाकायदा हिलरीला आणखी एक चांगले काम सोपवले जाते.
तोपर्यंत भूगर्भाचा प्रोफेसर असलेल्या अॅरॉन एकहार्टने काहीतरी डोके लावलेले असते आणि सुरू झालेली सगळी भानगड समजून घेऊन झिमिंस्की नावाच्या सेलिब्रीटी शास्त्रज्ञासमोर मांडलेली असतो. हा झिमिंस्की सेलिब्रीटी शास्त्रज्ञ असला तरी बर्याच भानगडी करून, लोकांची संशोधनं चोरून ती स्वत:च्या नावावर खपवून वर चढलेला असतो. कारण डेलरॉय लिंडो (हा वाळवंटात संशोधन करणारा झक्की शास्त्रज्ञ आहे) झिमिंस्कीला पाहिल्यापाहिल्याच म्हणतो - "तु अजून मेला नाहीस? तु माझं संशोधन चोरून स्वत:च्या नावावर खपवल्याला आता वीस वर्षे झालीत, वीस वर्षांनंतर मी तुझं तोंड पहिल्यांदाच पाहातोय." तर झिमिंस्की सगळी भानगड अमेरिकेचा सेक्युरिटी जनरल आणि टेबलाभोवती बसणार्या लोकांसमोर मांडतो आणि पुन्हा एकदा अॅरॉन एकहार्टला उचलून सेक्युरिटी काऊंसिलसमोर उभे केले जाते. हुशार आहेस ना, सांग मग काय होतंय ते! तो रूमफ्रेशनर मागवतो व एक फळ मधोमध कापून सगळी कथा तिथल्या लोकांसमोर मांडतो. मग आता पुढे काय होणार ते लोक त्याला विचारतात. रूम फ्रेशनरचा फवारा त्या फळावर सोडून तो त्या फळाला आग लावतो. सूर्याकडून येणार्या अशाच आगीच्या फवार्यात पृथ्वी जळून खाक होणार हे अॅरॉन जाहीर करतो. मग ही दुर्घटना थांबवणं आलंच. त्यासाठी पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील फक्त नऊ मैलांपर्यंतचीच माहिती उपलब्ध आहे आणि तिथंही एक लहानसा शाफ्ट्च जाऊ शकलाय हेही जाहीर होतं. फक्त वर्षभराच्या आत पृथ्वी जळून राख होईल हे अॅरॉन स्पष्ट करतो; झिमिंस्की त्याला मध्येमध्ये तोंड मारून स्वत:च त्या विषयावरील प्रभुत्व सिध्द करीत दुजोरा देत राहातो. या एका वर्षाच्या काळात नैसर्गिक प्रकोप वाढत्या प्रमाणात सहन करावा लागेल आणि त्यातच जगाचा अंत आहे हे मनावर बिंबतं.
मग येतो डेलरॉय लिंडो. या पठ्ठ्यानं लेजर किरण वापरून पहाडाला भोक पाडणारे एक यंत्र आणि लेजर किरणांच्या मार्यात उंदीर (कोणताही जीव) आत जीवंत राहिल असा धातू शोधलेला असतो. हा खरा हाडाचा शास्त्रज्ञ असतो. स्वत:च्या चष्याच्या काड्यांना सूत गुंडाळून हा वीस वर्षांपासून ते पहाडाला भोक पाडणारं यंत्र उभं करण्यात गुंतलेला असतो. शेवटी सेक्युरिटी जनरल आणि उपरोल्लेखीत सर्व गॅंग या डेलरॉय लिंडोच्या वाळवंटात असलेल्या बेसवर जाऊन धडकते. हॉलीवूडचा चित्रपट म्हटल्यावर हेलिकॉफ्टर्स, चकचकीत कार्स वगैरे लवाजामा आलाच. तोही दिसून जातो. डेलरॉय त्या यंत्राचं आणि धातूचं प्रात्यक्षिक करून दाखवतो. त्यानं बांधलेलं यानसुध्दा दाखवतो. त्याला जनरलकडून उपकरण पूर्ण कधी होईल त्याबद्दल विचारणा होते. डेलरॉय दहा ते बारा वर्षे लागतील हे सांगतो. मग पुन्हा जनरल डेलरॉयला तीन महिन्यात यान उभ करायला सांगतो; पन्नास अब्ज डॉलर्स खर्च द्यायला तयार होतो.
हे यान बांधण्यामागची कल्पना अशी की - रेल्वेच्या डब्याप्रमाणे एकमेकांपासून वेगळ्या होणार्या सात कंपार्टमेंटस तो नवीन धातू वापरून बांधायच्या. यानाच्या तोंडावर लेसर किरणांचा मारा करणारे व्हील बसवायचे. यान पृथ्वीला भोक पाडीत तिच्या गाभ्यापर्यंत जाणार. तिथे गेल्यावर यानात सोबत घेऊन गेलेल्या अणुबॉम्बचे स्फोट करायचे आणि गोलाकार असलेल्या त्या लाव्ह्याला गती देऊन आतलं वर्तुळ पुन्हा एकदा सुरू करायचं!
अॅरॉन एकहार्ट, चेकी कार्यो, ब्रुस ग्रीनवूड, हिलरी स्वॅंक, झिमिन्स्की, डेलरॉय लिंडो आणि हो, डीजे क्वाल्स हा आत्ताच चरख्यातून पिळून काढल्यासारखा दिसणारा हॅकर या सर्वांची टीम तयार करण्यात येते. डीजे क्वाल्सने चौसष्ट वेळा हॅकींग करून फ्रॉड केलेले असते. तोही त्याच्या क्षेत्रातला महागुरूच! पण काम करायला लवकर तयार होत नाही. बोलणी चालू असताना तो एका मिनीटातच अॅरॉनच्या मोबाईलवर लाईफटाईम एसटीडी कॉल्स फ्री करून देतो. त्याच्याकडे संपूर्ण जगातले इंटरनेट्च हॅक करण्याचे काम दिले जाते. म्हणजे या प्रकल्पाबाबत एक शब्द देखील इंटरनेट्वर दिसू द्यायचा नाही.
अॅरॉनला या यानाचा चीफ करण्यात येते. कारण झिमिन्स्कीच्या वर उल्लेख आलेल्या डेस्टीनी नावाच्या उद्योगामुळे झिमिन्स्कीची अक्कल जनरलला कळालेली असते. जगभरातील शास्त्रज्ञ समुदायासमोर प्रवक्ता म्हणून बोलू देऊन भाव खाऊ देण्यासाठीही झिमिन्स्की जनरलकडे तड्फड करतो; पण त्याची डाळ शिजत नाही. एकूण प्रकल्प सुरू होतो; सिम्युलेशनद्वारे यानाच्या चालकांना हे जमिनीत घुसत जाणारे यान चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
अॅरॉन या यानाचा भूगर्भातील वाटाड्या होतो, हिलरी आणि ब्रुस हे चालक होतात, झिमिन्स्की काहीच न करता चुकीचा सल्ला छातीठोकपणे द्यायचे काम स्वीकारतो, चेकी कार्योकडे अणुबॉम्बच्या स्फोटाचे काम असते, डेलरॉय लिंडोचे तर पूर्ण यानच असते. समुद्रात यान खाली तोंड करून उभे केले जाते आणि काऊंट्डाऊन पूर्ण होताच समुद्रतळाकडे मुसंडी मारून आत घुसत जाते. यानाशी संपर्क, नियंत्रण वगैरे सांभाळण्यासाठी नेहमीचेच निनावी यशस्वी कलाकार कुठल्यातरी नियंत्रण कक्षात बसतात.
अॅरॉन आणि हिलरी हेच सिनेमाचे हिरो-हिरॉईन असल्याने फक्त तेच दोघे शेवटी जीवंत परत येतात. यानातील बाकी सब लोग दुनिया बचाने के लिये कुर्बान हो जाते है. यान गाभ्यापर्यंत कसे जाते, गाभ्यावरचा लाव्हा अत्यंत तरल असल्याने स्फोट करणे रद्द होऊन त्यांना परत फिरण्याची ऑर्डर येणे, शिल्लक राहिलेल्यांमधील बेबनाव, मध्येच काय-काय अडचणी येतात वगैरे दृश्ये मनोरंजन करून जातात.
आता हॉलीवूडचा कोणताही सिनेमा पाहिल्यानंतर मला पडणारे सनातन प्रश्न:-
हॉलीवूडमध्ये निग्रो जर सूटाबुटात असेल तर त्याचा सूट नेहमी वाकडातिकडा, ढगाळा-गबाळा का असतो? (नमुना: २०१२ डूम्स डे मधील अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष)
हिरो हिरोईन हुशार असूनही एकमेकांना सोडून का जातात? रहा की राव मस्त, लग्न करा - मजा करा... पण नाही.
जवळपास सगळ्या हॉलीवूडपटांचा रोख जगाचा नाश करण्याकडेच का असतो?
हॉलीवूड सिनेमातील प्रत्येकजण सतत बर्गर, पिझ्झा असे काहीतरी खात किंवा दारू, वाईन पीत का असतो?
हॉलीवूड सिनेमातील निग्रो पोरांच्या आया त्यांच्यावर सतत का ओरडत असतात?
हॉलीवूडच्या सिनेमात प्रत्येकजण आपल्या कामात एवढा चोख दाखवला नाही तर अमेरिकेची जगातील प्रतिमा खराब होईल काय?
हॉलीवूडच्या सिनेमातील प्रत्येकाच्या आवडीचे एक विशिष्ट हॉटेल, विशिष्ट बेट, विशिष्ट ड्रिंक, एक विशिष्ट स्वप्न का असते?
स्वत: पन्नासदा घटस्फोट घेत असले तरी हॉलीवूड सिनेमातील नायक-नायिका पोराबाळांच्या पालन पोषणाबद्दल एवढे जागरूक का असतात?
आणि हॉलीवूड सिनेमातील प्रत्येक बाप "मुझे पता है, मै अच्छा बाप नहीं बन सका" असे का म्हणतो?
तुम ये कर सकते हो..
नय...चार्ली..छोडो भी
असली आणि असलीच कितीतरी निरर्थक वाक्ये हिंदी आवाजात कोण डब करतात?