२४ फेब्रुवारी, २०१२

कालाय तस्मै नम:

पहिल्याछूटच सांगून टाकतो शॉटमारी लेख लिहीतोय. त्यामुळं निगुतीनं वाचा; आता वेळ नसेल तर लगेच वाचूच नका. हे लिहिण्यामागे अपेक्षित असलेलं हस्तांतर शेवटी झालं की नाही ते सांगा. गेल्या काही दिवसांपासून मला एक प्रश्न पडला आहे. आपण जगात वावरतो कोणत्या आधारावर? आपल्या वावराला आधार कशाचा असतो? आपण एखाद्या काल्पनीक मितीमध्‍ये जगतो की आपल्या पायाखाली काही ठोस असतं? थोडासा आणखी फाटा फोडतो. मला ' काळ किंवा वेळ' दोन मूळ रुपात प्रतित होते. एक आहे काळाच्या उलटण्‍याची नैसर्गिक गती - ज्या गतीत कुणीही फेरफार करु शकत नाही. या काळाच्या उलटत असलेल्या नैसर्गिक गतीमध्‍ये काहीही फेरफार संभवत नाही. कारण आपल्याला ती परिपूर्णपणे जाणवत नाही. काळाच्या उलटण्याच्या त्या नैसर्गिक गतीशी आपण तसे फारसे जोडले जात नाही. क्षणभर जोडले जातो, लगेच त्यापासून तुटतो. कारण आपल्या आतमध्‍ये आपल्याला आपल्या स्वत:च्या 'काळ' या संकल्पनेला संचालित करणारी कसलीतरी यं‍त्रणा आहे. उलटणार्‍या काळाची नैसर्गिक गती आणि आपली स्वत:ची गती यात ताळमेळ नसतो. कारण काळाच्या नैसर्गिक गतीच्या वेगानं जायचं म्हटलं तर त्यात दरक्षणी अनंत पैलू असलेल्या लाखो प्रतिमा निर्माण होत असतात. आणि आपण आपल्या स्वत:च्या काळाच्या उलटण्‍याच्या वेगानं जात असल्यानं त्यातल्या काही प्रतिमाच आपल्या नजरेस पडतात. आपली स्वत:ची काळाची व्याख्या असलेली गती काळाच्या नैसर्गिक गतीशी नेहमीच विसंगत असते. त्यामुळे फारसं वेगळं काही दिसत नाही. त्याच त्याच प्रतिमा पाहून जीव कंटाळतो. प्रत्यक्षात आजूबाजूला मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिमांची ये-जा सुरु असते. आणि आपण काही प्रतिमाच पुन्हा पुन्हा उलटून पहात असतो.
काळ, मग तो कोणताही असो तो अनंत आहे. आपण अनंत नाही. आपण उद्या मरु, काळ असाच पुढे जाईल. त्यात कशा का होईना पदरी पडतात तेवढ्या प्रतिमा पहायलाही आपण नसू. पण आपण आता जीवंत असताना, पण ज्या गतीशी आपला ताळमेळ नाही त्या काळाच्या उलटण्‍याच्या नैसर्गिक गतीमध्‍ये काळ अनंतपट आहे असे भासते. या नैसर्गिक गतीत काळ अनंतपट भासतो म्हणजेच प्रत्यक्षात काळ ही संकल्पनाच लोप पावते आणि अनंतत्त्व शिल्लक उरतं. अनंतत्वातच काळ विलिन झालेला असतो. आणि अनंतत्व पूर्ण ताकदीने अनुभवात येते. पूर्ण ताकदीने अनुभवास येते म्हणजे काळ लोप पाऊन अनंतत्व शिल्लक राहिल्यानं त्या अनंतत्वात होणारी प्रत्येक हालचाल आपला जीवंत, थेट अनुभव असतो. कोणत्याही स्तरावरील कोणतीही हालचाल कशी होत आहे हे आपण अनुभवू शकतो. उदाहरण पहायचंय? इथे तुमच्या डोळ्यांसमोर शब्द येत आहेत आणि त्यातून कसलीतरी प्रतिमा उलगडत जात आहे. प्रत्यक्षात एक विशिष्‍ट विचार, एक विशिष्‍ट रेखाचित्र मन:पटलावर चितारत आहे. विचार असंख्‍य आहेत आणि ते स्वयंभू हालचाली करीत असल्यानं त्या कित्येक विचारांपैकी एक प्रयत्नपूर्वक वेगळा काढून तो विचार ज्या प्रदेशात संचार करीत आहे तो प्रदेश पहावा लागतो. ही झाली विचारांच्या स्तरावर होणारी विचारांची हालचाल आणि ती कशी होते हे शब्दात मांडण्याचा प्रयत्न. म्हणजे ही हालचाल प्रयत्नपूर्वक मांडावी लागली आहे कारण ती तुम्हाला वेगळी दाखवायची आहे.
काळाच्या उलटण्याच्या नैसर्गिक गतीमध्‍ये होणार्‍या अनंत हालचाली स्वत: अनुभवण्‍यासाठी त्या शब्दात मांडण्याची गरज नसते. कारण तो सगळा शब्देविण संवादु, दुजेविण अनुवादु असतोच आणि तो जेव्हा दुसर्‍यांसमोर मांडायचा असेल तेव्हाच 'हे तव कैसेनी गमे, परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे' अशी अवस्था असते.
तर मूळ मुद्दा आहे काळाच्या नैसर्गिक आणि काळाच्या आपल्या या दोन गतींचा. मला वाटते तो मी पूर्णपणे नसला तरी काही प्रमाणात मांडला आहे.