१० एप्रिल, २०१०

राष्ट्रपित्याचे कामजीवन




गांधीचे व्हल्गरायझेशन: म.टा. आणि मिड डे चा हलकटपणा या ८ तारखेच्या पोस्टवर आलेल्या प्रतिक्रियांना उत्तर लिहीत असताना ती लांबली आणि ही नवीन स्वतंत्र पोस्ट तयार झाली.
जेड अ‍ॅडम्सने नावाच्या इंग्लिश इतिहासकारानं नुकतच "गांधी, नेकेड एम्बिशन" नावाचं पुस्तक प्रकाशित केलं आहे. यात गांधींच्या कामजीवनाबद्दल आतापर्यंत माहित नसलेले तपशील दिल्याचा दावा करण्यात आला आहे. स्वत:चे कामजीवन असमाधानकारक असेल तेव्हाच इतरांच्या कामजीवनात डोकावून पाहाण्याची उत्सुकता निर्माण होते. आणि यासाठी एखाद्या देशाचा राष्ट्रपिता मिळाला तर जेड अ‍ॅडम्स सारख्या इतिहासकाराचे खिसेही भरले जातात.
ज्ञात आहे त्या माहितीनुसार गांधीनी त्यांची कामवासना गेलीय की नाही ते फक्त तपासून पाहाण्यासाठी त्यांच्या मनु आणि आभा या दोन भाच्यांसोबत नग्न झोपायला सुरूवात केली होती. नग्न झोपायला सुरूवात केली होती म्हणजे त्या पुढच्याही गोष्टी केल्या असतील असे मानण्याचे कारण नाही (७७ वर्षे या त्यांच्या वयाचा जरा विचार करा).



हा जेड अ‍ॅडम्स नावाचा हरामखोर माणूस नाही त्या गोष्टी उकरून काढुन स्वत:चे खिसे भरतोय.
आजही सेक्स सारख्या विषयाबाबत खुलेपणा राखला जात नाही (रस्त्याच्या कडेला उभं राहून गर्लफ्रेंडचे चुंबन घेणे आणि टि.व्ही.वर अर्धनग्न पोरींचा सुकाळ होणे वेगळे). गांधी त्या काळात त्यावर प्रयोग करीत होते आणि त्याबाबत खुलेपणे चर्चा करायला तयार होते हे सिंहह्रदयी पुरूषाचे लक्षण आहे. याबाबतीत ते नक्कीच राष्ट्रपिता मानता येतील.
जेड अ‍ॅडम्सने महर्षी महेश योगी आणि ओशो यांच्याच तराजूत गांधींना तोलले आहे. जगावर छाप पाडून गेलेल्या भारतीयांनी नेहमीच कामवासनेच्या खोलात शिरण्याचा प्रयत्न केला. ज्याला स्वत:ला जाणून घ्यायचे आहे, सत्यापर्यंत जायचे आहे त्याला नेहमीच कामवासनेच्या अभ्यासाची आणि स्वत:वरील प्रयोगाची पायरी चढावी लागलेली आहे.
गांधींची हत्या झाली नसती तर निश्चितच गांधींनी पुढे स्वत:च्या कामजीवनावर लेखन केलं असतं.
जेड अ‍ॅडम्सच्या या पुस्तकामुळे सर्वच भारतीयांकडे "सेक्स मेनीअ‍ॅक" म्हणून पाहाण्याच्या दृष्टीकोनाला बळ मिळणार आहे.

हटातटाने बटा

हटातटाने बटा रंगवून जटा धरीशी का शिरी
मठाची उठाठेव का तरी?
वनात अथवा जनात हो का मनात व्हावे बरी
हरीचे नाव भवांबुधी तरी
काय गळ्यात घालुन तुळशीची लाकडे
ही काय भवाला दुर करतील माकडे
बाहेर मिरवीशी आत हरीशी वाकडे
अशा भक्तीच्या रसा रहीत तु कसा म्हणविशी बुधा
हरीरस सांडुन घेसी दुधा
भला जन्म गा तुला लाधला
खुलास ह्रदयी बुधा धरीसी तरी हरीचा सेवक सुधा
शिळा टोपीवर शिळा पडो या बिळात करीशी जप
तथापि न होय हरीची कृपा
दर्भ मुष्टी ज्या गर्भी धरूनी निर्भर पशुची वपा
जाळीशी तिळा तांदुळा तुपा
दंड कमंडलु बंड माजवीसी मुंड मुंडिशी तपा
न सार्थक लटक्या सार्‍या गपा
ही बार बार तलवार येईल काय पुन्हा?
या दुर्लभ नरदेहात ठेवीसी कुणा?
भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा
वर्म कळेना धर्म घडेना कर्म चित्त ना द्विधा
सदा हरी कविरायावर फिदा
हटातटाने बटा रंगवून जटा धरीशी का शिरी
मठाची उठाठेव का तरी?

रामजोशी या चित्रपटातील हे शाहिरी काव्य. रामजोशी हा चित्रपट विक्रमी ठरला होता. या चित्रपटानेच ग.दि.मां.च्या पटकथा लेखनाची सुरुवात झाली.
नितांत सुंदर असणा‍र्‍या रामजोशी या चित्रपटातील हे शाहिरी काव्य इथे पाहा.

९ एप्रिल, २०१०

सुलभ शौचालय - अशोक नायगांवकरांची कविता



विक्रोळीच्या संपतला मी म्हटले
तु रूळावर काय शी करायला बसतोस?
अरे केवढी मोठी गाडी आणि माणसे जातात या रूळावरून?
तु संस्कृतीवर अशी घाण काय उडवतोस?
अरे सरळ शौलायात जावे सुसंकृतपणे
तशी संपत म्हणाला -
साहेब, शी काय म्हंता? सरळ हागाय बसतो म्हणाना
म्हणजे किती मराठी वाटतं, पोट कसं साफ झाल्यासारखं वाटतं
मी त्याला म्हटलं अरे दादरसारख्या ठिकाणी आता किती सुंदर, देखणी, सुलभ शौलालयं निघालीत
तिथे जावं
मग मी सरकारकडून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला
शौचालयाचा वार्षिक पास दिला मोफत
आता ते सर्वजण गाडीने दादरला येतात - सुलभ शौचालयात !
आणि रात्री झोपताना संपत मनात म्हणतो,
च्यायला सरकारनं जगायची नाय, जगायची नाय
हागायची तर सोय केली!!!

ही कविता अशोक नायगांवकरांकडुन इथे ऐका.

८ एप्रिल, २०१०

गांधीचे व्हल्गरायझेशन: म.टा. आणि मिड डे चा हलकटपणा

जेड एडम्स नावाच्या इंग्लिश इतिहासकारानं नुकतच "गांधी, नेकेड एम्बिशन" नावाचं पुस्तक प्रकाशित केलं आहे. यात गांधींच्या कामजीवनाबद्दल आतापर्यंत माहित नसलेले तपशील दिल्याचा दावा करण्यात आला आहे. ही झाली सर्वसामान्य बातमी.
म.टा. आणि मिड डे या वर्तमानपत्रांनी हीच बातमी अर्धनग्न महिलांच्या फोटोजच्या शेजारी गांधीचं चित्र दाखवून प्रकाशीत केली आहे. महाराष्ट्र टाईम्स आणि मिड डे च्या ई-आव्रुत्तीच्या संपादकांनी सनसनी निर्माण करण्यासाठी मस्तवालपणाचा कळस गाठला आहे.
राष्ट्रपिता गांधी यांना "झणझणीत वेब मसाल्याचा" विषय करून म.टा. ने पुन्हा एकदा आपली लायकी सिध्द केली. म.टा. च्या दररोज चालणा-या नागव्या प्रदर्शनाबद्दल नुकतीच हेरंबच्या "वटवट सत्यवान" या ब्लॊगवर त्याने म.टा. ला लिहीलेले अनाव्रुत्त पत्र वाचनात आले होते. पत्रकारीतेच्या नावाखाली स्वत:च्या मलीन मनाचे प्रदर्शन करणा-या या दोन्ही वर्तमानपत्रांचा धिक्कार असो!!

व्यंकटेश माडगुळकरांची एक कथा



आज व्यंकटेश माडगुळकरांची एक बेस्ट कथा वाचकांसमोर सादर करावी वाटतेय. माडगुळकरांची एक बेस्ट कथा यात पुनरुक्ती होते आहे, कारण माडगुळकरांची कथा बेस्ट असतेच. तर कथेचं नाव आहे "असंच."

"असंच"
रात्र झाली होती. बाहेर चिमधार पाऊस लागला होता. सारा महारवाडा त्या पावसाच्या मा-याखाली निपचित पडुन राहिला होता. सारख्या कोसळणा-या पावसाचा आवाज कानाला नकोसा वाटत होता. आणि गारठा असा पडला होता की, एखाद्या जाड कांबळात वा वाकळेत घुसमटुन पडायला हवे होते. निदान पेटलेल्या चुलीसमोर मांजरागत अंग उबवीत.
पण येसा खालीच एका पोत्याच्या तुकड्यावर पडली होती आणि लहानगा संदीपान तिच्या पाठीला माकडिणीच्या पोरासारखा चिकटला होता. पाठीच्या तेवढ्या भागाला उबारा मिळत होता. पुढल्या अंगाला मात्र थंडी बोचत होती. पण ती चुळबुळ करीत नव्हती. कारण तसे केले तर थंडी अधिक वाजते. एके जागी न हलता पडुन राहिले तर आपोआप ऊब मिळते. संदीपानच्या अंगात मात्र त्याला गुडघ्याच्या खाली येणारा अंगरखा होता. अगदी धडकंडका. त्याच्या बाह्या इतक्या लांब होत्या की, त्या बोटाखाली चांगल्या टिचभर लोंबत. छाती उघडी पडू नये, म्हणून येसाने बटनाच्या ऎवजी लहान-लहान चिंध्यांच्या तुकड्यांनी त्याची काजेही पक्की बंद केली होती. तो अंगरखा गावातल्या बामणाने दिला होता.
खोपटातली ती विचीत्र शांतता. पावसाचा आवाज. सर्दाळलेली हवा आणि बाहेरच्या भिजलेल्या उकिरड्याचा, छपरावरल्या काडाचा वास. पण येसाच्या ध्यानी या गोष्टी नव्हत्या.
.... पाटलाच्या घरी लगीन चालले होते. ताशेवाजंत्र्यांचा कडकडाट चालला होता. चांगले कपडे केलेली माणसे धांदलीने इकडेतिकडे करीत होती. त्यांच्याकडे आशाळभूतपणे पाहत येसा जोत्याजवळ बसली होती आणि सारखी म्हणत होती,
"दादा, आमाकडं बगा. आक्का, गरिबाकडं बगा !"
मग लफ्फेदार लुगडे नेसलेली आणि दागिन्याने गौरीगत सजलेली पाटलीण नाकातली नथ उडवीत आली आणि तिने चांगल्या ओटाभर पुरणाच्या पोळ्या आणि काहीबाही येसाच्या पदरात टाकले.
ते सावरुन तिला काही भराभरा चालता येईना....
संदीपान डोळ्याची सारखी उघडझाप करीत होता.
.... गेले कित्येक दिवस ठणठणीत असलेल्या ओढ्याला पाणी आले होते. आणि शिदा महाराचा संबा, विठोबाची इट्टली आणि संदीपान त्या लाल, गढुळ पाण्यात धबधब उड्या मारीत होती.
....आणि ओढ्याकाठच्या जांभळीखाली पावसाने पडलेल्या जांभळांचा नुसता सडा झाला होता. ती वेचून अंगरख्याच्या पुढच्या भागाच्या झोळीत टाकताना रंग लागत होता.
ती जांभळे त्याने किती तरी खाऊन घेतली. जीभ तोंडाबाहेर काढून तिरप्या डोळ्याने पाहिले तर ती अगदी गर्द जांभळी झाली होती.
त्याने डोळे उघडले आणि मिटले.
आईच्या पाठीवर आपले नकटे नाक घाशीत तो म्हणाला,
"आय, आमाला जांभळं !"
येसाच्या हातून सा-या पोळ्या धुळीत पडल्या.
तिने डोळे उघडुन पाहिले...
बाहेर पाऊस कोसळत होता. आणि आत अगदी गडद अंधार भरून राहिला होता. पायाकडे टिपटिप आवाज येत होता. गळत असावे.
तिने खडबडीत हात संदीपानच्या पाठीवरुन फिरवला आणि बोलली,
"अरं, अंधार गुडूप पडलाया. दिवा दिकून लावला न्हाई !"
गडबडीने उठायला लागली, पण तसे उठता आले नाही. पूर्वीची चपळाई आता राहिली नव्हती. ती दिवसात होती. "अग बया, बया - " करीत उठली. अंधारातच अचूक चुलीपाशी गेली. थोडीशी राख उकरताच आतला विस्तव चमकला. मग त्याच्यावर काटक्याकुटक्या घालून तिने दम लागेपर्यंत फुंकले, तेव्हा भडकून जाळ झाला.
खोपटातल्या अंधाराला भसका पडला आणि संदीपानने टक डोळे उघडले. चुलीवरला कडू तेलाचा दिवा उजळला. त्याने
कोप-यातला अंधार हुसकून लावला. संदीपानने हाक मारली,
"आये - "
येसा अजून बसल्या जागेवरनं उठली नव्हती. तिला उठवतच नव्हते. कण्हत्या आवाजात ती बोलली,
"काय रं?"
बाहेर कोसळणा-या पावसाच्या घोषात संदीपानच्या ते कानी गेले की नाही कोण जाणे, पण तो धडपडून उठला आणि आईपाशी दोन्ही गुडघे पोटाशी घेऊन बसला. येसाने एकवार समोर पांढ-या मातीने सारवलेल्या भिंतीवर पडलेल्या दोघांच्या भल्यामोठ्या सावलीकडे पाहिले. आणि मग गाडग्यांची उतरंड, फाटकी लक्तरे गुंडाळून ठेवलेले बोचके, कोप-यातली भलीमोठी कु-हाड, हातातली वेळूची गुळगुळीत काठी, धुळीने भरलेला फाटका जोडा, या सर्वावरुन फिरून तिची नजर स्थिर झाली - वरून एक-एक थेंब पडत होता, तळहाताएवढी जागा भिजून चिंब झाली होती, त्या जागेवर !
संदीपानने अंगरख्याने आपले उघडे पाय झाकून घेतले. चूल पेटावी आणि त्या पिवळट लालसर जाळासमोर बसून शिजणा-या कोरड्यासाचा घास घ्यावा असे त्याला वाटले.
"आये, जाळ कर की ग."
"बाबा माज्या, सर्पान न्हाय रं."
चूल पेटवायची कशाला? दुपारी दिवस डोक्यावर आल्यावर गावात वरावरा फिरून तिने पसाभर जोंधळे आणले होते. ते भरडून त्यांच्या पातळ कण्या केल्या होत्या आणि मायलेकरांनी त्या पोटात ढकलल्या होत्या. संदीपानला बजावले होते, "आता राती काय न्हाई रं खायला !" आणि पुढे उपयोगी पडतील म्हणून जुन्या चिंध्या चिवडीत बसली होती. संदीपान बाहेर पडून मातीत खेळला होता. वाण्याच्या दुकानासमोर बराच वेळ उभा राहिला होता. चावडीमागल्या उकिरड्यावर काही सापडते का ते त्याने पाहिले होते. चार कागद आणि एक खिळा सापडला होता. ती दौलत त्याने इट्टलीला दाखवली होती. इतके करीपर्यंत संध्याकाळ झाली होती. एका पायावर लंगडी घालत-घालत तो घरी आला होता. आणि पावसाला सुरूवात झाली होती.
येसा पोत्याच्या तुकड्यावर कलंडली होती आणि संदीपान तिला बिलगला होता.
चूल पेटवायची कशाला? आता काही शिजवायचे नव्हते ! आईच्या उत्तराने संदीपानची निराशा झाली. आपले मिचमिचे आणि सुजके डोळे मोठे करून आणि तिच्या तोंडाजवळ तोंड नेऊन त्याने विचारले,
"मग, वड्याला पानी आलं असल का? सकाळी आमी पवायला जानार !"
पण येसाने उत्तरच दिले नाही. तिचे चित्त त्याच्या बोलण्याकडे नव्हते. "भगवाना !" म्हणून ती बसल्या जागी पुन्हा आडवी झाली.
... छे, आडवी कुठली? बंडू बामणाच्या अंगणात खपल्याचा ढिग पडला होता. आणि उखळातल्या खपल्यावर जड मुसळाचे घावावर घाव ती टाकत होती. पारव्यासारखी घुमत होती. चोळी घामाने चिंब झाली होती आणि हात भरून आले होते. बंडू बामणाची सून सोप्यात कमरेवर हात देऊन उभी होती आणि म्हणत होती -
"येसा, आटप लवकर. तुजा नवरा जेव्हा-तेव्हा म्हणायचा, "आक्का, माजी अस्तुरी लई कामाची. महारवाड्यातली एक महारीन तिच्यासंग टिकायची न्हाई !" पलीकडे सावलीला, डालपाटीत निजवलेला संदीपानचा तीन महिन्यांचा भाऊ सारखा किंचाळत होता...
संदीपानसुध्दा बोटे नाचवीत तिच्यापुढे पडला नव्हता.
...रामोसवाड्याशेजारच्या चिंचेवर तो चढला होता. आणि आंबटगोड मोहर ओरबाडून त्याचे गपागप गपांडे मारीत होता. आणि तांबूस, लुसलुशीत अशी चिंचेची कोवळी पानेही काही कमी गोड लागत नव्हती.
खाली इट्टली उभी राहिली होती. तिच्या अंगावर फडकाही नव्हता आणि चोळीही. तोंड वर करून ती सारखी कोकलत होती,
"ए संद्या, मला टाक की रं थोडा मव्हर..."
अंधा-या कोप-यातून उठून एक डास गिरक्या मारीत-मारीत आला. संदीपान-येसाच्यावर गुणगुणत फिरू लागला.
उतरंडीच्या मागून एक वखवखलेला उंदीर हळूच बाहेर पडला. नाकपुड्या हलवीत, कान टवकारीत जमीन हुंगू लागला.
जरा वेळ गुणगुणून तो खिडमा डास नेमका संदीपानच्या गालावर बसला, आणि आपली टोकदार सोंड त्याने त्याला टोचली.
गाल चोळीत संदीपान एकदम उठुन बसला, आणि आईचे डोके हलवून म्हणाला,
"ए उठ. आमाला भुका लागल्याती !"
डोळे मिटुनच येसा म्हणाली,
"संदीपाना, भाकरी न्हाई रं. नीज आता. उद्या आनू...."
"मग कर की ग भाकरी. कितींदी झालं खाल्लीया का? सारका भोपळा उकडलेला आन भाजी."
येसाने पोराला कुरवाळले आणि समजुतीच्या स्वरात म्हणाली,
"व्हंय रं माज्या लेकरा !"
दुसरे ती काय म्हणणार होती? तीन चिपट्यांवर धारण आहे. गोरगरिबाला जोंधळा द्रुष्टीस पडत नाही. मोलमजुरी करणारा तुझा बापही आपल्याला सोडून निघून गेला आणि...
पण या गोष्टी त्या पोराच्या बाळबुध्दीला काय कळणार?
हटवादीपणाने तो पुन्हा बोलला,
"दे की ग! पोटात चावाय लागलंय...."
येसाने मनाचा धोंडा केला.
"पानी पे रांजनातलं म्हंजे -हाईल. शेना हाय माजा बाबा. पिट न्हाईं रं जुंदळ्याचं, न्हाई तर आता करून दिली असती भाकर !"
"मग नुसतं जुंदळं दे. मी खातो. बारीक चावून खाल्ल्यावर भाकरीवाणी लागत्यात जुंदळं. दे !"
येसा यावर काही बोलली नाही. गप्पच राहिली. लेकराच्या पोटात घालायला कोरभर भाकरीसुध्दा नाही या जाणिवेने ती कष्टी झाली. अंधार होता. रात्र झाली होती. पाऊस कोसळत होता. कुठे बाहेर जायला येत नव्हते. आणि बाहेर तरी कोण देणार? उपाशी मरणारी ती काय एकटीच होती? सारा महारवाडा, मांगवाडा, व्हरलवाडा - हातावर पोट असलेले सारेच गोरगरीब पालापाचोळा खाऊन जगत होते.
"लई भुका लागल्यात्या, कायसुदीक न्हाई का ग?"
"न्हाई रं सोन्या. बग तुज्या हातानं. मी का लबाड बोलतिया?"
भुकेने वखवखलेले ते पोरगे उठले आणि सारे खोपट धुंडू लागले. मोकळी गाडगीमडकी, चिंध्या, डबकी, कोनाडे - सारे खोपट रिकामे होते. खाण्यालायक अशी काहीच वस्तू नव्हती. त्याने चिंध्या हुसकल्या. कोपरे धुंडाळले. उतरंडीचे एक गाडगे खाली पडून फुटले आणि सा-या घरभर खापरे झाली.
आणि आनंदाने संदीपान म्हणाला,
"आई, घावलं मला खायाला !"
येसाने डोळे वर करुन बघितले.
त्याच्या हातात एक धुळीने भरलेले हळकुंड होते. हलकेच त्याने ते पुसले आणि दिव्याजवळ येऊन त्या ज्योतीवर धरले. काळपट-पिवळट हळकुंड तडतडले. त्याचा वास सुटला. त्या वासाने संदीपानच्या नाकपुड्या फुगल्या आणि भूक वाढली.
खरपूस भाजून झाल्यावर तो नीट बसला. आणि ओल्या खोब-याचा तुकडा खावा तसे ते हळकुंड थोडेथोडे मिटक्या मारीत त्याने संपवले.
त्याच्यावर गटागटा पाणी पिऊन त्याने अंगरख्याने तोंड पुसले आणि पुन्हा, आईपाशी येऊन पडला.
दिव्यातले तेल संपले. वात तुट्तुटू लागली. प्रकाश कमी-कमी होत एकदम विझला. पुन्हा चोहीकडे अंधार झाला.
बाहेर पावसाची झड जोरात येऊ लागली. कवाड वाजू लागले.
आणि एवढा वेळ सारे पाहत असलेली येसा संदीपानला पोटाशी धरून ढसढसून रडायला लागली.
"देवा, ह्यापरीस पटकीसारख्या एकांद्या रोगानं मारून का रं टाकलं न्हाईस गरिबाला...?"
देव तिला मारून टाकणार नव्हता. उपाशीपोटाने ती अशीच खोपटात पडून राहणार होती. आणि तिचे एकुलते एक, बापावेगळे पोरगे भुकेने वखवखून हळकुंड खाऊन झोपणार होते आणि ती आतडे तुटेपर्यंत ओरडून म्हणणारी होती,
"देवा, ह्यापरीस पटकीसारख्या एकांद्या रोगानं मारून का रं टाकत न्हाईस गरिबाला...?"
हे असेच चालणार होते.
व्यंकटेश माडगुळकर,
हस्ताचा पाऊस, उत्कर्ष प्रकाशन, पुणे

७ एप्रिल, २०१०

धार्मिक माथेफिरू (तिकडचे)






धार्मिक माथेफिरुपणा फक्त भारतातच चालत नाही तर तो सगळीकडेच आहे हे या छायाचित्रांवरुन दिसून येते. ही छायाचित्रे फिलीपाईन्स मधली आहेत.

६ एप्रिल, २०१०

राजसाहेबांना दिलेले पत्र


माझ्या मागच्या पोस्टला प्रतिसाद देताना श्री. विनोदकुमार शिरसाट यांनी मी राज ठाकरे यांना दिलेल्या पत्राबाबत विचारणा केली आहे. ते पत्र इथे जसेच्या तसे टाकत आहे.

राज ठाकरे हे नाही करू शकले !


राज ठाकरेंचा म.न.से. नुकताच स्थापन झाला होता आणि त्यांची मारा-ठोका छाप भाषणे गाजत होती. पुढे त्यांना अटक झाली - म्हणजे अटकेची एक मोठी मालिकाच सुरु झाली. रस्त्यावरुन जात असताना इथं, औरंगाबादला एक केवीलवाणे चित्र मला दिसले. ठाकरेंचे चार-दोन समर्थक (यापैकी एक म.न.से.कडून पदवीधर मतदार संघाची निवडणुक लढताना पडून आता शिवसेनावासी) रस्त्यावर उतरले होते आणि पोलीस त्यांना गाडीत कोंबत होते. राज ठाकरेंची भाषणे ऎकायला लोक जमत असतील, पण त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर फक्त चार-दोन पदाधिकारी आणि कार्यकर्तेच उतरले होते.
राज ठाकरे यांच्या भाषणातील थेट मुद्दे, महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट इ.इ. मुळे हा माणूस काहीतरी वेगळे करणार असे चित्र निर्माण झाले होते - आजही आहे. मोठ-मोठे विचारवंत लोक त्यांना समर्थन देत होते. मी राज ठाकरेंच्याच काय पण कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नव्हतो, आजही नाही. पण मला मोठी आशा वाटत होती. पण अमुक एका पक्षाचा कार्यकर्ता व्हायचे म्हणजे नेमके काय करायचे? साहेब आले की घोषणा द्यायच्या, साहेब गेले की सतरंज्या उचलायच्या - त्यांच्या वाढदिवसाला रक्तदान करायचे, कुठेतरी वह्या-पुस्तकं वाटायची, प्रचाराच्या वेळी प्रचार करायचा, आंदोलनाच्या वेळी आंदोलने करायची ही काही फार निकडीची आणि सदा-सर्वकाळ-सगळीकडे चालणारी कामे नाहीत. पण कार्यकर्ते ती करीत असतात. ही कामे कार्यकर्त्यापुरती आणि त्या-त्या घटनेपुरतीच मर्यादीत राहातात. त्यातून लोकांनाही काही मिळत नाही आणि कार्यकर्त्यालाही कामाचे केल्याचे समाधान होत नाही. विचार केला आणि तो कागदावर लिहुन काढला.
म.न.से.ने स्विकारलेली भूमिका शहरांपुरतीच मर्यादीत आहे आणि महाराष्ट्रात खेडी, अर्धशहरी गावेही आहेत. त्यांच्यासाठी काही ठोस हवे. नवनिर्माणच करायचेय तर तो दररोज आणि महाराष्ट्राच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत चालणारा कार्यक्रम पाहीजे. गावात ग्रामपंचायत, क्रुषी उत्पन्न बाजार समित्या, पोलीस ठाणी, शहरात महानगरपालिका, बसथांबे, न्यायालये, विमानतळे, बाजारपेठा, आर.टी.ओ. कार्यालये इत्यादी ठिकाणी नडलेल्या जनतेला दररोज मदत करण्यासाठी कार्यकर्ते का नसावेत? कार्यच करायचेय, नवनिर्माणच करायचेय तर त्याला इथे तिन्ही त्रिकाळ अमाप वाव आहे. उदाहरणार्थ म.न.से. चा कार्यकर्ता असणारा एक वकील आहे. तो रोज न्यायालयात जातो. त्याला म.न.से. नियुक्त, जनतेसाठी कधीही उपलब्ध असणारा वकील म्हणून घोषीत करा. त्या-त्या विषयाचे ज्ञान असलेले तुमचे लोक ठिक-ठिकाणी द्या. अनेकप्रकारचे ज्ञान असलेली कार्यकर्तेमंडळी तुमच्याकडे आहेत - करा त्यांना लोकार्पित. अशी भूमिका तुम्ही पक्षाचे धोरण म्हणून मुंबईतून जाहीर करा. असा काहीसा आशय असणारे पत्र मी राज ठाकरे यांना लिहीले. असली हजारो पत्रे त्यांना येत असतील - अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाहीच.

सुभेदारीवर एकदा राज ठाकरे आले असताना मी त्यांना वरील आशयाचे पत्र समक्षच द्यायचे असे ठरवून भेटायला गेलो. अगदी सकाळी सात वाजताच. तीन-चार तास वाट पाहिल्यावर कळले की "साहेब भाषणापूर्वी कुणाशीही बोलत नाहीत, जे काय असेल भाषण संपल्यावर बोला किंवा लिहुन आणलं असेल तर देऊन जा..." मी आता कंटाळलो होतो. श्री. मनोज हाटे नावाच्या मुंबईहुन त्यांच्या सोबत आलेल्या पदाधिका-याला बोललो. त्यांनी पत्र वाचले आणि साहेबांच्या रुममध्ये निघुन गेले. दहा-पंधरा मिनिटांनंतर परत आले.
"काय करता आपण?" पदाधिकारी
"अमुक-तमुक पेपरमध्ये काम करतो"
"अरे वा! किती आहे तुमच्या पेपरचं वितरण?"
"भरपुर असेल...नक्की आकडा माहीत नाही.."
"बरं, तुम्ही आमच्यासोबत मुंबईला याल का?"
"मी नोकरी करतो, मी तिथं येऊन काय करू, तुम्ही पत्रात विनंती केलीय ते करा, फार बरे होईल..."
"आम्ही निश्चित त्यावर विचार करू....खरंच हे व्हायला पाहीजे"
"मुंबईला याल का?" या त्याप्रश्नामागचा त्यांचा अभिप्राय फक्त एवढाच की "काय कमाल केली यार तु हे पत्र लिहुन? चल आता मुंबईला आमच्या सोबत...! आणि जा घरी परत आणि सांगत सुट सगळ्यांना "मला मुंबईला बोलावलं आहे म्हणून..."
पण हे झाल्यावरही मला राहवेना. यावर दोन वर्षे उलटली. काहीही झाले नाही. पुन्हा एकदा ते इथे आले. आता मात्र काही झाले तरी समक्षच, राज ठाकरेंच्याच हातात पत्र द्यायचे असे ठरवले.

पूर्वीसारखीच कार्यकर्त्यांची, बघ्यांची ही हुल्लड, ढकला-ढकली. ते थांबलेल्या ठिकाणी कसातरी आत घुसलो. मिडियाचे काही लोकही पाठोपाठ आले. यांचं आता सुरु होणार म्हणुन मी पटकन पुढे होऊन सोबत आणलेले पत्र राज ठाकरे यांच्या हातात ठेवले. ते त्यांनी वाचले. पुन्हा एकदा वाचुन काढले. समोर उभ्या असलेल्या कुणाला तरी (बहुतेक श्री. बाळा नांदगावकर) उद्देशून वाचलेले पत्र त्यांच्याकडे देत देत ते म्हणाले -
"बघा जरा काय करता येईल ते"
मला फार बरे वाटले. मी तिथेच थांबून राहीलो.
मग मिडियावाल्यांनी राज साहेबांची पाच-दहा मिनिटांत मुलाखत घेतली. राज ठाकरे यांच्यावर पीएच.डी. करणा-या विद्यार्थ्याने स्वत:बद्दल थोडक्यात माहिती सांगुन त्यांचे आशिर्वाद घेतले. पत्रकार परिषद दुसरीकडे होणार होती, त्यासाठी साहेब निघाले. तेवढ्यात तो पीएच.डी.वाला त्यांना काहीतरी म्हणाला. त्यांना वाटले मीच बोलतोय.
ते म्हणाले,
"कळ्ळयं मला...आलं माझ्या लक्षात"
मी म्हणालो -
"मी नाही बोललो..हे (पीएच.डी.वाले) बोलले.."
मी तिथून बाहेर पडलो.
आज ३-४ वर्षे झाली. त्यांना काय कळले आणि त्यांनी का काही केले नाही रामजाणे घनश्यामबापू* !

[रामजाणे घनश्यामबापू* - हा फक्त आमच्याच गावात चालणारा वाक्यप्रचार आहे. कुणाला कशातले काही कळले नाही तर घनश्यामबापूला (वारले आता ते) नावाच्या एका जख्ख म्हाता-या बाबांना ते नक्कीच ते कळते असा त्याचा अर्थ]

५ एप्रिल, २०१०

आता नाय थांबायचं !


ऎवीतेवी आज ना उद्या मरायचंच आहे ना? कशाला मग स्वत:चे विचार दाबून ठेवता? तुम्ही खलास झालात तर तुमचे विचार पण तुमच्या सोबतच दफ़न होणार. कुणी सुद्धा विचारणार नाही की, "बाबू, तुझ्या मनात काय होतं?, काय म्हणंन काय होतं तुझं?"
पण विचारच लिहायचेत तर शेळी लेंड्या टाकत जाते तसे शब्द कशाला टाकायचे? काहीतरी बोचणारं, मेंदुला हजार व्होल्टचा झटका देणारं असायला पाहीजे.
साधा माणूस व्हायचं म्हणजे एक ताप आहे का? नजर जाते पार सोनेरी क्षिताजाच्याही पुढे, पण पायाखाली असते फसफसती घाण. ओ..जरा थांबा, त्या चिखलातच कमळं फुलण्याच्या गोष्टी बास झाल्या आता - पार गाभण झालो त्या पाणचट कथा ऎकून.
साला आता आपण एकच करणार - आपल्या मनाचे वारु दाहीदिशांना मोकाट उधळून देणार - मग त्या वारुच्या दौडीने कुणाच्या अंगावर घाण उडाली नाहीतर कुणी त्याखाली चेंगरून जखमी झाला तर होऊद्या - आता नाय थांबायचं !

तुका जातो वैकुंठाला




न कळत्या वयात प्रभातचा संत तुकाराम पाहिला होता - खूप रडलोही होतो. अगदी काल-पर्वा युट्य़ूबवर संत तुकाराम चित्रपटातील दोन क्लिप्स पुन्हा एकदा पाहाण्यात आल्या. त्या उतरवूनदेखील घेतल्या. या चित्रपटातील तुकोबाची भूमिका विष्णुपंत पागनिसांची (पु.लं. च्या हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका मधली पेस्तनकांकाची "अरे साला काय ऎक्टिंग, तुला सांगतो साला ओरिजिनल तुकारामबी असा नसेल, ते विस्नुपंत आता वैकुंटमदी असेल, सिटिंग नेक्स्ट टू दी गॊड" ही दाद आठवते का?). विष्णुपंत पागनीसांनी केलेल्या तुकारामाच्या या भूमिकेने त्या काळात अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. विष्णुपंत पागनिस असे मराठीत लिहुन गुगलवर सर्च मारला तर पागनिसांच्या मुलीने लोकसत्तामध्ये लिहिलेला लेख वाचायला मिळाला. त्या लिहितात की ही भूमिका करण्यापूर्वी विष्णुपंत पागनीस देहूला गेले. तिथे तुकोबांच्या मंदिरात त्यांनी तुकोबाला "तुकोबा, तुम्हीच आता माझ्याकडून ही भूमिका करून घ्या" असे साकडे घातले. या भूमिकेनंतर पागनिस यांच्यामध्येही अमूलाग्र बदल झाल्याचे त्या लिहितात.
जुन्या जमान्यातील अभिनयाबद्दल आणि एकुणच चित्रपटनिर्मितीबद्दल काय लिहावे? मी मागे एकदा माझ्या मित्रांसोबत "रामजोशी" पाहीला होता तेव्हा एका चांगला नामांकित असलेल्या वकिल मित्राने विचारले होते, "त्या काळात जाऊन शूटिंग कशी काय केली असेल बुवा, तेव्हा कुठे होता क्यामेरा....?" मी कपाळावर हात मारून घेतला होता. त्याकाळची चित्रपटनिर्मिती, अभिनय यांना मिळालेली ही अस्सल दाद होती. असो.
तर तुकोबा आपल्या अंगणात चिपळ्य़ांच्या तालावर "पांडूरंग ध्यानी, पांडूरंग मनी" असे भजन करीत बसले आहेत, त्यांचा म्हाद्या पोटदुखीने बेजार होऊन "आईईईई, आईईईई" ओरडतोय. तुकोबाची बायको आवडी तिच्या म्हशीच्या वैरणकाडीची हलवा-हलव करतेय. म्हाद्याचे ओरडणे ऎकून आवडाबाई तुकोबावर उखडते आणि तुकोबाला अगदी फरफर ओढतच घरात घेऊन जाते -
"म्हयना झाला, पोर घरात माशावानी तडफडतंय, त्याचं काय हाय का तुमच्या जीवाला? पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी....घ्या ह्या कार्ट्याला"
असे म्हणून ती आत्ताच ओढून आणून आत बसवलेल्या तुकोबाच्या मांडीवर पोराला आदळतेच! (तुकाराम उगाच नाही म्हणाले - तुका झाला सांडा, विटंबिती पोरे रांडा)
तुकोबा पुटपुटतात "अगं, अगं असं काय करतेस? तो आजारी आहे ना?"
तो आजारी आहे ना हे म्हाद्याच्या अंगावरून हात फिरवीत बोललेले तुकारामांचे शब्द अगदी लोण्याहूनही मऊ, दयाद्र !
या टोनींगसाठी मी पागनिसांना हजार ऒस्कर दिले तरी त्यांना खरी दाद दिल्याचे माझे समाधान होणार नाही.
आवडी मात्र तुकोबाच्या या ऒस्करविनर शब्दांना दाद इत्यादी द्यायची सोडून त्यांच्यावर भडकतेच -
"व्ह्यय, व्ह्यय, तेच मगापासून तुमच्याम्होरं वरडतोया, त्याला काय औशद-बिशद करायचं हायं का न्हाई?"
"अगं, पांडूरंगासारखा धन्वंतरी, आणि विठ्ठ्लनामासारखं औषध त्रिभुवनात तरी मिळेल काय? बाळ, तु पांडूरंगाचं नाव घे पाहू....पांडूरंग, पांडूरंग"
तुकोबा त्यांच्या मधाळ आवजात म्हाद्याला त्याच्या तापेवर विठ्ठ्लनामाचं औषध सुचवतात. म्हाद्याही गोड आवाजात "पांडुरंग, पांडूरंग" म्हणू लागतो.
इथे आवडीच्या रागाचा कडेलोट होतो -
"खबरदार म्हाद्या, जिभन-जिभ हासडून काढीन त्या पांड्याचं नाव घेतलंस तर, घरात एक येडा आहे, तेवडं पुरं झालं"
ती म्हाद्याला तुकोबाच्या मांडीवरून कच्चकन ओढुन घेऊन दणकन जमिनीवर आदळते -
"बगा, बगा जरा डोळं फाडुनशान, पोर म्हशीवानी वरडतयं"
तुकोबा पुन्हा त्याच मऊ आवाजात "ऒरडणार नाहीतर काय करील बिचारा? तु त्याला माझ्याजवळही बसू देत नाहीस, आणखी तुही त्याच्याकडं बघत नाहीस..दिवसभर त्या दूध न देणा-या म्हशीमागं असतेस"
"हां, माझ्या म्हशीचं नाव काडू नका हं..." आवडी
"का? माहेरची आहे म्हणुन?"
"व्ह्यय, व्ह्यय ती माझ्या माहेरचीय म्हणुन ती मला लईई आवडतीया, काय म्हणणंय तुमचं? म्हायेरच्या वरवट्य़ांन आमा बायकाचं डोस्कं जरी फुटलं, तरीबी रगत येत न्हाय त्यातनं कंदी...जवातवा-जवातवा माझ्या म्हायेरचं नाव काडतायसा, आज न्हाई, तर च्चार वर्सानं माजी म्हस दूद देईन...पण रातदिस तुमी त्या काळ्याचं नाव कुटतायसा, काय दिलं त्यानं? समद्या घराचं वाटोळं केलं...खायाला भाकरीचा तुकडाबी नाही ठेवला, पोरबाळं आजारी पाडली, त्या मेल्या काळतोंड्यांनं माज्या म्हशीचं दुद बी आटवलं..."
एवढं रामायण ऎकूनही तुकोबाचा मधाळ आवाजात हेका सुरूच -
"अगं, पण पांडूरंगाला का शिव्या देतेस?"
"शिव्या? आता नुसत्या शिव्यावर ठेवत नाही, ह्या म्हाद्याला नेऊन आपटते त्याच्याम्होरं, चांगली पाठ चेचुन ईचारते तुमच्या त्या धन्वंत-याला....."
असे कडाडुन ती पोटदुखीने आजारी असलेल्या म्हाद्याला एका हाताला धरून घरातून, एका हातात तुकोबाचंच पायतण घेऊन रस्त्यातून फ़रफटत पांडूरंगाच्या देवळाकडे ओढत नेऊ लागते.
तुकोबाही आपली वीणा सावरीत तिच्या मागे पळतात.
तिकडे मंदिरात सालोचे किर्तन रंगात आलेले असते. तो आपल्याच नादात तल्लीन होऊन
"आणि ते असं थरथर-थरथर कापलं" असं काहीतरी श्रोत्यांना सांगत दोन्ही हात वर करून मागे येत असतो.
म्हाद्याला विठोबाच्या पुढे नेऊन टाकण्यासाठी आलेली आवडी पाठमो-या अवस्थेत तिच्याकडे येणा-या सालोला हाताच्या एका फटक-यानं गर्दीत भिरकावून देते. सालो श्रोत्यांमध्ये जाऊन एका अंगावर पडतो.
पुढे सालो ने जाब विचारल्यावर त्याला आवडीने त्याच्याही टाळकुटेपणाचा उध्दार करून त्यालाही गप्प करणे. या घटनेमुळे सालोने तुकोबाला देवळात यायला बंदी घालणे, पुन्हा तुकोबाचा देवापुढे काकुळतीचा अभंग इ.इ. सीन्स होतात.
दुस-या क्लिपमध्ये तुकोबा वैकुंठाला निघालेले आहेत. मंदिरासमोर अपार गर्दी जमली आहे. "पांडुरंगा, हिला सुखी ठेव" या वाक्यानंतर "पांडुरंग,पांडुरंग, पांडुरंग हरी" या भजनावर गर्दीने ताल धरला आहे. पगड्या, फेटे, कमरबंद बांधलेले वारकरी तुकोबाभोवती फेर धरून नाचत आहेत. मधोमध असलेले तुकोबा हळूहळू पुढे सरकत आहेत. भजनाचा पूर ओसरत असतानाच तुकोबा त्यांचं शेवटचं सांगणं, मधाळ, आर्जवी आवाजात सांगू लागतात-
"आता तुम्हाला माझं शेवटचं, एकचं सांगणं आहे, की सुखी संसारी असावे, चित्त परब्रम्ही ठेवावे. (हे सांगत असताना तुकोबांचे दोन्ही हात गर्दीच्या दिशेने पसरलेले, गर्दीतील प्रत्येकाला आपले म्हणणे पटावे म्हणून वाक्यातील प्रत्येक शब्दावर जोर, आर्जव...) अखंड नाम, हा माझ्या अनुभवाचा, परब्रम्ह गाठण्याचा, एकच, अगदी सोपा मार्ग आहे. त्यानं ईश्वरावरील श्रध्दा अचल होते, चित्त शुध्द होतं. स्वईर संचारी मनाला, ईश्वरी प्रेमाखेरीज आणखी कशानंही वेसण घालता येत नाही...मनाच्या या प्रेममय अवस्थेला एकविधभाव म्हणतात. अखंड नामोच्चारानं हा एकविधभाव आपल्या मनात उत्पन्न करून परमेश्वर प्राप्ती करून घेता येते (आता तुकोबाची नजर वर जाते). आणि मग, मुखी नाम, हाती मोक्ष, ऎसी साक्ष बहुतांची...अवघे लाभ होती या चिंतने, नाम संकिर्तने गोविंदाच्या...."
तुकोबाच्या आकाशाकडे गेलेल्या नजरेला खाली येणारे पुष्पक विमान दिसते, दोन्ही पंखांनी हवा कापीत ते खाली उतरतेय. तुकोबा अभंग गाऊ लागतो -
पैल आले हरी शंख चक्र शोभे करी ।
गरुड येतो फडत्कारे ना भी ना भी म्हणे त्वरे ।।
मुगूट कुंडलांच्या दिप्ती तेजे लोपला गभस्ती ।
मेघ:श्याम वर्ण हरी मूर्ती डोळस साजिरी ।।
चतुर्भज वैजंयती गळा माळ हे रूळती ।
पितांबर झळके कैसा उजळल्या दाही दिशा ।।
तुका झालासे संतुष्ट घरा आले वैकुंठपीठ ।
आपण नुसता वाचुन काढला तर अभंगात तेवढी मजा येत नाही. त्यासाठीही तुकोबांचीच चाल घ्यावी लागते. म्हणजे अभंगाचे एक पद म्हणुण झाल्यावर लगेच पुढचे पद न घेता त्याच पदाचा अर्धा भाग घ्यायचा, हा अर्धा भाग खाली खाली, उतरत जाणा-या तालात:-
पैल आले हरी शंख चक्र शोभे करी, शंख चक्र शोभे करी, शंख चक्र शोभे करी ।
गरुड येतो फडत्कारे ना भी ना भी म्हणे त्वरे. ना भी ना भी म्हणे त्वरे, ना भी ना भी म्हणे त्वरे....
मुगूट कुंडलांच्या दिप्ती तेजे लोपला गभस्ती । तेजे लोपला गभस्ती, तेजे लोपला गभस्ती.....
मेघ:श्याम वर्ण हरी मूर्ती डोळस साजिरी ।। मूर्ती डोळस साजिरी, मूर्ती डोळस साजिरी....
चतुर्भज वैजंयती गळा माळ हे रूळती । गळा माळ हे रूळती, गळा माळ हे रूळती.....
पितांबर झळके कैसा उजळल्या दाही दिशा ।। उजळल्या दाही दिशा, उजळल्या दाही दिशा.....
तुका झालासे संतुष्ट घरा आले वैकुंठपीठ । घरा आले वैकुंठपीठ, घरा आले वैकुंठपीठ......
पांडूरंग हरी, जय जय पांडूरंग हरी, जय जय पांडूरंग हरी.
तुकोबा आता खाली उरतलेल्या पुष्पक विमानात बसले आहेत. दोन गंधर्वकन्या त्यांना पंख्याने वारा घालत आहेत. तुकोबा गर्दीवर नजर टाकीत, हात जोडून, मुखाने पांडुरंग, पांडूरंग म्हणताना असा भास होतो की ते पांडुरंगाच्या नावाचा प्रसादच प्रत्येकाच्या मुखात भरवीत आहेत. तुकोबा गाऊ लागतात -
आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा । आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा....
तुमची आमुची हेचि भेटी येथुनीया जन्म सुखी ।। येथुनीया जन्म सुखी, येथुनीया जन्म सुखी....
आता असो द्यावी दया तुमच्या लागतसे पाया । तुमच्या लागतसे पाया, तुमच्या लागतसे पाया....
येता निजधामी कोणी विठठ्ल-विठठ्ल बोला वाणी ।। विठठ्ल-विठठ्ल बोला वाणी....
रामक्रुष्ण मुखी बोला तुका जातो वैकुंठाला । तुका जातो वैकुंठाला, तुका जातो वैकुंठाला....

तुका वैकुंठाला गेला. जाताना आम्हाला रडवुन गेला. घरा आले वैकुंठपीठ !!!!!
शेवटच्या अभंगात तुकोबा म्हणतात - तुमची आमुची हेची भेटी, येथुनिया जन्म सुखी....!!!!
वैकुंठाला जाणारे तुकोबा लोकांना आर्जव करतायत - आता असो द्यावी दया, तुमच्या लागतसे पाया...!!!!

तुकाराम महाराज खरंच वैकुंठाला गेले का? त्यांना न्यायला खरंच विमान आले होते काय? तुकोबाच्या नादापायी त्यांच्या लेकरांचे आणि आवडीचे किती हाल झाले? त्याला जबाबदार कोण? असले निरर्थक प्रश्न विचारण्याने आपण दगडाचे दगडच राहातो - आपल्याला पाझर फुटला नाही हेच कळते. तुकोबा विमानातुन वैकुंठाला गेलेही नसतील पण "तुमची आमुची हेचि भेटी येथुनीया जन्म सुखी" असे मरतानाही म्हणायला माणूस अमरतेची चव चाखलेलाच असावा लागतो.
संत तुकाराम, तुकोबा, सालो, आवडी