१३ जानेवारी, २०१२

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - 4



शास्त्रीजींनी पहिला पडाव ओंकारेश्वरहून १२ कि.मी. वर असलेल्या मोरटक्क्यात होईल असे सांगितले होते. मला असेही बसमध्ये बसून मोरटक्क्याहूनच पुढे जावे लागणार होते. त्याऐवजी शून्यासोबत चालत मोरटक्क्याला जाऊ आणि रात्री इंदूरला परत येऊ असे ठरवून घाट उतरायला सुरुवात केली.
..... पूर्वसूत्र
रस्त्यात बोलायला तोंड चालत नसेल तेव्हा खाण्‍यासाठी चालवावे म्हणून भाजलेल्या हरभर्‍याचा हिरवा टहाळ आणि केमिस्‍ट-कम-भजेवाल्याकडून स्‍वादिष्‍ट भजिये सोबत बांधून घेतले होते. भक्त निवासाची खोली तिथल्या औपचारिकता पूर्ण करुन नर्मदा पूजनाला निघतानाच सोडली होती. त्यामुळे आता आम्ही निघायला मोकळे होतो.
डाव्या बाजूच्या रस्त्याने नर्मदेच्या पात्रात उतरलो आणि आमच्या मागे वाळूत परिक्रमेची पावले सुटत जाऊ लागली. मागे दूरवर ओंकारेश्वराचे शुभ्र रंगातील शिखर चमकत लहान होत जात होते. काही अडचणी सोडता अखेर परिक्रमेला निर्विघ्न सुरुवात झाल्याने आत्मशून्य सुखावला होता.
भक्त निवासातून निघताना शेवटच्या क्षणीही आहे त्या स्‍थितीत परिक्रमेला निघण्‍यासाठी मी शेवटचे हातपाय मारुन पाहिले. ऑफिसला न कळवता एक दिवस इकडे थांबलो होतो. ऑफिसमधून सहकार्‍यांनी फोन केले होते. मॅनेजर महोदय नाराज होतेच. तापल्या तव्यावर कार्यभाग साधून घ्‍यावा. फोन करुन उद्या पण येणार नाहीय असे सांगितले की तो आणखी चिडणार आणि बोलणार - आणि मग राजीनामा देतोय असे सांगून मोकळे होता येईल असा विचार करुन ऑफिसला फोन लावून पाहिला होता. फासा अनुकूल पडला तर जवळचे मोबाइल हॅण्‍डसेट वगैरे कुरियरने मित्राकडे पाठवायचे आणि त्याला कार्डांचा पासवर्ड सांगून इंदूरातले खोली भाडे, पेपरबिल वगैरे मासिक देणी देऊन टाकायला सांगायचे. लॅपटॉप इत्यादी साहित्य त्याच्याकडे ठेवायला लावायचे असा माझा सगळा प्लॅन होता. पण मॅनेजर काही फोनवर उपलब्ध होईना. ऑफिसचे नियम मोडल्याने व्यवस्‍थापनाने नुकताच एका सहकार्‍यावर नोकरीवर रहाताना करारात लिहिलेल्या अटींचा वापर करुन जबर आर्थिक दंडाची कारवाई केली होती - त्यामुळे अचानक काही ठोस न करता निघून जाता येणार नव्हतं.
दुधाची तहान ताकावर म्हणून मोरटक्क्‍यापर्यंतचे 12 कि.मी. चालू लागलो. वाळू, खडक, कधी गवताळ डगरींच्या उतारावून पुसट दिसणार्‍या पायवाटेने निघालो. मध्‍ये काठावर नर्मदेच्या पुराने क्षरण झालेले संगमवराचे रंगीत खडक दिसत होते. नर्मदा कुठे संथ, कुठे कलकलाट करीत पुढे जात होती.
ओमकारेश्‍वरापासून पुढे एक-दीड किलोमीटरवर नर्मदेत कावेरी (दक्षिण भारतातील नव्हे) येऊन मिळते. पैलतीरावर तो संगम दिसत होता. तिथेही गर्दी दिसत होती. दोन्ही तीरांवरची नजरेच्या आवाक्यात येईल तेवढी शोभा पहात पुढे जाऊ लागलो.
मध्‍ये एक ओघळ लागला. त्यातल्या खडकांवरुन मी तो ओलांडला.
आत्मशून्य मात्र मागेच थांबला.
नर्मदा, तिच्यातून निघालेली पाण्‍याची चिंचोळी पट्टीही कुठेच ओलांडायची नाही. ती जिथपर्यंत पसरली असेल तिथपर्यंत चालत जाऊन जमिनीवरुनच पुढे जायचे. नर्मदेत येणार्‍या इतर नद्या, ओहोळ, झरे ओलांडले तर हरकत नाही असे जगन्नाथ कुंटे यांच्या पुस्तकात लिहीले आहे.
हा ओढा ओलांडावा की कसे या द्विधा मन:स्‍थितीत आत्मशून्य गांगरला आणि तंतोतत शास्‍त्रोक्त परिक्रमाच करायची असल्याने त्याला तो ओढा ओलांडायचा धीर होईना. त्याने ओढा कुठपर्यंत आहे ते पहाण्‍यासाठी त्याच्या काठावरुन आत जंगलात जायला सुरुवात केली. मी चिडलो होतोच. पण त्याची स्‍थिती समजू शकत होतो. वाद घालणार नव्हतो. सोबत घेतलेल्या हरभर्‍याच्या ओंब्या सोलून तोंडात टाकत मी आपला ओढ्‍याच्या पलिकडे बसलो.
खूप वेळाने तो परत आला. ओढा दूरपर्यंत गेला आहे हे त्याला दिसले असावे.
आत्मशून्याने सॅकमधील कुंटेंची पुस्तके काढून शंका निरसनासाठी पाने चाळत ओढ्‍यापलिकडील खडकांमध्‍ये बसकण मारली. अर्धा तास उलटला तरी त्याला समाधानकारक उत्तर सापडले नसावे. मी कंटाळलो. शेवटी चिडून ओरडलो - जगन्नाथ कुंटेंनाच फोन लाऊन विचार म्हणजे तुझं समाधान होईल.
ते ऐकून तो ''गुड आयडिया.. यू आर दि मॅन'' म्हणाला आणि माझ्‍याकडचा फोन घेण्‍यासाठी त्याने मला ओढ्‍यापलिकडे बोलावलो. गेलो आणि फोन दिला. रेंज नव्हती. तो नर्मदेतल्याच एका टेकाडावर गेला आणि तिथून त्याने पुस्तकात दिलेल्या प्रकाशकांच्या नंबरवर पुण्‍याला फोन लावला. कुंटे सध्‍या नाशिकमध्‍ये आहेत, दोन मिनिटात तिथला नंबर एसएमएसने पाठवतो असे पलिकडून उत्तर मिळाले.
मी पुन्हा ओढा ओलांडून इकडे येऊन बसलो.
कुंटे नाशिकला थांबलेल्या ठिकाणचा नंबर सांगणारा एसएमएस आला. त्याने त्यावर फोन लावला तर कुंटे आत्ताच झोपले असून साडेपाच वाजता उठतील असे उत्तर मिळाले. म्हणजे कल्याणमस्तू! आता हा महात्मा साडेपाच वाजेपर्यंत किंवा समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत ओढ्यापलीकडेच बसून रहाणार आणि त्यात कल्पांतही उलटू शकतो. शूलपाणीतल्या अश्वत्‍थाम्यासारखे हा ही नंतरच्या परिक्रमावासियांना अधूनमधून दर्शन देणार असा विचार करुन मी माझे मनोरंजन करीत शून्यासोबत वाद घालण्‍याची उबळ रोखली.
तासभर उलटला. शेवटी त्याला ओरडून म्हणालो - ''दहा मिनीट ध्‍यान कर आणि तुला जे योग्य वाटेल ते कर.''
त्याला ते काही पटले नसावे.
शेवटी ओढ्‍यापलीकडे जाऊन हा ओढा आहे, ही काही नर्मदा नाही.. तसं पहायला गेलं तर नर्मदेवर धरण आहे त्यातल्याच पाण्‍याचा हा ओढा असू शकतो..असेल किंवा नसेलही.. पण अशी साखरेची साल काढत बसले तर परिक्रमाच पूर्ण होणार नाही..असे कितीतरी ओढे तुला रस्त्यात ओलांडावे लागतील वगैरे युक्तीवाद करुन पाहिले... तो काही बधेना.
मी कंटाळून पुन्हा ओढ्‍यापलीकडे जाऊन बसलो. दहा-पंधरा मिनिटांनी त्याला पुस्तकात उत्तर सापडले. त्याने मला पुन्हा तिकडे बोलावले. नर्मदेतून निघालेला ओघळ ओलांडू नये, इतर झरे, नद्या ओलांडायला हरकत नाही असे काहीतरी वाक्य होते.
तो नर्मदेचा ओहोळ नसून कुठून तरी वाहात आलेला ओढा आहे - ओलांडायला काहीच हरकत नाही अशी खात्री झाल्यानंतर तो एकदाचा पलिकडे आला आणि पुन्हा निर्वेधपणे अंतर कापले जाऊ लागले. आता त्याच्यासोबत वाद घालायला काहीच हरकत नव्हती.
मी मटीअरिलिस्टीक आयुष्‍य मनसोक्त जगून पाहिले आहे.. हे सुरु करतोय तेव्हा ते शास्‍त्रोक्तच असायला पाहिजे हा माझा अट्‍टाहस आहे. उत्तर सापडले नसते तर मी साडेपाच वाजेपर्यंतच काय, रात्रभर तिथेच बसून राहिलो असतो वगैरे उत्तरे त्याने दिली आणि मी या माणसासोबत येऊन कृतकृत्य झालो आणि त्याच्या कर्मठतेला मनोमन नमस्कार केला.
मी पुन्हा एकदा मिपावर हे सगळे लिहिण्‍याचा मुद्दा काढला. मी युजीपंथीय असल्याचा त्याचा आल्यापासूनच गैरसमज होता. त्याला वाटले मी टिका करण्‍यासाठी हे मिपावर लिहिणार आहे.
''माझ्‍यावर काय हवी ती टिका कर.. पण माझ्‍या गुरुंना यात ओढू नको'' कळवळून आत्मशून्य म्हणाला.
मी असे काही करणार नव्हतोच.
हा प्रसंग लिहीला तो आत्मशून्यावरची टिका म्हणून नव्हे हे वेगळे सांगायला नको. प्रसंगातून काय व्यक्त झाले आहे ते वाचकांनीच मला सांगावे.
पुढे चालत राहिलो. तीन-चार कि.मी. मागे पडले असावेत.
नर्मदेचे आता अनेक डोह दिसत होते. डोक्यावरचे केस पिकलेल्या आजोबांसारखे दिसणार्‍या डोंगरांच्या पायथ्‍यापर्यंत जाऊन नर्मदा सागरासारखा भासणार डोह करुन संथपणेपुढे जात होती. उन्हं कलायला उशीर असताना पात्रात जिकडे तिकडे गूढ-गंभीर शांतता दाटली होती. ते दृश्य पाहून ''चानी'' या चित्रपटाची आठवण झाली. त्यातला नावाडी जशी आरोळी मारतो तशी आरोळी मारुन पहावी वाटली.
''हेऽऽहेऽऽहेऽऽ हेयऽऽऽऽऽऽ!!!
प्रचंड जोरात ओरडलो आणि दोन्ही काठ दणाणून सोडले. आरोळीचे प्रतिध्‍वनी विरुन गेल्यानंतर पुन्हा पहिल्यासारखी गूढ शांतता पसरली.
पात्रातील जमिनीच्या पट्ट्‍यांवर टरबूज, काकड्‍या, मका ही पिके घेऊन राखणीला झोपडी करुन रहाणारे लोक दूरवर दिसत होते. माकडे त्या पिकांवर टपून असणारच. ती डगरींवरच्या खैराच्या झाडांवर शेपट्या खाली सोडून निवांत काहीतरी चावत, बगला खाजवत बसलेली दिसत होतीच.
उन्हानं रापलेली शेताची एक कारभारीण सामोरी दिसली. एकटीच पिकाच्या राखणीला थांबलेली असावी. तिला साद घातली -
''नर्मदे हर ''
''हर हर नर्मदे'' तिने उत्तर दिले आणि तिच्या रस्त्याने गेली.
परिक्रमेदरम्यान माणूस दिसला की त्याला ''नर्मदे हर'' म्हणायचे. म्हणजे हा परिक्रमावासी आहे हे त्याला कळते.
चालत राहिलो.
आता पायवाट चढाची आली होती आणि रस्ता प्रशस्त दिसत होता. तो चढून वर आलो. धुळीत दुचाक्यांच्या टायरच्या खूणा उमटल्या होत्या. हा रस्ता एखाद्या आश्रमाच्या दिशेने जात असावा. काही वेळ चालत राहिल्यानंतर आश्रम दिसलाच. त्या वावभर रस्त्याला जोडून असलेल्या डगरीतून सिमेंट विटांनी पायर्‍या बांधून वर प्रशस्त जागी उतारावरच आश्रम होता.
केस पूर्ण पांढरे झालेले, पिकलेले, थकलेले व काठीच्या आधाराने उभे राहून नर्मदेच्या संथ डोहाकडे पहात उभे असलेले एक वृद्ध साधूबाबा दिसले. त्यांना ''नर्मदे हर'' केले.
क्षीण आवाजात त्यांनी उलट ''हर हर नर्मदे'' केले.
म्हणाले - ''खाना खावो.. उपर''
भूक नव्हतीच.
''खाना तो नहीं... पानी है तो पी सकते है'' आशू म्हणाला.
पायर्‍या चढून वर गेलो. एका बाजूला मांडव घातला होता. दोन-पाच भगवे कपडे घातलेले साधू इकडे तिकडे विखरुन होते. एक आमच्याएवढाच तरुण, दाढी-मिशा राखलेला, डोळ्यात काजळ घातलेला साधू यज्ञकुंडाजवळ बसून अंगाला राख फासून घेत होता. अंगावर फक्त लंगोट. राख फासून झाल्यानंतर त्यानं भगवा पंचा गुंडाळला आणि यज्ञकुंडाजवळ काहीतरी खालीवर करीत बसला.
आश्रमात परिक्रमावासी थांबलेले होते. मंडळींची जेवणं नुकतीच आटोपलेली दिसत होती. कारण नळावर गेलो तेव्हा पांढर्‍या कपड्यातले पाच-सात परिक्रमावासी खरकटी भांडी तिथे आणून ठेवत होते.
ओंजळ करुन दोघेही पाणी प्यालो.
ते खालचे वृद्ध साधुबाबा काठी टेकीत वर मांडवात येऊन बसले.
त्यांच्याकडे जाऊन दर्शन घेतलं. त्यांनी परिक्रमा कहां से उठाई म्हणजे कुठून चालायला सुरुवात केली वगैरे विचारणा केली. उत्तर दिले. मोरटक्का किती दूर राहिले ते त्यांना विचारले. त्यांनी मैल आणि किलोमीटर अशा दोन्ही मापात मोरटक्क्‍यापर्यंतचे अंतर किती राहिले त्याचे उत्तर दिले. साधूबाबा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत टिकले होते असे ताडले. पण जास्त काही विचारणा केली नाही.
खाली उतरुन नर्मदे हर म्हणून चालायला सुरुवात केली.
पुढे गेलो तर तारेचे कुंपण घातलेले होते. तारेखालून एक घळ सापडली. मी त्यातून घसरत पुढे गेलो व तारा ओलांडल्यावर अलिकडे उभ्या आशूकडून पिशवी घेतली. तो वर जाऊन तारांत अंतर जास्त होते तिथून आला.
पुढे चालू लागलो.
पायवाटेभोवती पसरट पाने असलेल्या खैर, ऐन किंवा धावड्याच्या झाडांचे जंगल पसरले होते. जमिनीवर जिकडेतिकडे पडलेली पांढरी पाने उदास वाटत होती. वनविद्येचा अभ्यास नाही म्हणून नक्की झाडे कोणती ते कळले नाही.
चालत राहिलो. नर्मदा खाली सोबतीला होतीच.
समोर पसरलेल्या पायवाटेवर उमटलेल्या प्राण्‍याच्या पायाच्या खूणा पाहून आशू म्हणाला - ''पगमार्क... वाघ असेल की बिबट?''
वाघ-बिबट्‍याच्या पाऊलखूणा तळहातापेक्षा थोड्या मोठ्‍या उमटतात. समोर मातीत उमटलेल्या खुणा लहान होत्या.
लांडगा, कोल्हा किंवा कुत्राही असेल. पुढे चालू लागलो.
आता पायवाट नर्मदेच्या पात्रात उतरून वाळूतून जात होती. औंदुबरासारखी दिसणारी काही खुरटी, काही उंच गेलेली झाडे नर्मदा जिकडे जाते त्या दिशेने वाकली होती. महापुरे वृक्ष जाती तेथे लव्हाळी वाचती. ही झाडे वाकडी-तिकडी वाकल्याने का होईना पण टिकून राहिली होती.
आणखी दोन-अडीच किलो मीटर मागे पडले असावेत.
एक झाड पाहून बसलो आणि सिगारेट पेटवली. थोडावेळ गप्पा मारुन पिशव्या काखोटीला मारल्या व पुढे निघालो. पुढे नर्मदेच्या पाण्‍यात यू टर्नसारखा एक प्रचंड प्रस्तर शिरला होता. त्याच्या मागच्या बाजूने आत जाता येणार नाही अशी झाडांची किर्रर्र दाटी. जवळ गेल्यानंतर पायवाट त्या प्रस्तराच्या कडातून वर चढत गेलेली दिसत होती. मी पुढे व तो मागे राहून हळू हळू ते प्रचंड खडक चढू लागलो. वरुन नर्मदेचा पंचवीस तीस फुट खाली पसरलेला डोह भयानक वाटत होता. पण हीच पायवाट बरोबर आहे असा संकेत करणारे छोटे भगवे ध्वज चाळीस-पन्नास फुटांवर त्यात रोवून ठेवलेले दिसले. हळूहळू चढलो आणि पुढच्या मोकळ्या जागी उतरलो. समोर एक कुलुप लावलेले मंदिर दिसले. चालत राहिलो.
समोर नर्मदेचे विशाल पात्र दूरवर नजरेत येत होते आणि नर्मदेच्या दोन्ही डगरी जोडणार्‍या पुलाची पुसट रेष लांबवर दिसत होती. तो पुल मोरटक्क्‍याचा होता. नेमका किती अंतरावर असेल तो पाहून अंदाज येत नव्हता.
पुढे आणखी एक छोटा आश्रम लागला. कसलीतरी अनोळखी मूर्ती शेंदूर फासून एका झाडाखाली उभी केलेली होती. शेजारी ओटा करुन समाधी बांधलेली होती आणि वर महादेवाची पिंड होती.
थकवा आल्याने मी त्या ओट्यावर जाऊन बसलो. तिथे झोपडीत एक माणूस बसलेला आशूला दिसत होता, तो माझ्‍या नजरेआड होता.
तिथे समाधीच्या ओट्यावर बसू नको, तो चिडेल असे आशू म्हणाला. थकलोच एवढा होतो की कुणी काही चिडत नाही म्हणालो.
थोड्या वेळाने लाकडी फाटक ओलांडून झोपडीकडे गेलो. इथे साधू वगैरे कुणी नव्हते. तो एकटाच माणूस पँट-बनियनवर बसला होता.
''नर्मदे हर''.. ''हर हर नर्मदे'' झालं.
त्या माणसाला मोरटक्का किती दूर राहिले विचारले तर त्या माणसाने हाताने दाखवत -
''सामने पुल दिख रहा है बस वही मोरटक्का.. पांच किलोमीटर है''
असे उत्तर मिळाले. झोपडीपलीकडचं फाटक ओलांडून पुढे गेलो. काही वेळ चालत राहिलो.
पुढे नर्मदेचा सपाट तीर होता. पसरट पात्रात अनेक लहान लांबट मोटरबोटी नर्मदेतील वाळू काढण्‍याच्या कामात गुंतल्या होत्या. त्यांच्या एंजिन्सचा आवाज घुमत होता. वाळूच्या ओझ्यानं एक बोट तर एका बाजूनं एवढी काठोकाठ बुडली होती की तीत बसलेली माणसे आतलं पाणी उपसून बाहेर फेकत होती. मला वाटलं पाणी आत शिरतंय आणि ती बोट बुडत आहे. पण बोटीत भरलेल्या वाळूतून पाझरलेलं पाणी ते बाहेर फेकत होते.
सूर्य बुडण्यासाठी कासराभर अंतर बाकी होते.
तिकडे नाशिकमध्‍ये असलेले जगन्नाथ कुंटे उठले असतील म्हणून आशूने त्यांना फोन लावला.
तु जवळ उभा राहू नको म्हणाला. त्याला वाटले मी मध्‍ये काही बोलून नसता घोळ करणार. त्याला बरंच मागे सोडून पुढे आलो.
कुंटेंनी आशूला ''परिक्रमेत आहेस की मजा म्हणून भ्रमणात आहेस? नर्मदेतून फोन कसा काय लावता येतोय? सुरुवातीला नर्मदेचा असा कोणताही ओघळ नाहीय.. तु नक्की नर्मदा परिक्रमेतच आहेस काय? ‍वगैरे विचारून आशूची टोपी उडवली.
ओढे, नाले पार करावे लागतातच असे समाधानकारक उत्तर मिळाल्याने शेवटी हा त्रस्त समंध शांत झाला.
पुढं गेल्यावर एक आश्रम लागला. त्यात वस्तीला राहिलेले परिक्रमा‍वासी पुढे निघत होते. आश्रमधारी दाढीवाले साधू त्यांना निरोप द्यायला सिगरेटचा धूर सोडत अर्ध्‍या पायर्‍यापर्यंत येऊन थांबले होते.
''नर्मदे हर'' ''हर हर नर्मदे'' झालं.
त्यांनी कुठुन परिक्रमा सुरु केली वगैरे विचारणा केली. ''प्रमाण-पत्र'' आणलंय काय तेही विचारलं.
''यहां रुकना है तो रुक सकते हो, लेकीन खाना खुद बनाके खाना होगा.. अगर रुकने की इच्छा नहीं है तो तीन किलोमीटर पर अगला आश्रम है.. सूर्यास्त होनेवाला है.. असं म्हणून आमच्या उत्तराची वाट न पाहता ते आत निघून गेले.
तेवढ्‍यात मागच्या आश्रमात नळावर खरकटी भांडी आणून ठेवणार्‍या परीक्रमींनी आम्हाला मागून येऊन गाठलं.
सात-आठ लोकांचा तो गट होता.
इथे थांबायचे की पुढे जायचे यासाठी त्या गटाच्या म्होरक्याने सगळ्यांना विचारणा केली व त्यांचे तिथेच रहायचे ठरले.
त्यातला एक निबर म्हातारा क्या है.. क्या है म्हणून म्होरक्यासमोर येऊन थांबला. त्यांना कमी ऐकू येत असावं. कारण म्होरक्या जे काही बोलला त्याचा भावार्थ असा - ''काही नाही झालं.. थांबायचं की पुढे जायचं ते सगळ्यांना विचारतोय.. तु लोड घेऊ नको. तुला एक गोष्‍ट चार वेळा सांगितली तरी तुझ्‍या टकुर्‍यात शिरत नाही.''
मग ते चार पाच जण वर आश्रमात निघून गेले.
आत्ताच म्होरक्याची बोलणी खाल्लेला वृद्ध तो म्होरक्‍या जे बोलला ते खरंच आहे असा भाव चेहेर्‍यावर घेऊन त्याचं बोचकं पायरीवर ठेऊन आमच्या सोबतच थांबला.
मी सिगारेटचं पाकिट काढून एक त्यांना दिली. माचीस पुढे केली तर ते म्हणे - ''माचीस है.''
आम्ही दोघांनी त्या पायर्‍यांवर बसून थोडावेळ धूम्ररेषा काढल्या.
मग मागून आलेल्या एका तुरुतुरु चालणार्‍या, दंताजीचे ठाणे उठून गेलेल्या सत्तरीच्या बाबांनी अगदी तोंडासमोर तोंड जवळ आणून आमची विचारपूस केली.
''किन्नु परकम्मा उठाई? एथ्‍थे र्‍हो.. सूर्यदेव रास्ता काट निकल्या'' म्हणाले.
आप कहां से आये है? विचारल्यानंतर पंजाबातील कुठल्यातरी अवघड नावाचा जिल्हा सांगितला.
कितने दिन से परिक्रमा शुरु है विचारल्यानंतर आमची परिक्रमा तर विनाकांक्ष आहे.. वाटेल तेव्हा सुरु, वाटेल तेव्हा बंद.. संकल्प वगैरे काही सोडलेला नाही असे त्यांनी त्यांच्या अपरिचित तरी कळू शकणार्‍या पंजाबीत सांगितले आणि वर आश्रमात निघून गेले.
मागून आलेल्या गटामधल्याच, ओमानी म्हातार्‍यांसारखा पेहराव केलेल्या तीन वृद्धांनी, बोलण्‍यात वेळ न घालवता पुढे झटझट रस्ता कापला आणि सायंकाळच्या निस्तेज होत जाणार्‍या उजेडात दिसेनासे झाले. ही अगदी राकट-रासवट त्रिमूर्ती एका जगद्विख्‍यात व्यावसायिकाच्या जन्मगावचे रहिवासी आहेत हे पुढे कळले.
आमच्या जवळ शिजवून खाण्यासारखे काही नव्हते. चुलीत नुसता जाळ फुंकला असता तरी इतर परिक्रमींनी आम्हाला उपाशी ठेवले नसते. पण आशूला शेजारच्याच छोट्याशा वस्तीतील घराकडे परतणार्‍या लोकांनी पुढे चांगला आश्रम आहे तिथे थांबायला सांगितले होते.
पुढे निघालो.
(पुढच्या भागात आपण आत्मशून्याला परिक्रमेत एकटे सोडून परतणार आहोत)

१२ जानेवारी, २०१२

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - ३

बाजूलाच असलेल्या पुस्तकांच्या दुकानात गीता प्रेसची उपनिषदे आणि चारी वेद विकायला ठेवले होते. श्रीमद् विद्वद्वर - वरदराजाचार्यप्रणित लघुसिद्धांतकौमुदी होते. संस्‍कृत पूर्णपणे समजण्‍याच्या नावाने बोंब.. पण उगाच किडा म्हणून ती स्वस्तातली खरेदी केली आणि भक्तनिवास गाठला.
भक्त निवास गाठण्यापूर्वी मला चहा प्यायची हुक्की आली. माझ्यासोबतचा महानुभाव "पहिल्यापासूनच उत्तेजक पेयापासून अलिप्त" होता. पण परिक्रमेत चहा प्यावाच लागणार आहे तेव्हा आतापासूनच सवय कर म्हणून आशूवर मी दर तासाला चहाचा मारा सुरु केला होता.
घाटावरच टपरी होती. समोर रात्रीच्या वेळी झळाळून निघालेला ओमकारेश्वराचा पैलतीर आणि मध्ये संथपणे वाहाणारी नर्मदा. डोक्यावर जटाभार राखलेले साधू, इकडेतिकडे पहात घाटावर हिंडणारे फॉरेनर्स अशी तुरळक गर्दी.



टपरीसमोर टाकलेल्या खुर्च्यांवर जाऊन बसलो. आम्ही चहा घेताना त्या टपरीसमोर दोन लहानग्या मुली टपरीसमोर ठेवलेल्या पदार्थांकडे आशाळभूतपणे पहात होत्या. अंगावर फाटके कपडे आणि थंडीने काकडतही होत्या. त्यांच्याकडे नजर लाऊन थोडावेळ पहात राहिलो.
इकडे या आणि तुम्हाला काय खायला पाहिजे ते घ्या असे त्यांना सांगायला उठणार तेवढ्यात एक जीन्सपँट-जॅकेट-कानटोपी घातलेला बाप्या मध्येच उपटला व त्या दोन्ही चिमुकल्यांना त्याने पाठीवर दोन-दोन धपाटे घातले -
"भागो यहां से, घर जा के मरो.."
असे बडबडत आमच्याकडे तिरस्काराने पाहून तो निघून जाऊ लागला. तेवढ्यात टपरी मालकाने त्या बाप्याला झापले -
"अरे उनको काहे भगाया? वो बर्तन माँजने और कुछ खाने के लिये इधर आती है.. "
"पानी में उतर गई थी - ठंड से मरमरा रही थी..बर्तन काहे माँजती..  " असे म्हणत तो बाप्या घाटावरच्याच एका गल्लीत निघून गेला. त्या लहान मुली त्याच्याच किंवा त्याच्या भाईबंदांपैकी कुणाच्या तरी असाव्यात.
थोडावेळ तिथे बसून राहिलो व टपरीवाल्याला पैसे देऊन निघालो. टपरी वाल्यानं परत दिलेल्या जीर्णशीर्ण नोटा घेतल्या. त्या नोटा पाहून आत्मशून्य हसू लागला. इकडे फाटक्या नोटा सर्रास वापरल्या जातात. देणाराही काही बोलत नाही व घेणाराही. कितीचीही नोट देऊन सुटे मागितले तर मिळून जातात. नोट परत अंगावर फेकली जात नाही. पैसे दिले की काही न बोलता सुटे परत मिळतात हे पाहून शून्य फक्त रडायचा बाकी होता. पुण्यपत्तन क्षेत्री बस वाहकाने आशूला सुटे नसल्याने पायीच चालण्याचे बोधामृत पाजले होते.
"नोट फटी हुयी है.. दुसरी दो.." असे आपण म्हणालो तर इकडच्या लोकांना तो लक्ष्मीचा अपमान केल्यासारखे वाटते.
लक्ष्मी को फटा हुआ कहते हो - पापी कहीं के - कहां से आये हो ? असा भाव त्यांच्या चेहेर्‍यावर स्पष्ट दिसतो. पण इथून तिथून फाटक्याच नोटा का वापरल्या जातात त्याचे शास्त्रीय कारण आमच्या कँटीनवाल्याने माझ्या अंगावर फेकून मला निरुत्तर केले होते. इथे नवा होतो तेव्हा त्याच्याकडून रोज-रोज फाटकी नोट परत घेऊन मी चिडलो होतो. कधीतरी धडकी नोट देत जा, इकडे चांगल्या नोटा वापरूच नयेत असा नियम आहे काय असे काहीबाही बोललो होतो.
"खोटे सिक्के चलन में लिये दिये जाते है तब खरे सिक्के ब्यवहार से बाहर होकर तिजोरी में बंद हो जाते है.. आप हम को अच्छी नोट दो - हम भी आपको अच्छी नोट देना शुरु करेंगे.."  असा यक्षप्रश्न मांडून त्याने बोळवण केली होती. आता सगळेच फाटक्या नोटा परत देत असतील तर कोर्‍या नोटा मी काही प्रिंटरमधून काढणार नव्हतो. असो.

तर नुकत्याच विकत घेतलेल्या पुस्तकांचे ओझे कधी या, कधी त्या हातावर तोलत आम्ही भक्त निवास गाठला. शास्त्रीजींनी साडेसात आठला पुन्हा मंदिराकडे यायला सांगितले होते. उद्या सकाळच्या "नर्मदा पूजन - कढाई" च्या विधीची ते त्यांच्या भावाशी भेट घालून देऊन तजवीज करून देणार होते. आठ वाजायला अजून वेळ होता म्हणून आणलेली पुस्तके कुठे, कधी घेतली त्याच्या तारखा पुस्तकांवर घातल्या.

कालपर्यंत परिक्रमेचे कसे होईल, काय होईल ही चिंता करणारा शून्य काल बाळाशास्त्रींची गाठ पडून योग्य तो मार्ग सापडल्याने निर्धास्त झाला होता. इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना साडेआठ कधी वाजले ते कळले नाही. तिकडच्या तीरावर जाऊन यायचे होते. तो झुलता पुल ओलांडून ओमकारेश्वराच्या मंदिरात पोहोचलो.
तिथे झांज, ढोलक, पेटीवर त्या विशिष्ट उत्तर भारतीय ठेक्यावर भजन रंगले होते आणि लोक टाळ्या वाजवत डुलत होते.
भजनात प्रचंड जोरात टिपेला जाणारा तो ढोलक आणि भजनाला चढलेल्या त्या रंगातून शिवशंभोच्या तांडव नृत्याची झाक दिसत होती. गाभार्‍यात ओंकारेश्वराची शयनपूजा सुरु होती त्यामुळे दारावर मखमली पडदा टाकलेला होता. भजन संपून आरती सुरु झाली. शंकराचार्यांनी रचना केलेले नर्मदाष्टक आणि कुणा शिवानंद स्वामींनी रचलेली प्रासादिक आरती सुरु झाली. दोन्हींची लय एवढी सुंदर होती की मन आतल्या आत उड्या मारू लागले आणि डोळे आपोआप मिटले जाऊन त्या तालासुरावर लोक डुलायला लागले -

सबिन्दु सिन्धु सुस्खलत् तरंग भंग रंजितम
द्विषत्सुपापजातकं आरिवारि संयुतम्
कृतान्तदूत कालभूत भीतिहारि नर्मदे
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे
त्वदाम्बुलीन दीन मीन दिव्य संम्प्रदायकं
कलौमलौघ भारहारि सर्वतीर्थ नायकम्
सुमस्यकच्छ नक्रचक्र चक्रवाक शर्मदे
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे

त्यानंतर आरती सुरु झाली

ओम् जगतानंदी.. हो मय्या जय जगतानंदी.. हो रेवा जगतानंदी
ब्रह्मा हरिहर शंकर.. रेवा शिवहर शंकर रुद्री पालंती
हरि ओम जय जगतानंदी
देवी.. नारद शारद तुम वरदायक अभिनव पदचंडी
हो मय्या अभिनव पदचंडी.. हो रेवा अभिनव पदचंडी
सुरवर मुनिजन सेवत.. मुनिजन ध्यावत शारद पदवंती
देवी धूम्रक वाहन राजत वीणा वाजयंती
हो मय्या वीणा वाजयंती.. हो रेवा वीणा वाजयंती

झुमकत झुमकत झुमकत
झनन झनन झनन रमती राजंती
देवी बाजत तालमृदंगा सुरमंडल रमती
हो मैय्या सुरमंडल रमती .. हो रेवा सुरमंडल रमती
तोडिताम् तोडिताम् तोडिताम्
तुडडड तुडडड तुडडड  रमती सुरवंती
हरि ओम जय जगतानंदी..


आरती-प्रसाद-दर्शन झाले आणि आम्ही शास्त्रीजींना शोधू लागलो. इकडे तिकडे पाहिले पण ते कुठेच दिसेनात. शून्य अस्वस्थ व्हायला लागला. उद्याचे नियोजन ठरणे महत्वाचे होते. अर्धा तास शोधाशोध आणि विचाराविचारात गेला. शेवटी त्यांना फोन लावलाच. त्यांना विचारले "कहां है आप? हम मंदिर में आपके लिये रूके है.."
तर तिकडून उत्तर मिळाले, "हम तो घर में विश्राम कर रहें है.."
दिवसभराच्या लगबगीनं थकून ते घरी परतले होते आणि त्यांच्या भावाला त्यांनी आमच्यासाठी मंदिरात थांबवून ठेवले होते. गर्दी फार नव्हती तरी त्यांच्या भावाला आम्ही ओळखू आलो नाही आणि हुकाचूक झाली.

आता सकाळी साडेसात किंवा जास्तीत जास्त आठपर्यंत मंदिरात या व सापडलो नाही तर फोन करा असे सांगून त्यांनी नर्मदे हर म्हणून फोन ठेवला. आत्मशून्याची धाकधुक पुन्हा सुरु झाली - काय होईल.. कसे होईल. परिक्रमेच्या रस्त्यावर पाय ठेवेपर्यंत त्याला सुख झाले नाही.
पुन्हा घाटांवर इकडेतिकडे फिरण्यात वेळ घालवला. भक्त निवासात गेलो तेव्हा पावणे दहा वाजले होते. तिथली प्रसादाची वेळ उलटून गेली होती.
भक्त निवासासमोरच्या हॉटेलमधून काहीतरी घेतले आणि रूम जवळ केली.
---------

रात्री पडल्यापडल्या ईशावास्योपनिषदाचा हिंदी अनुवाद उलटून पाहिला. पहिल्याच श्लोकात आकाश दाखवणारं पुस्तक आयुष्यात पहिल्यांदाच हातात पडलं होतं -

ईशावास्यमित्यादयो मन्त्रा:
ईशादि - कर्मस्वनियुक्ता: |
मन्त्राणां तेषामकर्मशेष्स्यात्मनो विनियोगः
याथात्म्य प्रकाशकत्वात् याथात्म्यं चात्मनः |
शुद्ध्त्वापापाविद्ध्त्वैकत्व नित्यत्वा शरीरत्व सर्वगतात्वादि वक्ष्य माणम्
तच्च कर्मणा विरुध्येतेति युक्त एवेषां कर्मस्विनियोगा: |

ईशावास्यम् इत्यादी मंत्रांचा कर्मात विनियोग होत नाही - कारण ते आत्म्याच्या यथार्थ रुपाचे प्रतिपादन करतात, जो कर्माचा भाग नाही.
आत्म्याचे यथार्थ स्वरूप शुद्ध, निष्पाप, एकत्व, नित्यत्व, अशरीरत्व आणि सर्वगतत्व इत्यादी असून त्याबद्दल पुढे सांगण्यात आले आहे.

न ह्येवंलक्षणमात्मनो याथात्ममुत्पाद्यं विकार्यं माप्यं संस्कार्यं कर्तृभोक्तृरुपं वा ये कर्मशेषता स्यात् |
सर्वासामुपनिषदा मात्मयाथात्मा निरूपणे नैव उपक्षयात्
गीतानां मोक्षधर्माणां चैव परत्वात् |
तदात्मानोनेकत्व कर्तृत्वभोक्तृत्वादी चाशुद्ध्त्व पापविद्ध्त्वादि चोपदाय लोकबुद्धी सिध्दं कर्माणी विहितानी |

आत्म्याचे अशा लक्षणांचे यथार्थ स्वरूप उत्पाद्य, विकार्य, आप्य आणि संस्कार्य किंवा कर्ता-भोक्ता रुप नाही, जेणेकरून तो कर्माचा भाग रूप होईल. संपूर्ण उपनिषदांची परिसमाप्ती आत्म्याच्या यथार्थ स्वरुपाचे निरूपण करण्यातच होते आणि गीता व मोक्षधर्म यासाठीच अस्तित्वात आहेत. त्यामुळे आत्म्याची सामान्य लोकांच्या बुद्धीतून अनुभवास येणार्‍या अनेकत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व तसेच अशुद्धत्व आणि पापमयत्व यांना विचारात घेऊनच कर्माचे विधान करण्यात आले आहे.

या वाक्यांची फोड करुन त्यांचा अर्थ मनात भिनला, भिनत जाऊ लागला. आत्मा जर शुध्द, निष्पाप, एक, नित्य, अशरीरी आणि सर्वगत आहे तर तो अनुभवण्यास एवढा दुस्तर का आहे? कर्माशी आत्म्याचं काही देणं-घेणं नाही हे ही आहेच. मग नेमकी काय भानगड आहे? खरंच काही अडचण आहे की मुळात काहीही अडचणच नाही? हे एवढं सोपं असेल तर मुदलातच काही घोळ होतो आहे एवढं निश्चित. बुद्धीला ताण देण्यापेक्षा ही वाक्ये पुन्हा-पुन्हा मनात भिनवू लागलो व झोप डोळ्यांवर उतरु लागली पण मध्येच आपोआप दोन्ही नाकपुड्यांतून एकदाच श्वासोश्वास सुरु होऊन अंधार व्हायला लागला आणि मरण जवळ आलं असं दर श्वासाला वाटू लागलो. रात्रभर हेच चालू. नसती भानगड झाली. या कुशीवरुन त्या कुशीवर होता होता साडेचार-पाचला कधीतरी झोप लागली. तेव्हा आत्मशून्य जागा होऊन काहीतरी खुडबूड करीत होता.
-----------

काल रात्री हॉटेलातून घेतलेल्या रतलामी सेव फरसाणानं पोट बिघडल्याचे शुभवर्तमान त्याने साडेसात- आठला उठल्यावर जाहीर केले. माझी पण रात्रभर झोप झाली नव्हती.

चहापाणी आवरुन पटकन ओमकारेश्वर मंदीर गाठलं. बाळाशास्त्रींना फोन लावला.
"हम जरा बालक को पाठशाला में छोडने आये है, बंधू आप ही की ओर निकले है.. " 
ओमकारेश्वराच्या पुजार्‍यालाही बालक को पाठशाला छोडने जाना पडता है हे पाहून हसू आलं.
पंधरावीस मिनिटांत बाळाशास्त्रींचे बंधूराज शोधत आलेच. समोरच्या घाटावर जाऊन "क्छौर" करुन घ्या, मी प्रसादाचा शिरा व पूजेचं साहित्य घेऊन पोचतो म्हणाले. दक्षिणा वगैरेबद्दल विचारून घेतलं आणि पुन्हा एकदा पुलावरुन अलीकडच्या काठावर आलो.


"क्छौर" केलेला तो गुटगुटीत आत्मशून्य वैदिक काळच्या बटू सारखा पण अनोळखी दिसू लागला. पैसे काढावे लागणार होते. एटीएम मशीनकडे गेलो तर कुणा येठनछाप माणसानं त्या गावातल्या एकुलत्या एक एटीएम मशीनचं वायर उपटून फेकलं होतं. शून्याच्या अस्वस्थपणाचा पारा पुन्हा १२० अंशांवर गेला. हे एटीएम दुरुस्त व्हायला दुपारचे बारा वाजतील पण नक्की होईल अशी माहिती त्या भल्या पहाटे एकटाच बँकेत काही खुडबूड करणार्‍या इसमाने दिली.
एटीएम असलेलं दुसरं गाव तिथून १२ कि. मी. वर असल्याची माहिती एका सज्जन दुकानदारानं दिली.
शेवटी आशूकडे असलेल्या हजार-दीड हजारात शास्त्रीजींना तात्पुरतं संतुष्ट करु असं ठरवून घाटावर परत आलो व त्यांना अडचण सांगितली तर - "कोई समस्या नहीं.. पहले पूजा निपटा लेते है"  म्हणून स्नानं करुन घ्यायला सांगितले.
घाटावर पूजेचं साहित्य आणि कपडे ठेवले होते. नर्मदेच्या लाटा तिथपर्यंत येऊन आदळल्या आणि कुंकुम, अक्षता ठेवलेलं ताट सोबत घेऊन गेल्या.
"इनकी पूजा लेने के लिये नर्मदाजी आतूर हो गई है" असं शून्याकडे पाहून म्हणालो तेव्हा शास्त्रीजी हसू लागले. नर्मदेत रोजच्या रोज वर जवळच असलेल्या धरणातून पाणी सोडलं जातं. 
नर्मदेचे पंचामृताने पूजन करताना आत्मशून्य गडबडून गेला - त्यात पुन्हा शास्त्रीजींचे १२० च्या स्पीडने होणारे मंत्रोच्चार आणि नेमके काय करायचे त्याबद्दल मध्ये मध्ये सूचनांचा मारा.



नर्मदा मैय्या को जल चढाईये ऐकल्यानंतर हा पठ्ठ्या गडू नर्मदेत टाकू का असे विचारता झाला.
त्याला काठावर उभं करुन पंडितजींनी पंचामृताचे द्रोण त्याच्या हातात पोहोच करण्याकामी उघड्याबंब असलेल्या आमची नेमणूक केली. पाणी सतत वाढत असल्याने काठापासून दूर एका बाकड्यावर पूजा सुरु होती.
नर्मदेची पूजा संपन्न झाली आणि कुमारिकांच्या रुपातील नर्मदेचे पूजन सुरु झाले. घाटावरच्या यात्रेकरूंच्या दोन मुली आणि काल त्या टपरीसमोर दिसलेल्या दोन आणि आणखी त्यांच्यासोबतची एक अशा पाच जणींनी दक्षिणा व प्रसाद स्वीकारून आशूच्या मस्तकावर आशिर्वादाचा हात ठेवला. पंडीतजींनाही दक्षिणा पावली.
परिक्रमीला ओंकारेश्वर नगर परिषदेकडून प्रमाणपत्र घ्यावे लागते. वाटेत काही संशयात्मे "प्रमाण - पत्र" पाहिल्याशिवाय थांबायला परवानगी देत नाहीत आणि परिक्रमा करणार्‍याने ते  सोबत ठेवणे चांगलेच. परिक्रमेदरम्यान काही ठराविक गावात थांबल्यावर त्या प्रमाणपत्रावर तिथला शिक्का घ्यावा लागतो. प्रमाणपत्रावर पूजा सांगितलेल्या गुरुजींचीही स्वाक्षरी असते. ते तयार करण्यासाठी आशू व पंडीतजी घाटावरच असलेल्या नगर परिषदेकडे निघाले आणि एटीएमकडे सुटलो. एटीएमचे वायर जोडले गेले होते. परत येऊन त्या दोघांना गाठले व पंडीतजींना राहिलेली दक्षिणा देऊन मार्गस्थ केले.
आता पोटात काव-काव सुरु झाली होती. हॉटेलमध्ये ताजा पदार्थ काहीच दिसेना पण त्याने त्याचे भजे फार स्वादिष्ट असतात असे सांगून समोरच्या "स्वादिष्ट भजिये" वाल्याकडे जायची शिफारस केली. लिंबू, मीठ मारलेले ते भजे एकट्याने हादडले. पोट बिघडल्याने शून्याने  फक्त संत्र्याच्या रसावर समाधान मानले. भजिये वाल्याला मेडिकल विचारले तर त्याने त्याच्याकडच्याच गोळांचा साठा धुंडाळला. तो केमिस्टही होता. पण हवी ती गोळी मिळाली नाही. त्याने सांगितलेली पावरबाज गोळी दुसर्‍या मेडीकलवर जाऊन आणली.
आता आशूचा निरोप घेण्याची वेळ आली होती. घाट उतरला की त्याची नर्मदा परिक्रमा सुरु होणार होती. पण मला जावे वाटेना. शास्त्रीजींनी पहिला पडाव ओंकारेश्वरहून १२ कि.मी. वर असलेल्या मोरटक्क्यात होईल असे सांगितले होते. मला असेही बसमध्ये बसून मोरटक्क्याहूनच पुढे जावे लागणार होते. त्याऐवजी शून्यासोबत चालत मोरटक्क्याला जाऊ आणि रात्री इंदूरला परत येऊ असे ठरवून घाट उतरायला सुरुवात केली.

(क्रमशः)

११ जानेवारी, २०१२

परिक्रमेमागील तत्त्वे

परिक्रमेमागील तत्त्वे

जगन्नाथ कुंटे यांनी परिक्रमेचे जे नियम नमूद केले आहेत ते मानून चालाव्या लागणार्‍या आध्‍यात्मिक पठडीतील आहेत. उदा. गुरुंची आज्ञा, परिक्रमेला जाण्याची प्रचंड अंतस्फूर्ती, प्राणायामाचे प्रकार, नर्मदा न ओलांडणे इत्यादी मोघमपणे पाळायचे ते नियम आहेत. त्यांनी त्यांच्या विविध पुस्तकांत सांगितलेल्या अनुभवांची संगती आपण तसा विचार करण्‍याकडे झुकत असू तर गुरुकृपा आणि नर्मदामाईची कृपा एवढाच किंवा निव्वळ योगायोग असा लाऊ शकतो.
वास्तविक नर्मदेचीच परिक्रमा कशासाठी करायची? पौराणिक किंवा आध्‍यात्मिक कारणं जी मानली जात असतील ती असोत - पण त्या 10-12 कि.मी. मध्‍ये त्या जीवनाची मला जी झलक मिळाली त्यातून आणि आठवडाभरातील चिंतनातून परिक्रमा हा प्रकार मला आवडला. तो कशामुळे हे थोडक्यात आटोपतो. हे मूळ कथनाला सोडून अवांतर आहे पण हेच परिक्रमेचं सार आहे.
1. परिक्रमा ही एक एकदा का होईना करुन पहावी अशी मूलभूत रुपातील आगळी जीवनपद्धती आहे. सर्वसामान्यपणे लोकांच्या संगतीत राहून सगळंच करुनही विशेष असे काही साधत नाही. कशामुळे तरी कुठल्याही वयात असणार्‍या कुणाचाही श्‍वास थांबतो आणि तोंडाचे बोळके उघडे राहून त्याची निष्‍प्राण हाडं-आतडी शिल्लक रहातात. त्यापुढे कुठलाही शोध, संवाद, प्रयत्न अगदी सगळ्यालाच पूर्णविराम लागतो. पण सगळे काही व्यवस्‍थित चालू असताना एकटे राहून ज्ञाताच्या सीमेवरुन जो पुढे पाऊल टाकू इच्छितो त्याला परिक्रमेचा मार्ग मोकळा आहे. असं काही न मानता 'फॉर ए चेंज' वाल्यांनाही तो मोकळा आहे.
2. नर्मदेच्या तीरावर वसलेल्या गावांमध्‍ये किंवा आश्रमांमध्‍ये ते लोक परिक्रमावासियांच्या जेवणाची सोय करतात. धपाट्यापेक्षा थोडा जाड आणि चवीला अगदी धपाट्यासारखाच 'टिक्कड' नावाचा पदार्थ आणि वरण हे दोन साधे पदार्थ आश्रमांमधून परिक्रमावासियांना दिले जातात - तोच त्यांचा सर्वसामान्य आहार. कुठंतरी निघुन जायचं आहे, पण तिथं गेल्यावर खायचं काय अशी चिंता कोणाही त्याच त्या रुटीनला विटलेल्या, कुठेतरी निघुन जाऊ इच्छिणार्‍या माणसाला सतावते. ही चिंता अशी आपोआप मिटली की परिक्रमावासी 'त्याचा त्याला' ध्‍यान करण्‍यासाठी स्वतंत्र असतो - हे एक.
याचीच दुसरी बाजू म्हणून ध्‍यान वगैरे काहीही न करता फक्त पोटभरीच्या माफक आशेनं परिक्रमेत फिरणारे लोकही आहेत. कारण नर्मदेच्या तीरावरील गावातील आणि आश्रमांतील लोक जेवणाची वेळ असेल आणि परिक्रमावासी नजरेस पडला तर कोणत्या का रुपात होईना, त्याला खाऊ घालतातच. तीरावर गावे जास्तीत जास्त 20-25 कि.मी. च्या टप्प्‍यांत असली तरी दर 3-5 कि.मी. वर एखादा तरी आश्रम हा प्रकार नर्मदेच्या तीरावर अद्याप टिकून आहे. आश्रमांची ही संख्‍या वाढतही आहे.
3. परिक्रमेदरम्यान आयुष्‍य सूर्योदय ते सूर्यास्त या दोन दररोज घडणार्‍या अत्यंत महत्त्वाच्या घटीकांमध्‍ये बांधले जाते. सूर्य उगवला की जिथे आहात तिथून तीरावरुन चालायला लागायचं आणि हव्या त्या ठिकाणी स्नान आटोपायचं. दिवसभर मानवेल तेवढ्‍या आणि रस्ता जसा सापडेल त्या वेगाने चालत रहायचं. सूर्य मावळला की मात्र थांबावं लागतं. अंधारातून तीरावरुन चालताच येत नाही. या दोन अपरिहार्यतांमुळे चालणं आणि एका ठिकाणी थांबणं या दोन क्रियांवर नैसर्गिक बंधनं येतात. चालण्‍यामुळं श्रम होतात, शरीराचा प्रत्येक भाग सक्रिय होतो.. आणि रात्री नैसर्गिकपणे येणार्‍या थकव्यानं प्रचंड नैसर्गिकपणे आलेली झोप लागते आणि 'ब्राह्ममुहूर्त' नावाचं जे काही आहे त्यावेळी आपोआप जागही येते. नैसर्गिक ठरलेल्या क्रमाने ध्‍यानाला बसता येतं. काही दिवसांचे अपवाद सोडले तर हा दिनक्रमच होतो - हा परिक्रमेचा गाभा.
4. परिक्रमेत चालताना रोज पुढे काय येईल हे माहित नसते. कित्येक पायवाटा, प्रस्तर, जंगल या असंख्‍य ठिकाणाहून प्रवास होतो. त्या-त्या भागाच्या बोलण्‍या-चालण्‍याच्या पद्धती दिसतात. त्यामुळं येणारा प्रत्येक क्षण, अनुभव नवा असतो. ओळख-पाळख नसलेले लोक मान देतात - काही अपमानही करतात. संकेतस्‍थळावर मी कोण व तो कोण हे पुरेसं स्पष्‍ट नसताना झालेला मान किंवा अपमान वेगळा आणि प्रत्यक्ष समोरासमोर झालेला मान किंवा अपमान वेगळा. मान मिळाला तरी मनात त्याबद्दल गंड निर्माण न होऊ देता त्याला योग्य असेल तसं सामोरं जायचं - आणि अपमान झाला तरी तो समजून घेऊन मौन रहायचं, किंवा पुढं चालायचं - हा सुद्धा एक क्रमच होऊन बसतो. हे नव्याने आलटुन पालटुन रोजच. शूलपाणीसारख्‍या ठिकाणी तर परिक्रमीजवळ असलेली प्रत्येक गोष्‍ट लुटण्‍याचेही प्रकार होतात. जरुर तेवढेच कपडे अंगावर असताना सर्वहारा अवस्‍थेत काही किलोमीटर चालणे आणि त्यादरम्यान मनात सुरु असलेली प्रक्रिया यातून जो अनुभव येतो तो विरळा आहे.
5. माणसात नैसर्गिकपणे असलेल्या, पण इतर रुटिनमध्‍ये अनुभवता न येणार्‍या जीव-ऊर्जेला नर्मदेच्या किनार्‍यावर उत्थापन मिळते. इनक्रीस्‍ड लेव्हल ऑफ एनर्जी. हे उत्थापन अर्थातच अवधानाचे विषय मर्यादित झाल्याने, तरीही त्यात नवेपणा, ताजेपणा असल्याने मिळते. आणखी सखोल सांगायचं तर, परिक्रमावासी एकाच दिशेने जाणार्‍या नर्मदेचे पाणी पितो - आणि नर्मदेचा प्रवाह ज्या दिशेने जात रहातो त्याच दिशेने शरीरातील पाण्‍यासगट माणूसही पुढे जात रहातो - हे गुजरातेतील भडोचजवळ नर्मदा सागरात जाईपर्यंत एका दिशेने चालू रहाते. नर्मदा सागराला जाऊन मिळाली तरी तिथून पुन्हा नर्मदेच्या उगमापर्यंत उलट परिक्रमा करीत यायचे असते. प्रवाही नर्मदा सागरात मिसळली तरी परिक्रमीच्या शरीरातील नर्मदा त्याच्यासोबतच उगमापर्यंत परत येते. उगमापर्यंतचा हा परिक्रमेतील प्रवास नर्मदेभोवती केलेले हिंडणे न ठरता स्वत:च्याच अंतरात सर्व स्तरांवर केलेले परिक्रमण ठरते. याचे सुपरिणाम कुठल्याही विश्लेषणाच्या पार असतात असे अनेक अनुभव आहेत - होणारी प्रक्रिया गहन व बहुपेडी आहे.

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा

मध्‍य प्रदेशात येऊन चार महिने उलटले तरी इंदुरातल्या सराफ्‍याशिवाय इतर कुठेही जाऊ शकलो नव्हतो. नव्या सालाच्या पहिल्याच दिवशी भारत भ्रमण करायला निघालेला आत्मशून्य इंदुरात येऊन पुढे जाणार होता. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार्‍या ओमकारेश्वराचे दर्शन घेऊन पुढे जायचे असे त्याचे ठरले होते. त्याप्रमाणे तो रविवार 1 जानेवारी रोजी इंदुरात येऊन पोहोचला. मिपावर प्रतिसाद देताना दुसर्‍या उकाराचा अतोनात मारा करणारी ही वल्ली कोण याबद्दल उत्सुकता होतीच. आत्मशून्याच्या भेटीअंती तो केवळ प्रतिसाद लिहिताना फक्त दुसरा उकार वापरतो, मात्र 'ण' चा उच्चार बाणातल्या ण प्रमाणे शास्‍त्रशुद्ध पुणेरी पद्धतीने करतो असे दिसले.
तसेच याचा एक पाय ट्रॅव्हलींग बस मध्‍ये झोपला असताना मुडपला असल्याचे त्याने गळाभेट घेताच जाहिर केले. तो लंगडत असलेला पाहून मला वेगळाच संशय आला होता. मग दुसर्‍या दिवशी आरामात त्याला मेडिकलवाल्याकडे घेऊन गेलो. मेडिकल वाल्याने थेट त्याच्या काऊंटरचा अडसर दूर करुन क्षतिग्रस्त पायाच्या निरीक्षणार्थ आशूला दुकानाच्या आत आमंत्रित केले. आशू पुण्‍यनगरीनिवासी असल्याने या प्रकारामुळे घाबरला. पण त्या मेडिकलवाल्यानेच आत्मशून्यच्या चेहेर्‍यावर उमटलेल्या सर्व शंका दूर केल्या. त्याला एका स्टूलावर स्‍थानापन्न केले. पायाचे निरीक्षण करताना आशूशी संवाद साधत पायाला झटका दिला. मग त्या मेडिकलवाल्याने त्याच्या लंबोळक्या दुकानात आशूच्या निर्दोष चालण्‍याची दोन चार वेळा तालीम घेऊन पुन्हा त्याच्या पायाला झटके दिले. आत्मशून्याने झटक्यांमुळे पायाच्या वेदनांत चाळीस टक्के फरक पडल्याची कबुली दिली. मग मेडिकलवाल्याने पायाला लावायला शास्त्रापुरत्या गोळ्या आणि एक मलम दिले.
आत्मशून्याशी झालेल्या संवादातून कळले की तो इंदूरपासून 60 कि.मी.वर असलेल्या ओंकारेश्वरला जाणार आहे. मी काही देवदेव करणार्‍यांपैकी नाही. ठायीच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा... न लागती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण हे मी कधीतरी ऐकले आहे. त्यामुळे आमच्या खात्यावर तीर्थाटन, देवदर्शन, पूजा-अर्चा नेहमीच सायडींगला पडलेले असते. तरीही, तीर्थाटनाने आनंदित होणार्‍या दोस्तांचे आपल्याला वावडे नाही.
आत्मशून्य ओमकारेश्वरला जाणारच आहे तर अनायासे ओमकारेश्वर पाहुन घ्‍यावे असे ठरवले. तो आला त्या दिवशी सुटी असल्याने बाकायदा इंदुरातल्या सराफ्‍यावर आडवा हात मारला. सराफ्‍यातल्या खास व्यंजनांचे फोटो काढून मिपावर टाकले, तर त्या वासाने मिपाकर सराफ्‍यावर चाल करुन येतील आणि तो मराठी लोंढा आवरता आवरता मध्‍य प्रदेशातही नसता 'क्रायसिस' उद्भवेल असा संशय आल्याने सराफ्‍यात फोटो काढले नाहीत. माझ्‍याकडे सध्‍या कॅमेरा असलेला मोबाईल नाही ही खरी गोष्‍ट आहे. Wink आत्मशून्यही मोबाइल घरीच ठेऊन प्रवासाला निघाला होता.
इंदूरात सध्‍या आमचा तंबू जिथे ठोकला आहे त्या लोकमान्य नगरच्या उशाशी असलेल्या, सतत पेंगत रहाणार्‍या ठेसनातून ओंकारेश्वरी जाता येते ही नवी माहिती विकीपिडीयानं दिली. एरव्ही रोज आम्ही चहा प्यायला याच स्‍टेशनबाहेर असलेल्या झोपडीरुपी रेस्‍टॉरंटमध्‍ये जात होतो. पण एवढ्‍या शांत स्‍टेशनातून कुठे जाता येत असेल यावर माझा विश्‍वास नव्हता. विकीपिडीयाच्या माहितीची स्‍टेशन मास्‍तरांकडून खात्री करुन घेणे आवश्‍यक होते.
चहा पिऊन झाल्यावर आत्मशून्याला पुण्‍या-मुंबईसारखे बिलकुल नसणारे स्‍टेशन दाखवावे व ओमकारेश्वरच्या गाडीची 'पूछताछ' करावी असे ठरले. शक्यतोवर नियम पाळण्‍याकडे माझा कल असतो. फलाटावर जायचे म्हणजे प्लॅटफॉर्म तिकीट घ्‍यायला हवे. म्हणून खिडकीच्या आत विदाउट युनिफॉर्म बसलेल्या बाबांना प्लॅटफॉर्म तिकिट मागितले. तर ते म्हणाले, ''प्लॅटफॉर्म टिकट किसलिए चाहिये?'' मी म्हणालो प्लॅटफॉर्मवर जायचंय म्हणून. तर ते एकदम खेकसलेच.. फलाटपर जाने के लिए टिकट की क्या जरुरत म्हणणारा तो म्हातारा स्‍टेशनलाच खेटून असलेल्या झोपडीरुपी हॉटेलचा मालक आहे असा प्रकाश पडला.. आणि दोन रेल्वेंच्या मधल्या टायंबात यजमानाकडे जेऊन येणार्‍या पुलंच्या स्‍टेशन मास्‍तरची आठवण झाली.
दररोज सकाळी 9 वाजता त्या स्टेशनमधून ओमकारेश्वरला रेल्वे जाते यावर त्या म्हातारबांच्या हॉटेल चालवणार्‍या अर्धांगिनीने सहमतीची मोहोर उठवली. ते ऐकून माझ्‍यापेक्षा आत्मशून्यच जास्त खूश झाला. कारण गाडी पकडण्‍याची पळापळ वाचली होती. रुमपासून या स्‍टेशनात पाच मिनीटांत जाता येते.
आता इथून पुढे मात्र या कथनाला वेगळे वळण लागत आहे. हे कथन मी मिपावर किंवा मिपावरील कुणाकडेही करु नये अशी आत्मशून्याने अगदी अनेक वेळा कळवळून विनंती केली असली तरी माझ्‍या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरुन मी शून्याचे गुपीत फोडत आहे. त्याबद्दल तो मला माफ करील अशी आशा आहे. हे गुपीत फोडले तर मी मित्रांसाठी विश्वासार्ह माणूस नसेल अशी तंबीही त्याने देऊन ठेवली आहे. कितीही काही असले तरी, कुणाला जाहीर होणे पसंत नसलेली गोष्‍ट मी उघड करीत आहे याबद्दल माझ्‍या मनात सल आहे.
'युजींविषयी तुझ्‍यासोबत बोलायचंय.. म्हणून तुझ्‍याकडे येत आहे' असे सांगणारा आत्मशून्य इंदुरला आला तो वेगळाच संकल्प मनात घेऊन. एकमेकांची ओळख होऊन एकमेकांबद्दलचा नवेपणा संपल्यानंतर त्याने तो ओमकारेश्वराहून सध्‍या तरी एकट्याने पायी चालत, 'नर्मदा परिक्रमेला' निघणार असल्याचे त्याचे गुपीत माझ्‍यासमोर फोडले. ते ऐकून, त्याने सोबत आणलेली जगन्नाथ कुंटे उर्फ अवधूतानंद यांची पुस्तके वाचून, इंटरनेटवरुन परिक्रमेबाबत 2 दिवस माहिती काढून मला सुद्धा त्याच्यासोबत परिक्रमेला जावे असे वाटायला लागले. पण माझ्‍यावर असलेल्या जबाबदार्‍यांमुळे मी ते करु शकलो नाही. या जबाबदार्‍या नाणेफेक करुन तूर्त टाळणे योग्य होईल काय याचाही प्रयत्न मी करुन पाहिला - पण ते होणे नव्हते. असो.
शेवटी दिनांक 9 जानेवारी रोजी आम्ही लोकमान्य नगर स्‍थानकातून ओमकारेश्वरकडे जाणार्‍या खंडवा-अकोला-रतलाम रेल्वेत चढलो. मीटरगेजवरुन झुक् झु्क् करीत जाणार्‍या रेल्वेत आम्ही चढलो. शिटा रिकाम्या असूनही सगळा प्रवास उभे राहून, डोंगरदर्‍यांची रमणीय दृश्‍ये मीटरगेजच्या गतीने डोळेभरुन पहाता आली. डॉ. आंबेडकरांचं जन्मस्‍थान असलेले महूदेखील वाटेत लागले. मागील पावसाळ्यात दोन लोकांचा बळी गेलेल्या कुप्रसिद्ध ''पातालपानी'' हा विकराल धबधबा वाटेत भीती घालून गेला. सुमारे चार तासांनंतर गाडीने आम्हाला ओमकारेश्‍वर रोड उर्फ मोरटक्का स्टेशनवर सोडले.
दुपारी दीडच्या दरम्यान नर्मदेच्या तीरावर ओबडधोबड पर्वतशिलांवर वसलेल्या ओमकारेश्वर येथे पोहोचलो. तिथल्या घाटांवर फिरुन झाल्यानंतर परिक्रमेपूर्वी नर्मदापूजन, प्रसादाच्या 'कढाई' साठी गुरुजी गाठणे आले.
 

हे फोटो काढल्या ठिकाणीच छापून मिळाले.. जे तंत्रज्ञान आयफेल टॉवरखाली तेच नर्मदेच्या तीरावर

ही परिक्रमा पूर्णत: शास्‍त्रोक्तपणे, सर्व नियमांचे पालन करुनच करायची असे आत्मशून्याने ठरवले होते. शेवटी कुंटेंच्याच पुस्तकात नाव दिलेल्या श्री. सुधाकरशास्‍त्री जोशी यांचा पत्ता काढत नर्मदेच्या पलिकडील तीरावरच्या ओमकारेश्वर मंदिराकडे निघालो. इतर कुठल्याही तीर्थस्‍थानाप्रमाणे इथेही भोवती पंडित लोकांचा गराडा पडलाच. पण आम्हाला श्री. सुधाकरशास्‍त्री हवे होते. सुधाकरशास्‍त्रीच हवे असण्‍याचे कारण म्हणजे, कुंट्‍यांनी लिहिल्याप्रमाणे ते महाराष्‍ट्रीय. त्या पुजार्‍यांनी सुधाकरशास्‍त्री हे 2003 मध्‍येच निधन पावल्याचे वर्तमान सांगितले. बाळाशास्‍त्री हे त्यांचे त्यांचे सुपूत्र भेटू शकतील असे सांगून त्यांचा मोबाइल नंबर आमच्या हातात पडला. पुढे गेल्यानंतर एका जॅकेटधारी पंडिताला बाळाशास्‍त्रींचा अतापता विचारला तर ''रुकें, अभी मिला देते है..वे भगवान के मुख्‍य पुजारियों मे से एक है..'' असे सांगून तो ओंकारेश्वर मंदीरातील गर्दीत अंतर्धान पावला. थोड्‍या वेळाने बाळाशास्‍त्री गर्दीतूनच कुठूनतरी समोर आले. महाराष्‍ट्रातून, कुंटेंच्या पुस्तकात नाव वाचून परिक्रमेसाठी आलोय म्हटल्यावर बाळाशास्‍त्री यांनी पूर्णपणे हिंदी लहेजाच्या कह्यात गेलेल्या मराठीत माहिती द्यायला सुरुवात केली.
उद्या परिक्रमा सुरु करता येईल, आता थकला असाल, पलीकडच्या तीरावरच गजानन महाराज संस्‍थानचा भक्त निवास असून तिथे आराम करा असे सुचवले. रात्री साडेसात-आठला ओंकारेश्वराची आरती असते तेव्हा परत एकदा या म्हणजे उद्या कढाईचा विधी करणार्‍या त्यांच्या बंधूराजांशी भेट घालून देता येईल असे सांगितले.
गजानन महाराज संस्‍थानचा भक्त निवास पाहून आम्ही चाट पडलो. अवघ्‍या 175 रुपयांत रात्रभरासाठी उत्तम दर्जाची खोली मराठी माणसांना महाराष्‍ट्राबाहेरही उपलब्ध करुन देण्‍याच्या प्रयत्नाला केवळ दंडवत घातला. ओळख सिद्ध करणारे पुरावे मात्र काऊंटरवर दाखवावे लागले. तिथे जेवणाचीही सोय आहे, पण आम्हाला फिरण्‍याच्या नादात वेळेचे भान राहिले नाही. त्यामुळे भक्त निवासात प्रसाद घेता आला नाही.
तासभर आराम करुन भक्त निवासाच्या जवळच असलेल्या ममलेश्वराच्या दिशेने निघालो. घाट चढून गेल्यानंतर एका दुकानात भल्या मोठ्‍या अक्षरात पाटी लाऊन भांग विकली जात असल्याने 'अचंभा' वाटला. पण इंदूरमध्‍येच, आत्मशून्य आणि मी टपरीवर गेल्यानंतर त्याने चॉकलेटसारख्‍या गोळ्या पाहून ते काय आहे असे विचारले होते. सिगारेटींसाठी मी ज्या टपरीवर रोज जातो तिथे भांगेच्या गोळ्याही एका रुपयात एक या भावाने विकल्या जातात हे ज्ञान मला इंदुरात रहायला आल्यानंतर चार महिन्यांनी झाले होते.
तेव्हा मजा म्हणून त्या स्वस्तातल्या भांगेच्या दोन गोळ्या रात्री झोपताना घेतल्या होत्या. दुसर्‍या दिवशी हपिसला ब्राम्हण घातला गेला. जागच दुपारी 12 वाजता आली. भांगेत मंद-मंद नशा उत्पन्न करुन अंमल असेपर्यंत माणसाला अवकाशगामी ठेवण्‍याची शक्ती आहे. पण 'दिडकीची भांग घेतली की वाट्टेल तेवढ्‍या कल्पना सुचतात' हे काही खरे नसावे. मला काहीही सुचले नाही.
येताना एका दुकानात शेरलॉक होम्स सारखा ओढायचा 'पाइप' पाहिला होता. सुव्हेनियर म्हणून मला तो हवा होता. एक फुटला तर दुसरा म्हणून ते दोन पाइफ घेऊन आम्ही घाट उतरु लागलो. बाजूलाच असलेल्या पुस्तकांच्या दुकानात गीता प्रेसची उपनिषदे आणि चारी वेद विकायला ठेवले होते. श्रीमद् विद्वद्वर - वरदराजाचार्यप्रणित लघुसिद्धांतकौमुदी होते. संस्‍कृत पूर्णपणे समजण्‍याच्या नावाने बोंब.. पण उगाच किडा म्हणून ती स्वस्तातली खरेदी केली आणि भक्तनिवास गाठला.
(आत्मशून्यासोबत केलेल्या 12 कि.मी.च्या परिक्रमेचा वृत्तांत, वाटेत आलेले मजेदार प्रसंग उद्या)