२३ जानेवारी, २०११

बाळासाहेब















हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आज ८५ वर्षांचे झाले! राजकारणातला असो नसो, शिवसेनेची भूमिका मानणारा असो नसो महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येकानं क्षणभर थांबून या सम्राटाचं अभिष्टचिंतन करण्याचा हा दिवस आहे. कारणे स्पष्ट आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या महाराष्ट्रीय अस्मितेमधील बाळासाहेब ठाकरे हे मुकूटणी आहेत; बाळासाहेब हा एक संस्कार आहे! हे व्यक्तीमत्वच करिष्माई आहे. शिवसेनाप्रमुख म्हणून त्यांनी निभावलेल्या भूमिकांबद्दल वाद असतील, पण तो बाळासाहेबांचा फक्त एक पैलू आहे; आणि त्यातूनही कुणाच्याही मनावर आक्रामकता, रोखठोकपणाचाच ठसा उमटतो.
कुंचल्याच्या फटकार्‍यांतून विरोधकांना गारद करणारे बाळासाहेब, खींचो न कमान को न तलवार निकालो - जब तोप मुकाबील है तब अखबार निकालो म्हणणारे बाळासाहेब! लाखोंच्या सभेसमोर उभे राहून हात पसरून महाराष्ट्रातील माताभगिनी आणि तमाम मराठीजनांना आवाहन करणारे बाळासाहेब. कोणत्याही काळात, कोणत्याही देशात निर्माण होणार्‍या महानायकाचा एक महत्वाचा गुणविशेष मानला जातो तो हाच की त्या नेत्यामुळे, त्याच्यासोबतच्या आणि नंतरच्या पिढ्यांमध्येही प्राण फुंकला जातो. तो नेता, फक्त नेता राहात नाही तर सर्वांसाठीच ते एक संचित बनून जाते. बाळासाहेबांच्या व्यक्तीमत्वात नक्कीच ही जादू आहे.
बाळासाहेबांच्या वक्तृत्वातील जादू ही की, त्यांच्या टिकेचा विषय बनलेल्या कोणत्याही व्यक्तीला ते त्यांच्या अभिनयाच्या क्षमतेमधून हुबेहुब जीवंत करून श्रोत्यांसमोर उभा करतात आणि तिथेच त्याची साले काढायला सुरूवात होते. मग अशा असंख्य उदाहरणांत बाळासाहेबांच्या मिष्किल अभिनयातून फटके खाणारे, सोनिया गांधींना तलवार दिल्याची आगळीक केलेले बाबासाहेब पुरंदरे  (या उद्याच्या पंतप्रधान, आम्हाला मॉं साहेबांसारख्या दिसत आहेत) असतील की काश्मीरच्या मढ्यावरचं लोणी खाणारे फारुख अब्दुल्ला  (गुलाबी, गुलाबी - बापाचा माल!) असतील. राज ठाकरे यांना विधायक कामासाठी पब्लिक एंटरटेन्मेंटमधून इमोशनल एनकॅशमेंट आज भलेही करता येत असेल पण तो संस्कार बाळासाहेबांचा आहे, हे ते सुध्दा मान्य करतील.
मला, मलाच काय वक्तृत्व या अभिव्यक्तीचा अभ्यास करणार्‍या कुणालाही बाळासाहेब या व्यक्तीमत्वामधला नेहमीच आकर्षित करणारा गुणविशेष म्हणजे अगदी कमीत कमी वाक्यांमध्ये टिकाविषयाचा अचूक वेध घेणारी त्यांची शब्दफेक आणि खास ठाकरी शैलीतील बॉम्बफेक. मागे एकदा सिंहगडाच्या पायथ्याशी झालेल्या रेव्ह पार्टीचा दसरा मेळाव्यात समाचार घेताना एका मिष्किल, तिरकस आजोबांच्या शैलीत बाळासाहेब असेच काहीसे उद्गारले होते - "आजकाल हे एक आलंय नवं खूळ - रेव्ह पार्ट्या... जंगलात जायचं, एकमेकांना आवळायचं.." बस्स.. बस्स..बस्स !!! पुढे काही बोलण्याची गरजच नाही - समजणार्‍याला सगळं समजून येतं.
   महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ही तोफ गावोगावच्या मैदानांवर कडाडत असताना प्रभु चावलांनी योग्य तो आदर राखून घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीतील बाळासाहेब असोत की इंग्लिशमध्ये वीर सिंघवीच्या तिरकस, धाडस करून थेट विचारलेल्या प्रश्नांना छप्परफाड उत्तरे देणारे, मुलाखत संपताच "जय हिंद, जय महाराष्ट्र!" म्हणून पुढे क्षणभरही वाट न पाहता ताड्कन चालते होणारे बाळासाहेब असोत - बाळासाहेबांच्या वक्तृत्वातील ती अदृश्य जादू आजही पंच्याऐंशीव्या वर्षीदेखील तेवढीच टिकून आहे.
शेवटी एवढंच म्हणतो, आई भवानी बाळासाहेबांना अशाच प्रभावी वक्तृत्वाचं शतक ठोकण्याचं बळ देवो!