१६ जून, २०१०

जुळवून घ्या, नाहीतर चालते व्हा


आज ऑस्ट्रेलियन पंतप्रधान केव्हीन रूड यांचे एक वक्तव्य या ब्लॉगवर टाकत आहे. श्री. विजय जोशी, जव्हार, ठाणे यांच्याकडून हा मूळ इंग्रजीतील मेल मला मिळाला, तो मी मराठीत सामना स्टाईलनं अनुवादीत केला आहे. स्टाईल सामनाची असली तरी, यातले वक्तव्य दाद देण्यासारखे आहे. मी कट्टर हिंदू नसल्यामुळे इतर कट्टर फाजीलपणाकडे दुर्लक्ष करू शकत नाही.




जगानं जे ऐकायलाच हवं ते बोलण्यासाठीचं धैर्य या माणसात आहे. हे होणारच असं जरी असलं तरी स्वत:च्या आणि ऑस्ट्रेलियाच्या मान्यतांबद्दल भूमिका घेण्याची इच्छाशक्ती या माणसाने जाहिर केली. याच्यासारखा एखादा माणूस इथं - भारतात आपल्याला मिळू शकतो काय? "तुमच्या श्रध्दा काहीही असोत, भारतीय व्हा, देशभक्त व्हा. दहशतीला खतपाणी घालून तुम्हाला भारतात रक्तपात करायचा असेल तर, चालते व्हा!!" असं सांगू शकणारा? लुळ्य़ा-पांगळ्या नेत्यांनो, मांडा आता तुमची भूमिका.


ऑस्ट्रेलियन पंतप्रधान पुन्हा एकदा कडाडले !!
इस्लामिक शरिया कायद्याप्रमाणे जीवन जगू इच्छिणार्‍या मुस्लिमांना ऑस्ट्रेलियाबाहेर चालते होण्यास सांगण्यात आले. संभाव्य दहशतवादी हल्ल्यांना टाळण्याचा भाग म्हणून सरकारने जहालवादी गटाला लक्ष्य केले.
देशातील मशीदींवरील गुप्तहेरांच्या टेहळणीचा त्यांच्या या वक्तव्याला आधार असल्याचे नमूद करीत ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियन मुस्लिमांवर तोफ डागली, ती अशी:
स्थलांतरितांनी जुळवून घ्यावे, ऑस्ट्रेलियन्सनी नव्हे. जुळवून घ्या, नाहीतर चालते व्हा. अडचणीत आलेल्या काही व्यक्ती किंवा त्यांची संस्कृती याबद्दल देशाला चिंता आहे की नाही याबद्दल काळजी करत राहाण्याचा मला आता वीट आला आहे. बालीवर दहशतवादी हल्ले झाल्यापासून बहुसंख्य ऑस्ट्रेलियन्समध्ये संतापाची लाट उसळल्याचे आपणास माहित आहे.
लक्षावधी स्री-पुरूषांचा स्वातंत्र्य संघर्ष, खटले आणि विजय यांच्या दोन शतकांतून ही संस्कृती विकसीत झाली आहे.
आम्ही मुख्यत: इंग्लिश बोलतो, स्पॅनिश, लेबनिज, अरेबिक, चायनीज, जपानिज किंवा इतर कोणतीही भाषा बोलत नाही. त्यामुळे, आमच्या समाजाचा भाग बनायचे असेल तर तुम्ही ही भाषा शिका!
बहुतांशी मुस्लिम देव मानतात. फक्त काही ख्रिश्चनच, उजवे किंवा राजकिय दबाग गटांनी नव्हे तर ख्रिश्चन स्त्री-पुरूषांने ख्रिस्ती तत्वांवर या देशाची उभारणी केली आहे आणि तसे स्पष्ट दस्तऐवज उपलब्ध आहेत. त्यामुळे आमच्या शाळांच्या भिंतीवर ते प्रदर्शित करणे निश्चितच योग्य आहे. देवामुळे तुमचा अपमान होत असेल, तर मी तुम्हाला सल्ला देतो की जगाचा इतर कुठलातरी भाग तुमचे नवीन घर म्हणून स्विकारा, कारण देव आमच्या संस्कृतीचा भाग आहे.
आम्ही तुमच्या श्रध्दा स्विकारू आणि त्याबद्दल प्रश्न विचारणार नाही. आम्हाला फक्त एवढेच हवे आहे की तुम्ही आमच्या श्रध्दा स्विकारा आणि आमच्यासोबत खेळीमेळीत आणि शांततामय मार्गाने आनंदात जगा.
हा आमचा देश, आमची भूमि आणि आमची जीवनशैली आहे आणि या सर्वांचा उपभोग घ्यायला आमची ना नाही. पण तुम्ही आमचा ध्वज, आमच्या ख्रिस्ती श्रध्दा किंवा जीवनशैलीबद्दल तक्रारी आणि गार्‍हाण्यांचे तुणतुणे वाजवू लागाल तर मात्र "निघून जाण्याचे स्वातंत्र्य" या आणखी एका महान ऑस्ट्रेलियन स्वातंत्र्याचा फायदा घ्या असा मी आग्रह धरीन.
तुम्हाला इथे बरे वाटत नसेल तर चालू लागा. आम्ही तुम्हाला इथे या असा आग्रह केला नव्हता. इथे येऊ का? अशी विचारणा तुम्ही केली होती. त्यामुळे तुम्ही निवडलेल्या देशाला जसेच्या तसे स्विकारा.

१५ जून, २०१०

खालच्या चमत्काराला मला शब्दात सांगता आलेलं नाहीच. पण झाकिर हुसेन आणि पंडित शिवप्रसाद शर्मा यांच्या या जुगलबंदीतून जे संगीत निर्माण झालं ते जर ऐकलंत तर नेमके काय घडले होते त्याची झलक मिळू शकेल. झाकीर आणि शिवप्रसाद यांच्या जुगलबंदीतील संगीत आणि खालची छायाचित्रे - म्हणजे त्यातला जीवंत देखावा यांची सरमिसळ करा. हे सूर, ताल जेवढे तलम आहेत, स्वर्गीय आहेत तेवढंच ते उन, हिरवळ आणि पाऊस तलम आणि स्वर्गीय होता.

मी पाहिलेला स्वर्गीय चमत्कार

मागच्या पावसाळ्यात अशाच एका कुंद झाकोळलेल्या दुपारी इथल्या विद्यापीठात गेलो होतो. पावसाच्या सरी वर सरी उतरू लागल्या आणि मधेच सोने पिऊन आलेले उनही नाचू लागले होते. जमीन हिरवाईनं नटली होतीच. परत येत असताना बोटॅनिकल गार्डन आणि विद्यापीठ विश्रामगृहाच्या मधल्या पट्ट्यात उन, हिरवळ आणि पाऊस हे तिन्ही जीवंत होऊन धुंदपणे नाचत होते आणि रंगीबिरंगी फुलपाखरेही या नाचाला उलट-सुलट बागडून दाद देत होती. मला ते शब्दात सांगता येत नाहीए आणि खालच्या फोटोंमधूनही ते दिसेल की नाही माहित नाही. पण तासभर मी तिथेच खिळून उभा होतो. हा पावसाळा स्वर्गाचे असे अनेक तुकडे घेऊन येणार - अनेक चमत्कार देऊन जाणार ! मी वाट पाहातोय फक्त हिरवळ पसरण्याची !





१३ जून, २०१०

‍जी.ए. कुलकर्णी - काजळमाया



जनसंमर्द एके ठिकाणी दुभागल्यासारखा झाला व त्याच्यात हास्याच्या लहरी उमटल्या. आपल्या दैनंदिन वस्त्रांवर एका बाजूने पूर्ण काळा व दुसर्‍या बाजूने पूर्ण शुभ्र असा वेष घातलेला विदूषक गाढवावर बसून राजसभेकडे येत होता. एका दोराच्या तुकड्याच्या टोकांना एका बाजूला घंटा व दुसर्‍या बाजूला दीप बांधून त्याने तो आपल्या गळ्याभोवती वेटोळ्याने टाकला होता, परंतू घंटेची जीभ काढून ठेवली होती व दीपात तेल अथवा वात काहीच नव्हते. भोवतालच्या कुत्सित उद्गारांकडे दुर्लक्ष करीत तो राजसभेकडे आला, आणि उच्चै:श्रव्यावरून इंद्र उतरत असल्याच्या दिमाखानेच तो खाली उतरला. त्याला पाहून फक्त सम्राटांच्याच विनोदाला हास्य अर्पण करण्याची सवय असलेल्या प्रधान अमात्यांच्यांही मुद्रेवर स्मिताची भावना दिसली. विदूषकाने गळ्याभोवतालची दोरी न काढताच दीप व घंटा एखाद्या देवतेच्या आयुधांप्रमाणे दोन्ही हातात उचलून धरली व राजसभेत प्रवेश करून तो सेनानायकांच्या आसनाशेजारीच, पण खाली संगमरवरी फरशीवर नम्रपणे बसला.
"स्वागत असो बृहस्पती ! आज गाढवावरून आगमन झालं ?" सेनानायकांनी नाटकी गंभीरपणे विचारले.
"आपण चुकलात सेनानायक ! आपल्या दिवंगत पुण्यश्लोकांच्या पवित्र आज्ञाचा भंग केलात! साम्राज्यात कशालाही, कोणालाही, त्याच्या खर्‍या रोखठोक नावानं संबोधायचं नाही, अशी एक आज्ञा त्यांनी प्रसृत केली होती याचा आपणांस विसर पडला आहे का? गाढवाला गाढव म्हणायचं नाही, तर त्यास मलराशिविमर्शक अथवा आजानुकर्ण म्हटलं पाहिजे. आत्ताच येत असता मी माझ्या मार्गावर एक मोठा कोलाहल ऐकला. घोड्यांचे केस कापून त्यांना नीटनेटके ठेवणार्‍या व्यवसायींचा, उंदीर मारून उपजीविका करणार्‍या श्रमिकांचा एक मोठा समूह राजसभेच्या दिशेनं आक्रामक आवेशानं येत असलेला मला दिसला. गत राजसभेच्या प्रसंगी मासे धरणार्‍यांना, शिकार करून जगणार्‍यांना नवीन नामचिन्हं मिळून त्यांना सभेत मानाचं स्थान मिळालं, तेव्हा या वेळी आपल्यासारख्या राज्यमंडलाच्या महत्वाच्या दिग्गजांना तसंच स्थान का मिळू नये, अशी त्यांची क्रोधजन्य विचारणा आहे. तेव्हा त्यांचं आगमन होण्याआधीच त्यांच्या प्रमुखांना अनुक्रमे अश्वकेशभूषारत्न आणि मूषककुलसंहारभास्कर अशा उपाधी देण्याची चतुर प्रधान अमात्यांनी योजना केली आहे, अशी वदंता आहे. मी फक्त वदंताच ऐकत असतो सेनानायक, सत्य नाही. एकदा काही तरी सत्य झालं की ते स्थिर, जड, चैतन्यहीन होतं, तर वदंता ही सदैव नवनवोन्मेषशालीनी असते."