६ नोव्हेंबर, २०१०

बुरा ना मानो दिवाली है!!

उगाच आपापल्या नादात जगत असणार्‍या लोकांना, लहान-सहान लेकरांना भडडाम्म!!! असा आवाज करून दचकवणं वाईटच! भलेही मग तुम्ही लक्ष्मीपूजन करीत असाल की दिवाळीत फटाक्यात हजारो रूपये जाळून स्वत:चा माज दाखवत असाल. पर ये नहीं हो सकता मेरी जान! लोक जसं वागतात तसंच आपणही वागलं पाहिजे. पागल म्हणतील ना नाहीतर लोक.  अख्खं शहर फटाक्यांच्या धुराने न्हाऊन निघत असताना इथे कुणाला शुध्द आहे? दिवाळी आहे ना.. बजाव फटाकाऽऽऽ अ‍ॅटम बॉम्ब लावा‌‍ऽऽऽ पाच-पाच हजारांच्या लडी लावाऽऽऽ लोकांच्या कानाच्या पडदे फुटले तर फुटले!
सहा सव्वा सहाची वेळ. छाट्छूट फटाक्यांचे आवाज गल्लीत सुरू झाले होते. त्यांचा काही त्रास होत नाही. पण कामात मन गुंतलं असताना, कशात तरी तंद्री लागलेली असताना मध्येच मोठ्ठा धड्डाम्म्म!! असा आवाज झाला तर कोण चिडणार नाही?? मी पण चिडलो होतो. एकतर समोरा-समोर दारं. तीस-चाळीस फूटांचं अंतर. शेजारी त्याच्या घराबाहेर फटाके, अ‍ॅटम बॉम्ब वाजवणार म्हणजे रस्त्याच्या मधोमध माझ्या घरापासून बारा पंधरा फूटांवर ! माय गॉड! घरात लहान बाळं आहेत - दिवाळी म्हणजे काय त्यांना अजून माहितही नाही. ती बिचारी इवले-इवले हात गाला-खांद्यांशी घेऊन झोपलेली असतात... इकडेतिकडे टुकूटूकू पाहात असतात...मध्येच भड्डाम्म्म!!!! आवाज  झाला की फूटभर उंच उडून केकाटायला लागतात ना ती? पर दिवाली है!! चालायचंच!
पण अ‍ॅटम बॉम्ब फारच जोरात वाजत होते. घरातही ठिणग्या उडून येत होत्या. 
शेवटी उठलोच.
"ए‌‍ऽऽऽ ये बम वगैरा अपने घर में बजाओ..हम भी दिवाली मना रहे है.. कहांसे लाये ये बम?? धमाके से घर चौंक रहा है..."
समोरचे शेजारी हिंदी भाषक होते. काय झाले माहीत नाही पण आवाज तेवढ्यापुरता थांबला. मला हायसं वाटलं. आणि वाईटही. सणासुदीच्या दिवशी काय आरडा-ओरडा करायचा? पण तेच चांगलं झालं. ताव मारून ओरडल्याशिवाय, अर्वाच्य बोलल्याशिवाय सालं कुणी ऐकतंच नाही. तास अर्धा-तास किरकोळ आवाजांत, म्हणजे तुलनेने शांततेत गेला. पण पुन्हा तेच! अ‍ॅटम बॉम्बच्या धडाक्यानं भिंतीवरचं घड्याळ खाली पडलं. पुन्हा उठलो.
"मै लास्ट बार बोल रहा हूं... इतनी बडी आवाज के पटाखें मत बजाओ.. वर्ना मै पुलिस को बुलाऊंगा.."
आता ती माणसं पण चिडली असावीत. ती पण जोरात आली.
"क्या बात कर रहे है साहब, अभी तो लक्ष्मीपूजा भी नहीं हुयी है.. फिर देखना आप कितनी आवाजें होंगी.. दिवाली है इसलिये बजा रहे है.. बुलाओ पुलिस को.. देखेंगे हम भी.."
"दिवाली सभी के लिये है, हम भी मना रहें है.. पटाखें बजाकर लोगों के घर गिराना चाहते हो या लोगों को गूंगा करना चाहते हो?"
त्याने उत्तर दिले नाही. पूर्वीपेक्षा जास्त मोठे आवाज होऊ लागले. शेवटी मोबाईलवरून "नियंत्रण कक्ष" नावाच्या पोलिसी खात्याला फोन लावला. हा नंबर असणं एक बरं असतं. हे लोक फार काही करीत नाहीत. पण रस्त्यात फार पोलीस तैनात दिसले, रस्त्यांवरची गर्दी अचानक खूप कमी झाली की - लाव नियंत्रण कक्षाला फोन - ते माहीती तरी देतात काय झालंय त्याची. म्हणजे आज मुख्यमंत्री शहरात येणार आहेत किंवा अमुक मशीदीवर रंग पडल्यानं शहरात वातावरण तंग आहे वगैरे वगैरे. तशीच त्यांनी आताही दिली -
"जै हिंद, नियंत्रन कक्षातून कॉन्स्टेबल वाघमारे बोलतोय, ब्वाला.."
"जय हिंद, साहेब आमचे शेजारी घर पडेल एवढे मोठे फटाके वाजवत आहेत.. सांगितलं तरी ऐकत नाहीत..पोलिसांनाही बोलावलं तरी काहीऽऽऽ"
"कोंच्या कॉलिनीत र्‍हाता तुमी?"
" **** कॉलनी"
"मंग ***** वाडी ठाण्याला ********* नंबरावर फोन लावा"
" बरं लावतो. जय हिंद."
त्या ठाण्यात फोन लावयचा मूड होईना. फोनमधूनच फौजदार आणि मंडळी फोडत असलेल्या फटाक्यांचे आवाज ऐकू यायचे! दिवाली है ना!
चला म्हटले बाहेर थोडे बाहेर फिरून येऊ. च्यायला नसत्या उचापती करून डोकं फिरलंय.
बाहेर फिरायला गेलो तर नाक्यावरच फटाक्यांचे स्टॉल्स लागलेले~! गर्दी ! यॅंव!! आयडीया!
तिथं जाऊन सगळ्यात मोठ्ठ्या सुतळी बॉम्बचे बॉक्स घेतले. सहा. पॅण्टीला सहाच खिसे होते. सहा खिश्यात बॉम्बचे सहा बॉक्स! च्यायला मानवी बॉम्बच झालो ना मी. पट्कन घर गाठलेलं बरं. एक ठिणगी पडायची खिशात आणि अंगाच्या चिंध्या !
सहज फिरून आलोय अशा प्रकारे घरी आलो आणि पटकन रूमच दार बंद करून सगळे खिसे फरशीवर रिकामे केले. पाच-पाच बॉम्बच्या वाती एकत्र जोडल्या आणि अ‍ॅटम बॉम्बचीच लड तयार केली. मादर**द!! दिवाली है क्या! मै भी मनाता अब दिवाली. शेजार्‍यांचा दारूगोळा संपला होता वाटतं. समोर कुणी नव्हतं.  
घरासमोरच्या रस्त्याच्या अगदी मधोमध तो पाच सुतळी बॉम्बचा गड्डा नेऊन ठेवला. आणि काय इकडं-तिकडं पाहून पेटवला.
भड्डाम्म्म्म!!!!
आसपासच्या घरांच्या काचा खाली. लोक बाहेर. आरडा-ओरडा. 
"क्या लगाया था?? क्या था??"
"लांब जाऊन वाजवा ना राव! काचा फुटल्या ना! म्हतारी उडाली ना आमची जाग्यावरल्या जाग्यावर "
"तेच सांगत होतो साहेब मगाच पासून.. पण कुणी ऐकायलाच तयार नाही.. बुरा ना मानो दिवाली है!"


सर्व ब्लॉग वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!