३० जून, २०१०

प्राचार्य


काल प्राचार्य गेले. आयुष्यभर आपल्या मृदुल वाणीच्या सामर्थ्यानं मराठी भाषेत व्याख्यान करून अनेकांची आयुष्ये संस्कारित करणार्‍या प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्याबद्दल लिहीत असताना ऊर भरून येत आहे. आपण सर्वजण शब्दांचे सत्व हरवून बसलेल्या काळातून जात आहोत, कधी-कधी तर शब्दांना काही अर्थच आहे की नाही असा विचार मनात येतो. पण ज्याला शब्दशक्ती प्रसन्न होती आणि ज्यांच्या मुखातून निघालेल्या शब्दांना रत्नांचे तेज असे अशा या विभूतीने आपल्या मागे खूप मोठा वारसा ठेवला आहे.

प्राचार्य शिवाजीराव भोसले ज्या काळात घडले, त्यांनी जे-जे उदात्त आणि उत्कट पाहिले ते-ते अवघ्या महाराष्ट्रानेही पाहावे, अभ्यासावे आणि जीवन संपन्न करून घ्यावे यासाठी प्राचार्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात व्याख्याने केली. प्राचार्यांनी छत्रपती शिवराय, समर्थ रामदास, संत तुकाराम, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, आचार्य रजनीश अशा अनेक व्यक्तींच्या जीवन-चरित्रावर बोलणे केले. हे बोलणे करीत असताना कुठेही कुणाच्या विचारांतील परस्पर विसंगतीमुळे प्राचार्यांना कधीच त्या व्यक्तीबद्दल बोलताना अडचण येत नसे - कारण प्राचार्यांची भूमिका ही नेहमीच अभ्यासकाची असे.

ज्यांना छत्रपतींचा अभिमान आहे त्यांना रामदास रूचतीलच असे नाही आणि ज्यांना सावरकर आवडतात त्यांना गांधी कळतीलच असे नाही. पण आपला अभिनिवेश थोडा बाजूला ठेवून आपण हवे ते अभ्यासू शकतो हे प्राचार्यांनी शिकवले. प्राचार्य हे फलटणच्या मुधोजी महाविद्यालयात तत्वज्ञान आणि तर्कशास्त्रासारखा विषय शिकवत असले, तरी त्यांच्या व्याख्यानात तर्क-कर्कश्शपणा औषधालाही सापडत नसे. कारण त्यांना एकच एक विचार श्रोत्यांच्या मनात ठसवायचा नसे, तर हे जीवन समृध्द आहे, ते जगण्यासारखे आहे, वाटा अनेक आहेत फक्त आपले कुतूहल जागे असायला हवे हा विचार ते श्रोत्यांना देऊ इच्छित. अगदी आपण नेहमी बोलतो त्या भाषेत, शब्दा-शब्दांचे नवनवीन पैलू आपल्या शुध्द उच्चारांतून उलगडून दाखवत, मध्येच श्रोत्यांना नर्मविनोदी चिमटे काढत सुखद लयीत प्राचार्य व्याख्यान रंगवित.
व्याख्यानात पूर्वपक्ष-उत्तरपक्ष, खंडन-मंडन असला निरर्थक बाष्कळपणा त्यांना करावा लागला नाही आणि व्याख्यानासाठी अमुक हाच विषय हवा असाही त्यांचा आग्रह नसे कारण त्यांचे वाचन समृध्द होते. हवा तो मुद्दा, हव्या त्या ठिकाणी आपोआप बाहेर पडतो - फक्त निर्हेतूकपणे वाचन वाढवा असे त्यांचे सांगणे असे.
प्राचार्यांनी त्यांच्या विद्यार्थीदशेत गांधी, जे. कृष्णमूर्ती, स्वातंत्र्यवीर सावरकर, जयप्रकाश नारायण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन या सर्व लोकांना जवळून पाहिले होते. त्यांच्यातील अद्भुताची चव चाखली होती, या सर्वांची व्याख्याने निष्काम भक्तीने ऐकली होती. हा सर्व समृद्ध वारसा महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्यांपर्यत गेला पाहिजे या विचाराने ते बोलत आणि त्यांची व्याख्याने ऐकताना हा भारलेपणा श्रोत्यांनादेखील स्पर्शून जात असे. सकाळमधून त्यांनी लिहीलेल्या जागर या सदराच्या जाहीर वाचनाचे कार्यक्रम अनेक ठिकाणी वाचकांनी उस्फूर्तपणे केले, कारण त्यात संस्कार होता.
बीड शहरात श्री. सुरेश नवले यांनी आई महोत्सवात ओळीने त्यांची सात-आठ व्याख्याने आयोजीत केली होती. डॉ. आंबेडकर, म. फुले, म. गांधी, छ्त्रपती शिवाजी, संत तुकाराम यांच्यावरील ती व्याख्याने आज महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा ठरली आहेत.
मला त्यांची तीन-चार व्याख्याने ऐकण्याचा आनंद घेता आला, आणि त्यांच्याशी मनसोक्त संवादही साधता आला. औरंगाबादमध्ये संदीप राजेभोसले यांच्याकडे राहायला होतो. प्राचार्यांच्या व्याख्यानाची जाहिरात पेपरमध्ये आली होती. थोडेसे काम आहे असे सरांना सांगून मी प्राचार्यांच्या व्याख्यानाला गेलो. का कोण जाणे या माणसाच्या पायांना स्पर्श केलाच पाहिजे असे वाटले. व्याख्यान संपल्यावर मी तो केलाही आणि मिळालेल्या पाच-दहा मिनीटांत त्यांची मायादेखील अनुभवली. रविवार सकाळ मधून त्यांनी "देशोदेशीचे दार्शनिक" या सदरातून विविध दार्शनिकांवर लेखन केले होते; पण त्यात रजनीशांचा समावेश नव्हता. मी त्या काळी रजनीशवेडा होतो. त्याबद्दल
मी त्यांच्याशी बोलत होतो.
"महाराष्ट्राला अजून तुकारामच कळला नाही, रजनीश कळायला अजुन खूप उशीर आहे, मी रजनीशांना प्रत्यक्ष भेटलो आहे, नंतर त्यांच्यावर बोललोही आहे..." असे त्यांनी सांगितले.
आता त्यांचे रजनीशांवरील व्याख्यान शोधायचेच असा विचार घेऊन मी ऑफिसला परतलो, तर आमचे बॉस इकडे आमच्यावर फायरींगच्या मूडमध्ये आले होते.
"काम आहे असे सांगून जातोस आणि मुलींच्या मागे फिरतोस?" खरं सांग..कुठे गेला होतास?
मी त्यांच्याकडे नवीनच कामाला लागलो होतो, त्यांच्याकडेच राहायलाही होतो. या अनपेक्षीत हल्ल्याने
कावरा-बावरा झालो, रडू येऊ लागले. शेवटी त्यांनी जोक संपवला आणि सांगितले,
"मी पाहिले तुला प्राचार्यांच्या पाया पडताना, जा आत, तुझ्यासाठी दोन हजार रूपयांची पुस्तके आणलीत त्यांची...."
हे आमचे सर देखील त्यांचे फॅन होते. शाळेत शिकत असताना बीडपर्यंतच्या तिकीटासाठी स्वत:ची पुस्तके विकून त्यांनी प्राचार्यांची व्याख्याने ऐकली होती आणि रात्री झोपण्यासाठी बीडच्या बसस्टॅण्डचा आश्रय घेतला होता.
त्यानंतर प्राचार्यांचे भरपूर लिखाण वाचले, भरपूर कॅसेटस ऐकल्या आणि उत्तरोत्तर
प्राचा
र्यांच्या प्रेमात पडत गेलो.
आपण किमान दोन दिवस तरी त्यांना जवळून पाहिले पाहिजे, त्यांच्या गावी गेले पाहिजे असे मला वाटू लागले. पुस्तकावर त्यांचा लॅंडलाईन नंबर होताच. लावला.
प्राचार्यच फोनवर होते. त्यांनी कोण? कुठे भेटला होता? इत्यादी मायेने विचारपूस केली. मी फलटणला येणार आहे असे त्यांना सांगितले.
"अरे, आमच्या भागात एवढं उन पडत आहे, कशाला उगा परेशान व्हायचे प्रवासात? मी औरंगाबादला येतच असतो आणि मला तो भाग पुन्हा एकदा नीट पाहायचा आहे, तेव्हा येणारच आहे पावसाळ्यात तिकडे..तेव्हा आलो की खूप बोलू" असे सांगून माझी समज काढली.
नंतर मीच माझ्या व्यापात अडकलो. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर अ‍ॅंजिओप्लास्टी झाल्याचे वाचले होते.
प्राचार्यांची आठवण झाली की आता मात्र त्यांचे काहीही न ऐकता, त्यांना काहीही न सांगता फलटणला नक्की जायचेच असे नेहमी ठरवीत असे.

आता मात्र मी कधीच फलटणला जाऊ शकणार नाही.

छायाचित्रे - चैतन्य रूद्रभाटे, फलटण

समर्थ रामदासांवारील प्राचार्यांचे व्याख्यान इथे ऐकता येईल.