३ जानेवारी, २०११

बाबूकाका

डोक्याच्या घेरावर बारीक होत गेलेला पोलीसकट, पांढरे होत चाललेले केस, तरूणपणीच्या शम्मी कपूरसारखाच चेहेरा आणि अंगयष्टीही तशीच, अंगात सफारी किंवा तसलाच साहेबी वाटणारा पोषाख, हातात एक लहानशा आकाराची ब्रीफकेस असे काहीसे वर्णन करता येईल असा माणूस एसटीतून उतरण्याची वाट पाहात खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट घातलेला एक पोरगा बसस्टॅण्डवर कितीतरी वेळापासून थांबलेला असे. ते त्याचे बाबूकाका होते. बाबूकाका त्याचे आजोबा लागत असले तरी घरातील इतर सर्वजण त्यांना बाबूकाकाच म्हणत असल्याने त्याच्यासाठीही ते बाबूकाकाच होते. घरातील कुणीतरी बाबूकाका आज/उद्या येणार असं बोलत असताना ऐकलं की तो शाळा सुटताच बाबूकाका यायची वाट पाहात स्टॅण्डवरच थांबून राही. कधीकधी बाबूकाकासोबत रमाकाकू सुध्दा यायच्या. अशावेळी मात्र त्यांचा गडी चांदपाशासुध्दा गाडीबैल बसस्टॅंडजवळच्या एखाद्या झाडाखाली सोडून तिथेच बीडी फुंकत बसलेला दिसे. एस्ट्यावर एस्ट्या थांबत आणि त्यातून बाबूकाका-रमाकाकू बाहेर न पडताच निघुन जात. मग साडेसहा पावणेसात वाजता चांदपाशानं गाडी जुपून गावाकडे वळवली की तो पोरगा मागून चालत्या बैलगाडीत उडी मारून गाडीत चढे आणि चांदपाशाजवळ जाऊन बसे.
"य्या:!! ...हूं॒:!!! ... सांगायचं नाही व्हयं गाडी थांबव म्हनून? पल्डं, र्‍हायलं म्हंजी? नसलेली बला.."
बैलगाडीचा कासरा सांभाळताना खरोखर आलेला राग त्या हूं:!!! मधून दाखवत त्या पोराकडं पाहून चांदपाशा म्हणे.
"काही पडत नाही मी चांदपाशामामू.. ते जाऊ द्या.. बाबूकाका कधी येतो म्हणले होते?"
"बाबूशेट आज पंधरादी जालन्याला गेले व्हते तव्हा ह्या सुक्कीरवारी यतो म्हनून निरोप देल्ता... आजूक पत्ता नाई... येतेन उद्या.. सनवार आन रैवारी सुट्टीबी अस्ती.."
"हो!!!! उद्या बाबूकाका येणारच मग.. उद्या शनीवार.."
मग तो पोरगा शनीवारी दुपारी चार वाजता पुन्हा एकदा स्टॅण्डवर जाऊन बसे. बाबूकाका आणि रमाकाकूची खूप वेळ वाट पाहून कंटाळून जाई. आणि अचानक कुठल्यातरी एसटीतून बाबूकाका आणि डोक्यावर पदर घेतलेल्या रमाकाकू उतरताना दिसत. चेहेर्‍यावर खूप मोठं हसू घेऊन तो एस्टीतून उतरलेल्या बाबूकाकाच्या दिशेनं पळे.
"ह्हे:!!!!! पप्पुशेठ.. गाडीलेट.. गाडीचा नंबर एटीएट!!! ..." बाबूकाका त्या पोराकडं पाहून ओरडत.
"तुमी तर कालच येणार होता... चांदपाशा न मी वाट पाहून घरी वापस गेलो काल..."
"येणार होतो रे.. पण सुट्टीच मिळाली नाही.."
तेवढ्यात गावात कोतवालकी करणारा देवर्‍या कुणीही न सांगता पुढे येऊन काकांची ब्रीफकेस हातात घेई आणि रूमालाची चुंबळ डोक्यावर ठेऊन काकूची मोठी सूटकेस डोक्यावर घेऊन घराकडे चालू लागे.
मग बाबूकाकाच्या हातात हात घातलेला तो पोरगा, रमाकाकू असे सगळेजण पायीपायीच घराकडे चालू लागत. बाबूकाकासोबत हातात हात घालून चालताना त्या पाचवी सहावीतल्या पोराला खूप मजा वाटे. रस्त्यात भेटणारे, धोतर, टोपी घातलेले लोक मध्येच थांबून बाबूकाकाला रामराम! असं म्हणून रामराम घालत. बाबूकाकापण रामराम! रामराम! म्हणून प्रतिसाद देत. असं होता होता मारवाड्याचं दुकानं येई आणि तिथं बाबूकाका मुद्दाम थांबून दुकानात गिर्‍हाईकांच्या मालाची पट्टी करीत उभ्या असलेल्या बाबूशेठला "जयगोपाल शेटजी!!" म्हणत. ते ऐकताच आडदांड आकाराचे बाबूशेठ चष्यातून वर पाहात बोलत -
"अरे! तुम्ही आलात? चांदपाशा आला नाही का गाडीबैल घेऊन?.. आज कापूस वेचायला बाया लावल्यात.. तिकडं गेला असल.."
"हो, तुम्हाला बोललो होतो शुक्रवारी येईल म्हणून.. पण रजाच मिळाली नाही.. आज शेवटी निघालोच.. येतो रात्री निवांत.." असं म्हणून बाबूकाका पुढे चालू लागत.
घराकजवळ येताच त्या पोराची आजी हातात पाण्यानं भरलेला तांब्या आणि भाकरीचा तुकडा घेऊन थांबलेली दिसे. शेजारच्या ओट्यावरच सामान वाहून थकल्याने हाश्श..हुश्श करत देवर्‍या बसलेला.
"देवर्‍यानं सामान आणून टेकवलं कीच मी म्हणले, माय‌‍ऽऽ बाबू राव आले जणू... रमा, किती खराब झालात गं.." असं म्हणीत आजी बाबूकाका आणि रमाकाकूवरून भाकरीचा तुकडा ओवाळून फेकी आणि चूळ भरायला पाण्यानं भरलेला तांब्या हातात देई.
बाबूकाका मोठ्या दारातच चूळ भरून पायावर पाणी घेत आणि लगेच वाट पाहात उभ्या राहिलेल्या देवर्‍याच्या हातावर तिथल्या तिथेच दहा रूपयाची कडक नोट ठेवत. डोक्याला हात लावत देवर्‍या पुन्हा बसस्टॅण्डकडे चालू लागे. पटकन मग तो लहानसा पोरगा त्याच्या शाळेच्य वह्या बाहेर काढी आणि बाबूकाकाला दाखवायला निघे -
"काका, हे बघा, मला आता इंग्लिश वाचता येतंय...."
"हो? पाचवीलाच इंग्लीश? दाखव.." म्हणून काका त्या पोराची वही हातात घेत. तो पोरगा वही काकांच्या हातात देऊन इंग्रजीचं पुस्तक हातात धरून धडा वाचायला सुरूवात करी.. निघोज इज ए वंडरफुल प्लेस सिच्युएटेड ऑन दी बॅंक्स ऑफ रिव्हर घोड.. रिव्हर घोड हॅज क्रिएटेड मेनी पॅथहोल्स इन दी रॉक्स सराऊंडींग इट्स बोथ साईड्स..."
"ए‌ऽऽऽ इथं हे मराठीत लिहीलेलंय..." काका म्हणत..
"हो.. मला दादांनी आधी मराठीत इंग्रजी वाक्यं लिहून वाचायला शिकवलंय.." तो पोरगा त्याची बाजू सांभाळी.
"तुझे दादा काही ती जुनी पध्दत सोडणार नाहीत.. कुठे गेले दादा..?" बाबूकाका विचारत. हे दादा म्हणजे बाबूकाकाचेच सावत्र पण मोठे भाऊ.
"गायवाड्याकडं गेले असतेल.." तो पोरगा बाबूकाकाला सांगत असे.
"पप्प्या, जा बोलावून आण तुझ्या दादाला.. बाबूराव आले म्हणाव.." त्याची आजी त्याला म्हणे.
बाबूकांच्या हातात वाफाळलेल्या चहाची कपबशी देत आजी म्हणे. तो पोरगा गायवाड्याकडं पळे.
त्या पोरासाठी बाबूकाका म्हणजे नेहमीच लांबच्या गावाहून येणारं अत्यंत जवळचं, अत्यंत लाड करणारं आणि आकर्षण वाटणारं माणूस असे. बाबूकाकाबद्दल गावातल्या प्रत्येक माणसाला आदरयुक्त भीती असे, प्रत्येक माणूस कधी ना कधी त्यांना सल्ला विचारायला येत असे. बाबूकाका हे पुणे, जालन्याच्या पोलिसांच्या शाळांमध्ये पोलिसांना कायदे शिकवणारे वकील होते. पाचवीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत जालन्याच्या आर.पी.टी.एस. मध्ये बाबूकाकांकडे राहायला तो मुलगा जेव्हा गेला, तेव्हा गेट भोवती आणि घराभोवती बंदुका हातात घेऊन उभे असलेले पोलिस पाहून त्याला बाबूकाका हे कुणीतरी खूपच मोठे असल्याबद्दल खात्रीच पटली होती.
बाबूकाका म्हणजे कायदेकानू कोळून प्यालेला माणूस. कधीही कुणासमोरही खाली पाहाणार नाही. झालेच तर लोकांवर उपकार करतील, पण फुकट कुणाकडून ग्लासभर पाणीसुद्धा घेणार नाहीत. बेकार हिंडणार्‍या पोरांना काहीतरी किल्ल्या वापरून पोलिस कॉन्स्टेबलची नोकरी द्यायचा अधिकार हातात असला तरी, कायद्यानं आखलेल्या मर्यादेबाहेर जाऊन कधी कुणावर उपकार केला नाही. शिकायचं आहे ना, मग शिका - पैसा लागला तर मी देतो, पण परिक्षा पास होऊनच नोकरीत या - वशिल्याचे फालतू धंदे माझ्याच्यानं होणार नाहीत - हे त्यांच्याकडं नोकरीकरीता येणार्‍या गावातल्या तरूण लोकांना स्वच्छ सांगणं असे. त्यांच्या आश्रयानं राहून अनेक होतकरू पोरं फौजदार, सरकारी वकील या हुद्द्यावर गेली. आणि जी जावू शकली नाहीत, ती "वकील लई खडूस हाये.. साधा कॉन्स्टेबल म्हणूनपण कधी कुणा बेकार पोराला लावणार नाही" म्हणू लागली.
बाबूकाका आणि रमाकाकू येत तेव्हा न चुकता त्या मुलासाठी खार्‍या शेंगदाण्याच्या पुड्या आणत, दिवाळीत हजार रूपयांचे फटाके विकत घेऊन देत, कपडे, पुस्तके आणि तसलाच अनेक प्रकारचा लाड पुरवत. पण या बाबूकाका आणि रमाकाकूंना स्वत:चा मुलगा किंवा मुलगी कुणीही नव्हते. ते स्वत:च्या पुतण्याच्या, भावाच्या मुलांना असे प्रेम लावत. आणि मग त्या खेड्यात "आता बाबू वकील अमुक च्या मुलाला दत्तक घेणार!!" अशी अफवा उठे. बाबूकांकांचा दरारा, चार औतं, पाच-सहा गड्यांचा बारदाना आणि पन्नास-साठ एक्कर जमीन पण त्यांच्या वंशाला नसलेला नसलेला दिवा हाच एक गावातल्या लोकांसाठी चर्चेचा विषय असे.
गावातले लोक मध्येच कधीतरी त्या मुलाला पकडून म्हणत -
"पप्पुशेठ, नीट र्‍हा, शिका.. बाबूमालक तुमाला काई कमी पडू देणार न्हाईत.. सोनं होईल आयुष्याचं.." त्या पाचवी सहावीतल्या पोराला त्यातलं काही कळत नसे.
मग बाबूकाका चहापाणी आटोपून ओट्यावर बसत. तेवढ्यात शेताकडून कापसाच्या भोतांनी लादलेली बैलगाडी घेऊन चांदपाशा येई. आल्याआल्याच "मालक आले जणू!" म्हणून पटकन कापूस चार खणात टाकून बाबूकाका या त्याच्या मालकांसमोर येऊन बसे.
"वाट पाहून चार वाजता गेलो मी गारूडात... कापसाला बाया लावल्यात आज.." असं सांगून बैलगाडी घेऊन बसस्टॅण्डवर हजर नसल्याबद्दल सारवासारव करी.
"देवर्‍या होता बसस्टॅण्डवर.. आम्ही आलो पायीपायी.. बाबूशेठनं आत्ताच दुकानात सांगितलं कापसाचं.. किती होईल यंदा कापूस?" बाबूकाका चांदपाशाला विचारत.
"अं! छातीइतकं हाये एक एक झाड आवंदा.., ईस पंचीस कुंटल उतार होईनच...तूर बी तशीच हाये.. उद्या येढ्याला तुमीच पाहा.." चांदपाशा म्हणे.
मग ओट्यावर बाबूकाका, चांदपाशा आणि रानातून आलेल्या गड्यांच्या गप्पा होत त्यावेळी वाड्यासमोरच्या आवारात रातकिडे चमकू लागलेले असत आणि बेडकांची डरांवऽऽ डरावं‍ऽऽ सुरू झालेली असे. गड्यांसोबत बाबूकाकांचा पुन्हा एकदा चहा होई.
"जा आता घरी, भाकरी खाऊन घ्या..." शेवटी बाबूकाका गड्यांना सांगत आणि जेवणखाण आटोपून बाबूशेठ्च्या दुकानाकडं निघत. तिथे त्यांच्या दोस्तांचा जमाव रात्रीच्या रमीच्या डावाची जमवाजमव करीत बाबूकाकांची वाट पाहात असे.
सकाळी "बाबू काल रात्री अडीच वाजता आला घरी" असं दादा म्हणत असताना ऐकू येई आणि तो पोरगा जागा होई.
मग चार सहा दिवस असेच बाबूकाकासोबत, रमाकाकूसोबत गप्पा करताना, त्यांचं बोलणं ऐकताना कसे वार्‍यासारखे भुर्रर्र उडून जात.
"वन्सं, माझा सपीटाचा उंडा किती काळा पडलाय हो... पप्पुशा अभ्यास करतोस की नाही नीट?" रमाकाकू आजीला बोलत असताना त्या पोराला जवळ घेत.
"गंगंच्या काठंचं वारं रमा इथं, इथं कुठं तुमच्या जालन्यासारखं मशीनीतून येणारं वारं? घेऊन जा त्याला जालन्याला... महिन्यात सपीटासारखा दिसल" आजी रमाकाकूला म्हणे.
मग गुरूवार येई आणि गुंजाला निघायची तयारी होई. तो मुलगा आणि त्याची बहीण नमी सगळ्यात अगोदर तयार होऊन गाडीत चढत.
.
.
.
.
.
.
.
असेच दिवस, वर्षे उलटत गेली. तो मुलगा कळता होऊ लागला. चुकत माकत शिकला, चार अक्षरं गिरवू लागला. पाखरांच्या पिलांना पंख आले की ती जास्त काळ घरट्यात थांबत नाहीत. तो ही कुठंतरी दूर उडून गेला. या काळात बाबूकाका रिटायर झाले. गावाकडे राहायला आले. आता इतकी वर्षं शहरात राहिलो, आता गावातच राहून स्वत: शेती पाहाणार म्हणाले - काही वर्षे गुंजाच्या वार्‍या करीत स्वत: शेती पाहिलीसुध्दा. एवढा सरकारी वकील माणूस पण खेड्यागावात राहून शेती पाहातोय, गावची मोडकळीला आलेली मंदीरं पुन्हा उभारतोय हे पाहून गावातल्या लोकांना बाबूकाकांचं आणखीनच अप्रूप वाटू लागलं.
तशी बाबूकाकाची प्रकृती पहिल्यापासूनच तोळामासा. थोडं काही झालं की बाबूकाकांची तब्येत खालावत असे. गावचं राहाणं, लोकांकडून होणार्‍या दत्तकाबद्दल होणार्‍या खुदर्‍याबुदर्‍या यांत बाबूकाकांनी त्याबद्दल काहीच ठरवलं नाही. स्वत:च्या दुसर्‍या सख्ख्या भावाची मुलं, मुलीही आता कळते सवरते झाले होते. बाबूकाकांनी त्यांना शिकवलं, डॉक्टर, प्राध्यापक केलं. जालन्यात असताना भावाची मुलगी स्वत:कडे शिकायला ठेऊन घेतली - तिला पोटच्या पोरीसारखाच जीव लावला. तिचं लग्न लाऊन दिलं - आणि तेव्हापासूनच त्यांची तोळामासा प्रकृती दर सहा महिन्यांना आणखी ढासळू लागली. अन्न समोर आलं की उलट्या होऊ लागल्या.
असाच आजार सरकारी वकीलाची नोकरी लागलेली असताना त्यांना झाला होता असं दादा कित्येक वेळा बोलताना त्या पोराला आठवे. पण तो काळ जुना होता. तेव्हा गुंजाचे महाराज हयात होते. ते महाराज दत्तकृपा असलेले नैष्ठीक ब्रम्हचारी होते. बाबूकाका त्यांच्या संस्थानातले मानकरी होते. रमाकाकूंनी महाराजांसमोर पदर पसरून भीक मागितल्यानंतर त्यांनी बाबूकाकांना जगवलं होतं. कुणाच्याही घरचं अन्न खाऊ नका, कुणाचा पैसा खाऊ नका, नेकीनं सरकारची चाकरी करा अशा अटी घालून त्यांनी बाबूकाकांना जीवनदान दिल्याचं खुद्द बाबूकाकाच मानत होते. महाराजांनी सांगितलेले नियम आणि गुरूवारची दत्तमहाराजांची वारी व रोजची पंचपदी, पाठ चुकवत नव्हते.
पण आता काळ बदलला होता. वय वाढल्यानंतर पुन्हा प्रकृतीच्या त्याच तक्रारी बाबूकाकाला सतावू लागल्या. आता गुंजाचे महाराजही नव्हते. डॉक्टर झाले, वैद्य झाले, महिना महिना हॉस्पीटलमध्ये राहून झालं. चार आठ महिने बाबूकाकांना बरं वाटे आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन.
तो पोरगा बाबूकाकांना म्हणे -
"काका, तुम्ही कशाला त्या गावात राहून शेती पाहाण्याच्या फालतू भानगडीत पडता.. चांगला बंगला घ्या, कार घ्या.. शहरात राहा.. काय पडलंय त्या शेतीत आणि हवीय कशाला आता ती शेती? सरळ विकून टाका.. आजारी पडलात तर कार करून शहरापर्यंत यावं लागतं... तुम्ही नकाच राहू तिथं.." बाबूकाका हो! हो! म्हणत पण ऐकत नसत.
शेवटी महिनाभर बाबूकाकांनी अन्न सोडलं. सगळे डॉक्टर, वैद्य झाले. जुन्या महाराजांच्या जागेवर आलेल्या महाराजांनी दिलेला अंगारा, तीर्थ वगैरे झाले.. पण बाबूकाकांची अन्नावर वासना होईना. डॉक्टरांनी आठ दिवस ठेऊन घेतले आणि एके दिवशी प्रकृतीत फरक पडल्यावर काहीही शारीरिक आजार नाही, अन्न खायला लागा म्हणून डिस्चार्ज दिला. सख्ख्या भावाचा पुतण्या, सावत्र भावाचा पुतण्या, बायको त्यांचा तो पोरगा दिवसरात्र हॉस्पिटलमध्ये राहिले. डिस्चार्ज मिळून गावाकडे गेल्यावर, शेवटी बाबूकाकांनी नेहमीच्या शिरस्त्यानुसार गुंजाच्या वारीला न्यायचा हट्ट धरला. अन्न जात नव्हतंच. तिथं गेले, रात्रीचे बारा वाजेपर्यंत गुरूवारची पंचपदी झाली, सकाळी काकड आरती झाली..
बाबूकाका सोबत असलेल्या, डॉक्टर पुतण्याला म्हणाले -
"अरे, दत्त महाराजांचं तीर्थ आणि अंगारा दे..."
ते झालं. सकाळी साडेसहाला बाबूकाकांचा श्वास थांबला आणि अन्नावाचून जर्जर झालेला देह शिल्लक राहिला. प्रतिगाणगापूर मानल्या जात असलेल्या गुंज गावात बाबूकांकांनी देह ठेवला.
बाबूकाका गेले आणि त्या पोराला हे सगळं आठवलं...
गावी जाणार्‍या रेल्वेमध्ये हे पोरंगं का रडतंय ते अनोळखी प्रवाशांना कळत नव्हतं