१५ एप्रिल, २०१२

विस्टिरिया लॉज - होम्सकथा


डॉयलसाहेबाची ही मी अनुवादित करायला घेतलेली आणखी एक  होम्सकथा. मजा आली करताना, पण  खूपच मोठी आहे. हे मस्त वाटत असेल तरच पुढे क्रमशः

माझ्या टिपणवहीत असं नोंदवलेलं दिसतंय की, १८९२ चा मार्च संपतानाचा तो एक ढगाळ आणि भुतासारखे वारे सुटलेला दिवस होता. आम्ही दुपारी जेवायला बसलो असतानाच होम्सला तार आली होती. आणि तेव्हाच त्या तारेला त्याने उत्तरही खरडले होते. त्याने तारेबद्दल काही उल्लेख केला नाही; पण तारेची बाब त्याच्या मनात घोळताना दिसत होती कारण नंतर तो त्या तारेवर मध्येमध्ये नजर टाकत चिंतीत चेहेर्‍याने पाईपचे झुरक्यावर झुरके मारु लागला. त्याच्या डोळ्यात एक खोडकर झाक उमटली आणि अचानक तो माझ्या रोखाने वळला -
'' वॉटसन, मला वाटतं तु शब्द, साहित्य वगैरे लफड्यांत रस असलेला माणूस आहेस. विलक्षण या शब्दातून काय चित्र उभं रहातं बरं?
'' अनाकलनीय - उल्लेखनीय" मी म्हणालो.
माझे ते शब्द ऐकून त्याने नुसतीच मान डोलवली.
"विलक्षण या शब्दामध्ये अनाकलनीय, उल्लेखनीय पेक्षाही बरंच आही आहे " होम्स बोलू लागला.
" त्यामधून काहीतरी दुर्दैवी आणि भयानक गोष्टी ध्वनित होतात. आधीच बेजार असलेल्या जनतेला तु तुझ्याकडच्या कथानकांनी भंडावतोस त्या कथानकांकडे थोडे लक्ष देऊन पाहिलेस तर तुला दिसेल की गुन्हेगारीमध्ये विलक्षणपणा किती खोलवर रुजलाय. रेड हेडेड लिग मधल्या गुन्हेगारांचच घे. प्रकरण सुरुवातीपासूनच विलक्षण वाटले, पण तरी अखेरीस तो एक जीव तोडून घातलेल्या दरोड्याचा प्रयत्न निघाला. विलक्षण हा शब्द वाचला की माझे कान टवकारले जातात.
''पण तारेत असं काही म्हटलंय का?" मी विचारलं.



त्याने ती तार मोठ्याने वाचायला सुरु केली.
"आत्ताच एका विलक्षण आणि अनाकलनीय अनुभवातून बाहेर पडलो आहे.
मला तुमचा सल्ला मिळू शकेल काय? "
- स्कॉट एक्लस, चेरिंग क्रॉस डाकखाना
 '' स्कॉट एक्लस बाई आहे की पुरुष?" मी म्हणालो.
" नक्कीच पुरुष! माझं उत्तर मिळण्यासाठी अगोदरच पैसे भरून कोणत्या बाईनं तार पाठवली असती? बाई असती तर ती आधी इथे येऊन धडकली असती. "
" तु भेटणार आहेस? "
'' म्हणजे काय! कर्नल कॅरॅथरला आपण आत टाकल्यानंतर पासून  किती कंटाळलोय मी. माझं मन रेसिंग इंजिनसारखं स्वतःच्याच चिंधड्या उडवत आहे कारण ते जे ओझं वाहून नेण्यासाठी बनलं आहे, तेच त्यावर पडलेलं नाही. जीवन रंगहीन, संथ झालंय, पेपरांमध्ये तर काहीच घडताना दिसत नाही, गुन्हेगारी जगातली हिंमत आणि त्या जगाचा कैफ तर जसा गुन्हेगारीतुन कायमचा निघून गेला आहे. मग असं असताना, येणारी केस कितीही जटील असली तरी ती पहायला मी तयार आहे का हे तु विचारू सुद्धा नयेस. मी चुकत नसेन तर तेच महाशय बाहेर घंटी वाजवत आहेत."
पायर्‍यांवर जपून पावलं टाकली जात असतानाचा आवाज आला आणि क्षणार्धात एक भरभक्कम, उंचपुरा आणि केस करडे झालेला, दिसता क्षणीच आदरास पात्र माणूस खोलीत प्रवेशकर्ता झाला. त्याच्या जीवनाची कर्मकहाणी त्याचा मख्ख चेहेरा आणि नाटकी हावभावांतून दिसून येत होती. त्याचा सोनेरी चष्मा हातात धरण्याच्या शैलीतून तो एक कन्झर्व्हेटीव्ह, चर्चगामी, उत्तम नागरिक दिसत होता - जुनेपणा आणि परंपरा त्याच्या नसानसातून उसळत होत्या.
पण त्याच्या या मूळच्या रुपावर काहीतरी अचाट घडून गेल्याची छाया दिसत पसरली होती आणि तिच्या खुणा त्या माणसाचे अस्ताव्यस्त केस, त्याचे संतापाने लाल झालेले गाल आणि त्याच्या भूत लागल्या सारख्या हावभावातून दिसत होत्या. त्यानं आत आल्याआल्या थेट विषयावर उडी घेतली.
"श्रीयुत होम्स, अत्यंत विलक्षण आणि तापदायक गोष्ट घडलीय माझ्यासोबत" तो म्हणाला -
"पूर्ण आयुष्यात मी पूर्वी कधी असल्या तिढ्यात सापडलो नव्हतो. हे पूर्ण चुक, भयानक आहे हे!. म्हणजे मी तुम्हाला हे सगळं उकलूनच सांगायला हवं " रागाने तो पुटपुटला.
"प्रथम बसून घ्या, श्रीयुत स्कॉट एक्लस" होम्स सहानुभूतीपूर्ण आवाजात म्हणाला
"मला आपण प्रथम सांगा, आपण माझ्याकडेच का बरे आलात? " होम्स म्हणाला.
"यात पोलिसांची काहीच भूमिका दिसत नाही असं हे प्रकरण आहे. आणि तरीही मी जे सांगेन ते ऐकल्यानंतर आपण निश्चित सहमत व्हाल की मी ही गोष्ट अशीच वार्‍यावर सोडून द्यायला नको. खासगी गुप्तहेर जमातीबद्दल माझ्या मनात कसलीच सहानुभूती नाही, पण त्यातल्या त्यात तुमचं नाव ऐकल्यानंतर मात्र -  "
"असं आहे तर! पण दुसरी गोष्ट, एकदा येतो असा निरोप देणारी तार पाठवल्यानंतरही आपण तेवढ्याच तेडफेनं इथे येऊनच का गेला नाहीत?"
" तुम्हाला म्हणायचंय तरी काय?"
होम्सने त्यांच्या घड्याळाकडे नजर टाकली.
"आता अडीच वाजत आहेत " तो म्हणाला "आपली तार सुमारे एकच्या दरम्यान पावली. पण आज सकाळी आपण प्रथम डोळे उघडलेत तेव्हापासूनच तुमचं चित्त थार्‍यावर नाही हे तुमचा एकंदरीत अवतार पहाणार्‍याच्या आधी लक्षात येईल आणि बाकी अस्ताव्यस्तपणा नंतर लक्षात येईल."
हे ऐकून आमच्या अशील महोदयांनी त्यांचे विस्कटलेले केस हाताने चोपून बसवायला सुरुवात केली आणि दाढीच्या खुंटांकडेही त्यांचा हात गेला.
"तुमचं अगदी खरं आहे श्रीयुत होम्स, मी बिलकुल काहीही न आवरता बाहेर पडलो. असल्या भयंकर घरातून मी बाहेर पडलो याच आनंदात मी होतो. पण आपल्याकडे येण्यापूर्वी मी चौकशा करीत वणवण हिंडत होतो. तुम्हाला माहितीय मी आधी बंगल्याच्या इस्टेट एजंटकडे गेलो, पण तो म्हणाला बंगल्याचे ताबेदार श्रीयुत गार्सियांकडे कसलीही बाकी नाही आणि विस्टिरिया लॉज या बंगल्याबाबत सर्वकाही आलबेल आहे."
"थांबा महाशय, थांबा " होम्सने हसून म्हटले.
"तुम्ही थोडेसे माझा मित्र वॉटसन सारखेच आहात, त्यालाही तुमच्यासारखीच स्वतःच्या कथा शेवटापासून सुरुवातीकडे सांगत सुटण्याची वाईट खोड आहे. कृपया अगोदर तुमच्या मनात नीट विचार करा, आणि योग्य त्याच क्रमाने घटना माझ्यासमोर मांडा, जेणेकरुन आपण नेमक्या कोणत्या घटनाक्रमामुळे अगदी अंथरूणात होता तसेच, कपड्याच्या गुंड्याही नीट न लावता सल्ला आणि मदत मागायला बाहेर पडला आहात हे मला कळू शकेल. " बारीकसं हसून होम्सने म्हटले
आमच्या अशीलाने खजिल होऊन स्वतःच्याच गबाळ्या पोषाखाकडे नजर झुकवली.
"मी किती वेडपटासारखा दिसत असेन याची मला कल्पना आहे श्रीयुत होम्स, माझ्या आयुष्यात पूर्वी कधी असली विलक्षण घटना घडल्याचं मला आठवत नाही. पण मला आधी या विलक्षण घटनेबद्दल आधीच सांगू द्या, म्हणजे तुम्ही स्वतःच म्हणाल की मी अशा स्थितीत बाहेर पडलो यात काहीच आश्चर्य नाही. "  
पण आमच्या अशीलाचे हे कथन मध्येच अडखळले. बाहेर कुणीतरी टकटक करीत असल्याचा आवाज आला आणि श्रीमती हडसन यांनी अधिकार्‍यांसारख्या भारदस्त दिसणार्‍या दोघांना दरवाजा उघडून आत आणून सोडले. यापैकी पहिला होता स्कॉटलंड यार्डचा  एक चपळ, पराक्रमी आणि त्याच्या अधिकारा बसू शकत असेल तेवढा सामर्थसंपन्न इन्स्पेक्टर ग्रेगसन. त्याने होम्ससोबत हस्तांदोलन केले आणि त्याच्यासोबत आलेल्या अधिकार्‍याची  'इन्स्पेक्टर बेयन्स, सरे पोलिस ठाणे' अशी ओळख करुन दिली.
"आम्ही एकत्र शिकार शोधतोय श्रीयुत होम्स, आणि आमचा माग या दिशेने आहे " त्याने त्याचे बटबटीत डोळे आमच्या अशीलावर रोखले.
"पॉफॅम हाऊस ली मध्ये रहाणारे श्री जॉन स्कॉट एक्लस तुम्हीच काय?"
"हो मीच"
"भल्या सकाळपासून आम्ही तुमच्या मागावर आहोत"
"नि:संशय तुम्ही तारेच्या सुगाव्यावरुन इथवर येऊन पोचलात " होम्स म्हणाला
"अगदी अचूक श्रीयुत होम्स, आम्ही चेरींग क्रॉस पोस्ट ऑफिसमध्ये नाक शिंकरले आणि इथवर वास काढत पोचलो. "
"पण तुम्ही माझ्या मागावर का आहात? काय हवंय तुम्हाला?"
"आम्हाला काल रात्री झालेल्या इशर मधील रहिवासी अल्योसियस गार्सिया यांच्या मृत्यूच्या घटनाक्रमाबद्दल तुमचा जवाब हवाय."
आमचा अशील डोळे फाडफाडून पहात राहिला आणि त्याच्या चेहेर्‍यावर उमटू शकेल ती ती छटा उमटली.
"गार्सियाचा मृत्यू? तो मेला असं तुम्हाला म्हणायचं आहे का? "
"होय श्रीयुत एक्लस , गार्सिया आता जीवंत नाही."
"पण कसं काय? अपघात वगैरे? "
"अपघात नव्हे, खून! "
"हाहाहा, म्हणजे कमाल आहे ! म्हणज मी यामध्ये आरोपी आहे - माझ्यावर त्याच्या खुनाचा संशय आहे, असं तर तुम्हाला म्हणायचं नाही ना?"
"मयताच्या खिशात तुमचे एक पत्र आढळले आणि त्यावरुन आम्हाला कळले  की कालची रात्र तुम्ही त्यांच्या घरी रहाणार होता "
 "काल रात्री मी तिथेच होतो"
"होता ना? नक्की होता ना? "
लगेच एक कार्यालयीन चोपडी बाहेर आली.
"एक मिनिट ग्रेगसन, " शेरलॉक होम्स म्हणाला
"तुम्हाला फक्त त्यांचा एक साधा जवाबच हवा असेल, नाही का?"
"आणि श्रीयुत स्कॉट एक्लस यांना सावध करणे माझे कर्तव्यच आहे की, हा साधा जवाब त्यांच्या विरूध्द वापरला जाऊ शकतो"
"तुम्ही इथे आलात तेव्हा श्री एक्लस नेमके त्याबद्दलच आम्हाला सांगत होते. वॉटसन, मला वाटते थोडीशी ब्रॅण्डी आणि सोडा घेतल्याने श्रीयुत एक्लसना थोडा आधार मिळेल; आणि हो, तुमच्या श्रोत्यांमध्ये पडलेल्या या नव्या भरीकडे बिलकुल लक्ष न देता तुमचे कथन मध्ये खंडीत झालेच नाही असे समजून पुढे सांगायला सुरु करा."
"मी अविवाहित आहे " ते म्हणाले, "आणि मी लोकांशी मिळून मिसळून वागत असल्याने मला मित्रमंडळींची ददात नाही. या मित्रमंडळामध्ये आहेत केन्सिंग्टनच्या अल्बरमार्लमध्ये रहाणारे निवृत्त ब्रूअर मेलव्हिले. मागे काही आठवड्यांपूर्वीच त्यांच्यासोबत टेबलवर बसलो असताना या गार्सिया नावाच्या तरूणाशी माझी ओळख झाली. मला कळले की तो स्पॅनिश आहे आणि त्याचे दूतावासाशी कुठूनतरी लागेबांधे आहेत. तो बिनचूक इंग्रजी बोलायचा, अदबशीर होताच आणि दिसायला म्हणाल तर त्याच्याएवढा राजबिंडा माणूस मी कधीच पाहिला नाही."
"मी आणि हा तरूण, कुठल्यातरी योगायोगाने एकमेकांचे मित्र बनलो. सुरुवातीपासूनच कशामुळेतरी तो माझ्यामध्ये उत्सुक आहे हे जाणवत होतेच आणि आम्ही भेटल्यापासून दोनच दिवसांच्या आत तो मला भेटायला मी रहातो त्या ली नामक ठिकाणी आला. एकातून दुसरी गोष्ट निघत गेली आणि सरतेशेवटी त्याने मला इशर आणि ऑक्झशॉटच्या दरम्यान असलेल्या विस्टिरिया लॉजमध्ये काही दिवस रहाण्याचे आमंत्रण दिले. त्या आमंत्रणाला मान देऊन मी काल सायंकाळी इशरमध्ये जाऊन दाखल झालो. "
"मी तिथे जाण्यापूर्वीच त्याने माझ्याकडे त्या घराचे वर्णन केले होते. तो त्याच्याच देशातील एका विश्वासू नोकरासोअबत रहात होता आणि हा नोकरच त्याला काय हवं-नको ते पहात असे. या माणसालाही इंग्रजी बोलता येत होती आणि तो घरकाम वगैरे पहात होता. आणि एक मजेशीर स्वयंपाकीदेखील तिथे होता - कुठेतरी प्रवासात गार्सिया आणि याची गाठ पडली होती म्हणे. हा मस्त जेवण बनवायचा. मला चांगलेच आठवते की, सरे च्या मध्यवर्ती भागात असलेल्या त्या विस्टिरियात्यामधील विचित्रपणाबद्दल त्याने माझ्यासमोर उल्लेखही केला होता आणि मी तसे वाटतेच म्हणून त्याच्याकडे कबूलीही दिली होती, पण मला वाटले होते त्यापेक्षा कितीतरी विचित्र निघाला हा सगळा मामला."
"इशरपासून दक्षिणेस दोन मैलांवर असलेल्या त्या घराकडे मी निघालो. घराचा आकार बराच मोठा होता. ते रस्त्यापासून तुटून मागच्या बाजूला, गोलाकार गेलेल्या पायवाटेच्या कडेने लावलेल्या हिरव्यागार झुडूपांच्या आड होते. ती एक जुनाट, माणसांचा वावर बंद पडलेली विलक्षण बंगलीच होती म्हणा ना."
"समोरचे गवत वाढलेल, रंगाचे पोपडे उडालेले ते जुनाट दार उघडले गेले तेव्हापासूनच मी एवढी ढोबळ ओळख असलेल्या माणसाच्या घरे येऊन आपण चूक तर करीत नाहीय ना असे मला वाटू लागले होते. गार्सियाने स्वतःच दार उघडले आणि खूपच यारीदोस्ती दाखवत आपलेपणाने माझे स्वागत केले."
"त्यानंतर मला एका खिन्न चेहेर्‍याच्या रंगाने काळ्या ठिक्कर नोकराच्या ताब्यात दिले गेले, माझी बॅग त्याने घेत मला माझ्या खोलीत आणून सोडले. ती पूर्ण जागाच उदास वाटत होती. जेवण खासगी गप्पांत पार पडले आणि माझ्या यजमानाने बोलण्यात आणि हास्यविनोदात लक्ष आहे अशी कितीही बतावणी केली तरी तो सतत कसल्यातरी विचारात भडाडला आहे हे दिसत होतेच. तो बोललाही एवढे गुंतागुंतीचे आणि उडत-उडत की मला तर ते काहीच कळले नाही. तो सतत अस्वस्थपणे टेबलावर बोटांनी आवाज करीत, नखं कुरतडत तो अस्वस्थ असल्याची चिन्हे दाखवत होता. जेवण म्हणाल तर ते नीट शिजवलेही नव्हते की नीट वाढले नव्हते. आणि त्या गप्पगप्प असलेल्या उदास नोकराच्या उपस्थितीत मी काही गार्सियाशी मोकळेपणाने बोलू शकलो नाही. त्या रात्रीतून मी काही कारण काढून ली कडे परतावे असा विचार मी कितीतरी वेळा केला हे मी  अगदी खात्रीने तुम्हाला सांगतो. माझ्या लक्षात एक गोष्ट नेहमी येते आहे; आणि तुम्हा दोघांना जो तपास करायचा आहे त्यावर या गोष्टीची नक्कीच या गोष्टीची पकड असेल. त्यावेळी मात्र मला असं काही वाटलं नव्हतं. आमचं जेवण संपत असतानाच नोकराने एक चिठी आणून दिली होती. माझ्या नजरेतून ती चिठी वाचल्यानंतर माझा यजमान गार्सिया पूर्वीपेक्षाही किती अस्वस्थ झाला ते सुटु शकले नाही. बोलण्यातील त्याचे सगळे लक्ष उडून गेले आणि सिगारेटीमागून सिगारेटी फुंकत तो कसल्यातरी विचारात तो बुडून गेला. पण त्याने चिठीतल्या मजकुराचा उल्लेख केला नाही. सुमारे अकरा वाजता मी झोपण्याच्या खोलीकडे निघून आलो. नंतर काही वेळाने गार्सियाने माझ्या खोलेत वाकून पाहिले - त्या खोलीत आधीच अंधार होता - मी घंटी वाजवलीय का असे तो विचारत होता. मी म्हणालो मी वाजवली नाही. एवढ्या रात्रीचा त्रास दिल्याबद्दल त्याने माझी क्षमा मागत रात्रीचा एक वाजल्याचे सांगितले. यानंतर मी पडून राहिलो आणि रात्रभर मला शांत झोप लागली. "

"आणि आता माझ्या कथेच्या सर्वात विलक्षण भागाबद्दल सांगतो. मी उठलो तेव्हा दिवस कधीचा वर आलेला होता. मी माझ्या घड्याळावर नजर टाकली आणि जवळपास नऊ वाजलेल दिसले. मला आठ वाजताच उठवा असं मुद्दाम सांगून ठेऊनही त्यांच्या या विसरभोळेपणाचं मला आश्चर्य वाटलं. मी बिछान्यातून बाहेर आलो आणि नोकराला बोलावण्यासाठी घंटीचे बटण दाबले. काहीही प्रतिसाद मिळाला नाही. मी पुन्हा पुन्हा दाबून पाहिले, पण परिणाम तोच! नंतर मी निष्कर्ष काढला की घंटी निकामी झालेली  आहे. मी घाईघाईने अंगावर कपडे चढवले आणि गरम पाणी मिळण्यासाठी मी अत्यंत चिडून पायर्‍या उतरल्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, खाली कुणी म्हणजे कुणीही नव्हतं. मी हॉलमध्ये आवाज देऊन पाहिले. काहीही उत्तर नाही. त्यानंतर मी तिथली प्रत्येक खोली पालथी घातली. सगळ्या रिकाम्या होत्या. माझ्या यजमानाने काल रात्रीच मला त्याची खोली दाखवली होती, त्यामुळे मी तिचे दार वाजवले. काहीही उत्तर मिळाले नाही. दरवाजाचे हँडल फिरवून मी आत शिरलो. खोली रिकामी होती आणि बिछान्यावर कुणी झोपून उठल्याची काहीही चिन्हे नव्हती. इतर सगळ्यांसोबत हा ही माणूस गायब झाला होता. विदेशी यजमान, त्याचा विदेशी नोकर, विदेशी स्वयंपाकी सगळेच्या सगळे एका रात्रीत गायब झाले ! विस्टिरिया लॉजला दिलेल्या भेटीची समाप्ती अशी विलक्षण झाली. "
आमच्या अशीलाने त्याच्या विलक्षण मालिकेचा एक एक भाग सांगितला तेव्हा होम्स हात चोळत मध्ये मध्ये हुंकार भरत होता.
"मला लक्षात येतंय तिथवर तरी तुमचा अनुभव पूर्णपणे अद्वितीय आहे. " तो म्हणाला "त्यानंतर आपण काय केलेत? "
"मी प्रचंड संतापलो. पहिल्यांदा माझ्या मनात आले की मला 'प्रॅक्टीकल जोक' चा बळी बनवण्यात आले आहे. मी माझे सामान बांधले. माझ्यामागे त्या हॉलचा दरवाजा एकदाचा आदळला आणि हातात माझी बॅग घेऊन इशरमधून निघालो. गावातील मुख्य इस्टेट एजंट अ‍ॅलन ब्रदर्सकडे जाऊन धडकलो आणि ती बंगली यांनीच भाड्याने दिली असल्याचे मला आढळले. तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की हा सगळा बनाव मला मूर्खात काढण्यासाठी तर रचला गेला नाहीय ना? आणि या बनावाचा खरा हेतू माझ्या खिशातून भाडे वसूल केले जावे हा तर नाहीय ना? मार्च संपत आला तरी पूर्ण दिवस अजून बाकी होता. पण ही शंका चुकीची निघाली. त्या एजंटाने मी बोलून दाखवलेल्या संशयाबद्दल आभारच मानले, पण भाड आगाऊच भरण्यात आले असल्याचे त्याने सांगितले. "
"त्यानंतर मी शहराचा रस्ता पकडला आणि आधी स्पॅनिश दूतावासात जाऊन धडकलो. तिथे तर गार्सियाला कुणीच ओळखत नव्हते. त्यानंतर मी मेलव्हिलेला भेटायला गेलो. त्यांच्याच घरी मी प्रथम गार्सियाला भेटलो होतो. पण मला आढळले की त्यांना तर गार्सियाबद्दल माझ्यापेक्षाही कमी माहिती आहे. शेवटी माझ्या तारेला आपल्याकडून उत्तर मिळाले तेव्हा मी आपल्याकडे येऊन पोचलो, कारण अशा अवघड बाबतीत आपणच सल्ला देऊ शकता असे मला वाटते. पण श्रीयुत इन्स्पेक्टर, तुम्ही इथे आल्या आल्या जे सांगितलेत त्यावरुन काहीतरी भयंकर घडलेय असे वाटते, काय घडले आहे नेमके ते जरा सांगाल काय? मी शपथपूर्वक सांगतो, मी उच्चारलेला एकन एक शब्द खरा आहे, त्या माणसाच्या नशिबात काय लिहून ठेवले होते त्याबद्दल मला काही ओ की ठो माहित नाही. शक्य त्या प्रत्येक मार्गाने कायद्याला मदत करावी हीच माझी इच्छा आहे."  
"आपली आम्हाला नक्कीच मदत होईल श्रीयुत स्कॉट एक्लस, मला त्याबद्दल खात्री आहे." अत्यंत समजदार स्वरात इन्स्पेक्टर ग्रेगसन म्हणाला.
"आपण सांगितलेल्या बर्‍याच गोष्टी आम्ही केलेल्या तपासाशी जुळतात, हे कबूल करावेच लागेल. उदाहरणार्थ जेवताना आलेली ती चिठी. तिचं पुढे काय झालं हे तुम्हाला पहाण्याची संधी मिळाली होती?"
" होय, गार्सियाने तिची सुरळी केली आणि आगीत फेकली. "
"यावर आपण काय म्हणाल श्रीयुत बेयन्स?"
गावाकडून आलेला तो डिटेक्टीव्ह भरभक्कम, भकाभका धूर सोडणारा लाल कातडीचा माणूस होता, ज्याचा चेहेरा दोन असामान्य चमक असलेल्या डोळ्यांनी उजळून निघाला होता आणि हे डोळे त्याचे भरीव गाल आणि भुवईच्या खोबणीत खोलवर रुतलेले होते. त्याने त्याच्या खिशातून एक कागदाचा रंग गेलेला तुकडा काढून तो नीट केला.
"हे विस्तव नीट करायच्या दांडीनं केलेलं काम श्रीयुक्त होम्स" तो म्हणाला,
"हा कागद न जळताच तिथे पडून होता. मी मागच्या बाजूने पकडून उचलला."
होम्स कौतुकाने हसला.
"कागदाचा हा तुकडा शोधण्यापूर्वी खूपच कसोशीने झडती घेतली असेल, हे निश्चित"
"मी नीट झडती घेतलीच, श्रीयुत होम्स, माझी पद्धतच आहे ती. श्रीयुत ग्रेगसन मी हे वाचून दाखवू ना?"
लंडनवासी ग्रेगसनने मान डोलवली.
"ही चिठी वॉटरमार्क नसलेल्या , बनतानाच  क्रिम फासलेल्या साध्या कागदावर लिहिण्यात आलेली आहे. हे जवळपास कागदाचे पाऊण पान आहे. लहान पात्याच्या कात्रीने दोन झटक्यात कागद कापून वेगळा करण्यात आलेला आहे. हा कागद तीन वेळा घडी करुन किरमिजी मेणाने सीलबंद केला गेला आहे; घाईनं कसल्यातरी सपाट वस्तूने त्यावर दाब दिलेला दिसतो. श्रीयुत गार्सिया, विस्टिरिया लॉज असा पत्ता यावर लिहिलेला आहे. चिठीत म्हटलेलं आहे की -  
आपले नेहमीचेच रंग, हिरवा आणि पांढरा.
उघडे असेल तर हिरवा, बंद असेल तर पांढरा.
मुख्य पायर्‍या, पहिला कॉरिडॉर, उजवीकडील सातवे, ग्रीन बेझ. लवकर.
- डी. "
हे स्त्रीचे हस्ताक्षर आहे. खूप टोक असलेल्या पेनाने लिहिले आहे. पण पत्ता मात्र दुसर्‍याच पेनाने किंवा कुणीतरी दुसर्‍याच माणसाने लिहिला आहे. तो जाड आणि ठळक अक्षरात आहे, पहा."
"खूपच महत्वाची चिठी आहे"   तिच्यावर खालीवर नजर टाकून होम्स म्हणाला.
"आपल्या विश्लेषणात आपण तपशीलावर दिलेल्या अवधानाबद्दल आपले अभिनंदनच करायला हवे श्रीयुत बेयन्स. तरी काही बिनमहत्वाचे मुद्दे मात्र जोडायला हवेत. सपाट सील म्हणजे नि:संशय स्लीव्ह लिंक आहे - दुसरे काही असूच शकत नाहे. कात्री ही घरात वापरतो ती बाकदार कात्री होती. दोन काप मारुन दोन झटक्यात कागद कापला आहे म्हणजे ती छोटीच असणार, प्रत्येक झटक्यामध्ये तेच किंचित बाकदार वळण वेगळे उठून दिसते आहे. "
गावाकडच्या डिटेक्टीव्हने यावर होकारार्थी मान हलवली.
"मला वाटले मी त्यातून सगळा रस पिळून काढलाय, पण अजूनही थोडासा रस राहिला होताच म्हणायचा." तो म्हणाला.
"पुढे काहीतरी होणार होते आणि नेहमीप्रमाणेच या सगळ्याच्या मूळाशी एक बाई होती एवढे सोडले तर या चिठीतून मला काहीही कळलेले नाही हे मात्र मी कबूल करायला हवे."
या संवादादरम्यान श्रीयुत स्कॉट एक्लस यांनी जागच्या जागी थोडी चुळबुळ केली.
"तुम्हाला ही चिठी सापडली हे बरेच झाले म्हणायचे, माझे कथन खरे असल्याचा हा पुरावा आहे " ते म्हणाले
"पण कृपया तुम्ही एक लक्षात घ्या की, गार्सियाचे पुढे काय झाले किंवा त्याच्या घराचे काय झाले हे मला अजूनही समजलेले नाही"
"गार्सियाबद्द सांगायचं तर " ग्रेगसन म्हणाला,
"उत्तर सोपं आहे. त्याच्या घरापासून जवळपास एक मैल असलेल्या ऑक्झशॉट कॉमनवर गार्सियाचे प्रेत सापडले. सँड बॅग किंवा तशाच एखाद्या साधनाने त्याचे डोके छिन्न-विच्छिन्न केले गेले होते. प्रेत पडलेली जागा माणसांचा वावर नसलेला एक कोपरा असून त्या जागेपासून मैलाच्या आत एकही घर नाही. गार्सियावर अगोदर मागच्या बाजूने हल्ला झाला, पण त्याच्या हल्ले खोराने त्याचा प्राण गेला तरी गार्सियाला मारहाण चालूच ठेवलेली दिसत होती. त्याच्यावर अत्यंत भयानक हल्ला झाला. तिथे कसल्याही पाऊलखूणा किंवा गुन्हेगारांचा माग आढळला नाही."
"त्याला लुटले गेले होते काय?"
"नाही, लूटमार झाल्याचं काही चिन्ह सापडलं नाही. "
"खूप वाईट आहे हे, भयानक आहे " संतापाने श्रीयुत स्कॉट एक्लस म्हणाले.
"पण या सगळ्याचा मला मात्र चांगलाच फटका बसला. माझा यजमान थोडीशी हवाखोरी करायला बाहेर पडला आणि त्यात त्याचा एवढा भयानक अंत झाला यात माझा काहीच संबंध नाही. या भानगडीत मी कसाकाय अडकतो?"
"ते खूपच सोपे आहे " इन्स्पेक्टर बेयन्स म्हणाले
"मयताच्या खिशात सापडलेल्या एकमेव पुराव्यात आपणच पाठवलेले पत्र आहे आणि तो मारला गेला त्या रात्री आपण त्याच्या सोबत असणार होता असं त्या पत्रात म्हटलेलं आहे. मयताचे नाव आणि पत्ता आम्हाला मिळाला, तो  याच पत्राच्या लिफाफ्यावरुन! आज सकाळी नऊ नंतर आम्ही आम्ही त्याच्या घरी पोचलो तर तिथे तुम्ही किंवा इतर कुणीही आढळले नाही. लंडनमध्ये आपल्या मागावर रहावे मी ग्रेगसन यांना तार केली आणि तेवढ्यात विस्टिरिया लॉजची झडती घेतली. त्यानंतर मी शहरात दाखल झालो, ग्रेगसन यांना भेटलो आणि आता आम्ही इथे आहोत. "
"आता मला वाटते " जागेवरुन उठत ग्रेगसन म्हणाला
"आपण या प्रकरणाला आधी अधिकृत रुपात कायदेशीर आकार द्यायला हवा. आपण आमच्यासोबत स्टेशनमध्ये चला, श्रीयुत स्कॉट एक्लस आणि आपला अधिकृत जवाब तिथे द्या. "
"निश्चितच मी येईन, पण श्रीयुत होम्स, मी तुमचा सल्ला घेत राहिन. आपण खरे काय ते शोधून काढण्यात कोणतीही कसर ठेऊ नका. "
शेरलॉक गावाकडच्या इन्स्पेक्टरच्या रोखाने वळला
"श्रीयुत बेयन्स, मी आपल्या सोबत या प्रकरणावर काम करण्यावर आपला काही आक्षेप नसेल असे मानतो. "
"हा तर माझा सन्मान आहे, आक्षेप वगैरे कसला? "
"आपण जे काही केलंत त्यात आपण अत्यंत तडफ आणि खबरदारी घेतलीत. हा गार्सिया मारला गेला ती अचूक वेळ सांगू शकणारा काही सुगावा मिळू शकला का?"
"तो तिथे एक वाजल्यापासून होता, त्यावेळी तिथे पाऊस पडत होता, आणि नक्कीच पाऊस पडायला सुरुवात होण्यापूर्वी त्याला मारण्यात आलं आहे "
"पण हे तर पूर्णतः अशक्य आहे श्रीयुत बेयन्स " आमचा अशील ओरडला
"त्याचा आवाज माझ्या चांगलाच ओळखीचा आहे. नेमक्या याच वेळी त्याने मला माझ्या झोपण्याच्या खोलीत आवाज दिला होता हे मी शपथेवर सांगू शकतो "
"उल्लेखनीय आहे, पण हे अशक्यच आहे असं मात्र म्हणता येणार नाही" होम्स हसत म्हणाला
"तुम्हाला काही सुगावा दिसतोय?" ग्रेगसनने विचारले
"वरवर पाहिले तर ही केस गुंतागुंतीची वाटत नाही, पण त्यात खूपच बोलकी आणि मनोरंजक वैशिष्ट्ये आहेत. अंतिम आणि निश्चित मत देण्यापूर्वी पुढील तथ्यांचे ज्ञान होणे आवश्यक आहे. श्रीयुत बेयन्स, तुम्ही घेतलेल्या तुमच्या झडतीमध्ये त्या चिठीशिवाय काही उल्लेखनीय आढळलं काय?"
डिटेक्टीव्हने विचित्र नजरेने होम्सकडे पाहिले.
"आढळलंय तर!" तो म्हणाला "खूपच उल्लेखनीय अशा एक दोन गोष्टी आहेत. माझे काम आटोपली की कदाचित आपण पोलीस स्टेशनमध्ये येऊ शकाल आणि तिथे आपले मत द्याल अशी मला आशा आहे "
"मी पूर्णपणे आपल्या सेवेत हजर असेल " शेरलॉकने घंटीच्या बटणाकडे हात लांबवत म्हटले.
"श्रीमती हडसन, आपण यांना बाहेरपर्यंत सोडा. आणि त्या मुलाकडे ही तार द्या. पाच शिलिंग  त्याच्याकडे द्या, जवाबी तार आहे. "
आमच्या पाहुण्यांना निरोप दिल्यानंतर आम्ही काही वेळ शांत बसून राहिलो. होम्स, नेहमीप्रमाणे डोळे बारीक करुन भुवया डोळ्यांभोवती पाडून जोर जोराने धूर सोडत होता.