१७ डिसेंबर, २०१०

दिलखुलास

नमस्कार वाचकहो!
आजची पोस्ट तुमच्यासाठीच आहे. हा ब्लॉग सुरू होऊन जवळपास सात आठ महिने झालेत. या ब्लॉगवरची प्रत्येक पोस्ट या ना त्या रूपात वाचकांशी संवाद साधण्यासाठीच असली तरी आजच्यासारखा थेट संवाद सुरू करण्याचा पहिल्यांदाच प्रयत्न करतोय. सुरूवातीला मी या ब्लॉगपुरताच मर्यादीत होतो. नंतर मग मिसळपाव डॉट कॉम, मायबोली, मीमराठी या मराठी संकेतस्थळांचे सदस्यत्व घेतले आणि तिथे नियमीत लिहू लागलो; त्यामुळं ब्लॉगकडे येणं फक्त पोस्ट टाकण्यापुरतंच होऊ लागलं. अधेमध्ये पोस्ट आवडून गेल्याचे अनेक वाचकांचे मेल्सही आले; पण ते तेवढ्यापुरतंच. ब्लॉगवर वाचकांशी संवाद असा झालाच नाही. त्या-त्या पोस्टवर एखाददुसरी प्रतिक्रिया आली तरी मी ब्लॉग नेहमी पाहात नसल्याने, प्रतिक्रिया येऊन बरेच दिवस उलटलेले असत आणि मला त्या प्रतिक्रियेला उत्तर द्यायला कंटाळा होत असे. कदाचित यामुळेही वाचकांनी फक्त ब्लॉग वाचून लगेच इथून कल्टी मारणे पसंत केले असावे ;-) हरकत नाही. योगेशसारखा एखादा पक्का वाचक मात्र, उत्तर येवो न येवो नेहमीच प्रतिक्रिया देत आला आहे. पण एक उगी किडा म्हणून मला आता वाटतंय की हा ब्लॉग तुम्ही किती लोक वाचत आहात? तुमचे ब्लॉग कोणते आहेत? तुम्ही काय लिहीतायत? तुम्ही कुठले आहेत? वगैरे कळालं तर बरं होईल ! पण हे कळायला आपला संवाद तर झाला पाहिजे ना? इव्हन हा ब्लॉग कुणी वाचत आहे की नाही याबद्दलही मला काही कल्पना नाही. ते पेजव्ह्युज आणि टेहळणीचा नकाशा आपला कामापुरता आहे.
असतील तर (!) या ब्लॉगच्या नियमीत वाचकांनीही त्या-त्या पोस्टवरच त्यांना काय वाटलं ते रोखठोकपणे सांगितलं तर फार बरं होईल.
तर आता प्लीज हा ब्लॉग आवडत असेल/नसेल तरीही "टिप्पणी पोस्ट करा" या बटणाचा आजच्या दिवस का होईना आणि तुम्हाला शक्य झाल्यास नेहमीच वापर करा आणि दिलखोल के जे हवं ते बोला. कसं म्हणता?    

१५ डिसेंबर, २०१०

कासाराचा गोईंदा

काल पुण्याहून अचानक गज्याचा फोन आला आणि मी दहा बारा वर्षे मागे गेलो. गज्या म्हणजे आमच्या गोविंदकाकाचा मुलगा. हा गोविंदाकाका आमचा पोरासोरांचा गोविंदकाका असला तरी अख्ख्या पंचक्रोशीत त्याला कासाराचा गोईंदा हे एकच नाव होतं. तो आमच्या लहानशा गावात राहून चप्पलबूट, कटलरी सामान, बांगड्या, कंदील, कुलूपं, खेळण्या, आरसे-फण्या-पॉण्ड्स पावडर, इस्नू (स्नो!) असल्या वस्तू विकायचा धंदा करायचा. हा धंदा करण्याची त्याची रीतही त्याच्यासारखीच जगावेगळी. तो हे सामान वाहून नेण्यासाठी घोडा वापरायचा! सतत फूर्रर्र ऽऽ फूर्रर्रऽऽ करणारा आणि बांधला असेल तिथे लीद टाकून त्या आवारात विचित्र वास पसरवणारा घोडा. त्याच्या कटलरी सामानापेक्षाही गोईंदाच्या घोड्याचं आम्हाला आकर्षण. कारण गोविंदकाकाच प्रत्येक घोडं गुणाचं होतं.
गावातल्या लोकांची सकाळची गडबड सुरू असताना गोईंदाची वेगळीच गडबड सुरू असायची. चप्पलबूट, कटलरी सामान, बांगड्या, कंदील, कुलूपं, खेळण्या, आरसे-फण्या-पॉण्ड्स पावडर, इस्नू या सगळ्या वस्तू पडशी नावाच्या दोन गाठोड्यांत भरून त्या दोन्ही पडशा घोड्याच्या पाठीवर दोन्ही बाजूने लादायचा गोईंदाचा कार्यक्रम सकाळीसकाळी ऐन रंगात आलेला असायचा. हे सामान त्या घोड्याच्या पाठीवर लादून गोईंदानं वर मांड ठोकली की ते घोडमं त्याचा गुण दाखवायला सुरूवात करी. ते पुढे न जाता रिव्हर्स गिअरमध्ये त्याला वाट्टेल तितकं मागे, मागे, मागेच जाऊ लागे - मागे पार कुपाट्या आल्या तरी ते घोडं रिव्हर्स गिअर थांबवत नसे. मग गोईंद आणि त्याचे सामान कुपाट्यात पडे! असं दोन-चारदा झाल्यानं गोविंदा ते घोडं नीट चालायला लागेपर्यंत कुणालाही त्या घोड्यामागं एक फोक घेऊन उभं राहायला सांगे. हे काम मी मोठ्या आवडीनं करायचो. घोड्यानं रिव्हर्स गिअर टाकायचा अवकाश की त्याच्या मागच्या पायावर मी फटाफट फोकारे ओढायला सुरूवात करी. मग मात्र ते घोडं पुढे पाऊल टाकी आणि बाजारस्ता आला, की लगेच पुन्हा एकदा घोडं रिव्हर्स गिअरमध्ये यायला लागे! तिथं मात्र घोड्याचे पाय झोडपायला कुणी भेटलं तर ठीक, नाहीतर घोडं सामान आणि गोविंदाला तिकडेच फेकून घरी पळून येई. गोविंदाला सकाळी सकाळी टमरेल घेऊन घराकडे परत येणार्‍या लोकांचे सल्ले ऐकावे लागत.
"अरं काय मर्दा गोईंद, असली ब्याद घेतानाच नीट बघून इकत घेऊ नै व्हय?"
"हाना, हाना - मी बसतो, पुलापस्तोरच हाना.. मग नाई येत ते मागं.."
मी तो संतराम किंवा असाच कुणीतरी धोंड्या त्या घोड्याचे मागचे पाय झोडपून काढी आणि गोविंदकाका एकदाचा मार्गस्थ होई!
गोईंदाही मुलखाचा चिकट होता. चांगले दहावीस हजार रूपये खर्चून अस्सल घोडा विकत आणायचा तर चार-पाच हजारात एखादा असलाच गुणी घोडा तो शोधून आणी. बुलेट गाडी घेण्याइतका पैसा पदरी बाळगत असूनही तो साधी सायकलसुध्दा वापरायचा नाही. पांढरा लेंगा, तसाच पांढरा शर्ट आणि एका डोळ्याभोवतीची कातडी काळी झालेला त्याचा डोळा. आवाज गेंगाणा- चिरका.
घोड्याचा ताप फार वाढला की तो घोडं बदलीत असे. मग नव्या घोड्याचे नवे गुण! असाच माऊली नावाचा एक घोडा त्यानं कुठूनतरी शोधून आणला. या घोड्याची खोड वेगळी होती. या घोड्यासमोर कुणीही अचानक जाऊन उभा राहिला की हे घोडं त्याचे पुढचे दोन पाय समोरच्या माणसाच्या खांद्यावर टाकी. बाजारात गोविंदाच्या दुकानाशेजारी दुकान लावणार्‍या बोकडासारख्या दाढीच्या मणेर्‍याचीही त्या घोड्यानं एकदा अशीच गळाभेट घेतली होती.
"मेरे कू कुछ नही करिंगा वो घोडा, गोईंदऽऽऽ मैने भोत खच्चरोंको ठीक किया है"
असा नाद लावून त्यानं हट्टानं गोविंदाकडून घोड्याचा लगाम मागून घेतला, आणि थोड्यावेळानं गपगार गंगाकडे जाऊन स्वत:चे भरलेले कपडे धूवून आला!
मी गोविंदकाकाच्या खनपटीलाच बसत असे. त्या घोड्याला खरारा कर, त्याला वैरण टाक, दुपारच्या वेळेस जाऊन चोंबाळ असं करून मी त्या घोड्याची मैत्री संपादन केली. काही दिवसांनी गोविंदासमोर माझी आणि घोड्याची मैत्री सिध्द करून दाखवून त्याचा लगामही हस्तगत केला. मला पण त्या घोड्यानं चार-सहा वेळा पाडलं - पण मी गोविंदकाकाला त्याचा पत्ता लागू देत नसे. तो सकाळीसकाळी नवं सामान भरायला तालुक्याला जाताना पाच वाजता बसस्टॅण्डवर घोडा घेऊन यायचा निरोप तो त्याच्या बायकोकडे म्हणजे रमाकाकूकडे ठेवून जाई. तासभर आधीच घोडा घेऊन मी लंपास होई आणि त्या घोड्याच्या तोंडातून फेस येईपर्यंत त्याला गंगेच्या वाळूतून पिदडून काढी. जोपर्यंत व्यापार केला तोपर्यंत गोविंदकाकानं घोडं सोडलं नाही. गोविंदकाका गावातला एक विक्षिप्त माणूस होता. कधीच कुणाला आपण होऊन बोलत नसे. त्याला मित्रही नव्हतेच. आपण भलं, आपला बाजार भला आणि आपलं घोडं भलं असं मानणारा गोईंदा कासार. दररोज देवदर्शन, विठ्ठलमंदीरातला हरिपाठ मात्र चुकवत नसे.
तो बाजार करून येताना रानातून घोड्यासाठी गवत आणत असे. कुणीतरी रस्त्यात विचारी -
"काय गोविंदराव.. कुनीकडून आणलं गवत?"
"लांबून" गोविंदा एकाच शब्दात उत्तर देऊन घोडा पुढे रेटीत असे.
कधीतरी कुणीतरी विचारी -
"किती वाजले गोईंदा?"
"बख्खळ" !!
त्याच्या गावोगावच्या बाजारातल्या गिर्‍हाईकांना मात्र तो पोपटासारखा बोलायचा. बाजार ऐन भरात आलेला असे. गावच्या भोयांनी झणझणीत लसण घातलेला चिवडा, जिलेबी, मासे यांचा बाजारात घमघमाट सुटलेला असे आणि आम्ही पोरं चिंचेच्या पारावरून बाजाराची शोभा पाहात असू. खालीच गोविंदाचा पाल ठोकलेला असायचा -
"केवढ्याला देता बुटाड गोईंद महाराज, पटकन बोला" जेरीला आलेलं गिर्‍हाईक म्हणायचं.
"लास्ट सत्तर रूपै.. नाई.. नाई.. माल बघा ना तुम्ही...पिवर नायलॉनय.." अत्यंत भोळाभाबडा चेहेरा करून, दुसरीकडेच बघत गोईंदकासार उत्तर देई.
"अरे हॅट!! पिवर नायलॉन म्हनं! सा म्हैन्यात चुरा व्हतो ह्याचा.. ह्याचे सत्तर रूपै ??" गिर्‍हाईक चवताळत असे.
"मग किती देता?.. गिर्‍हाईक
"चाळीस रूपये देतो बघ ह्याचे..पटत असंल तर बघ.. नाहीतर पाथरीहून आणतो चांगला बूट उद्या..."
"चाळीसला हे घ्या ना मग.. पस्तीसला घ्या.. पाच कमी करतो पाटील तुमच्यासाठी" दुसरा एक बेक्कार बूट समोर ठेऊन गोविंदा म्हणे!
गिर्‍हाईक पुन्हा एकदा तो नवा बूट खालीवर करून बघे.. दोन्ही बूट समोर ठेऊन पाही आणि सत्तर रूपै वाल्या बुटाचेच पन्नास रूपये द्यायला तयार होई.
"पन्नासमध्ये मला पन आला नाही माल पाटील.. सत्तर लास्ट.. तुम्ही माल बघा की.."
"आता लई झालं तुव्हं.. पंचावन रूपै देतो बघ" असं म्हणून पाटील एकदम उठून धोतर झटकीत असे.
"साठ रूपये देऊन टाका जाऊद्या..." गोविंदा बूट कागदात बांधत म्हणे.
"आता पंचावन घी.. पुढच्या बाजारी पाच रूपै देईन..ओऽ?" गिर्‍हाईक पैसे समोर करी
गोविंदा पट्कन पैसे घेऊन त्याच्या लोखंडी गल्ल्यात टाकून देत असे. वर्षानुवर्ष तीच गिर्‍हाईकं, तीच गावं आणि बाजारातली त्याची तीच ठरलेली जागा आणि दुकानाच्या त्याच निळ्या तंबूखाली गोविंदकासाराचा व्यापार चालत होता. त्यावरच त्यानं एका मुलीचं लग्न केलं - गल्लीच्या हमरस्त्यावर एक नवं पत्र्याचं शेड बांधलं आणि रमाकाकूला वेगळं बांगड्यांचं दुकान काढून दिलं. स्वत:चा घोडा आणि गावोगावचे बाजार मात्र सोडले नाहीत.
मध्ये एका उन्हाळ्यात त्याच्या शेडसमोरच वाडा असणार्‍या मधूआण्णासोबत रमाकाकूच्या काहीतरी कुरबुरी झाल्या. आणि एका रात्री त्यांच्या त्या पत्र्याच्या शेडनंच आतून पेट घेतला. गोविंदकासाराचे सत्तरऐंशी हजार रूपये त्या रात्रीच्या तीन ते साडेसहा वाजेदरम्यान राख झाले !
सरपन्या केशवला दारू पाजवून, पाचशे रूपये देऊन मधूअण्णानंच दुकान पेटवून द्यायला लावलं अशी चार-सहा महिन्यानं अफवा उठली होती.
त्या झटक्यानं त्या कुटूंबानं गावंच सोडलं. रमाकाकू गोविंदकाकाला घेऊन तिच्या माहेरी राहायला गेली. तिथं नवं दुकान टाकलं.
तर त्या गोविंदकाकाचा मुलगा गजा काल फोनवर सांगत होता -
"मी पुण्यात एमबीए करतोय.. हॉस्टेलवर असतो... पप्पा न आई आजोळीच असतात.. पप्पाला दिसत नाही व्यवस्थित आजकाल.."
मी गज्याला काहीच बोललो नाही. फक्त इकडच्यातिकडच्या, पुण्याच्या गप्पा केल्या.