६ एप्रिल, २०१२

पुन्हा एकदा कस्टमर केअर



मोबाईलवाल्यांच्या कस्टमर केअरला बोलताना कितीही चिडायचं नाही म्हटलं तरी ते तुम्हाला चीड आणायलाच तिथे बसवलेले असतात असं नेहमी वाटतं. नंबर डायल केलात, पटकन एखाद्या जीवंत मानवी आवाजाने तिकडून रिसीव्ह केला तर तुम्ही पोस्टपोड असलात तरी त्या दिवशी तेहेतीस कोटी देवांची आणि सहासष्‍ट कोटी शास्‍त्रज्ञांची तुमच्यावर मेहेरनजर आहे असे बिनदिक्कत मानावे.

मगर ये हो नहीं सकता!

जादुगाराचा प्राण पिंजर्‍यात ठेवलेल्या पोपटात असावा आणि तो पिंजरा बारा गुहा आणि तेरा समुद्रापार कुठल्यातरी दरीत असावा त्या दुर्गम, दुस्तर जागी हे क.के. बसलेले असतात.

आपण इकडून आग लागल्यासारख्या घाईत नंबर डायल करतो आणि सत्त्वपरिक्षा सुरू.

अतिगोड हिणकस आवाजाच्या बाईची रेकॉर्ड (स्वर 'मी फार थकलेय बरं, पण माझं नशीबच फुटकं इथं हे बोंबलत बसावं लागतंय): झझझ कंपनी में आपका स्वागत है. ये करने के लिये वो दबाईये, वो करने के लिये ये दबाईये ... आपण चार शिव्या घालून ती बटणं दाबत दाबत इप्सित ठिकाणी जातो (अचूक बटण दाबायला चुकलात की पुन्हा नवा गडी नवा राज.. माझा तर संयम इथेच हरे राम म्हणतो ), रिंगही जाऊ लागते... पण मध्‍येच ती रेकॉर्ड केकाटू लागते.. इस वक्त हमारे सभी एक्झी‍क्युटिव्हज् अन्य ग्राहकों को सेवा देने में व्यस्त है. आप हमारे बहुमूल्य उपभोक्ता है (हो, म्हणूनच ही फळं भोगतोय, हरामखोर! ), कृप्या प्रतिक्षा करें [मग कानावर त्यांच्या जाहिरातींची बळजबरी] झझझ पेश करता है दादादादी कॅलिंग स्कीम जिसमें आप पा सकते है पुरे महिनेभर आपके दादादादी के साथ मनपसंद बातें, वो भी सिर्फ 50 रुपए में ( सिर्फ 50 रुपए में म्हणताना तिला कुणीतरी गुदगुल्या केल्यासारखा ती आवाज काढते, आणि आपण दारात कितीवेळचा उभा आहे, पण कुणीच भीक घालायला तयार नाही तसे आतल्या आत फसफसतोय! आपल्या संयमाची काशी ! कॉल कट करावा वाटतो )
शेवटी ती किटकिट एकदाची बंद होऊन भस्सकन् मध्‍येच कॉल जोडला जातो आणि पुढचा तमाशा सुरु -

'मैं झझझ से विशाल आपकी क्या सहायता कर सकता हूं?'
'ये घटिया आयवीआर पहले उखाड के फेक दो.. और किसी जिंदा आदमी को यहां पटकाओ सीधी बात करने के लिये ..'
'सॉरी सर, आपकी असुविधा के लिये खेद है, क्या मै आपका नाम जान सकता हूं ?'
'***********'
क्या मै आपका नंबर जान सकता हूं?
9999999999
' क्या ये वही है जिस नंबर से आप बात कर रहें है? '
'नहीं, उसको तो धोने के लिये बाल्टी में भिगोया है.. ये तो दुसरा वाला है.. क्या यार, तुम्हारे सामने जो डिब्बा रखा है उसपर मेरी पुरी कुंडली पडी है.. फिर क्यों परेशान कर रहे हो ? उसमे देख नहीं सकते?'
'क्या आपकी समस्या बतायेंगे?'
'मेरा आऊट गोईंग बंद किया गया है..पच्चीस बार कॉल कर चुकां हू.. अभी तक शुरु नहीं हुआ..'
'क्या आप बतायेंगे की आपने पिछला पेमेंट किस मोड से किया था? कैश, चेक या इंटरनेट?'
'उज्जैन की दानपेटी में कैश डाला था'
'क्षमा करें सर, आप असभ्य भाषा का प्रयोग कर रहें है..'
'वो कहावत है ना उलटा चोर कोतवाल को डांटे.. मै पैसे भर चुका हूं, उसकी रसीद मिल चुकी है फिर भी ये फालतूगिरी की जांचपडताल करनी जरुरी है ? '
'आपकी असुविधा के लिये खेद है सर, लेकीन हमारी सिस्‍टीम के अनुसार जानकारी तो लेनी होगी '
'हां, हां.. ले लो, समय पडेवो पाछे गधेडानू काको कहेवो पडे! तुम्हारे एबी रोड वाले आऊटलेट में पेमेंट किया था.. उस घटिया जगह पर सर्वर डाऊन था.. इ‍सलिये उसी वक्त पोस्‍टींग नहीं हो सकी.. और यहां तुम्हारे मुंह लगना पड रहा है.. '

बस्स! पुढे लिहू पण शकत नाही..

यथेच्छ शिव्यांचा वापर न केलेले फार थोडे कॉल मला आठवतात

(हंड्रेड पर्सेंट ब्लॅकलिस्टेड) यशवंत

३ एप्रिल, २०१२

फायली : एक दाबणे !

लेखक: मानस चक्रवर्ती, 'लूज कॅनन' या स्तंभातून
हिंदुस्तान टाइम्स, दि. 01.04.2012
http://paper.hindustantimes.com/epaper/viewer.aspx

भारतात पुकारलेल्या आणीबाणीचे रेकॉर्ड पंतप्रधान कार्यालयातून गायब झाले आहे - भारत सरकार.

--------------------------------------

जुन्या सरकारी कागदपत्रांचे रक्षण करणार्‍या सरकारी अधिकार्‍याची मी घेतलेली ही मुलाखत. याचे कार्यालयीन पद Librarian and Information Archives Registrar (LIAR) आहे.

मी: ही एवढी महत्त्वाची कागदपत्रे अशी कशी सहज गायब होऊ शकतात?
LIAR: खरं सांगायचं म्हणजे, कुत्र्याने हे..
मी: बास! तुम्ही कुत्र्याने कागद चघळले हे जुने रडगाणेच वाजणार तर?
LIAR: नाही, नाही मी तसं कुठं म्हणालो. कुत्रे कागद खात नाहीत. आमच्या कंपाऊंडमध्‍ये आम्ही शेळी पाळली होती, कर्मचार्‍यांना शेळीचे दूध लागले तर असावी म्हणून. पण काये ना, त्या कुत्र्याला इकडे-तिकडे वास काढत हिंडायची सवय होती आणि ते नेहमीच शेळीमागे लागायचं. म्हणून आम्ही काय केलं, आम्ही त्या शेळीलाच आत बांधू लागलो होतो, तिथे ती कागदपत्रं ठेवली होती. भानगड अशी झाली की त्या शेळीला त्या जुन्या कागदपत्रांची चव आवडली आणि शेळीच्या चर्वण उद्योगाचा सुगावा आम्हाला लागण्यापूर्वीच तिनं अर्ध्याच्या वर त्या दस्तऐवजांचा फन्ना उडवला..
मी: आय फील समथिंग फिशी बिहाइंड..
LIAR: Goat-ey. पण तुमचं बरोबर आहे. यामागची आणखी एक कारणमिमांसा आहे. काही वर्षांपूर्वी अभिलेखागारात चोर शिरले होते. आम्ही पडताळणी केली तेव्हा आणीबाणीबद्दलची कागपत्रे तेवढी गहाळ झाली होती.
मी: हे सरकारचंच काम मानायचं का?
Liar: नाही, नाही माझ्या विश्वसार्ह सूत्रांनी कळवलंय हे काम पाकिस्तानच्या जनरल कयानींचंच म्हणून. त्यांना सत्ता उलथवून टाकायची आहे आणि ते त्यांना लोकशाही मार्गाने करायचं होतं. त्यांना वाटलं आणीबाणीच्या कागदपत्रांतून काही हाती पडेल. ते बाड वाचून चित्रपट तयार करावा असे एखाद्या बॉलीवूड दिग्दर्शकालाही वाटले नसेलच असे नाही, पण माझा यावर तेवढा
विश्वास नाही.
मी: मग, तुम्हाला काय वाटतं?
Liar: मला वाटतं हा सगळा त्या खोलीत पाणी साठल्याच्या दुष्परिणाम आहे. X-Z दरम्यानच्या फायली फायलींग कॅबीनेटच्या तळाशी रचून ठेवल्या होत्या. रात्री कुणीतरी बेसीनमधला नळ सुरु ठेवला आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ती खोली पाण्‍याने भरुन गेली. कॅबीनेटच्या बूडाशी असलेली कागदपत्रे गहाळ झाली.
मी: मला एक कळत नाहीय, Emergency बद्दलची कागदपत्रे X-Z दरम्यान कशी ठेवलीत तुम्ही?
Liar: अहो तो फायलींग करणारा लिपीक! तो तामिळनाडूचा आहे ना. त्याने Yemergency करुन त्या फायली Y मध्‍ये ठेऊन दिल्या.
मी: मला हेही खरं वाटत नाही.
Liar: तुम्हाला सांगतो प्रकाशकांनाही असंच वाटलं! माझ्या हाताखालच्या एका क्लर्कने मला सांगितलं, पंतप्रधान आणि राष्‍ट्रपतीदरम्यान आणीबाणीबद्दलची बातचीत असलेले ते पूर्णच्या पूर्ण दस्तऐवज त्याने पुस्तक म्हणून छापण्यासाठी प्रकाशकाला दिले होते. नकारघंटा वाजवून त्यांनी ते परत पाठवले.
मी: पण त्यांनी कागदपत्रे परत तर पाठ‍वली होती ना?
Liar: त्यांचं म्हणणं पडलं की त्यात कसलाही साहित्यिक दर्जा नाही, त्या कागदपत्रांची शैलीपण भयंकर आहे आणि त्यातील पटकथा तर कचराछाप आहे.
मी: मग? तुम्ही काय केलंत?
Liar: त्यानंतर लगेच मी ऑफिसबाहेरच्या भय्याची भेळपुरी खाल्ली, ती बांधून आली होती त्या कागदावर इंदिरा गांधींची स्वाक्षरी होती. पण काही लोक म्हणतात की मानवी मूर्खपणाच्या सखोलतेचा पुरावा म्हणून एलियन्सनी ती कागदपत्रं पळवलीत.
मी: आणखी काही सबबी?
Liar: आता तुमच्यापासून काय लपवणार.. खरं म्हणजे एकदा संडासातलं पाणी संपलं होतं, मग..
मी: बस्स!! आता खरी गोष्‍ट काय आहे ते सांगा.
Liar: अहो, कसची कागदपत्रं आणि काय. आमच्याकडे काहीच नव्हतं. इंदिरामॅडम राष्‍ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांना भेटल्या तेव्हा त्यांनी मॅडमला विचारलं की, आणीबाणी लादायचीच असे त्यांच्या मनात असल्याची अफवा खरी आहे का? मॅडमजींनी आधी त्यांना डोळा मारला, मग त्यांच्या पोटात हलकासा गुद्दा मारला आणि शेवटी गोड हसल्या.

पुढे आम्हाला कळालं की राष्‍ट्रपतींनी आणीबाणी जाहिर केलीय.

****

१ एप्रिल, २०१२

जीवन, भाषा, साहित्य वगैरे वगैरे

हे लिहायला बसण्‍यामागे माझ्या मनात अधून मधून पडत असलेलं प्रतिबिंब शब्दरुपात ठेऊन ते स्वत:साठी पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घेण्याचा उद्देश आहे. एरव्ही क्षणभर क्षणभर झरणार्‍या काळाच्या मंद गतीने आयुष्‍य उलगडत जाते; आणि आयुष्‍याचं सुस्पष्‍ट नखशिखांत जसं आहे तसं रुप त्या क्षणभरात पहायला मिळत नाही. ते चित्र उमटण्यासाठी उलटत जाणार्‍या क्षणाचा आवाका कदाचित तोकडा असेल, कदाचित आपण तीव्रपणे संवेदनशील नसू किंवा दश इंद्रियांचा एक मेळा असणारी आपली निर्मितीच तिच्या सर्वसामान्य रुपात तेवढी 'जिंदा' रहात नसेल, नक्की कारण माहित नाही - पण हे परिपूर्ण जीवन जगणं आहे असं जाणवत नाही, कारण कुठेतरी स्वप्नवत असणारे ते परिपूर्ण जीवन जगण्याची तहान पुन्हा पुन्हा आपल्याला लागत असते. रोजच्या अनुभवाची परिपूर्णता टिकत नसेल, त्यात सतत तुटलेपणा असेल, किंवा अनुभव देणार्‍या जीवनाची व्याप्तीच एवढी मोठी असेल की तिला सामोरे जाताना फे फे उडत असेल. काय असेल ते असो, पण आपण बोलण्याच्या, लिहिलेल्या शब्दांच्या, भाषेच्या माध्यमातून जीवनातील अनुभवांच्या विविध छटा आणि अदा टिपण्याच्या मागे लागलेलो असतो - साहित्य म्हणजे दुसरं तिसरं काही वाटत नाही, या आपल्याच जीवनाचे आपल्याच शब्दांत मांडलेले पुढेमागे, सुरळित-विस्कळीत, जसे हाती पडतील तसे, ज्या स्थितीत हाती पडतील त्या स्थितीत घेतेलेले फोटोग्राफ्स वाटतात - आणि आपण त्यांच्याकडे बघत बसतो, त्यातून स्वत:ला निरखीत बसतो. प्रत्यक्ष तुम्ही आम्हीच त्यात असण्याची गरज नाही. आपल्यातलाच कुणीतरी जसा ज्या रुपात असेल तसा आपण शोधत असतो.
साहित्यनिर्मिती असं प्रचंड काहीतरी म्हणण्यापूर्वी आपण आपले अनुभव कुठेतरी शब्दांत, गाण्यात किंवा कोणत्याही रुपात मांडून त्यांच्याकडे पहात रहाणे हा आपलाच आरसा आपण तयार करणं वाटतं. आता आपणच स्वत: कसे आहोत ते एकदाचं स्वत: समजून घेण्याचं सोडुन या शब्द, भाषा, साहित्याद्वारे आरसे निर्मितीच्या भानगडीत आपण का पडतो हे तत्त्वज्ञानी विवचेन नंतर करुन पाहू, कारण त्यात वैयक्तिकता येत असल्यानं तो कदाचित वादंगाचा मुद्दा होईल, त्यामुळे ते नंतर.
साहित्य निर्मिती आणि त्यात आपलं पडलेलं प्रतिबिंब हा फार पुढचा पल्ला झाला. कारण 'साहित्य' असं दांडगं काहीतरी हातून तयार होण्याच्या कितीतरी पूर्वी प्रत्येकाने साधे शब्द उच्चारलेले असतातच. अ, आऽऽ आई हे त्याला पुढे आई ची मंगलमूर्ती उभी असल्यानं स्फुरलेलं असतं की हा त्यानं जगात आल्या आल्या घेतलेला पहिला फोटोग्राफ असतो, की आई या उदाहरणादाखल घेतलेल्या साध्या, पण पुढे साहित्यनिर्मिती उभी राहू शकेल अशा शब्दाची ती त्याची पहिली शिकवणी असते काय असेल ते असो. पण 'साहित्य निर्मिती' अशा प्रचंड जोरदार गोष्‍टीची जाणीव होण्यापूर्वीच त्यानं त्या दिशेनं पाऊल टाकलेलं असतं एवढं नक्की.
फार फाटे फुटले - ही नेहमीसारखी भलतीच निर्मिती झाली. शब्द असे हजारो फाटे फोडतात, कुठल्या शब्दावरुन कोणत्या रंगाचा धागा हातात येईल आणि तिकडंच विणकाम होत राहिल हे सांगता येत नाही. बोलणे, भाषा, साहित्य यावरुन शब्दापर्यंत आलो आणि भलतीकडेच गेलो. पण आता शब्द पकडून ठेवतो. शब्दांच्याच तुकड्या तुकड्यांतून साहित्यात आपलं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. आणि इथं हे शब्दांच्याच वापरातून स्वत:साठी नीट मांडायचं असल्यानं इथे लिहिलेल्या शब्दांच्या जोडणीतून निर्माण होणार्‍या प्रतिमा भुरळ घालणार - त्याकडे बघायला नको.
तर शब्द, भाषा, साहित्य आणि त्यात पडणारं आपलं इत्थंभूत प्रतिबिंब. हे प्रतिबिंब 'जीवन' वगैरे बलदंड गोष्‍टींचं आहे असं न पहाता साधी साठ सत्तर वर्षे हयात असलेल्या असलेल्या कुणाही मरणधर्मा माणसाचं मानलं तर मुद्दा जास्त सोपा होईल. कारण त्याच्या अवस्‍थेत होत गेलेला बदल, आणि त्या त्या अवस्थेत टिपलेली छायाचित्रे आपल्याला साहित्यात निश्चितच कधीही पहायला मिळू शकतील. ''ए केवडा, आपल्याला लाईन देते काय?'' ही साहित्यातील निर्मितीत पडलेल्या माणसाच्या प्रतिबिंबाची अशीच एक अवस्था टिपणारे एक वाक्य. ''मलमली तारुण्य माझे तु पहाटे पांघरावे'' ही थोडीशी पुढची अवस्था. आता हे काही अश्लील नाही. स्‍त्री-पुरुष या दोन जाती आहेत म्हणूनच त्यांच्या शारीर सूचक, अश्लील वाटतील अशा भावना येतात असं नव्हे, बहुतांश सगळी दर्जेदार साहित्यनिर्मिती कुठल्या ना कुठल्या प्रकारे शरीर सूचक असतेच. दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे, संध्‍याछाया भिववीती ह्रदया
आता एवढ्या सगळ्या मांडणीतून एक मुद्दा लक्षात आला आहे तो असा की साहित्यनिर्मिती ही परिपूर्णच असते. त्याअर्थी क्षण क्षणाच्या गतीने ठिबकणारा काळही जसा आहे तसा पुरेसा असतो. माणसाला एका क्षणातही आयुष्‍याची परिपूर्ण झलकही मिळू शकते, तेवढी माणसात संवेदनशीलता आहे. प्रश्न आहे आयुष्यातील अनंत क्षणी निर्माण होणार्‍या अनंत परिपूर्ण प्रतिमा त्या क्षणीच नष्‍ट करुन टाकण्याचा, त्या प्रतिमा निर्माण कारणीभूत असणार्‍या आपल्या अनुभवांच्या, आणि आपल्या स्वत:पासून थोडं वेगळं होण्याचा. स्वत: सोबत स्वत:च फार खेटून उभं राहून कदाचित जगायला नको, थोडीशी जागा ठेवायला हवी. कदाचित तेव्हाच जगणं दरक्षणी जसं असं तसं भिनत जाईल.