यु. जी. कृष्णूर्तींचे साहित्य वाचताना त्यांच्या रूपांतरणोत्तर आयुष्यात घडलेल्या एका अगदीच सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाच्या फरकाचा उल्लेख येत रहातो. हा अगदीच छोटासा फरक 'युजी' हा माणूस आणि बाकीचे जग यांतला कळीचा मुद्दा आहे. कदाचित आध्यात्माच्या वाटेवर चालून ती वाट संपवलेल्या सर्वांच्यामधला व बाकी माणसांच्या मधला तो फरक असावा; इतरांचं मला जास्त माहित नाही, पण युजींनी मात्र सतत या फरकावर जोर दिला आहे.
हा फरक म्हणजे शब्द आणि त्यातून निर्माण होणारी प्रतिमा! युजींच्या अंतर्पटलावर शब्दांतून कसलीही प्रतिमा निर्माण होऊ शकत नाही.
थोडक्यात जगाला जाणून घेण्यात किंवा जगाबद्दल समजाऊन सांगण्यात शब्दांवर त्यांची भिस्त नाही. अर्थात युजी आणि लोकांच्यातला संवाद हा शब्दांच्या माध्यमातूनच झाला आहे. पण युजींचे शब्द हे फक्त ते ज्या अवस्थेत आहेत तिची झलक त्यांना ऐकणारांच्या मनात उभी रहावी यासाठी मारलेले कुंचल्याचे फटकारे आहेत. पण युजी हे काही शब्दांचे फटकारे मारुन रजनीशांप्रमाणे सुंदर-सुंदर, लोभस चित्रे उभे करु शकणारे निष्णात चित्रकार नाहीत. युजींनी केलेला शब्दांचा वापर हा यांत्रिक आहे, तर रजनीशांनी केलेला शब्दांचा वापर हा नितांत कलात्मक आहे - त्यातून सृजनशीलता डोकावते आणि ती आकर्षित करते.
एरव्ही शब्द म्हणजे काय तर, जे आपल्या आजूबाजूला अफाट विस्तारलं आहे आणि ज्या अफाट विस्ताराची एकच एक, एकसंघ, महाप्रचंड प्रतिमा आहे, त्या प्रतिमेतून फाडून काढलेल्या चिंध्या किंवा ती प्रतिमा उभी राहण्यासाठी आपण मर्त्य मानवांनी जोडलेली ठिगळे!
त्या महाप्रचंड प्रतिमेला उभं करण्यासाठी आपण जोडत असलेली शब्दरुपी ठिगळे आणि चिंध्या याच माणसांनी साठवलेलं लेंढार आहेत - या शब्दांच्या लेंढारातून सहज मोकळं होता येत नाही, व ही शब्दरुपी ठिगळे पाहिल्या शिवाय आपल्या मनात कसलंही चित्र उभं राहू शकत नाही.
हा शब्दप्रतिमांचा व्यापार विचारांच्या माध्यमातून मनातही अखंड सुरु असतो, बाहेरुनही आपल्यावर त्याचा मारा सुरु असतो आणि आपणही शब्दप्रतिमा लोकांकडे फेकत असतो - थोडक्यात आपण सर्वचजण लाक्षणीक अर्थाने शब्दावडंबर माजवात जगत राहणारे लोक आहेत, आपण शब्दजीव आहोत. शब्दप्रतिमांच्या ठिगळांशिवाय आपलं चालु शकत नाही. शब्दप्रतिमांची ही ठिगळे विशिष्ट पद्धतीने जोडणे ही झाली भाषा. पण मुळात शब्द म्हणजे काय त्याच्या खोलात शिरण्याचं कारण नाही. कारण शब्द हे फक्त चिन्ह-प्रतिमा आहेत. त्या प्रतिमांचं अस्तित्त्व हेच शब्दांचं अस्तित्व आहे. मनातून प्रतिमा पुसून टाका, शब्द पुसला जातो. शब्दाचा गळा दाबा, मनात कसलीही प्रतिमा उमटू शकत नाही. प्रात्यक्षिकासाठी कुठलाही शब्द घ्या. उदा. मुलगा. मुलगा या शब्दातून जी प्रतिमा मनात येते ती फाडून टाकली, ती नष्ट करुन पाहिली तर 'मुलगा' हा एक निरर्थक, विनोदी शब्द शिल्लक रहातो! प्रत्येक शब्द असा मनात नष्ट करुन नलीफाइड, व्हॉईड केला तर हे लक्षात येऊ शकेल.
शब्दांच्या मागील प्रतिमा छाटून टाकून आपण तेवढ्यापुरतं शब्दावेगळे, शब्दमुक्त होऊ शकतो आणि याच शब्दातून निपजणार्या विचारांच्या वावटळींतूनही वेगळे होऊ शकतो, पण हे फक्त तेवढ्यापुरतंच होता येतं. विचारांचा ब्रम्हराक्षस णआपण त्याच्या शब्दरुपी अपत्यांची कत्तल करुन मारुन टाकू शकत नाही.
शब्द ही आपली शेवटची मर्यादा आहे. शब्द हीच आपली अंतिम सीमारेखा आहे, आपल्यावर ओढलेलं कवच आहे. शब्दांना जर ओेलांडून पुढे जाता आलं तर, शब्दावेगळं रहाता आलं तर कदाचित त्याला मुक्ती किंवा मोक्ष म्हणत असावेत. कदाचित त्यामुळेच आध्यात्मात मौन राहून पाहिलं जातं असावं.