18 मार्च 2012

मॅसोचिस्ट कि मॅसोकिस्ट सौंदर्य : एक गूढ

मॅसोचिस्ट कि मॅसोकिस्ट सौंदर्य : एक गूढ


सॅ‍‍डीस्ट मॅसोचिस्टच्या अर्थाच्या सुतावरुन आम्ही हा स्वर्ग गाठला आहे. मॅसोचिस्ट साहित्याचं फक्त सौंदर्य पकडून इथं उभं केलं आहे. आणखी एक म्हणजे जगाच्या साहित्यात 'मॅसोचिस्ट सौंदर्य' असं काही नाहीच्चे, हा विकृत माणूस आहे म्हणून कुणी आलं तर आपण बोलू शकणार नाही. कारण 'मॅसोचिस्ट सौंदर्य' असं काही आहे की नाही हे मला माहित नाहीच. एक उगी आपला शब्द म्हणून बरा वाटला 'मॅसोचिस्ट सौंदर्य' म्हणून वापरलाय - आणि मी सगळे शब्द असेच शब्दकोश वगैरे चाळून, खात्री वगैरे करुन न घेता वापरतो, नेहमीच.

तर मुख्य मुद्दा असा की 'मॅसोचिस्ट सौंदर्याच्या या अभिव्यक्तीमागे एक गूढ लपलंय. पण मी ते सांगत बसणार नाही. पुन्हा म्हणायचात झाला हा सुरु, आणि काही लोकांना तर उगाच बारीक कळ पण येते. पण आग्रह वगैरे असेलच तर सांगेन.

-------

तू मला श्वासात भरुन घे... पण इकडे डोळ्यात बघ.. तू मला बाहेर सोडू शकणार नाहीस..

-------

तुम्ही कधीतरी कुणावर असंच प्रेम केल्याची वेळ आलेली असते. ते चांगले किंवा वाईट किंवा आणखी कसले आहेत म्हणून नव्हे. प्रेम होऊन जातं. तुम्ही नेहमी सोबतच रहाल असं ते काही नसतं. पण याचा अर्थ तुम्ही एकमेकांना दु्खावणारच नाही असं नाही. त्याचा अर्थ तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता.

-------

काहीवेळा तुम्हाला त्या एका व्यक्तिची गरज असते जी तुम्हाला ‍सोबत
फिरताना बोलू देईल, तुमच्या तक्रारी ऐकेल आणि मूर्खासारखा पहात राहिल, पण तुमच्यावर प्रेम मात्र तसाच करीत राहिल.

-------

मी लिहिणार असलेल्या प्रत्येक शब्दाला तु कारणीभूत आहेस. मी लिहिलेल्या सगळ्यालाच.

-------

मी कुठे सुरु होते आणि तु कुठे संपतेस हे न कळण्‍याच्या त्या भावनेवर माझं प्रेम आहे. आपण विसावलो असताना अंगाला होत रहाणारा स्पर्श.. त्वचेचा त्वचेशी.. काळजाचा काळजाशी. सदा असंच प्रेम कर.
-------

मला दिवसभर असंच तुझ्या मिठीत राहूनही सगळं सुख मिळू शकतं.

-------

माझ्यातील ती उणीव आहे असं मला वाटलेल्या प्रत्येक छोट्या गोष्‍टीवर, तुला हेवा वाटला असा तुच पहिला. आणि त्याबद्दल सांगताना ते कितीही विचित्र प्रकारे सांगितलंस तरी, ते अचूकच वाटलं. मला खरोखर सुंदर वाटायला सुरुवात करायला लावणारा तुच आहेस.
-------

असा कुणी शोधा ज्यासमोर तुम्ही जसे आहात तसेच असू शकता, काहीही बोलू शकता, तुम्ही हसू शकता, तुम्ही गालात हसू शकता. तुम्ही रडू शकता, ओरडू शकता, चुंबन घेऊ शकता आणि मिठी मारु शकता. तुम्ही भांडू शकता. रात्रीच्या शेवटास पुन्हा एक होऊ शकल्यानंतरही तो तसाच वेडपट असेल.
-------

माझा हात पकड आणि मला जाऊ नकोस देऊ. माझ्यासोबत दूर चल. आपण या गुंत्यातून उडू आणि आपल्याच दोघांच्या खासगी जगात हरवून जाऊ.
-------

साधी कामे
रोजचा क्रम
डावीकडे उजवीकडे
खाली नी वर
-------

तुझ्याशी बोलताना मी मूर्खासारखा हसत असतो.
-------

तुम्ही फार गोड आहात म्हणून कुणाला तरी आवडता असे कधीच मानू नका. ते कधीतरी कंटाळले सतानाचा तुम्ही फक्त एक पर्याय असता.

-------

15 मार्च 2012

अजि ये प्रोभाते - आज पहाटे रविकर आला

कवी मग तो कुठलाही असो, त्याच्यात ऋषि बनण्याची संभाव्यता असते. कारण मनाच्या एका विशिष्‍ट अवस्‍थेत त्याला जे झप्पकन दिसून जातं ते तेवढ्याच झगझगीतपणे व्यक्त होणार्‍या शब्दांत बांधण्याचे कसब कवीकडे असते. ऋषिलाही ते दिसत असते; पण त्याला कविता करण्‍याची गरज पडत नाही कारण ऋषिने पाहिलेले आणि समोर मांडलेले 'सत्य' असते. म्हणून ऋषिच्या वाणीला धर्मग्रंथांत स्‍थान मिळते. कवीची अवस्था मात्र जाणीवेच्या दृष्‍टीने काहीशी खालची मानली जाते कारण कवी सत्य आणि सामान्यत: जग जसे असते त्यातील सीमारेषेचे सतत अतिक्रमण करीत असतो. या सीमारेषेबाहेर त्याचे सतत पाऊल पडते असे नाही, ज्यांचे पडते ते लोक रविंद्रनाथांसारखे महाकवी होतात, थोड्याफार फरकानं ऋषिच होतात म्हटले तरी चालेल. काहीतरी जाणवतंय पण पूर्णपणे पकडताही येत नाही, आणि नजरेतून पूर्णपणे सुटतही नाही अशा विचित्र वेदना कवीला सहन कराव्या लागतात. या ‍कवितेमध्‍ये रविंद्रनाथांचा असाच एक अनुभव कैद आहे.
मराठीत, इंग्रजीत अनुवादित झालेल्या रविंद्रनाथांच्या कविता आजवर वाचल्या होत्या. एक इंग्रजी कविताही अभ्यासाला होती. पण गेयतेच्या, रविंद्रनाथांना होणार्‍या जाणिवेच्या प्रदेशात वाचकालाही घेऊन जाण्याइतपत भाववाहकता अनुवादकांना पकडता आली नसावी. वाचायला त्या बर्‍या होत्या, पण त्या कवितेच्या वाचनातून सर्वांचं कल्याण होवो, सर्व जग सुखी असो असला सर्वकल्याणकारी (आणि काहीसा बोजड) आशय बाहेर पडत होता.
पण इथे अनुवादक पुलं आहेत, त्यामुळं जास्त बोलण्याची काही गरज नाही. मी तर म्हणेन पुलंनी मूळ कवितेतील सूक्ष्म रिकाम्या जागाही मराठीत अनुवाद करताना अगदी मूर्तीकार मूर्तीवर शेवटचा हात फिरवतो तेवढ्या सफाईनं भरुन काढल्या आहेत, त्यामुळं कवितेचं रसग्रहण टाळतो.  


आज पहाटे रविकर आला
नकळे कैसा प्राणा माझ्या स्पर्शूनी गेला
प्राणा माझ्या स्पर्शूनी गेला आणि जाहला अंधार्‍या या गव्हरात मज
स्पर्श आज त्या पहाट पक्षाच्या गीताचा
इतुक्या दिवसामागुनी नकळे माझा प्राण ऐसा जागूनी उठला
जागूनी उठला प्राण अरे आन उसळून आले नीर
प्राण वासना रोधू न शकली मत्प्राणांचा धीर
थरथर थरथर कंपित भूधर शीळाखंड कोसळून पडले
फुलूनफुलून मग फेस उसळला
गर्जत जल संतापून उठले
इथेतिथे मग वेड्यापरी जल मत्त भिंगर्‍या मारीत सुटले
शोधू लागले तरी न दिसले बंदिगृहाचे दार कोठले
सांग विधात्या पाषाणाच्या कशास येथे राशी पडल्या
चहूदिशांना कशास त्यांच्या उंचउंच या भिंती घडल्या
ह्रदया आता सर्व बंधने तोड तोड ही
प्राणांची साधना करोनी मने जोड ही
लाटेवरती उसळून लाटा आघातावर कर आघाता
मत्त होऊनी प्राण जागला
कुठला तम अन् फत्तर कुठला
उसळूनी उठता सर्व वासना
जगती कोणाचेही भय ना
करुणाधारा आता घालीन
पाषाणाच्या कारा फोडीन
बुडोनी सारे जग हे टाकीन
चहूदिशांना भटकत भटकत
पिशापरी मी गाईन गाणी
केस पिंजूनी फुले उधळूनी
इंद्रधनूने रंगवलेले पंख पसरुनी
रविकिरणातून हासू फुलवित
टाकीन पंच:प्राण उधळूनी
या शिखरातून त्या शिखरातून देईन झोकून
या खडकातून त्या खडकातून घेईन लोळण
हसेन खळखळ गाईन कलकल
धरुनी ताल मग टाळी देईन
माझ्यापाशी कथा कितीतरी
गाणी कितीतरी प्राणांची अन् शक्ती कितीतरी
सुखे किती अन् अनंत उर्मी
मम जीवाची कोण उभारी
काय आज मज झाले नकळे
कानी माझ्या महारणवाचे गाणे आले
चहूदिशांना कसले हे कारागृह दिसते
फोड फोड रे कारागृह ते वज्राघाते
पहाटपक्षी कसले गाणे गाऊ लागला
कुठला रविकर आज असा मज स्पर्शूनी गेला
नकळे कैसा प्राणा माझ्या स्पर्शूनी गेला  


(मूळ बंगाली ‍कविता: अजि ये प्रभाते - रविंद्रनाथ टागोर, मराठी अनुवाद - पु. ल. देशपांडे)

 

अजी ये प्रोभाते रोबिर कोर
केमोने पोशिलो प्राणेर पोर
केमोने पोशिलो गुहार अधारे प्रोभातपाकीर गान
ना जानी केनोरे अतोडिन पोरे जागिया उठिलो प्राण
जागिया उठेचे प्राण
ओरे उठोली उठेचे बारी
ओरे प्राणेर बाशोना प्राणेर अबेग रुधिया राखिते नारी
थोर थोर कोरी कापिचे भूधोर
शिला राशी राशी पोरिचे खोशे
फुलिया फुलिया फेनिल शोलिल
गोरोजी उठिचे दारुन रोशे
हेथाय होथाय पागोलेर प्राय
घुरिया घुरिया मातीया बेराय
बहिरिते छाय, देखिते ना पाय कोथाय कारार दार
केनो रे बिधाता पाशान हेनो
चारी दिके तर बधोन केनो!
भंग रे रिधोय, भंग रे बधोन
शध रे ‍अजिके प्राणेर शधोन
लौहोरीर पोरे लौहोरी तुलिया
अघातेर पोरे अघात कोर
मातीया जोखोन उठेचे पोरान
किशेर आधार, किशेर पाशान!
उठोली जोखोन उठेचे बाशोना
जागोते तोखोन किशेर दोर!

अमी धालिबो कोरुनाधारा
अमी भंगिबो पाशानकारा
अमी जोगोत प्लाबीया बेराबो गहिया
अकुल पागोल-पारा.
केश इलैया, फुल कुरैया
रामधोनू-अका पाखा उरैया
रोबिर किरोने हशी छोरिया दिबो रे पोरान धाली
सिखोर होईते शिखोरे छुटिबो
बुधोर होईते बुधोरे लुटिबो
हेशे खोलखोल गेये कोलकोल
ताले ताले दिबो ताली
एतो कोठा आछे, एतो गान आछे, एतो प्राण आछे मोर,
एतो शुख आछे, एतो शध आछे - प्राण होये आछे भोर
की जानी की होलो आजी, जागीया उठिलो प्राण
दूर होते शुनी जेनो मोहाशगोरेर गान
ओरे छारी डिके मोर - ए की कारागार घोर
भांग भांग भांग कारा, अघाते अघात कोर
ओरे आज की गान गायेचे पाखी
एशेचे रोबिर कोर

24 फेब्रुवारी 2012

कालाय तस्मै नम:

पहिल्याछूटच सांगून टाकतो शॉटमारी लेख लिहीतोय. त्यामुळं निगुतीनं वाचा; आता वेळ नसेल तर लगेच वाचूच नका. हे लिहिण्यामागे अपेक्षित असलेलं हस्तांतर शेवटी झालं की नाही ते सांगा. गेल्या काही दिवसांपासून मला एक प्रश्न पडला आहे. आपण जगात वावरतो कोणत्या आधारावर? आपल्या वावराला आधार कशाचा असतो? आपण एखाद्या काल्पनीक मितीमध्‍ये जगतो की आपल्या पायाखाली काही ठोस असतं? थोडासा आणखी फाटा फोडतो. मला ' काळ किंवा वेळ' दोन मूळ रुपात प्रतित होते. एक आहे काळाच्या उलटण्‍याची नैसर्गिक गती - ज्या गतीत कुणीही फेरफार करु शकत नाही. या काळाच्या उलटत असलेल्या नैसर्गिक गतीमध्‍ये काहीही फेरफार संभवत नाही. कारण आपल्याला ती परिपूर्णपणे जाणवत नाही. काळाच्या उलटण्याच्या त्या नैसर्गिक गतीशी आपण तसे फारसे जोडले जात नाही. क्षणभर जोडले जातो, लगेच त्यापासून तुटतो. कारण आपल्या आतमध्‍ये आपल्याला आपल्या स्वत:च्या 'काळ' या संकल्पनेला संचालित करणारी कसलीतरी यं‍त्रणा आहे. उलटणार्‍या काळाची नैसर्गिक गती आणि आपली स्वत:ची गती यात ताळमेळ नसतो. कारण काळाच्या नैसर्गिक गतीच्या वेगानं जायचं म्हटलं तर त्यात दरक्षणी अनंत पैलू असलेल्या लाखो प्रतिमा निर्माण होत असतात. आणि आपण आपल्या स्वत:च्या काळाच्या उलटण्‍याच्या वेगानं जात असल्यानं त्यातल्या काही प्रतिमाच आपल्या नजरेस पडतात. आपली स्वत:ची काळाची व्याख्या असलेली गती काळाच्या नैसर्गिक गतीशी नेहमीच विसंगत असते. त्यामुळे फारसं वेगळं काही दिसत नाही. त्याच त्याच प्रतिमा पाहून जीव कंटाळतो. प्रत्यक्षात आजूबाजूला मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिमांची ये-जा सुरु असते. आणि आपण काही प्रतिमाच पुन्हा पुन्हा उलटून पहात असतो.
काळ, मग तो कोणताही असो तो अनंत आहे. आपण अनंत नाही. आपण उद्या मरु, काळ असाच पुढे जाईल. त्यात कशा का होईना पदरी पडतात तेवढ्या प्रतिमा पहायलाही आपण नसू. पण आपण आता जीवंत असताना, पण ज्या गतीशी आपला ताळमेळ नाही त्या काळाच्या उलटण्‍याच्या नैसर्गिक गतीमध्‍ये काळ अनंतपट आहे असे भासते. या नैसर्गिक गतीत काळ अनंतपट भासतो म्हणजेच प्रत्यक्षात काळ ही संकल्पनाच लोप पावते आणि अनंतत्त्व शिल्लक उरतं. अनंतत्वातच काळ विलिन झालेला असतो. आणि अनंतत्व पूर्ण ताकदीने अनुभवात येते. पूर्ण ताकदीने अनुभवास येते म्हणजे काळ लोप पाऊन अनंतत्व शिल्लक राहिल्यानं त्या अनंतत्वात होणारी प्रत्येक हालचाल आपला जीवंत, थेट अनुभव असतो. कोणत्याही स्तरावरील कोणतीही हालचाल कशी होत आहे हे आपण अनुभवू शकतो. उदाहरण पहायचंय? इथे तुमच्या डोळ्यांसमोर शब्द येत आहेत आणि त्यातून कसलीतरी प्रतिमा उलगडत जात आहे. प्रत्यक्षात एक विशिष्‍ट विचार, एक विशिष्‍ट रेखाचित्र मन:पटलावर चितारत आहे. विचार असंख्‍य आहेत आणि ते स्वयंभू हालचाली करीत असल्यानं त्या कित्येक विचारांपैकी एक प्रयत्नपूर्वक वेगळा काढून तो विचार ज्या प्रदेशात संचार करीत आहे तो प्रदेश पहावा लागतो. ही झाली विचारांच्या स्तरावर होणारी विचारांची हालचाल आणि ती कशी होते हे शब्दात मांडण्याचा प्रयत्न. म्हणजे ही हालचाल प्रयत्नपूर्वक मांडावी लागली आहे कारण ती तुम्हाला वेगळी दाखवायची आहे.
काळाच्या उलटण्याच्या नैसर्गिक गतीमध्‍ये होणार्‍या अनंत हालचाली स्वत: अनुभवण्‍यासाठी त्या शब्दात मांडण्याची गरज नसते. कारण तो सगळा शब्देविण संवादु, दुजेविण अनुवादु असतोच आणि तो जेव्हा दुसर्‍यांसमोर मांडायचा असेल तेव्हाच 'हे तव कैसेनी गमे, परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे' अशी अवस्था असते.
तर मूळ मुद्दा आहे काळाच्या नैसर्गिक आणि काळाच्या आपल्या या दोन गतींचा. मला वाटते तो मी पूर्णपणे नसला तरी काही प्रमाणात मांडला आहे.

30 जानेवारी 2012

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - वृत्तांत पुढे चालू

(एकदा निरोप घेतल्यानंतर, पुन्हा एकदा अचानक हाती पडलेल्या माहितीचा हा वृत्तांत.. आत्मशून्यशी झालेल्या बोलण्यावर आधारित)


यशवंतकडे पाठ फिरवुन मी पुढे जायला सुरुवात केली. नाही म्हटलं तरी नर्मदामाईच्या कृपेने डोळे भरुन आले होते. अशी व्यक्ती जिला मी केवळ १ आठवड्यापूर्वी भेटलो होतो (यशवंता सोबत त्या आधी माझे कोणतेही वैयक्तीक असे संभाषण कधीच चालु नव्हते). त्याने माझा खर्चाचा अंदाज चुकला असताना मला लागणार्यात सर्वच गोष्टीं ची मदत अत्यंत सढळ हाताने मी न मागताच दिली होती. हातात काठी, स्वेटर, लुंगी, व झोपायला चटई त्यानेच घेउन दिली. निरोप घेताना येशुने मला हवे तेवढे पैसे सोबत देण्याची तयारी (सक्ती) केली होती. ती नाकारुन मी माझ्याकडची त्याने आधीच दिलेली ५०० ची नोटही त्याला परत केली. पण त्याने काही सुट्टे पैसे (१०० च्या दोन नोटा व १० च्या दोन व २० ची एक व काही नाण्यांचा खुळखुळा) मात्र माझ्याकडेच राहु दिले. आता सोबतीला कोणच नाही, वाटेत काहीही विकत घेउन खायचं नाही, मिळालं तर गिळायच नाहीतर पुढे जात रहायचं. अन्न शिजवत बसायचं नाही.

एकटाच मी सदाव्रत मागुन आणा, मग बिन रॉकेलची चुल पेटवायचा कुटाणा करा, मग अन्न नीट शिजवा, जेवा, भांडी घासा व मग विश्रांती घ्या व पुढे चला. असले वेळखाऊ उद्योग दिवसातून किमान एकदाही माझ्यासारखा आळशी माणुस एकट्याने करणंच शक्य नाही. नर्मदामातेला जगतानंदी म्हटले जाते. तर तिच्या काठावर  मी दु:खी राहणे शक्यच नाही ती काळजी घेईल असा ठाम विश्वास असला तरी पोटातले कावळे भल्या भल्यांच अध्यात्म केरात लोटतात. तर माझ्या सारख्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या आंडु-पाडुंची काय गत होईल ? आज पोट पुजेचं काय होणार?  काहीही असो स्वतःच्या सिध्दांतावर विश्वास, श्रध्देवर शुध्द असे पर्यंत ठाम रहायच असा विचार करत करत नर्मदेच्या किनार्याीने पुढे सरकु लागलो.

तितक्यात ते ३ मस्कटीटिअर्स (टिप: आपले मागचे ओमानी म्हातारे) जराशा अंतरावर एका काठावर विश्रांती घेताना दिसले. सुर्य डोक्यावर आल्याने त्यांनी आता आन्हिक उरकले होते. पण त्यांनी मला थोडे पुढे चालत जा व कंटाळा आला कि स्नान करायला थांब आम्ही पोचतोच असे सांगीतले. मला कटवण्याचा त्यांचा इरादा आवाजात स्पष्ट  दिसत होता. शेवटची भेट होताना येशुने त्यांच्या हातात १५० रुपये बळेच कोंबले होते त्यावरुन काही काळ परिक्रमा गाडीने करायची सोय झाली असावी.

त्यांनी आधीही बोलताना सांगीतलं होतं की काही काळ ते परिक्रमा वाहनाने करत जाणार म्हणुन. त्यांची साथ सुटेल हे आधीच माहीत होतं. पण हे अचानक वेगळं होणं ? रस्ता व्यवस्थीत नव्हता म्हणुन जरासा वर आलो. अजुन मोरटक्का संपलं नव्हतं. तिथे मिलीटरीच्या गणवेशात दिसणार्या् लोकांच काहीतरी काम चालु होतं. एकदोन समवयस्क गणवेशधारींसोबत नजरानजर झाली. त्यांच्या चेहर्याावर काही भाव नव्हता. पण माझ्याकडे बघुन एकदोघांच्या नजरेत मात्र छ्द्मी हास्य उतरलय असा भास मला झाला. फार चौकशी केली नाही.  चालत राहीलो.



परिक्रमींचा साधारण पेहराव असा असतो. फोटो जालावरुन साभार.

सोबतच्या साहित्यामुळे आता टिपीकल परीक्रमावासीचा ड्रेसकोड आपोआप जमुन गेला होता. बस फक्त आता माझं वय कसं वाढलेलं दिसेल याचा विचार करत होतो. परीक्रमेबाबत काहीही गृहीत धरु नये हेच बरं. बस चालत रहायच. आई नर्मदा वेगवेगळे अनुभव देत असते. त्यात आपलाच फायदा आहे. रखरखत्या उन्हात नर्मदेच्या काठने मी अनेक काटे व तापलेली (असावीच) वाळु दगड गोटे कॅनव्हासचे बूट घातलेल्या पायानी तुडवत बराच काळानंतर एका निर्जन जागी येऊन थांबलो. दमलेलो होतो, सुर्याची जागा हेच घड्याळ मानुन अंदाज केला. 

सुर्य डोक्यावरुन इतका पुढे सरकलाय म्हणजे दीड तरी वाजले असणार. तो वाटेत एक जण भेटला "अकेली मुर्ती है"? म्हणुन कुतुहलाने विचारले. मी आपोआप "अरे नही मैय्या साथमे है ना" असे बोलून गेलो. मग तो म्हणाला "अच्छा ठीक" करुन पुढे सरकला. चटकन मागे वळुन हसुन म्हणाला,  ''ओ अच्छा आप नर्मदाजी की बात कर रहे थे?'' म्हणुन माझ्याकडे आदराने व अजीजीने बघुन हसला व निघुन गेला.

वाह! काय ट्रीक मिळालीय इथल्या लोकांना इम्प्रेस करायची! आधी उगाच वाटलं होतं की आपण फारच टिपीकल उत्तर दिलयं :) तिथेच काठावर अंघोळ केली (परीक्रमावासीने गुढघ्यापेक्षा खोल पाण्यात नर्मदेमधे उतरु नये अशी पध्दत आहे). आरती नर्मदाष्टकक वगैरे झाले व बेंबीच्या देठापासुन शक्य तेवढा दीर्घ "ओम्" किंचाळायचा आनंद उद्बत्ती संपे पर्यंत घेत बसलो. मस्त एकांत समोर प्रचंड विस्ताराचे नदीचे पात्र, तिचा खळाळणारा प्रवाह माझ्या ओमची त्याच्याशी जुगलबंदी (ही माझी समजुत ).

वाढलेल्या श्वासाने , भोवतालच्या रितेपणामुळे, वा सतत ओम केकाटल्याच्या प्रभावाने  अचानक मी निर्वीचार बनुन मटकन खाली बसलो. बसुन राहीलो हळु हळु अवसान आलं. नजर सभोवताली टाकली. पुढे नर्मदा वळत होती म्हणुन लोकवस्ती कुठे लागेल याचा अंदाज येत नव्हता. चार एक किलोमीटर वर दुर एकच झोपडी दिसत होती. पोचलो तर कदाचीत तिथेच काही खायला मिळेल अशी आशा होती.


साहित्य सॅक मधे टाकुन मी पोटभर पाणी पिले. आता थकवा जाणवु लागला. कालचे फरसाण आपल्याकडेच ठेवले असते तर बरं झालं असतं म्हणत पुढे सरकु लागलो. शक्यतो किनारा सोडत न्हवतो पण कधी आत येणार्याठ मोठमोठ्या घळी असतात. काट्यांच्या झाडीचा दाटपणा प्रचंड असतो. पाण्याची पातळी वाढुन निर्माण झालेल्या ओलीची निसरडी दलदल अथवा भौगोलीक परिस्थिती वा इतर कारणाने बरेचदा वाट ही नदीपासुन काहीशी दुर जात लगतच्या टेकडीच्या चढ उतारांच्या आधाराने पुढे सरकत असते. 

इथे काट्यांच जंगल आडवं आलो म्हणुन मीळेलत्या वाटेने शेजारील टेकाडावर चढलो. छोट्याशा झाडीने भरलेल्या टेकडीच्या पठारावर पोचल्यावर मी पुढची वाट कुठे आहे याचा अंदाज घेत एका जुनाट व निर्मनुष्य भासणार्याे काटेरी कंपाऊंडपाशी पोचलो. सहजच नर्मदे हर ची हाक दिली. व वाट पाहु लागलो, आत एक नुकतंच बांधण्यात आलेलं छोटसं मंदीर दिसत होतं. आतुन आवाज आला अंदर आइये पहले आसन तो लगाईये. फिर बात करते है.

आत गेलो तर मंदीरात अजुन मुर्ती नव्हती. पण टाईल्सवर राम-सीता-हनुमान यांची चित्रे होती. शेजारी जुनी पडकी खोली होती. त्यात गेलो तर तिथे जमीनीवरच हनुमानाची पुजा झालेली दिसत होती. सोबतीला गीता प्रेस (?) अथवा तत्सम प्रकाशकांची साधना सिध्दीला वगैरे विषयांना वाहिलेली पुस्तके (जी अक्षरधाराच्या प्रदर्शनातही एका ठिकाणी ठेवलेली असतात अशी) ज्यावर हनुमानाचे चित्र होते. ती ही ठेवलेली होती. बाहेर आलो तर पलीकडे दोन माणसे एका माणसाला लाइटच्या वायरींगमधे मदत करण्यात अत्यंत मग्न होती अन तिथुनच कानावर शब्द आदळले "भोजन पाओगे ?"..... आई शप्पथ!

एकतर टेकाडावरती झाडीच्या आत लपलेली व बहुदा डागडुजी चालु असलेली ही जागा आधी दिसलीच नव्हती. ज्या झोपडीत जायचे ठरवले. तिथपर्यंतची वाट बघता किमान दोन अडीच तास लागणे स्वाभाविक वाटत होतं. मी चालायला सुरुवात करुन २० मिनीटेही झाली नसावीत. अन समोर "भोजन पाओगे ?" पाओगे म्हणजे काय. पावणारच. मानेने हो म्हटलं अनं मग कोणतही संभाषण झालं नाही. लगेच काम सोडुन एक जण माझ्यासाठी जेवण आणायला त्या पडक्या खोलीत पळाला. आतील भागातुन माझ्या समोर त्याने २ जाडजुड टिक्कड व तिखट वरण समोर ठेवले. टिक्कड म्हणजे डोमीनोझच्या रेग्युलर साइझच्या पिझाचा बेस असतो त्या एवढा अथवा थोडा   
जाडजुड व आकाराने तेवढीच अशी चुलीवर भाजलेली खमंग भाकरी होय. गव्हाचीही करतात. आडवा हात मारला. मग भाताची विचारणा झाली. अरे यार आधी नाय सांगायचं भातही बनवलाय ते ? ३रा टिक्कड मागितलाच नसता. आज यही रुक जाओ म्हणुन आग्रह झाला, सर्वांनाच होतो. पण एक तर अजुन साडेपाच वाजायला बराच वेळ होता  म्हणुन म्हटलं नको, "मैय्याकी इच्छासे आगे जाना है". पुढची वाट विचारली एकाने सोबत येऊन किनार्यााला पोचायचा रस्ता दाखवला, नर्मदे हर हर असं मनापासुन किंचाळुन अत्यंत सद्गदीत होउन त्याला निरोप देउन चालु लागलो.


चालत होतोच. किती चालत राहीलो, कळलं नाही. नर्मदेसोबत वाटेनेही दिशा बदलली. मी थोड्या टेकाडावर येऊन पोचलो. चला आज दुसरा दिवस उपास घडला नाही पाय दुखत होते. पण मन प्रसन्न होतं. चालताना एका वळणावर नर्मदामातेचे मंदीर दिसलं. जागा थोडी उंचावर होती नर्मदा काहीसी खालुन वहात होती. पांढर्याए रंगाच साधं मंदीर समोर. छोटी दरी व लगेच नर्मदेचे विस्तृत पात्र अप्रतीम 
देखावा. पण पायाचा शिनवटा जास्त प्रभावी म्हणुन चटकन मंदीराच्या छोट्याश्या अंगणात पाऊल टाकले. समोर घोरत पडलेली (?) 
तीनचार कुत्री त्वरीत जागी होऊन माझ्या दिशेने प्रचंड त्वेषाने भुंकत धाऊन आली. कुत्र्यांची पहील्यापासुनच भीती वाटत नाही. म्हणजे खास प्रशिक्षण न दिलेल्या. रात्री अपरात्री येणार्यार जाणार्यान वाहनाच्या, लोकांच्या अंगावर धाऊन जाणार्याी कुत्र्यांच्या लोळक्यातून मी अनेकदा एकट्यांनेच अनेकांसमोर बिधास्तपणे गेलो आहे, आणि कोणत्याही अपयाशिवाय सहज बाहेरही पडतो. पण इथे एक गंमत झाली.  
कुत्री अंगावर आली व सवयीने मी ही मागे न हटता गेटमधुन आत पुढेच जात राहीलो. कुत्री माझ्या भोवती कोंडाळे करुन भुंकुन भुंकुन वातावरण दणाणुन सोडत होती. कुत्र्यांच्या भुंकण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करुन, मी जागेच्या मध्य भागी येऊन इथे कोण आहे काय याचा अंदाज घेत होतो.

कारण मंदिराला लागुनच स्वयंपाक घर दिसत होतं. कुत्र्याच्या गलक्याने एक मुलगा आतुन धावत आला. मला आतमधे पाहीले व हसुन म्हणाला नर्मदे हर बोलो, वोह सांत हो जाएंगे. आपल्याला काय? नर्मदे हर केलं अनं ती कुत्री ताबडतोब आल्या जागी परतुन अंग गुरफटुन उताणी पडली. मला गंमत वाटली. त्याने विचारले कौनसा जिला ? म्हटलं महाराष्ट्र. त्याने भुवया उंचाउन वहां से आये हो ? 
म्हटलं हो. अकेला ही हुं. मंदिरात नर्मदामाईचे दर्शन घेतले. निघालो तर तेव्हड्यात त्याने चहा बनवला होता. आवड नाही पण नकारही देत नाही. त्याला विचारलं परिक्रमावासीसांठी संध्याकाळी थांबायची सोय कुठे आहे? तो म्हटला थोडं पुढे टोकसर म्हणुन एक गाव आहे. तिथे मोठा आश्रम आहे. थांबता येईल. जेवण दुपारी असते पण संध्याकाळी स्वतःला बनवावे लागेल.

३ टिक्कड पोटात होते. रात्रीच्या जेवणाची चिंताच नव्हती. वाटेतली लहान गावे, वस्त्या पार करत ४.३० ला टोकसरला पोचलो सांगितलेल्या आश्रमात गेलो. अत्यंत रमणीय व प्रशस्त जागा मोठी व स्वच्छ धर्मशाळा परंतु ओस पडलेली. आश्रमात गेलो. भगव्या वस्त्रात असलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीने प्रेमाने स्वागत केले. कोण, कुठ्ले, केव्हा सुरु केली परीक्रमा वगैरे झालं. त्यांच्याकडुन  प्रमाणपत्रावर शिक्का मारुन घेतला. त्यांनीही विचारलं भोजन पाओगे ? आयला ! चमत्कारच आहे.

मी तर ऐकलं होते दुपारी बारा एकलाच जेवण असतं इथं म्हणुन.  म्हटल "रातको". अन त्यांनी दिलेल्या स्वच्छ अशा खोलीत येऊन आडवा झालो. अर्धा तास झाला अन त्याने माझ्या खोलीत अजुन एका परिक्रमावासीला आणलं. हसत म्हणाला ये भी अकेले है और महाराष्ट्रं से ही है. तो आणी मी एकदमच हसलो. कोण कुठले वगैरे झालं. मुंबैकर होता. म्हणाला तुमच्या सोबतचा कुठाय? म्हटलं तो सोबतीसाठीच होता. परतला मोरटक्याहुन. हा म्हणाला तुम्हाला ओंकारेश्वरला पाहिलं होतं. मी सुध्दा थोड्या वेळाने तिथेच परिक्रमा सुरु केली. मी त्याला ओळखणे शक्यच नव्हते.

त्यांचं वय ६०. त्यांच्या कमरेपर्यंत येईल अशी भलीमोठी जाडजूड सॅक पाठीला होती. पुन्हा मनात म्हटलं हिमालयात नाही परीक्रमेत जातोय याचा याला नक्कीच विसर पडलाय. पण माणुस तरतरीत होता बोलायला. बसला आणि गप्पा सुरु. परिक्रमा का सुरु केली? त्यांनी सांगायला सुरुवात केली. म्हणाले मी एकांतात राहून बर्यापच काळापासून एका देवतेची साधना केली आहे. गेली दहा वर्षे मी कूटूंबापासुन दुर आहे (संपर्कात आहेच पण राहतो दुसरीकडे). त्या देवतेचं मंदीरही बांधलं आहे व पुजारीही आहे. अनेक लोक त्यांच्या अडचणी घेऊन गेले व त्यांना फायदा झाला. पण आयुष्यभर जे त्यांनी मिळवलयं ते लोकांना वाटायची आता वेळही आली आहे म्हणुनच परिक्रमा.

सध्या गाडी, घर, उत्तम नोकरी वगैरे सर्व काही आहे. पण साधनेत तीव्र स्फूर्ती आल्याने व नंतर परिक्रमेसाठी अनुकूल गोष्टीग आपोआप घडत गेल्याने ते परीक्रमेत कसे आले त्याची माहीतीही त्यांनी दिली. अर्थातच ते जे बोलले ते माझ्यासाठी क्रिप्टीक होते वा सविस्तर नव्हते. पण मुळात मी स्वतः परीक्रमेचा संकल्प उघड करणे वा न पाळणे याबाबत कमालीचा संवेदनशील असल्याने याबाबतीत कधीच कोणत्याही परीक्रमावासीच्या चौकशीच्या खोलात गेलो नाही. माझ्या बाबत बोलाल तर असा प्रयत्न झाल्यास मी सरळ थापा ठोकुन दिल्या आहेत.

ते मला थोडे अस्वस्थ भासले. कारण त्यांची पाठ फार दुखत होती मी त्यांना त्यांची राक्षसी सॅक इथंच टोकसरच्या आश्रमात ठेवण्याचा सल्ला दिला व केवळ मोजकेच सामान सोबत बाळगण्यास सांगितले. इतक्यात आश्रमाची व्यवस्था पाहणारे प्रेमळ गृहस्थ आत येऊन आम्हाला म्हणाले भोजन पाओगे? माझं तेच उत्तर "रातको". तर, "अरे नारायण कब की रात हो गयी" म्हणुन खेकसले. सुर्यास्त होऊन बराच वेळ झाला होता. ५.४५ ला त्या दिवशी सुर्यास्त होता. म्हणजे सात वाजायला आले असावेत. त्यांचं बरोबरच आहे तिकडे ती वेळ नक्कीच रात्रीची होती.

मी हो म्हटल्यावर आम्हाला त्यांनी भाजी आणि टिक्कड पोटभर खायला दिले. संध्याकाळी मंदीरात पुजेला जायचे 
त्राण नव्हतेच. म्हणुन नर्मदा मातेची पुजा वगैरे आटोपुन तो त्याने सोबत आणलेल्या स्लिपींग बॅगच्या गुहेत शिरुन चेन ओढून घेतली तर मी माझ्याकडच्या चटईवर छोटी सतरंजी टाकून त्वरीत निद्राधीन झालो.

(क्रमश:)

16 जानेवारी 2012

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - निरोप

सायंकाळची कातरवेळ संपून अंधार आणखी दाटून आला आणि पायाखालचा रस्ता पुसट झाला.
झपाट्याने पुढे गेलो.
मागच्या आश्रमाच्या पायर्‍यांजवळ आम्हाला मागे टाकून निघालेली ‍ती त्रिमूर्ती डगर चढताना दिसली. डगरीवर केळीचा बाग आणि चार दोन शेडस दिसत होती - तोच आश्रम.
डगरीवर पसरलेल्या झाडांच्या मुळांना पकडून वर गेलो. अंधारात जेसीबी लाऊन आश्रमाचं काही काम चालू होतं. आश्रमाचे गोल गरगरीत स्वामी शंकराचार्यांच्या फोटोत असतो तसा डोक्यावर कफनीचा पदर घेऊन कामावर लक्ष ठेऊन उभे होते. जेसीबीवाल्याला कुठली माती ओढायची त्याच्या मधूनमधून सूचना चालू होत्या.
शेजारीच आठदहा खोल्या असलेली एक प्रशस्त इमारत बांधून झालेली दिसत होती.. समोर बांधकामाचे बांबू, फळ्या, सिमेंट पडलेलं होतं.
त्या शेडमध्‍ये पाचपंचवीस गाद्यागिराद्याही थप्पी लाऊन ठेवल्या होत्या.
आम्ही तिथंच आगंतुकासारखे जाऊन बसलो. आमच्या पुढे असलेल्या त्रिमूर्तीमध्‍ये कुजबूज झाली. एकजण उठला व त्या भगवे वस्‍त्रधारी स्वामींकडे गेला. आज रात्री इथे थांबणार आहोत वगैरे विचारले असावे. कारण लगेच स्वामीजींनी त्या परिक्रमीला नमस्कार वगैरे केला आणि लगेच आश्रमाच्या सेवेकर्‍यानं आम्हाला एक सतरंजी आणून दिली. त्या नवीन ईमारतीच्या व्हरांड्यात ती टाकली.
आतापर्यंत नर्मदेच्या पात्रातून जो पुल नजरेत होता त्यावरुन वहानांच्या लाइटचा प्रकाश ये-जा करताना दिसत होता. तोही आम्ही चालत होतो तिथून तीन कि.मी. वर होता. हा पुल नर्मदेच्या अल्याड-पल्याड पाच-पाच किलोमीटरवर असलेल्या बडवाह आणि सनावद या गावांना जोडतो असे सकाळी पुढे गेल्यावर दिसले. पुलावरुन बडवाहला येऊन इंदूरला जाणारी बस पकडता येणार होती. मोरटक्क्‍याचा रेल्वे पुल मात्र तिथून आणखी चार किलोमीटरवर होता.
त्यामुळं मोरटक्क्‍यावरुन रेल्वेनं इंदूरला परतण्‍याचा प्लॅन रद्द केला.
दिवसा नर्मदेतून सरळ पुलाकडे जाता आलं असतं. पण आता रात्र पडल्यानं वरच्या कच्च्या रस्त्यावरुन भलतीकडेच गेलो असतो. तिथं असलेल्या एकदोन मोकळ्या लोकांना स्टेशनचा रस्ता विचारला तर त्यांनाही तो नीट माहित नव्हता. आशूपण ''जाऊ दे, सकाळी जा..'' म्हणाला. मग थांबलो.
मग प्रश्न आला रात्री खायचं काय? या आश्रमात सोय होते की नाही वगैरे काही माहित नव्हतं. म्हटलं ओंकारेश्वरातून आणलेल्या भज्यांचं पार्सल आणि टहाळ आहेच.
आणि रात्री थंडीत पांघरायचं काय? आशूकडं फक्त एक सतरंजी आणि माझ्‍याकडे विकत घेतलेली पुस्तके व अंगावरल्या कपड्‍यांशिवाय काही नव्हतं. त्या नव्या ईमारतीच्या व्हरांड्‍यात टाकलेल्या सतरंजीवर गप्पा मारीत बसलो.
सोबतच्या त्रिकुटाने सायंपूजेसाठी नर्मदा जलाच्या आपपल्या बाटल्या काढल्या.
त्यांच्यापैकी एकाकडे असलेल्या मोबाईलच्या उजेडात नर्मदाष्‍टक काही सापडेना. निरांजन, उदबत्त्या लाऊन त्यांना मुखपाठ होती ती आरती म्हणून त्यांची नर्मदा पूजा आटोपली. आशून त्याच्याकडच्या पुस्तकात शोधून नर्मदाष्‍टक म्हटले. तेवढ्‍यात एक माणूस 'भजन के लिये चलिये.. भगवान ने बुलाया है'' सांगत आला.
ऐन डगरीच्या कडेवर बांधलेल्या शेडमध्‍ये ते स्वामी रहात होते आणि आश्रमातले पंधरावीस लोक त्यांना भगवान म्हणत होते.
पेटी, ढोलक, टाळांच्या तालावर भजन सुरु होते, पेटीवर ते स्वामीजी.
भजन संपले. नर्मदेकडे तोंड करुन, सर्वांनी रांगेने ताट हातात घेऊन केलेली आरती झाली त्यावेळी खाली नर्मदेचे पाणी पल्याडच्या तुरळक दिव्यांमुळे अंधारात लकाकत होते.
स्वामीजींनी प्रसाद म्हणून सेवेकर्‍याला आतल्या शेडमधून चिकू आणि चिकू न सापडल्यास जांब आणायला सांगितले. पेटी, ढोलक वगैरे आत गेले.
तो प्रसाद घेतला.
मग स्वामीजींनी कहां से आये है वगैरे विचारणा केली.
साडेपाच सहा फुट उंची, बेचाळीस - पंचेचाळीच वय, एकूणच शरीराचा गोल गरगरीत घेर आणि दोन्ही डोळे बारिक करुन, बोलताना दोन्ही बुब्बुळे डाव्या-उजव्या कोपर्‍यात जाणारी, निष्‍पापपणा दाखवणारी लकब.
मी माझं नाव, इंदुरात काय करतो वगैरे सांगितलं तेव्हा ''हां वो ममता कुलकर्णी...'' हे बोलून स्वामीजींनी ते वाक्य मध्‍येच तोडले. मग आशू पुण्‍यातून आलाय हे ऐकून त्यांनी परिक्रमेबद्दल रितसर, तपशीलवार मार्गदर्शन केलं.
आपको नर्मदा के तट पर जीवन के सभी रुप दिखेंगे. सभी प्रकार के लोग है. कहीं आश्रम समृद्ध होकर भी आपको कुछ पूछे बिना हकाल दिया जायेगा, कहीं बहुत आदर सत्कार मिलेगा. शांती से सब देखना है और मईया का स्मरण करते हुये आगे बढते रहना है वगैरे बर्‍याच महत्त्वाच्या गोष्‍टींची त्यांनी आठवण करुन दिली.
स्वयंपाक तयार होतोय, जेऊन जा हेही सांगितले.
पांघरण्‍यासाठी काही नाहीय हे कळल्यानंतर सेवेकर्‍याला ''अभी वो सुरत से नये चद्दर आये है उसमें से इनको दो'' म्हणून सांगितले.
आमची चिंता मिटली.
त्या ओमानी म्हातार्‍यांसारख्‍या दिसणार्‍या त्रिकुटाला त्यांनी नाव गाव विचारले.
गाडरवारा हे त्यांच्या गावाचे नाव ऐकून ''रजनीश की जनमभूमी'' म्हटल्यावर मला ते तिथून आल्याचे कळले. मी आधीही त्यांच्या गावाचे नाव विचारले होते, पण मुक्काम पोस्ट, तालुका जिल्हा च्या हिंदी चालीत त्यांनी सांगितल्याने मला ते नीट कळाले नव्हते.
रजनीशांच्या जन्मगावातून आलेली ती त्रिमुर्ती माझ्‍यासाठी इंट्रेस्‍टिंग विषय होती.
स्वामींना पुन्हा एकदा नर्मदाष्‍टक म्हणण्‍याची इच्छा झाली. पेटी, ढोलक बाहेर आले.
तिथे रहाणार्‍या दोन लहान मुली व एक मुलगाही होते. त्यांना मी तुमचे नाव काय, शाळेत जाता की नाही वगैरे प्रश्न विचारले तेव्हा स्वामींजींनी ''अरे वो स्कुल में जाते है.. लेकीन वहां कुछ सिखाया नहीं जाता.. हमने कहा शिक्षा हम देंगे.. स्कुल से सिर्फ डिग्री ले लेना..'' म्हणून लोकांना हसवले.
थोड्या वेळाने केळीची पानं मांडली गेली. गरमागरम वरण, चवीला धपाट्यासारखा, पण थोडा जाड 'टिक्कड' नावाचा परिक्रमींचा पेटंट पदार्थ आणि स्वामीजींने मुद्दाम आतून मागवलेले फरसाण यावर आम्ही थकलेले, भुकेजलेले लोक तुटून पडलो. मी तर नर्मदाकिनारच्‍या त्या काकडून टाकणार्‍या थंडीत सूप पिल्यासारखे ते गरमागरम, तिखट वरण ओरपले.
जेवणं झाल्यावर आम्ही सकाळी पाच वाजताच निघू हे सांगितल्यानंतर स्वामीजींनी पुन्हा एकदा आम्हाला नीट मार्गदर्शन केले. सू्र्योदय झाल्याशिवाय बिलकुल रस्त्यावर चालायला सुरुवात करायची नाही. सूर्यास्त झाल्यावरही चालायचे नाही. तुम्हाला पूर्णत: अनोळखी रस्त्यात काटेकुटे, साप-किरडू, घळ काहीही असू शकते वगैरे काळजी घ्यावी अशा गोष्‍टी सांगितल्या. लवकर जायचे आहे तर जा, पण सूर्योदय
होऊ द्या वगैरे.
आम्ही त्यांच्या अगत्याबद्दल, केलेल्या मार्गदर्शनाबद्दल पुन:पुन्हा आभार मानले, त्यांचं दर्शन घेतलं.
त्यावर -
''अरे हम तो भुक्कड बाबा है... हमारे गुरुने यहां बिठाया है तो हो गये हम भगवान'' असे प्रांजळपणे सांगितले.
आठ एकरांचा आश्रम आहे. इंदुर जिल्ह्यातले धार आणि सुरतेत आणखी एका ठिकाणी मोठे आश्रम आहेत. नर्मदेच्या तटावर रहाण्‍याची इच्छा झाली, आता कायम मुक्काम इथेच. मध्‍ये मध्‍ये तिकडे जातो वगैरे व्यक्तिगत गोष्‍टी त्यांनी सांगितल्या.
तुम्हाला फोर व्हिलर चालवता येते काय असा प्रश्नही मध्‍येच मला विचारला. त्यांना जवळ कुठेतरी जाऊन यायचे असावे. त्यांची स्कॉर्पिओ पार्क केलेली होतीच. पण मला गाडी चालवता येत नव्हती.
आम्ही निरोप घेऊन परत त्या ईमारतीत आलो. पाठोपाठ रगी घेऊन माणूस आलाच. मी परिक्रमावासी नाहीय, फक्त सोबत आलोय हे कळाल्याने त्यांनी दोघांसाठी 3 रगी पाठवून दिल्या होत्या.
तुम्ही शेजारीच टाकलेल्या कॉटवर झोपा असे सांगून, थोडावेळ गप्पा मारुन तो माणून निघून गेला. पण सतरंजी प्रशस्त होती, आणि परिक्रमेला निघाले नसलो तरी उगाच स्पेशल ट्रिटमेंट घ्‍यावी वाटेना.
माझ्या अंगावर तरी रेक्‍झीनचे जॅकेट होते. आशूकडे तर फक्त एकावर एक घातलेले दोन शर्ट.
त्याला त्या दोन रगी आग्रह करुन घ्‍यायला लावल्या. आशू ध्‍यान, नामस्मरण करु लागला व मी झोपेची आळवणी.
रजनीशांच्या गावचे त्रिकुट सोबत आणलेल्या रगीमध्‍ये गुरफटुन कधीच घोरु लागले होते.
थोड्या वेळाने आशूही झोपला. मला काही त्या थंडीत झोप लागेना. रात्रभर या कुशीवर-त्या कुशीवर होत उजाडले. सकाळी सहा-सव्वासहाला नव्या बांधकामावर पाणी टाकण्‍यासाठी आश्रमाची माणसे आली. आम्हाला उठवले.
आपल्याला निघून जायला सांगत आहेत असा त्या त्रिकुटाचा गैरसमज झाला व ते चंबूगबाळे आवरुन डगरीच्या खाली गेले. मग आम्हीही रगी, सतरंजी घडी घालून त्या माणसांकडे सोपवल्या व त्या त्रिकुटामागेच डगर उतरलो. दिशा पुरेशा फटफटल्या नव्हत्या.
डगरीखाली जाऊन तिथे पडलेले आयचन गोळा करुन शेकोटी पेटवली व शेकत बसलो. त्या त्रिमूर्तीला मी रजनीशांबद्दल माहिती विचारली. पण रजनीशांच्या बाकी जगातल्या ख्‍यातीबद्दल त्यांना काही गम्य नव्हते. ज्याच्या नावाने गावात एक शाळा आहे तोच हा रजनीश एवढीच माहिती त्यांना होती. हिंदी चित्रपटात सहसा चंबळ खोर्‍यातल्या डाकुंच्या तोंडी असलेले 'कछू' सारखे शब्द ते बोलण्‍यात वापरत होते आणि त्यांची बोलीही दोन-दोनदा विचारून समजून घ्‍यावी लागत होती.
सूर्य बराच वर येईपर्यंत शेकत बसलो. त्रिकुटाने चहाची तयारी केली. त्यांनी सोबत असलेला गांजा बाहेर काढला.
''इ चीज अपने को चलत नाही.. कभी गलती से पी लिये तो एक पैर कछू इधर गिरे तो दुसरा उधर''
असे म्हणून त्यातल्या पोक्त म्हातार्‍याने दुसर्‍या दोघांची आमच्यासमोर थट्टा केली. सूर्य बराच वर आला होता.
त्या म्हातार्‍यांनी आशूला परिक्रमेत एक रग, खाली अंधरायला पोत्यांचे चव्हाळे, पाण्यासाठी कडी असलेला डबा, स्वेटर आणि हातात काठी असायलाच पाहिजे हे पटवून दिले.
आम्ही त्या तिघांचा निरोप घेतला आणि ''नर्मदे हर'' करुन निघालो. नर्मदेचा तट पक्क्या खडकांचा होता, म्हणूनच वर पुल बांधला होता. त्या पुलाच्या दिशेने निघालो. वाटेत खडकात खोदलेल्या चरामध्‍ये नर्मदेच्या पाण्‍याची चिंचोळी धार आडवी आल्याने आशूला वरुन शेतातून लांबलचक चाल करावी लागली. मी ती धार पार करुन त्याची वाट पहात वर डगरीवर थांबलो.. तेव्हा ती मागे सोडून निघालेली त्रिमूर्ती त्याच्यासोबत येताना दिसली.
हळूहळू चालत बडवाहच्या पुलापर्यंत आलो. ते तिघे पुढे निघुन गेले.
आम्ही वर आलो आणि मी चहा बिस्कीट घेतले. आशू मात्र काही घेणार नाही यावर ठाम. म्हटले असो.
आशूला पुलाशेजारच्या घाटावर बसवले कारण त्याला नर्मदा ओलांडता येणार नव्हती. मी बडवाह गावात निघालो. सकाळचे साडेनऊच वाजले होते तरी मार्केटमधली सगळी दुकाने उघडली होती.
एका दुकानात वजनाला अत्यंत हलकी पण गरम रग, स्वेटर घेतले. चटई विचारली. त्याला वाटले मी नर्मदा किनारी श्राद्ध घालण्यासाठी आलोय आणि श्राद्धाच्या वेळी ब्राह्मणाला देण्‍यासाठी मला त्या वस्तू पाहिजेत. पण मी परिक्रमेत जाणार्‍या माणसासाठी या वस्तू घेऊन चाललोय हे सांगिल्यानंतर तो दुकानदार स्वत:च माझ्‍यासोबत मला काय काय हवे त्याचा योग्य भाव करीत मार्केटमधून हिंडू लागला. दुसर्‍या दुकानदारांना पटवून त्याने योग्य त्या भावात सगळ्या वस्तू घेऊन दिल्या.
त्याने ही मदत करीत त्या बाजारातून हिंडत असताना तेवढ्‍यातल्या तेवढ्‍यात आमची गट्टी जमली.
सगळ्या वस्तू घेऊन झाल्यानंतर पुन्हा त्याच्या दुकानात नेऊन आग्रहाने चहा पाजला. त्यांना नमस्कार करुन तिथून निघालो आणि सहा आसनी रिक्षात बसून परत आशू बसला होता त्या घाटावर आलो.
अडचण अशी आली की या सामानामुळे आशूकडचे ओझे वाढले.
त्याने शेवटी दोन जीन्सच्या पॅंटी आणि शर्ट तिथेच घाटावर ठेऊन दिले. सोबत घेतली नाहीत तरी चालतील अशी पुस्तके माझ्‍याकडे दिली. सॅक उचलून पाहिली तेव्हा वजन सांभाळता येईल एवढे झाले होते. पाठीवर सॅक, एका हातात कमंडलूसारखा कडी असलेला डबा आणि दुसर्‍या हातात ''?'' या आकारासारखी आजोबांची काठी. रस्‍त्यात अचानक कुत्रे, साप समोर आल्यावर, ओबडधोबड खडकांवरुन, चिखलातून चालताना काठी पाहिजेच. मीच आग्रह करुन त्याला ती घ्‍यायला लावली, त्याने सोबत ठेवली असेल की नाही देवजाणे.
शेवटी एकदाची आत्मशून्याचा निरोप घ्‍यायची वेळ आली.
निघतो म्हणालो. त्याने छातीशी धरले. भडोचला पोहोचल्यानंतर फोन कर म्हणालो.
मी घाट चढून वर आलो तेव्हा दूरवर जाणारा आत्मशून्य नाक आणि डोळे पुसताना दिसला.
मी घाट चढून आलो नर्मदेकडे पहात सिगारेट संपवली. पुल ओलांडून बडवाहकडे निघालो तेव्हा दूरवर नर्मदेच्या डगरीशेजारुन आशूची संथ परिक्रमा सुरु झालेली होती.
समाप्त


आशू थांबलेला घाट निळ्या ठिपक्यावर व बडवाह गाव वर्तुळात

13 जानेवारी 2012

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - 4



शास्त्रीजींनी पहिला पडाव ओंकारेश्वरहून १२ कि.मी. वर असलेल्या मोरटक्क्यात होईल असे सांगितले होते. मला असेही बसमध्ये बसून मोरटक्क्याहूनच पुढे जावे लागणार होते. त्याऐवजी शून्यासोबत चालत मोरटक्क्याला जाऊ आणि रात्री इंदूरला परत येऊ असे ठरवून घाट उतरायला सुरुवात केली.
..... पूर्वसूत्र
रस्त्यात बोलायला तोंड चालत नसेल तेव्हा खाण्‍यासाठी चालवावे म्हणून भाजलेल्या हरभर्‍याचा हिरवा टहाळ आणि केमिस्‍ट-कम-भजेवाल्याकडून स्‍वादिष्‍ट भजिये सोबत बांधून घेतले होते. भक्त निवासाची खोली तिथल्या औपचारिकता पूर्ण करुन नर्मदा पूजनाला निघतानाच सोडली होती. त्यामुळे आता आम्ही निघायला मोकळे होतो.
डाव्या बाजूच्या रस्त्याने नर्मदेच्या पात्रात उतरलो आणि आमच्या मागे वाळूत परिक्रमेची पावले सुटत जाऊ लागली. मागे दूरवर ओंकारेश्वराचे शुभ्र रंगातील शिखर चमकत लहान होत जात होते. काही अडचणी सोडता अखेर परिक्रमेला निर्विघ्न सुरुवात झाल्याने आत्मशून्य सुखावला होता.
भक्त निवासातून निघताना शेवटच्या क्षणीही आहे त्या स्‍थितीत परिक्रमेला निघण्‍यासाठी मी शेवटचे हातपाय मारुन पाहिले. ऑफिसला न कळवता एक दिवस इकडे थांबलो होतो. ऑफिसमधून सहकार्‍यांनी फोन केले होते. मॅनेजर महोदय नाराज होतेच. तापल्या तव्यावर कार्यभाग साधून घ्‍यावा. फोन करुन उद्या पण येणार नाहीय असे सांगितले की तो आणखी चिडणार आणि बोलणार - आणि मग राजीनामा देतोय असे सांगून मोकळे होता येईल असा विचार करुन ऑफिसला फोन लावून पाहिला होता. फासा अनुकूल पडला तर जवळचे मोबाइल हॅण्‍डसेट वगैरे कुरियरने मित्राकडे पाठवायचे आणि त्याला कार्डांचा पासवर्ड सांगून इंदूरातले खोली भाडे, पेपरबिल वगैरे मासिक देणी देऊन टाकायला सांगायचे. लॅपटॉप इत्यादी साहित्य त्याच्याकडे ठेवायला लावायचे असा माझा सगळा प्लॅन होता. पण मॅनेजर काही फोनवर उपलब्ध होईना. ऑफिसचे नियम मोडल्याने व्यवस्‍थापनाने नुकताच एका सहकार्‍यावर नोकरीवर रहाताना करारात लिहिलेल्या अटींचा वापर करुन जबर आर्थिक दंडाची कारवाई केली होती - त्यामुळे अचानक काही ठोस न करता निघून जाता येणार नव्हतं.
दुधाची तहान ताकावर म्हणून मोरटक्क्‍यापर्यंतचे 12 कि.मी. चालू लागलो. वाळू, खडक, कधी गवताळ डगरींच्या उतारावून पुसट दिसणार्‍या पायवाटेने निघालो. मध्‍ये काठावर नर्मदेच्या पुराने क्षरण झालेले संगमवराचे रंगीत खडक दिसत होते. नर्मदा कुठे संथ, कुठे कलकलाट करीत पुढे जात होती.
ओमकारेश्‍वरापासून पुढे एक-दीड किलोमीटरवर नर्मदेत कावेरी (दक्षिण भारतातील नव्हे) येऊन मिळते. पैलतीरावर तो संगम दिसत होता. तिथेही गर्दी दिसत होती. दोन्ही तीरांवरची नजरेच्या आवाक्यात येईल तेवढी शोभा पहात पुढे जाऊ लागलो.
मध्‍ये एक ओघळ लागला. त्यातल्या खडकांवरुन मी तो ओलांडला.
आत्मशून्य मात्र मागेच थांबला.
नर्मदा, तिच्यातून निघालेली पाण्‍याची चिंचोळी पट्टीही कुठेच ओलांडायची नाही. ती जिथपर्यंत पसरली असेल तिथपर्यंत चालत जाऊन जमिनीवरुनच पुढे जायचे. नर्मदेत येणार्‍या इतर नद्या, ओहोळ, झरे ओलांडले तर हरकत नाही असे जगन्नाथ कुंटे यांच्या पुस्तकात लिहीले आहे.
हा ओढा ओलांडावा की कसे या द्विधा मन:स्‍थितीत आत्मशून्य गांगरला आणि तंतोतत शास्‍त्रोक्त परिक्रमाच करायची असल्याने त्याला तो ओढा ओलांडायचा धीर होईना. त्याने ओढा कुठपर्यंत आहे ते पहाण्‍यासाठी त्याच्या काठावरुन आत जंगलात जायला सुरुवात केली. मी चिडलो होतोच. पण त्याची स्‍थिती समजू शकत होतो. वाद घालणार नव्हतो. सोबत घेतलेल्या हरभर्‍याच्या ओंब्या सोलून तोंडात टाकत मी आपला ओढ्‍याच्या पलिकडे बसलो.
खूप वेळाने तो परत आला. ओढा दूरपर्यंत गेला आहे हे त्याला दिसले असावे.
आत्मशून्याने सॅकमधील कुंटेंची पुस्तके काढून शंका निरसनासाठी पाने चाळत ओढ्‍यापलिकडील खडकांमध्‍ये बसकण मारली. अर्धा तास उलटला तरी त्याला समाधानकारक उत्तर सापडले नसावे. मी कंटाळलो. शेवटी चिडून ओरडलो - जगन्नाथ कुंटेंनाच फोन लाऊन विचार म्हणजे तुझं समाधान होईल.
ते ऐकून तो ''गुड आयडिया.. यू आर दि मॅन'' म्हणाला आणि माझ्‍याकडचा फोन घेण्‍यासाठी त्याने मला ओढ्‍यापलिकडे बोलावलो. गेलो आणि फोन दिला. रेंज नव्हती. तो नर्मदेतल्याच एका टेकाडावर गेला आणि तिथून त्याने पुस्तकात दिलेल्या प्रकाशकांच्या नंबरवर पुण्‍याला फोन लावला. कुंटे सध्‍या नाशिकमध्‍ये आहेत, दोन मिनिटात तिथला नंबर एसएमएसने पाठवतो असे पलिकडून उत्तर मिळाले.
मी पुन्हा ओढा ओलांडून इकडे येऊन बसलो.
कुंटे नाशिकला थांबलेल्या ठिकाणचा नंबर सांगणारा एसएमएस आला. त्याने त्यावर फोन लावला तर कुंटे आत्ताच झोपले असून साडेपाच वाजता उठतील असे उत्तर मिळाले. म्हणजे कल्याणमस्तू! आता हा महात्मा साडेपाच वाजेपर्यंत किंवा समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत ओढ्यापलीकडेच बसून रहाणार आणि त्यात कल्पांतही उलटू शकतो. शूलपाणीतल्या अश्वत्‍थाम्यासारखे हा ही नंतरच्या परिक्रमावासियांना अधूनमधून दर्शन देणार असा विचार करुन मी माझे मनोरंजन करीत शून्यासोबत वाद घालण्‍याची उबळ रोखली.
तासभर उलटला. शेवटी त्याला ओरडून म्हणालो - ''दहा मिनीट ध्‍यान कर आणि तुला जे योग्य वाटेल ते कर.''
त्याला ते काही पटले नसावे.
शेवटी ओढ्‍यापलीकडे जाऊन हा ओढा आहे, ही काही नर्मदा नाही.. तसं पहायला गेलं तर नर्मदेवर धरण आहे त्यातल्याच पाण्‍याचा हा ओढा असू शकतो..असेल किंवा नसेलही.. पण अशी साखरेची साल काढत बसले तर परिक्रमाच पूर्ण होणार नाही..असे कितीतरी ओढे तुला रस्त्यात ओलांडावे लागतील वगैरे युक्तीवाद करुन पाहिले... तो काही बधेना.
मी कंटाळून पुन्हा ओढ्‍यापलीकडे जाऊन बसलो. दहा-पंधरा मिनिटांनी त्याला पुस्तकात उत्तर सापडले. त्याने मला पुन्हा तिकडे बोलावले. नर्मदेतून निघालेला ओघळ ओलांडू नये, इतर झरे, नद्या ओलांडायला हरकत नाही असे काहीतरी वाक्य होते.
तो नर्मदेचा ओहोळ नसून कुठून तरी वाहात आलेला ओढा आहे - ओलांडायला काहीच हरकत नाही अशी खात्री झाल्यानंतर तो एकदाचा पलिकडे आला आणि पुन्हा निर्वेधपणे अंतर कापले जाऊ लागले. आता त्याच्यासोबत वाद घालायला काहीच हरकत नव्हती.
मी मटीअरिलिस्टीक आयुष्‍य मनसोक्त जगून पाहिले आहे.. हे सुरु करतोय तेव्हा ते शास्‍त्रोक्तच असायला पाहिजे हा माझा अट्‍टाहस आहे. उत्तर सापडले नसते तर मी साडेपाच वाजेपर्यंतच काय, रात्रभर तिथेच बसून राहिलो असतो वगैरे उत्तरे त्याने दिली आणि मी या माणसासोबत येऊन कृतकृत्य झालो आणि त्याच्या कर्मठतेला मनोमन नमस्कार केला.
मी पुन्हा एकदा मिपावर हे सगळे लिहिण्‍याचा मुद्दा काढला. मी युजीपंथीय असल्याचा त्याचा आल्यापासूनच गैरसमज होता. त्याला वाटले मी टिका करण्‍यासाठी हे मिपावर लिहिणार आहे.
''माझ्‍यावर काय हवी ती टिका कर.. पण माझ्‍या गुरुंना यात ओढू नको'' कळवळून आत्मशून्य म्हणाला.
मी असे काही करणार नव्हतोच.
हा प्रसंग लिहीला तो आत्मशून्यावरची टिका म्हणून नव्हे हे वेगळे सांगायला नको. प्रसंगातून काय व्यक्त झाले आहे ते वाचकांनीच मला सांगावे.
पुढे चालत राहिलो. तीन-चार कि.मी. मागे पडले असावेत.
नर्मदेचे आता अनेक डोह दिसत होते. डोक्यावरचे केस पिकलेल्या आजोबांसारखे दिसणार्‍या डोंगरांच्या पायथ्‍यापर्यंत जाऊन नर्मदा सागरासारखा भासणार डोह करुन संथपणेपुढे जात होती. उन्हं कलायला उशीर असताना पात्रात जिकडे तिकडे गूढ-गंभीर शांतता दाटली होती. ते दृश्य पाहून ''चानी'' या चित्रपटाची आठवण झाली. त्यातला नावाडी जशी आरोळी मारतो तशी आरोळी मारुन पहावी वाटली.
''हेऽऽहेऽऽहेऽऽ हेयऽऽऽऽऽऽ!!!
प्रचंड जोरात ओरडलो आणि दोन्ही काठ दणाणून सोडले. आरोळीचे प्रतिध्‍वनी विरुन गेल्यानंतर पुन्हा पहिल्यासारखी गूढ शांतता पसरली.
पात्रातील जमिनीच्या पट्ट्‍यांवर टरबूज, काकड्‍या, मका ही पिके घेऊन राखणीला झोपडी करुन रहाणारे लोक दूरवर दिसत होते. माकडे त्या पिकांवर टपून असणारच. ती डगरींवरच्या खैराच्या झाडांवर शेपट्या खाली सोडून निवांत काहीतरी चावत, बगला खाजवत बसलेली दिसत होतीच.
उन्हानं रापलेली शेताची एक कारभारीण सामोरी दिसली. एकटीच पिकाच्या राखणीला थांबलेली असावी. तिला साद घातली -
''नर्मदे हर ''
''हर हर नर्मदे'' तिने उत्तर दिले आणि तिच्या रस्त्याने गेली.
परिक्रमेदरम्यान माणूस दिसला की त्याला ''नर्मदे हर'' म्हणायचे. म्हणजे हा परिक्रमावासी आहे हे त्याला कळते.
चालत राहिलो.
आता पायवाट चढाची आली होती आणि रस्ता प्रशस्त दिसत होता. तो चढून वर आलो. धुळीत दुचाक्यांच्या टायरच्या खूणा उमटल्या होत्या. हा रस्ता एखाद्या आश्रमाच्या दिशेने जात असावा. काही वेळ चालत राहिल्यानंतर आश्रम दिसलाच. त्या वावभर रस्त्याला जोडून असलेल्या डगरीतून सिमेंट विटांनी पायर्‍या बांधून वर प्रशस्त जागी उतारावरच आश्रम होता.
केस पूर्ण पांढरे झालेले, पिकलेले, थकलेले व काठीच्या आधाराने उभे राहून नर्मदेच्या संथ डोहाकडे पहात उभे असलेले एक वृद्ध साधूबाबा दिसले. त्यांना ''नर्मदे हर'' केले.
क्षीण आवाजात त्यांनी उलट ''हर हर नर्मदे'' केले.
म्हणाले - ''खाना खावो.. उपर''
भूक नव्हतीच.
''खाना तो नहीं... पानी है तो पी सकते है'' आशू म्हणाला.
पायर्‍या चढून वर गेलो. एका बाजूला मांडव घातला होता. दोन-पाच भगवे कपडे घातलेले साधू इकडे तिकडे विखरुन होते. एक आमच्याएवढाच तरुण, दाढी-मिशा राखलेला, डोळ्यात काजळ घातलेला साधू यज्ञकुंडाजवळ बसून अंगाला राख फासून घेत होता. अंगावर फक्त लंगोट. राख फासून झाल्यानंतर त्यानं भगवा पंचा गुंडाळला आणि यज्ञकुंडाजवळ काहीतरी खालीवर करीत बसला.
आश्रमात परिक्रमावासी थांबलेले होते. मंडळींची जेवणं नुकतीच आटोपलेली दिसत होती. कारण नळावर गेलो तेव्हा पांढर्‍या कपड्यातले पाच-सात परिक्रमावासी खरकटी भांडी तिथे आणून ठेवत होते.
ओंजळ करुन दोघेही पाणी प्यालो.
ते खालचे वृद्ध साधुबाबा काठी टेकीत वर मांडवात येऊन बसले.
त्यांच्याकडे जाऊन दर्शन घेतलं. त्यांनी परिक्रमा कहां से उठाई म्हणजे कुठून चालायला सुरुवात केली वगैरे विचारणा केली. उत्तर दिले. मोरटक्का किती दूर राहिले ते त्यांना विचारले. त्यांनी मैल आणि किलोमीटर अशा दोन्ही मापात मोरटक्क्‍यापर्यंतचे अंतर किती राहिले त्याचे उत्तर दिले. साधूबाबा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत टिकले होते असे ताडले. पण जास्त काही विचारणा केली नाही.
खाली उतरुन नर्मदे हर म्हणून चालायला सुरुवात केली.
पुढे गेलो तर तारेचे कुंपण घातलेले होते. तारेखालून एक घळ सापडली. मी त्यातून घसरत पुढे गेलो व तारा ओलांडल्यावर अलिकडे उभ्या आशूकडून पिशवी घेतली. तो वर जाऊन तारांत अंतर जास्त होते तिथून आला.
पुढे चालू लागलो.
पायवाटेभोवती पसरट पाने असलेल्या खैर, ऐन किंवा धावड्याच्या झाडांचे जंगल पसरले होते. जमिनीवर जिकडेतिकडे पडलेली पांढरी पाने उदास वाटत होती. वनविद्येचा अभ्यास नाही म्हणून नक्की झाडे कोणती ते कळले नाही.
चालत राहिलो. नर्मदा खाली सोबतीला होतीच.
समोर पसरलेल्या पायवाटेवर उमटलेल्या प्राण्‍याच्या पायाच्या खूणा पाहून आशू म्हणाला - ''पगमार्क... वाघ असेल की बिबट?''
वाघ-बिबट्‍याच्या पाऊलखूणा तळहातापेक्षा थोड्या मोठ्‍या उमटतात. समोर मातीत उमटलेल्या खुणा लहान होत्या.
लांडगा, कोल्हा किंवा कुत्राही असेल. पुढे चालू लागलो.
आता पायवाट नर्मदेच्या पात्रात उतरून वाळूतून जात होती. औंदुबरासारखी दिसणारी काही खुरटी, काही उंच गेलेली झाडे नर्मदा जिकडे जाते त्या दिशेने वाकली होती. महापुरे वृक्ष जाती तेथे लव्हाळी वाचती. ही झाडे वाकडी-तिकडी वाकल्याने का होईना पण टिकून राहिली होती.
आणखी दोन-अडीच किलो मीटर मागे पडले असावेत.
एक झाड पाहून बसलो आणि सिगारेट पेटवली. थोडावेळ गप्पा मारुन पिशव्या काखोटीला मारल्या व पुढे निघालो. पुढे नर्मदेच्या पाण्‍यात यू टर्नसारखा एक प्रचंड प्रस्तर शिरला होता. त्याच्या मागच्या बाजूने आत जाता येणार नाही अशी झाडांची किर्रर्र दाटी. जवळ गेल्यानंतर पायवाट त्या प्रस्तराच्या कडातून वर चढत गेलेली दिसत होती. मी पुढे व तो मागे राहून हळू हळू ते प्रचंड खडक चढू लागलो. वरुन नर्मदेचा पंचवीस तीस फुट खाली पसरलेला डोह भयानक वाटत होता. पण हीच पायवाट बरोबर आहे असा संकेत करणारे छोटे भगवे ध्वज चाळीस-पन्नास फुटांवर त्यात रोवून ठेवलेले दिसले. हळूहळू चढलो आणि पुढच्या मोकळ्या जागी उतरलो. समोर एक कुलुप लावलेले मंदिर दिसले. चालत राहिलो.
समोर नर्मदेचे विशाल पात्र दूरवर नजरेत येत होते आणि नर्मदेच्या दोन्ही डगरी जोडणार्‍या पुलाची पुसट रेष लांबवर दिसत होती. तो पुल मोरटक्क्‍याचा होता. नेमका किती अंतरावर असेल तो पाहून अंदाज येत नव्हता.
पुढे आणखी एक छोटा आश्रम लागला. कसलीतरी अनोळखी मूर्ती शेंदूर फासून एका झाडाखाली उभी केलेली होती. शेजारी ओटा करुन समाधी बांधलेली होती आणि वर महादेवाची पिंड होती.
थकवा आल्याने मी त्या ओट्यावर जाऊन बसलो. तिथे झोपडीत एक माणूस बसलेला आशूला दिसत होता, तो माझ्‍या नजरेआड होता.
तिथे समाधीच्या ओट्यावर बसू नको, तो चिडेल असे आशू म्हणाला. थकलोच एवढा होतो की कुणी काही चिडत नाही म्हणालो.
थोड्या वेळाने लाकडी फाटक ओलांडून झोपडीकडे गेलो. इथे साधू वगैरे कुणी नव्हते. तो एकटाच माणूस पँट-बनियनवर बसला होता.
''नर्मदे हर''.. ''हर हर नर्मदे'' झालं.
त्या माणसाला मोरटक्का किती दूर राहिले विचारले तर त्या माणसाने हाताने दाखवत -
''सामने पुल दिख रहा है बस वही मोरटक्का.. पांच किलोमीटर है''
असे उत्तर मिळाले. झोपडीपलीकडचं फाटक ओलांडून पुढे गेलो. काही वेळ चालत राहिलो.
पुढे नर्मदेचा सपाट तीर होता. पसरट पात्रात अनेक लहान लांबट मोटरबोटी नर्मदेतील वाळू काढण्‍याच्या कामात गुंतल्या होत्या. त्यांच्या एंजिन्सचा आवाज घुमत होता. वाळूच्या ओझ्यानं एक बोट तर एका बाजूनं एवढी काठोकाठ बुडली होती की तीत बसलेली माणसे आतलं पाणी उपसून बाहेर फेकत होती. मला वाटलं पाणी आत शिरतंय आणि ती बोट बुडत आहे. पण बोटीत भरलेल्या वाळूतून पाझरलेलं पाणी ते बाहेर फेकत होते.
सूर्य बुडण्यासाठी कासराभर अंतर बाकी होते.
तिकडे नाशिकमध्‍ये असलेले जगन्नाथ कुंटे उठले असतील म्हणून आशूने त्यांना फोन लावला.
तु जवळ उभा राहू नको म्हणाला. त्याला वाटले मी मध्‍ये काही बोलून नसता घोळ करणार. त्याला बरंच मागे सोडून पुढे आलो.
कुंटेंनी आशूला ''परिक्रमेत आहेस की मजा म्हणून भ्रमणात आहेस? नर्मदेतून फोन कसा काय लावता येतोय? सुरुवातीला नर्मदेचा असा कोणताही ओघळ नाहीय.. तु नक्की नर्मदा परिक्रमेतच आहेस काय? ‍वगैरे विचारून आशूची टोपी उडवली.
ओढे, नाले पार करावे लागतातच असे समाधानकारक उत्तर मिळाल्याने शेवटी हा त्रस्त समंध शांत झाला.
पुढं गेल्यावर एक आश्रम लागला. त्यात वस्तीला राहिलेले परिक्रमा‍वासी पुढे निघत होते. आश्रमधारी दाढीवाले साधू त्यांना निरोप द्यायला सिगरेटचा धूर सोडत अर्ध्‍या पायर्‍यापर्यंत येऊन थांबले होते.
''नर्मदे हर'' ''हर हर नर्मदे'' झालं.
त्यांनी कुठुन परिक्रमा सुरु केली वगैरे विचारणा केली. ''प्रमाण-पत्र'' आणलंय काय तेही विचारलं.
''यहां रुकना है तो रुक सकते हो, लेकीन खाना खुद बनाके खाना होगा.. अगर रुकने की इच्छा नहीं है तो तीन किलोमीटर पर अगला आश्रम है.. सूर्यास्त होनेवाला है.. असं म्हणून आमच्या उत्तराची वाट न पाहता ते आत निघून गेले.
तेवढ्‍यात मागच्या आश्रमात नळावर खरकटी भांडी आणून ठेवणार्‍या परीक्रमींनी आम्हाला मागून येऊन गाठलं.
सात-आठ लोकांचा तो गट होता.
इथे थांबायचे की पुढे जायचे यासाठी त्या गटाच्या म्होरक्याने सगळ्यांना विचारणा केली व त्यांचे तिथेच रहायचे ठरले.
त्यातला एक निबर म्हातारा क्या है.. क्या है म्हणून म्होरक्यासमोर येऊन थांबला. त्यांना कमी ऐकू येत असावं. कारण म्होरक्या जे काही बोलला त्याचा भावार्थ असा - ''काही नाही झालं.. थांबायचं की पुढे जायचं ते सगळ्यांना विचारतोय.. तु लोड घेऊ नको. तुला एक गोष्‍ट चार वेळा सांगितली तरी तुझ्‍या टकुर्‍यात शिरत नाही.''
मग ते चार पाच जण वर आश्रमात निघून गेले.
आत्ताच म्होरक्याची बोलणी खाल्लेला वृद्ध तो म्होरक्‍या जे बोलला ते खरंच आहे असा भाव चेहेर्‍यावर घेऊन त्याचं बोचकं पायरीवर ठेऊन आमच्या सोबतच थांबला.
मी सिगारेटचं पाकिट काढून एक त्यांना दिली. माचीस पुढे केली तर ते म्हणे - ''माचीस है.''
आम्ही दोघांनी त्या पायर्‍यांवर बसून थोडावेळ धूम्ररेषा काढल्या.
मग मागून आलेल्या एका तुरुतुरु चालणार्‍या, दंताजीचे ठाणे उठून गेलेल्या सत्तरीच्या बाबांनी अगदी तोंडासमोर तोंड जवळ आणून आमची विचारपूस केली.
''किन्नु परकम्मा उठाई? एथ्‍थे र्‍हो.. सूर्यदेव रास्ता काट निकल्या'' म्हणाले.
आप कहां से आये है? विचारल्यानंतर पंजाबातील कुठल्यातरी अवघड नावाचा जिल्हा सांगितला.
कितने दिन से परिक्रमा शुरु है विचारल्यानंतर आमची परिक्रमा तर विनाकांक्ष आहे.. वाटेल तेव्हा सुरु, वाटेल तेव्हा बंद.. संकल्प वगैरे काही सोडलेला नाही असे त्यांनी त्यांच्या अपरिचित तरी कळू शकणार्‍या पंजाबीत सांगितले आणि वर आश्रमात निघून गेले.
मागून आलेल्या गटामधल्याच, ओमानी म्हातार्‍यांसारखा पेहराव केलेल्या तीन वृद्धांनी, बोलण्‍यात वेळ न घालवता पुढे झटझट रस्ता कापला आणि सायंकाळच्या निस्तेज होत जाणार्‍या उजेडात दिसेनासे झाले. ही अगदी राकट-रासवट त्रिमूर्ती एका जगद्विख्‍यात व्यावसायिकाच्या जन्मगावचे रहिवासी आहेत हे पुढे कळले.
आमच्या जवळ शिजवून खाण्यासारखे काही नव्हते. चुलीत नुसता जाळ फुंकला असता तरी इतर परिक्रमींनी आम्हाला उपाशी ठेवले नसते. पण आशूला शेजारच्याच छोट्याशा वस्तीतील घराकडे परतणार्‍या लोकांनी पुढे चांगला आश्रम आहे तिथे थांबायला सांगितले होते.
पुढे निघालो.
(पुढच्या भागात आपण आत्मशून्याला परिक्रमेत एकटे सोडून परतणार आहोत)

12 जानेवारी 2012

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - ३

बाजूलाच असलेल्या पुस्तकांच्या दुकानात गीता प्रेसची उपनिषदे आणि चारी वेद विकायला ठेवले होते. श्रीमद् विद्वद्वर - वरदराजाचार्यप्रणित लघुसिद्धांतकौमुदी होते. संस्‍कृत पूर्णपणे समजण्‍याच्या नावाने बोंब.. पण उगाच किडा म्हणून ती स्वस्तातली खरेदी केली आणि भक्तनिवास गाठला.
भक्त निवास गाठण्यापूर्वी मला चहा प्यायची हुक्की आली. माझ्यासोबतचा महानुभाव "पहिल्यापासूनच उत्तेजक पेयापासून अलिप्त" होता. पण परिक्रमेत चहा प्यावाच लागणार आहे तेव्हा आतापासूनच सवय कर म्हणून आशूवर मी दर तासाला चहाचा मारा सुरु केला होता.
घाटावरच टपरी होती. समोर रात्रीच्या वेळी झळाळून निघालेला ओमकारेश्वराचा पैलतीर आणि मध्ये संथपणे वाहाणारी नर्मदा. डोक्यावर जटाभार राखलेले साधू, इकडेतिकडे पहात घाटावर हिंडणारे फॉरेनर्स अशी तुरळक गर्दी.



टपरीसमोर टाकलेल्या खुर्च्यांवर जाऊन बसलो. आम्ही चहा घेताना त्या टपरीसमोर दोन लहानग्या मुली टपरीसमोर ठेवलेल्या पदार्थांकडे आशाळभूतपणे पहात होत्या. अंगावर फाटके कपडे आणि थंडीने काकडतही होत्या. त्यांच्याकडे नजर लाऊन थोडावेळ पहात राहिलो.
इकडे या आणि तुम्हाला काय खायला पाहिजे ते घ्या असे त्यांना सांगायला उठणार तेवढ्यात एक जीन्सपँट-जॅकेट-कानटोपी घातलेला बाप्या मध्येच उपटला व त्या दोन्ही चिमुकल्यांना त्याने पाठीवर दोन-दोन धपाटे घातले -
"भागो यहां से, घर जा के मरो.."
असे बडबडत आमच्याकडे तिरस्काराने पाहून तो निघून जाऊ लागला. तेवढ्यात टपरी मालकाने त्या बाप्याला झापले -
"अरे उनको काहे भगाया? वो बर्तन माँजने और कुछ खाने के लिये इधर आती है.. "
"पानी में उतर गई थी - ठंड से मरमरा रही थी..बर्तन काहे माँजती..  " असे म्हणत तो बाप्या घाटावरच्याच एका गल्लीत निघून गेला. त्या लहान मुली त्याच्याच किंवा त्याच्या भाईबंदांपैकी कुणाच्या तरी असाव्यात.
थोडावेळ तिथे बसून राहिलो व टपरीवाल्याला पैसे देऊन निघालो. टपरी वाल्यानं परत दिलेल्या जीर्णशीर्ण नोटा घेतल्या. त्या नोटा पाहून आत्मशून्य हसू लागला. इकडे फाटक्या नोटा सर्रास वापरल्या जातात. देणाराही काही बोलत नाही व घेणाराही. कितीचीही नोट देऊन सुटे मागितले तर मिळून जातात. नोट परत अंगावर फेकली जात नाही. पैसे दिले की काही न बोलता सुटे परत मिळतात हे पाहून शून्य फक्त रडायचा बाकी होता. पुण्यपत्तन क्षेत्री बस वाहकाने आशूला सुटे नसल्याने पायीच चालण्याचे बोधामृत पाजले होते.
"नोट फटी हुयी है.. दुसरी दो.." असे आपण म्हणालो तर इकडच्या लोकांना तो लक्ष्मीचा अपमान केल्यासारखे वाटते.
लक्ष्मी को फटा हुआ कहते हो - पापी कहीं के - कहां से आये हो ? असा भाव त्यांच्या चेहेर्‍यावर स्पष्ट दिसतो. पण इथून तिथून फाटक्याच नोटा का वापरल्या जातात त्याचे शास्त्रीय कारण आमच्या कँटीनवाल्याने माझ्या अंगावर फेकून मला निरुत्तर केले होते. इथे नवा होतो तेव्हा त्याच्याकडून रोज-रोज फाटकी नोट परत घेऊन मी चिडलो होतो. कधीतरी धडकी नोट देत जा, इकडे चांगल्या नोटा वापरूच नयेत असा नियम आहे काय असे काहीबाही बोललो होतो.
"खोटे सिक्के चलन में लिये दिये जाते है तब खरे सिक्के ब्यवहार से बाहर होकर तिजोरी में बंद हो जाते है.. आप हम को अच्छी नोट दो - हम भी आपको अच्छी नोट देना शुरु करेंगे.."  असा यक्षप्रश्न मांडून त्याने बोळवण केली होती. आता सगळेच फाटक्या नोटा परत देत असतील तर कोर्‍या नोटा मी काही प्रिंटरमधून काढणार नव्हतो. असो.

तर नुकत्याच विकत घेतलेल्या पुस्तकांचे ओझे कधी या, कधी त्या हातावर तोलत आम्ही भक्त निवास गाठला. शास्त्रीजींनी साडेसात आठला पुन्हा मंदिराकडे यायला सांगितले होते. उद्या सकाळच्या "नर्मदा पूजन - कढाई" च्या विधीची ते त्यांच्या भावाशी भेट घालून देऊन तजवीज करून देणार होते. आठ वाजायला अजून वेळ होता म्हणून आणलेली पुस्तके कुठे, कधी घेतली त्याच्या तारखा पुस्तकांवर घातल्या.

कालपर्यंत परिक्रमेचे कसे होईल, काय होईल ही चिंता करणारा शून्य काल बाळाशास्त्रींची गाठ पडून योग्य तो मार्ग सापडल्याने निर्धास्त झाला होता. इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना साडेआठ कधी वाजले ते कळले नाही. तिकडच्या तीरावर जाऊन यायचे होते. तो झुलता पुल ओलांडून ओमकारेश्वराच्या मंदिरात पोहोचलो.
तिथे झांज, ढोलक, पेटीवर त्या विशिष्ट उत्तर भारतीय ठेक्यावर भजन रंगले होते आणि लोक टाळ्या वाजवत डुलत होते.
भजनात प्रचंड जोरात टिपेला जाणारा तो ढोलक आणि भजनाला चढलेल्या त्या रंगातून शिवशंभोच्या तांडव नृत्याची झाक दिसत होती. गाभार्‍यात ओंकारेश्वराची शयनपूजा सुरु होती त्यामुळे दारावर मखमली पडदा टाकलेला होता. भजन संपून आरती सुरु झाली. शंकराचार्यांनी रचना केलेले नर्मदाष्टक आणि कुणा शिवानंद स्वामींनी रचलेली प्रासादिक आरती सुरु झाली. दोन्हींची लय एवढी सुंदर होती की मन आतल्या आत उड्या मारू लागले आणि डोळे आपोआप मिटले जाऊन त्या तालासुरावर लोक डुलायला लागले -

सबिन्दु सिन्धु सुस्खलत् तरंग भंग रंजितम
द्विषत्सुपापजातकं आरिवारि संयुतम्
कृतान्तदूत कालभूत भीतिहारि नर्मदे
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे
त्वदाम्बुलीन दीन मीन दिव्य संम्प्रदायकं
कलौमलौघ भारहारि सर्वतीर्थ नायकम्
सुमस्यकच्छ नक्रचक्र चक्रवाक शर्मदे
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे

त्यानंतर आरती सुरु झाली

ओम् जगतानंदी.. हो मय्या जय जगतानंदी.. हो रेवा जगतानंदी
ब्रह्मा हरिहर शंकर.. रेवा शिवहर शंकर रुद्री पालंती
हरि ओम जय जगतानंदी
देवी.. नारद शारद तुम वरदायक अभिनव पदचंडी
हो मय्या अभिनव पदचंडी.. हो रेवा अभिनव पदचंडी
सुरवर मुनिजन सेवत.. मुनिजन ध्यावत शारद पदवंती
देवी धूम्रक वाहन राजत वीणा वाजयंती
हो मय्या वीणा वाजयंती.. हो रेवा वीणा वाजयंती

झुमकत झुमकत झुमकत
झनन झनन झनन रमती राजंती
देवी बाजत तालमृदंगा सुरमंडल रमती
हो मैय्या सुरमंडल रमती .. हो रेवा सुरमंडल रमती
तोडिताम् तोडिताम् तोडिताम्
तुडडड तुडडड तुडडड  रमती सुरवंती
हरि ओम जय जगतानंदी..


आरती-प्रसाद-दर्शन झाले आणि आम्ही शास्त्रीजींना शोधू लागलो. इकडे तिकडे पाहिले पण ते कुठेच दिसेनात. शून्य अस्वस्थ व्हायला लागला. उद्याचे नियोजन ठरणे महत्वाचे होते. अर्धा तास शोधाशोध आणि विचाराविचारात गेला. शेवटी त्यांना फोन लावलाच. त्यांना विचारले "कहां है आप? हम मंदिर में आपके लिये रूके है.."
तर तिकडून उत्तर मिळाले, "हम तो घर में विश्राम कर रहें है.."
दिवसभराच्या लगबगीनं थकून ते घरी परतले होते आणि त्यांच्या भावाला त्यांनी आमच्यासाठी मंदिरात थांबवून ठेवले होते. गर्दी फार नव्हती तरी त्यांच्या भावाला आम्ही ओळखू आलो नाही आणि हुकाचूक झाली.

आता सकाळी साडेसात किंवा जास्तीत जास्त आठपर्यंत मंदिरात या व सापडलो नाही तर फोन करा असे सांगून त्यांनी नर्मदे हर म्हणून फोन ठेवला. आत्मशून्याची धाकधुक पुन्हा सुरु झाली - काय होईल.. कसे होईल. परिक्रमेच्या रस्त्यावर पाय ठेवेपर्यंत त्याला सुख झाले नाही.
पुन्हा घाटांवर इकडेतिकडे फिरण्यात वेळ घालवला. भक्त निवासात गेलो तेव्हा पावणे दहा वाजले होते. तिथली प्रसादाची वेळ उलटून गेली होती.
भक्त निवासासमोरच्या हॉटेलमधून काहीतरी घेतले आणि रूम जवळ केली.
---------

रात्री पडल्यापडल्या ईशावास्योपनिषदाचा हिंदी अनुवाद उलटून पाहिला. पहिल्याच श्लोकात आकाश दाखवणारं पुस्तक आयुष्यात पहिल्यांदाच हातात पडलं होतं -

ईशावास्यमित्यादयो मन्त्रा:
ईशादि - कर्मस्वनियुक्ता: |
मन्त्राणां तेषामकर्मशेष्स्यात्मनो विनियोगः
याथात्म्य प्रकाशकत्वात् याथात्म्यं चात्मनः |
शुद्ध्त्वापापाविद्ध्त्वैकत्व नित्यत्वा शरीरत्व सर्वगतात्वादि वक्ष्य माणम्
तच्च कर्मणा विरुध्येतेति युक्त एवेषां कर्मस्विनियोगा: |

ईशावास्यम् इत्यादी मंत्रांचा कर्मात विनियोग होत नाही - कारण ते आत्म्याच्या यथार्थ रुपाचे प्रतिपादन करतात, जो कर्माचा भाग नाही.
आत्म्याचे यथार्थ स्वरूप शुद्ध, निष्पाप, एकत्व, नित्यत्व, अशरीरत्व आणि सर्वगतत्व इत्यादी असून त्याबद्दल पुढे सांगण्यात आले आहे.

न ह्येवंलक्षणमात्मनो याथात्ममुत्पाद्यं विकार्यं माप्यं संस्कार्यं कर्तृभोक्तृरुपं वा ये कर्मशेषता स्यात् |
सर्वासामुपनिषदा मात्मयाथात्मा निरूपणे नैव उपक्षयात्
गीतानां मोक्षधर्माणां चैव परत्वात् |
तदात्मानोनेकत्व कर्तृत्वभोक्तृत्वादी चाशुद्ध्त्व पापविद्ध्त्वादि चोपदाय लोकबुद्धी सिध्दं कर्माणी विहितानी |

आत्म्याचे अशा लक्षणांचे यथार्थ स्वरूप उत्पाद्य, विकार्य, आप्य आणि संस्कार्य किंवा कर्ता-भोक्ता रुप नाही, जेणेकरून तो कर्माचा भाग रूप होईल. संपूर्ण उपनिषदांची परिसमाप्ती आत्म्याच्या यथार्थ स्वरुपाचे निरूपण करण्यातच होते आणि गीता व मोक्षधर्म यासाठीच अस्तित्वात आहेत. त्यामुळे आत्म्याची सामान्य लोकांच्या बुद्धीतून अनुभवास येणार्‍या अनेकत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व तसेच अशुद्धत्व आणि पापमयत्व यांना विचारात घेऊनच कर्माचे विधान करण्यात आले आहे.

या वाक्यांची फोड करुन त्यांचा अर्थ मनात भिनला, भिनत जाऊ लागला. आत्मा जर शुध्द, निष्पाप, एक, नित्य, अशरीरी आणि सर्वगत आहे तर तो अनुभवण्यास एवढा दुस्तर का आहे? कर्माशी आत्म्याचं काही देणं-घेणं नाही हे ही आहेच. मग नेमकी काय भानगड आहे? खरंच काही अडचण आहे की मुळात काहीही अडचणच नाही? हे एवढं सोपं असेल तर मुदलातच काही घोळ होतो आहे एवढं निश्चित. बुद्धीला ताण देण्यापेक्षा ही वाक्ये पुन्हा-पुन्हा मनात भिनवू लागलो व झोप डोळ्यांवर उतरु लागली पण मध्येच आपोआप दोन्ही नाकपुड्यांतून एकदाच श्वासोश्वास सुरु होऊन अंधार व्हायला लागला आणि मरण जवळ आलं असं दर श्वासाला वाटू लागलो. रात्रभर हेच चालू. नसती भानगड झाली. या कुशीवरुन त्या कुशीवर होता होता साडेचार-पाचला कधीतरी झोप लागली. तेव्हा आत्मशून्य जागा होऊन काहीतरी खुडबूड करीत होता.
-----------

काल रात्री हॉटेलातून घेतलेल्या रतलामी सेव फरसाणानं पोट बिघडल्याचे शुभवर्तमान त्याने साडेसात- आठला उठल्यावर जाहीर केले. माझी पण रात्रभर झोप झाली नव्हती.

चहापाणी आवरुन पटकन ओमकारेश्वर मंदीर गाठलं. बाळाशास्त्रींना फोन लावला.
"हम जरा बालक को पाठशाला में छोडने आये है, बंधू आप ही की ओर निकले है.. " 
ओमकारेश्वराच्या पुजार्‍यालाही बालक को पाठशाला छोडने जाना पडता है हे पाहून हसू आलं.
पंधरावीस मिनिटांत बाळाशास्त्रींचे बंधूराज शोधत आलेच. समोरच्या घाटावर जाऊन "क्छौर" करुन घ्या, मी प्रसादाचा शिरा व पूजेचं साहित्य घेऊन पोचतो म्हणाले. दक्षिणा वगैरेबद्दल विचारून घेतलं आणि पुन्हा एकदा पुलावरुन अलीकडच्या काठावर आलो.


"क्छौर" केलेला तो गुटगुटीत आत्मशून्य वैदिक काळच्या बटू सारखा पण अनोळखी दिसू लागला. पैसे काढावे लागणार होते. एटीएम मशीनकडे गेलो तर कुणा येठनछाप माणसानं त्या गावातल्या एकुलत्या एक एटीएम मशीनचं वायर उपटून फेकलं होतं. शून्याच्या अस्वस्थपणाचा पारा पुन्हा १२० अंशांवर गेला. हे एटीएम दुरुस्त व्हायला दुपारचे बारा वाजतील पण नक्की होईल अशी माहिती त्या भल्या पहाटे एकटाच बँकेत काही खुडबूड करणार्‍या इसमाने दिली.
एटीएम असलेलं दुसरं गाव तिथून १२ कि. मी. वर असल्याची माहिती एका सज्जन दुकानदारानं दिली.
शेवटी आशूकडे असलेल्या हजार-दीड हजारात शास्त्रीजींना तात्पुरतं संतुष्ट करु असं ठरवून घाटावर परत आलो व त्यांना अडचण सांगितली तर - "कोई समस्या नहीं.. पहले पूजा निपटा लेते है"  म्हणून स्नानं करुन घ्यायला सांगितले.
घाटावर पूजेचं साहित्य आणि कपडे ठेवले होते. नर्मदेच्या लाटा तिथपर्यंत येऊन आदळल्या आणि कुंकुम, अक्षता ठेवलेलं ताट सोबत घेऊन गेल्या.
"इनकी पूजा लेने के लिये नर्मदाजी आतूर हो गई है" असं शून्याकडे पाहून म्हणालो तेव्हा शास्त्रीजी हसू लागले. नर्मदेत रोजच्या रोज वर जवळच असलेल्या धरणातून पाणी सोडलं जातं. 
नर्मदेचे पंचामृताने पूजन करताना आत्मशून्य गडबडून गेला - त्यात पुन्हा शास्त्रीजींचे १२० च्या स्पीडने होणारे मंत्रोच्चार आणि नेमके काय करायचे त्याबद्दल मध्ये मध्ये सूचनांचा मारा.



नर्मदा मैय्या को जल चढाईये ऐकल्यानंतर हा पठ्ठ्या गडू नर्मदेत टाकू का असे विचारता झाला.
त्याला काठावर उभं करुन पंडितजींनी पंचामृताचे द्रोण त्याच्या हातात पोहोच करण्याकामी उघड्याबंब असलेल्या आमची नेमणूक केली. पाणी सतत वाढत असल्याने काठापासून दूर एका बाकड्यावर पूजा सुरु होती.
नर्मदेची पूजा संपन्न झाली आणि कुमारिकांच्या रुपातील नर्मदेचे पूजन सुरु झाले. घाटावरच्या यात्रेकरूंच्या दोन मुली आणि काल त्या टपरीसमोर दिसलेल्या दोन आणि आणखी त्यांच्यासोबतची एक अशा पाच जणींनी दक्षिणा व प्रसाद स्वीकारून आशूच्या मस्तकावर आशिर्वादाचा हात ठेवला. पंडीतजींनाही दक्षिणा पावली.
परिक्रमीला ओंकारेश्वर नगर परिषदेकडून प्रमाणपत्र घ्यावे लागते. वाटेत काही संशयात्मे "प्रमाण - पत्र" पाहिल्याशिवाय थांबायला परवानगी देत नाहीत आणि परिक्रमा करणार्‍याने ते  सोबत ठेवणे चांगलेच. परिक्रमेदरम्यान काही ठराविक गावात थांबल्यावर त्या प्रमाणपत्रावर तिथला शिक्का घ्यावा लागतो. प्रमाणपत्रावर पूजा सांगितलेल्या गुरुजींचीही स्वाक्षरी असते. ते तयार करण्यासाठी आशू व पंडीतजी घाटावरच असलेल्या नगर परिषदेकडे निघाले आणि एटीएमकडे सुटलो. एटीएमचे वायर जोडले गेले होते. परत येऊन त्या दोघांना गाठले व पंडीतजींना राहिलेली दक्षिणा देऊन मार्गस्थ केले.
आता पोटात काव-काव सुरु झाली होती. हॉटेलमध्ये ताजा पदार्थ काहीच दिसेना पण त्याने त्याचे भजे फार स्वादिष्ट असतात असे सांगून समोरच्या "स्वादिष्ट भजिये" वाल्याकडे जायची शिफारस केली. लिंबू, मीठ मारलेले ते भजे एकट्याने हादडले. पोट बिघडल्याने शून्याने  फक्त संत्र्याच्या रसावर समाधान मानले. भजिये वाल्याला मेडिकल विचारले तर त्याने त्याच्याकडच्याच गोळांचा साठा धुंडाळला. तो केमिस्टही होता. पण हवी ती गोळी मिळाली नाही. त्याने सांगितलेली पावरबाज गोळी दुसर्‍या मेडीकलवर जाऊन आणली.
आता आशूचा निरोप घेण्याची वेळ आली होती. घाट उतरला की त्याची नर्मदा परिक्रमा सुरु होणार होती. पण मला जावे वाटेना. शास्त्रीजींनी पहिला पडाव ओंकारेश्वरहून १२ कि.मी. वर असलेल्या मोरटक्क्यात होईल असे सांगितले होते. मला असेही बसमध्ये बसून मोरटक्क्याहूनच पुढे जावे लागणार होते. त्याऐवजी शून्यासोबत चालत मोरटक्क्याला जाऊ आणि रात्री इंदूरला परत येऊ असे ठरवून घाट उतरायला सुरुवात केली.

(क्रमशः)