६ मार्च, २०१०

सोपे ध्यान


ध्यान कसे करावे याबाबत मी थोडेसे लिहीत आहे. ध्यान म्हणजे एकाग्रता, नाकाच्या शेंड्यावर चित्त एकाग्र करुन बसणे असा एक गैरसमज असतो. ध्यान म्हणजे सतत जागेपणा राखणे. आता सतत जागेपणा राखायचा कसा? त्याला सुरुवात आपोआप होते आणि त्यासाठी श्वसनावर आधारीत काही सोप्या पद्धती आहेत. मांडी घालुन, पाठीचा कणा ताठ राहील अशा प्रकारे बसावे. शरीरात कुठेही ताण पडु देऊ नये. डोळे मिटुन घेऊन दहा मिनिटांपर्यंत आपल्या श्वासाच्या येण्या-जाण्यावर, आणि मनात उमटणा-या विचारांकडे पाहावे. पूर्ण शक्तिनिशी श्वास आत घ्यावा, तो आत येत असताना त्याची जाणीव होऊ द्यावी, श्वास बाहेर जातानाही जाणीव व्हायला हवी. मनात येणारे विचार फ़क्त पाहायचे आहेत...त्यांच्यासोबत वाहातही जायचे नाही आणि त्यांना विरोधही करायचा नाही. हा प्रकार दहा मिनीटे चालु द्यावा. दहा मिनीटांनंतर खुप ताजेपणा येईल. पुढच्या दहा मिनिटांत ही क्रिया चालुच राहिल, पण आणखी एका गोष्टीची त्यात भर पडेल ती म्हणजे आपल्या आजुबाजुला होणारे आवाज (रस्त्यावरुन गाड्या जाणे, लहान मुलांचा दंगा इ.इ.). हे आवाज मनात कोणतीही तक्रार येऊ न देता ऐकायचे आहेत. ध्यान मात्र दीर्घ आणि खोलवर चालणा-या श्वासावरच राहील. पहिल्या दहा मिनिटांत पूर्ण शक्ती लावली असेल तर आता होणारे आवाज ऐकत असताना आणि आवाज बंद झाल्यावर फ़ार शांत वाटु लागेल. हे दहा मिनीटे. पुढची दहा मिनीटे ज्या प्रतिक्रिया होतील त्यांना होऊ देण्याची आहेत. ध्यानात पुर्ण शक्ती लावली असेल तर त्या नक्कीच होतील - येतील. या प्रतिक्रियांना रोखायचे नाही. त्या काय आहेत ते अनुभवानेच कळलेले उत्तम !

प्राचार्य शिवाजीराव भोसले


प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे व्याख्यान म्हणजे एक सुखद अनुभव असतो. काळा कोट (टाय शिवाय), पांढरी प्यांट आणि पायात बाटाच्या साध्या चपला अशा पोषाखात प्राचार्य माईकसमोर उभे राहतात आणि "बंधुभगीनींनो" या संबोधनाने किंवा अगदी थेट ते विषयाला हात घालतात. व्याख्यानापुर्वी केले जाणारे यांना हार घालणे, त्यांची ओळख करुन देणे, यांनी थोडे बोलावे असले सोपस्कार त्यांना आवडत नाहीत. एकदा पैठणला त्यांचे व्याख्यान होते. कुठ्ल्याही सोपस्काराशिवाय त्यांचे व्याख्यान सुरु झाले. ते त्यांना फ़ार आवडले. "पाहुण्यांनी उठावे, आणि दीपप्रज्वलन करावे, आता पाहुण्यांनी आसन ग्रहण करावे, आता पुन्हा एकदा उठुन थोडे हलावे" असे सांगुन सुत्रसंचालक व्याख्याता म्हणुन आणलेल्या पाहुण्याला काही कळतच नाही असे समजत असतो असा शेरा मारुन त्यांनी टाळया घेतल्या होत्या. व्याख्यानाचा विषय असावा अशीही त्यांना गरज वाटत नाही. उठुन सरळ माईक समोर उभे राहावे आणि आपल्या विचारांना मोकळे होऊ द्यावे, एकापाठोपाठ विचार येत राहातात, व्याख्यान फ़ुलत राहाते अशी त्यांची धारणा.
त्यांच्या व्याख्यानात एक प्रवाहीपणा आहे. प्राचार्य बोलत राहातात, कधी ते श्रोत्यांना मधुनच एखादा बोलण्याच्या ओघात आलेला किस्सा सांगुन हसवतात. बहुतांशी वेळा "व्याख्यान" याच विषयापासुनच ते बोलायला सुरुवात करतात. त्यांच्या विद्यार्थीदशेत त्यांनी कुणा-कुणाची व्याख्याने ऐकली, त्यांची वैशिष्ट्ये आणि अभ्यासविषय ते नमुद करतात.
प्राचार्यांची शैली एवढी मोहक की त्यांची व्याख्याने ऐकुन त्याच शैलीत भाषण करणारे अनेक हौशी "भाषण बहाद्दर" पहाता येतील. एकदा मी त्यांचे भाषण ऐकुन भारावलेल्या अवस्थेत त्यांना एक पत्र पाठवले होते. हे पत्र मी टाईप केले होते. पत्रोत्तर येईल अशी मला निश्चित आशा होती. पण ते आले नाही. फ़ोनवरुन बोलताना त्यांनी सांगितले की, "पत्र स्वत:च्या हाताने लिहावे (क्रमश:) ."