१४ मे, २०१२

विस्‍टिरिया लॉज - 2

आमच्या पाहुण्‍यांना निरोप दिल्यानंतर काही वेळ आम्ही शांत बसून राहिलो. बारीक झालेल्या डोळ्यांवर भूवया पाडून नेहमीप्रमाणे त्याचे डोके पुढे काढून होम्स जोरजोराने धूम्रपान करु लागला.
'' तर वॉटसन'' माझ्याकडे अचनाक वळून तो म्हणाला,
''या सगळ्यातून तुला काय कळले?''
''स्कॉट एक्लसच्या गूढाबद्दल मला काहीच समजले नाही''
''पण गुन्ह्याबद्दल?''
''त्या माणसाचे साथीदारही गायब आहेत त्याअर्थी, मी असे म्हणेन की तेदेखील या खूनात सहभागी होते, म्हणूणच ते फरार आहेत''
''एका दृष्‍टीकोनातून हेदेखील शक्य आहे. पण असे असले तरी, त्याच्या दोन नोकरांनी गार्सियाविरुद्ध संगनमत करावे आणि त्याच्याकडे पाहुणा आलेल्या रात्रीच त्याच्यावर हल्ला करावा, हे विचित्र आहे हे तू पण कबूल करशील. गार्सियावर हल्ला करायचा असता तर हा नेमका दिवस सोडून तो कधीही त्यांच्याच तावडीत होता ना?''
''मग ते फरार का झाले?''
''अगदी अचूक! ते फरार का झाले? हा एक मोठा मुद्दा आहेच. आणखी एक मोठा मुद्दा म्हणजे आपला अशील स्कॉट एक्लसचा अनाकलनीय अनुभव. या दोन्ही ठळक मुद्यांना सांधणारे विश्लेषण देता येणं हे मानवी बुद्धीमत्तेला शक्य आहे काय? शब्दांचा विचित्र वापर करुन लिहिलेली ती गूढ चिठी विचारात घ्‍यायचीच असेल, तर ती तात्पुरते गृहितक म्हणूनच विचारात घेण्‍याच्या लायकीची असेल? आपल्याला कळणारी नवी तथ्‍ये, आपोआप आपल्या गृहितकाच्या साच्यात बसली तर आपले गृहितक हळूहळू या प्रकरणाची उकल करु शकेल.''
''आपले गृहितक आहे तरी काय?''
त्याच्या खुर्चीत मागे झुकून होम्सच्या डोळ्यांची मुद्रा मंगोल झाली.
''या स्कॉट एक्लसची कुणीतरी मुद्दाम मजा घेतलीय, हे अशक्य आहे हे तुलाही जाणवत असेल. घटनाक्रमातून दिसते त्याप्रमाणे पुढे गंभीर घटना घडणार होत्या आणि स्कॉट एक्लसला विस्‍टिरिया लॉजमध्‍ये घेऊन जाण्‍याचा त्यांच्याशी संबंध आहे.''
''पण कसला संबंध संभवतो?''
''आपण यातल्या प्रत्येक मुद्यावर विचार करु. तो तरुण स्पॅनियार्ड आणि स्कॉट एक्लसच्या विचित्र आणि अचानक झालेल्या ओळखीमध्‍ये काहीतरी खटकतंय. या स्पॅनियार्डनेच मैत्रीसाठी पुढाकार घेतला. स्कॉट एक्लसची त्याच्याशी ओळख झाल्यानंतरच्या दुसर्‍याच दिवशी त्याने लंडनच्या दुसर्‍या टोकाला जाऊन स्कॉट एक्लसची भेट घेतली, आणि त्याला इशरला घेऊन येईपर्यंत त्याने एक्लसशी सतत संपर्क ठेवला. आता, त्याला या एक्लसकडून काय मिळण्यासारखे होते? मला त्या माणसात दम दिसत नाही. तो तेवढा बुद्धीमानही दिसत नाही - हजरजबाबी लॅटीन माणसाचा मित्र होण्‍याएवढा तरी नाहीच. मग गार्सियाला मिळू शकणार्‍या इतर लोकांमधून यालाच का बरे निवडण्‍यात आले? हेतू तडीस जाईल असे काय या स्कॉट एक्लसमध्‍ये आहे? त्याच्यामध्‍ये वेगळा उठून दिसणारा गुण आहे का? मी म्हणतो असा गुण स्कॉट एक्लसमध्‍ये आहे. खानदानी
ब्रिटीश अदबशीरपणाचा तो उत्तम नमुना आहे, आणि हाच माणूस दुसर्‍या ब्रिटीश माणसावर छाप पाडू शकतो. स्कॉट एक्लसचे कथन कितीतरी विचित्र होते तरी या दोन अधिकार्‍यांनी चकार शब्दाने स्कॉट एक्लसला प्रश्न विचारला नाही, हे तू पाहिले असशीलच.''
''पण तो कशाचा साक्षीदार बनणार होता?''
''घटना जशा घडल्या त्यानुसार तो कशाचाच साक्षीदार बनला नाही. त्या जशा योजल्या होत्या तशा त्या घडल्याच नाहीत. हे प्रकरण मला दिसते ते हे असे!''
''तो alibi ठरु शकला असता, असे काही आहे का?''
''अगदी अचूक! वॉटसन, तो निश्चितच एक alibi ठरु शकला असता. केवळ युक्तीवादासाठी आपण असं मानू की विस्‍टिरिया लॉजमधले लोक संगनमत करुन कसलातरी बनाव रचत होते. हा बनाव, मग तो कशाचाही
असो, एक वाजण्यापूर्वीच तडीस जाण्‍याची योजना होती. काही घड्याळांचे काटे फिरवून त्यांनी स्कॉट एक्लसला त्याला वाटले त्यापेक्षा कितीतरी आधीच झोपी घातले असेल हे अगदी सहज शक्य आहे, पण काहीही झालेले असले तरी, बारापेक्षा जास्त वाजलेले नाहीत हे सांगायला जाणारा गार्सियाच होता हेही शक्य आहेच. गार्सियाला बाहेर जाऊन जे काय करायचे होते ते करुन उल्लेख केलेल्या वेळेपर्यंत तो परत येऊ शकला असता तर कसल्याही गंभीर आरोपावर त्याच्याकडे देण्यासारखी त्याच्याकडे जबरदस्त तोड होती. त्याच्याकडे कोणत्याही न्यायालयासमोर शपथेवर सांगू शकणारा एक इंग्लिश माणूस होता की गार्सिया रात्रभर घराच्या बाहेरच पडला नाही. वाईटात वाईट घडले तर संरक्षण म्हणून स्कॉट एक्लसच्या खांद्यावर बंदूक ठेवता आली असती.''
''होय, हे लक्षात आले, पण फरार झालेल्या इतरांबद्दल काय?''
''अद्याप वास्तविकता काय ते आपल्याला काहीच माहित नाही, पण यात फार मोठ्या अडचणी असतील असे मला वाटत नाही. तरीही, पूर्ण माहिती न घेताच युक्तीवाद करीत सुटणे चूक आहे. असे केले तर ती माहिती
आपण आपल्या गृहितकाशी जुळण्‍यासाठी उगाच त्यात फेरफार करतो.''
''आणि ती मध्‍येच आलेली चिठी''
''त्यात काय लिहिलं होतं बरं? आपले नेहमीचेच रंग, हिरवा आणि पांढरा. उघड्यासाठी हिरवा, बंदसाठी पांढरा - रेसींगसारखं काहीतरी वाटतंय. उघड्यासाठी हिरवा, बंदसाठी पांढरा हा एक सुस्पष्‍ट संकेत आहे. मुख्‍य पायर्‍या, पहिला कॉरीडॉर, उजवीकडील सातवे, ग्रीन बेझ - हा कुठेतरी करण्‍यात आलेला निर्देश आहे. या सर्वांच्या मागे आपल्याला कदाचित टाळके सरकलेला नवरा आढळू शकतो. खरोखर हा एक धोकादायक पाठलाग  होता. तसं नसतं तर तिने 'लवकर' हा शब्द लिहिला नसता. ''डी'' हे कदाचित खूण म्हणून.''
''तो माणूस स्पॅनियार्ड होता, ते डी डोलोरेसमधले डी आहे, स्पेनमध्‍ये आढळणारे सर्वसामान्य नाव!''
''उत्तम, वॉटसन, फारच उत्तम! पण हे अशक्य आहे. एक स्पॅनियार्ड दुसर्‍या स्पॅनियार्डला स्पॅनिशमध्‍येच लिहील ना! या चिठीचा जो कुणी लेखक असेल तो निश्चितच इंग्लिश आहे. असो तर. तो हुशार इन्स्पेक्‍टर
आपल्याकडे परत येईपर्यंत आपण थंड बसावे हे उत्तम. दरम्यान काही तासांसाठी तरी आळसटलेल्या वातावरणातून बाहेर पडल्याबद्दल, आपले नशीब जोरावर आहे असे मानू.
सरे पोलीस ठाण्याचा अमलदार येण्‍यापूर्वीच होम्सच्या तारेचे उत्तर आले होते. होम्सने ते वाचले आणि त्याच्या वहीत ठेवण्‍यापूर्वी माझा आशाळभूत झालेला चेहेरा त्याच्या नजरेतून सुटला नाही.
''आपण बड्या वर्तुळात शिरत आहोत,'' तो म्हणाला.
ती तार म्हणजे नावे आणि पत्त्यांची यादी होती:
लॉर्ड हॅरिंगबी, दि डिंगल; सर जॉर्ज फॉलॉइट, ऑक्झशॉट टॉवर्स; मिस्‍टर हेन्स हेन्स, जे. पी, पर्डी प्लेस; मिस्टर जेम्स बेकर विल्यम्स, फॉर्टन ओल्‍ड हॉल; मिस्‍टर हेन्‍डरसन, हाय गॅबल, रेव्हरंड जोशुआ स्टोन, नेथर
वॉल्सलिंग.
''आपली कारवाई मर्यादीत वर्तुळात ठेवण्‍याचा हा अत्यंत सूस्पष्‍ट मार्ग आहे,'' होम्स म्हणाला.
''बेयन्सच्या पोलीसी खाक्याच्या मनाने आधीच अशी काहीतरी योजना वापरली असेल यात संशय नाही.''
''मला नीटसं कळलं नाही.''
''हे बघ मित्रा, आधीच आपण या निष्‍कर्षावर आलेलो आहोत की गार्सियाला जेवताना मिळालेला संदेश म्हणजे भेट किंवा भेटीचे नियोजन होते. आता, त्यातून पक्का अर्थ कळतो तो अचूक असेल तर, गुप्तता ठेवण्यासाठी, जाणार्‍याला मुख्‍य पायर्‍या चढून कॉरीडॉरमधला सातवा दरवाजा शोधावा लागणार, मग घर खूपच मोठे आहे हे अगदी उघड आहे. अगदी तसेच हेही निश्चित आहे की हे घर ऑक्झशॉटपासून एक किंवा दोन  मैलांच्या आत आहे, कारण गार्सिया त्याच दिशेने चालत होता आणि, मी तथ्‍ये जशी पहातो त्याप्रमाणे, तो विस्‍टिरिया लॉजमध्‍ये alibi ची पाठराखण मिळवण्यासाठी परत येणार होता, जे त्याला एक वाजेपर्यंतच मिळू शकणार होते. ऑक्झशॉटच्या जवळील घरांची संख्‍या मर्यादित असायलाच हवी, म्हणून मी स्कॉट एक्लसने नमूद केलेल्या एजंटला तार पाठवून त्यांची यादी हस्तगत करण्‍याची सुस्पष्‍ट पद्धत वापरली. ती या तारेत आहे
आणि आपल्या गुंत्याची उकल करणारे टोक निश्चित त्यांत असायला हवे.''
इशरमधील त्या सुंदर सरे गावात इन्स्पेक्टर बेयन्सला सोबत घेऊन पोहोचेपर्यंत जवळजवळ सहा वाजले.
होम्स आणि मी मुक्काम पडणार या अंदाजानेच निघालो होतो आणि बुल येथे झोपण्‍याची मस्त सोय केली होती. शेवटी डिटेक्टीव्हसोबत आम्ही विस्‍टिरिया लॉजची पाहणी करण्‍यासाठी निघालो. झोंबरा वारा आणि
चेहेर्‍यावर सपकारे मारणारा दमदार पाऊस असलेली ती मार्चमधली थंडगार, किर्रर्र सायंकाळ होती. आम्ही ज्या भयंकर ध्‍येयाकडे निघालो होतो त्यासाठी हे वातावरण अगदीच जुळून आले होते.

2. सॅन पेद्रोचा वाघ


थंडगार, उदास वातावरणातून काही मैल चालल्यानंतर आम्ही एक उंच लाकडी दरवाज्यासमोर पोहोचलो, जो चेस्‍टनट्सच्या पडछाया पडलेल्या रस्त्याच्या तोंडावर उभा होता. वळणा-वळणाच्या, पडछाया पडलेल्या त्या
रस्त्यावरुन आम्ही एका बसक्या, काळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर तसल्याच काळपट दिसणार्‍या घरासमोर आलो. दरवाज्याकडील डाव्याबाजूस असलेल्या बाहेर उघडणार्‍या खिडकीतून मंद उजेडाची तिरीप पडत होती.
''कॉन्स्‍टेबल आहे बंदोबस्तावर,'' बेयन्स म्हणाला. ''मी खिडकी वाजवतो.'' त्याने गवताचा पट्‍टा ओलांडला आणि खिडकीच्या काचेवर टकटक केली. धूसर काचेतून मला आतला माणूस आगीसमोर ठेवलेल्या खुर्चीतून
धाडकन उठताना अस्पष्‍टसा दिसला, आणि खोलीतून तीव्र आरोळी उठली. लगेच झटकन एक पांढर्‍याफटक, श्वास गुदमरलेल्या पोलीसाने दरवाजा उघडला, त्याच्या थरथरत्या हातात मेणबत्ती हेलकावे खात होती.
''वॉल्टर्स, काय झालंय?'' बेयन्सने जरबदार आवाजात विचारले.
त्या माणसाने हातरुमाल कपाळावरुन फिरवला आणि सुटका झाल्यासारखा श्वास बाहेर टाकला.
''तुम्ही आलात हे बरंच झालं, सर. खूपवेळ झाली सायंकाळ उलटून, आणि माझा तर धीरच सुटत होता.''
''धीर सुटत होता वॉल्टर्स? मनगटात दम असलेला माणूस आहेस असं मला उगाच वाटलं म्हणायचं.''
''आहेच, सर, पण हे रिकामे घर आणि किचनमधली ती विचित्र गोष्‍ट. तुम्ही खिडकी वाजवलीत मला वाटलं, ती बला पुन्हा एकदा आली. ''
''कसली बला आली?''
''भूत, भूतच म्हणायला पाहिजे त्याला. इथं खिडकीत होतं.''
''काय होतं खिडकीत, आणि कधी?''
''आत्ता दोन तासांपूर्वी. अंधार पडत आला होता. मी खुर्चीत वाचत बसलो होतो. माझी नजर वर का गेली ते कळलं नाही, पण पण खिडकीतून एक चेहेरा माझ्यावर रोखला होता. एवढा भयानक चेहेरा, तो नक्की माझ्या
स्वप्नात दिसणार.''
'' छ्‍या:, छ्‍या: वॉल्टर्स, पोलिस-कॉन्स्‍टेबल असे बोलत नसतात.''
''होय, सर, होय; पण मी ते पाहून हादरलो, मग घाबरलोच नाही असं दाखवण्यात काय अर्थ. ते धड पांढरंही नव्हतं सर, ना काळं - मी कधी पाहिलेल्या रंगाचं नव्हतंच ते - शाडूवर दुधाळ पट्‍टे मारल्यासारखा विचित्र रंग होता. आणि त्याचा आकार, तुमच्या चेहेर्‍यापेक्षा नक्कीच दुप्पट मोठा होता, सर. भुकेजलेल्या श्वापदासारखे पांढरे दात, आणि त्या बटबटीत डोळ्यांनी माझ्यावर नजर रोखली होती. शपथ घेऊन सांगतो सर, तिथून ते मागे होऊन निघून गेलं तोपर्यंत मला बोटसुद्धा हलवण्‍याची बुद्धी झाली नाही - माझा श्वास जसा बंदच पडला होता. मी बाहेर झुडूपांमध्‍ये जाऊन आलो, पण ईश्वराची कृपाच तिथं कुणीही नव्हतं.''
''तुला ओळखत नसतो ना मी, वॉल्टर्स, तर तुझ्या नावासमोर मी काळी खूण ठोकली असती असल्या फालतूपणासाठी. भूतच दिसलं तर ड्यूटीवर असलेल्या कॉन्स्‍टेबलने ते पकडता आलं नाही म्हणून देवाचं नाव घेऊ  नये. एकांतामुळे झालेला हा सगळा भासच हा?''
''किमान एवढं तरी सहज उकलायला हवं,'' होम्स त्याच्या हातातील बॅटरीचा झोत टाकत म्हणाला. गवताच्या पट्‍ट्याची झर्रकन पहाणी करुन ''होय,'' तो म्हणाला, ''बारा नंबरचा बूट असणार. त्याच्या पायाइतकाच इथून
तिथून भरभक्कम असला तर निश्चितच तो अगडबंब होता असं म्हणायला पाहिजे.''
''गेला कुठे तो?''
''झुडूपं ओलांडून रस्त्यावर उतरून पसार झाला असणार.''
''जाऊ द्या,'' इन्स्पेक्‍टरने गंभीर व करारी चेहेर्‍याने म्हटले, ''तो कुणीही असो, आणि त्याला काहीही हवे असो, आत्ता तो इथून गायब आहे, आणि आपल्याला बर्‍याच गोष्‍टी पहाव्या लागणारेत. आता, श्रीयुत होम्स,
तुमची हरकत नसेल तर, एकदा घरात चक्कर टाकून येऊ.''
विविध बेडरुम आणि बैठकांची बारकाईनं पाहणी करुनही काहीच हाती लागलं नाही. तिथे रहाणार्‍यांनी सोबत थोड्याच वस्तू असाव्यात किंवा काहीही आणलं नसावं, आणि छोट्यातलं छोटं फर्निचर घरासोबतच घेण्‍यात आलेलं दिसतं होतं. मार्क्स आणि कं., हाय हॉलबर्न असा शिक्क्याच्या गाद्यागिराद्या तशाच मागे ठेवलेल्या दिसत होत्या. तार पाठवून आधीच चौकशी करुन झाली होती आणि त्यात मार्क्स यांच्याकडे या ग्राहकाबद्दल तो पैसेवाला होता यापेक्षा काहीही जास्त मिळू शकली नाही. सटरफटर सामान, काही पाईप्स, काही कादंबर्‍या, त्यापैकी दोन स्पॅनिश, जुन्या प्रकारची पीनफायर रिव्हॉल्व्हर, आणि एक गिटार एवढ्या वस्तू तिथल्या जंगम मालमत्तेपैकी होत्या.
''यात काहीच नाही,'' बेयन्सने प्रत्येक खोली तपासताना मेणबत्ती या हातातून त्या हातात हलवत म्हटले, ''पण श्रीयुत होम्स, किचनमध्‍ये काय आहे ते तुम्हाला दाखवलंच पाहिजे.''
घराच्या मागच्या बाजूस असलेली ती एक अंधारी, उंच सिलींगची, कोपर्‍यात काड्यामुड्‍यांचं गचपन पडलेली खोली होती, स्वयंपाकी तिथे झोपत असावा असं दिसत होतं. टेबलावर खरकटी ताटं आणि प्लेट, काल रात्रीचं
शिळं अन्न पडलेलं होतं.
''हे पहा बरं,'' बेयन्स म्हणाला. ''हे इथे का असावं?''
ड्रेसिंग टेबलच्या बाजूस ठेवलेल्या एका विचित्र आकारावर त्याने मेणबत्ती धरली. खूप सार्‍या सुरकुत्या, कडकडीतपणा आणि वाळून गेलेला तो आकार नेमका काय असावा ते सांगणं अवघड होतं. काळपट, कातडीदार आणि मानवी आकृतीशी साधर्म्य दाखवणारं काहीतरी आहे असं म्हणता आलं असतं. पहिल्यांदा मी त्या आकाराचं निरिक्षण केलं तेव्हा, मला वाटलं ते ममी सारखा मसाला भरलेलं ते निग्रो मूल असावं, नंतर वाटलं ते खूप वेडंवाकडं आणि प्राचीन माकड असावं. शेवटी तो प्राणी आहे की माकड आहे अशा संशयात मी गोंधळलो. पांढर्‍या शिंपल्यांच्या दोन माळा त्या आकाराच्या मध्‍यभागी बांधल्या होत्या.
''कमाल आहे -- कमालच आहे, ही! त्या विचित्र अवशेषाकडे पहात होम्स म्हणाला. ''आणखी काही?''
बेयन्स काही न बोलता सिंकच्या दिशेने निघाला आणि मेणबत्ती पुढे धरली. कुठल्यातरी मोठ्या, पांढर्‍या पक्ष्याचे अवयव आणि शरीराचे त्यावर पंख तसेच त्यावर ठेऊन निघृणपणे तुकडे केलेले होते. होम्सने त्या पक्ष्याच्या छिन्नविच्छिन्न केलेल्या डोक्यावर आलेली सूज दाखवली.
''सफेद मुर्गा,'' तो म्हणाला. ''खूपच मजेदार! खरोखर ही केस विचित्र आहे.''
पण बेयन्सने त्यापैकी सर्वात विचित्र वस्तू सर्वात शेवटी ठेवली होती. सिंकच्या खालच्या बाजूने जस्ताची बादली बाहेर काढली ज्यात रक्त भरुन ठेवलेले होते. त्यानंतर त्याने हाडाचे जळके तुकडे भरुन ठेवलेले तबक
घेतले.
''काहीतरी मारण्‍यात आले आणि काहीतरी जाळण्‍यात आले. या वस्तू आम्ही आगीतून बाहेर काढल्या. सकाळी डॉक्टर येऊन पाहून गेले. ते म्हणतात यापैकी काहीही मानवी नाही.''
होम्स असला व त्याने हातावर हात चोळले.
''इन्स्पेक्‍टर, अभिनंदन करायला हवं तुमचं, एवढी विलक्षण आणि सूचक केस हाताळल्याबद्दल. तुमची एकंदर तयारी आणि मिळत असलेल्या संधींचा मेळ बसलेला नाही, असं मी खरोखर म्हणेन.
इन्स्पेक्टर बेयन्सचे बारीक डोळे आनंदाने चकमले.
''खरे आहे, श्रीयुत होम्स. ग्रामीण भागात धूळ बसतेच. या प्रकारची केस हीच माणसाला संधी मिळवून देते, आणि मला वाटते मी ती सोडणार नाही. ही हाडे कशाची असावीत बरे?''
''मेंढी, किंवा मी म्हणेन, एखादा चिमुकला.''
''आणि तो पांढरा मुर्गा?''
''कमाल आहे, श्रीयुत बेयन्स, खूपच कमाल आहे. जवळ जवळ एकमेवाद्वितीयच म्हणायला हवं.''
''होय, सर, या घरात अत्यंत विचित्रप्रकार करणारे अत्यंत विचित्र लोक असले पाहिजेत. त्यापैकी एक तर गेला. त्याच्या साथीदारांनी त्याचा पाठलाग करुन त्याला संपवला असेल काय? असेल तरी ते जातील कुठे, कारण  प्रत्येक बंदरावर बातमी पाठ‍वलीय. पण माझा स्वत:चा दृष्‍टीकोण वेगळा आहे. होय, माझा दृष्‍टीकोण खूपच वेगळा आहे.''

(क्रमश:)

१३ मे, २०१२

एक वाचनानुभव


दि. 6 मे 2012
काल म्हणजे 5 मे चे सकाळचे काही तास वगळता पूर्ण दिवस झोपण्‍यात गेला. नेहमीची जागरणं. पण रात्री 10 वाजता जाग आली तेव्हा बाहेर पाऊस पडून गेला होता आणि वीज गेली होती. पाणी संपलं होतं म्हणून ते आणायला गेलो. आमच्या कॉलनीतल्या छोट्याशा झोपाळू स्टेशनसमोर पाण्‍याची सोय आहे. अपरात्री दुकाने बंद असताना तिथे कधीही पाणी मिळू शकतं. रेल्वेट्रॅकपलीकडे असलेल्या शेजारच्याच कॉलनीतमात्र वीज होती.
त्यामुळं कुंद वातावरणात रस्त्यावरुन जाताना सकाळचे चार साडेचार वाजल्याचा भास होत होता. पाणी आणून थोडे जेवलो आणि नेहमीप्रमाणे मिपावर लॉगीन झालो. तर कुठेतरी उचकपाचक करताना गोडसे भटजींच्या 'माझा प्रवास' ची लिंक सापडली. पण ती करप्ट लिंक होती. आता उत्सुकता चाळवली गेली होतीच, म्हणून 'माझा प्रवास' साठी सर्च मारला, लगेच मिळून गेले.
मग अकरापासून साडेतीन चार पर्यंत ती 196 पाने वाचण्‍यात गेली. 1857 च्या बंडाच्या सुमारास प्रवासाला निघालेल्या गोडसे भटजींचा मुक्काम महूला पडला होता. आमच्या कॉलनीच्या रेल्वे स्टेशनमधून महूला रोज रेल्वे जाते. मला वाटले गोडसे भटजी महूहून पुढे इंदूरला येणार आणि 1857 मधल्या इंदूरच्या हकीगती वाचायला मिळणार; पण तसं काही झालं नाही. गोडसे भटजी हे 1857 च्या बंडाच्या काळचे प्रत्यक्षदर्शी आहेत. त्यांच्या प्रवासाच्या हकीगतीमध्‍ये बंडामुळे त्या काळातील लोकांच्या जीवनाची झालेली फरफट, नष्‍टचर्य नि:संशय प्रतिबिंबीत झाले आहे पण त्यांची हकीगत ऐतिहासिक दस्तऐवज मानता येईल की नाही हे इतिहास तज्ञांनाच सांगता येईल - कारण प्रत्येक ठिकाणी गोडसे भटजी प्रत्यक्ष हजर असतीलच, आणि बंडादरम्यान उठलेल्या अफवा, बाजारगप्पा किंवा जनमानसात झालेल्या खळबळीमुळे ऐकीव बातम्यांचा सुळसुळाट यांचा त्यांच्या कथनावर प्रभाव पडलाच नसेल असे म्हणवत नाही.
पण एवढ्यावरच हे पुस्तक निकालात काढता येत नाही. गोडसे भटजी झाशीच्या राणीला प्रत्यक्ष भेटले आहेत. त्यांनी झाशीच्या राणीची स्वभाव वैशिष्‍ट्ये, कारभाराची रीत, त्यांची दिनचर्या, अगदी झाशीची राणी बालपणी कशी होती, त्यांच्या मातोश्री गेल्यानंतर झाशीच्या राणीचे वडील मोरोपंत तांबे यांनी तिचे पालनपोषण कसे केले होते, तिचा राजा गंगाधरराव नेवाळकर यांच्यासोबत विवाह कसा जुळून आला होता हा सर्व इतिहास गोडसे भटजींना माहित असण्‍यासह ते पुढे ती राणी झाल्यानंतर झाशीच्या राणीच्या आश्रयाला राहिले आहेत. अगदी झाशीच्या किल्ल्यावर तोफगोळे पडत असताना गोडसे भटजींनी झाशीच्या किल्ल्यामध्‍ये निवास केला आहे.
झाशीचा पाडाव होऊन झाशीची राणी तेथून निघून गेल्यानंतर इंग्रजी कत्तलीपासून वाचण्‍यासाठी ते लादणीत लपून बसले आहेत - गोडसे भटजी नि:संशय 1857 च्या बंडामध्‍ये होरपळलेल्या लोकांपैकी एक, पण मराठी साहित्यात ज्यांचे लिखाण उपलब्ध आहे असे एकमेव आहेत. गोडसे भटजींची अत्यंत प्रांजळ निवेदनशैली असलेल्या त्या कथनात मी पूर्णपणे रंगून गेलो. यज्ञ होऊन दक्षिणा पदरी पडेल या आशेने उत्तरेत गेलेले गोडसे भटजी दुसर्‍याच कुठल्यातरी राजाकडून दक्षिणा पदरी पडूनही चोरट्यांकडून लुटले जातात. बंडामुळे उत्तरेत अनागोंदी माजलेली असल्याने दिसेल त्या प्रवाशाला पकडणे, आणि बंडात सामील असेल तर सरळ फाशी देणे असे आदेश तत्कालीन गर्व्हर्नरने काढलेले असतात. गोडसे भटजींनाही संशयीत म्हणून इंग्रजी सैन्याच्या तुकडीकडून पकडले जाते, पण हे खरोखर भिक्षुक आहेत हे स्पष्‍ट झाल्याने फाशीबिशी न होता त्यांची सुटका होते. अशा परिस्थितीत भिक्षुकीसाठी त्या प्रांतात देशाटन करण्‍याऐवजी गोडसे भटजी, पैसे गेले तर गेले काही तीर्थाटन करावे, पुण्‍य पदरी पाडावे, महाराष्‍ट्रात असलेल्या आईवडीलांचे इहलौकीक कर्ज प्राप्त परिस्थितीत पैसा मिळत नसल्याने दूर होत नसेल तर नसो - पण गंगेच्या पाण्‍याने आईवडीलांना स्नान घालून पारलौकीक पुण्‍य तरी कमवावे म्हणून गंगेच्या पाण्‍याची कावड खांद्यावर घेऊन ते पेण तालुक्यातील वरसई पर्यंतचा प्रवास पायी करतात.
मुळात तत्कालिन पुणे-मुंबई प्रांतात रहाणारे गोडसे भटजी झाशी-काल्पी-ग्वाल्हेर-काशी-लखनौ-अयोध्‍या एवढा दूरचा प्रवास करतातच का? कारण गोडसे भटजींच्या कथनातच स्पष्‍ट दिसत होते. पुणे-मुंबई प्रांतातले भिक्षुक, तत्कालिन विद्वज्जनांची संभावना होणारे सत्ता आणि संपत्ती केंद्रच इंग्रजी राजवट आल्याने भारतामध्‍ये उत्तरेत स्थलांतरीत झाले होते. त्यामुळे हे लोक उत्तरेत येणार हे आजही स्थलांतराची जी मूळ प्रेरणा दिसते त्याप्रमाणे उघड आहे. आणि ही तत्कालिन सत्ताकेंद्रे, सत्ताधिश कशा परिस्थितीत होती आणि काय करीत होती? तर इंग्रजांसारख्या प्रबळ शत्रूने सत्ता हिसकाऊन घेतली म्हणून ब्राह्मणांना मंदीर, राजवाड्‍यांमध्‍ये अनुष्‍ठाणाला बसवून 1857 च्या बंडाच्या रुपात यथाशक्ती लढा देत होती. ब्राह्मणांच्या अनुष्‍ठाणात अनाठाई द्रव्यापव्यव करण्‍यापेक्षा इंग्रजांपेक्षा वरचढ शस्‍त्रे, होतील तिथून पैदा करुन सत्ता हिसकाऊन घेणार्‍या इंग्रजांचे नामोनिशाण मिटवूनच टाकण्‍याचा विचार त्यांच्या मनात का आला नाही? तर त्या काळात स्वप्रयत्न नव्हते असे नव्हे, तर त्यापेक्षाही धर्म, धर्माचरण, पाप-पुण्‍य, भोग-दैव, पूर्वसुकृत, कर्मकांड, आचार यांचा पगडा होता - नव्हे या काळातली बहुतांश हिंदू माणसे ही याच श्रद्धा आणि धारणांचे मूर्तीमंत रुप होती. त्यामुळे विजयश्री संपादित करण्यात स्वपराक्रम, प्रयत्न यांच्यापेक्षाही धर्मसंयुक्त कृत्यांना प्राधान्य होते. राज्ये, संस्‍थानांमध्‍ये देश विभागला गेला, एकरुपता - एक विचार नव्हता होता हेही आहेच. झाशीचा पडाव व नृशंस लुटीनंतरच्या दिवसांचे व तो का झाला याचे वर्णन करणारा गोडसे भटजींचा खालील उतारा पहा -
तिसरे दिवशी शहरात पलटणी लोक शिरलें, त्यांनी धान्य लुटण्‍यास प्रारंभ केला. त्याणीं बरोबर मोठमोठे बैल आणिले होते. बैल दरवाज्यापाशी उभा करुन लोकांचे घरी जोंधळे, बाजरी, तांदूळ, डाळी वगैरे जी धान्ये सापडतील तीं भरुन नेली. धान्यादिकांनी भरलेली मडकी ओतून घेऊन तेथेंच फोडून टाकीत असत. चवथे दिवशी सर्व प्रकारची लूट करण्‍यास आरंभ केला. ज्यास जें नेण्‍यासारखे वाटे, ते तो घेऊन जाई. लोकांचे घरी उपयोगी वस्तू एकही ठेविली नाही; विहिरीचे राहाटही काढून नेले. राहाटाचे दोरखंडही नेले. दारची केळीची केळवंडे, आंब्यावरचे आंबे, झाडावरचे फळ, लाकडी खुर्च्या वगैरे सामान याप्रमाणे सर्व जिनसांची लूट मांडली. ते दिवशी आम्हापाशी काहीएक खाण्‍यास नव्हते. जुजबी धान्य होते ते सरून गेले होते. बाजारात कोठे विकत घेऊ म्हटले तर कोठेच मिळण्‍यासारखे नव्हते. सायंकाळपर्यंत उपोषण पडल्यामुळे व वैशाखमास असल्यामुळे जीव अगदी हल्लक होऊन गेला. सायंकाळानंतर थंड पाण्‍यानी स्नान करुन अतिशय भूक व तहान लागल्यामुळे निरुपायास्तव थंडा फराळ केला ! हरहर! काय हा दु:खाचा प्रसंग ! सर्व शहरात हजारो लोक उपाशी होते. लाखो मेले होते. शहर जळत होते. लोक तर अगदी नागवून गेले होते. कोणाचे घरात भांडे अगर मडके अगर धान्य अगर वस्‍त्र कांही उरले नव्हते. परमेश्वराच्या घरचा न्याय मोठा चमत्कारिक आहे. ज्या गरिब लोकांनी इंग्रज सरकारचा कोणत्याही प्रकारें अपराध केला नव्हता त्यांस निरर्थक किती भयंकर शिक्षा ही ! परंतू इंग्रज सरकारास अगर परमेश्वरास तरी बोल काय म्हणून लावावा? शुक्रनितीमध्‍ये शत्रूचे पारिपत्य असेच करावे म्हणून सांगितले आहे. परमेश्वराने तरी काय अन्याय केला आहे? झांशीच्या लोकांचे पदरी पूर्व दुष्‍कृतच फार मोठे असले पाहिजे. बुंदेलखंडात व्याभिचाराचे पातक पूर्वीपासूनच सांचत आले होते. भंगिणीचा इतिहास मागचे भागात वर्णन केलाच आहे. या पातकपर्वताबद्दल लक्ष्मीबाईचे निमित्ताने ईश्वराने ही भूमि शुद्ध केली असे आम्हांस वाटू लागले.
म्हणजे एवढ्या प्राणांतिक यातना, लूट, नष्‍टचर्य, मानहानी, वित्तहानी होऊनही त्या काळची माणसे स्वत:च्या आयुष्‍यातील घटनांबद्दल स्वत:च्या कर्मांना दोषी धरायला तयार नाहीत. ती पाप मानतात, ईश्वर पापकृत्यांबद्दल दंड देऊन शुद्धी करतो असे मानतात. आपल्या धारणाही थेट अशाच नसतील, पण यापेक्षा फार वेगळ्या नसतील, हे नक्की. म्हणूनच हा वाचनानुभव नुसते वाचन न रहाता ते प्रॅक्टीकली लागू होऊ शकतं. खुद्द झाशीची राणी लक्ष्मीबाईच तिने केलेला प्रतिकार मोडून पडल्याचा अंदाज आल्यानंतर काय म्हणते ते पहा -
काल्पीचा रस्ता धरल्यानंतर जातां जातां एके दिवशी सायंकाळी एका खेडेवस्तीस येऊन पोंचलो. तेथून काल्पि सुमारे सहा कोश राहिली होती. गांवाबाहेर चिंचेची झाडी आहे. तेथे स्वयंपाक तयार करुन भोजनें झाल्यावर स्वस्थ निद्रा केली. पाहाटेच्या प्रहर रात्रीच्या सुमारास, एकाएकी मोठा गलका झाला. त्यासरसे उठून पहातो तों शेकडो स्वार रस्त्याने उधळत चालले आहेत असे दृष्‍टीस पडले. हें काय अरिष्‍ट आले आहे याची कल्पना होईना. आम्हीही घाईघाईने आपले सामान गुंडाळून, काखोटीस मारुन, शिपाई लोकांच्या बरोबर पळ काढू लागलो. काही वेळाने असे समजले की, पेशव्यांची व इंग्रजांची चरखारीवर लढाई होऊन त्यात पेशव्यांचा मोड झाला. त्यात झाशीवाली राणीही होती. ती फौज परत काल्पीवर चालली आहे. मग आम्ही किंचीत स्वस्‍थ होऊन झुंजूमुंजूचे सुमारास एका विहिरीवर पाणी काढून शौच मुखमार्जन करण्‍यास बसलों. तों पांच-चार स्वार विहिरीवरुन जात होते. त्यांत झाशीवाली दृष्‍टीस पडली. तिने सर्व पठाणी पोषाख केला होता, व सर्व अंग धुळीने भरले होते, व तोंड किंचीत आरक्त असून म्लान व उदास दिसत होते. तिला तृषा फार लागली असल्यामुळे तिने घोड्यावरुनच आम्हांस तुम्हीं कोण आहां असा प्रश्न केला. तेव्हा आम्ही पुढे होऊन हात जोडून विनंती केली की, आम्ही ब्राह्मण आहो, आपल्यास तृषा लागली असल्यास पाणी काढून देतो. बाईसाहेबांस ओळख पटली व खाली उतरल्या. मी रसी मडके घेऊन लागलीच विहिरीत सोडणार, तो बाईसाहेब म्हणाल्या की, तुम्ही विद्वान ब्राह्मण, तुम्ही मजकरिता पाणी काढू नका. मीच काढून घेते. हे तिचे उदासपणाचे शब्द ऐकून मला फार वाईट वाटले. परंतु निरुपायास्तव मडके खाली ठेवले. बाईसाहेबांनी पाणी काढून, त्या मृण्‍मय पात्रातून ओंजळीने पाणी पिऊन, तृषा हरण केली. दैवगति मोठी विचित्र आहे. नंतर मोठ्या निराश मुद्रेने बोलल्या की,
मी अर्धा शेर तांदुळाची धणीन, मजला रांडमुंडेस विधवा धर्म सोडून, हा उद्योग करण्‍याची काहीच जरुर नव्हती. परंतू हिंदूधर्माचा अभिमान धरुन या कर्मास प्रवृत्त झाले, व याज‍करिता वित्ताची, जीविताची, सर्वांची आशा सोडिली. आमच्या पदरी पातकच फार म्हणून आम्हास ईश्वर यश देत नाही. चरखारीवर मोठी लढाई झाली. परंतू आम्हांस यश आले नाही. काल्पीवरही इंग्रज चालून येत आहे.
माधवराव व नारायणराव पेशवे बंडात सामील नसूनही, इंग्रजांबद्दल त्यांच्या मनात कुठलाही वाईट विचार नसताना ते इंग्रजांचे कैदी बनण्‍याचा प्रसंग पहा -
*श्रीमंत नारायणराव व माधवराव पेशवे हे इंग्रजांशी बिघडले नव्हते; परंतू त्यांचा दिवाण राधाकिसन म्हणून परदेशी होता तो बिघडला होता. प्रथम जेव्हा इंग्रज सरकारवर गहजब गुदरला तेव्हा तेथील कलेक्‍टर वगैरे साहेबलोकांनी चित्रकुटाखालचा 25 लक्षांचा मुलूख व डंघाईचा मुलूख श्रीमंत नारायणराव पेशवे यांचे स्वाधीन करुन दप्तर स्वाधीन केले, व आपण जीवभयास्तव पळून गेले. मुलूख स्वाधीन झाल्यावर दिवाणजीने बंदोबस्ताकरिता म्हणून नवीन शिपाई ठेविले. बिघडलेल्या पलटणांस आश्रय दिला व दारुगोळा, तोफा वगैरे सामान तयार करण्‍याचा कारखाना सुरु केला. परंतु नारायणाराव पेशवे यांचे मनात कोणत्याही प्रकारचा किंतू आला नव्हता. इत्यादि हकीगती आम्हांस चित्रकूटास आल्यावर समजल्या होत्या. आम्ही अनुष्‍ठाणाचे आमंत्रण घरी घेऊन आलो तो अशी बातमी समजली की कपतानसाहेब बरोबर दोन पलटणी घेऊन पयोष्‍णी गंगेपलिकडे दोन कोशावर येऊन उतरला आहे. साहेबाने स्वाराबरोबर पत्र पाठवून श्रीमंतास कळविले की, आम्हास तुमचे भेटीचे प्रयोजन असल्यामुळे तुम्ही उदईक सायंकाळपर्यंत उभयंता बंधू दिवाणजींस बरोबर घेऊन आमचे गोटांत येऊन भेटावे. बरोबर हत्यार किंवा शिपाई आणू नये. श्रीमंताचे मनात स्वताविषयी कोणत्याही प्रकारचा संशय नसल्यामुळे आपण निर्दोषी आहो असे पूर्ण जाणून व इंग्रजांचे न्यायावर पूर्ण भरवंसा ठेऊन श्रीमंतानीही लागलीच त्याच पत्रावर उदईक येऊन भेटतो असा शेरा लिहून पत्र परत पाठवून दिले. तत्रापि, या भेटीपासून काय होते याची काळजी लागल्यामुळे उभयतां बंधूस सर्व रात्र झोप आली नाही. ही बातमी शहरात पसरताच शहरचे लोक अगदी तजा-वजा होऊन गेले. जिकडे तिकडे याच गोष्‍टी चालू होऊन हालचाल होऊन राहिली. कैक लोकांचे अभिप्रायांत श्रीमंतांनी जाऊ नयें, गेल्यास व्यर्थ कैदेत पडून कदाचित प्राणासही मुकतील व सर्व शहर लुटले जाईल असें होते. कित्येक श्रीमंत निर्दोषी आहेत व खरे रितीने वागल्यास त्यांस भय नाही असेही म्हणत होते. रात्रौ बारा घटकाचे सुमारास परदेशी दिवाणजी श्रीमंतांस न जाण्‍याबद्दल उपदेश करु लागला. ''उदईक तुम्ही जाऊं नयें हेच फार चांगले आहे. गेल्यास मूठभर दारु खर्च न होता इंग्रजांचा मनोदय साध्‍य होऊन तुम्ही कदाचित प्राणास मुकाल; तुमची जिंदगी सर्व लुटली जाईल. याजपेक्षा आपल्यापाशी दारुगोळा आहे, लढवई लोक आहेत, आपण येथेच राहून जंग करु. यांत लौकिक आहे. मनुष्‍यास कधीतरी मरणें आहेच. परंतू रांडमरणाने मरुन जाणे हे तुमच्या शूर कुलास उचित नाही, अशी अनेक प्रकारची शूरत्त्वाची भाषणे करुन पेशव्यांचे मन वळविण्याचा यत्न केला. परंतु त्याजवर त्यांचा काही ठसा पडला नाही. शेवटी राधाकिसन परदेशाने कळविले की, आम्ही तर तुम्हाबरोबर येत नाही. आतांच आम्ही येथून दारुगोळा तोफा फौज वगैरे घेऊन जिकडे वाट फुटेल तिकडे घेऊन जाणार. परंतू तुम्ही आम्हास खर्चाकरिता दोन लक्ष रुपये दिले पाहिजेत. न दिल्यास आम्ही जबरदस्तीने घेऊन जाऊ. हें ऐकतांच श्रीमंतांनी विचार केला की, हा मनुष्‍य जीवावर उदार झाला आहें, त्यांजला आपण स्वखुशीने रुपये न‍ दिले तर वाड्‍याबाहेर फौज आणिली आहे, ती सर्व लुटून फस्त करुन टाकिल. याजकरिता सामोपचाराने रुपये द्यावे हे बरें. असा विचार करुन रुपये तेव्हांच दिले. ते रुपये घेऊन दिवाण वाड्‍यातून बाहेर पडून सर्व फौज बरोबर घेऊन मध्‍य रात्रीस जंगलात निघून गेला. दाहा बारा कोशावर पहाडी किल्ला बंदोबस्ताचा होता, त्यांचा आश्रय करुन राहिला. इकडे श्रीमंतांनी ज्योतिषीबुवांस बोलावून आणून त्यांस असें विचारलें की, उदईक सायंकाळपर्यंत आम्हांस साहेबाचे भेटीस जाण्याचा मुहूर्त केव्हा आहे तो सांगावा. तेव्हा जोशीबुवांनी मुहूर्त उजाडतां साडेपांच वाजता लग्नशुद्धी बरी आहे, बाकी दिवस उद्याचा चांगला नाही, मर्जीस येईल तसे करावे. असे सांगितल्यावरुन नारायणराव व माधवराव साहेबांनी साडेपांच वाजता जावे असा निश्चय केला.
आम्ही हरिपंत भावे यांचे माडीवर निजलो होतो. तेथे पहाटेच्या सुमारास जागे होऊन गोष्‍टी बोलत बसलो आहो, इतक्यात स्वारांच्या घोड्‍यांच्या टापांचा टप-टप आवाज कानीं पडतांच धामधूम काय आहे हे पहाण्‍याकरिता रस्त्याकडील खिडकी उघडून पहातो, तो श्रीमंताची स्वारी साहेबांकडे जाण्‍यास निघाली आहे, असे दृष्‍टीस पडले. बरोबर शिबंदीचे लोक सुमारे दोनशें बिनहत्यार होते. खुद्द श्रीमंत माधवराव व नारायणराव मेण्‍यात बसले असून पुढे भालदार पुकारत होते. उजेडाकरिता शेकडो मशाली पेटविल्या होत्या. या बिनहत्यार स्वारीचा थाट पहातांच आम्हास झाशीवालीबाई किल्ल्याबाहेर पडून शत्रूचा घेर फेडण्‍याकरिता निघाली त्यावेळचे स्मरण होऊन फार वाईट वाटले, व हे लोक केवळ अपमान व दु:ख पदरी घेण्‍याकरिता जात आहेत असें वाटूं लागलें. स्वारी झराझर चालून उजेडताचे सुमारास पयोष्‍णीचे पार गेली. स्वारी साहेबाचे तंबूपाशीं जाऊन पोचलीं तों सहा घटका दिवस आला. पुढे जाणार इतक्यात साहेबांकडील स्वार येऊन असे कळविले की, सर्व लोकांनी येथे राहून फक्त नारायणराव व माधवराव साहेबांनी मेण्‍यांतून उतरून पायीच भेटीस यावे. बरोबर एकही मनुष्‍य घेऊ नये. तें समयीं श्रीमंतास अति दु:ख झाले, परंतू येथवर आल्यावर दुसरे गत्यंतर नाही व आपण निर्दोषी आहोत असे मनात आणून निरुपायास्तव मेण्‍यांतून खाली उतरले. व बरोबर एकही मनुष्‍य न घेता तंबूकडे निघाले. श्रीमंत लोकांबरोबर छत्री धरण्‍याकरिता एक मनुष्‍य असतो, तोही बरोबर घेऊ दिला नाही. दिवस ऐन ग्रीष्‍म ऋतूचे असल्यामुळे सूर्याचा प्रखर ताप सुरु झाला होता. श्रीमंतास उन्हात जाण्‍याचा कधीही प्रसंग नसल्यामुळे व चित्तवृत्तीचा क्षोभ झाला असल्याकारणाने त्यांची मुखकमले आरक्त होऊन गेली, डोळे लाल झाले, श्रीमंत तंबूसमोर येऊन पोचले तो साहेब खाना खात बसला होता. व पुढेही चार घटका श्रीमंताची दाद घेतली नाही. त्याजमुळे भर दोन प्रहरच्या उन्हात तंबूसमोर छत्रीशिवाय श्रीमंतांस उभे रहावे लागले. त्यांस बसावयास खुर्चीही कोणी आ़णून दिली नाही. अशी त्यांची दीनावस्‍था पाहून त्यांचे लोक दूर उभे होते, त्यांस अति त्वेष येऊन त्यांचे डोळ्यांस अश्रू येऊ लागले. परंतू त्यांचा कोणत्याही प्रकारचा इलाज चालेना. या शरीराच्या व अपमानाच्या तापामुळे श्रीमंतांस दे माय धरणी ठाय झालें. जीव कासावीस होऊन सर्वांगास घाम सुटला. अति क्षुधा व तृषा उत्पन्न झाली, परंतू स्वीकारलेला मार्ग सोडणे गैर आहे, असे समजून त्या सत्वशील पुरुषांनी होणारा ताप गट्ट करुन तसेच धीर धरुन उभे राहिले. शेवटी साहेब बाहेर येऊन एकदम तुम्हास सरकारचे हुकुमावरुन कैद केले आहे असे सांगितले व लागलीच गोरें शिपायांस भोंवताली गराडा घालण्‍यास हुकूम केला.
असेच कितीतरी प्रसंग पुस्तकभर..
पुस्तक वाचून संपले पण त्यातून उमटलेली हलती बोलती चित्रे, ते सगळे प्रसंग माझ्या मनात रुंजी घालू लागले. या सगळ्या इतिहासाबद्दल अंतर्मुख वगैरे म्हणतात तसे आपोआप झालो - हे अर्थातच त्या पुस्तकातील निर्मळ, थेट ह्रदयाला जाऊन भिडणार्‍या निवेदनामुळे. नुकताच युजींसोबतचा मृत्यू म्हणजे काय त्याबद्दलचा संवाद अनुवादित केला होता. त्यात एक विचार असा होता -
असं म्हणतात की विचार टिकून रहातात.
होय, पण ती संरचना आहे; ती परंपरा आहे. तथाकथित मानवी जाणीव ही विचारांची संरचना आहे. आपण मागील पिढ्यांपासून पुढील पिढ्‍यांकडे ती सोपवली आहे.
पुस्तक वाचताना मी ते पूर्णपणे जगलो होतो. मीच गोडसे भटजी झालो होतो. काका त्या अरण्‍यात निश्चेष्‍ट होऊन पडलेले असताना मीच मावळत्या सूर्यदेवाला आम्हाला त्या अरण्‍यातून सुखरुप बाहेर काढण्‍यासाठी करुणा भाकली होती.
हे थोडंसं मजेशीर आहे, पण आपली जाणीव वेगळ्या अथाने अत्यंत संसर्गजन्य आहे. कुणीही लिहिलेलं असो की बोललेलं, ऐकलेलं काही क्षणांत ते आपल्याला स्मृतीगत होतं - त्यामुळे असेल कदाचित. त्यामुळे 1857 ते आत्ता मी इंदुरमध्‍ये रहात असलेल्या 2012 पर्यंतच्या काळातील अंतर माझ्या जाणीवेमध्‍ये क्षणात सांधले गेले - आणि मनात मंतव्यांचा खळबळाट होऊ लागला. ते होत असताना माझा श्वास मला आपोआप जाणवू लागला. हे सर्व होत असताना नेमके कोणकोणते प्रश्न मी स्वत:ला विचारले ते आता आठवत नाही - पण मनात एक बेरीज झाली. च्यायला, आपल्या स्मृतीशिवाय, आपल्या जाणीवेशिवाय आपण अस्तित्त्वात आहोतच कुठे? नुसता भल्याबुर्‍या आठवणींचा साठा आहे. हेदेखील आपल्याला शिवलिंगावरील भांड्‍यातून पाण्याची धार जशी बाहेर पडत असते त्याप्रमाणे मनातून बाहेर स्रवणार्‍या 'विचारा'तून आपल्याला जाणवतंय.
आपण फक्त जो मनात विचार असेल त्या रुपामध्‍येच जीवंत आहोत. आणि असे हजारो प्रकारचे विचार स्रवून जातात, तेच आपण बनलेलो असतो. हे झालं आता लिहून दाखवायचं आहे म्हणून घडून गेलेल्या मंतव्यांचं फक्त वर्णन. पण हे ज्यामध्‍ये घडलं तो दुसरा अनिवार्य पैलू 'शरीर' आहे - चार-पाच दिवस प्रचंड त्रास भोगावा लागला. त्यामध्‍ये मात्र मी अगदी ठरवून खोलात शिरणार नाही, त्याची कारणे वेगळी आहेत - तो सगळा 'मिस्टिकल कंटेंट' आहे आणि त्याचं विश्लेषण केलं नाही तरी चालू शकेल - खरं म्हणजे आता बर्‍याच गोष्‍टी केल्या नाहीत तरी चालू शकेल.
कारण त्या का घडत आहेत हे केवळ 'विचार' ही वस्तू काय आहे ते लख्‍ख दिसल्याने दिसलंय, दिसतंय. लोकांना वाटतं हॅ! हे पोरगं नेहमीच काहीतरी भंजाळणारं लिहित रहातं - पण महाजनहो, मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की 'विचारच' जीवंत असलेल्या सगळ्यांच्या बोकांडीवर कसाही कुणीकडून चढत रहातो - त्यामुळंच सर्व प्रकारची भंकस चालू आहे - यात सगळं म्हणजे सगळंच आलं! Each & Everything everyone does!
व्यक्त झालेल्या विचाराच्या रुपात मानवी शरीरातला 'मुव्हींग फोर्स' कसाही कुठेही जाऊन आदळलाय, आदळतोय आणि ती आपली कृती बनतेय, ते आपण बनतोय हे सर्वजण पहाताय ना? बस्स! मग तेवढंच.
कालपर्यंत जे माझे खरोखर प्रश्न होते़ ते फटक्यात संपले - आणि तेही एका बिगर आध्‍यात्मिक पुस्तकाच्या वाचन-मननामुळे ही आश्चर्याची बाब आहे* - हे आपल्यापर्यंत पोहोचवावं वाटलं - थोडक्यात जालीय भाषेत सांगायचं तर माझा बोळा कायमचा निघाला ! Wink
-------------------------------------------------------------
जिज्ञासूंसाठी : * मला वाटतं या घटनेबद्दल स्वा. सावकरांचं वेगळं विश्लेषण आहे, ते सावकरांच्याच आवाजात येथे ऐकायला मिळू शकते.
*कुठलीही गोष्‍ट तीव्रतेनं करणं या अर्थाने - त्या पुस्तकात जादू वगैरे आहे असं म्हणायचं नाहीय.