"दि मेसेज" या चित्रपटाबद्दल बऱ्याच दिवसांपासून लिहिण्याचे मनात होते. प्रेषित मुहम्मद व इस्लामच्या जन्माबद्दलचा हा एक फारसा नसला तरी धाडसी चित्रपट म्हणावा लागेल. माझे खूप मुस्लिम मित्र असूनही त्या कुणाकडूनच कधी या चित्रपटाबद्दल ऐकले नव्हते - पण अचानक मिळून गेला. कथेला नायक असूनही तो शेवटपर्यंत न दाखवलेला कदाचित हा एकमेव चित्रपट असावा. शिवाय या चित्रपटाबद्दल वाद झाल्याने (हो.. वाद होण्याचा किंवा 'घडवण्याचा' मक्ता काय फक्त बॉलीवूडने घेतलाय का) त्यातील प्रसंगांची इजिप्तच्या 'जामे अल अझर' व 'वर्ल्ड शिय्यत कौन्सिल'ने तारीकी सच्चाई केलेली आहे. चित्रपटात कुठेही प्रेषित किंवा त्यांचे नातेवाईक दाखवलेले नाहीत.
विशेष म्हणजे ऊर्दूमध्ये डब झाल्याने या चित्रपटाची मजा आणखीच वाढलेली आहे. ऊर्दू भाषेला तिचे खास लोभस रूप आहेच व बॉलीवूडमधील ऊर्दू संवादलेखकांच्या कृपेकरून आपल्याला समजणारे ऊर्दू शब्द मजा आणतात.
शहनशाह ए फारीस, शहनशाह ए बाझन्तीन (byzantine), शहनशाह ए मिस्र यांना प्रेषित दूताकरवी 'इस्लाम कुबूल' करण्याचे फर्मान पाठवतात. इजिप्त वगळता सर्व राजे ते 'तुम बियाबानो से निकलकर हमे बताओगे की हमे किस खुदा को मानना चाहिये' वगैरे डायलॉग मारून फर्मान फाडून टाकतात किंवा नाकारतात. ही या चित्रपटाची सुरुवात. निवेदन-विवेचन पद्धतीने चित्रपटातील दृश्ये सुरु होतात.
'मक्का बुतो का मस्कन'
मक्केत अंदाधुंद मूर्तीपूजा सुरु असते. तिथले नेते व काबाचे पुजारी यांनी भोळ्याभाबड्या जनतेला देवाच्या नावे लुटायला सुरु केलेले असते.
अर्थात हा चित्रपट माहितीपटाच्या अंगाने पुढे जात असल्याने कोणत्या देवांची आराधना सुरु होती? कधीपासून सुरु होती? हिंदू मूर्ती त्यात होत्या का? हे त्यात तपशीलवार आलेले नाही व तशी काही तथ्ये कदाचित उपलब्ध असतील तरी ते येऊ शकले नसते. फक्त 'हुबल' व 'लात' या दोन देवतांच्या मुर्ती दाखवणारे एक दृश्य आहे. या दोन देवता समृद्धी देणाऱ्या मानल्या जात.
काबा व त्यातील देवतांच्या मूर्तींमुळे मक्का हे अरब मधील एक महत्वाचे गाव बनलेले असते. मक्केच्या आर्थिक नाड्या काबातील मूर्त्यांमध्ये गुंतलेल्या असतात. त्यामुळे जेवढ्या जास्त मूर्ती तेवढी जास्त आमदनी असा सरळ हिशेब असतो.
अद्याप प्रेषित न झालेले निरक्षर मुहम्मद हे सर्व पाहून व्यथित असतात व मक्केशेजारी असलेल्या पर्वतावरील गुहा (गार) ही त्यांच्या चिंतनाची जागा असते (वो गार में तन्हा थे). या गुहेत त्यांना 'जिब्रईल' या देवदुताचे दर्शन होते. मी देवदूत जिब्रईल असून तुम्ही खुदाचे प्रेषित मुहम्मद आहात हे सांगून जिब्रईल त्यांना 'ए मुहम्मद.. पढ..' ( हीच कुरानाची सुरुवात) असा आदेश देतो. पण मुहम्मद त्याला मी निरक्षर आहे.. मी वाचू शकत नाही हे सांगतात. मग जिब्रईल 'पढ उस खुदा के नाम से जिसने इन्सान को खून की नाजूक बूंद से बनाया..' असे सांगतो.
या प्रसंगानंतर मुहंमदांना प्रचंड ताप चढतो व ते झालेली घटना जवळच्या नातेवाईकांना सांगतात. इथून पुढे वेळोवेळी मुहमंदांवर खुदाच्या वहीचे नुजूल होते व मुहम्मद तो संदेश लोकांना ऐकवू लागतात.
या संदेशांत सर्वात महत्वाचा व मक्काधिपती आणि मुहम्मद यांच्यात (व ईस्लाम व अन्य धर्मांतही ) वितुष्ट घड्वून आणणारा संदेश असतो तो म्हणजे - "एकच देव आहे व मुहम्मद हे त्याचे प्रेषित आहेत." (ला ईलाहा ईल्लला मुहम्मद रसूल्लीला (चु.भू.द्या.घ्या.) हा अरबी भाषेतील संदेश ऊर्दूमध्ये खुदा के सिवा कोई माबूद नहीं.. मुहम्मद खुदा के रसूल है असा दाखवण्यात आला आहे.. )
मक्कावासियांच्या मनात उलथापालथ घडवून आणणारे इतर संदेशही (देव एकच आहे व तो मूर्तीत बांधला जाऊ शकत नाही.. त्यामुळे काबा मध्ये ठेवलेल्या मूर्ती व त्यांची आराधना निरर्थक आहे.. स्त्री ही पुरुषाएवढीच महत्वाची आहे.. मुलींची जन्मतःच हत्या करणं पाप आहे...) मुहम्मदांना मिळतात. हे सोड्ता इतर संदेशांमागची सामाजिक पार्श्वभूमी चित्रपटात तेवढ्या तपशीलवार येत नसल्यानं ते बिगर मुस्लिम प्रेक्षकांच्या मनाची पकड घेत नाहीत. पण मुहम्मदांच्या या संदेशांकडे अनेक मक्कावासी आकर्षित होतात.. त्यांना ऐकण्यासाठी नियमीतपणे येऊ लागतात.
मुहम्मदांच्या संदेशांना मानणार्या लोकांच्या वाढत्या संख्येमुळे मक्काधिपतींचे धाबे दणाणते. मक्केतील गुलामसुध्दा मुहम्मदांच्या बाजूने होतात. मक्काधिपती मुहम्मदांच्या काका मार्फत त्यांना निरोप पाठवतात की आम्ही तुला अधिकार आणि पद देऊ.. पण तु तुझी शिकवण बंद कर. मुहम्मद ते नाकारतात. मग संघर्ष आणखीच तीव्र होतो.
मुहम्मदांवर "खुद कलामी" (संदेश वगैरे काही नाही.. हा स्वतःच काव्य रचतोय) चे आरोप केले जातात.
त्यातच मुहम्मदांना ईस्लाम जाहीर करण्याचा संदेश मिळतो व त्यांचे अनुयायी काबासमोर मोर्चा घेऊन धडकतात. तिथे मूर्तीपूजा मानणारे मक्कावासी व मुहम्मदांचे अनुयायी यांच्यात मारामारी होते. इथे सिंहाचे शिकारी असणारे मुहम्मदांचे दुसरे एक काका हमजा (अँथनी क्वीन) मुहम्मदांची बाजू घेतात व मुहम्मदांच्या अनुयायांवर दगडफेक करण्याचा आदेश देणार्या काबाच्या पुजार्याला एका झापडीत खाली पाडून जमावाला स्वतःसोबत लढण्याचे आव्हान देतात. जमाव गुपचूप पांगतो. हमजाने ईस्लाम स्वीकारल्याने मुहम्मदांचा पक्ष थोडा मजबूत होतो.
मग मक्केचे नेते आणखी चिडून मुहम्मद व त्यांच्या अनुयायांना वाळीत टाकतात. त्यांची घरे लुटली जातात व काही लोकांची हत्याही होते. शेवटी जीव वाचवण्यासाठी गुलाम व काही लोकांना शेजारच्या "हबशाच्या बादशहा" च्या राज्यात पाठ्वण्यात येते. हा हबशाचा बादशहा ख्रिश्चन असतो. तिथेही मक्केचे नेते त्यांचे लोक पाठ्वून 'गुलाम और मजहब के बागी' परत मागतात. इथे हबशाच्या बादशहासमोर झालेला कुराण वाचून दाखवण्याचा प्रसंग पहाण्यासारखा आहे. कुराणात मदर मेरी आणि येशू ख्रिस्ताबद्दल उल्लेख असल्याने सुखावलेला बादशहा (तुममे और हम में फर्क सिर्फ इस लकीर जितना है ) गुलाम व मक्केच्या लोकांना परत मक्केत पाठवण्याचे नाकारतो. या काळात मुहम्मद मात्र मक्केतच असतात, त्यांना त्यांच्या मोठ्या काकांचा आधार असतो. मक्केच्या नेत्यांचे या काका मार्फत मुहम्मदांना समजाऊन सांगण्याचे प्रयत्न सुरु असतात. पण वृध्द झालेल्या काकांचा मृत्यू होतो.
काही काळाने मुहम्मद मक्का सोडून मदिना मध्ये रहायला जातात. वाळवंटातील रस्त्यात एकट्या पडलेल्या मुहम्मदांवर मारेकरी पाठ्वले जातात. पण ते ज्या गुहेत लपलेले असतात तिच्या तोंडावर कोळ्याचे जाळे पाहून इथे कुणी नसेल असे समजून मारेकरी परत फिरतात.
मदिनामध्ये मुहम्मदांच्या आगमनानंतर ईस्लामच्या पहिल्या मशीदीचे बांधकाम, एका काळ्या गुलामाला मशिदीतून पहिली बांग देण्यास प्रोत्साहन देणे, नमाजची वेळ झाल्यानंतर लोकांनी दुकान उघड्यावर टाकून ओस पडणारी मदिना वगैरे दृश्ये मस्त आहेत.
पुढे मदिना वासियांना तीन वर्षातून एकदा मक्केची यात्रा करण्याचा मक्का-मदिनामध्ये करार होतो. प्रेषित मुहम्मदांसोबत खुदा सर्वप्रथम मक्केत 'हम कलाम' झाला असल्याने मादिनेतील मुस्लिमांच्या मनात मक्केबद्दल एक वेगळा आदर असतो.
पण यात्रेकरूंवर मक्केच्या काही लोकांनी अचानक हल्ला केल्याने दोन्ही पक्षात पुन्हा संघर्षाची ठिणगी पडते व युद्ध होऊन मक्केचे बरेच महत्वाचे लोक मारले जातात.
अबू सुफियान या मक्केतील बड्या असामीच्या बायकोचा (हिचं नाव 'हिंद' असं आहे ) भाऊ हमजाकडून मारला जातो. ती मग चिडून भाला फेकण्यात तरबेज असलेल्या गुलामाला नेमून हमजाचा काटा काढते.
फार प्रभावी नसली तरी वाळवंटातील युध्दाची दृश्ये व वाळवंटात चित्रित झालेला हा एकूणच चित्रपट काहीतरी क्लासिक पहात असल्याची मजा देतो. वाळवंटातील दोन-तीन युध्दांचे प्रसंग चित्रपटातच पहाण्यासारखे आहेत.
मक्केवर मदिनावासियांचा विजय व मुहम्मदांनी काब्यावरुन दिलेला खुत्बा व संदेश यावर चित्रपट संपतो.
सर्व चित्रे जालावरुन साभार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा