नुकताच झालेला, शेअर करण्यासारखा फाऊंटन पेनचा किस्सा आहे.
आत्मशून्य इथे आला तेव्हा आम्ही असेच राजवाड्याशेजारच्या रोडवर बाजारातून फिरत होतो. जुनी कळकट दुकाने बंद व्हायची रात्रीची वेळ. एक फाऊंटन पेनचं दुकान दिसलं. फाऊंटनपेन भलेही रोज वापरत नसलो तरी दुकान दिसलं की पहावे, घ्यावे वाटतातच. त्या दुकानदाराने नेहमीचीच सत्तर, शंभर रुपयांची शाईपेनं समोर मांडली. त्यापैकी बरीच ऑलरेडी इथेतिथे पडून आहेत. मूड गेला. पण दुकानातून निघून कसं यावं म्हणून उगी शान मारत -
''अरे नहीं नहीं, ये तो सब चालू माल है, कलेक्शन के लिये कुछ है तो दिखाईये '' अशी वाक्ये फेकली.
दुकानदारी नजरेत आणि अत्यंत किंचीत तुच्छतेने पुन्हा नीट निरखून पहात -
''सब प्रकार के पीस मिलेंगे, आपका बजट कितना है ? ''
म्हटलं बुवा चांगला असेल तर घेऊ सात आठशेपर्यंत. मग त्यानं आतून एक लाकडी केस आणून दाखवली.
जिनहाओ - छोटे छोटे लाल डोळे असलेल्या बाकदार ड्रॅगनचं हूक आणि उत्थित चिनी अक्षरे, आकृत्यांनी सजवलेला फिकट राखाडी शाईपेन - व्वॉव्व!
मी आपलं घिसाडघाईत खस्स्कन झाकण उघडलं. सुरी हातात घ्यावी तसं वाटतं होतं.
दुकानदार महाशय जे पेटले ते तसं झाकण उघडलेलं पाहून, अरारा!
''आपके पास कितने पेन है? आपको ठिक से ढक्कन खोलना नहीं आता.'' मी चमकलो. नाटकी आवेशात हात जोडून म्हणालो -
''महाराज आपही कृपा करो''
पुन्हा त्याचा भडीमर - ''मुझसे कुछ सिख के जाईये, आप क्या खाक कलेक्शन में इसे रखोगे, इधर, इधर दिजीए. मै सिखाता हुं.'' म्हणून त्यानं एका हाताच्या तीन बोटांच्या आधारावर तर्जनी व अंगठ्यात शाईपेन पकडून, पायात मोडलेला काटा काढावा तसं हळुवार झाकणावर दाब दिला. क्लिक् ! वाजलेलं आम्हालासुद्धा ऐकू आलं.
''इसे ऐसा खोलते है, तलवार की तरह उखाडोगे तो इसका नीब् घीस घीस के खतम् हो जाता है, फिर इसमें मजा नहीं.. अब ये ध्यान में रखिए, यहांसे खरीद के ले गये तो भी...''
मग त्यानं त्या कोर्या पेनचं नीब् तसंच काळ्या शाईच्या दौतीत बुडवलं.. एकदोन रेषा काढून
''चलाईये, मख्खन की तरह चलता है''
ते पुरेसं वजनदार शाईपेन स्वत:च चालत असाव तसं हळुवारपणे नीब् मधून काळ्याभोर बाकदार महिरपी चितारु लागलं. आपण खलास! आत्मशून्याकडंही पेन दिलं - तो म्हणे अक्षर चांगलं नाहीय रे, तुच लिही. म्हटलं बघ तर. त्यानंही चालवून पाहिलं. तो म्हणे सेल्फ गायडेड मिसाईल आहे.
''चीज़ ही ऐसी रखतें है, हाथ में लोगे तो वापस नहीं रख पाओगे. जिंदगी गुजर गई कलम की दुनिया में, मै कोई दुकानदार लगता हुं?''
दुकानदार जबराट माणूस होता, ही खास इंदौरी दुकानदारी होती. दाम भी वाजिब, मुनाफा भी खरा. ग्राहकी नहीं, जैसे अपने ही घरवालों को कुछ बेच रहे हो. और जाओगे भी कहां?
काही बोलण्यासारखं नव्हतंच, पण एवढं ज्ञान मिळाल्यानंतर महाराष्ट्रातले लोकही कृतज्ञ असतात, हे त्याला जाणवावं म्हणून म्हणालो -
''आप भी फाऊंटन के चहेते है.. कितने तक के फाऊंटन पेन रखते हैं...''
तो काही बोलला नाही - आत निघून गेला. त्या फारशा झकपक नसलेल्या त्याच्या दुकानाबद्दलच्या कात्रणांचे बाड घेऊन परत आला. हिंदुस्तान टाइम्स, दैनिक भास्कर, दबंग दुनियाची कात्रणे काऊंटरवर विखरुन टाकत -
''ये डेढ लाख, ये दो लाख.. ये साडेसात लाख''
इंदुरमध्ये तो लाख लाख रुपयांचा शाईपेन आला तेव्हा तेव्हा बातम्या आलेल्या होत्या.
''हमें तो आप जैसे परखी मिल जाए, दुनिया के किसी भी कोने से जो चाहे वो फाऊंटेन पेन मँगवा लेते है''
''ये अपने बस की बात नहीं.. मै तो बस ऐसे ही..'' वाक्ये आपोआप बाहेर पडली.
''हम किसलिए है, इसीलिए सभी की बस की चीज़ लिए बैठे है...''
आता त्यानं रजिस्टर काढलं.
''ये कौन है? प्रोफेसर श्रीवास्तव, इन्होंने डेढ हजार का लिया है, ये हमारे डाक्टर शुक्ला, आठ सौ का, ये यहां देखीए एडवोकेट भाटिया..
शोधूनशोधून तो नावं बघायला लावत होता.. डेढ हजार.. ये हमारे सालों से ग्राहक है.. पसंदीदा चीज आ जाए, तो बस इन्हे फोन करने की देरी.. आकर ले जाते है...''
''बस, बस.. बस..इसको पैक कर दिजीए.. और आपका कार्ड हो तो दे दिजीए..''
कार्ड काही छापली नव्हती की संपली होती माहित नाही. रजिस्टरमध्ये नाव, फोन नंबर लिहून घेतला. शाईपेन कॅरीबॅगेत टाकलं, पैसे दिले.
''कुछ ऐसा ही आये तो जरुर बताईये.. मै आ जाऊंगा.''
''मार्च के एंड में नया माल आनेवाला है, फोन करुंगा''
''धन्यवाद!'' म्हणून बाहेर पडू लागलो.
''और एक बात..'' त्याला काहीतरी सांगायचं असावं.
हात जोडून म्हटलं, ''महाराज!''
''एकबार उस पेन का ढक्कन ठिक से खोलकर के दिखायेंगे..?''
खळखळून हसलो आणि जोडलेले हात डोक्यापर्यंत नेऊन झटकन् दुकानाबाहेर पडलो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा