१४ मे, २०१२

विस्‍टिरिया लॉज - 2

आमच्या पाहुण्‍यांना निरोप दिल्यानंतर काही वेळ आम्ही शांत बसून राहिलो. बारीक झालेल्या डोळ्यांवर भूवया पाडून नेहमीप्रमाणे त्याचे डोके पुढे काढून होम्स जोरजोराने धूम्रपान करु लागला.
'' तर वॉटसन'' माझ्याकडे अचनाक वळून तो म्हणाला,
''या सगळ्यातून तुला काय कळले?''
''स्कॉट एक्लसच्या गूढाबद्दल मला काहीच समजले नाही''
''पण गुन्ह्याबद्दल?''
''त्या माणसाचे साथीदारही गायब आहेत त्याअर्थी, मी असे म्हणेन की तेदेखील या खूनात सहभागी होते, म्हणूणच ते फरार आहेत''
''एका दृष्‍टीकोनातून हेदेखील शक्य आहे. पण असे असले तरी, त्याच्या दोन नोकरांनी गार्सियाविरुद्ध संगनमत करावे आणि त्याच्याकडे पाहुणा आलेल्या रात्रीच त्याच्यावर हल्ला करावा, हे विचित्र आहे हे तू पण कबूल करशील. गार्सियावर हल्ला करायचा असता तर हा नेमका दिवस सोडून तो कधीही त्यांच्याच तावडीत होता ना?''
''मग ते फरार का झाले?''
''अगदी अचूक! ते फरार का झाले? हा एक मोठा मुद्दा आहेच. आणखी एक मोठा मुद्दा म्हणजे आपला अशील स्कॉट एक्लसचा अनाकलनीय अनुभव. या दोन्ही ठळक मुद्यांना सांधणारे विश्लेषण देता येणं हे मानवी बुद्धीमत्तेला शक्य आहे काय? शब्दांचा विचित्र वापर करुन लिहिलेली ती गूढ चिठी विचारात घ्‍यायचीच असेल, तर ती तात्पुरते गृहितक म्हणूनच विचारात घेण्‍याच्या लायकीची असेल? आपल्याला कळणारी नवी तथ्‍ये, आपोआप आपल्या गृहितकाच्या साच्यात बसली तर आपले गृहितक हळूहळू या प्रकरणाची उकल करु शकेल.''
''आपले गृहितक आहे तरी काय?''
त्याच्या खुर्चीत मागे झुकून होम्सच्या डोळ्यांची मुद्रा मंगोल झाली.
''या स्कॉट एक्लसची कुणीतरी मुद्दाम मजा घेतलीय, हे अशक्य आहे हे तुलाही जाणवत असेल. घटनाक्रमातून दिसते त्याप्रमाणे पुढे गंभीर घटना घडणार होत्या आणि स्कॉट एक्लसला विस्‍टिरिया लॉजमध्‍ये घेऊन जाण्‍याचा त्यांच्याशी संबंध आहे.''
''पण कसला संबंध संभवतो?''
''आपण यातल्या प्रत्येक मुद्यावर विचार करु. तो तरुण स्पॅनियार्ड आणि स्कॉट एक्लसच्या विचित्र आणि अचानक झालेल्या ओळखीमध्‍ये काहीतरी खटकतंय. या स्पॅनियार्डनेच मैत्रीसाठी पुढाकार घेतला. स्कॉट एक्लसची त्याच्याशी ओळख झाल्यानंतरच्या दुसर्‍याच दिवशी त्याने लंडनच्या दुसर्‍या टोकाला जाऊन स्कॉट एक्लसची भेट घेतली, आणि त्याला इशरला घेऊन येईपर्यंत त्याने एक्लसशी सतत संपर्क ठेवला. आता, त्याला या एक्लसकडून काय मिळण्यासारखे होते? मला त्या माणसात दम दिसत नाही. तो तेवढा बुद्धीमानही दिसत नाही - हजरजबाबी लॅटीन माणसाचा मित्र होण्‍याएवढा तरी नाहीच. मग गार्सियाला मिळू शकणार्‍या इतर लोकांमधून यालाच का बरे निवडण्‍यात आले? हेतू तडीस जाईल असे काय या स्कॉट एक्लसमध्‍ये आहे? त्याच्यामध्‍ये वेगळा उठून दिसणारा गुण आहे का? मी म्हणतो असा गुण स्कॉट एक्लसमध्‍ये आहे. खानदानी
ब्रिटीश अदबशीरपणाचा तो उत्तम नमुना आहे, आणि हाच माणूस दुसर्‍या ब्रिटीश माणसावर छाप पाडू शकतो. स्कॉट एक्लसचे कथन कितीतरी विचित्र होते तरी या दोन अधिकार्‍यांनी चकार शब्दाने स्कॉट एक्लसला प्रश्न विचारला नाही, हे तू पाहिले असशीलच.''
''पण तो कशाचा साक्षीदार बनणार होता?''
''घटना जशा घडल्या त्यानुसार तो कशाचाच साक्षीदार बनला नाही. त्या जशा योजल्या होत्या तशा त्या घडल्याच नाहीत. हे प्रकरण मला दिसते ते हे असे!''
''तो alibi ठरु शकला असता, असे काही आहे का?''
''अगदी अचूक! वॉटसन, तो निश्चितच एक alibi ठरु शकला असता. केवळ युक्तीवादासाठी आपण असं मानू की विस्‍टिरिया लॉजमधले लोक संगनमत करुन कसलातरी बनाव रचत होते. हा बनाव, मग तो कशाचाही
असो, एक वाजण्यापूर्वीच तडीस जाण्‍याची योजना होती. काही घड्याळांचे काटे फिरवून त्यांनी स्कॉट एक्लसला त्याला वाटले त्यापेक्षा कितीतरी आधीच झोपी घातले असेल हे अगदी सहज शक्य आहे, पण काहीही झालेले असले तरी, बारापेक्षा जास्त वाजलेले नाहीत हे सांगायला जाणारा गार्सियाच होता हेही शक्य आहेच. गार्सियाला बाहेर जाऊन जे काय करायचे होते ते करुन उल्लेख केलेल्या वेळेपर्यंत तो परत येऊ शकला असता तर कसल्याही गंभीर आरोपावर त्याच्याकडे देण्यासारखी त्याच्याकडे जबरदस्त तोड होती. त्याच्याकडे कोणत्याही न्यायालयासमोर शपथेवर सांगू शकणारा एक इंग्लिश माणूस होता की गार्सिया रात्रभर घराच्या बाहेरच पडला नाही. वाईटात वाईट घडले तर संरक्षण म्हणून स्कॉट एक्लसच्या खांद्यावर बंदूक ठेवता आली असती.''
''होय, हे लक्षात आले, पण फरार झालेल्या इतरांबद्दल काय?''
''अद्याप वास्तविकता काय ते आपल्याला काहीच माहित नाही, पण यात फार मोठ्या अडचणी असतील असे मला वाटत नाही. तरीही, पूर्ण माहिती न घेताच युक्तीवाद करीत सुटणे चूक आहे. असे केले तर ती माहिती
आपण आपल्या गृहितकाशी जुळण्‍यासाठी उगाच त्यात फेरफार करतो.''
''आणि ती मध्‍येच आलेली चिठी''
''त्यात काय लिहिलं होतं बरं? आपले नेहमीचेच रंग, हिरवा आणि पांढरा. उघड्यासाठी हिरवा, बंदसाठी पांढरा - रेसींगसारखं काहीतरी वाटतंय. उघड्यासाठी हिरवा, बंदसाठी पांढरा हा एक सुस्पष्‍ट संकेत आहे. मुख्‍य पायर्‍या, पहिला कॉरीडॉर, उजवीकडील सातवे, ग्रीन बेझ - हा कुठेतरी करण्‍यात आलेला निर्देश आहे. या सर्वांच्या मागे आपल्याला कदाचित टाळके सरकलेला नवरा आढळू शकतो. खरोखर हा एक धोकादायक पाठलाग  होता. तसं नसतं तर तिने 'लवकर' हा शब्द लिहिला नसता. ''डी'' हे कदाचित खूण म्हणून.''
''तो माणूस स्पॅनियार्ड होता, ते डी डोलोरेसमधले डी आहे, स्पेनमध्‍ये आढळणारे सर्वसामान्य नाव!''
''उत्तम, वॉटसन, फारच उत्तम! पण हे अशक्य आहे. एक स्पॅनियार्ड दुसर्‍या स्पॅनियार्डला स्पॅनिशमध्‍येच लिहील ना! या चिठीचा जो कुणी लेखक असेल तो निश्चितच इंग्लिश आहे. असो तर. तो हुशार इन्स्पेक्‍टर
आपल्याकडे परत येईपर्यंत आपण थंड बसावे हे उत्तम. दरम्यान काही तासांसाठी तरी आळसटलेल्या वातावरणातून बाहेर पडल्याबद्दल, आपले नशीब जोरावर आहे असे मानू.
सरे पोलीस ठाण्याचा अमलदार येण्‍यापूर्वीच होम्सच्या तारेचे उत्तर आले होते. होम्सने ते वाचले आणि त्याच्या वहीत ठेवण्‍यापूर्वी माझा आशाळभूत झालेला चेहेरा त्याच्या नजरेतून सुटला नाही.
''आपण बड्या वर्तुळात शिरत आहोत,'' तो म्हणाला.
ती तार म्हणजे नावे आणि पत्त्यांची यादी होती:
लॉर्ड हॅरिंगबी, दि डिंगल; सर जॉर्ज फॉलॉइट, ऑक्झशॉट टॉवर्स; मिस्‍टर हेन्स हेन्स, जे. पी, पर्डी प्लेस; मिस्टर जेम्स बेकर विल्यम्स, फॉर्टन ओल्‍ड हॉल; मिस्‍टर हेन्‍डरसन, हाय गॅबल, रेव्हरंड जोशुआ स्टोन, नेथर
वॉल्सलिंग.
''आपली कारवाई मर्यादीत वर्तुळात ठेवण्‍याचा हा अत्यंत सूस्पष्‍ट मार्ग आहे,'' होम्स म्हणाला.
''बेयन्सच्या पोलीसी खाक्याच्या मनाने आधीच अशी काहीतरी योजना वापरली असेल यात संशय नाही.''
''मला नीटसं कळलं नाही.''
''हे बघ मित्रा, आधीच आपण या निष्‍कर्षावर आलेलो आहोत की गार्सियाला जेवताना मिळालेला संदेश म्हणजे भेट किंवा भेटीचे नियोजन होते. आता, त्यातून पक्का अर्थ कळतो तो अचूक असेल तर, गुप्तता ठेवण्यासाठी, जाणार्‍याला मुख्‍य पायर्‍या चढून कॉरीडॉरमधला सातवा दरवाजा शोधावा लागणार, मग घर खूपच मोठे आहे हे अगदी उघड आहे. अगदी तसेच हेही निश्चित आहे की हे घर ऑक्झशॉटपासून एक किंवा दोन  मैलांच्या आत आहे, कारण गार्सिया त्याच दिशेने चालत होता आणि, मी तथ्‍ये जशी पहातो त्याप्रमाणे, तो विस्‍टिरिया लॉजमध्‍ये alibi ची पाठराखण मिळवण्यासाठी परत येणार होता, जे त्याला एक वाजेपर्यंतच मिळू शकणार होते. ऑक्झशॉटच्या जवळील घरांची संख्‍या मर्यादित असायलाच हवी, म्हणून मी स्कॉट एक्लसने नमूद केलेल्या एजंटला तार पाठवून त्यांची यादी हस्तगत करण्‍याची सुस्पष्‍ट पद्धत वापरली. ती या तारेत आहे
आणि आपल्या गुंत्याची उकल करणारे टोक निश्चित त्यांत असायला हवे.''
इशरमधील त्या सुंदर सरे गावात इन्स्पेक्टर बेयन्सला सोबत घेऊन पोहोचेपर्यंत जवळजवळ सहा वाजले.
होम्स आणि मी मुक्काम पडणार या अंदाजानेच निघालो होतो आणि बुल येथे झोपण्‍याची मस्त सोय केली होती. शेवटी डिटेक्टीव्हसोबत आम्ही विस्‍टिरिया लॉजची पाहणी करण्‍यासाठी निघालो. झोंबरा वारा आणि
चेहेर्‍यावर सपकारे मारणारा दमदार पाऊस असलेली ती मार्चमधली थंडगार, किर्रर्र सायंकाळ होती. आम्ही ज्या भयंकर ध्‍येयाकडे निघालो होतो त्यासाठी हे वातावरण अगदीच जुळून आले होते.

2. सॅन पेद्रोचा वाघ


थंडगार, उदास वातावरणातून काही मैल चालल्यानंतर आम्ही एक उंच लाकडी दरवाज्यासमोर पोहोचलो, जो चेस्‍टनट्सच्या पडछाया पडलेल्या रस्त्याच्या तोंडावर उभा होता. वळणा-वळणाच्या, पडछाया पडलेल्या त्या
रस्त्यावरुन आम्ही एका बसक्या, काळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर तसल्याच काळपट दिसणार्‍या घरासमोर आलो. दरवाज्याकडील डाव्याबाजूस असलेल्या बाहेर उघडणार्‍या खिडकीतून मंद उजेडाची तिरीप पडत होती.
''कॉन्स्‍टेबल आहे बंदोबस्तावर,'' बेयन्स म्हणाला. ''मी खिडकी वाजवतो.'' त्याने गवताचा पट्‍टा ओलांडला आणि खिडकीच्या काचेवर टकटक केली. धूसर काचेतून मला आतला माणूस आगीसमोर ठेवलेल्या खुर्चीतून
धाडकन उठताना अस्पष्‍टसा दिसला, आणि खोलीतून तीव्र आरोळी उठली. लगेच झटकन एक पांढर्‍याफटक, श्वास गुदमरलेल्या पोलीसाने दरवाजा उघडला, त्याच्या थरथरत्या हातात मेणबत्ती हेलकावे खात होती.
''वॉल्टर्स, काय झालंय?'' बेयन्सने जरबदार आवाजात विचारले.
त्या माणसाने हातरुमाल कपाळावरुन फिरवला आणि सुटका झाल्यासारखा श्वास बाहेर टाकला.
''तुम्ही आलात हे बरंच झालं, सर. खूपवेळ झाली सायंकाळ उलटून, आणि माझा तर धीरच सुटत होता.''
''धीर सुटत होता वॉल्टर्स? मनगटात दम असलेला माणूस आहेस असं मला उगाच वाटलं म्हणायचं.''
''आहेच, सर, पण हे रिकामे घर आणि किचनमधली ती विचित्र गोष्‍ट. तुम्ही खिडकी वाजवलीत मला वाटलं, ती बला पुन्हा एकदा आली. ''
''कसली बला आली?''
''भूत, भूतच म्हणायला पाहिजे त्याला. इथं खिडकीत होतं.''
''काय होतं खिडकीत, आणि कधी?''
''आत्ता दोन तासांपूर्वी. अंधार पडत आला होता. मी खुर्चीत वाचत बसलो होतो. माझी नजर वर का गेली ते कळलं नाही, पण पण खिडकीतून एक चेहेरा माझ्यावर रोखला होता. एवढा भयानक चेहेरा, तो नक्की माझ्या
स्वप्नात दिसणार.''
'' छ्‍या:, छ्‍या: वॉल्टर्स, पोलिस-कॉन्स्‍टेबल असे बोलत नसतात.''
''होय, सर, होय; पण मी ते पाहून हादरलो, मग घाबरलोच नाही असं दाखवण्यात काय अर्थ. ते धड पांढरंही नव्हतं सर, ना काळं - मी कधी पाहिलेल्या रंगाचं नव्हतंच ते - शाडूवर दुधाळ पट्‍टे मारल्यासारखा विचित्र रंग होता. आणि त्याचा आकार, तुमच्या चेहेर्‍यापेक्षा नक्कीच दुप्पट मोठा होता, सर. भुकेजलेल्या श्वापदासारखे पांढरे दात, आणि त्या बटबटीत डोळ्यांनी माझ्यावर नजर रोखली होती. शपथ घेऊन सांगतो सर, तिथून ते मागे होऊन निघून गेलं तोपर्यंत मला बोटसुद्धा हलवण्‍याची बुद्धी झाली नाही - माझा श्वास जसा बंदच पडला होता. मी बाहेर झुडूपांमध्‍ये जाऊन आलो, पण ईश्वराची कृपाच तिथं कुणीही नव्हतं.''
''तुला ओळखत नसतो ना मी, वॉल्टर्स, तर तुझ्या नावासमोर मी काळी खूण ठोकली असती असल्या फालतूपणासाठी. भूतच दिसलं तर ड्यूटीवर असलेल्या कॉन्स्‍टेबलने ते पकडता आलं नाही म्हणून देवाचं नाव घेऊ  नये. एकांतामुळे झालेला हा सगळा भासच हा?''
''किमान एवढं तरी सहज उकलायला हवं,'' होम्स त्याच्या हातातील बॅटरीचा झोत टाकत म्हणाला. गवताच्या पट्‍ट्याची झर्रकन पहाणी करुन ''होय,'' तो म्हणाला, ''बारा नंबरचा बूट असणार. त्याच्या पायाइतकाच इथून
तिथून भरभक्कम असला तर निश्चितच तो अगडबंब होता असं म्हणायला पाहिजे.''
''गेला कुठे तो?''
''झुडूपं ओलांडून रस्त्यावर उतरून पसार झाला असणार.''
''जाऊ द्या,'' इन्स्पेक्‍टरने गंभीर व करारी चेहेर्‍याने म्हटले, ''तो कुणीही असो, आणि त्याला काहीही हवे असो, आत्ता तो इथून गायब आहे, आणि आपल्याला बर्‍याच गोष्‍टी पहाव्या लागणारेत. आता, श्रीयुत होम्स,
तुमची हरकत नसेल तर, एकदा घरात चक्कर टाकून येऊ.''
विविध बेडरुम आणि बैठकांची बारकाईनं पाहणी करुनही काहीच हाती लागलं नाही. तिथे रहाणार्‍यांनी सोबत थोड्याच वस्तू असाव्यात किंवा काहीही आणलं नसावं, आणि छोट्यातलं छोटं फर्निचर घरासोबतच घेण्‍यात आलेलं दिसतं होतं. मार्क्स आणि कं., हाय हॉलबर्न असा शिक्क्याच्या गाद्यागिराद्या तशाच मागे ठेवलेल्या दिसत होत्या. तार पाठवून आधीच चौकशी करुन झाली होती आणि त्यात मार्क्स यांच्याकडे या ग्राहकाबद्दल तो पैसेवाला होता यापेक्षा काहीही जास्त मिळू शकली नाही. सटरफटर सामान, काही पाईप्स, काही कादंबर्‍या, त्यापैकी दोन स्पॅनिश, जुन्या प्रकारची पीनफायर रिव्हॉल्व्हर, आणि एक गिटार एवढ्या वस्तू तिथल्या जंगम मालमत्तेपैकी होत्या.
''यात काहीच नाही,'' बेयन्सने प्रत्येक खोली तपासताना मेणबत्ती या हातातून त्या हातात हलवत म्हटले, ''पण श्रीयुत होम्स, किचनमध्‍ये काय आहे ते तुम्हाला दाखवलंच पाहिजे.''
घराच्या मागच्या बाजूस असलेली ती एक अंधारी, उंच सिलींगची, कोपर्‍यात काड्यामुड्‍यांचं गचपन पडलेली खोली होती, स्वयंपाकी तिथे झोपत असावा असं दिसत होतं. टेबलावर खरकटी ताटं आणि प्लेट, काल रात्रीचं
शिळं अन्न पडलेलं होतं.
''हे पहा बरं,'' बेयन्स म्हणाला. ''हे इथे का असावं?''
ड्रेसिंग टेबलच्या बाजूस ठेवलेल्या एका विचित्र आकारावर त्याने मेणबत्ती धरली. खूप सार्‍या सुरकुत्या, कडकडीतपणा आणि वाळून गेलेला तो आकार नेमका काय असावा ते सांगणं अवघड होतं. काळपट, कातडीदार आणि मानवी आकृतीशी साधर्म्य दाखवणारं काहीतरी आहे असं म्हणता आलं असतं. पहिल्यांदा मी त्या आकाराचं निरिक्षण केलं तेव्हा, मला वाटलं ते ममी सारखा मसाला भरलेलं ते निग्रो मूल असावं, नंतर वाटलं ते खूप वेडंवाकडं आणि प्राचीन माकड असावं. शेवटी तो प्राणी आहे की माकड आहे अशा संशयात मी गोंधळलो. पांढर्‍या शिंपल्यांच्या दोन माळा त्या आकाराच्या मध्‍यभागी बांधल्या होत्या.
''कमाल आहे -- कमालच आहे, ही! त्या विचित्र अवशेषाकडे पहात होम्स म्हणाला. ''आणखी काही?''
बेयन्स काही न बोलता सिंकच्या दिशेने निघाला आणि मेणबत्ती पुढे धरली. कुठल्यातरी मोठ्या, पांढर्‍या पक्ष्याचे अवयव आणि शरीराचे त्यावर पंख तसेच त्यावर ठेऊन निघृणपणे तुकडे केलेले होते. होम्सने त्या पक्ष्याच्या छिन्नविच्छिन्न केलेल्या डोक्यावर आलेली सूज दाखवली.
''सफेद मुर्गा,'' तो म्हणाला. ''खूपच मजेदार! खरोखर ही केस विचित्र आहे.''
पण बेयन्सने त्यापैकी सर्वात विचित्र वस्तू सर्वात शेवटी ठेवली होती. सिंकच्या खालच्या बाजूने जस्ताची बादली बाहेर काढली ज्यात रक्त भरुन ठेवलेले होते. त्यानंतर त्याने हाडाचे जळके तुकडे भरुन ठेवलेले तबक
घेतले.
''काहीतरी मारण्‍यात आले आणि काहीतरी जाळण्‍यात आले. या वस्तू आम्ही आगीतून बाहेर काढल्या. सकाळी डॉक्टर येऊन पाहून गेले. ते म्हणतात यापैकी काहीही मानवी नाही.''
होम्स असला व त्याने हातावर हात चोळले.
''इन्स्पेक्‍टर, अभिनंदन करायला हवं तुमचं, एवढी विलक्षण आणि सूचक केस हाताळल्याबद्दल. तुमची एकंदर तयारी आणि मिळत असलेल्या संधींचा मेळ बसलेला नाही, असं मी खरोखर म्हणेन.
इन्स्पेक्टर बेयन्सचे बारीक डोळे आनंदाने चकमले.
''खरे आहे, श्रीयुत होम्स. ग्रामीण भागात धूळ बसतेच. या प्रकारची केस हीच माणसाला संधी मिळवून देते, आणि मला वाटते मी ती सोडणार नाही. ही हाडे कशाची असावीत बरे?''
''मेंढी, किंवा मी म्हणेन, एखादा चिमुकला.''
''आणि तो पांढरा मुर्गा?''
''कमाल आहे, श्रीयुत बेयन्स, खूपच कमाल आहे. जवळ जवळ एकमेवाद्वितीयच म्हणायला हवं.''
''होय, सर, या घरात अत्यंत विचित्रप्रकार करणारे अत्यंत विचित्र लोक असले पाहिजेत. त्यापैकी एक तर गेला. त्याच्या साथीदारांनी त्याचा पाठलाग करुन त्याला संपवला असेल काय? असेल तरी ते जातील कुठे, कारण  प्रत्येक बंदरावर बातमी पाठ‍वलीय. पण माझा स्वत:चा दृष्‍टीकोण वेगळा आहे. होय, माझा दृष्‍टीकोण खूपच वेगळा आहे.''

(क्रमश:)

३ टिप्पण्या:

  1. मी लहानपणी या गोष्टीचा अनुवाद वाचलेला आहे, मी वाचलं ते एक ४-५ होल्म्सकथांचं अनुवादित पुस्तक होतं. त्यामध्ये अजून "नाचणारी माणसे", "छतामधून येणारा साप" अशा काही गोष्टीही होत्या. तेव्हा वाचलेलं आता अगदीच धूसर आठवतंय. तुम्ही खूप सुंदर अनुवाद केला आहे, पुन्हा वाचताना खूपच मजा येतेय.

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद इंद्रधनू :)
    आता विस्टिरिया लॉज - ३ साठी बहुतेक थोडा उशीर होईल.

    उत्तर द्याहटवा