२७ मार्च, २०१०

व्यंकटेश माडगुळकर





लोकमतमध्ये असताना एकदा व्यंकटेश माडगुळकरांचे "गावाकडच्या गोष्टी" हे पुस्तक हातात पडले. पुस्तक वाचुन मी या लेखकावर जाम फ़िदा झालो. त्यापूर्वी बनगरवाडी एकदा वाचले होते - पण ते तेवढे लक्षात राहीले नव्हते. गावाकडच्या बोली भाषेत शब्दबंबाळपणे लिहिणारे अनेक लेखक पाहीले - पण माडगुळकरांची शैलीच निराळी. वाचकांच्या बोटाला धरून, प्रमाण भाषेत सुरुवात करून माडगुळकर मधुनमधुन अस्सल गावठी (ग्रामीण नव्हे, तो शहरातल्या लोकांचा शब्द) वाक्यांची पेरणी करतात. या वाक्यामध्येच गावकी बोलीचे सगळे गुण पाहायला मिळतात आणि लेखक कथा लिहीताना जेवढा तल्लीन झालेला असतो तेवढेच आपणही तल्लीन होतो.
माडगुळकरांचे बालपण गावातल्या रामोशी, महार, मुसलमान या अठरापगड जातींमध्ये गेले असे ते सांगतात. ती पोरे जे करीत असत तेच हेही करीत. माडगुळकरांच्या लहानपणीची पण माडगुळकरांच्या व्यक्तीमत्वात फार मोठा हात असलेली कथा ते सांगतात. त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आजारी आईला दुध पाजता येईना. या लहान लेकराचा पोटमारा होऊ लागला. शेजारीच त्यांच्या आईची बायजा नावाची एक मैत्रीण होती. तिलाही नेमके याच वेळी मूल झाले होते. माडगुळकरांच्या आईचे दुध आटले आणि या मैत्रीणीला मात्र भरपुर दुध येऊ लागले. ही बायजा या लहानग्यालाही पाजायला येऊ लागली. या दुधाचा परिणाम म्हणजे मोठे झाल्यावर या बामणाच्या पोरात मांस-मच्छर खाणे, शिकार करणे असले गुण उतरले !
माडगुळकर कधीही "हे असे व्हायला नको होते, ते तसे हवे होते" असा आव आणून कथा लिहीत नाहीत. जे असेल त्याचा बारीक-सारीक तपशीलांसह एक पट ते वाचकांसमोर मांडतात आणि आपण ती भाषेची श्रीमंती पाहाण्यात दंग होतो. (क्रमश:)
(छायाचित्रे इथुन घेतली:http://www.tatya.org/)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा