२८ मार्च, २०१०

आचार्य रजनीश उर्फ़ भगवान श्री रजनीश उर्फ़ ओशो






रजनीश:ओशो नावाचं गारुड समजुन घेताना आपण स्वत:लाच हरवुन बसतो. रजनीशांची व्याख्याने किंवा साहित्य हे भोव-या सारखं आहे. ते तुम्हाला आकर्षीत करतं, गरगर फिरवतं, घेरी आणतं, तुम्ही आजवर वाहात राहीलेली ओझी फेकायला लावतं. त्यांची व्याख्याने किंवा साहित्य या फक्त पाय-या आहेत - त्या अंतिमत: तुम्हाला ध्यानाकडे घेऊनच जातात.
रजनीशांकडे एक व्यक्ती म्हणुन तुम्हाला पाहाता येत नाही. कारण त्यांनी स्वत:ला व्यक्तीत्वाच्या चौकटीत बांधुन घेतलेलं नाही आणि तुम्ही त्यांना त्या चौकटीत बांधुही शकत नाही. ११ डिसेंबर १९३१ ते १९ जानेवारी १९९० हा त्यांचे ५९ वर्षांचे आयुष्य. लहानपणीचा एक अवखळ मुलगा, तारुण्यातील एक झंझावाती व्याख्याता - विद्यापीठाचा गोल्डमेडलिस्ट, पुढे त्याच विद्यापीठातील प्राध्यापक, आपल्या व्याख्यानांतुन धर्मा-धर्मांमध्ये पसरलेल्या दांभिकतेवर, दांभिक गुरुंवर हल्ला करणारा बंडखोर, शहरा-शहरांतुन ध्यान शिबीरे घेणारा, देश-विदेशांतील तरूण-तुर्कांना वेड लाऊन सोडणारा आणि संभोग से समाधी की ओर या व्याख्यानमालेमुळे "सेक्स गुरु" या नावाने प्रसिद्धी पावलेला, रोल्स राईस ही महागडी कार आणि हि-यांची घड्याळे वापरणारा आध्यात्मिक गुरु, पुण्यातील आश्रमातुन निघुन अमेरिकेतील ओरेगॊन या परगण्यात गेलेला मसिहा, तिथुन हाकालपट्टी होऊन पुन्हा भारतात पुनरागमन असा त्यांचा जीवन प्रवास आहे.
मला रजनीशांची ओळख पुस्तके, ध्वनी-चित्रफीती आणि इंटरनेट यावरून झाली. पण त्यांना ज्या-ज्या लोकांनी प्रत्यक्ष पाहिले त्यावरुन रजनीशांच्या भोवती खरंच एक गारुड, एक अद्भुतता होती असे दिसते. त्यांना वाचणारे साधक जेव्हा त्यांना प्रत्यक्ष भेटत तेव्हा भावना अनावर होऊन ते हंबरडा फोडुन रजनीशांच्याकडे झेपावत, रडत (ओशो: एक प्रतिभावंत ध्यानयोगी, शिरिष पै, प्रतिक प्रकाशन). (इथे मला मायकल जैक्सनला पाहुन बेशुद्ध होणा-या मुली आठवतात).
रजनीश स्वत:ला बुध्द पुरुष म्हणवुन घेतात. बुध्द पुरुष म्हणजे आत्मानुभूती झालेला, स्वत:च्या अगदी तळापर्यंत जाऊन आलेला माणुस. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे माणसाला जेव्हा आत्मज्ञान होते तेव्हा तो माणुस शिल्लक राहात नाही - तो फक्त एक स्रोत म्हणुन उरतो, त्याला भुत-भविष्य -वर्तमान दिसु लागले, तो आकाशिक रेकोर्डस पाहु शकतो इ.इ.इ. अशा अनेक लंब्याचवड्या, भुलविणा-या आणि लोकांना ध्यानाकडे आकर्षित करणा-या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत.
पण एखाद्या माणसाचा सर्वोत्तम समिक्षक, टिकाकार म्हणजे त्याचेच आयुष्य असते. तुम्ही कितीही लोकांना भुलवु शकाल पण तुम्ही जे जसे जगाल ते लोकांना पहायला तसेच राहील ना? ते गरिबांना आणि गरिबीला सरळ झटकुनच टाकतात. गरिबीच्या प्रश्नाला "गरिबीची कारणे देशाच्या मानसिकतेत आहेत, गरिबांना आपल्या देशात दरिद्रनारायण म्हटले गेले आहे, त्यात त्यांच्या अहंकाराची पुर्ती होते म्हणुन ते गरिब राहातात" ते अशी बगल देतात पण ते स्वत: मात्र रोल्स राईस वापरत असत. ख्रिस्तोफर काल्डर हा त्यांचा एकेकाळचा संन्यासी आणि नंतरचा टीकाकार म्हणतो की, "मी (रजनीशांनी) शेकडो मुलींसोबत सेक्स केला आहे, असे रजनीशांनी अमेरिकन प्रसार माध्यमांसमोर सांगितले होते. भारतीय गुरूंनी कधी आपल्या शिष्यांसोबत असले प्रकार केल्याचे दिसत नाही...." ओशोवर्ल्ड डॊट कॊम वर संकलीत केलेल्या त्यांच्या चरित्रात असे वाचनात आले की "बुध्दत्व प्राप्तीनंतर मी सेक्स केलेला आहे, आणि चांगल्याप्रकारे केलेला आहे...सेक्समुळे बुध्दत्वावर काहीही परिणाम होत नाही..."
रजनीश नायट्रस ऒक्साईड (मादक पदार्थ) घेत. यावरुन ते स्वत:ला "रबर होज बुध्दा" असेही म्हणवुन घेतात.
रजनीश कधीच कुणाची भीड-भाड ठेवत नसत. म.गांधी, मदर तेरेसा, येशु ख्रिस्त, ख्रिश्चनिटी, हिंदु धर्म, तुलसीदास, वेद, राम या सर्वांवर रजनीशांनी त्यांच्या व्याख्यानातुन ठिकठीकाणी ताशेरे ओढलेले दिसतात. "पूर्व आणि पश्चिम, आध्यात्म आणि भौतिकता, आत्मा आणि शरीर यातील दरी मिटवण्याचा माझा प्रयत्न आहे" असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
तशी रजनीशांनी लोकनिंदेची कधीच दखल घेतली नाही. लोकस्तुतीची मात्र त्यांनी निश्चितच दखल घेतली आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांनी सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर एक लेख लिहिला होता. रजनीशांनी एका व्याख्यानात त्याची दखल घेतली होती.
विवेकानंदांवर तुम्ही का बोलत नाही? असे त्यांच्या शिष्याने रजनीशांना विचारले होते. तेव्हा व्याख्यानात "विवेकानंद हे काही जाग्रत पुरुष नव्हते, त्यांना महापंडित म्हणता येईल.... आणि या तथाकथित पंडितांवर माझे किती प्रेम आहे हे तुम्ही जाणताच. विवेकानंदांनी हिंदुधर्माच्या अहंकाराला खतपाणी मात्र घातले....मी विवेकानंदांच्या गुरुंवर (रामक्रष्ण परमहंस) बोलु शकतो, कारण ती गोष्टच वेगळी आहे...
विवेकानंदांचे अभिमानी दत्ता बाळ यांनी रजनीशांच्या या वक्तव्यावर टीका केली, तेव्हा मात्र रजनीशांनी त्यांच्या व्याख्यानात दत्ता बाळ यांची यथेच्छ टिंगल उडविली होती.
रजनीशांच्या विवाहसंस्थेला विरोध होता....विवाह हे सुरक्षीत वातावरण आहे, त्यात प्राण नाही, त्यात प्रेम नाही असे ते सांगतात.
रजनीश कितीही बाता मारत असले, तरी ते ठिकठिकाणी उघडे पडलेले दिसतात. रजनीशांनी विवाह केला नाही. त्यांची एक प्रेयसी मात्र होती. क्रिस्टिन वाल्फ़ या नावाची इंग्रज तरूणी. ती त्यांच्या पूर्व जन्मीची प्रेयसी आहे, त्यांनी तिला पुढच्या जन्मात भेटण्याचे वचन दिले होते असे रजनीशांनी त्यांच्या व्याख्यानात सांगितले. पण पुढे या पूर्वजन्मीच्या प्रेयसीने मात्र मुंबईच्या एका हॊटेलमध्ये झोपेच्या गोळया खाऊन आत्महत्त्या केली. महिनाभरानंतर रजनीशांनीही जगाचा निरोप घेतला. गेल्यावरसुद्धा या माणसा भोवती एक गारूड उभे आहे. पुण्यातील त्यांच्या आश्रमातील समाधीवर लिहिले आहे - OSHO NEVER BORN NEVER DIED. ONLY VISITED THIS PLANET EARTH BETWEEN 11 DECEMBER 1931 AND 19 JANUARY 1990. (क्रमश:)

१० टिप्पण्या:

  1. मी काही रजनीशांचं फारसं वाचन केलं नाही.नुकतंच बागमार यांचं प्रिय आत्मन---! हे पुस्तक वाचलं.तुम्ही बरीच माहिती दिली आहे.हा माणूस गुढ होता असं दिसतंय !
    http://savadhan.wrdpress.com

    उत्तर द्याहटवा
  2. हा माणूस गूढ नव्हता - त्याने स्वत:भोवती मुद्दाम गूढता विणली होती.

    उत्तर द्याहटवा
  3. aapan dekhil osho baanu shakata. Tewadha chalu panaa aani bolbacchanpana aaplyat aahe he mi samgu shakato. Bola yashvant baba ki jai

    उत्तर द्याहटवा
  4. येस्स...! माझ्याकडे बोलबच्चनपणा नक्कीच आहे, पण ओशोकडे असलेली गोष्ट माझ्याकडे नाही - ती जेव्हा मिळेल तेव्हा यशवंत कुलकर्णी हा यशवंत कुलकर्णीच बनून जाईल - त्याने ओशो बनायची गरज नाही.

    उत्तर द्याहटवा
  5. दुनिया झुकती ही, झुकानेवाला चाहिये याचे उत्तम उदाहरण म्हणजे ओशो. त्यांच्याकडे अशी कुठलीही गोष्ट नव्हती ज्याने यशवंत कुलकर्णी यशवंत कुलकर्णी बनून जाईल (आत्मसाक्षात्कारी होईल). तसा गैरसमज मात्र त्यानी शाब्दिक चलाखी करत व्यवस्थित जोपासला होता. त्यांच्या भोवतीच्या तथाकथित गूढाइतकाच त्यांच्या साक्षात्कारही बोगस होता.

    उत्तर द्याहटवा
  6. विवेकानंदानी सद्गुरुना स्वात्मदान दिले. त्यांचे कार्य जगाच्या हितासाठी होते. शिष्यांच्या जीवावर परपोश्या गोचीडासारखे ऐशोआरामात राहणाऱ्या फुकट्या विदुषकाने त्यांना संकुचित ठरवत बुद्धी विश्वात्मक करावी हा विनोदच आहे. 'आत्ता आणि इथे' सारे आहे, तुम्ही जसे आहात तसे परिपूर्ण आहात असली बडबड करायची आणि मागच्या जन्मीचे दाखले देत शिष्येला भुरळ घालून लफडी करायची हे 'आत्मज्ञान' असेल तर तेच खरे आणि रमण महर्षीना झाला तो मात्र भ्रम म्हणावा लागेल. असो.

    उत्तर द्याहटवा
  7. Dear yashwant,
    I think Rajnish had great ability in spirutual field but he sleeped on that way.What do u think?

    उत्तर द्याहटवा