९ जून, २०१०

अलीफ लैला...अलीफ लैला....अलीफ लैला...




अर्शब नयी कहानी...
दिलचस्प है बयानी...
सदीयां गुजर गयी है
लेकीन न हो पुरानी
परीयों को जीत लाये
जिन्दो को भी हराये
इन्सान में वो ताकत
सब पे करे हुकूमत...
लहानपणी (हे नक्की कधी संपते?) या मालिकेने मला फार आनंद दिला, घाबरून सोडले आणि एका वेगळ्याच जगात गुंगवून सोडले. लहानपणी टि.व्ही.वरच्या मालिका आमचे खरे आयुष्य रंगवून सोडीत. रॉबीनहूड पाहिली की केलेच वेळू आणि चिपाड वापरून धनुष्यबाण. नुसत्या बाणाने चिमण्या मरेनात म्हणुन त्यांच्या टोकावर वेड्या बाभळीचे काटे. मग काय, चिमण्या मारता मारता आम्ही एकमेकांचे डोळेही फोडू लागलो.
टीपू सुलतान पाहात असताना सैनिक ****** की असे ओरडले की मालिकेत रंगून गेलेला मी मारवाड्याच्या घरात तल्लीन झालेल्या अख्ख्या पब्लिकमध्ये मोठ्याने "जय!!!!!" असे ओरडलो. आणि नंतर कुठेही मी दिसलो की पोट्टे "की जय!!!" म्हणून ओरडू लागली.
अलीफ लैला या मालिकेतील सिंदबाद, जिन्न, पर्‍या आणि अल्लाह ने केलेले चमत्कार पाहून अल्लाह या माणसाबद्दल (!!) आपला आदर फारच वाढला होता. इतका की मी उर्दू ही भाषा शिकण्यासाठी आमच्या गाय वाड्याशेजारच्या मशीदीत चालणार्‍या मदरशात जाऊन बसू लागलो. आमच्या गड्यांनी मला तिथे पाहिले आणि घरी आल्यावर आमची यथेच्छ कणीक तिंबण्यात आली !
"मुसलमान होतोस काय बेट्या, आधी संस्कृत शिक...मग कर वाटेल ते धंदे.....उर्दू शिकणार आहे म्हणे" इति भाऊ आणि काका..
पण आमचे दादा मात्र याबाबतीत माझ्या लेखी संत माणूस. या माणसाकडून ते जाई पर्यंत मी लाख रूपये तरी वसूल केले असतील - हवे असतील तेव्हा...द्या एक रूपया...द्या आठाणे (हजार वर्षे झाली हा शब्द उच्चारून)..असो तो एक वेगळा विषय आहे.
तर मी उर्दू शिकायला मशीदीत जाऊन बसलो हे कळल्यावर दादांनी स्वत: मला उर्दू शिकवायला सुरूवात केली (अलिफ, बे, पे, ते आणि उलट्या बाजूने लिहावे लागते हे कळल्यावर सोडून दिले). आमचे दादा उस्मानिया युनिव्हर्सिटीचे त्याकाळचे उर्दुतील पदवीधर होते. एकदा कुणाच्यातरी लग्नाला (नेमका सोमवार, अलिफ-लैलाचा वार) ते मला दुसर्‍या गावाला घेऊन गेले. आम्ही लग्न आटोपून रस्त्याने जात असताना "अलीफ लैला...अलीफ लैला....अलीफ लैला..." हे टायटल सॉंग कानी पडले. मग काय मी तिथेच भोकाड पसरले "मला अलिफ-लैला पाहायचीय..!" काही केल्या ऎकेचना.
बिचार्‍या दादांनी त्या अनोळखी घराचा दरवाजा वाजवून आतल्या माणसाला काहीतरी सांगितले आणि त्याने आम्हाला आत घेतले. त्या घरातली पोरे अलिफ-लैला बघायची सोडून माझ्याकडेच विचित्र नजरेने पाहात होती.
उर्दू डायलॉग्जची फोडणी दिलेल्या हिंदी चित्रपटांनी आमची (म्हणजे किमान मराठवाड्यातल्या पोरांची तरी) मातृभाषा खराब केली. आज देखील पोरे प्रेमा ऎवजी मोहब्बत, वाट पाहातो ऐवजी इंतजार करतो असे डायलॉग मारतात. कसे कुठुन जाणे अचानक "अलीफ लैला...अलीफ लैला...अलीफ लैला" हे टायटल सॉंग मनाच्या रेडिओत वाजले आणि हजारो आठवणींना जीवंत करणारी एवढी मोठी पोस्ट तयार झाली.

४ टिप्पण्या: