१० जून, २०१०
शब्द शब्द मुका
शब्द तयार आहेत हीच एक मोठी अडचण आहे. कारण शब्दांचे आपले आपले स्वभाव आहेत, ज्याचे-त्याचे अर्थ आहेत. ते फार तोकडे पडतात.
काही लिहायचं असेल, मन भरून आलं असेल तरीदेखील शब्द दगा देऊन जातात. आता पहा मला या पोस्ट मधून काहीच सांगायचं नाही - अगदी काहीही नाही. मग काही सांगायचं नाही तर ही झकमारी कशासाठी? ही झकमारी अशासाठी की "काही सांगायचं नाही" एवढं म्हणूनही मला जे सांगायचं नाही ते ठिक-ठिक व्यक्त होत नाही.
इथे उमटलेल्या शब्दांचा आणि जे मला लिहायचं आहे त्याचं कुठेच एकमेकांशी ताळतंत्र नाहीय. पण मी शब्दांचे अर्थ रद्द करू शकत नाही आणि त्यांना मला हवा असलेला अर्थही देऊ शकत नाही. ते नाठाळ घोड्यासारखे त्यांच्याच मनाप्रमाणे उधळत जाणार - आणि मी मात्र शब्दांवर बसून आपण काय मजल मारली यार? या विचारात खूश !! त्यामुळे मेंढपाळ त्याच्या शेळ्यामेंढ्यांना हिरव्या माळरानावर सोडून स्वत: बाभळीखाली निवांत ताणून देतो किंवा कासरे वळीत बसतो तसे मी करणार आहे.
काहीही सांगांयचं नसताना, फक्त शब्दांना पूर्वीच अर्थ चिकटले असल्यामुळे कुठलातरी आकृतीबंध ते तयार करणारच - मग तो तुम्हाला हवा तसा असेल - नसेल. हे माझ्या बाबतीत बर्याच वेळा घडलं असल्यामुळे मला जे कधीकाळी लिहावं वाटत होतं ते शब्दार्थात पकडण्याची खटपट निरर्थक होती हेच कळलं, कारण शब्दांना पूर्वीचेच अर्थ असतानादेखील "मी हे लिहिलं" असं म्हणनं म्हणजे मूर्खपणाचा कळस !! उलट जे सांगायचं आहे आणि जे सांगायचं नाही हे दोन्हीही तयारच आहे - माझा आणि त्याचा काही संबंध नाही असं म्हणंणच जरा अचूक ठरेल. उदा. रस्ते जगभर पसरून तयार आहेत, आणि जगही तयार झाले आहे. तुम्ही चाला, न चाला - रस्ते जिथे जायचे तिथे जाणार, आणि जिथे जायचे नाहीत तिथे नाही जाणार/ जग पण जसे आहे तसे राहाणार, किंवा नाही राहाणार.
मग एवढे सगळे असताना मी काही करण्याचा किंवा मी जे करील त्यावर "ह्याने केले" असा शिक्का मारण्याची गरजच राहात नाही - किंवा "मी" हा पदार्थच शिल्लक राहात नाही. "मी" किंवा "आपण सगळे" जर शिल्लक नाहीत मग हे आजूबाजूला एवढे कोण लोक आहेत? तर ते "काहीही नाही" आहे. कारण आपण जेव्हा नव्हतो तेव्हा आपण कुठे होतो? तर आपण तेव्हा नव्हतोच असे उत्तर मिळेल. मग आपण जर नव्हतोच, तर आपण असू कसे शकतो? किंवा आपण आत्ता आहोत हे तरी शक्य आहे का? आपण म्हणजे आपली शरीरं? नाही. ती फारच तोकडी पडतील. मग? आपली मनं? नाही. ते तर फक्त एक जैविक यंत्र आहे. आपण यंत्र कसे असू शकतो? मग शरीर नाही, मन नाही, शब्द नाही क्काही, क्काही नाही! काहीच नाही!!! म्हणूनच म्हणतो "मला काही सांगायचं नाही", कारण काही नाहीच्चे !!!
शब्द शब्द मुका
अर्थ सदा वांझोटा
वादाच्या हाती सदा
संवादाचा खराटा
मेंदूत भरली
विचारांची जळमटे
त्यात फडफडती
कल्पनांचे किडे
शोधती सदा
तत्वांचे आधार
हा सगळा
उधारीचा बाजार
प्रज्ञा कुपोषणाने मेली
बुध्दी पोटामागे गेली
मन बसले गाणी गात
फिडलवाल्या निरोची त्याची जात
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
शब्दांशी खेळत बसु नको.कवितेतुन जे सहजपणे व्यक्त होतंय त्या साठी इतकी भली लांबलचक पोस्ट कशाला???
उत्तर द्याहटवाएवढं दळण दळल्यावरच मला वाटतं कविता जास्त अर्थवाही झाली असावी..!
उत्तर द्याहटवाchitra, kavita ani post.. ek se ek..( nakki kay te malahi nahi kalal mahnun!)..
उत्तर द्याहटवाat last.. ultimate mahnje..
" मन बसले गाणी गात
फिडलवाल्या निरोची त्याची जात "
तो नव्हता का निरो? रोम जळत असताना फिडल वाजवत बसणारा? तो निरो आहे इथे.
उत्तर द्याहटवाही कविता आधीचीच आहे - वरचा गद्य खरडा नंतरचा आहे. पण दोन्हींतून तेच व्यक्त होतं.
खर आहे......
उत्तर द्याहटवा