मागच्या पावसाळ्यात अशाच एका कुंद झाकोळलेल्या दुपारी इथल्या विद्यापीठात गेलो होतो. पावसाच्या सरी वर सरी उतरू लागल्या आणि मधेच सोने पिऊन आलेले उनही नाचू लागले होते. जमीन हिरवाईनं नटली होतीच. परत येत असताना बोटॅनिकल गार्डन आणि विद्यापीठ विश्रामगृहाच्या मधल्या पट्ट्यात उन, हिरवळ आणि पाऊस हे तिन्ही जीवंत होऊन धुंदपणे नाचत होते आणि रंगीबिरंगी फुलपाखरेही या नाचाला उलट-सुलट बागडून दाद देत होती. मला ते शब्दात सांगता येत नाहीए आणि खालच्या फोटोंमधूनही ते दिसेल की नाही माहित नाही. पण तासभर मी तिथेच खिळून उभा होतो. हा पावसाळा स्वर्गाचे असे अनेक तुकडे घेऊन येणार - अनेक चमत्कार देऊन जाणार ! मी वाट पाहातोय फक्त हिरवळ पसरण्याची !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा