१३ जून, २०१०

‍जी.ए. कुलकर्णी - काजळमाया



जनसंमर्द एके ठिकाणी दुभागल्यासारखा झाला व त्याच्यात हास्याच्या लहरी उमटल्या. आपल्या दैनंदिन वस्त्रांवर एका बाजूने पूर्ण काळा व दुसर्‍या बाजूने पूर्ण शुभ्र असा वेष घातलेला विदूषक गाढवावर बसून राजसभेकडे येत होता. एका दोराच्या तुकड्याच्या टोकांना एका बाजूला घंटा व दुसर्‍या बाजूला दीप बांधून त्याने तो आपल्या गळ्याभोवती वेटोळ्याने टाकला होता, परंतू घंटेची जीभ काढून ठेवली होती व दीपात तेल अथवा वात काहीच नव्हते. भोवतालच्या कुत्सित उद्गारांकडे दुर्लक्ष करीत तो राजसभेकडे आला, आणि उच्चै:श्रव्यावरून इंद्र उतरत असल्याच्या दिमाखानेच तो खाली उतरला. त्याला पाहून फक्त सम्राटांच्याच विनोदाला हास्य अर्पण करण्याची सवय असलेल्या प्रधान अमात्यांच्यांही मुद्रेवर स्मिताची भावना दिसली. विदूषकाने गळ्याभोवतालची दोरी न काढताच दीप व घंटा एखाद्या देवतेच्या आयुधांप्रमाणे दोन्ही हातात उचलून धरली व राजसभेत प्रवेश करून तो सेनानायकांच्या आसनाशेजारीच, पण खाली संगमरवरी फरशीवर नम्रपणे बसला.
"स्वागत असो बृहस्पती ! आज गाढवावरून आगमन झालं ?" सेनानायकांनी नाटकी गंभीरपणे विचारले.
"आपण चुकलात सेनानायक ! आपल्या दिवंगत पुण्यश्लोकांच्या पवित्र आज्ञाचा भंग केलात! साम्राज्यात कशालाही, कोणालाही, त्याच्या खर्‍या रोखठोक नावानं संबोधायचं नाही, अशी एक आज्ञा त्यांनी प्रसृत केली होती याचा आपणांस विसर पडला आहे का? गाढवाला गाढव म्हणायचं नाही, तर त्यास मलराशिविमर्शक अथवा आजानुकर्ण म्हटलं पाहिजे. आत्ताच येत असता मी माझ्या मार्गावर एक मोठा कोलाहल ऐकला. घोड्यांचे केस कापून त्यांना नीटनेटके ठेवणार्‍या व्यवसायींचा, उंदीर मारून उपजीविका करणार्‍या श्रमिकांचा एक मोठा समूह राजसभेच्या दिशेनं आक्रामक आवेशानं येत असलेला मला दिसला. गत राजसभेच्या प्रसंगी मासे धरणार्‍यांना, शिकार करून जगणार्‍यांना नवीन नामचिन्हं मिळून त्यांना सभेत मानाचं स्थान मिळालं, तेव्हा या वेळी आपल्यासारख्या राज्यमंडलाच्या महत्वाच्या दिग्गजांना तसंच स्थान का मिळू नये, अशी त्यांची क्रोधजन्य विचारणा आहे. तेव्हा त्यांचं आगमन होण्याआधीच त्यांच्या प्रमुखांना अनुक्रमे अश्वकेशभूषारत्न आणि मूषककुलसंहारभास्कर अशा उपाधी देण्याची चतुर प्रधान अमात्यांनी योजना केली आहे, अशी वदंता आहे. मी फक्त वदंताच ऐकत असतो सेनानायक, सत्य नाही. एकदा काही तरी सत्य झालं की ते स्थिर, जड, चैतन्यहीन होतं, तर वदंता ही सदैव नवनवोन्मेषशालीनी असते."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा