७ ऑगस्ट, २०१०

मानसिक गर्भधारणा व प्रसुती:उगम, विकास, सद्यस्थिती


पहिली मानसिक प्रसुती कुठं झाली याच्या निश्चित नोंदी नसल्या तरी नाममात्र किंमतीत (काहीवेळा आग्रह करून फुकट) जी पुस्तकं मिळतात त्यांना त्या-त्या काळात झालेल्या प्रसुत्यांचे पेशंट हिस्ट्री रिपोर्टस मानायला हरकत नाही. या मानसिक प्रसुत्यांचे पेशंट हिस्ट्री रिपोर्ट आज पाहायला मिळत असले, तरी मुळात गर्भ राहिला कुणामुळे हेही पाहावं लागेल. तर गर्भ राहाण्याची कारणे तशी लक्षावधी आहेत. शरीरशास्त्राच्या दृष्टीने स्त्री हीच फक्त गर्भधारणा करीत असेल; पण मानसशास्त्राच्या दृष्टीने गर्भधारणेकरिता स्त्री-पुरूष एवढेच काय पण क्लिबसुध्दा सक्षम आहेत. जाणता अजाणता बोलणे, पाहाणे, ऐकणे, कल्पीणे घडत असताना संग घडून जातो; त्याची आठवण देखील राहात नाही, एवढंच काय पण मानसिक गर्भधारणा झाल्यानंतर आपण गर्भ वागवतोय हे सुध्दा जाणवत नाही. कधीतरी दिवस भरतात आणि हाती पडेल तो कागद-लेखणी वापरून आणि तेही उपलब्ध नसल्यास कुठल्याही मानव प्राण्यासमोर, ध्वनीवर्धकासमोर मुखावाटे शब्द करून मानसिक प्रसुती उरकली जाते. 
आता एकदा अशा मानसिक गर्भधारणा आणि प्रसुतीचा अनुभव गाठीस आला, तरी पुढच्या मानसिक गर्भधारणेचे काटेकोर व्यवस्थापन सहसा केले जात नाही. कारण स्पष्ट आहे. मानसिक संग करणे आणि मानसिक प्रसुती या संकल्पनाच एवढ्या सूक्ष्म आणि दृष्टी अगोचर आहेत की गर्भधारणा-वाढ-प्रसुती या प्रक्रियांचा आलेख काढण्याची कोणतीच यंत्रणा उपलब्ध नाही. एक मार्ग असतो - पण तो प्रसुती पश्चात आणि क्रौर्यसंपन्न आहे. यात प्रसुती होऊ देऊन अपत्याचे मूल्यमापन करावे लागते आणि ते पसंतीस उतरले नाही तर आपोआपच हातून भ्रूणहत्त्या नव्हे तर बालहत्त्या घडते !
     रात्रन रात्र जागून, अनेक वेळा मानसिकदृष्ट्या प्रसूत होऊन, अनेक बालकांची हत्त्या करून जे असे व्यवस्थापन करतात त्यांची बाळे रंगीत वेष्टणात गुंडाळून अनेक प्रतींमध्ये विकली जातात. आता बाळ तुम्ही विकत घेतले असले, थोडक्यात दत्तक घेतले असले तरी तुम्ही त्याचे मातापिता नसल्याने तुम्ही त्याला समजून घेऊ शकालच अशी खात्री नसते. तर असा हा लोकव्यवहार अनादि काळापासून सुरू आहे. 
माणसाचे जग जस-जसे विकसीत होत गेले तस-तशी मानसिक गर्भधारणा-प्रसुतीची गरज वाढत गेली आणि या प्रक्रियेला आखीव-रेखीव रूप मिळाले. पूर्वी जो मानसिक गर्भधारणेचा कालावधी अमर्यादित होता, तो आता घटला. गेली तीस वर्षे गर्भवती राहून सहाशे (??) पृष्टांच्या बाळाची डिलेव्हरी झालेली मिशाळ माता आणि दररोज प्रसुत होणार्‍या दैनंदिनप्रसुतीकारांच्या तुलनेतून हीच परिस्थिती स्पष्ट होते. 
         शिवाय मानसिक गर्भवती/प्रसुत माता यांची संख्या अतोनात वाढल्याने, बाळ झालंय हे क्षणार्धात जगजाहिर करणारी, एकमेकांची बाळे एकाच जागी पटकन पाहुन घेण्याची यंत्रणा देखील अस्तित्वात आली. मानसिक गर्भधारणा-वाढ-प्रसुती ही एकत्रितपणेच रूग्णालयात व्हावी याही संकल्पनेने जोर धरल्याने चित्रविचित्र नावांची हास्पिटलेही या यंत्रणेपूर्वी आकाराला आली - पण तिथे जाणे अजूनही बर्‍याच मानसिक गर्भवती टाळतात. यामागे कारणे अनंत आहेत. बाळ झाल्यानंतर तिथे होणारे अतोनात कौतुक, होणारी अतोनात टीका आणि मानसिक गर्भपात, अनंत विषयोपभोगातून जन्मास येणारी लुळी-पांगळी-आंधळी अपत्ये, अस्फूट मानसिक गर्भधारणेतून चाललेला काथ्याकूट ही ह्रदयद्रावक परिस्थिती पाहून नवख्या माता सहसा या हॉस्पिटल्सच्या खिडकीतून डोकावतात जरूर, पण स्वत: मात्र तिथे प्रसूत होत नाहीत. या सर्व गोष्टींचा विचार करता मानसिक प्रसुतीशास्त्राचा उगम, विकास, सद्यस्थिती आणि संभाव्यता यात संशोधनाला भरपूर वाव आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा