विचार जागा झाला आणि मेंदूच्या या कप्प्यातून त्या कप्प्यात फिरू लागला; हे उचकलं; ते उचकलं. पण त्याला काही करमेना मग थोडंस डोकं खाजवलं. मेंदूत तो एकटाच होता. बोर झाला होता. कुणीतरी हवं होतं. मग त्यानं दुसरा एक मेंदू शेजारून जाताना पाहिला. त्यात त्याला दुसरा, त्याच्यापेक्षा वेगळा विचार दिसला. मग त्यानं त्याला हाक दिली. दोघांचं काही बोलणं झालं आणि अचानक ते दोन्ही विचार हमरी-तुमरीवर उतरू लागले. मग त्यापैकी कोणतातरी एक विचार म्हणाला, "अरे? आपले विचार जुळत नाहीत वाटते, असे नको व्हायला"
मग दुसरा म्हणाला, "ए बाबा, मला एक वेगळा विचार म्हणून जगायचं आहे - तुझ्यासोबत जुळलो तर खलास होईल ना मी?"
मग पहिला विचार म्हणे, "छे! असं काही नसतं, दुसर्या अनेक विचारांचं माझ्याशी खूप जुळतं; तरी ते शिल्लक राहातात. तु म्हणतोस ते काही खरं नाही."
मग दुसरा विचार म्हणे, "असं आहे काय? मग असं कर, तु माझ्याशी जुळून दाखव"
मग तो पहिला विचार त्या दुसर्या विचाराशी जुळू लागला. ते दोन्ही एक झाले; आणि दोन्हीही नष्ट झाले. पण ते दोन्ही विचार जुळून मरण्यापूर्वी त्यांची असंख्य अपत्ये जन्माला आली होती - ती अजूनही हमरी-तुमरीवर उतरतात. कधी जुळतात आणि मरतात. कधी अनमॅरीड राहून वेगळी जगतात. या अनमॅरीड विचारांना मात्र काही अपत्ये होत नाहीत - ज्या मेंदूत ते राहातात तो निकामी होईपर्यंतच असले विचार जगतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा