८ ऑक्टोबर, २०१०

यु.जी.कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग चार

कॅलॅमिटीनंतर युजींनी सर्वप्रथम बंगळूरातील इन्स्टिट्यूट ऑफ वर्ल्ड कल्चरसमोर भाषण केले. या भाषणात त्यांनी मानवतेला देण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही संदेश नसल्याबद्दल आणि त्यांना जे घडलेय ते आध्यात्मिक कक्षेच्या पूर्णत: बाहेरचे असल्याबद्दल सांगितले. हे त्यांचे शेवटचेच भाषण ठरले. त्यानंतर त्यांनी कधीच, व्याख्यानाचे कुठलेच निमंत्रण स्वीकारले नाही; कुठल्याच प्रकारे त्यांना घडलेल्या घटनेभोवती किमान स्वत: होऊन तरी वलय निर्माण केले नाही. पुढे युजी कृष्णमूर्तींसोबत झालेल्या लोकांच्या किंवा तथाकथित साधकांच्या चर्चा या अत्यंत अनौपचारिक गप्पांसारख्या आहेत; ज्यात युजी कृष्णमूर्ती त्यांच्याकडे प्रश्न विचारायला आलेल्या लोकांची किंवा तथाकथित साधकांची “साधनेची” धुंदी पूर्णत: उतरवून टाकतात, त्यांच्याकडे गेलेल्या प्रश्नाळू लोकांना कुठल्याही प्रकारे मार्गदर्शन घेण्याच्या हेतूने त्यांच्या जवळपासदेखील फटकायला संधी नसे; विचारलेल्या सर्व प्रश्नांच्या चिंध्या होत. पण ते सरळसोटपणे लोकांना हाकलूनही लावत नसत. मित्रांसोबत चाललेल्या अनौपचारिक गप्पा ऐकायच्या असतील तर त्या ऐकायला आणि गप्पांच्या ओघात आध्यात्मिक विषयासंबंधाने त्यांचा दृष्टीकोन मांडण्याचा युजींचा मूड आला तर, ते ऐकण्यासाठी, फक्त मुक्त चर्चेच्या रूपात साधेसुधे प्रश्न विचारण्यासाठी युजींची ना नसे. याच चर्चांचे चित्रांकन करून युट्यूब, व्हिडीओसर्फ आणि गुगल व्हिडीओवर वेगवेगळ्या लोकांनी टाकले आहे – ते आज आपण पाहू शकतो.

महेश भट आणि युजी

महेश भट आणि युजींमध्ये संबंध कसे निर्माण झाले ते पाहाणे फार मनोरंजक आहे. युजींच्या संपर्कात येण्यापूर्वी महेश भट हे रजनीशांचे संन्यासी होते. त्या काळात विनोद खन्ना, गोल्डी उर्फ विजय आनंदसह बॉलीवूडमधील बरेच लोक रजनीशांकडे आकर्षित झालेले होते. रजनीशांची गर्भश्रीमंत, वलयांकित व्यक्तींना स्वत:कडे आकर्षित करून घेण्याची एक विशिष्ट “मोडस ऑपरेंडी” होती; त्याबाबतीत रजनीशांवर इथे काही लिहीण्याचा योग आला तर विस्ताराने लिहू. पण एक किस्सा आठवतो. 
दादा कोंडके

               पुण्याच्या आश्रमात रजनीशांचे “डिस्कोर्सेस” दररोज चालू असल्याच्या काळात पुण्याच्याच थेटरांमध्ये दादा कोंडकेचे “विच्छा माझी पुरी करा” जोरदार चालू होते. त्यात दादांनी “बाबागिरी”वर एक फार्स सादर केला होता. रजनीशांनी या गोष्टीची स्वत:होऊन नोंद घेतली आणि दादा कोंडके यांना आश्रमात बोलावून घेतले. एकतर रजनीशांभोवती त्यांनी स्वत:च पध्दतशीरपणे, अत्यंत सूक्ष्मप्रकारे निर्माण केलेले, पाहाणाराला बिलकुल कृत्रिम वाटणार नाही असे “पोहोचलेला माणूस” या प्रकारातले एक वलय असे आणि हे वलय ते सतत टिकवून ठेवत. आश्रमात येणार्‍या असामींबद्दलची खडानखडा व्यक्तीगत माहिती रजनीशांपर्यंत पोहोचत असे आणि गरज पडेल तेव्हा तीच माहीती रजनीश बेमालूमपणे, आडूनआडून त्या असामीसमोर मांडत राहात – रजनीशांना ते कळले  कसे याबद्दल ती असामी मात्र परेशान होत असे आणि काहीच संबंध न जोडता आल्याने बर्‍याच उदाहरणांत बर्‍याच ख्यातनाम लोकांनी रजनीशांना “सगळे काही दिसते” टाईप समजुतीला दुजोरा दिलेला आहे.
               रजनीशांची देहबोली अत्यंत अकृत्रिम, बोलणे अगदी लाघवी, शांत, हवेहवेसे. ते जिथे राहात त्या राजमहाल सदृश्य वास्तूतील दालनात दोन-दोन ए.सी. बसवलेले असत आणि फुल्ल स्पीडने ते सतत चालू असत. आलेल्या व्यक्तीला त्या दालनातील गारठा सहन होणार नाही असे वातावरण असे. गारठ्यात राहाण्याची रजनीशांची सवय होती. तर रजनीशांचे बोलावणे आलेय म्हटल्यावर दादा कोंडके त्यांच्या या असल्या वातावरण आश्रमात गेले. रजनीशांनी दादा कोंडकेंना विचारले “आपके प्रोग्रैम में आप हमारी मजाक उडाते है ऐसा सुनने में आया है..क्या बात है..” मी माझ्या कार्यक्रमात “बाबा” लोकांची टिंगल करतो; व्यक्तीगत तुमची नाही ही बाब दादा कोंडकेंनी रजनीशांसमोर स्पष्ट केली. भेट संपवताना रजनीशांनी दादा कोंडकेंच्या हातात स्वत:चे अत्यंत मुलायम, मऊसर हात ठेवत आश्रमात “येत राहायला” सांगितले. एखाद्या बाईचेसुध्दा एवढे मुलायम हात मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलेले नाहीत हे दादा कोंडकेंनी त्यांच्या “एकटा जीव” मध्ये लिहीले आहे. बहरहाल, पुढे चालून दादा रजनीश के शिकंजे में नहीं फंसे.

युजी आणि महेश भट


     पण महेश भट रजनीशांच्या तावडीतून सुटून युजींच्या संपर्कात आले कसे ते पाहाण्यासारखे आहे. ताणतणावाच्या आयुष्यात महेश भट एलएसडी च्या आहारी गेले होते. रजनीशांचे संन्यासी होते. यादरम्यानच श्री. भट हे जेकेंचे दि अवेकनिंग ऑफ इन्टेलिजन्स हे पुस्तक वाचत असताना प्रकाश कारवत यांनी महेश भट यांना सगळा गुरूगिरीच्या धंदा कसा चालतो ते समजावून सांगून “युजी नावाची एक व्यक्ती दरवर्षी भारतात येते, ते बेंगलोरमध्ये थांबतात – ते अज्ञात राहातात,  एकदा भेटून पहा ”  असे सुचवले. महेश भट हे मूळात चित्रपट निर्माते (त्या काळात महेश भट यांचा “स्ट्र्गल” सुरू होता) - रजनीशांचे संन्यासी – रजनीशांच्या मार्गदर्शनाखाली ध्यान वगैरे करणारे. थोडक्यात रजनीशांकडून तहान जागी केलेले साधक. या दोघांतील भेटीदरम्यान युजींनी केलेले बोलणे युजींच्या आध्यात्मिक दृष्टीकोनाचे मासलेवाईक उदाहरण असल्याने ते तसेच्या तसे इथे टाकतो:

युजी 
“मी काही देवमाणूस नाहीय. नव्हे, मला फ्रॉड म्हणता येईल. वेदनांशिवाय आनंद मिळवू शकणे अशक्य असल्याने माणसांच्या आयुष्यात देवाच्या शोधाचा गुंता निर्माण झाला. मन नावाच्या जांगडबुत्त्याने अनेक विघातक गोष्टी निर्माण केल्यात. त्यापैकी सर्वात विघातक गोष्ट आहे ती म्हणजे देव. देव हाच आत्यंतिक आनंद बनून राहिला आहे. स्वानुभूती, मोक्ष किंवा मुक्ती, रूपांतरणाच्या फॅशनेबल क्लृप्त्या, पहिले आणि शेवटचे स्वातंत्र्य हे देवत्वाचे दुसरे प्रकार आणि तसलीच कितीतरी स्वातंत्र्ये अधेमधे कुठेतरी येतात – याच सगळ्या गोष्टी माणसाला पागलपणा-तणावाच्या स्थितीत ढकलत आहेत. उत्क्रांतीच्या वाटेवर कुठेतरी, इतर जीवमात्रात जाणीव जशी कार्य करीत असते त्याच्या अगदी उलट माणसाला स्वत:च्या जाणीवेबद्दल जाण आली. इथंच, जाणीवेत तयार झालेल्या त्या दुभागणीत,  निसर्गाने प्रचंड काळजी घेत जे-जे काही तयार केले आहे त्याच्या सत्यानाशाची भीती दाखवत असणारा तो देव जन्माला आला..“
“या पृथ्वीवरची कोणतीच शक्ती, कोणताही देव, कोणताही अवतार हे थांबवू शकत नाही. माणूस आटोपलाय. त्याला काहीच करण्याचे स्वातंत्र्य नाही. जागतिक अणुयुध्द थांबविण्याचे मार्ग शोधण्याच्या गप्पा चालू असतानाच आपण फक्त एकच गोष्ट करू शकतो ती म्हणजे जगाचा नाश होण्याची वाट पाहाणे.” युजी चिडवलेल्या बैलासारखे धुसफुसत होते.
“असं बोलून तुम्ही आमच्याकडून आशा हिसकावून घेत नाहीय का, सर” महेश भट.
युजी हसले आणि म्हणाले,
“हो का? मी काही आशावादी महापंडीत नाही. तुम्ही आशा करीतच जगलात किंवा मेलात तरी चालेल.”
“लैंगितेबद्दल तुमचा विशिष्ट दृष्टीकोण आहे काय?” महेश भट.
युजी म्हणाले, “ देव आणि लैंगिकता एकाच स्रोतातून उगम पावल्यात. देव हा आत्यंतिक आनंद आहे. लैंगिकता नष्ट होण्यापूर्वी देव नष्ट व्हायलाच हवा. लैंगिकता का जायला हवी? मी अगोदरच नमुद करतो की सेक्सच्या विषयावरील माझ्या संपूर्ण विचारांवर साधु बैराग्यांचा प्रभाव होता. पण आता मी सांगतो की ब्रम्हचर्य पालनाचे जीवन, सेक्सला नकार आणि आध्यात्मिक जीवनाशी संबंधित तसल्याच त्या सर्व गोष्टींचा माझ्याबाबतीत जे घडलेय त्याच्याशी काडीचाही संबंध नाही. याचा अर्थ असा नाही की सेक्समध्ये रंगुन जाणे किंवा लिंगपिसाटाचे आयुष्य जगणे, एन्लायटन्मेंट किंवा तुम्हाला त्याला जे काही म्हणायचेय ते म्हणा – त्यासाठी पूरक ठरते. असल्याच कचर्‍यावर तुमचे पोषण झालेले आहे आणि कसल्याच प्रकारे मी तुम्हाला भ्रमित करायला इथे बसलेलो नाही. गांजा कसणे किंवा लैंगिक बजबजाट हा स्वत:ला जाणून घेण्याचा किंवा समाधीत जाण्याचा खात्रीशीर मार्ग आहे अशी स्वत:ची खुशाल समजूत करून घ्या. वर्तनाची नैतिक बंधने आणि कायदे हे दोन्ही तुम्ही पायदळी तुडवता आहात ती तुमचा समाज आणि तुमच्यातील बाब आहे. सामाजिक दृष्टीकोण बदलत असतील, पण अजूनही तुमची कृत्ये समाजविघातक मानली जातात. ”
पुढे महेश भट आणि युजींमध्ये बराच “संवाद” झाला –त्यातून महेश भट यांचे आध्यात्माबाबतचे समज किंवा गैरसमज चकणाचूर झाले. सेक्सबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत बोलताना महेश भट यांना युजी म्हणतात–
“तुझ्या गुरूने तुला लायसन आणि पांघरूण दिलेय, त्यामुळे तुला त्यात कसलीही अनैतिकता किंवा बजबजाट  वाटत नाही. अगदी याच पध्दतीने, बॉलीवूडमध्ये भूमिका मिळवण्यासाठी प्रोड्यूसर-डायरेक्टरसोबत सेक्स करणार्‍या नवोदित तारकासुध्दा स्वत:ला धंदेवाईक वेश्यांपेक्षाही कितीतरी वरच्या दर्जाच्या समजत असतात. अभिनयाच्या वलयांकित धंद्यात असल्याने त्या सहज स्वत:ला वेगळे समजू शकतात. तु सुखी आहेस? तुमच्यापैकी कोण सुखी आहे? तु? तुझी मैत्रिण? तुझी बायको? तिचा बॉयफ्रेंड? प्रत्येक जण दु:खी आहे. तुझ्या वागण्याचा प्रभाव प्रत्येकावर पडतो हे विसरू नको. प्रत्येकजण केविलवाण्या स्थितीत आहे. ”
या संवादातून आध्यात्मिक कोमाच्या अवस्थेत असलेले महेश भट खडबडून उठले असे ते स्वत:च कबूल करतात. युजींशी संवाद म्हणजे वीज वाहून नेत असलेल्या तारेला स्पर्श करणे होते. महेश भट यांचा आध्यात्मिक जगतातील प्रवेशच एलएसडीचे भूत मानगुटीवर बसल्याने झाला होता. मादक पदार्थ घेऊन झालेल्या परिणामातून बाहेर पडण्याच्या इच्छेने महेश भट हे आध्यात्मिक बाजाराच्या गल्लीकडे वळलेले होते.
“ध्यान ही युध्दभूमी आहे” महेश भट युजींचा निरोप घेत असताना युजी म्हणाले.
महेश भट यांचा रजनीशांशी संबंध येऊन दोन वर्षे उलटली होती. पण युजींना भेटल्यानंतर मात्र महेश भट यांना ध्यान करता येईना, गोंधळ उडू लागला. गारठून गेलेल्या रात्रीच्या वेळी, निर्जन रस्त्यावर शेकत बसणारे लोक सुखी आहेत, रस्त्याने फिरत फिरत आलेला आणि त्यांच्यात सामील झालेला मी, महेश भट, एक चित्रपट निर्माता एवढ्या जवळून पाहायला मिळाल्याने तर त्यांना फारच आनंद झालेला आहे पण मी स्वत: मात्र दु:खात आहे. मी का दु:खात आहे? महेश भट स्वत:शी विचार करू लागले. रात्री झोप येईना. त्यांच्या आतून त्यांना कुणीतरी म्हणू लागले, “मित्रा, तु भानगड ओढवून घेत आहेस!”
त्याच हिवाळ्यातील एका सायंकाळी पुण्याच्या आश्रमात रजनीशांची भेट होताच महेश भट रजनीशांसमोर त्यांना होणारा त्रास मांडू लागले -
“मला एकटंएकटं, हरवल्यासारखं वाटतंय. मी घाबरलोय, मनात शंका खदखदतायत. मदत करा मला!”
रजनीशांनी भट यांच्यावर दृष्टी खिळवली, हळूवारपणे स्वत:चा हात त्यांच्या कपाळावर ठेवत म्हटले,
 “जिससला सुळावर चढवले जात होते तेव्हा जिससलादेखील अशाच संशयाने पछाडले होते, देवाचा धावा करीत ते आरोळ्या मारत होते. पण ते शब्द उच्चारत असतानाच देव त्यांच्याच शेजारी उभा आहे हे त्यांना जाणवले.” “मी तुझ्याच सोबत आहे.”
त्याच सायंकाळी महेश भट यांना रजनीशांनी स्वत:ची पांढरी कफनी (रोब) भेट म्हणून दिला.
“हे घालत जा महेश. सगळं काही ठीक होईल. तु चांगली प्रगती करतो आहेस.” या शब्दांनी रजनीशांनी महेश भट यांना दिलासा दिला. महेश भट यांना ज्या गोष्टी ऐकायच्या होत्या त्या त्यांनी सांगितल्या. पण दुर्दैवाने, सगळे काही उत्तम असल्याची महेश भट यांची ती भावना फार काळ टिकू शकली नाही. त्यांना पुन्हा पुन्हा “भगवान रजनीशांच्या आणखी एका दर्शनाची” भीक मागण्यासाठी रजनीश आश्रमाच्या फ्रंट गेटवर चकरा माराव्या लागल्या. पुढचा अड्डा कधी जमणार यासाठी जीव तुटत असलेल्या, एखाद्या ड्रगच्या विळख्यात सापडलेल्या माणसासारखी गत होती. रजनीश हे त्यांच्या कुबड्या बनले होते – महेश भट त्यांच्या ब्लॉगवर सांगतात.  
रजनीशांसोबतचे महेश भट यांचे दिवस संपत आल्याचे  त्यांना स्पष्ट दिसू लागले. महेश भट यांच्या मनातील “भगवान” मरू लागले.  शेवटी, रजनीशांनी दिलेली संन्यासाची माळ तुकडे-तुकडे करून ती संडासात फेकून देऊन महेश भट यांच्या जीवनातील रजनीश अध्याय संपला.
नव-संन्यास इंटरनॅशनल कम्युनभोवती आणि आतबाहेर गेलेल्या तीन वर्षांतून महेश भट यांना स्वत: मध्ये काडीचीही सुधारणा होत असल्याचे जाणवले नाही.
“पुस्तके आणि व्याख्यानांतून लोक बदलू शकत असते तर, हे जग स्वर्ग बनले असते” युजी म्हणतात.
महेश भट यांनी रजनीशांनी दिलेली माळ संडासात फेकल्याची खबर आश्रमात पोहोचली होती. विनोद खन्नांच्या मार्फत महेश भट यांना आश्रमात भेटायला येण्याचा निरोप पाठवण्यात आला.
“का महेश? तु असे का केलेस?” खरोखर, मनातून वाटणारी काळजी दाखवत विनोद खन्ना महेश भट यांना विचारू लागले.

रजनीश उर्फ ओशो













“मी भगवानांना एवढ्या रागात कधीच पाहिलेले नाही. तु समक्षच आश्रमात येऊन त्यांनी दिलेली माळ त्यांना परत करावीस असा त्यांनी आग्रह धरलाय. तुझ्याबाबत ते कठोर परिश्रम घेत आहेत, तु विश्वासघात केलास असे ते म्हणतात. तु जर आश्रमात परत आला नाहीस, तर ते तुला नष्ट करून टाकतील असे ते म्हणातायत, महेश.” माझे आयुष्य बोटावर मोजण्या इतकेदिवसच राहिलेय असे भाव चेहेर्‍यावर ठेऊन विनोद खन्ना माझ्याकडे पाहात होता. मी “देवा”च्या विरूध्द बंडखोरी केली होती. त्याचा जळजळीत राग माझ्यावर रोखला होता   – महेश भट सांगतात.

युजी, महेश भट आणि विनोद खन्ना
















       निरपेक्ष प्रेमावर आणि दुसर्‍यावर मालकीची भावना कशी वाईट असते यावर तासन तास व्याख्यान झोडणार्‍या रजनीशांचा हा दुटप्पीपणा पाहुन, प्रेयसी सोडून गेल्याचे सहन होत नसणार्‍या प्रियकरासारखेच रजनीशांचे “दिल जले” टाईप वर्तन पाहुन महेश भट काय समजायचे ते समजले आणि युजींच्या “सगळ्या कुबड्या फेकून द्यायला लावेल तोच खरा गुरू. तो तुला चालायला सांगेल आणि तु पडलास तर पुन्हा उठ आणि पुन्हा चालायला लाग असे म्हणेल. कितीही थरथर सुटलेली असो, उठ आणि स्वत:च्या पायावर उभा राहा.” या शब्दांनी महेश भट यांना दिलासा मिळाला, आत्मविश्वास निर्माण झाला. महेश भट युजींचे मित्र बनले. युजी जेव्हा-जेव्हा भारतात येतील तेव्हा ते त्यांची भेट घेऊ लागले – त्यांना भेटायला परदेशात जाऊ लागले. पुढे महेश भट यांनीच, युजींच्या शिव्या खाऊन का होईना पण युजींचे आत्मचरित्र लिहीलेय.

युजी आणि महेश भट  




















(पुढच्या अंतिम भागात यु.जीं.ची वेगवेगळ्या विषयावरील मते, युजींचे व्यक्तीगत आयुष्य आणि  यु.जीं. चा मृत्यू)
(फोटो सौजन्य: मायाजाल, महेश भट यांचा ब्लॉग http://ug-k.blogspot.com)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा