२१ ऑक्टोबर, २०१०

यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग सहा (अंतिम)

युजी कृष्णमूर्ती या व्यक्तीमत्वाबद्दल इथे लिहीत असताना आणि बाकीच्या दैनंदिन निरिक्षणातदेखील माझी मलाच एक गोष्ट सुस्पष्टपणे जाणवली. आपल्याला जे स्पर्शून जातं ते सगळ्यांना स्पर्शून जाईलच असा सरळसोट नियम असू शकत नाही, होऊ शकत नाही - कारण माणसं वेगवेगळी आहेत, प्रत्येकाची पार्श्वभूमी वेगवेगळी असते आणि त्यातून प्रत्येकाचं "रिस्पॉन्स मॅकॅनिझम" वेगवेगळं झालेलं असतं; त्याबद्दलही ठाम आडाखे बांधता येत नाहीत. पण या लेखमालेत आलेल्या जवळपास सर्वच प्रतिक्रियांवरून (अगदी बोटावर मोजण्याइतक्या असल्या तरी) पुन्हा एकदा माझा यावर विश्वास बसला की लोक अजूनही वाचतात आणि काही नवं समजून घेण्याची आणि लिहीणार्‍याला प्रोत्साहन देण्याची त्यांची मानसिकता असते; ती लिहिणार्‍यांसाठी खरंच फारच महत्वाची आहे. त्यामुळे नाव न घेता, ज्ञात-अज्ञात प्रत्येक वाचकाचे व्यक्तीश: आभार मानतो आणि या लेखमालेच्या समारोपाकडे वळतो... (मिसळपाव च्या वाचकांना उद्देशून असलेला परिच्छेद..)
                                                                                             ----

मागच्या सहा लेखांत युजी या व्यक्तिमत्वाचा (!) पुसटसा का होईना पण बराचसा भाग रेखाटून झाला आहे. वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी युजींना घडलेल्या कॅलॅमिटीचा नंतर ८९ व्या वर्षी त्यांचे प्राणोत्क्रमण होईपर्यंतच्या आयुष्यात त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये प्रभाव दिसत राहिला. पण दुर्दैवाने, युजींनी त्या घटनेभोवती किंचीतही वलय उमटू दिले नाही. आध्यात्मिक क्षेत्राचे अभ्यासक/ स्वत:चा अध्यात्मात तेवढा (म्हणजे केवढा हेही एक कोडेच आहे!) अभ्यास नाही असे मानणारे सर्वसामान्य वाचकही या घटनेला कितीही ओढून ताणून एन्लायटन्मेंट/मुक्ती/मोक्ष याच आपल्याला नुसते ऐकून ज्ञात असलेल्या स्टेशनांवर आणून पोचवत असले तरी युजींनी आयुष्यभर ते नाकारले. युजींचा मूळ स्वभाव निर्दयी, कठोर होताच; सदयता, मृदूता अंगी बाणवण्यासाठी, स्वत:चा शोध घेण्यासाठी युजींनी जीवतोडून केलेली साधना निष्फळ ठरली होती; शेवटी स्वत:मध्ये असलेल्या निर्दयता, मोह याच घटकांना (!) आधार मानून बाकी जे-जे काही शिकवले, सांगितले जाते ते सर्व युजींनी भिरकावून दिले होते (पण म्हणून ते लोकांचे खून करीत किंवा लूटमारही करत सुटले नव्हते). ते फक्त जे जसे आहे ते तसेच स्वीकारणे होते. सगळ्या साधना सोडून दिल्यानंतर, बैराग्यासारखे जगभरात विविध ठिकाणचा प्रवास करीत करीत ते लंडन आणि तिथून पॅरीसमध्ये आले असताना, जवळचे सगळे पैसे संपून गेल्याने तिथल्या दूतावासात जाऊन स्वत:ला भारतात परत पाठविण्याची विनंती करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच मार्ग उरला नसताना युजींच्या आयुष्यात पूर्वीची काहीही ओळखपाळख नसली तरीही व्हॅलेण्टाईन डी कार्व्हान या आश्रयदातीचा प्रवेश झाला. आणि त्या एकाच भेटीत युजी व्हॅलेण्टाईनसोबत स्वित्झरलॅण्डमधील सानेन येथे राहू लागले. दैनंदिन कामे, खाणे, पिणे, झोपणे, आणि टाईम मॅगझीन वाचणे याशिवाय युजी तिथे काहीच करीत नसत. नेमक्या याच कालखंडात जेकेंची व्याख्याने सानेनमध्येच व्हावीत आणि व्याख्याने, उपदेश, साधना या गोष्टींना रामराम ठोकलेल्या युजींना मित्रांनी त्या व्याख्यानात ओढून न्यावे हा विचित्र योगायोग आहे (भारताच्या एका कोपर्‍यातील शहरातून निघून अमेरिका, लंडनमध्ये जाणारे विवेकानंद आणि तिथे त्यांना भेटलेल्या सारा बुल, भगिनी निवेदिता आणि कसलीच अपेक्षा न ठेवता आधार देणारी माणसे हे एक दृश्य आणि जवळपास बैराग्याच्याच मनोवस्थेत जगप्रवास करीत असताना कोणतीच ओळख नसतानाही युजींना आश्रय देणार्‍या व्हॅलेण्टाईन हे एक दृश्य मनात एका वेळी चमकून जाते तेव्हा अफाट पसरलेले हे जग खरंच नुसत्या स्वार्थी माणसांचे वैराण वाळवंट नाही असं उगाच वाटून जाते).

साधना आणि मोक्षप्राप्तीचे विचार सोडून देऊन, विविध प्रकारचे अतिंद्रिय अनुभव घेऊनही कुठल्याच अंतिम निष्कर्षाप्रत न पोहोचलेल्या युजींना जे. कृष्णमूर्तींच्या व्याख्यानात जेकेंच्या तोंडून बाहेर पडलेल्या “...त्या शांततेत, तिथं मन नसतं; तिथे कृती असते...” या शब्दांतून, एकूणच त्यांच्या त्या पोपटपंचीबद्दल तिटकारा आला आणि युजी तिथून उठून व्याख्यानाच्या शामियान्याबाहेर पडले.

हा झालेलाच कथाभाग पुन्हा एकदा मांडावा लागत आहे कारण खरा टर्निंग पॉईंट इथेच आहे. कारण एका "पोहोचलेला" मानला जात असणार्‍या आणि एका "प्रवासातील" माणसांतील ती शीतयुध्दासारखी परिस्थिती आहे. जेकेंच्या बोलण्याचा तिटकारा येण्याचे कारण म्हणजे ज्या गोष्टी सांगितल्या जात होत्या त्या युजींच्या जीवनात "ऑपरेट" होत नव्हत्या; आणि पार भगवान बुध्दांपासून, उपनिषदे, वेद, रामकृष्ण परमहंस अगदी इथून तिथून सगळ्याच वर्ल्ड टीचर्सनी सर्वात आधी स्वत:ला मूर्ख बनवले आणि नंतर संपर्कात येणारे सर्वजणही त्या मूर्खपणावर विसंबून राहात आले हा त्यांचा विश्वास अगदी पक्का झालाच होता. तरीही ती मोक्षाची स्थिती नेमकी असते कशी? आणि मी त्या स्थितीत आहे हे मला कळणार कसे? हे प्रश्न शिल्लक होतेच. जे. कृष्णमूर्तींच्या व्याख्यानातून निघून आल्यानंतर दोन दिवस ते प्रश्न "युजी" ही जी कुणी व्यक्ती होती तिच्या अंगात भिनले, रोम-रोम त्या प्रश्नाने पेटून उठले. शेवटी त्यांची त्यांनाच समज आली की आतापर्यंत त्याच वर्ल्ड टीचर्सकडून पाझरत स्वत:मध्ये आलेले ज्ञानच ते प्रश्न विचारत आहे (कारण जी माहिती आत उपलब्ध असते तीच बाहेर येते, जे शिकवलेले नसते ते कळूच शकत नाही हे त्यांनी पुढे चालून केलेले विधान आहे). ही बाब सुस्पष्टपणे दिसल्यानंतर, काही क्षण सगळी शरीर-मनोयंत्रणा सुन्न झाली कारण ती समज उदयाला येताच विचार प्रक्रिया थांबली होती. समजून घेण्यासारखे काहीही नाही हे वास्तव वीजेसारखे युजींवर येऊन आदळले होते. त्यानंतर काय घडले हे खुद्द युजीही सांगू शकत नाहीत. कारण विचारसाखळी तुटली तेव्हा तिच्यातून प्रचंड ऊर्जा मुक्त झाली आणि त्या ऊर्जेचा शरीरात स्फोट होऊन युजी या व्यक्तीने ४९ मिनीटे मृत्यूच्या स्थितीत घालवली; आणि या प्रक्रियेदरम्याने शरीर धनुरासनच्या स्थितीत वाकले होते. ही त्या कॅलॅमिटीची सुरूवात. पुढच्या पाच दिवसात सर्व इंद्रियांचे रूपांतरण आणि पाचव्या दिवशी स्वत:चे शरीरही स्वत:साठी नाहीसे होणे वगैरे घडले.

त्या पाच दिवसांत या घटना घडत असताना आणि नंतर सहा महिन्यांपर्यंत सर्व यंत्रणा स्थिरस्थावर होईपर्यंत नेमके काय होत आहे, झाले आहे हे युजींनाही उमगत नव्हते. साहाजिकच, ते ज्या अद्भुत प्रक्रियेतून जात होते त्याबद्दल युजींच्या आसपासच्या लोकांनाही उत्सुकता दाटून आली होती आणि त्यांच्यावर जेकेंच्या व्याख्यानासाठी सानेनमध्ये येऊन युजींनाही भेटायला येत असलेल्या लोकांकडून प्रश्नांचा भडीमार केला जात होता. पण त्या कॅलॅमिटीचा परिपाक म्हणून युजींना सलगपणे बोलता येत नव्हते; कारण आत स्वयंभूपणे चालणारा विचार कायमचा थांबला होता; आणि विचारांत समन्वय साधणारा समन्वयकच गायब झाला होता. पाहणार्‍या लोकांसाठी युजी शिल्लक होते; युजींसाठी "युजी" नावाचे कुणीच शिल्लक राहिले नव्हते. कॅलॅमिटीनंतरच्या विविध घटना आणि युजींनी  सांगितलेली त्यांच्या शिल्लक राहिलेल्या शरीराच्या चलनवलनात्मक कार्याची निरिक्षणे पुन्हा एकदा इथे लिहीत नाही; ती मागील भागात येऊन गेली आहेत.

ही घटना घडून गेल्यानंतर युजींसोबत लोकांच्या झालेल्या बोलण्यामध्ये युजींनी वेळोवेळी स्पष्ट केले आणि त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते स्पष्ट करीत राहिले की घडलेल्या घटनेत कसलाही आध्यात्मिक "कंटेट" नाही. त्या घटनेनंतर फक्त विचार नाहीसे होणे आणि शरीराचा प्रचंड इन्टेलिजन्स जागा होणे आणि त्याचे कार्य कसे चालते याबद्दल बाकीचे तपशील आहेत. पण इकडे युजींना घडलेल्या घटनेची खबर जेकेंच्या अनुयांयापर्यंत पोहोचली होती आणि जेकेंचे निकटवर्ती डेव्हीड बोह्म यांनीच युजींची सुमारे अडीच तास मुलाखत घेतल्याने युजींकडे लोकांच्या रांगा लागू लागल्या. आलेले लोक जेकेंच्या शिकवणुकीबद्दल बोलू लागले, युजी निर्दयपणे समोर मांडलेल्या मुद्याच्या चिंध्या करू लागले आणि त्यांना घडलेल्या घटनेला कोणताही आध्यात्मिक संदर्भ नसल्याचे पुन:पुन्हा सांगू लागले.

पुढे रजनीशांना सोडून आलेल्या दोन माजी संन्याशांनी संकलीत केलेले मिस्टीक ऑफ एन्लायटन्मेंट, माईंड इज ए मिथ, थॉट इज युअर एनेमी ही तीन पुस्तके सुरूवातीला प्रकाशीत झाली; नंतर युजींकडून विरोध होत असतानाही महेश भट यांनी युजींचे चरित्र लिहीले. युजींच्या कॅलॅमिटीबद्दल वैद्यकिय, वैज्ञानिक, मानसशास्त्रीय, आध्यात्मिक या आणि अशा कित्येक क्षेत्रातील ख्यातनाम नावांना उत्सुकता निर्माण झाली; वैज्ञानिक क्षेत्रातील मूर्खांचा (!) "गिनीपीग" व्हायला युजींनी नकार दिला, आध्यात्मिक क्षेत्रातील मूर्खांचा (!) "एन्लायटन्मेंटप्राप्त" गुरू व्हायला युजींनी नकार दिला. आणि त्यांच्यासमोर मांडल्या जात प्रत्येक गोष्टीला ते नकार देऊ लागले; मुळातच असलेला कठोर स्वभाव, कुठल्याही क्षेत्रातून आलेल्या कुठल्याच व्यक्तीच्या हुशारीची भीडभाड न ठेवता, इंग्रजी भाषेतील तिखटजाळ शीव्यांची वाक्या-वाक्यातून पखरण करीत युजी "उत्तरे" देऊ लागले नव्हे विचारलेल्या प्रश्नाची मोडतोड, चोळामोळा करून तो प्रश्नच प्रश्नकर्त्याच्या अंगावर भिरकाऊ लागले.

युजींनी केलेले बोलणे स्वत:च्या शब्दात रूपांतरीत करून वाचकांसमोर मांडणे म्हणजे जळत्या निखार्‍यावर पाणी ओतून शिल्लक राहिलेले कोळसे वाचकांसमोर ठेवण्यासारखे होईल. त्यामुळे युट्यूब, व्हिडीओसर्फ आणि इतर ठिकाणी अजूनही धगधगत असलेले हे निखारे जसेच्या तसे : -

स्वत:ची एन्लाटन्मेंट नाकारताना बॉम्बफेक -
व्हॉट नॉन्सेन्स इट इज?? आय अ‍ॅम नॉट अ‍ॅन एन्लायटन्ड मॅन... नॉट इन दी सेन्स यू यूज दॅट वर्ड...नॉट इन एनी सेन्स...देअर इज नो सच थींग अ‍ॅज एन्लायटन्मेंट... दे कॅनॉट टॉक ऑफ लव्ह, कम्पॅशन अ‍ॅट ऑल..यू कॅन फूल यूअरसेल्फ...आय अ‍ॅम नॉट इंट्रेस्टेड इन फ्रीईंग यू फ्रॉम यूवर फुलीशनेस...व्हाय शूड आय?..हू हॅज गिव्हन मी दी मॅण्डेट टू सेव्ह मॅनकाईंड? व्हाट इज रॉंग विथ मॅन काईंड..यू आर प्रॉडक्ट ऑफ दॅट..ऑल धीस सिली नॉन्सेस...



डॉक्टरांवरची बॉम्बफेक -     
यु थिंक दॅट वी नीड ऑल दोज स्क्रौंड्रल्स? फोर्टी ऑफ देम डा‌ऽऽईड दोज स्क्रौंड्रल्स...डॉक्टर्स.. दे वील नॉट हॅव चॅन्स वीथ मी...दे कॅन फूल व्होल ऑफ मॅनकाईंड...नॉट मी... सो माय कमांडमेंट - शूट ऑल डॉक्टर्स ऑन साईट अ‍ॅण्ड अ‍ॅट साईट..वी डोण्ट नीड दोज बास्टर्डस..



दलाई लामा आणि जे. कृष्णमूर्तींवरची बॉम्बफेक -
आर यू रेडी टू बिलीव्ह दॅट डलाई लामा इज ए सीआयए एजंट? यू गेव्ह हीम ए नोबल प्राईज.. ही बॉट एकर्स अ‍ॅण्ड एकर्स ऑफ व्हीनयार्डस...  बीकॉज इट्स ए रिफ्लेक्शन ऑन युवर इण्टेलिजन्स... यु आर नॉट रेडी दॅट यू आर ए डॅम फूल टू बिलिव्ह ऑल दोज शीट...

इव्हन व्हेन कृष्णमूर्तीज स्टोरीज केम आऊट, दे डिडण्ट वॉण्ट टू बिलीव्ह...ऑल इज सेक्स-अ-पेट्स (अस्पष्ट शब्द)..आय अ‍ॅम नॉट अगेन्स्ट इट.. आय अ‍ॅडमायर हीम मोर फॉर दॅट...बिकॉज ही केप्ट इट अंडर दी कार्पेट... अ‍ॅण्ड देन इव्हन टू ऑर थ्री वीमेन वर इन्व्हॉल्व्हड.. दे वूड ब्रिंग इट इन्टू दी ओपन..इव्हन दे केप्ट इट अंडर दी कार्पेट... दे आर नाऊ सर्क्युलेटींग दॅट बुक सेईंग ऑल दॅट इज ट्रू...ऑल हिज लव्हलेटर्स आर देअर..इन दि हंटिंगटन लायब्रेरी पॅसिडीएना...यु कॅन रीड देम....यू कान्ट डीनाय दॅट... ही वॉज लाईक ए नेव्हीमॅन..अ‍ॅण्ड ही हॅड ए गर्ल अ‍ॅट एव्हरी पोर्ट..आय अ‍ॅम नॉट अगेन्स्ट इट..आय अ‍ॅडमायर दॅट....नॉट हिज टीचींग..फिल्दी टीचींग... सर, यू गो अवे अ‍ॅण्ड गो टू सम ऑफ दोज बास्टर्डस..अ‍ॅण्ड पिक अप मोर फ्रेजेस..एम्प्टी वर्ड्स.. अ‍ॅण्ड रीपिट देम अ‍ॅण्ड फिल गुड... आय हॅव नो इंट्रेस्ट इन फ्रीईंग यू फ्रॉम एनिथींग..ऑर एनिबडी इन धीस वर्ल्ड.. व्हेन आय वॉज यंग अ‍ॅण्ड स्टूपीड आय यूस्ड टू गिव्ह दी लेक्चर्स.. यूथ शॅल रिशेप दी वर्ल्ड..यू कॅन रीड ऑल दी शीट ऑन इंटरनेट..



मातृत्वावर बॉम्बफेक-
मदर्स आर मॉन्स्टर्स, किल देम ऑल. दॅटस माय कमांडमेंट.

रजनीश उर्फ ओशोंवर बॉम्बफेक -
रजनीश इज, वॉज अ‍ॅण्ड एव्हर वील बी ए पोर्नो अवतार... हि वॉज ए पिम्प..ही प्रोव्हायडेड बॉय्ज अ‍ॅण्ड गर्ल्स टेलींग देम यू फक अ‍ॅण्ड थ्रू फकींग, तान्त्रिक फकींग यू वील गेट एन्लायट्न्मेंट... हाऊ मेनी पीपल हॅव बीन एन्लायटण्ड??... यू ऑल फेल फॉर दॅट... पिम्पस यूज्वली शेअर मनी विथ दी बॉय्ज अ‍ॅण्ड गर्ल्स.. बट दॅट बास्टर्ड टूक मनी फ्रॉम बॉय्ज अ‍ॅण्ड गर्ल्स अ‍ॅण्ड केप्ट ऑऽऽऽल फॉर हिमसेल्फ..



स्वत:बद्दल:
दी बेस्ट थींग यू कॅन डू टू मी अ‍ॅण्ड टू मॅन काईण्ड, इज टू बर्न ऑल दी मेमरीज ऑफ मी, अबाऊट मी अ‍ॅलॉंग विथ धीस बॉडी, व्हेन आय अ‍ॅम डेड.




अवेअरनेस (जागरूकता) आणि त्यांच्या आत्मचरित्राबद्दल:
कॅन अवेअरनेस ब्रिंग अबाऊट ए चेंज ? (प्रश्न विचारणारा)
(वाक्य मध्येच तोडत) ...अवेअरनेस डझन्ट एक्झिस्ट्.. हू इज धीस दॅट ही सेज ही इज अवेअर?..
वॉचिंग वन्स ओन थॉट्स?? (प्रश्न विचारणारा)
(मध्येच तोडत) नेव्हर..थॉट्स डोन्ट एक्झिस्ट्.. यू डोन्ट हॅव टू टेक माय वर्ड..दोज बास्टर्डस कॅनॉट इन्फ्ल्य़ूएन्स मी..शो मी दी थॉट... इट इज अबाऊट थॉट बट नॉट थॉट...ऑल दॅट शीट दॅट दे पुट इन्टू शीटबॉक्स ऑफ युवर्स..व्हाटेव्हर कमिंग आऊट ऑफ यूवर माऊथ इज ओव्हरऑल शीट...आयडियाज दे हॅव पुट इन्टू युवर हेड...
व्हेन यू आर रिकॉलींग यूवर पास्ट, देअर इज नथिंग बट पास्ट..(प्रश्न विचारणारा)
देअर इज नो पास्ट..
दे हाऊ कूड (यू) रोट युवर बायॉग्राफी? (प्रश्न विचारणारा)
नॉट मी, सम बास्टर्ड रोट इट.. यू थिंग आय अ‍ॅम माय ओव्हर रायटर ऑफ माय बायॉग्राफी?
नो..नो..(प्रश्न विचारणारा)
बट व्हेन यू रोट, यू रिकलेक्टेड फ्रॉम युवर पास्ट..दॅट इज पास्ट..  (प्रश्न विचारणारा)
दॅट इज मेमरी.. टू रिकग्नाईज दॅट स्काय इज ब्ल्यू..आय कीक्ड माय ग्रॅण्डमदर.. व्हेन शी टोल्ड मी स्काय इज ब्ल्य़ू..यू आर टेलींग मी.. दि फिजीकल आय डज नॉट सी दॅट स्काय इज ब्ल्यू..शट अप आय सेड टू माय ग्रॅण्डमदर..शी वॉज शिव्हरींग...अ‍ॅण्ड फ्रॉम देन ऑन यू लूक अ‍ॅट दॅट यू से स्काय इज ब्ल्यू...अ‍ॅण्ड यू आर विअरींग ए ब्लॅक जॅकेट..फिजीकल आय डज नॉट सी इट इज ब्लॅक..दॅट बीच टोल्ड मी

युजींनी आयुष्यभरात कधीच कुठली औषधे घेतली नाहीत किंवा आरोग्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही. "हेल्थ फूड" वर त्यांचा विश्वास नव्हता आणि त्यांच्या आहारात फक्त चीज, क्रीम यासारख्याच गोष्टी असत. ते सलग झोप न घेता दिवसभरात आणि रात्रीतून अधेमध्ये तासा-तासाची डुलकी काढत. युजी जीवंत असेपर्यंत दर वर्षातील डिसेंबर महिन्याच्या ३१ तारखेला वर्षाच्या हिशेबातून त्यांच्याकडे शिल्लक राहीलेले पैसे वाटून टाकत. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी युजींच्या शरीरावर, सामान्यत: योगात सांगितलेली चक्रे असतात त्या जागांवर सूज येत असे. प्रश्न विचारला नसल्यास युजी कधीच कुणावर चिडत नसत आणि इतरवेळी त्यांच्या अवतीभवती वातावरण एवढे हलके आणि सहज असे की लोक हास्यविनोद करीत, युजींसोबत बसलेले असताना तंगड्याही टेबलावर ठेवत. युजी सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ कुठेच राहात नसत. आफ्रिकेची जंगले आणि दोन ध्रुव वगळता युजींनी अक्षरश: प्रत्येक देशात पायपीट केली. जगभरातील टीव्ही वाहिन्या, रेडीओ स्टेशन्स, वृत्तपत्रे, नियतकालिकांना युजींनी मुलाखती दिल्या. व्हॅलेण्टाईन डी कार्व्हानने स्थापन केलेल्या फंडातून युजींचा प्रवासखर्च चालत असे.

फक्त "एन्टरटेन्मेंट" म्हणून युजी प्रसंग येईल तेव्हा सर्व पठडीतील ज्योतिषांकडून स्वत:चे भविष्य वदवून घेत. कौमारन पध्दतीतील युजींच्या "नाडी रीडींग" तसेच "आय-चींग" या चीनी होराशास्त्रासंदभातील किस्सा फार मनोरंजक आहे. हे नाडीवाचन १९८८ साली केलेले आहे. हे दोन्ही किस्से महेश भट यांनी लिहीलेल्या युजींच्या चरित्रातून-

नाडी वाचन करणार्‍या श्री. नागराज यांनी उदबत्ती पेटवली आणि अत्यंत भक्तीभावाने ती भविष्ये लिहीलेल्या बंडलाभोवती फिरवून त्यांचे काम सुरू केले. त्यांनी नंतर नाडीचे एक टोक बाहेर काढले आणि दुसरे टोक त्या बंडलाला जोडलेले होते. ते बंडल त्यांनी युजींच्या हातात दिले. त्या पानांच्या बाडातून नाडीचे एक टोक मागे पुढे करीत त्यांनी युजींना त्या बाडाचे दोन भाग करायला सांगितले.  युजींनी ते बाड जिथे वेगळे केले होते ते पान घेऊन ज्योतिष्याने ते वाचायला सुरूवात केली: कमळाच्या पानावर पडलेल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे अस्पर्शित राहाणार्‍या या अवलियाबद्दल काय सांगण्यासारखं आहे? राजासारखे सुखोपभोग आणि ऐश आराम यांच्यासोबत राहूनही हा रामायणातील भरताप्रमाणे विरक्त राहातो. बुध (??) आणि शनि या ग्रहांच्या संयोगामुळे याला जीवनाचे सार कळू शकले आहे. तो मोठा अभ्यासक आणि अनुभव संपन्न आहे. 
चुकीचे पान निघाले की काय अशी शंका आल्याने नागराज यांनी वाचन थांबवत प्रश्नार्थक चेहेरा करून युजींकडे पाहिले. चाललेले वाचन बरोबर आहे असे युजींनी तात्काळ म्हटले, आणि वाचन पुन्हा एकदा सुरू झाले:
हा माणूस त्याच्या रविदशेत ख्यातनाम होईल. त्याच्या मूळ गावापासून स्थलांतरीत झाल्याने, तो कुठल्याच एका ठिकाणी मुक्काम ठोकुन राहाणार नाही. तो कसल्याच प्रकारची दीक्षा घेणार नाही, उपजतच त्याला ती मिळाली आहे. त्याची शिकवण साधुसंत आणि वनात राहाणार्‍या लोकांसारखी नसेल. त्याच्या शिकवणुकीचा प्रकाश प्रत्येक ठिकाणी पसरत राहिल. कुठेतरी पोहोचू , काहीतरी मिळवू या हेतूने त्याच्याकडे येणार्‍यांना तो पूर्णत: निराश करील. या व्यक्तीला "माणूस" असे संबोधन न वापरता "आत्मा" असे म्हटले जावे (कारण त्याच्याकडे व्यक्तीत्वच नाही).


यानंतर, प्राचीन ऋषिंना मध्येच विश्रांती घ्यावी वाटली की काय कोण जाणे, पण पुढे लिहीलेले होते: एक घटीका संपल्यानंतर आम्ही पुन्हा वाचन सुरू करू. नागराज यांनी बाड बंद केले. त्यांची आणि त्यांच्यासोबत आलेल्या साथीदारांची उत्सुकता फारच ताणली गेली होती. त्या पंधरा किंवा वीस मिनीटांत आत्ता सांगितलेल्या आणि इतर भविष्यकथनांत त्यांच्या जीवनांतील घटना कशा स्पष्टपणे प्रतिबिंबीत होतात ते समजावून सांगितले. ज्योतिषातील भाकीताच्या भागात सत्यता किती असू शकते याबद्दल मी बिनतोड विधान करू शकणार नाही, पण कुणाला त्यात सखोल अभ्यास करायचा असेल तर माझी कुंडली सर्वोत्तम उदाहरण ठरेल - युजी म्हणाले.
तिथे बसलेले सर्वजण युजींबद्दल नाडी पुढे काय म्हणणार ते ऐकण्यासाठी खूपच उताविळ झाले होते. आम्ही नागराज यांना वाचन पुन्हा एकदा सुरू करा म्हणालो. नागराज यांनी ते सुरू करण्यासाठी पुढचे पान उघडले आणि प्राचीन ऋषिंना आमचा उताविळपणा आधीच दिसला होता की काय माहीत नाही, कारण एका पूर्ण कोर्‍या पानाने नागराज यांचे स्वागत केले.
"कोरे पान म्हणजे माझे भविष्यही कोरेच आहे!" युजींनी हसतहसत शेरा मारला. पुन्हा अर्धा मिनीट थांबा घेऊन नाडीने पान काढण्यात आले. या पानावर लिखाण होते. ते असे:


मागच्या भविष्यात आपण घेतलेली एक घटीकेची विश्रांती पूर्ण होण्यासाठी अजूनही दीड मिनीट बाकी आहे. या भविष्याचा असल्या माणसाला काहीच उपयोग नाही. तरी पण, त्यातील मजेसाठी म्हणून आपण ते पुढे चालू ठेऊया. तुम्ही आम्हाला नमस्कार करण्याची गरज नाही पण तुमच्यासमोर जो बसला आहे त्याला नमस्कार घाला आणि पुढे वाचा. नाडीवाचन पुढे सुरू झाले: आजपासून अकरा वर्षांनंतर, हा जिथे जाईल तिथे-तिथे तो सदभाग्य त्याचा पाठलाग करीत राहिल. ते त्याला सोडून जाणार नाही...जेवत असो, पाणी पित असो, चालत असो, झोपलेला असो किंवा काहीही करीत असो, हा माणूस सहज समाधीत असेल. चंद्रदशेच्या अंतिम पर्वात त्याच्या फक्त दर्शनानेच पाहाणार्‍याला आध्यात्मिक दीक्षा मिळेल...अशा माणसाला या वाचनाचा काय उपयोग आहे? उत्तर अपेक्षित नसलेला प्रश्न विचारून नाडी वाचन समाप्त झाले.


आय-चींग प्रकारातील चिनी भविष्य -
हे भविष्य महेश भट यांची युजींची ओळख करून देण्याचे माध्यम ठरलेल्या व्यक्तीने त्याच्या मनात युजींबद्दल झालेला गोंधळ दूर करण्यासाठी करून घेतले आहे. युजींना भेटल्यावर प्रत्येकवेळी निराश झाल्याने त्याने आय-चिंग करून घेतले होते. त्याला हे उत्तर मिळाले:
"तो गुरू नाही, शिक्षक नाही, किंवा तारणहार नाही. तुम्हाला जागे करण्याशी त्याला काही देणेघेणे नाही आणि त्याला काहीही करायचे नाहीय. कोणताही हेतू न ठेवता तो मस्तीत धगधगत राहील. तो नसताना तुम्ही जेवढे हरवलेले आहात तेवढाच तुम्ही नसताना तो हरवलेला असेल. तुमच्यात प्रतिबिंबीत होत नसेल तर त्याचा प्रकाश विझेल. त्याच्या प्रकाशाशिवाय तुमचे जीवन अंध:कारमय आहे."

आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टणम येथे ९ जुलै १९१८ रोजी त्यांचा जन्म झाला. उप्पलुरी गोपाला कृष्णमूर्ती हे त्यांचे पूर्ण नाव. आयुष्याच्या शेवटच्या कालखंडात युजींनी इटलीमधील व्हॅलेक्रोशिया येथे मित्राच्या घरी एके ठिकाणी राहायला सुरूवात केली. प्राणोत्क्रमण होताना त्यांच्या महेश भट या निष्टावान मित्रासह आणखी दोन व्यक्ती सोबत बसून होत्या; इतर सर्वांना बाहेर जायला सांगण्यात आले होते आणि त्यांच्या पार्थिवावर अंत्यक्रिया कशी करण्यात आली हे गुलदस्त्यात आहे. युजींनी त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तीन हजार डॉलर देण्याचा प्रस्ताव दिला होता. ते गेल्यानंतर त्यांची आठवण केली जाऊ नये अशी त्यांची इच्छा होती. मी गेल्यानंतर बागेतल्या कृमिसारखाच सडेल हा त्यांचा देह सोडतानाचा संदेश होता. २२ मार्च २००७ रोजी इटालीतील व्हॅलेक्रोशिया इथे युजींनी देह सोडला.

इझून गेली ठिणगी रामा इझून गेला जाळ!!!!

समाप्त

आभार:  
१. श्री. महेश भट (ब्लॉगवरील फोटो, संदर्भ साहित्य वापरण्यासाठी खुल्या दिलानं परवानगी दिल्याबद्दल)
२. के चंद्रशेखर राव (युजींच्या सुरूवातीपासूनच्या छायाचित्रांचे संकलक)
३. मुकूंद राव (लेखक, युजी रीडर)
४. ज्युली थायर ( आज आपल्याला उपलब्ध असणारी व्हिडीओग्राफी युजींसोबत सतत दहा ते बारा वर्षे राहून; ती विविध साईटस टाकणे)
५. इंग्लिश विकीपिडीया

३ टिप्पण्या:

  1. एकून ही व्यक्ती अत्यंत इन्टरेस्टिंग आहे हे १०० टक्के सत्य. त्यांना काहीतरी म्हणायचं होतं पण ते पकडता येत नव्हतं.

    ...
    "कारण जी माहिती आत उपलब्ध असते तीच बाहेर येते, जे शिकवलेले नसते ते कळूच शकत नाही.."

    ..ग्रेट स्टेटमेंट. या एका वाक्यासाठी त्यांना "साक्षात्कारी" म्हणायलाही हरकत नाही.

    पण ही "जाणीव" सुद्धा त्याच त्या "लिमिट" मधली. ही जाणीव नवी नाही.

    ती झाल्याने कोणतीही शारीरिक किंवा एकूणच इतकी उलथापालथ होणे अगम्य वाटते. We are all trapped inside knowledge
    .....

    मात्र:


    ---

    युजींनी आयुष्यभरात कधीच कुठली औषधे घेतली नाहीत

    प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी युजींच्या शरीरावर, सामान्यत: योगात सांगितलेली चक्रे असतात त्या जागांवर सूज येत असे.

    हे एका चांगल्या विचार प्रवाहाला सुरस चमत्कारिक कथांमध्ये झाकोळून मठबाजीत चिणून टाकण्याचे उदाहरण आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. नचिकेतजी,
    जरा स्पष्ट लिहीतो त्याबद्दल माफ करा, पण
    ~~~त्यांना काहीतरी म्हणायचं होतं पण ते पकडता येत नव्हतं~~~~
    याऐवजी
    ~~ त्यांना काहीतरी म्हणायचं होतं पण आपल्याला ते पकडता येत नव्हतं असं म्हटलं तर जास्त बरं~~~
    उदा. इथे लिहीलेली अक्षरं, वाक्य, त्यातला अर्थ-गैर अर्थ, भाव आपल्याला सहज पकडता येतो आणि हे सगळं या ब्लॉगच्या कोरेपणावर उमटलं आहे हे, तो पार्श्वभूमीवर सतत टिकून असणारा कोरेपणा मात्र नेहमीच, सतत आपल्या लक्षात येत नाही.
    आता ही आपली ही कोरेपणा पकडण्याची जाणीव शाब्दीक आहे; पण ती जेव्हा शारीरिक, मानसिक आणि एकूणच अस्तित्वगत होते तेव्हा मला विश्वास आहे, निश्चितच भयंकर उलथापालथी घडतात

    बाकी सुरसकथा, मठबाजी निर्माण करण्याचा माझ्या प्रयत्न नाही ( युजींबाबत तरी ते कुणाच्याही बापाला शक्य नाहीय, पण काही बेंगलोर मधील काही लोकांनी युजींचेही फोटो लाऊन दिक्षा द्यायला सुरूवात केलीय~~ उगं आपला किडा म्हणून ) त्या घटना त्यांच्या चरित्राचा भाग आहेत, त्या कुठलाही मुलाहिजा न राखता मी मांडल्यात याबद्दल तुम्ही माझे अभिनंदन करा.

    युजींबाबत तरी, मी सादर केलेल्या माहितीतून त्यांची चुकीची प्रतिमा निर्माण होत असेल, पण त्यांच्याबद्दल स्वत: माहिती शोधाल तेव्हा पूर्णत: तुमच्या "समजेतून" निर्माण होणारी त्यांची प्रतिमाच खरी असेल.

    अवांतर: त्या नव्या "बोक्या सातबंडे" ला इंगा दाखवा हो एकदा कांचनताईसारखा..

    उत्तर द्याहटवा
  3. य़शवंत जी,
    आपला फोन आला होता. त्यानंतर काही ना कारणांने संपर्क करता आला नाही. आज सहज आपला ब्लॉग पहायला मिळाला. म्हणून ...
    आपण नाडी ग्रंथांतून वेगळ्या युजींचे दर्शन घडवलेत. धन्यवाद.
    महर्षांचे कथन त्यांना त्यावर विचार करायला लावून गेले यातच नाडी ग्रथांची व आपल्या पुर्व सुरींची महानता जाणवते. मो. ९८८१९०१०४९वर संपर्क करता आला तर सविस्तर बोलता येईल.
    य़ुजींचे प्रत्येक कथन मान्य व्हायला हवे असे नाही पण त्यांना आपल्या विचारांना निर्भीडपणे मांडायचे स्वातंत्र्य याच विचारधारेतील लोकांमुळे मिळाले. त्यांना अभिवादन.

    उत्तर द्याहटवा