१९ ऑक्टोबर, २०१०

यु.जी.कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग पाच

हा भाग लिहायला सुरूवात करताना आधीच कबूल करतो की आता युजींच्या संदर्भातील सर्व पुस्तके आणि वेबसाईटस बंद करून गेल्या सात-आठ महिन्यांत युजींबद्दल/कडून जे-जे वाचलं, पाहिलं, ऐकलं ते डोक्यात साठल्यानुसार तसंच्या तसं मांडत आहे. ही लेखमाला केवळ ओळख म्हणून लिहीली जात आहे - त्यामुळं इथं कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षापर्यंत मोक्ष आहे काय, ती स्थिती कशी असते, ती मला हवी आहे असले विचार डोक्यात घेऊन युजी थिऑसॉफिकल सोसायटी, शिवानंद सरस्वतींसोबत ऋषिकेषच्या गुहा, रमणमहर्षींसारखा ऋषि आणि जगभरातील असल्याच ज्ञात-अज्ञात ठिकाणी फिरत राहिले - ध्यानाचे प्रयोग करीत राहिले. त्यांना समाधी, तृतिय नेत्र (पिनीयल ग्लॅण्ड) दर्शन, कुंडलिनी जागरण, समाधी प्रवेश, दुसर्‍या माणसांच्या मनातील विचार कळणे आणि त्याच पठडीतील सर्व अनुभव आले. पण हे अनुभव येणे म्हणजे त्यांच्यासाठी शेवट नव्हता. बुध्दांची/जागृत/मोक्षप्राप्त लोकांची स्थिती नेमकी असते कशी हा प्रश्न त्यांच्या मनात सतत निनादत राहिला. कारण आपल्याला ज्ञात असते, इतिहासाने, परंपरेने सांगितलेले त्याप्रमाणे जागृत पुरूष हे निर्विचार स्थितीत असतात - त्यांच्यातील काम, क्रोध, मोह, माया, मत्सर यांचा निरास झालेला असतो आणि त्यांचे जीवनच जगाच्या कल्याणासाठी असते हे सगळे आपल्याला पुस्तके वाचून कळलेले असते. युजींची स्थिती मात्र वेगळी होती. सगळे अनुभव येत असताना देखील कामिनी-कांचनाकडचा ओढा सुटत नव्हता. ते स्वभावाने कठोर होते.

युजी: तारूण्यातील

वयाच्या एकवीस-बावीसाव्या वर्षी त्यांनी पदवीसाठी मानसशास्त्र हा विषय घेतला तेव्हा त्या विषयाच्या प्राध्यापकांना त्यांनी खडा सवाल विचारला होता,  "आपण सतत मनाबद्दल बोलत असतो, मन असतं कुठे ते तुमचं तुम्हाला तरी माहीत आहे काय? मनाबद्दल मला जे काही माहिती आहे ते मी जुंग, फ्राईड आणि एडलर यांच्या आणि त्या तसल्याच पुस्तकांतूनच वाचले आहे. ही पुस्तके वगळता तुम्हाला स्वत:चे असे मनाबद्दल काही माहीती आहे काय?" एकवीस-बावीस वर्षे वयाच्या विद्यार्थ्याच्या या चक्रावून टाकणार्‍या प्रश्नामुळे ते प्राध्यापक गोंधळले. पण "तुला परिक्षा उत्तीर्ण होऊन पदवी मिळवायची असेल तर जे काही वाचले आहेस, तेच लिही" असे त्यांनी युजींना मोकळेपणे सांगितले. "असे उत्तर देऊन त्या माणसाने प्रामाणिकपणा तरी दाखवला होता!" युजींनी नंतर टिप्पणी केलीय. युजींनी ती परिक्षा द्यायला नकार दिला आणि पदवीचे शिक्षण सोडून दिले.
बुध्द, रामकृष्ण परमहंस इत्यादी लोक सांगत आहेत ते आणि स्वत:चे वास्तविक जीवन ज्यानुसार संचालित होत आहे त्यात त्यांना जमीन आसमानचा फरक दिसू लागला. या सगळ्या लोकांनी स्वत:शीच पोरखेळ केलाय, स्वत:चीच फसवणूक केली आणि इतरांचीही फसवणुक केली हा विचार त्यांच्या मनात रूंजी घालू लागला. हे लोक सांगतात क्रोध करू नका - पण माझ्या मनात तर सतत क्रोधाची भावनाच खदखदत असते, त्यामुळे ते जे सांगत आहेत ते पूर्णत: चुकीचे आहे कारण  क्रोध न करण्याची कुठलीतरी स्थिती गाठण्यापेक्षा, आत्ता माझ्या मनात खदखदत असणारा राग माझ्यासाठी कितीतरी खरा आहे! मला नाटकं करायची नाहीत. हे लोक मला काहीतरी चुकीचं, वेगळंच व्हायला सांगत आहेत - आणि मला तसं व्हायचं नाही. मोह माझ्यासाठी कितीतरी खरा आहे, आणि हे लोक सतत मोह सोडा असं सांगत राहातात. त्यामुळे पवित्र मानल्या गेलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांच्या मनात टोकाचा तिटकारा निर्माण झाला. त्यांचा सधन ब्राम्हण घरात जन्म झाला होता, संत, साधु-बैरागी, शंकराचार्य वगैरे लोकांच्या घरात नेहमी पंगती उठत असत पण त्या सगळ्याच गोष्टी युजींच्या यंत्रणेतून बाहेर भिरकावल्या गेल्या: श्लोक, धर्म, भम्भम, साधना सबकुछ बंद्द! - कारण त्यात काहीच नाही. मी खाटीक आहे, मी दैत्य आहे, माझ्या नसानसात हिंसा भरलीय - ही सत्यता आहे; ते लोक चुकीचे आहेत; आणि ते फक्त चुकीचेच नाहीत तर मलाही ते चुकीचं ठरवित आहेत - युजींनी स्वत:ला बजावले आणि त्या सगळ्या धंद्याचा गाशा गुंडाळला.
महर्षी रमण

युजींच्या स्वत:च्या साधनेतूनच त्यांना कुठेही पोहोचता आले नव्हते आणि त्यातून मिळालेली उत्तरे हीच मोठे प्रश्न होते. युजींची ही तीव्र निराशा पाहुन रमणपादानंद स्वामी या त्यांच्या स्नेह्यांनी युजींनी पॉल ब्रण्टनचे इन सर्च ऑफ सिक्रेट इंडिया हे पुस्तक दिले आणि त्यातील रमण महर्षींवर असलेली प्रकरणे काळजीपूर्वक वाचायला सांगितली. त्यातूनही युजींचे समाधान झाले नाही आणि "हो-नाही करीत, टाळाटाळ करीत, अगदी बळजबरीनेच" ते रमण महर्षींना भेटण्यासाठी कबूल झाले.
"मला त्यांचा काय उपयोग?" युजींच्या या प्रश्नाला रमणपादानंदांनी उत्तर दिले होते की तुझ्यासारख्याच शेकडो साधकांप्रमाणेच रमण महर्षींच्या सान्निध्यात तुझ्या रोम-रोमातून शांतता वाहु लागेल आणि तुझे सगळे प्रश्न गळून पडतील, गुरूच्या फक्त एका नजरेतूनच तुझ्यात बदल घडेल.
रमण महर्षींसोबतच्या भेटीत शेवटी एकदाची दोघांची नजरानजर झाली. भिंतीवरच्या घड्याळ्याने ठोके दिले. एक तास उलटला होता. युजींचा कोणताही प्रश्न मावळला नव्हता आणि त्यांची निराशा संपुष्टात येण्याचे कोणतेच चिन्ह नव्हते. दोन तास उलटले आणि सरतेशेवटी युजी थेट मुद्यावर उतरले,
"ठिक आहे, मला आणखी काही प्रश्न विचारू द्या." युजींना थेट मोक्षाशिवाय इतर काहीच नको होते. पण त्यांनी हा प्रश्न टाकला, "मोक्ष खरंच आहे काय?"
रमण महर्षींनी ठामपणे होकार दिला.
"एखादा माणूस काहीवेळा मुक्त असू शकतो आणि काहीवेळा मुक्त नसू शकतो काय?"
"एकतर तुम्ही मुक्त असता किंवा नसताच - अधेमधे काही नाही."
"त्याचे काही स्तर आहेत काय?"
"नाही - त्यात कसलेही स्तर नसतात - ती सगळी एकजीव गोष्ट आहे. तुम्ही त्या स्थितीत पूर्णत: असता, किंवा नसताच!"
युजींनी त्यांचा शेवटचा प्रश्न बाहेर काढला, "तुम्ही हा जो काही मोक्ष म्हणताय, तो मला देऊ शकता काय?"
रमण महर्षींनी प्रतिप्रश्न करून उत्तर दिले, "मी देऊ शकतो - पण तु घेऊ शकतोस काय?"
कुठल्याच गुरूने कधी असे उत्तर दिले नव्हते. बहुतेकांनी त्यांना आणखी जास्त साधना करण्याचा आणि युजींनी ज्या धंद्याचा गाशा गुंडाळला होता तेच पुन्हा करायला सांगितले होते. पण आता रमण महर्षींच्या रूपात, जागृत मानला जाणारा पुरूष होता आणि तो त्यांना विचारत होता, "तु घेऊ शकतोस काय?"
अंगावर वीज पडावी तसा हा प्रश्न युजींवर येऊन आदळला. तो अत्यंत उध्दट प्रश्न वाटत होता. पण युजींचाही उध्दटपणा हिमालयाएवढा होता. "मोक्ष घेऊ शकणारा कुणी असेल, तर तो मी आहे... मी तो घेऊच शकत नसेल तर, अजुन कोण घेणार तरी कोण?"
युजी हा असा प्रकार होता.
जे. कृष्णमूर्तींसोबतचा असाच एक किस्सा पूर्वी येऊन गेला आहे. शेवटी युजी कृष्णमूर्तींनी सगळे काही नाकारले. आपल्याला मन नसतेच, आपल्याला विचारही नसतात, मोक्षही नसतो आणि कसलेच स्वातंत्र्यही नसते, एवढंच नव्हे तर आपणही नसतो, दुसरेही कुणी नसतात इथपर्यंत युजी गेले. सगळं फार मजेशीर आहे - मन नसतेच तर ते "आहे" झाले कुठून? आपण जन्माला आलो तेव्हा काय होतं? फक्त मांसाचा एक हलता-रडता गोळा. त्यावेळी तर विशिष्ट गोष्टीवर नजरही लावता येत नसते. जन्म झाल्यापासून तीन-चार महिन्यांनी "फोकस" करायला जमते. शरीराची वाढ होत जाते आणि हळुहळु "व्यक्ती" आकाराला येत राहाते तोपर्यंत आई-वडील, शिक्षक, मित्र, साधु-संत, समाज यांच्याकडून आपल्याला मन असते, आपल्याला विचारही असतात, आपल्याला मुक्ती मिळवायची असते, या अगोदर बर्‍याच लोकांनी ती मिळवलीय हा सगळा कचरा भरून झालेला असतो आणि त्या कचर्‍यासोबतच व्यक्ती जगत असते. एक साधे उदाहरण आहे - कुणीतरी बोललेलं, कुणीतरी काही लिहीलेलं आपल्याला चटकन समजू शकतं - का? कारण ते समजून कसं घ्यायचं यासाठी आपल्याला प्रशिक्षित करण्यात आलंय; त्याचं ग्रहण कसं करायचं याची माहिती आपल्यात पध्दतशीरपणे भरण्यात आलीय (आठवा: आ‌‍ऽऽऽई, मा‌‍ऽऽऽमा, का‌‍ऽऽऽऽका, दा‍ऽऽऽदा). हे सगळं प्रोग्रॅम्ड आहे; त्यामुळं जे आपल्या माहितीत येऊ शकत नाही - ते अस्तित्वात नसतं; ते कळूच शकत नाही. शब्दांत सांगता येणार नाही तो अनुभव आला, ती निर्विचार, निर्विकल्प अवस्था अनुभवली, ती अशी समाधी लागली, ती शांतता असली होती - या सगळ्या भंकस, बोगस भाकडकथा आहेत. निर्विचार अवस्था/समाधी लागते तर ती निर्विचार अवस्था आहे/ समाधी आहे ही बडबड कोण करतंय? ध्यान म्हणजे तरी काय? स्वत:च्या शरीर-मनोयंत्रणेला त्या विशिष्ट स्थितीची ट्रेनिंग देणंच. पातंजलींच्या योगसूत्रांतही "साक्षी" हा प्रकार आहे आणि भगवान बुध्दांनीही "विपश्यना" हा प्रकार सांगितलेला आहे. या दोन्ही प्रकारांत मनाची, विचाराची, शरीराची जी हालचाल होत असते त्यावर सतत नजर ठेवायची असते. आपण नजर ठेवत जातो, ठेवत जातो आणि सुरूवातीला आपल्या असंख्य विचारांतून दिसणारा आपला चेहेरा पुसट होत जातो आणि स्वत:चे विचार, शारीरिक हालचाली यावर नजर ठेवणारा  "साक्षी", विपश्यन - पाहाणारा आकाराला येतो. इथे "जे दिसतंय ते" आणि "जे पाहातंय ते शिल्लक" उरतं. दिर्घकाळ ध्यान करीत राहिल्यास पुढे सरावाने ध्यानाच्या अवस्थेत शिरल्यानंतर काही मिनीटांतच "जे दिसतंय ते दिसणं पुसट होत जाऊन" फक्त पाहाणाराच शिल्लक राहातो. एकतर ध्यान म्हणजे स्वत:च्याच नाकातून श्वासांच्या रूपानं आत बाहेर होत असणारा लगाम हाताळणं. या श्वासांच्या चालणार्‍या लगामावरच सगळ्या शरीर-मनोयंत्रणेचे चलनवलन होत असते. ध्यानाच्या सखोल अवस्थेत श्वासांचा हा लगाम ढिला पडत जातो, ढिला पडत जातो, जवळपास नाहीसाच होतो, इतर सर्व विचार विरतात आणि शरीर-मनोयंत्रणा अत्यंत मुक्त अवस्थेत, एरव्ही कधीही अनुभवाला न येणार्‍या स्थितीत प्रवेशते, अंतर्पटल दशदिशांनी विस्तारते, विस्तारत जाते आणि शरीर-मनोयंत्रणा स्वत:मध्ये निर्माण झालेल्या अनुल्लंघ्य, असिम अवकाशात तरंगू लागते. हेच आत्मदर्शन. हाच समाधीचा अनुभव. हेच निर्वाण. हाच कॉस्मिक कॉन्शसनेस. ही स्थितीदेखील येते तेव्हा भयावह असते, कारण श्वास मंद होत शून्य झालेला असतो, शारीरिक क्रिया मंदावलेल्या असतात, मनोयंत्रणा मुक्त, मादक, आनंदमय स्थितीत गेलेली असते आणि ती तशीच काहीकाळ राहु दिली तर उंबरठा ओलांडला जाऊन मरण घडेल की काय हे भयदेखील तिथे असते. या स्थितीतच काही लोक ते ध्यानात असताना मरून परत आल्याचा अनुभव (पक्षी निर्विकल्प समाधीचा अनुभव) आल्याचे सांगत असतात.  पण गमतीची गोष्ट म्हणजे या लोकांच्या शरीराच्या आत सोडा, शरीरावरही कसल्याही शारीरिक रूपांतरणाची चिन्हे दिसत नाहीत. रजनीशांचे उदाहरण घ्या. रजनीशांचे डोळे अत्यंत तेजस्वी, कमळाच्या पाकळ्यांसारखे असल्याबद्दल बाता मारल्या जातात. पण रजनीशच काय कुणीही चार-दोन महिने गांभीर्यपूर्वक ध्यान केले तर भुवया धनुष्याकृती होतात आणि डोळ्यांत स्थैर्य झळकू शकते. आणखी एक गोष्ट म्हणजे या पोहोचलेल्या लोकांभोवती सतत असणारा"कॉस्मिक एनर्जी" झरा. असली एनर्जी वगैरे काही नसते तर समोरचा माणूस शांत बसलेला असेल तर आपलाही कल शांत राहाण्याकडेच असतो; समोरचा माणूस आक्रामक असेल तर आपणही आक्रामकतेकडे कलतो - हाच प्रकार शांत, सदा आनंदमय स्थितीत असतात असे वर्णन करून सांगितले जाते त्या बाबा/गुरू लोकांच्या बाबतीतही असतो.  

हे सगळे आत कुठेतरी रेकॉर्ड झालेले असते (तेच नंतर वेगवेगळ्या लोकांसमोर, वेगवेगळ्या व्यासपीठांवरून, वेग-वेगळ्या पुस्तकांतून बाहेर पडत राहाते); पण दुर्दैवाने हा काही "ध्यान" या सगळ्या प्रकाराचा शेवट नसतो. ध्यानातून निकल बाहर ची स्थिती येते तेव्हा पूर्वीसारखेच विचारही परततात, भावनाही परतात, क्रोधही परततो आणि ध्यान करणारा जुनाच माणूस पुन्हा उभा राहातो. भगवान बुध्दांच्या आयुष्यात कथा सांगितली जाते की त्यांना जेव्हा वर वर्णन केलेली निर्वाणाची स्थिती प्राप्त झाली तेव्हा, तो शेवटचा उंबरा ओलांडून पुढे पाऊल टाकायला त्यांनी नकार दिला. जगातला शेवटचा माणूस त्या निर्वाणाच्या द्वारातून आत प्रवेशत नाही तोपर्यंत मला आत जाण्याचा काहीच अधिकार नाही असे म्हणून भगवान निर्वाणाच्या त्या द्वारात न प्रवेशताच परतले आणि त्यांनी भिक्खु-भिक्खुणींचे संघ उभे करायला सुरूवात केली. इथेच युजींचा आणि बुध्दाचा खटका उडतो. जगातले सर्व लोक निर्वाणाच्या द्वारातून प्रवेशत नाहीत तोपर्यंत मी ही आत जाणार नाही ही भगवान बुध्दांच्या निर्वाण स्थितीबद्दल सांगितली जाणारी कथा युजींना एका राजकारण्याचे विधान वाटते -

(बट दॅट फेलो डिडन्ट हॅव दि गट्स टु गो टु दि एण्ड, व्हेन ही गेट धीस एक्सपिरियन्स, ही सेड अ‍ॅज लॉंग अ‍ॅज देअर इज सिंगल सोल इंप्रिजण्ड इन दि वेल ऑफ इल्ल्युजन, ही रिफ्युज्ड टू एंटर दि गेट्स ऑफ निर्वाणा,  ही नेव्हर एंटर्ड गेटस ऑफ निर्वाणा, ही रिफ्युज्ड... फॉर दि सेक ऑफ मॅनकाईंड, लाईक ए पॉलीटिशीयन टॉकींग ऑफ मॅन काईंड, ह्यूमॅनिटी...यु नो, देन फॉर दि फर्स्ट टाईम इन दि हिस्टरी ऑफ मॅनकाईंड ही इंट्रोड्यूस्ड एलेमेण्ट ऑफ कन्व्हर्शन, प्रॉस्लेटायझेशन, क्रिएटेड ए संघा, ही मुव्हड टू प्लेस टू प्लेस फॉलोव्ड बाय ऑल दीज पीपल्स, अ‍ॅण्ड ही डिडण्ट अलो विमेन टू जॉईन हीज ऑर्डर फॉर लॉट ऑफ टाईम..लॉट ऑफ प्रोटेस्टेशन अ‍ॅण्ड फायनली ही रिलेण्टेड अ‍ॅण्ड अ‍ॅडमिटेड देम ऑल्सो...देन देअर केम अ‍ॅलॉंग ए...धीस इज माय रिडींग ऑफ हिस्टरी..टेक इट ऑर लिव्ह इट.. अ‍ॅण्ड अशोका दि किंग...युज दॅट अ‍ॅज ए इन्स्ट्रुमेंट ऑफ पॉवर...ही स्प्रेड इट फोर्सिब्ली इन धीस कंट्री...देन केम हर्षवर्धना..अनादर फेलो...व्हेन दे केम साऊथ दे स्टॉप्ड...  ).

हा जो आजचा आध्यात्मिक बाजार चालु आहे त्याची सगळी मुळं विविध उपनिषदे, भगवान बुध्द, येशू ख्रिस्त या लोकांना "आदर्श" म्हणून, त्यांना जे इकडचे-तिकडचे, किरकोळ अनुभव आलेत त्याच अनुभवांना अंतिम मानून सादर केले जाते त्यात आहेत. उपनिषदांत जे लिहीलेय, ते लिखाण ती वास्तविक स्थिती प्राप्त झालेल्या लोकांनी केलेले नसून, ज्यांना ती स्थिती हवीय त्या लोकांच्या आकांक्षा त्यात आहेत...उपनिषदांत अशी व्यक्ती स्वयंप्रामाण्य असते, ती स्वत:च एक अ‍ॅथॉरिटी असते असं म्हटलेलं आहे...त्यानं उपनिषदांना नकार दिला असला तरी बुध्द हा काही ओरीजिनल नव्हता... सगळे साधुसंत असाच नकार देत असतात..

हाईट ऑफ ऑल म्हणजे युजी कृष्णमूर्ती कॉन्शसनेस, "जागरूकता" यासारखे काही अस्तित्वात नसते असे म्हणतात. ध्यान केले जात असते, त्यातून जागरूकता अनुभवली जात असते तेव्हा तो अनुभव हाच मुळात स्वयंकेंद्रीत कृती असते आणि असली कृती कितीही काळ करीत राहिले तरी "स्व" पासून मुक्त होण्याचा कोणताही मार्ग अस्तित्वात राहात नाही;- हेच ते नो वे आऊट~!!!! पण हो, त्या सगळ्या प्रक्रियेचे, स्व पासून मुक्त न होताच अगदी सुंदर भाषेत विश्लेषण मात्र करता येते - त्यातूनच बनावट गुरूंची पैदास होत राहाते. त्यांचे शब्द केवळ पोकळ शब्द असतात, त्यांनी मांडलेली प्रमेये इतर कोणत्याही प्रमेयांसारखीच पूर्णत: बौध्दीक खेळ असतो - पण तो खेळ तो-तो विशिष्ट गुरू जीवंत असे पर्यंत मजेत चालु राहातो. हे सगळे सांगत असताना खुद्द युजी मात्र नेमकी कोणती किल्ली वापरून बाहेर पडले हे ते सांगू शकत नाहीत - बाय सम लक, ऑर बाय सम स्ट्रेन्ज चान्स एवढंच ते म्हणू शकतात. त्यांनी सांगितललेले दृष्टीकोण एकत्र करून एकसंघ विचारसरणी उभी करायलाही त्यांनी कठोरपणे नकार दिला; ज्यांनी ती उभी करायचा प्रयत्न केला त्यांनी तसे करता येणेच शक्य नसल्याची कबुली दिली.

मागील भागांत वर्णन केलेल्या त्यांच्या "कॅलॅमिटी" बद्दलची युजींची वक्तव्ये ही त्या शरीरात निर्माण झालेल्या चक्रीवादळानंतर शरीर ज्या नैसर्गिक स्थितीत पडलेय, फक्त त्या स्थितीचे शब्दात मांडलेले तपशील आहेत. कॅलॅमिटीनंतर कधीच त्यांच्या डोक्यात कुठलाही विचार प्रवेशला नसल्याचे युजी सांगतात. जगात वावरण्यासाठी आवश्यक असेल तेवढाच आणि फक्त बाहेरून साद आली तरच तो घडतो; लगेच त्याचा स्फोट होतो आणि पुन्हा ते निर्विचार स्थितीत जातात. भिंतीवर लावलेल्या घड्याळ्याकडे ते तासन तास पहात राहु शकतील; ते काय आहे, त्यात किती वाजलेत याबद्दल कसलाही विचार न येता! जेव्हा केव्हा कुणी येऊन त्यांना "किती वाजलेत?" असे विचारील तेव्हाच लगेच क्षणात "अमुक इतके वाजलेत" असे युजींकडून उत्तर बाहेर पडते.

कॅलॅमिटीनंतर सुरूवातीच्या काही दिवसांत युजींना प्रत्येक गोष्ट पुन्हा शिकावी लागली; पुढे चालुन पूर्वायुष्यात मेंदूत (युजींचा शब्द डेटाबॅंक) रेकॉर्ड झालेली माहीती हळुहळु पूर्वपदावर येऊ लागली. पण ते फक्त निष्प्राण तपशील होते. ते आत पडून असतील; एखादा तपशील हवा असल्याबद्दल बाहेरून कुणाकडून साद आली, तर आत उपलब्ध असेल तर क्षणात तो बाहेर पडतो, उपलब्ध नसेल तर युजींचे उत्तर ठरलेले असते - "आय डोण्ट नो!" सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत घडते तसे युजींच्या डोक्यात असलेले तपशील जीवंत होऊन आपण होऊन गार्‍या गार्‍या भिंगोर्‍या खेळत नाहीत.

चमत्कार वगैरेंच्या बाबतीत स्वत: युजींनी शक्ती किंवा सिध्दी असलेल्या माणसाने येऊन तसे सिध्द करून दाखवावे असे म्हटले आहे. खुद्द युजींची दोन-चार उदाहरणे मात्र गोंधळात पाडणारी आहेत. महेश भट यांना चित्रपटात वापरण्यासाठी बिबट्या किंवा तसलाच हिंस्र प्राणी हवा होता. रोम मधील एका माणसाकडे युजी आणि महेश भट गेले. तिथे असलेले प्राणी त्यांना दाखविण्यात आले. एका पिंजर्‍यातील वाघ डरकाळ्या फोडू लागला आणि हिंस्र झाला. युजींनी "सिट डाऊन!", "सिट डाऊन!" असे म्हणून एकदा नव्हे तर अनेकदा त्या वाघाला खाली बसवले. युजी हे हिंस्र प्राण्यांना प्रशिक्षण देणारे रिंगमास्टर असल्याबद्दलचा त्या शिकारखान्याच्या मालकाचा झालेला गैरसमज महेश भट यांना दूर करता आला नाही.

स्वित्झरलॅण्डमध्येही आणि भारतातही युजी जेव्हा फिरायला जात तेव्हा सतत साप अवतीभवती असतात असे युजीच अनेकदा सांगत असत. माझ्याकडे वैरभावनाच नाही; त्यामुळे मलाही सापांचा धोका वाटत नाही आणि सापांनाही माझा धोका वाटत नाही हे युजींकडून बर्‍याच वेळा ऐकल्यानंतर महेश भट आणि परवीन बाबी दक्षिण भारतात पर्यटन करीत असताना "युजी तुम्ही फिरायला जाता तेव्हा तुमच्या सोबत फिरणारे साप दाखवाच" म्हणून युजींसोबत फिरायला गेले. काही अंतर चालुन गेल्यानंतर रस्त्याच्या कडेने साप नव्हे तर कोब्रा जातीच्या सापांचे अख्खे कुटूंबच सोबत करतेय हे पाहुन महेश भट आणि परवीन बाबी यांनी उलट धूम ठोकली; युजी मात्र रोजचा फेरफटका मारून परत आले.

आणखी एक मुद्दा येतो तो म्हणजे कॅलॅमिटीनंतर युजींच्या लैंगिक स्थितीचा. त्यांच्याकडे आलेल्या आणि लैंगिक संबंधाबाबत प्रश्न विचारलेल्या लोकांना उत्तर देताना युजी "बॉडी इज इण्ट्रेस्टेड इन ओन्ली टू थिंग्ज - सर्व्हायव्हल अ‍ॅण्ड फ**ग" असे म्हणत असले तरी स्वत: ते लैंगिक संबंध ठेवण्यास अकार्यक्षम असल्याबद्दल सांगत. महेश भट यांनी युजींच्या चरित्रात याबाबतीत दोन किस्से देऊन ठेवले आहेत तेही सांगून टाकतो.
एके दिवशी लोकांच्या घोळक्यात बसून युजी बोलत असताना युजींच्या शेजारी असलेली महिला, पुस्तकात दिलेय त्या प्रमाणे टर्न ऑन झाली. तो प्रकार खूपवेळ चालला. शेवटी युजी तिच्याकडे पाहुन खांदे उडवत म्हणाले - "मॅडम, आय कॅन फील अ‍ॅण्ड सेन्स एव्हरीथिंग यू फिल...बट सॉरी...नथिंग कॅन बी डन!"
दुसर्‍या एका किश्श्यात एका बोल्ड बाईने प्रश्न विचारण्याच्या ओघात युजींना विचारले, "मी जर तुमच्यावर बलात्कार केला, तर काय घडेल?"
युजी निष्पाप चेहेरा करून म्हणाले, "मलाही काही अंदाज नाही, डू इट, वी वील सी व्हॉट हॅपन्स!" ती बाई तिथून उठून निघुन गेली.

रजनीशांनी मात्र एन्लायट्न्मेंटनंतरही आपण सेक्स करू शकतो आणि इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा चांगला करू शकतो अशा बाता अमेरिकन प्रसारमाध्यमांसमोर मारलेल्या आहेत. त्यांच्या सोबतीणी राहिलेल्या महिलांनी मात्र रजनीशांची अमेरिकेतून हकालपट्टी झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतींत "ही वॉज जस्ट बिलो दॅन एनी अ‍ॅव्हरेज मेल" असे मत नोंदवलेले आहे.

युजींची त्यांच्या स्वत:च्या बाजूने कुठलीही "टीचींग" नसली तरी भेटायला आलेले लोक आणि युजी दरम्यान जे बोलणे झाले त्यात एक विशिष्ट शैली दिसून येते. युजींच्या सगळ्या बोलण्याचा भर शरीर या घटकावर दिसतो - कारण त्यांचा अनुभव शरीरावर उमटलाच उमटला, पण त्याच शरीरात असलेली त्यांची मनोरचना आणि सगळा पूर्वेतिहासही पुसला गेला. सतत सुरू असणार्‍या त्यांच्या जगप्रवासात विमानातील एअर होस्टेस युजींचे लांब केस, चेहेर्‍यावरील भाव पाहुन त्यांना "मॅडम" म्हणत तेव्हा युजींचे त्याबद्दल काहीही म्हणणे नसे.

दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे विधाने करताना त्यांत असलेला ठामपणा - गेट लॉस्ट अ‍ॅण्ड स्टे लॉस्ट! गेट अप अ‍ॅण्ड गो! मग भलेही तो माणूस आयुष्यात पुन्हा कधीच भेटला नाही तरी चालेल. कॅलॅमिटीपूर्व युजींच्या लंडनमधील मुक्कामात ब्रिटीश म्युझियममध्ये, कार्ल मार्क्सने ज्या टेबलाशी बसून दास कॅपीटलचे लिखाण केले त्यासमोरच्या टेबलाशी बसून केलेले "अंडरग्राऊंड स्लॅंग" (शिवराळ बोली) या शब्दकोषाचे वाचन नंतर युजींच्या भरपूर उपयोगी पडले. होली हुकर्स, ऑल दॅट इज देअर इन होली स्क्रिप्चर्स इज नथिंग बट शीट! ओम तत सत या थीमवरच युजींनी बोलून दाखवलेल्या दृष्टीकोनांवर आधारीत "ओम दॅट शीट" हे पुस्तकही लिहायचे कुणीतरी फॉरेनरने प्रस्तावीत केले होते.

त्यांची काही विधाने:

मी आणि समाज यांत काही दुष्मनी नाहीय. मला तो बदलण्यात काहीच रूचि नाहीय. माझ्यास्वत:मध्ये बदल घडवण्याची मागणीच आता शिल्लक राहिलेली नाहीय, त्यामुळे माझ्याकरिता अख्ख जग बदलण्याचीही मागणी शिल्लक नाही. मी दु:खात असलेल्या माणसासोबत दु:ख सहन करतो आणि सुखात असलेल्या माणसासोबत सुख.

प्रश्न विचारणारा दुसरे तिसरे काही नसून तो उत्तर आहे. हाच खरा प्रश्न आहे. आपण हे उत्तर स्वीकारायला तयार नाही आहोत कारण युगानुयुगांपासून आपण मानत आलेल्या खर्‍या उत्तरांची त्यामुळे इतिश्री होईल.

निसर्गाला फक्त दोन गोष्टींशी देणेघेणे आहे - टिकून राहाणे आणि त्यासारखी दुसरी गोष्ट पुनर्निर्मित करणे. यावर लादले जाणारे काहीही, ते सगळे संस्कृतीने दिलेले ओझे माणसाच्या कंटाळवाण्या स्थितीला कारणीभूत आहे.

मानवी विचारशक्तीचा जन्म हा मानवी शरीरातील कुठल्यातरी चेतापेशीय दोषातून झाला आहे. त्यामुळे मानवी विचारातून जन्म घेणारी कोणतीही गोष्ट विघातक असते.

आपल्याला एकत्र जगण्यासाठी दहशतीची मदत होईल, प्रेमाची किंवा बंधुभावाची नव्हे. हा संदेश मानवी जाणीवेत घुसून बसल्याशिवाय काही आशा आहे, असे मला वाटत नाही.

ज्ञानावर आधारीत राहून आलेला कोणताही अनुभव हा भ्रम असतो.

सत्य नावाची कसलीही गोष्ट अस्तित्वात नाही. वास्तविक गोष्ट असते ती म्हणजे "तार्किकदृष्ट्या" ठासून सांगितलेले गृहितक, ज्याला तुम्ही सत्य म्हणता.

मी फक्त एवढंच म्हणतोय की तुम्ही शोधत असलेली ही शांती ही अगोदर पासूनच तुमच्यात आहे, तुमच्या शरीराच्या सुसंवादी क्रियांमध्ये.

तुम्ही भयावर प्रेम करता. भय समाप्त होणे हाच मृत्यू असतो, आणि तुम्हाला ते घडू द्यायचे नाहीय. मी शरीरातील फोबिया बाहेर फेकण्याबद्दल बोलत नाहीय. ते शरीर टिकून राहाण्यासाठी आवश्यक आहेत. भयाचा मृत्यू हाच खरा मृत्यू आहे.

तुम्ही हे तथ्य स्वीकारायलाच तयार नाही आहात की तुम्हाला हार पत्करावी लागणार आहे. संपूर्ण आणि इथून-तिथून शरणागती. हीच ती निराश स्थिती असते जी बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग अस्तित्वात नाही असे सांगते... कोणत्याही दिशेला चाललेली, कोणत्याही पैलूवर चालणारी, कोणत्याही स्तरावर चालणारी कोणतीही हालचाल, तुम्हाला तुमच्या पासून दूर घेऊन जात आहे.

इतर सगळे मार्ग नाकाराल तेव्हाच तुम्ही तुमचा मार्ग शोधू शकाल.

अन्न, वस्त्र आणि निवारा - या मूलभूत गरजा आहेत. त्यापुढे तुम्हाला काहीही हवे असेल, तर ती स्वत:लाच फसवण्याची सुरूवात आहे.

स्वार्थी व्हा आणि स्वार्थीच राहा हा माझा संदेश आहे. एन्लायट्न्मेंट हवी असणे स्वार्थ आहे. दानशूरता स्वार्थ आहे.

आपले सर्व अनुभव, आध्यात्मिक असोत की आणि कुठलेही आपल्या दु:खाची मूलभूत कारणे आहेत... तुम्हाला रूचि असलेल्या कोणत्याच गोष्टी शरीराला रूचि नसते. हेच युध्द सतत चालू असते.. बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग आहे असे दिसत नाही...

तुमच्याकडे अगोदरच असलेले ज्ञान न वापरता कोणत्याच गोष्टीकडे पाहाण्याचा मार्ग नाही.

मला माझा स्वत: म्हणता येईल असा एकही विचार, एकही शब्द, एकही अनुभव माझ्याकडे नाही.

इतरांनी जे सांगितलेय त्याचा चुराडा करणे (ते फार सोपे आहे) हा माझा हेतू नाहीच, तर मीच जे सांगतोय ते नष्ट करीत जाणे हा माझा हेतू आहे. आणखी तंतोतंत बोलायचं तर, मी जे सांगतोय त्यातून तुम्ही जो अर्थ काढताय त्यालाच खोडा घालायचा मी प्रयत्न करतोय.

माझे कार्य, जर असेल तर, ते म्हणजे मीच केलेले प्रत्येक विधान खोडून काढणे. मी जे म्हणालोय ते गांभिर्यानं घेऊन ते वापरण्याचा किंवा लागू करण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्ही धोका पत्करताय.

तुम्हाला वाचवले जाऊ शकते या कल्पनेपासूनच तुम्हाला वाचवण्याची गरज आहे. तुम्हाला वाचणार्‍यांपासून वाचवण्याची आणि तुमचे पुनरूत्थान करणार्‍यांपासून तुम्हाला हिसकावून दूर फेकण्याची गरज आहे.

तुम्हाला जेव्हा काहीच माहीत नसते, तेव्हा तुम्ही खूपकाही बोलता. तुम्हाला काही माहित असते तेव्हा, बोलण्यासारखे काहीच नसते.

मी फक्त एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतोय की व्यक्ती नावाचा कसलाच प्रकार कुठंच नाही. ते म्हणजे ज्ञानाचे विशिष्ट गाठोडे असते - तो विचार असतो - पण तिथे व्यक्तीत्व नसते.

तुम्हाला मदत करण्यासाठी केलेली कुठलीही गोष्ट तुमच्या परेशानीत भर घालील. मला ऐकत राहाण्यातून तुमच्याकडे ज्या लोकांची आधीपासूनच थप्पी लागलेली आहे त्यात अजून एकाची भर पडेल.

पूर्वी कुणीच स्पर्श केलेला नाही अशा बिंदूवर तुम्हाला जीवनाला स्पर्श करावा लागेल. ते तुम्हाला कुणीही शिकवू शकत नाही.

सर्वप्रथम जीवनाला स्पर्श करण्याचे धैर्य तुमच्याकडे असेल, तर तुमच्या डोक्यावर काय येऊन आदळलेय हे तुम्हाला कधीच कळणार नाही. शिकवलेल्या, वाटलेल्या आणि अनुभवलेल्या सगळ्या गोष्टींनीच काढता पाय घेतलाय आणि त्या जागी काहीही येऊन बसलेले नाही.

माझ्या, सगळ्या गुरूंच्या चिंध्या करण्याचे धैर्य तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुम्ही फोटोग्राफ्स, कर्मकांड, जन्मदिन उत्सव आणि तसल्याच गोष्टी करणारे सांप्रदायिक राहाल.

मी नेहमीच यावर जोर देतोय की समजून घेण्यासारखे काहीच नाही हे सत्य तुमच्यावर येऊन आदळले पाहिजे.

आध्यात्मिक ध्येयांच्या मागे लागुन कोणतीतरी जादू होऊन तुमची भौतिक ध्येये सोपी आणि सहज होतील असे समजणे तुमची चूक आहे.

मी फक्त एवढीच हमी देऊ शकतो की जोपर्यंत तुम्ही सुख शोधत राहाल, तो पर्यंत तुम्ही दु:खात खितपत पडाल.

तुमचे मन किंवा माझे मन असली कोणतीही गोष्ट नसते. कदाचित "वैश्विक मनासारखी" गोष्ट असू शकेल ज्यात साठत आलेले ज्ञान आणि अनुभव एकत्र होतात आणि एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे येतात.

इकडे तिकडे फिरणार्‍या मुंग्या किंवा आपल्या डोक्यावर घोंगावणार्‍या माश्या किंवा आपले रक्त शोषून घेत असलेले डास यांपेक्षा जास्त इतर कोणत्याही उदात्त हेतूसाठी आपली निर्मिती झालेली नाही.

तुम्ही जगत आहात आणि तुम्ही मराल हे भय पटवून देत असते. भय समाप्त व्हावे हे आपल्याला नको असते. त्यामुळेच आपण आपण ही सगळी न्यू माईंड्स, न्यू सायंन्सेस, न्यू टॉक्स, थेरपीज, चॉईसलेस अवेअरनेस आणि वेगवेगळ्या अटकली शोधून काढल्या आहेत.

तुम्हाला भय याच गोष्टीपासून मुक्त व्हायचे नाहीय. भय समाप्त झाले तर तुम्ही शारीरिकदृष्ट्या आटोपाल. वैद्यकिय मृत्यू घडून जाईल.

सूर्यप्रकाशा इतके सत्य म्हणजे तुम्हाला एकही अडचण नसते, तुम्ही ती तयार करता. तुम्हाला काहीच अडचणी नसतील तर तुम्ही जगत आहात असे तुम्हाला वाटत नाही.

हे सगळं काय आहे हे जाणून घेण्यास खुमखुमी असलेल्या कुणाकडेही असणारा पाहाण्याचा एक मार्ग म्हणजे विभक्त होण्याची क्रिया कशी घडते आहे, तुमच्या अवतीभवती आणि आतमध्ये घडणार्‍या गोष्टींपासून तुम्ही स्वत:ला वेगळे कसे पाडता आहात तेवढेच पाहाणे.

निसर्गात मृत्यू किंवा विनाश बिलकुल घडत नाही. फक्त अणुंचे विस्कटणे आणि आकार घेणे घडते. विश्वात "ऊर्जेचा" समतोल राखण्याची गरज किंवा आवश्यकता निर्माण झाली तर, मृत्यू घडतो.

चूक आणि बरोबर, चांगले आणि वाईट या भानगडीत तुम्ही जेव्हा बिलकुल नसाल तेव्हा तुम्ही कधीच काहीही चुकीचे करू शकणार नाही. तुम्ही या दोन डगरींवर अडकलेले असाल तोपर्यंत तुम्ही नेहमीच चुकीचे करीत राहाल.

आपल्याला वाटते की आपल्या आत विचार आहेत. ते स्वयंनिर्मित आणि स्वयंभू आहेत असे आपल्याला वाटते. वास्तविक मी ज्याला विचार-कक्षा म्हणतो ती गोष्ट तिथे असते. ही विचार कक्षा पिढ्यान पिढ्यांपासून सोपवलेले माणसाचे अनुभव, विचार आणि भावना यांची एकूण बेरीज असते.

विचारातून निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट, आतापर्यंत तुम्ही लावलेला प्रत्येक शोध विघातक हेतूंसाठी वापरण्यात आलाय. आपला प्रत्येक शोध, आपले प्रत्येक संशोधन आपल्याला मानव जातीच्या पूर्ण विनाशाकडे ढकलत आहे.

कंटाळा हा एक बूड नसलेला खड्डा असतो. तुम्ही वास्तविक जे करताय त्यापेक्षा जास्त मनोरंजक, जास्त मोठा हेतू असलेले काहीतरी आहे असा जोपर्यंत विचार कराल, तोपर्यंत कंटाळ्यातून मुक्त होण्याचा कोणताच मार्ग नाही.

संवाद किंवा बोलण्याचा एकूणच हेतू म्हणजे दुसर्‍या माणसाला तुमच्या दृष्टीकोनाचा करून घेणे. तुमच्याकडे कोणताच दृष्टीकोन नसेल तर समोरच्या माणसाकडे तुम्हाला त्याच्या दृष्टीकोनाचा करून घेण्याचा किंवा तुमचे मतपरिवर्तन करण्याचा कोणताच मार्ग नसतो.

उत्तम जीवनशैलीसाठी फक्त जैविक घडणीत असलेली असाधारण हुशारीच आवश्यक असते, पण आपण नेहमीच विचाराच्या माध्यमाने तिच्या नैसर्गिक संचालनात तंगडे अडकवत असतो.

तुम्ही जे आहात त्यापेक्षा कुणीतरी वेगळे बनण्याच्या दिशेने हालचाल नसेल तेव्हा, तुमचा स्वत:शी कुठलाच वाद राहात नाही.

तुमच्या अवतीभवती असलेले सर्वकाही ही विचाराची निर्मिती आहे हे तुम्ही विसरलात. तुम्ही स्वत:च विचारातून जन्मलेले आहात तुम्ही इथे बिलकुल नसता. या अर्थाने  विचार प्रचंड मौल्यवान आहे, तरीही तुमचा घात करणारी तीच गोष्ट आहे.

प्रत्येकवेळी विचार जन्मतो तेव्हा तुम्ही जन्म घेता. तुम्ही जगत असताना अस्तित्वात नसते अशी ही विशिष्ट गोष्ट नाही, तर तिच्या जन्ममरणाची मालिका सुरूच असते.

युजींच्या हयातीत काढण्यात आलेल्या फोटोग्राफ पैकी सर्वोत्तम फोटो - एक पूर्णविराम, परिपूर्णता, कोरेपणा




(पुढच्या भागात राहिलेली चर्चा आणि युजींना निरोप)

४ टिप्पण्या:

  1. Khup chhan vatala lekh vachun ! yabaddal tumhi det asaleli mahiti ha mazyasathi tari khup mothi ani mahatwachi goshta ahe. aplya blog sathi shubhechha !

    उत्तर द्याहटवा
  2. जीवनाबद्दल प्रत्येक जण काहींना काहीतरी वेगळा विचार करत असतो, त्यासाठी थोर विचारवंतांची नक्कीच गरज या समाजातील माणसाला आहे. वरील लेख वाचल्यामुळे आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे.
    विचार , भीती, मृत्यू, आध्यात्म, ध्यान, दुःख, सुख, मोह माया याबद्दल वेगळा विचार मंडतांनाच माझे मत सर्वांवर लादण्याचा अट्टहास हि कोणी करणे योग्य नाही याचीही जाणीव, धन्यवाद सर, आणखी सविस्तर माहितीची आम्ही वाट पाहत आहोत...

    उत्तर द्याहटवा
  3. जीवनाबद्दल प्रत्येक जण काहींना काहीतरी वेगळा विचार करत असतो, त्यासाठी थोर विचारवंतांची नक्कीच गरज या समाजातील माणसाला आहे. वरील लेख वाचल्यामुळे आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे.
    विचार , भीती, मृत्यू, आध्यात्म, ध्यान, दुःख, सुख, मोह माया याबद्दल वेगळा विचार मंडतांनाच माझे मत सर्वांवर लादण्याचा अट्टहास हि कोणी करणे योग्य नाही याचीही जाणीव, धन्यवाद सर, आणखी सविस्तर माहितीची आम्ही वाट पाहत आहोत...

    उत्तर द्याहटवा