११ जानेवारी, २०१२

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा

मध्‍य प्रदेशात येऊन चार महिने उलटले तरी इंदुरातल्या सराफ्‍याशिवाय इतर कुठेही जाऊ शकलो नव्हतो. नव्या सालाच्या पहिल्याच दिवशी भारत भ्रमण करायला निघालेला आत्मशून्य इंदुरात येऊन पुढे जाणार होता. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार्‍या ओमकारेश्वराचे दर्शन घेऊन पुढे जायचे असे त्याचे ठरले होते. त्याप्रमाणे तो रविवार 1 जानेवारी रोजी इंदुरात येऊन पोहोचला. मिपावर प्रतिसाद देताना दुसर्‍या उकाराचा अतोनात मारा करणारी ही वल्ली कोण याबद्दल उत्सुकता होतीच. आत्मशून्याच्या भेटीअंती तो केवळ प्रतिसाद लिहिताना फक्त दुसरा उकार वापरतो, मात्र 'ण' चा उच्चार बाणातल्या ण प्रमाणे शास्‍त्रशुद्ध पुणेरी पद्धतीने करतो असे दिसले.
तसेच याचा एक पाय ट्रॅव्हलींग बस मध्‍ये झोपला असताना मुडपला असल्याचे त्याने गळाभेट घेताच जाहिर केले. तो लंगडत असलेला पाहून मला वेगळाच संशय आला होता. मग दुसर्‍या दिवशी आरामात त्याला मेडिकलवाल्याकडे घेऊन गेलो. मेडिकल वाल्याने थेट त्याच्या काऊंटरचा अडसर दूर करुन क्षतिग्रस्त पायाच्या निरीक्षणार्थ आशूला दुकानाच्या आत आमंत्रित केले. आशू पुण्‍यनगरीनिवासी असल्याने या प्रकारामुळे घाबरला. पण त्या मेडिकलवाल्यानेच आत्मशून्यच्या चेहेर्‍यावर उमटलेल्या सर्व शंका दूर केल्या. त्याला एका स्टूलावर स्‍थानापन्न केले. पायाचे निरीक्षण करताना आशूशी संवाद साधत पायाला झटका दिला. मग त्या मेडिकलवाल्याने त्याच्या लंबोळक्या दुकानात आशूच्या निर्दोष चालण्‍याची दोन चार वेळा तालीम घेऊन पुन्हा त्याच्या पायाला झटके दिले. आत्मशून्याने झटक्यांमुळे पायाच्या वेदनांत चाळीस टक्के फरक पडल्याची कबुली दिली. मग मेडिकलवाल्याने पायाला लावायला शास्त्रापुरत्या गोळ्या आणि एक मलम दिले.
आत्मशून्याशी झालेल्या संवादातून कळले की तो इंदूरपासून 60 कि.मी.वर असलेल्या ओंकारेश्वरला जाणार आहे. मी काही देवदेव करणार्‍यांपैकी नाही. ठायीच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा... न लागती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण हे मी कधीतरी ऐकले आहे. त्यामुळे आमच्या खात्यावर तीर्थाटन, देवदर्शन, पूजा-अर्चा नेहमीच सायडींगला पडलेले असते. तरीही, तीर्थाटनाने आनंदित होणार्‍या दोस्तांचे आपल्याला वावडे नाही.
आत्मशून्य ओमकारेश्वरला जाणारच आहे तर अनायासे ओमकारेश्वर पाहुन घ्‍यावे असे ठरवले. तो आला त्या दिवशी सुटी असल्याने बाकायदा इंदुरातल्या सराफ्‍यावर आडवा हात मारला. सराफ्‍यातल्या खास व्यंजनांचे फोटो काढून मिपावर टाकले, तर त्या वासाने मिपाकर सराफ्‍यावर चाल करुन येतील आणि तो मराठी लोंढा आवरता आवरता मध्‍य प्रदेशातही नसता 'क्रायसिस' उद्भवेल असा संशय आल्याने सराफ्‍यात फोटो काढले नाहीत. माझ्‍याकडे सध्‍या कॅमेरा असलेला मोबाईल नाही ही खरी गोष्‍ट आहे. Wink आत्मशून्यही मोबाइल घरीच ठेऊन प्रवासाला निघाला होता.
इंदूरात सध्‍या आमचा तंबू जिथे ठोकला आहे त्या लोकमान्य नगरच्या उशाशी असलेल्या, सतत पेंगत रहाणार्‍या ठेसनातून ओंकारेश्वरी जाता येते ही नवी माहिती विकीपिडीयानं दिली. एरव्ही रोज आम्ही चहा प्यायला याच स्‍टेशनबाहेर असलेल्या झोपडीरुपी रेस्‍टॉरंटमध्‍ये जात होतो. पण एवढ्‍या शांत स्‍टेशनातून कुठे जाता येत असेल यावर माझा विश्‍वास नव्हता. विकीपिडीयाच्या माहितीची स्‍टेशन मास्‍तरांकडून खात्री करुन घेणे आवश्‍यक होते.
चहा पिऊन झाल्यावर आत्मशून्याला पुण्‍या-मुंबईसारखे बिलकुल नसणारे स्‍टेशन दाखवावे व ओमकारेश्वरच्या गाडीची 'पूछताछ' करावी असे ठरले. शक्यतोवर नियम पाळण्‍याकडे माझा कल असतो. फलाटावर जायचे म्हणजे प्लॅटफॉर्म तिकीट घ्‍यायला हवे. म्हणून खिडकीच्या आत विदाउट युनिफॉर्म बसलेल्या बाबांना प्लॅटफॉर्म तिकिट मागितले. तर ते म्हणाले, ''प्लॅटफॉर्म टिकट किसलिए चाहिये?'' मी म्हणालो प्लॅटफॉर्मवर जायचंय म्हणून. तर ते एकदम खेकसलेच.. फलाटपर जाने के लिए टिकट की क्या जरुरत म्हणणारा तो म्हातारा स्‍टेशनलाच खेटून असलेल्या झोपडीरुपी हॉटेलचा मालक आहे असा प्रकाश पडला.. आणि दोन रेल्वेंच्या मधल्या टायंबात यजमानाकडे जेऊन येणार्‍या पुलंच्या स्‍टेशन मास्‍तरची आठवण झाली.
दररोज सकाळी 9 वाजता त्या स्टेशनमधून ओमकारेश्वरला रेल्वे जाते यावर त्या म्हातारबांच्या हॉटेल चालवणार्‍या अर्धांगिनीने सहमतीची मोहोर उठवली. ते ऐकून माझ्‍यापेक्षा आत्मशून्यच जास्त खूश झाला. कारण गाडी पकडण्‍याची पळापळ वाचली होती. रुमपासून या स्‍टेशनात पाच मिनीटांत जाता येते.
आता इथून पुढे मात्र या कथनाला वेगळे वळण लागत आहे. हे कथन मी मिपावर किंवा मिपावरील कुणाकडेही करु नये अशी आत्मशून्याने अगदी अनेक वेळा कळवळून विनंती केली असली तरी माझ्‍या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरुन मी शून्याचे गुपीत फोडत आहे. त्याबद्दल तो मला माफ करील अशी आशा आहे. हे गुपीत फोडले तर मी मित्रांसाठी विश्वासार्ह माणूस नसेल अशी तंबीही त्याने देऊन ठेवली आहे. कितीही काही असले तरी, कुणाला जाहीर होणे पसंत नसलेली गोष्‍ट मी उघड करीत आहे याबद्दल माझ्‍या मनात सल आहे.
'युजींविषयी तुझ्‍यासोबत बोलायचंय.. म्हणून तुझ्‍याकडे येत आहे' असे सांगणारा आत्मशून्य इंदुरला आला तो वेगळाच संकल्प मनात घेऊन. एकमेकांची ओळख होऊन एकमेकांबद्दलचा नवेपणा संपल्यानंतर त्याने तो ओमकारेश्वराहून सध्‍या तरी एकट्याने पायी चालत, 'नर्मदा परिक्रमेला' निघणार असल्याचे त्याचे गुपीत माझ्‍यासमोर फोडले. ते ऐकून, त्याने सोबत आणलेली जगन्नाथ कुंटे उर्फ अवधूतानंद यांची पुस्तके वाचून, इंटरनेटवरुन परिक्रमेबाबत 2 दिवस माहिती काढून मला सुद्धा त्याच्यासोबत परिक्रमेला जावे असे वाटायला लागले. पण माझ्‍यावर असलेल्या जबाबदार्‍यांमुळे मी ते करु शकलो नाही. या जबाबदार्‍या नाणेफेक करुन तूर्त टाळणे योग्य होईल काय याचाही प्रयत्न मी करुन पाहिला - पण ते होणे नव्हते. असो.
शेवटी दिनांक 9 जानेवारी रोजी आम्ही लोकमान्य नगर स्‍थानकातून ओमकारेश्वरकडे जाणार्‍या खंडवा-अकोला-रतलाम रेल्वेत चढलो. मीटरगेजवरुन झुक् झु्क् करीत जाणार्‍या रेल्वेत आम्ही चढलो. शिटा रिकाम्या असूनही सगळा प्रवास उभे राहून, डोंगरदर्‍यांची रमणीय दृश्‍ये मीटरगेजच्या गतीने डोळेभरुन पहाता आली. डॉ. आंबेडकरांचं जन्मस्‍थान असलेले महूदेखील वाटेत लागले. मागील पावसाळ्यात दोन लोकांचा बळी गेलेल्या कुप्रसिद्ध ''पातालपानी'' हा विकराल धबधबा वाटेत भीती घालून गेला. सुमारे चार तासांनंतर गाडीने आम्हाला ओमकारेश्‍वर रोड उर्फ मोरटक्का स्टेशनवर सोडले.
दुपारी दीडच्या दरम्यान नर्मदेच्या तीरावर ओबडधोबड पर्वतशिलांवर वसलेल्या ओमकारेश्वर येथे पोहोचलो. तिथल्या घाटांवर फिरुन झाल्यानंतर परिक्रमेपूर्वी नर्मदापूजन, प्रसादाच्या 'कढाई' साठी गुरुजी गाठणे आले.
 

हे फोटो काढल्या ठिकाणीच छापून मिळाले.. जे तंत्रज्ञान आयफेल टॉवरखाली तेच नर्मदेच्या तीरावर

ही परिक्रमा पूर्णत: शास्‍त्रोक्तपणे, सर्व नियमांचे पालन करुनच करायची असे आत्मशून्याने ठरवले होते. शेवटी कुंटेंच्याच पुस्तकात नाव दिलेल्या श्री. सुधाकरशास्‍त्री जोशी यांचा पत्ता काढत नर्मदेच्या पलिकडील तीरावरच्या ओमकारेश्वर मंदिराकडे निघालो. इतर कुठल्याही तीर्थस्‍थानाप्रमाणे इथेही भोवती पंडित लोकांचा गराडा पडलाच. पण आम्हाला श्री. सुधाकरशास्‍त्री हवे होते. सुधाकरशास्‍त्रीच हवे असण्‍याचे कारण म्हणजे, कुंट्‍यांनी लिहिल्याप्रमाणे ते महाराष्‍ट्रीय. त्या पुजार्‍यांनी सुधाकरशास्‍त्री हे 2003 मध्‍येच निधन पावल्याचे वर्तमान सांगितले. बाळाशास्‍त्री हे त्यांचे त्यांचे सुपूत्र भेटू शकतील असे सांगून त्यांचा मोबाइल नंबर आमच्या हातात पडला. पुढे गेल्यानंतर एका जॅकेटधारी पंडिताला बाळाशास्‍त्रींचा अतापता विचारला तर ''रुकें, अभी मिला देते है..वे भगवान के मुख्‍य पुजारियों मे से एक है..'' असे सांगून तो ओंकारेश्वर मंदीरातील गर्दीत अंतर्धान पावला. थोड्‍या वेळाने बाळाशास्‍त्री गर्दीतूनच कुठूनतरी समोर आले. महाराष्‍ट्रातून, कुंटेंच्या पुस्तकात नाव वाचून परिक्रमेसाठी आलोय म्हटल्यावर बाळाशास्‍त्री यांनी पूर्णपणे हिंदी लहेजाच्या कह्यात गेलेल्या मराठीत माहिती द्यायला सुरुवात केली.
उद्या परिक्रमा सुरु करता येईल, आता थकला असाल, पलीकडच्या तीरावरच गजानन महाराज संस्‍थानचा भक्त निवास असून तिथे आराम करा असे सुचवले. रात्री साडेसात-आठला ओंकारेश्वराची आरती असते तेव्हा परत एकदा या म्हणजे उद्या कढाईचा विधी करणार्‍या त्यांच्या बंधूराजांशी भेट घालून देता येईल असे सांगितले.
गजानन महाराज संस्‍थानचा भक्त निवास पाहून आम्ही चाट पडलो. अवघ्‍या 175 रुपयांत रात्रभरासाठी उत्तम दर्जाची खोली मराठी माणसांना महाराष्‍ट्राबाहेरही उपलब्ध करुन देण्‍याच्या प्रयत्नाला केवळ दंडवत घातला. ओळख सिद्ध करणारे पुरावे मात्र काऊंटरवर दाखवावे लागले. तिथे जेवणाचीही सोय आहे, पण आम्हाला फिरण्‍याच्या नादात वेळेचे भान राहिले नाही. त्यामुळे भक्त निवासात प्रसाद घेता आला नाही.
तासभर आराम करुन भक्त निवासाच्या जवळच असलेल्या ममलेश्वराच्या दिशेने निघालो. घाट चढून गेल्यानंतर एका दुकानात भल्या मोठ्‍या अक्षरात पाटी लाऊन भांग विकली जात असल्याने 'अचंभा' वाटला. पण इंदूरमध्‍येच, आत्मशून्य आणि मी टपरीवर गेल्यानंतर त्याने चॉकलेटसारख्‍या गोळ्या पाहून ते काय आहे असे विचारले होते. सिगारेटींसाठी मी ज्या टपरीवर रोज जातो तिथे भांगेच्या गोळ्याही एका रुपयात एक या भावाने विकल्या जातात हे ज्ञान मला इंदुरात रहायला आल्यानंतर चार महिन्यांनी झाले होते.
तेव्हा मजा म्हणून त्या स्वस्तातल्या भांगेच्या दोन गोळ्या रात्री झोपताना घेतल्या होत्या. दुसर्‍या दिवशी हपिसला ब्राम्हण घातला गेला. जागच दुपारी 12 वाजता आली. भांगेत मंद-मंद नशा उत्पन्न करुन अंमल असेपर्यंत माणसाला अवकाशगामी ठेवण्‍याची शक्ती आहे. पण 'दिडकीची भांग घेतली की वाट्टेल तेवढ्‍या कल्पना सुचतात' हे काही खरे नसावे. मला काहीही सुचले नाही.
येताना एका दुकानात शेरलॉक होम्स सारखा ओढायचा 'पाइप' पाहिला होता. सुव्हेनियर म्हणून मला तो हवा होता. एक फुटला तर दुसरा म्हणून ते दोन पाइफ घेऊन आम्ही घाट उतरु लागलो. बाजूलाच असलेल्या पुस्तकांच्या दुकानात गीता प्रेसची उपनिषदे आणि चारी वेद विकायला ठेवले होते. श्रीमद् विद्वद्वर - वरदराजाचार्यप्रणित लघुसिद्धांतकौमुदी होते. संस्‍कृत पूर्णपणे समजण्‍याच्या नावाने बोंब.. पण उगाच किडा म्हणून ती स्वस्तातली खरेदी केली आणि भक्तनिवास गाठला.
(आत्मशून्यासोबत केलेल्या 12 कि.मी.च्या परिक्रमेचा वृत्तांत, वाटेत आलेले मजेदार प्रसंग उद्या)

२ टिप्पण्या: