१२ जानेवारी, २०१२

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - ३

बाजूलाच असलेल्या पुस्तकांच्या दुकानात गीता प्रेसची उपनिषदे आणि चारी वेद विकायला ठेवले होते. श्रीमद् विद्वद्वर - वरदराजाचार्यप्रणित लघुसिद्धांतकौमुदी होते. संस्‍कृत पूर्णपणे समजण्‍याच्या नावाने बोंब.. पण उगाच किडा म्हणून ती स्वस्तातली खरेदी केली आणि भक्तनिवास गाठला.
भक्त निवास गाठण्यापूर्वी मला चहा प्यायची हुक्की आली. माझ्यासोबतचा महानुभाव "पहिल्यापासूनच उत्तेजक पेयापासून अलिप्त" होता. पण परिक्रमेत चहा प्यावाच लागणार आहे तेव्हा आतापासूनच सवय कर म्हणून आशूवर मी दर तासाला चहाचा मारा सुरु केला होता.
घाटावरच टपरी होती. समोर रात्रीच्या वेळी झळाळून निघालेला ओमकारेश्वराचा पैलतीर आणि मध्ये संथपणे वाहाणारी नर्मदा. डोक्यावर जटाभार राखलेले साधू, इकडेतिकडे पहात घाटावर हिंडणारे फॉरेनर्स अशी तुरळक गर्दी.



टपरीसमोर टाकलेल्या खुर्च्यांवर जाऊन बसलो. आम्ही चहा घेताना त्या टपरीसमोर दोन लहानग्या मुली टपरीसमोर ठेवलेल्या पदार्थांकडे आशाळभूतपणे पहात होत्या. अंगावर फाटके कपडे आणि थंडीने काकडतही होत्या. त्यांच्याकडे नजर लाऊन थोडावेळ पहात राहिलो.
इकडे या आणि तुम्हाला काय खायला पाहिजे ते घ्या असे त्यांना सांगायला उठणार तेवढ्यात एक जीन्सपँट-जॅकेट-कानटोपी घातलेला बाप्या मध्येच उपटला व त्या दोन्ही चिमुकल्यांना त्याने पाठीवर दोन-दोन धपाटे घातले -
"भागो यहां से, घर जा के मरो.."
असे बडबडत आमच्याकडे तिरस्काराने पाहून तो निघून जाऊ लागला. तेवढ्यात टपरी मालकाने त्या बाप्याला झापले -
"अरे उनको काहे भगाया? वो बर्तन माँजने और कुछ खाने के लिये इधर आती है.. "
"पानी में उतर गई थी - ठंड से मरमरा रही थी..बर्तन काहे माँजती..  " असे म्हणत तो बाप्या घाटावरच्याच एका गल्लीत निघून गेला. त्या लहान मुली त्याच्याच किंवा त्याच्या भाईबंदांपैकी कुणाच्या तरी असाव्यात.
थोडावेळ तिथे बसून राहिलो व टपरीवाल्याला पैसे देऊन निघालो. टपरी वाल्यानं परत दिलेल्या जीर्णशीर्ण नोटा घेतल्या. त्या नोटा पाहून आत्मशून्य हसू लागला. इकडे फाटक्या नोटा सर्रास वापरल्या जातात. देणाराही काही बोलत नाही व घेणाराही. कितीचीही नोट देऊन सुटे मागितले तर मिळून जातात. नोट परत अंगावर फेकली जात नाही. पैसे दिले की काही न बोलता सुटे परत मिळतात हे पाहून शून्य फक्त रडायचा बाकी होता. पुण्यपत्तन क्षेत्री बस वाहकाने आशूला सुटे नसल्याने पायीच चालण्याचे बोधामृत पाजले होते.
"नोट फटी हुयी है.. दुसरी दो.." असे आपण म्हणालो तर इकडच्या लोकांना तो लक्ष्मीचा अपमान केल्यासारखे वाटते.
लक्ष्मी को फटा हुआ कहते हो - पापी कहीं के - कहां से आये हो ? असा भाव त्यांच्या चेहेर्‍यावर स्पष्ट दिसतो. पण इथून तिथून फाटक्याच नोटा का वापरल्या जातात त्याचे शास्त्रीय कारण आमच्या कँटीनवाल्याने माझ्या अंगावर फेकून मला निरुत्तर केले होते. इथे नवा होतो तेव्हा त्याच्याकडून रोज-रोज फाटकी नोट परत घेऊन मी चिडलो होतो. कधीतरी धडकी नोट देत जा, इकडे चांगल्या नोटा वापरूच नयेत असा नियम आहे काय असे काहीबाही बोललो होतो.
"खोटे सिक्के चलन में लिये दिये जाते है तब खरे सिक्के ब्यवहार से बाहर होकर तिजोरी में बंद हो जाते है.. आप हम को अच्छी नोट दो - हम भी आपको अच्छी नोट देना शुरु करेंगे.."  असा यक्षप्रश्न मांडून त्याने बोळवण केली होती. आता सगळेच फाटक्या नोटा परत देत असतील तर कोर्‍या नोटा मी काही प्रिंटरमधून काढणार नव्हतो. असो.

तर नुकत्याच विकत घेतलेल्या पुस्तकांचे ओझे कधी या, कधी त्या हातावर तोलत आम्ही भक्त निवास गाठला. शास्त्रीजींनी साडेसात आठला पुन्हा मंदिराकडे यायला सांगितले होते. उद्या सकाळच्या "नर्मदा पूजन - कढाई" च्या विधीची ते त्यांच्या भावाशी भेट घालून देऊन तजवीज करून देणार होते. आठ वाजायला अजून वेळ होता म्हणून आणलेली पुस्तके कुठे, कधी घेतली त्याच्या तारखा पुस्तकांवर घातल्या.

कालपर्यंत परिक्रमेचे कसे होईल, काय होईल ही चिंता करणारा शून्य काल बाळाशास्त्रींची गाठ पडून योग्य तो मार्ग सापडल्याने निर्धास्त झाला होता. इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना साडेआठ कधी वाजले ते कळले नाही. तिकडच्या तीरावर जाऊन यायचे होते. तो झुलता पुल ओलांडून ओमकारेश्वराच्या मंदिरात पोहोचलो.
तिथे झांज, ढोलक, पेटीवर त्या विशिष्ट उत्तर भारतीय ठेक्यावर भजन रंगले होते आणि लोक टाळ्या वाजवत डुलत होते.
भजनात प्रचंड जोरात टिपेला जाणारा तो ढोलक आणि भजनाला चढलेल्या त्या रंगातून शिवशंभोच्या तांडव नृत्याची झाक दिसत होती. गाभार्‍यात ओंकारेश्वराची शयनपूजा सुरु होती त्यामुळे दारावर मखमली पडदा टाकलेला होता. भजन संपून आरती सुरु झाली. शंकराचार्यांनी रचना केलेले नर्मदाष्टक आणि कुणा शिवानंद स्वामींनी रचलेली प्रासादिक आरती सुरु झाली. दोन्हींची लय एवढी सुंदर होती की मन आतल्या आत उड्या मारू लागले आणि डोळे आपोआप मिटले जाऊन त्या तालासुरावर लोक डुलायला लागले -

सबिन्दु सिन्धु सुस्खलत् तरंग भंग रंजितम
द्विषत्सुपापजातकं आरिवारि संयुतम्
कृतान्तदूत कालभूत भीतिहारि नर्मदे
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे
त्वदाम्बुलीन दीन मीन दिव्य संम्प्रदायकं
कलौमलौघ भारहारि सर्वतीर्थ नायकम्
सुमस्यकच्छ नक्रचक्र चक्रवाक शर्मदे
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे

त्यानंतर आरती सुरु झाली

ओम् जगतानंदी.. हो मय्या जय जगतानंदी.. हो रेवा जगतानंदी
ब्रह्मा हरिहर शंकर.. रेवा शिवहर शंकर रुद्री पालंती
हरि ओम जय जगतानंदी
देवी.. नारद शारद तुम वरदायक अभिनव पदचंडी
हो मय्या अभिनव पदचंडी.. हो रेवा अभिनव पदचंडी
सुरवर मुनिजन सेवत.. मुनिजन ध्यावत शारद पदवंती
देवी धूम्रक वाहन राजत वीणा वाजयंती
हो मय्या वीणा वाजयंती.. हो रेवा वीणा वाजयंती

झुमकत झुमकत झुमकत
झनन झनन झनन रमती राजंती
देवी बाजत तालमृदंगा सुरमंडल रमती
हो मैय्या सुरमंडल रमती .. हो रेवा सुरमंडल रमती
तोडिताम् तोडिताम् तोडिताम्
तुडडड तुडडड तुडडड  रमती सुरवंती
हरि ओम जय जगतानंदी..


आरती-प्रसाद-दर्शन झाले आणि आम्ही शास्त्रीजींना शोधू लागलो. इकडे तिकडे पाहिले पण ते कुठेच दिसेनात. शून्य अस्वस्थ व्हायला लागला. उद्याचे नियोजन ठरणे महत्वाचे होते. अर्धा तास शोधाशोध आणि विचाराविचारात गेला. शेवटी त्यांना फोन लावलाच. त्यांना विचारले "कहां है आप? हम मंदिर में आपके लिये रूके है.."
तर तिकडून उत्तर मिळाले, "हम तो घर में विश्राम कर रहें है.."
दिवसभराच्या लगबगीनं थकून ते घरी परतले होते आणि त्यांच्या भावाला त्यांनी आमच्यासाठी मंदिरात थांबवून ठेवले होते. गर्दी फार नव्हती तरी त्यांच्या भावाला आम्ही ओळखू आलो नाही आणि हुकाचूक झाली.

आता सकाळी साडेसात किंवा जास्तीत जास्त आठपर्यंत मंदिरात या व सापडलो नाही तर फोन करा असे सांगून त्यांनी नर्मदे हर म्हणून फोन ठेवला. आत्मशून्याची धाकधुक पुन्हा सुरु झाली - काय होईल.. कसे होईल. परिक्रमेच्या रस्त्यावर पाय ठेवेपर्यंत त्याला सुख झाले नाही.
पुन्हा घाटांवर इकडेतिकडे फिरण्यात वेळ घालवला. भक्त निवासात गेलो तेव्हा पावणे दहा वाजले होते. तिथली प्रसादाची वेळ उलटून गेली होती.
भक्त निवासासमोरच्या हॉटेलमधून काहीतरी घेतले आणि रूम जवळ केली.
---------

रात्री पडल्यापडल्या ईशावास्योपनिषदाचा हिंदी अनुवाद उलटून पाहिला. पहिल्याच श्लोकात आकाश दाखवणारं पुस्तक आयुष्यात पहिल्यांदाच हातात पडलं होतं -

ईशावास्यमित्यादयो मन्त्रा:
ईशादि - कर्मस्वनियुक्ता: |
मन्त्राणां तेषामकर्मशेष्स्यात्मनो विनियोगः
याथात्म्य प्रकाशकत्वात् याथात्म्यं चात्मनः |
शुद्ध्त्वापापाविद्ध्त्वैकत्व नित्यत्वा शरीरत्व सर्वगतात्वादि वक्ष्य माणम्
तच्च कर्मणा विरुध्येतेति युक्त एवेषां कर्मस्विनियोगा: |

ईशावास्यम् इत्यादी मंत्रांचा कर्मात विनियोग होत नाही - कारण ते आत्म्याच्या यथार्थ रुपाचे प्रतिपादन करतात, जो कर्माचा भाग नाही.
आत्म्याचे यथार्थ स्वरूप शुद्ध, निष्पाप, एकत्व, नित्यत्व, अशरीरत्व आणि सर्वगतत्व इत्यादी असून त्याबद्दल पुढे सांगण्यात आले आहे.

न ह्येवंलक्षणमात्मनो याथात्ममुत्पाद्यं विकार्यं माप्यं संस्कार्यं कर्तृभोक्तृरुपं वा ये कर्मशेषता स्यात् |
सर्वासामुपनिषदा मात्मयाथात्मा निरूपणे नैव उपक्षयात्
गीतानां मोक्षधर्माणां चैव परत्वात् |
तदात्मानोनेकत्व कर्तृत्वभोक्तृत्वादी चाशुद्ध्त्व पापविद्ध्त्वादि चोपदाय लोकबुद्धी सिध्दं कर्माणी विहितानी |

आत्म्याचे अशा लक्षणांचे यथार्थ स्वरूप उत्पाद्य, विकार्य, आप्य आणि संस्कार्य किंवा कर्ता-भोक्ता रुप नाही, जेणेकरून तो कर्माचा भाग रूप होईल. संपूर्ण उपनिषदांची परिसमाप्ती आत्म्याच्या यथार्थ स्वरुपाचे निरूपण करण्यातच होते आणि गीता व मोक्षधर्म यासाठीच अस्तित्वात आहेत. त्यामुळे आत्म्याची सामान्य लोकांच्या बुद्धीतून अनुभवास येणार्‍या अनेकत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व तसेच अशुद्धत्व आणि पापमयत्व यांना विचारात घेऊनच कर्माचे विधान करण्यात आले आहे.

या वाक्यांची फोड करुन त्यांचा अर्थ मनात भिनला, भिनत जाऊ लागला. आत्मा जर शुध्द, निष्पाप, एक, नित्य, अशरीरी आणि सर्वगत आहे तर तो अनुभवण्यास एवढा दुस्तर का आहे? कर्माशी आत्म्याचं काही देणं-घेणं नाही हे ही आहेच. मग नेमकी काय भानगड आहे? खरंच काही अडचण आहे की मुळात काहीही अडचणच नाही? हे एवढं सोपं असेल तर मुदलातच काही घोळ होतो आहे एवढं निश्चित. बुद्धीला ताण देण्यापेक्षा ही वाक्ये पुन्हा-पुन्हा मनात भिनवू लागलो व झोप डोळ्यांवर उतरु लागली पण मध्येच आपोआप दोन्ही नाकपुड्यांतून एकदाच श्वासोश्वास सुरु होऊन अंधार व्हायला लागला आणि मरण जवळ आलं असं दर श्वासाला वाटू लागलो. रात्रभर हेच चालू. नसती भानगड झाली. या कुशीवरुन त्या कुशीवर होता होता साडेचार-पाचला कधीतरी झोप लागली. तेव्हा आत्मशून्य जागा होऊन काहीतरी खुडबूड करीत होता.
-----------

काल रात्री हॉटेलातून घेतलेल्या रतलामी सेव फरसाणानं पोट बिघडल्याचे शुभवर्तमान त्याने साडेसात- आठला उठल्यावर जाहीर केले. माझी पण रात्रभर झोप झाली नव्हती.

चहापाणी आवरुन पटकन ओमकारेश्वर मंदीर गाठलं. बाळाशास्त्रींना फोन लावला.
"हम जरा बालक को पाठशाला में छोडने आये है, बंधू आप ही की ओर निकले है.. " 
ओमकारेश्वराच्या पुजार्‍यालाही बालक को पाठशाला छोडने जाना पडता है हे पाहून हसू आलं.
पंधरावीस मिनिटांत बाळाशास्त्रींचे बंधूराज शोधत आलेच. समोरच्या घाटावर जाऊन "क्छौर" करुन घ्या, मी प्रसादाचा शिरा व पूजेचं साहित्य घेऊन पोचतो म्हणाले. दक्षिणा वगैरेबद्दल विचारून घेतलं आणि पुन्हा एकदा पुलावरुन अलीकडच्या काठावर आलो.


"क्छौर" केलेला तो गुटगुटीत आत्मशून्य वैदिक काळच्या बटू सारखा पण अनोळखी दिसू लागला. पैसे काढावे लागणार होते. एटीएम मशीनकडे गेलो तर कुणा येठनछाप माणसानं त्या गावातल्या एकुलत्या एक एटीएम मशीनचं वायर उपटून फेकलं होतं. शून्याच्या अस्वस्थपणाचा पारा पुन्हा १२० अंशांवर गेला. हे एटीएम दुरुस्त व्हायला दुपारचे बारा वाजतील पण नक्की होईल अशी माहिती त्या भल्या पहाटे एकटाच बँकेत काही खुडबूड करणार्‍या इसमाने दिली.
एटीएम असलेलं दुसरं गाव तिथून १२ कि. मी. वर असल्याची माहिती एका सज्जन दुकानदारानं दिली.
शेवटी आशूकडे असलेल्या हजार-दीड हजारात शास्त्रीजींना तात्पुरतं संतुष्ट करु असं ठरवून घाटावर परत आलो व त्यांना अडचण सांगितली तर - "कोई समस्या नहीं.. पहले पूजा निपटा लेते है"  म्हणून स्नानं करुन घ्यायला सांगितले.
घाटावर पूजेचं साहित्य आणि कपडे ठेवले होते. नर्मदेच्या लाटा तिथपर्यंत येऊन आदळल्या आणि कुंकुम, अक्षता ठेवलेलं ताट सोबत घेऊन गेल्या.
"इनकी पूजा लेने के लिये नर्मदाजी आतूर हो गई है" असं शून्याकडे पाहून म्हणालो तेव्हा शास्त्रीजी हसू लागले. नर्मदेत रोजच्या रोज वर जवळच असलेल्या धरणातून पाणी सोडलं जातं. 
नर्मदेचे पंचामृताने पूजन करताना आत्मशून्य गडबडून गेला - त्यात पुन्हा शास्त्रीजींचे १२० च्या स्पीडने होणारे मंत्रोच्चार आणि नेमके काय करायचे त्याबद्दल मध्ये मध्ये सूचनांचा मारा.



नर्मदा मैय्या को जल चढाईये ऐकल्यानंतर हा पठ्ठ्या गडू नर्मदेत टाकू का असे विचारता झाला.
त्याला काठावर उभं करुन पंडितजींनी पंचामृताचे द्रोण त्याच्या हातात पोहोच करण्याकामी उघड्याबंब असलेल्या आमची नेमणूक केली. पाणी सतत वाढत असल्याने काठापासून दूर एका बाकड्यावर पूजा सुरु होती.
नर्मदेची पूजा संपन्न झाली आणि कुमारिकांच्या रुपातील नर्मदेचे पूजन सुरु झाले. घाटावरच्या यात्रेकरूंच्या दोन मुली आणि काल त्या टपरीसमोर दिसलेल्या दोन आणि आणखी त्यांच्यासोबतची एक अशा पाच जणींनी दक्षिणा व प्रसाद स्वीकारून आशूच्या मस्तकावर आशिर्वादाचा हात ठेवला. पंडीतजींनाही दक्षिणा पावली.
परिक्रमीला ओंकारेश्वर नगर परिषदेकडून प्रमाणपत्र घ्यावे लागते. वाटेत काही संशयात्मे "प्रमाण - पत्र" पाहिल्याशिवाय थांबायला परवानगी देत नाहीत आणि परिक्रमा करणार्‍याने ते  सोबत ठेवणे चांगलेच. परिक्रमेदरम्यान काही ठराविक गावात थांबल्यावर त्या प्रमाणपत्रावर तिथला शिक्का घ्यावा लागतो. प्रमाणपत्रावर पूजा सांगितलेल्या गुरुजींचीही स्वाक्षरी असते. ते तयार करण्यासाठी आशू व पंडीतजी घाटावरच असलेल्या नगर परिषदेकडे निघाले आणि एटीएमकडे सुटलो. एटीएमचे वायर जोडले गेले होते. परत येऊन त्या दोघांना गाठले व पंडीतजींना राहिलेली दक्षिणा देऊन मार्गस्थ केले.
आता पोटात काव-काव सुरु झाली होती. हॉटेलमध्ये ताजा पदार्थ काहीच दिसेना पण त्याने त्याचे भजे फार स्वादिष्ट असतात असे सांगून समोरच्या "स्वादिष्ट भजिये" वाल्याकडे जायची शिफारस केली. लिंबू, मीठ मारलेले ते भजे एकट्याने हादडले. पोट बिघडल्याने शून्याने  फक्त संत्र्याच्या रसावर समाधान मानले. भजिये वाल्याला मेडिकल विचारले तर त्याने त्याच्याकडच्याच गोळांचा साठा धुंडाळला. तो केमिस्टही होता. पण हवी ती गोळी मिळाली नाही. त्याने सांगितलेली पावरबाज गोळी दुसर्‍या मेडीकलवर जाऊन आणली.
आता आशूचा निरोप घेण्याची वेळ आली होती. घाट उतरला की त्याची नर्मदा परिक्रमा सुरु होणार होती. पण मला जावे वाटेना. शास्त्रीजींनी पहिला पडाव ओंकारेश्वरहून १२ कि.मी. वर असलेल्या मोरटक्क्यात होईल असे सांगितले होते. मला असेही बसमध्ये बसून मोरटक्क्याहूनच पुढे जावे लागणार होते. त्याऐवजी शून्यासोबत चालत मोरटक्क्याला जाऊ आणि रात्री इंदूरला परत येऊ असे ठरवून घाट उतरायला सुरुवात केली.

(क्रमशः)

1 टिप्पणी:

  1. सुरेख, उत्कंठा वाढते आहे.

    अवांतर : कितीचीही नोट देऊन सुटे मागितले तर मिळून जातात. नोट परत अंगावर फेकली जात नाही. पैसे दिले की काही न बोलता सुटे परत मिळतात हे पाहून शून्य फक्त रडायचा बाकी होता. पुण्यपत्तन क्षेत्री बस वाहकाने आशूला सुटे नसल्याने पायीच चालण्याचे बोधामृत पाजले होते.>>>> पुण्यपत्तन :D जबराट पंच राव ;)

    उत्तर द्याहटवा