३ एप्रिल, २०१२

फायली : एक दाबणे !

लेखक: मानस चक्रवर्ती, 'लूज कॅनन' या स्तंभातून
हिंदुस्तान टाइम्स, दि. 01.04.2012
http://paper.hindustantimes.com/epaper/viewer.aspx

भारतात पुकारलेल्या आणीबाणीचे रेकॉर्ड पंतप्रधान कार्यालयातून गायब झाले आहे - भारत सरकार.

--------------------------------------

जुन्या सरकारी कागदपत्रांचे रक्षण करणार्‍या सरकारी अधिकार्‍याची मी घेतलेली ही मुलाखत. याचे कार्यालयीन पद Librarian and Information Archives Registrar (LIAR) आहे.

मी: ही एवढी महत्त्वाची कागदपत्रे अशी कशी सहज गायब होऊ शकतात?
LIAR: खरं सांगायचं म्हणजे, कुत्र्याने हे..
मी: बास! तुम्ही कुत्र्याने कागद चघळले हे जुने रडगाणेच वाजणार तर?
LIAR: नाही, नाही मी तसं कुठं म्हणालो. कुत्रे कागद खात नाहीत. आमच्या कंपाऊंडमध्‍ये आम्ही शेळी पाळली होती, कर्मचार्‍यांना शेळीचे दूध लागले तर असावी म्हणून. पण काये ना, त्या कुत्र्याला इकडे-तिकडे वास काढत हिंडायची सवय होती आणि ते नेहमीच शेळीमागे लागायचं. म्हणून आम्ही काय केलं, आम्ही त्या शेळीलाच आत बांधू लागलो होतो, तिथे ती कागदपत्रं ठेवली होती. भानगड अशी झाली की त्या शेळीला त्या जुन्या कागदपत्रांची चव आवडली आणि शेळीच्या चर्वण उद्योगाचा सुगावा आम्हाला लागण्यापूर्वीच तिनं अर्ध्याच्या वर त्या दस्तऐवजांचा फन्ना उडवला..
मी: आय फील समथिंग फिशी बिहाइंड..
LIAR: Goat-ey. पण तुमचं बरोबर आहे. यामागची आणखी एक कारणमिमांसा आहे. काही वर्षांपूर्वी अभिलेखागारात चोर शिरले होते. आम्ही पडताळणी केली तेव्हा आणीबाणीबद्दलची कागपत्रे तेवढी गहाळ झाली होती.
मी: हे सरकारचंच काम मानायचं का?
Liar: नाही, नाही माझ्या विश्वसार्ह सूत्रांनी कळवलंय हे काम पाकिस्तानच्या जनरल कयानींचंच म्हणून. त्यांना सत्ता उलथवून टाकायची आहे आणि ते त्यांना लोकशाही मार्गाने करायचं होतं. त्यांना वाटलं आणीबाणीच्या कागदपत्रांतून काही हाती पडेल. ते बाड वाचून चित्रपट तयार करावा असे एखाद्या बॉलीवूड दिग्दर्शकालाही वाटले नसेलच असे नाही, पण माझा यावर तेवढा
विश्वास नाही.
मी: मग, तुम्हाला काय वाटतं?
Liar: मला वाटतं हा सगळा त्या खोलीत पाणी साठल्याच्या दुष्परिणाम आहे. X-Z दरम्यानच्या फायली फायलींग कॅबीनेटच्या तळाशी रचून ठेवल्या होत्या. रात्री कुणीतरी बेसीनमधला नळ सुरु ठेवला आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ती खोली पाण्‍याने भरुन गेली. कॅबीनेटच्या बूडाशी असलेली कागदपत्रे गहाळ झाली.
मी: मला एक कळत नाहीय, Emergency बद्दलची कागदपत्रे X-Z दरम्यान कशी ठेवलीत तुम्ही?
Liar: अहो तो फायलींग करणारा लिपीक! तो तामिळनाडूचा आहे ना. त्याने Yemergency करुन त्या फायली Y मध्‍ये ठेऊन दिल्या.
मी: मला हेही खरं वाटत नाही.
Liar: तुम्हाला सांगतो प्रकाशकांनाही असंच वाटलं! माझ्या हाताखालच्या एका क्लर्कने मला सांगितलं, पंतप्रधान आणि राष्‍ट्रपतीदरम्यान आणीबाणीबद्दलची बातचीत असलेले ते पूर्णच्या पूर्ण दस्तऐवज त्याने पुस्तक म्हणून छापण्यासाठी प्रकाशकाला दिले होते. नकारघंटा वाजवून त्यांनी ते परत पाठवले.
मी: पण त्यांनी कागदपत्रे परत तर पाठ‍वली होती ना?
Liar: त्यांचं म्हणणं पडलं की त्यात कसलाही साहित्यिक दर्जा नाही, त्या कागदपत्रांची शैलीपण भयंकर आहे आणि त्यातील पटकथा तर कचराछाप आहे.
मी: मग? तुम्ही काय केलंत?
Liar: त्यानंतर लगेच मी ऑफिसबाहेरच्या भय्याची भेळपुरी खाल्ली, ती बांधून आली होती त्या कागदावर इंदिरा गांधींची स्वाक्षरी होती. पण काही लोक म्हणतात की मानवी मूर्खपणाच्या सखोलतेचा पुरावा म्हणून एलियन्सनी ती कागदपत्रं पळवलीत.
मी: आणखी काही सबबी?
Liar: आता तुमच्यापासून काय लपवणार.. खरं म्हणजे एकदा संडासातलं पाणी संपलं होतं, मग..
मी: बस्स!! आता खरी गोष्‍ट काय आहे ते सांगा.
Liar: अहो, कसची कागदपत्रं आणि काय. आमच्याकडे काहीच नव्हतं. इंदिरामॅडम राष्‍ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांना भेटल्या तेव्हा त्यांनी मॅडमला विचारलं की, आणीबाणी लादायचीच असे त्यांच्या मनात असल्याची अफवा खरी आहे का? मॅडमजींनी आधी त्यांना डोळा मारला, मग त्यांच्या पोटात हलकासा गुद्दा मारला आणि शेवटी गोड हसल्या.

पुढे आम्हाला कळालं की राष्‍ट्रपतींनी आणीबाणी जाहिर केलीय.

****

२ टिप्पण्या:

  1. इंदिरामॅडम राष्‍ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांना भेटल्या तेव्हा त्यांनी मॅडमला विचारलं की, आणीबाणी लादायचीच असे त्यांच्या मनात असल्याची अफवा खरी आहे का? मॅडमजींनी आधी त्यांना डोळा मारला, मग त्यांच्या पोटात हलकासा गुद्दा मारला आणि शेवटी गोड हसल्या.

    हाईट्टे

    उत्तर द्याहटवा