छे!! छे!! छे!! हे मात्र अतिच झालं. आमच्या मैत्रिणीकडुनच आमच्यावर आम्ही राजकिय आणि वैचारिक लिखाणाकडे झुकत असल्याचे आरोप होऊ लागले. पण खरंच स्वत:च्याच मागच्या आणि चालु पोस्ट्स वाचून पाहिल्या तर त्यात तथ्य आहे हे जाणवलं. हे विषयच असे होते की हलक्या-फुलक्या शैलीत लिहिले तर सवंगपणाचे आरोप झाले असते, आणि एरंडेल पिऊन लिखाण करण्याच्या शैलीत (पक्षी: समस्त संपादकांची शैली) लिहिले तर वैचारिक लिखाणाचे झाले असते. एवढी कसरत करीत लिहीलं तरी काही करड्या नजरांच्या खास ठेवणीतील टिप्पण्या आल्याच! त्यामुळे प्राण गेला तरी बेहतर, पण आता त्या शैलीला पुन्हा शिवणे नाही. तर असो, सांगण्याचा मुद्दा एवढाच की, आम्ही काही जगाची चिंता असलेले विचारवंत (शी!! शी!! शी!!) नाही, आमचंही दिल कधीतरी धडकलं आहे, आम्हालाही कशा का होईना प्रेम कविता "झाल्या" आहेत, आम्हीही टपोरी लिहू शकतो, आमचंही डोकं सटकू शकतं. आमचं हे "आम्ही, आम्ही" ऎकून एखादा अनामित (गुगलच्या भाषांतरकाराचा शब्द! एलायसीचा फार्म भरल्यासारखे वाटते) नंतर म्हणायचा "तुम्ही कितीजण आहात?" तर आधीच सांगून ठेवतो की आमचा "मी" पणा गेला आहे आणि त्याची जागा "आम्हीपणानं" घेतलीय. तर आता प्रस्तुत आहे आमच्या आवडीची, एका खास भेटीची कधीकाळी "झालेली" प्रेमकविता (आमच्या मताप्रमाणं विवाहित जोडप्यांना पोरे "होतात" तशा अविवाहीत प्रियकर-प्रेयसींना कविता होतात. कधीकाळी झालेली हेही तेवढंच नैसर्गिक जेवढं एखादा बाप आपल्या मुला/मुलीबद्दल बोलताना म्हणतो "आमचा संजु/सीमा अमुक साली झाली", तो असं नाही म्हणत की "संजु/सीमाला आम्ही अमुक साली तयार केलं", विवाहाची इतिश्री पोरे होण्यात आहे, तशी लव्ह अफ्येयरची इतिश्री प्रेमकविता होण्यात आहे, प्रेमविवाह होण्यात नाही!!). तर हे चर्हाट इथंच आवरतो आणि तुम्ही कविता वाचा व तुमच्या मताची पिंक टाकायला विसरू नका.
वेळही अशी ती होती
उगवती न फटफटलेली
पक्षीही तुरळक जागे
नुकतेच जरा फडफडले
माणसे होऊन जागी
चालली खाया वारा
या शांत पहाट वेळी
ती मला भेटते म्हटली
आलीच पहा ती आली
येताच तिला ओळखले
मी मनात माझ्या गुपचुप
सांगूच नको मी म्हटले
ती बसली अगदी चुपचुप
अशी दोघे गुपचुप बसता
बोलणे खुंटले अगदी
पण बोलून काही न येता
ती कसली भेट म्हणावी?
सावरून मी हे वदलो
डोळ्यात तुला साठवण्या
मी रात्र पहाट गं केली
पाहुन घेऊ दे आता
तुज सुंदर शांत सकाळी
ते वस्त्र रंग गुलाबी
मुखचंद्र अनावरण करता
ह्रदयास हुडहूडी भरली
नजरेस तिच्या त्या वरता
बोलास काही ना सुचले
ते मूक-मूक गलबलले
शेवटी तिने पाहियले
त्या निष्ठुर घटिकायंत्री
मी येते आता म्हटली
मी येते आता म्हटली
छान चालू आहे..
उत्तर द्याहटवामला तुमचे सर्व लेखन फार आवडले . मी पहिल्यांदाच वाचतोय तुमचा ब्लॉग. तुम्ही बरेच विद्वान पन दिसत आहात. धडाडी पन दिसत आहात . मी पन कुळकर्णी च आहे . मी संभाजीनगर मधे होतो . आता नाही .
उत्तर द्याहटवानाही हो प्रभाकरजी, मी विद्वान वगैरे काही नाही..क्षमस्व..!
उत्तर द्याहटवापण लेखन आवडले त्याबद्दल धन्यवाद !
कालच तुमचे प्रोफाईल पाहिले होते...कतार, लोखंडाचे कारखाने इ.इ...खडतर आणि जगावेगळा प्रवास आहे म्हणायचा तुमचा.
तुमचे स्वागत!